नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 18 March 2011

बाऊ?

अंधार पडून जुना झाला होता. डोक्यावर येऊन पडलेली कामे आटपता आटपता सकाळचे नऊ आणि रात्रीचे नऊ...नेहाचे घड्याळ तिला एव्हढेच दाखवत असे. त्यात दिवसाभरात कधीतरी पोटात काही घालणे म्हणजे फक्त 'साखरेची बरणी रिकामी झालीय, त्यात साखर भरून ठेवणे' असे. इतकेच.

सकाळी घरातून निघाल्याक्षणी कामांची एक यादीच तिच्या डोक्यावर घिरट्या घालू लागे. आणि कार्यालयातून घरी परतताना घरच्या काळज्या रोज चुकता एक अवाढव्य गोणी बनून डोक्यावर आपटत असत.
ठीक. नाहीतरी घरातील कमावत्या बाईची वेगळी काय कहाणी असणार?

गाडी तिची, चालवणारी ती. म्हणजे गाडीतले क्षण हे दिवसाभरातील तिचे फक्त तिचे म्हणता येतील असे एकांताचे क्षण. आज तिने मग तिच्या कॉलेजमधील मित्राला फोन लावला. कधीकधी आयुष्यात मागे वळून बघितलं तर काही चांगल्या घटना घडून गेलेल्या जाणवतात. काळाच्या चाचणीत टिकून राहिलेल्या. तसाच हा तिचा मित्र. खरं तर तिच्या नवऱ्याचा. आणि म्हणून तिच्या आयुष्यात आलेला. नवरा नुकताच काळाच्या ओघात दृष्टीआड झालेला पण ह्या निखळ मैत्रीला कसली गणितं नव्हती. सध्याच्या जगात मित्र म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवता येणाऱ्यांची संख्या कशी अगदी एक आणि दोन. विचारपूस करण्यासाठी फोन लावला होता. म्हणजे तुझ्या णांगणावर काय चालू आहे आणि माझे पानिपत झाले आहे...हा आणि असाच संवाद...बरेच महिने नव्हते बोलणे झाले. म्हणून आज ठरवून नंबर फिरवला होता.

"बोल गं. कशी आहेस? काय चाललंय?"
"काही नाही रे. चालू आहे रोजचीच लढाई."
"लेक काय म्हणतोय?"
"ठीक आहे. अजून धक्यातून तितकासा सावरलेला नाही."
"का? काय झालं?"
"काही नाही. वजन खूप घटलंय. डॉक्टरकडे नेलं होतं."
"मग?"
"सगळ्या चाचण्या केल्या. शारीरिकदृष्ट्या सगळं तर ठीक आहे. पण वजन खूपच कमी झालंय."
"मग? आता?"
"काही नाही. मानसिक आहे."
"हम्म्म्म."
"आईवडिलांच्या चुकीच्या वागण्याने मुलांवर जे वाईट परिणाम होतात ते आता जाणवतंय!"
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही. आपण मोठ्या लोकांना आपण करतोय ते सगळंच बरोबर वाटत असतं. म्हणजे आपले आईवडील आपल्या बाबतीत चुकले असं तर आपल्याला नेहेमीच वाटतं. पण आपण आपल्या मुलांबाबतीत चुकतोय हे काही आपल्याला मान्य करता येत नाही. नाही का?"
"कोणावर रोख आहे तुझा?"
"रोख कोणावरच नाही. टाळी काही एका हाताने वाजत नाही. परंतु, ह्याच्या अति मद्यपानामुळे घरावर जे दुष्ट परिणाम झाले ते होणारच होते. नाही का?"
"हे मला अजिबात पटत नाही!"
"ह्यात पटण्यासारखं काय आहे?"
"काय यार! तो काय मारझोड करत होता? की बलात्कार केले? फक्त दारूच तर पीत होता. फुकट तुम्ही बायका इतके आरोप करता काय त्याच्यावर? अजिबात मान्य नाही मला हे!"
"आम्ही बायका?"
"मग काय तर! अजिबात पटले नाही हे मला!"
"पण तुला हे मान्य करायलाच हवं असं मी कधी म्हटलं?"
मित्राचं आपल्या गत मित्रावरचं निष्पाप प्रेम. आता काहीही संवाद होणे अशक्य. तिचा आजवरचा अनुभव. आणि हे जसं तिला माहित होतं तसंच ते त्यालाही माहितीच होतं. फोन तोडला गेला होता.

नवऱ्याने उभे केलेले वेडेविद्रे प्रसंग! दु:खाचे क्षण नेहेमीच सुखाच्या क्षणांपेक्षा अधिक घर करून रहातात. त्यांनी खोल खोल जखमा ज्या केलेल्या असतात. गाडी रोज मऊ रूमालाने पुसली म्हणून काय तिच्यावर गेलेले ओरखडे नाहीसे होतात?
मारझोड? नव्हती. बलात्कार? माणसाच्या जगात बलात्कार हे फक्त शरीरावर होतात. कदाचित वरच्या दरबारात मनावरील झालेल्या बलात्कारांचा देखील हिशोब ठेवला जाईल.

नेहाने दारावरची घंटा वाजवली. एकांत संपला होता. उघड्या दारात अक्राळ विक्राळ गोणी तयारच होती.

21 comments:

सौरभ said...

somewhere I had read -
"Pleasure of love lasts but a moment, Pain of love lasts lifetime"

Gouri said...

सुंदर!

ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. बाहेरून बघणार्‍याला त्याची आच काय समजणार? त्याला वाटेल राईचा पर्वत केलाय म्हणून.

Shriraj said...

:( मी दारू कधीच पिणार नाही :(

Anagha said...

खरंय सौरभ... :)

Anagha said...

ज्याचं जळतं त्यालाच कळतं... बाहेरून आच काय कळणार?
खरं ग गौरी...

Anagha said...

श्रीराज, :)

हेरंब said...

'बाऊ' वाचून काहीतरी हलकंफुलकं लिहिलं असशील म्हणून वाचायला गेलो तर..... :(

आनंद पत्रे said...

चटका लावणारं आहे :(

Anagha said...

हेरंबा, माफी. पण ही स्त्री पुरुषांची विचारांतील गल्लत सांगितल्याशिवाय राहवलं नाही....आणि तुम्हीं सगळे आहात ना...जे वाचतील आणि समजून घेतील म्हणून हा प्रयत्न....

Anagha said...

खरं आहे आनंद... सत्य बऱ्याचदा चटका लावून जाणार असतं...
पुरुषांसाठी ह्या गोष्टी बऱ्याचदा खूप साध्यासुध्या असतात..परंतु स्त्रीसाठी त्याच घटना मूळ पायाच ठिसूळ बनवणाऱ्या ठरतात...

हेरंब said...

अग माफी वगैरे कशाला... तुझा लेख नेहमीप्रमाणेच सुंदर झालाय.

THEPROPHET said...

:(
संवादातला तो स्टेलमेट फारच भिडला मनाला!

Anagha said...

ह्म्म्म.
विद्याधर, बरेचदा आपल्या 'फिक्स्ड आयडीयास' मुळे हे असे 'स्टेलमेट' आपण बऱ्याचदा आणतो...
नाही का?

सारिका said...

माणसाच्या जगात बलात्कार हे फक्त शरीरावर होतात. कदाचित वरच्या दरबारात मनावरील झालेल्या बलात्कारांचा देखील हिशोब ठेवला जाईल.

खरंच मनाला चटका लावलास...

इंद्रधनु said...

आपलं दु:ख फक्त आपलंच असतं.... :(
मनाला भिडेल असं मांडता तुम्ही हे सगळं .......

Anagha said...

सारिका, प्रतिक्रियेबद्दल आभार गं.

Anagha said...

इंद्रधनू, कदाचित आपल्या दु:खात देखील एखाद्याला धडा असतो...
प्रतिक्रियेबद्दल आभार.

Anonymous said...

>>> कदाचित वरच्या दरबारात मनावरील झालेल्या बलात्कारांचा देखील हिशोब ठेवला जाईल.

अनघा अगं ’पुरूष’ नाटक पाहिलं परवा.... बलात्कार हा शब्द मनात घर करून राहिला होता, विचारांचा भुंगा डोक्यात नुसता... हेच विचार गं.... मनावरचे बलात्कार काय कमी त्रासदायक का? असेच काहिसे....

:(
:(
>>>ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. बाहेरून बघणार्‍याला त्याची आच काय समजणार? त्याला वाटेल राईचा पर्वत केलाय म्हणून.

... तुझ्या व्यक्त होण्याबद्दल पुन्हा काय बोलू.... सुंदर नेहेमीप्रमाणेच...

Anagha said...

तन्वी, आभार गं.

रोहन... said...

अनघा... प्रासंगिक संवाद छान आहे पण मला १-२ गोष्टी सांगाव्याश्या वाटत आहेत... १ म्हणजे दारू पिणे वाईट हे चूक की बरोबर हे ज्याचे त्याला माहित. कारण प्रत्येकाची व्याख्या वेगळी. त्याचा त्रास दुसऱ्याला न होणे योग्य. मला वाटतंय आपल्याकडे किती, कधी आणि कशी प्यावी हे लोकांना अवगत नसल्याने दारू पिणे हे चूक ठरवले गेले आहे. सुरापान करणे हे देखील एक शास्त्र आहे.. ते ज्याला उमगले तो आनंद घेऊ शकतो आणि वाटूही शकतो.
आता जरा बलात्कार ह्या शब्दाकडे वळूया. आज शब्दश: जो अर्थ (शारीरिक जबरदस्ती) आपल्याकडे धरला जातो तो तसा नसून नुसता 'जबरदस्ती' असाच आहे. मग ती कसलीही जबरदस्ती असो. जुन्या कागदपत्रांमध्ये हा शब्द ह्याच अर्थाने वापरला गेला आहे...

सहज वाटले म्हणून लिहिले.. गैरसमज नको... आणि उगाच bau पण नको.. :)

Anagha said...

:)