नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 11 March 2011

शिक्का

प्रत्येक कार्यालयाची काम करण्याची एक पद्धती असते. प्रणाली असते.

एक अतिभव्य कार्यालय. एच आर विभाग. त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या? अगणित. त्यांचे कामाचे तास? २४ X ७. अथक. ज्याने ही माणसे त्याच्यासाठी शोधली आहेत त्याची पारख हिऱ्यांची आहे. अतिशय बारकाईने ही नेमणूक केली गेलेली आहे. त्यांचे काम काय?

त्याने प्रत्येकाकडे काही माणसांची यादी दिलेली आहे. व पाच शिक्के. समजा एका कर्मचाऱ्याकडे दहा माणसांची नावे. एका शिक्क्यावर आहे 'हुशारी'. दुसऱ्यावर 'लबाडी'. तिसऱ्यावर समाधानकारक. चवथ्यावर असमाधानकारक. पाचव्यावर मूर्खता. त्या एका कर्मचाऱ्याचे काम काय? तर त्याने त्याला दिलेल्या माणसांच्या प्रत्येक क्षणावर नजर ठेवायची आहे. व तो मनुष्य निद्रिस्त झाल्यावर त्यातील एक शिक्का उचलून त्या माणसाच्या त्या दिवसाच्या कागदावर मारायचा आहे. म्हणजे तो माणूस त्या दिवशी कसा वागला आहे ते बारकाईने न्याहाळून तो शिक्का मारला जाणे अपेक्षित आहे. त्या दिवशी तो माणूस लबाडीने वागला आहे की माणुसकीने...की काही भयंकर. आणि मग त्याच्या आयुष्याची वर्ष संपता संपता त्या व्यक्तीची ती नोंदणी पूर्ण करून त्याच्या नावाची एक फाईल केली जाते. त्यावरील डकवलेल्या कागदावर एक तक्ता असतो. पाच कॉलम्सचा. त्याखाली आकडे टाकलेले...गोळाबेरजेचे. म्हणजे लबाडी १ लक्ष, हुशारी पन्नास हजार....वगैरे वगैरे. इथे त्या कर्मचाऱ्याचे त्या व्यक्तिसंदर्भातील काम संपते...

आता तो गठ्ठा जातो त्यांच्या वरिष्ठाकडे. वरिष्ठ एकमेव. तो नजर टाकतो फक्त त्या टक्केवारीकडे. त्याच्या माणसांनी केलेल्या कामावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. नि:संशय. त्याची फक्त एक नजर. त्या माणसाने, त्याचे आयुष्य कशा प्रकारे घालवले आहे ह्याचा सर्वंकष विचार करायला चाणाक्ष देवाला काही क्षण पुरतात. त्या टक्केवारीवरून. आणि त्याच्याकडे शिक्के किती? फक्त दोन. पुण्यवान आणि पापी. त्या फाईलवर शेवटचा त्याचा शिक्का. संपलं.

दान म्हणून मिळालेले एक आयुष्य संपते. दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा हिशोब संपतो. आणि मग पुढील जन्म त्या मनुष्यव्यक्तीला कुठलं दिलं जावं हे ठरते. त्या पापी आत्म्याला अधांतरी लटकत ठेवावे वा किडामुंगीचे आयुष्य दान करावे हे त्या 'रिपोर्ट कार्डा'वर ठरते.

जर माझ्या कार्डावर काल 'मूर्ख' हा शिक्का पडला असेल तर त्याच क्षणाला मी कित्येक वर्ष ज्याला मित्र मानत आले त्याच्या कार्डावर 'लबाड' हा शिक्का मारला गेला असलाच पाहिजे.

कधी घरात टीव्ही चालू आहे म्हणून नजरेस ह्या मालिका पडल्याच तर प्रश्र्न पडे, कोणाला एव्हढा वेळ असतो कपट कारस्थाने करायला? आणि का कोणी आपली बुद्धी व वेळ असा घालवावा?

बेसावध मी होते. नाते मैत्रीचे. ह्या नात्यातील पुरुष कधी मला जिवलग नव्हता. पण काय मित्र आणि शत्रू, ह्यामध्ये काहीच नसते? अगदी घट्ट मैत्री, जिवाभावाची मैत्री आणि अगदी साधी एक मैत्री असेही काही मैत्रीचे स्तर असतात की नसतातच?

एका मित्राने ह्या मुंबईतील जागेच्या निमित्ताने दहा वर्षांपूर्वी पाठीत खुपसलेला खंजीर काल हृदयापर्यंत पोचला...आणि माझ्या ह्या कथित मित्राचाच मित्र, एका हपापलेल्या बिल्डरने, हसतहसत माझी मूर्खता मला जाणवून दिली. चुकीच्या माणसांना मित्र म्हणून घरात घ्यायची माझ्या नवऱ्याची खोड मला पुन्हां नडली!

शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यांची हाव नाही संपणार आणि माझा मूर्खपणा नाही कधी संपणार.

रं आहे...देवाने ज्या कर्मचाऱ्याकडे माझे नाव दिले आहे त्याचे काम सोप्पे. झोपेत देखील करता येण्यासारखे. रोज तोच तो एकच तर शिक्का उचलायचा आणि खाडकन माझ्या दैनिक रिपोर्टवर मारायचा.

टॅक! शिक्कामोर्तब!
'मूर्ख'!

18 comments:

Gouri said...

हम्म. त्याच्यावर अविश्वास दाखवला असतास तर त्याचा जास्त मनस्ताप झाला असता ना? ‘लबाड’ किंवा ‘बन चुके’ चा शिक्का मिळण्यापेक्षा ‘मूर्ख’ चा मिळालेला परवडला ग.

BinaryBandya™ said...

"कपटी/कारस्थानी" पेक्षा "मूर्ख" म्हणा चालेल ..

Raindrop said...

thoda confusing ho gaya....kuch samajh hi nahi aaya:(

Anagha said...

खरं आहे गौरी...शेवटी त्याचं पाप त्याच्याकडे....पण ह्यातील मला बसलेला फटका फार मोठा आहे....

बघू, देव जर असेल तर तो सत्यालाच साथ देईल...

Anagha said...

बंड्या, हे खरंच आहे. कारण कपट कारस्थानं करून आपल्याला कुठे शांत झोप लागणार आहे? नाही का?

Anagha said...

मौन का सौरभ? तू म्हणत असशील...काय आणि कुठे कुठे लढत बसलीय ही बाई! हो ना?! :(

Anagha said...

Vandu, I knew this one is going to get difficult for you...

It's like God has his own HR dept which keeps track of each and every person for him....every person's good and bad behaviour has been kept for him in a file. Like in our offices?
By the end of our life God has exact track of our journey...so it becomes easy for him to decide what kind of life he wants to give us in our next 'avatar'!
:)

Raindrop said...

u r equating Sapna to God he he he now that's something :)
I am sure my record is so bad in this case that next janam to kya even if I reapply for the same post in this janam.....I will not be taken it :)

Anagha said...

hmmmm! Sapna!
But don't you think that there is somebody who is keeping track of all our deeds? I just gave Him some methodology!! :p

sanket said...

जैसा करम करेगा वैसा फ़ल देगा भगवान,
ये हैं गीता का ‍ज्ञान .....

विश्वास ठेव, मी अनुभवलंय. त्यामुळे "मूर्ख" चा शिक्का परवडला.(अर्थात, "महामूर्ख" हाही शिक्का असतोच देवाकडे, तो बसू नये कपाळावर! )

Anagha said...

खरं आहे संकेत तुझं! धन्यवाद!
:)

भानस said...

अनघे, अगं नेमके काय घडलेय हे कळत नसल्याने गोंधळ उडालाय. मात्र तुझे मनस्वास्थ्य अतिशय कोलमडले आहे हे जाणवतेयं.

बयो, जप तू. त्याचे पाप त्याच्याकडे म्हटले तरी त्या पापाच्या झळीचे चटके तुला बसत आहेत. :(

Shriraj said...

अनघा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन... तुला यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी

Anagha said...

ब्लॉग लिखाणाचं हे एक बरं असतं! एका तर मित्रवर्ग वाढतो आणि मग सगळ्यांच्या शुभेच्छा मिळतात! आभार रे श्रीराज.
:)

THEPROPHET said...

'मूर्ख' वगैरे काही नसतं गं! आपण आपलं काम करतो, तो त्याचं काम! जग चालायचं कसं नाहीतर? :-/

रोहन... said...

प्रोफेट बरोबर बोलतोय... तो कधी चुकू शकतो का... :) रहात गड अस चालायचंच... :)

Anagha said...

खरंय विद्याधर...

Anagha said...

जग चालायचं कसं नाहीतर...खरंय रोहन...