नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 25 November 2010

रामाची वही

त्या वेळी दादर माहीम परिसरातील चवथी ते आठवीपर्यंतची मुले, शंभर पानांच्या वहीत 'श्री राम जय राम जय जय राम' हा मंत्र उतरवत होती. त्यांना शाळेने तशी सुचना दिली होती. महिन्याभरात वही पूर्ण करून आपापल्या वर्गशिक्षकाकडे ती सुपूर्त करायची होती.

बालमोहनमध्ये हस्ताक्षराला उचित महत्व दिले जात असे. सध्याची परिस्थिती माहित नाही परंतु त्यावेळी ते ज्ञ लिहिता येऊ लागल्यावर मुलांना एक छापील वही दिली जात असे. त्यात प्रत्येक अक्षर हे रांगोळीवजा छापलेले असे. ठिपक्याठिपक्यात. सर्व विद्यार्ध्यांनी त्यावर पेन्सिलीने घोटवून आपले हस्ताक्षर बालमोहनच्या पठडीत बसेल इतपत सुधारणे अपेक्षित असे. आणि तसे नाही झाले तर आपली वही शिक्षकांकडून वर्गाबाहेर भिरकावली जाऊ शकते असा मुळी दबदबाच प्रत्येक शिक्षकाने कमावलेला असे.

त्यामुळे काही लिहायला घेतले की ते आपोआप ह्या मुलांकडून कागदावर रेखीवच उतरत असे. शाळेतून घरी आल्यावर हातपाय धुवून, ही मुले आपापल्या वहीत हा मंत्र लिहायला सुरुवात करत होती. 'श्री राम जय राम जय जय राम'. त्यांचा खेळही त्या कालावधीत कमी झाला होता. खेळाचा त्यांनी काही काळ त्यागच केला होता असे तुम्ही म्हणू शकता. लहान मुले पेन्सिलीने आणि मोठी फाउंटनपेनाने. रोज निदान तीन पाने तरी संपवणे गरजेचे. "नंदू अरे, जेवायला चल." "आलोच आई, हे एव्हढं पान होऊ दे!" हा आणि अश्याच धर्तीचा संवाद घरोघरी होत होता. "सुमा, अगं, झोप आता! अकरा वाजले!" "हो आई, शेवटची ओळ!" हळूहळू वही भरली जाऊ लागली. वहीला ९६ पाने असतात कव्हर धरून ती १०० मोजली जातात हे कळून मुलांच्या सामान्यज्ञानात भर पडली. नेमाने केल्याने, डाव्या हाताजवळ पानांचा थर अधिक आणि उजव्या हाताजवळ कमी अशी परिस्थिती हळूहळू होऊ लागली. पानांवर कोपऱ्यात आकडे पडू लागले आणि त्यातून एक चांगलेच निघाले. अशी पानांची नित्य मोजदाद झाल्याने मुलांचे आकडे पाठ होऊन गेले. ते ९६.

कशाने बरे भारला होता हा परिसर? कसला हा मंत्र? कोणाला हव्या होत्या ह्या वह्या? काय भवितव्य होतं ह्या वह्यांचं?

महाराष्ट्रात त्या वर्षी दुष्काळ पडला होता. रानोमाळ रखरखीत झाले होते. तलाव आटले होते. नद्यांनी तळ गाठला होता. डोंगर उघडेबोघडे पडले होते. वठलेली शुष्क झाडे हात रिकाम्या आकाशाकडे पसरून आर्त ये रे ये रे पावसा गात होती.

मग सरकार काय करत होते? सरकाराकडे ह्या दुष्काळावर काय उपाय होता?

उपाय हिंदू धर्माने शोधला होता. रामाची आराधना करण्याची गरज होती. तोच आता महाराष्ट्राला वाचवू शकत होता. मग रामापर्यंत ही आळवणी कोण पोहोचवणार? स्वर्गापर्यंत हा निरोप कसा धाडणार? प्रश्नाला एकंच उत्तर. पुरातनकालापासून. यज्ञ. यज्ञ, हा एकमेव उपाय होता. समस्त जनतेला वाचवण्याचा. त्या जाज्वल होमहवनानेच राम जागा होणार होता. कैक किलो तूप, शेकडो लिटर दुध दुभते जेव्हां आगीत धो धो ओतले जाईल, त्यावेळी त्या धूरधुपाच्या वासानेच त्या झोपी गेलेल्या सातव्या विष्णूवताराला जाग येईल. असे घडल्याचे रामायण महाभारतात दाखलेच आहेत.

मग त्या यज्ञाशी बालमोहनच्या बालकांचा काय संबंध?

होता. त्या बालकांचे श्रमदानच तर महाराष्ट्राला वाचवणार होते. चिमुकल्या हातांनी लिहिलेला तो मंत्रच तर रामाला भूतलावर यायला भाग पाडणार होता. आणि तो मंत्र तिथपर्यंत पोचणार कसा? अर्थात सर्व वह्या होमात आहुती जाणार होत्या. "घाल चुलीत!" असे म्हणून देखील कधी ह्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या वह्या आगीच्या भक्ष्यस्थानी घातल्या नव्हत्या. पुढल्या वर्षी त्या रद्दीत दिल्या जात असत. पण आगीत? कधीही नाही. ते बाल श्रमदान जेव्हां आगीत जळेल, माफी असावी, जेव्हां त्याचे हवन होईल, त्याचवेळी आपोआप ते मंत्र त्या मुलांच्या तालबद्ध सुरात, रामाच्या कानी पोचणार होते. राम प्रसन्न मनाने जागा होणार होता. आणि महाराष्ट्राचे रक्षण होणार होते. त्या कार्याला महात्म्य असेच तर प्राप्त झाले होते. देशासाठी श्रमदान. थोर भावना.

जसजश्या पूर्ण होतील तसतश्या वह्या शिक्षकांकडे जमा होऊ लागल्या. शिक्षकांच्या खोलीतील आपल्या शिक्षकांच्या कपाटात, वह्या कुलुपबंद करण्याचे काम वर्गप्रमुखाचे होते. सर्वांनी सुवाच्य अक्षरात वेळेवर वह्या पूर्ण केल्या. शेवटच्या दिवशी प्रत्येक वर्गशिक्षकाचा मंच वह्यांच्या गठ्ठ्यांनी भरून गेला. प्रार्थना झाल्यावर सर्व वर्गप्रमुख उपवर्गप्रमुख दोन्ही हातांवर ते पेलणारे ओझे घेऊन शाळेच्या हॉलच्या दिशेने खेपा मारताना दिसू लागले. सुरुवातीचे काही तास मग त्याच कामात गेले. जिल्हा ओला करण्याची जबाबदारी मुलांवर टाकण्यात आली होती. ती त्यांनी पार पाडली होती.

वर्गातील फक्त एका विद्यार्थाने ह्या धर्मादाय कार्यास विरोध करण्याची ठाम भूमिका घेतली. "मी असा काहीही मंत्र वहीत लिहिणार नाही. आणि तुम्हांला मी लिहिलेली वही अशी आगीत टाकू देणार नाही." तोपर्यंत वेगवेगळी तडफदार वाक्य फक्त शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांतून पाठ केलेली होती.

जवळजवळ ३००० वह्या आगीत भस्म झाल्या.

नेमेची येणारा पाऊस त्या वर्षी अंमळ उशिराने आला. मग थोड्याफार प्रमाणात नदयानाले भरले. अगदी हिरवा शालू नाही तरी हिरवी गोधडी डोंगरांनी पांघरली. मनुष्यहानी झाली. जनावरे मरण पावली. गरिबी अधिक सुस्तावली.

'श्री राम जय राम जय जय राम'

15 comments:

सौरभ said...

कोण तो/ती विद्यार्थी/नी??? आणि शाळेने असा धर्मांध कार्यक्रम राबवलापण??? कोणा विद्यार्थ्याच्या पालकाने काहिच तक्रार नाही केली??? काय वेडेपणा!!!

Anagha said...

मित्रांनो, पोस्ट बरी झालीय ना पण?? काळजीतच टाकता बुवा तुम्हीं मला! :)

Anagha said...

आमचीच शाळा ती सौरभ! आणि माझा एक शूर वर्गबंधू! तुझी उस्फूर्त प्रतिक्रिया चांगली वाटली. :)

Raindrop said...

hmmm....never heard anything like this....we were made to write 'India is my country' all the time. post is insightful and informative.

Well 'Ram' did appear in our sanskrit anuvaad classes where we had to translate 'sita ramen saha vanam gachhati' and we all secretly wrote our names and the names of the boys we had a crush on and giggles amonst ourseveles imagining the van n us ;)

हेरंब said...

अग बरी काय.. मस्तच झालीये एकदम.. नेहमीप्रमाणेच... पण मला नक्की काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना.. पोस्ट वाचल्या वाचल्या जी instant reaction होती (म्हणजे रडका स्मायली) ती टाकली..

Anagha said...

हां! हेरंब, ते वाटलंच मला! पण मग कळेना कि जागतिक पातळीवर मी लोकांना रडवतेय कि काय!! :p

Anagha said...

वंदू, मला खरं तर माझ्या शाळेचा किती अभिमान आहे! पण काल हे लिहिताना गर्वाचं घर जरा खालीच आलंय! :( आणि तुझ्या चिठ्ठीत कोणते नाव लिहिले होते तुम्हीं वंदना मडॅम?! :)

sanket said...

"देवा याही देशात पाऊस पाड" - दि.पु. चित्रेंची कविता आहे. अर्थात त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा होता. आणि मलादेखील तेच म्हणायचेय. पण तुमच्या शाळेत शब्दशः घेतला गेला!! खासगीत जे करायचेत ते करा, पण निदान शाळेततरी असले उपाय व्हायला नको होते.. आतापण असले उपाय होत असतील का शाळांमधे?
देवा, याही देशात पाऊस पाड!

Anagha said...

एखाद्या शाळेने अंधश्रद्धयेला पाठिंबा देत लहान मुलांकडून असे काही करून घेणे चुकीचे. आणि ही शाळा दूर कुठली कोनाड्यातील नव्हे. तर मुंबईसारख्या महानगरीतील.

भानस said...

कित्येक वेळा अशा असतात की चुकतेय हे कळत असूनही.... अजूनही हे असे वेडेपणे ग्लोबली होत असतातच. :(

Anagha said...

भाग्यश्री, निदान पुढली पिढी तरी माणूस म्हणून जगायला शिकेल का?

THEPROPHET said...

माणसं प्रचंड हतबल किंवा हतबुद्ध झाली की अंधश्रद्धेकडे वळतात आणि समूहामध्ये ही मानसिकता तर साथीच्या रोगाप्रमाणे पसरते. त्याप्रमाणेच हे घडलं असावं.
पण हा प्रकार खरंच माहित नव्हता. मुंबईत असं घडलं होतं हे ऐकून खरंच अंगावर शहारा आला.

Anagha said...

विद्याधर, काय माहित किती मुलांवर ह्याचे दुष्परिणाम झाले?! आमचा वर्ग भेटला तर निघते कधीकधी ह्या प्रसंगाची आठवण.

रोहन... said...

वह्या टाकण्याऐवजी सर्व मुले एकत्र पठणाला बसवायची ना.. :) लवकर झाले असते काम... :D

रामा बरोबर कृष्ण, हनुमान आणि शंकर सर्वच ... :D

Anagha said...

hmmmm