नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 22 March 2011

बालभारती

घडामोडी घडत असतात. परिणाम कधी चांगला कधी वाईट. मग त्यावर चर्चा, उहापोह. कारणमिमांसा...वगैरे वगैरे.

जे घडले आहे ते मांडले नाही, त्यावर विचार केला गेला नाही तर त्यातून धडे कसे घेतले जाणार? असा प्रश्न मनात उभा रहातो.

घटना कधी जागतिक स्तरावरील असतात, कधी असतो कोणा एका देशाचा प्रश्न, कधी जिल्ह्याचा, कधी गावाचा, कधी गल्लीचा आणि शेवटी कधी एका घराचा. एका कुटुंबाचा.
परंतु, त्या सर्वात समान धागा? माणूस. त्याचे हक्क, त्याची कर्तव्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या भावना. आणि हा माणूस कोण? तर तुम्हीं आम्ही.

एखादा अनार फोडला तर काळ्याभोर आकाशात नयनरम्य दृश्य उभारतं. अगदी दूर दूर कोणा एका फुटपाथावर आकाशाकडे नजर लावून निद्रेची प्रतिक्षा करणारा देखील एक क्षणभर सुखावून जातो. हे कधी होतं, तर एखादी आनंददायी गोष्ट अगदी जगभर फोडली तर.

मग कोणाच्या दु:खाचं काय? ते सांगून, ते ऐकून नक्की काय घडतं? का फक्त त्या माणसाचं मन हलकं होतं? की त्याही पलीकडे काही?

जपानमध्ये नैसर्गिक जुळी आपत्ती उभी रहाते. पृथ्वीवरील सर्व देश आपापले घर पडताळून बघू लागतात. पुढच्यास ठेच लागते. मागचा शहाणा होतो. निदान तसे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. कोणाचे दु:ख कोणाला जागे करते. शहाणपण देऊ करते.

काय आपण फक्त एखाद्या झाडाला लागलेली फळे आहोत? जेणेकरून त्यातील एखाद्या फळाला कीड लागली तरी शेजारच्या दुसऱ्या फळाला त्याचा थांगपत्ता नसेल. त्याविरुद्ध स्वत:हून काही काळजी घेण्याची क्षमता देखील नसेल.

दु:ख काही एखादा मोती नव्हे...हातास लागला तर त्याचा गाजावाजा करू नये...गुपचूप पुरचुंडी करावी, खिशात सारावी...मजल दर मजल करत राहावे.

दु:ख, एक बालभारती... ते तिथे आहे...त्यातून शिकण्यासारखे बरेच आहे...फक्त वरवर चाळले, तर फक्त पांढऱ्यावर काळे आहे. परंतु, धडे मन लावून वाचले तर फायदाच आहे. कधी त्यात स्वत:ला बसवून, तर कधी दूरवरून न्याहाळून.

बालभारती उघडे टाकण्यामागे हा एकमेव उद्देश आहे.

15 comments:

Shriraj said...

"फक्त वरवर चाळले, तर फक्त पांढऱ्यावर काळे आहे. परंतु, धडे मन लावून वाचले तर फायदाच आहे. कधी त्यात स्वत:ला बसवून, तर कधी दूरवरून न्याहाळून"

व्वा! क्या बात है!!

Gouri said...

दुसर्‍याच्या दुःखातून आपण शिकलो नाही, तर अजून जास्त किंमत मोजावी लागेल हा धडा शिकायला. :(

सौरभ said...

प्रत्येक बालभारतीत धडे वेगळे आहेत आणि ते समजून घेण्याची प्रत्येकाची कुवतही...

हेरंब said...

अनघा, तुझी बालभारती आमच्यासाठी बल-भरती आहे. एकेक अनुभव वाचून नवीन नवीन बळ येतं... भरतीसारखं !

Raindrop said...

I like the Balbharati connect a lot. Unfortunately the ability to learn from others mistakes comes with time...and sometimes a little late :(

आनंद पत्रे said...

श्रीराज ++
हेरंब ++

Anagha said...

धन्यवाद श्रीराज. :)

Anagha said...

ह्म्म्म... नको...अशी अजून जास्त किंमत कधीच कोणाला मोजायला लागू नये....
हो ना गौरी? :)

Anagha said...

बरोबर सौरभ...परंतु त्यात overlaps देखील आहेतच.... :)

Anagha said...

:D हेरंबा, बल-भरती!!! :D

Anagha said...

धन्यवाद वंदू.
हे बरिक खरं आहे गं....माणूस दुसऱ्यांच्या अनुभवातून नाही शिकत! :)

BinaryBandya™ said...

दु:ख, एक बालभारती... ते तिथे आहे...त्यातून शिकण्यासारखे बरेच आहे...फक्त वरवर चाळले, तर फक्त पांढऱ्यावर काळे आहे. परंतु, धडे मन लावून वाचले तर फायदाच आहे. कधी त्यात स्वत:ला बसवून, तर कधी दूरवरून न्याहाळून.


अप्रतिम ..
अनघाच्या बालभारतीतले धडे नेहमीच काही ना काही शिकवतात ..

Anagha said...

बंड्या....मी काहीतरी शहाणपणा शिकवतेय...असं काहीतरी वाटतंय का? :(

THEPROPHET said...

ए ताई कधीतरी किशोरभारतीपण लिही ना! :P

Anagha said...

विद्याधर ! :D