नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 14 January 2011

रिकामं आकाश


















मला वाटतं...
मला वाटतं...मी एक ढग होतो. काळा सावळा ढग. तरंगता. संथ. माझ्या घरावर वहाणारा. शांत छाया अंथरणारा. सहा मुले. तीन मुलं. तीन मुली. सहा मुलांची एक आई. रहाणार लालबाग. गिरणगाव. चाळीची एक खोली. रोज सकाळी सातला खोली सोडायची. भायखळ्याच्या गिरणीत पोचायचं. चटचट. चालत. काळा रस्ता. वळणाच्या टोकाशी एक रोप कोपऱ्यातलं. कुठून तरी आलेलं. तिथं रुजलेलं. कोणाला ना पत्ता. कोणाला ना थांग. नेमकी नजर गेली की हलकेच डुलायचं. कधी दादरा उतरून रस्त्याला लागायचो. वर पहिल्या मजल्यावरील आमच्या बंद दाराकडे बघायचो. तर कोण नसायचं. ना छोटी शकू. सगळं स्तब्ध. घरातून दार ढकलून निघालो की पहिली हालचाल ह्या रोपाची. हलकी हलकी. फक्त माझ्यासाठी.

दिवेलागणीस घरी परत. जे काही पैसे मिळायचे ते हिच्या ताब्यात. मी बचत केली. थोडे खिशात घातले. थोडे थोडे करून जमवले. तीनचार महिन्यातून एक क्वार्टर. बस. बाहेर सज्ज्यात बसलेला मी. माझा संवाद मनात. तिचा भांड्यांशी. भांड्यांची तिला साथ. आदळआपट. हिची सगळी भांडी तारस्वरात ओरडणारी. त्याला वेगळा ताल तिच्या दात ओठांचा. कडाकडा. कधी आत डोकावले तर शकू गुमान कोपऱ्यात बसून.
ताट बाहेर आणून आदळायची. चपाती उडायची, हलकेच येऊन तिरपी पडायची. डाळ डुचमळायची. जशी गढूळ डबकं. हे सगळं दारू प्यायलो म्हणून. पण मी तेव्हढंच करायचो. लक्ष्मीला कधी खेळायला नाही लावली. मग जाऊन गुमान सज्ज्यात बसायचो. वर नजरेला आकाश. टक लावून बघायचं. नजर न हलवता. पापणी न फडकवता. खोल खोल. शिरतो आपण. आत आत. मग हळूहळू मी तरंगतो. आकाश उघडतं. मी सज्ज्यात नसतोच. निमुळता सज्जा. फिरतो. चढता होतो.
दार. बंद दार. आणून टाकलेलं माझं अंथरूण. बदलतं आकाश. गडद होणारं. थंड. तेव्हापासून मला वाटायचं, मी एक ढग आहे.
हे असं दिवसेंदिवस केलं की मग त्याची सवय होते. कोणाशी न बोलण्याची सवय. मी बोलतो. फक्त तोंड न उघडता. तशी मी सवय लावून घेतली. सोपी सवय. बोलणं जरुरीचं नसतं. संवाद जरुरीचा असतो. मग आसपास बघितलं तर सगळ्यांना बरंच वाटलं. दहा बाय दहाची खोली एक रंगमंच. उठती, चालती, आपापसात बोलती माणसं. माझी भूमिका एकच. महिन्याच्या एक तारखेला. ते पण जर बंद दाराच्या फटी खालून पाकीट सरकवलं असतं तर सगळ्यांना बरंच वाटलं असतं. माझ्या कानांसाठी दर महिन्याला फक्त तीन शब्द. "द्या. पगार द्या." महिन्याला तीन म्हणजे वर्षाला किती? ३६.

दिवसेंदिवस. वर्षानुवर्ष. हे सगळं वाहणाऱ्या या ढगाचा सातजणांना ना कधी पत्ता लागला. मी होतो. माझी छाया होती. माझ्या माणसांवर पडलेली. न झाकोळणारी सावली.

ते रोप वाढलं. हिरवं डवरलं. पिंपळ तो. भरल्या तारुण्याने सळसळला. मी पिवळं पान झालो. एक दिवस रिटायर झालो. पेन्शन घेऊ लागलो. कायम मुक्काम पोस्ट सज्जा.

सज्जात बसल्या जागी त्या दिवशी एक बघितलं. ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं त्या दिवशी विश्वास नाही बसला. नाही कळलं हे कधी चालू झालं?
मुलं मोठी झाली होती. सकाळी बाहेर पडू लागली होती. कामासाठी, शाळेत, कॉलेजात. आणि माझी सगळी मुलं बाहेर पडताना त्यांच्या मातेच्या पाया पडू लागली होती. रोज. प्रत्येकजण. मी बाहेर सज्ज्यात बसून होतो. कोणाला कधी दिसलो नाही. कोणी आलं नाही. पायाशी कोणी वाकलं नाही. माझा संवाद मनाशी. त्यातील वाक्यांत मग भर पडली. आयुष्यमान भव. ऐकायला कोणी नव्हतं. पण मी बोललो मात्र.

मला वाटतं...
मला नेहेमीच वाटतं...मी एक ढग होतो. काळा सावळा ढग. तरंगता. संथ. वर तरंगत राहिलो. छाया देत राहिलो. एकटक जेव्हा आकाशात बघतो त्यावेळी माझ्यासाठी आकाश उघडतं. मी आत शिरतो. खोल. मी खोल खोल शिरतो.
आज मी वळून मात्र बघत नाही.
ढग सरकल्याचं कधी कोणाला कळलंय?
नाही.
पेन्शनचा ढग सावली देऊ लागल्यावर काय कोणाला कळणार होतं.
एक म्हातारा पिंजलेला ढग....कधीतरी विखुरला.
आणि कधीतरी...
कधीतरी...विरून गेला.

18 comments:

सौरभ said...

:) लेख असला तरी काव्यमय आहे. माझ्यासाठी बराचसा abstract असा. उगीच चुटपुट लागून राहिलीये.

भानस said...

खूपच छान अनघा. रिकाम्या आका्शाचं कर्तुत्व न पाहणारे वेडेच.

Anagha said...

सौरभ, आपल्यासाठी अबोल खस्ता काढणारा माणूस, नेहेमीच बोलून दाखवणाऱ्या माणसापुढे झाकोळला जातो. नाही का?

Anagha said...

भाग्यश्री, सगळ्यांना छायेत घेणाऱ्या एका ढगाचं अस्तित्व...आपण दुरून बघतो तेव्हा त्याचं महत्त्व कळतं.

THEPROPHET said...

मला "अगं बाई अरेच्चा!" मधला 'गणपत' आठवला! :-S

हेरंब said...

खरंच चुटपुट लागली खूप :(

न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही आणि बोलणार्‍याची मातीही विकली जाते म्हणतात ते खोटं नाही !

Anagha said...

किती खरं बोललास तू हेरंब. अशी माणसं आयुष्यात भेटतात आणि खिन्न करून जातात.

Anagha said...

विद्याधर, मी तो सिनेमा नीट बघितलेला नाही. पण त्यातील गाणं...'मन उधाण वाऱ्याचं ..' मला अतिशय आवडतं.

Anonymous said...

>न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही आणि बोलणार्‍याची मातीही विकली जाते म्हणतात ते खोटं नाही !


+ १

अगदी असेच म्हणतो.
असे काही वाचले की मन तळमळत का कोणास ठाऊक :(

Anagha said...

राज, प्रतिक्रियेबद्दल आभार.
देवाच्या कल्पक डोक्यातून प्रत्येक जीवित प्राण्यासाठी एक कथा लिहिलेली असते. वारंवारता टाळून. असंख्य व्यक्तिचित्रे, अमाप स्वभावछटा आणि अगणित पैलू! नाही का?

Shriraj said...

अनघा, तुझ्या मनात दारूबद्दल आकस नाही हे मला खूप आवडतं.

सौरभ म्हणतो तशी गोष्ट काव्यमय झालेय... झुम्पा-च्या गोष्टींसारखी तरल आणि तरीही रुखरुख लावून जाणारी.

भानसच्या "ठण...ठण"-नेही माझं असंच झालं...

Anagha said...

श्रीराज, असमतोल...दांपत्यातील कोणी तरी एक, अधिक उंचीवर उभा राहिला कि होतो...मग ते स्त्री किंवा पुरुष कोणीही असो...असं मला वाटतं.
दुसरी गोष्ट दारूसंदर्भात...तिच्यावर प्रेम करण्यासारखं तिच्यात काही आहे असं काही अजून तरी वाटलेलं नाही.

Raindrop said...

saurabh is right....this prose is poetry in itself. very beautiful. i felt i was watching a small clip of a short telefilm as i read this. kharach...khoop khoop chhan :) and the background matches it too :)

Anagha said...

आभार आभार वंदू!! :)

BinaryBandya™ said...

मलाही सज्जात उभा राहिलेला गणपत आठवला "अग बाई अरेच्चा" मधला...

अबोल खस्ता खाणारी माणसे - अप्रतिम लिहिले आहे ..

Anagha said...

आभार बंड्या. :)

Unknown said...

अनघा, आई थोर की बाबा, स्त्री की पुरुष? ह्या प्रश्नाच उत्तर आहे का? पण मला नेहमी वाटत,ढगाच्या सावलि पेक्शा पदरा ची फार सुखावून जाते. 

Anagha said...

राम, आईने जन्म दिलेला असतो, कळा सोसलेल्या असतात...परंतु, आई श्रेष्ठ कि वडील ह्या प्रश्नाला पक्कं उत्तर मिळू शकणे मला थोडे अवघडच वाटते. ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकते. कारण दोन अतिशय वेगवेगळे स्वभावधर्म एकत्रित आलेले असतात..आणि ते उत्तम प्रतीने एकत्रित व्हावे/रहावे अशी अपेक्षा असते...वा तसे झाले तर कुटुंब सुखाने वाढू शकते. परंतु त्यातील एक वरचढ व एक मृदू असेल तर दुर्दैवाने ते मिश्रण एकजीव होणे कठीण...ढगाची व पदराची सावली एकत्रित लाभणे म्हणजे भाग्यच. :)
प्रतिक्रियेबद्दल आभार. :)