"अगं अगं, जरा नीट. किती घाई! सगळ्या एकाच आकाराच्या व्हायला हव्यात गं!"
"अगं, तेच करतेय! पण हा चमचा बघ ना तुझा! कसा घसरतो तो! तोच पळतोय घाईघाईत ! मग अश्या शेपटी शंकरपाळ्या होतात!"
'अश्या शंकरपाळ्या ठेवायाच्यात का लोकांसमोर?"
"जा! तूच कर मग!"
"झालं का? पळाली!"
अर्ध लक्ष त्या उद्या घालायच्या रांगोळीत! रांगोळीची तयारी कोण करणार मग?
ठिबक्यांचा कागद पण नाही अजून तयार झाला! नुसता ब्राऊन पेपर आणून ठेवलाय! फराळ करत बसले तर मग त्याला भोकं कोण पाडेल? किती कामं असतात दिवाळीची! अजून त्या कागदाला समान अंतरावर जळक्या उदबत्तीने भोकं पाडायचीयत तेव्हा कुठे आमचा ठिबक्यांचा कागद तयार होईल! आणि पांढरी रांगोळी कोण गाळणार? ते रंग आणून ठेवलेयत ते नीट बाटल्यांत कोण भरणार? आणि दिवसावारी कुठली रांगोळी काढायची ते नको का आत्ताच नीट ठरवायला? एव्हढी पुस्तक आहेत रांगोळीची! दर दिवशी आणि दर वर्षी नवी नको का काढायला? त्यासाठी नीट विचार करायला लागतो! आईला ना फक्त फराळच दिसतो!
दिवाळीचा पहिला दिवस उजाडतो तोच मुळी कुठे दूर उडालेल्या लवंगी माळेने. दिवाळीत कशी पहाटे सुद्धा टुणकन जाग येते कोण जाणे! झोप अगदी लगेच पळते! तेच अभ्यासासाठी पहाटेचा गजर लावून बघा! नाहीच होत ते बुवा!
उठल्याउठल्या आधी भराभर घराबाहेर धाव घ्यावी आणि कामाला लागावं! दाराबाहेरील जमीन झाडून पुसून स्वच्छ करावी. वाटीत लालबुंद गेरू थोडा ओलसर करावा आणि करावं सुरू. मनसोक्त फराटे ओढत जमीन लाल करावी. रुक्ष सिमेंटच्या त्या जमिनीला देखील हा लाल मातीचा ओला स्पर्श हवाहवासाच वाटत असेल नाही? सुंदर लाल गुळगुळीत जमीन तयार. हे होईस्तो आमच्या धाकट्या दोन भगिनींचे डोळे टक्क उघडे. आणि मग 'मी पण मी पण, मला पण मला पण'...सुरू!
ठिबक्यांचं सर्व गणित २० ठिबके, २४ ठिबके...३० ठिबके. तुम्ही कधी गाळलेल्या मऊसूत आणि तरीही रवाळ रांगोळीत हात खुपसलाय? बोटांना होणारा थंड स्पर्श किती सुखद. त्या आसुसलेल्या लाल जमिनीवर ठिबक्यांचा कागद घालून पांढऱ्या रांगोळीचे ठिपके घालावेत. आणि कागद कसा अगदी जपून उचलावा. थोडी सुद्धा रांगोळी लाल जमिनीवर पडता कामा नये. लिंबूटिंबू बहिणींना हाताशी घेऊन रांगोळी काढणे म्हणजे काही खायचं काम नाही! तिघीतिघी कामाला लागतो तेव्हा अख्ख्या बिल्डींगला जाग येते. जिन्यात मधेच बस्तान थाटल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा! दिवाळीत सगळंच माफ.
"अगं, नीट धर ना कागद. सांडवू नको अजिबात!"
"तिला नको घेऊया गं आपण! अजून लहान आहे ती! बघ ना कशी सगळी रांगोळी सांडवून ठेवलीय!"
"अगं, तू ना, तू जा, बाहेर आपल्या गॅलेरीत काढतेस का रांगोळी?"
पाच वर्षांच्या शेंडेफळाची छान भलावण आणि पाठवणी गॅलेरीत! मग तिची एक दुसरी रांगोळी तयार. म्हणजे आलेल्या पाहुण्यांनी द्वारासमोरची रांगोळी बघायचीच आणि मग गॅलेरीत जाऊन ही छोटेखानी चित्रकला बघायची आणि कवतिकं देखील करायची!
लाल जमिनीवर ते किंचित उभारलेले पांढरेशुभ्र रांगोळीचे दाणेदार ठिबके किती सुरेख दिसतात. मग सुरू. ती वळणं, ते चौरस, त्या चांदण्या आणि ते फुलोरे.
"अगं, तू ना मुद्दामून असं करतेस! गोलगोल चित्र शोधतेस! मग मला येत नाही ना!' हे रडवेलं मधलं सोंग.
"अगं, तू बाकीचे चौकोनबिवकोन काढ ना! ती वळणं सोड तू! ती काढते मी!" जेष्ठा मी! मग थोरपण नको दाखवायला?
एक तास ही चित्रकला. आणि मग रंग!
"अगं, चटणी देऊया का इथं? की राणी?"
"मोरपिशी पण मस्त दिसेल गं!"
(अख्ख्या पाच वर्षांच्या कलाशिक्षणात ह्या अश्या हुबेहूब छटा कधी नाही हो मिळाल्या! उलट गुरुवर्यांकडून ओरडा खाल्ला! चटणी...राणी...गुलबाक्षी...रंगांची अशी नावे घेतल्याबद्दल!)
अर्ध्या तासाच्या ह्या गंभीर चर्चेच्या निकालानंतर पुढचे दोन तास ते हळुवार रंगकाम. मग त्या रंगीबेरंगी रांगोळीचा गालिचा भरणे. म्हणजे कसं, सगळा फुलोरा रंगवून झाला की रिकाम्या जागा भरा. त्या भरल्याशिवाय कसा हा आमचा पर्शियन गालिचा तयार होणार? एव्हढ्यावरच संपत नाही बुवा! त्या सगळ्या फुलोऱ्याला, तारकांना शुभ्र पांढरी ठसठशीत बॉर्डर नको का? तेव्हा कुठे उठाव येणार गालिच्याला! आता बघा कसा घसघशीत दिसतो आमचा गालिचा! अगदी असं वाटावं की हळुवार उचललात तर जवळून न्याहाळू शकाल! मग भिरभिरवा चंदेरी कलाबूत! काळोखाच्या साम्राज्यात जेव्हां पणत्या लावाल तेव्हां चमकून निघेल गालिचा. मान डोलवाल तर चांदण्या चमकतील. जसं काही आकाशात गालिचा अंथरावा आणि त्यावर चांदण्या येऊन विसाव्या. झाली की हो रांगोळी तयार! मग रहा उभे. दुरून न्याहाळा की कवतिकं! कधी डावीकडून तर कधी उजवीकडून. तो समोरचा जिना चढून जा पाहू वर आणि टाका दुरून एखादा दृष्टीक्षेप. आम्ही तर अगदी नारसिससचे छोटे अवतार! स्वतःच्या 'मास्टरपीस' वर एकदम खुश!
तोपर्यंत पाच वर्षांच्या लिंबूची छोटुशी रांगोळी देखील तयार. घरात मात्र सगळीकडे छोट्या छोट्या रंगीबेरंगी पाउलखुणा.
इतक्यात काम संपलं नाही हो! चला! आता मोर्चा बिल्डींगमधील इतर दारांत. दोघी आणि पाठी एक शेपूट!
"मावशी, तुमच्या दारात काढू आम्हीं रांगोळी?" शेजारच्या शिंदे मावशींच्या घरी उपद्व्यापी कोणी नाही. चला मग. वाट कसली बघताय राव? घाला त्यांच्या दारात गालिचा. दोन तास मावशींना!
"व्वा व्वा! छान झाली बरं का रांगोळी!" मावशींकडून मूठभर मांस!
आता शेपटासकट मोर्चा वरच्या मजल्यावर.
"काकी, आमची झाली रांगोळी काढून! तुमच्या दारात पण काढू?"
वरच्या पेडणेकर काकींची मंगलताई घालायची रांगोळी. सुंदर टपोऱ्या गुलाबी फुलांची! पण ताई झाली ना परक्या घरची! मग काकींचं अंगण काय कोरडं ठेवायचं? चला पुढचे तीन तास काकींचे!
"अरे व्वा! छान छान!" सगळ्या पेडणेकर दादालोकांना आवडलेली आहे आमची रांगोळी!
हुश्श! अख्खा दिवस गेला की बाई!
थकलेलं सैन्य तंबूत परत.
"अगं मुलींनो! हे काय सगळं घरभर करून ठेवलंय! आवरा पाहू आता सगळं! दिवेलागणीची वेळ झाली! चला पणत्या लावूया!"
"आई, झाले कानवले? आम्ही खाऊ?"
"अगं अगं! हात नका घालू त्यात घाणेरडे! हातपाय धूवा पाहू आधी! आणि देवाला नैवेद्य कोण दाखवणार?"
"या या! अगं, दुर्गाबाई आल्यात बरं का!" बाबांनी दारातून आईला साद घातली.
मातेच्या आधी आम्ही तिघी समोर हजर!
अगदी उंचीच्या उतरत्या भाजणीत पाहुण्यांसमोर उभ्या.
आता फराळाला आलेल्या दुर्गा आजी आणि बाबांची समस्त मित्रमंडळी, आमच्या रांगोळीचं कौतुक करतील ते आम्हांला ऐकायला नको?!
24 comments:
मस्त.. नेहमीप्रमाणेच.. :) वाचता-वाचता शेवट आला कधी ते कळलाच नाही. मध्येच संपवलीस का पोस्ट? अजून पुढे लिहिता आली असती ना तुला? पण थांबलीस. खूपच आठवणी... :)
मी ही दिवाळी जाम मिसतोय... :(
दिवाळी आणि नववर्षाच्या असंख्य शुभेच्छा!!!
किती छान आणि सुरेख ते दिवस... व्वाह!!! मला गणपति/दिवाळीला घरापासुन लांब रहावं लागलय... ह्यावेळीदेखिल... काय वाटतय कसं सांगू?? हे प्रभो... पुढची दिवाळी घरच्यांच्या आणि मित्रमंडळींच्या सानिद्ध्यात जावो... (...दिर्घ सुस्कारा...)
रोहन, अर्धवट नाही ना वाटत पोस्ट? अरे तुला माहितेय ना परिच्छेदांवर परिच्छेद यायला लागले ना कि मला जरा कसं तरीच व्हायला लागतं! असं वाटतं कि अगं बाई, किती बोलतेस?! म्हणजे अगदी 'पगार किती आणि बोलते किती' स्टाइलमध्ये!! आणि खरंच! सणासुदीच्या दिवसांत घरापासून दूर राहावे लागणे म्हणजे जरा जास्तीच होतं! नाही का? मग असं म्हण पाहू तू कि,"अपने घर में तो हर दिन दिवाली!" :)
सौरभ, तुझा दीर्घ सुस्कारा अगदी पोचला बरं का इथे! म्हणजे अगदी माझ्या हातातलं वर्तमानपत्र फडफडलं!! hehe!! :p
नक्की पुढची दिवाळी तू तुझ्या घरच्यांच्या आणि मित्रमंडळींच्या सानिध्यात काढशील बघ!! :)
सुंदर सजलिए शब्दांची रांगोळी !!
दिपवलीच्या हार्दीक शुभेच्छा !!
दीपक, धन्यवाद. तुलाही हार्दिक शुभेच्छा! :)
अख्खी दिवाळीच उभी केलीस की गो...डोळ्या समोर !!! मस्तंच!!!!! छान छान
>>दिवाळीत कशी पहाटे सुद्धा टुणकन जाग येते कोण जाणे! झोप अगदी लगेच पळते! तेच अभ्यासासाठी पहाटेचा गजर लावून बघा! नाहीच होत ते बुवा!
+१००
थ्री मस्केटियर्सचं चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं! :)
श्रीराज, ती निरागस दिवाळी नेहेमी डोळ्यांसमोर उभी रहाते! :)
हेहे!! येस! विद्याधर, माझं खूप लाडकं पुस्तक आहे ते! तीन शिलेदार! एथॉस, पॉर्थोस आणि आरमीस!!! (हे अतरंगी उच्चार बरोबर आहेत का?) :)
nice :) could actually see u guys at it...rangoli kadhtana.
but whenever i think of rangoli n diwali...i remember my neighbour sadhna and her rangoli which she had made in 3 hours and my cats had destroyed in 3 seconds. when she came to know this ti phone war fakta mhanali 'no problem, me udya navin kadhen....pan udaya matra tyanna gharaatach thev haan'. what patience :)
अगं वंदू, निदान हे बिचारी तुझी मांजर नकळत चुकून करायची! आमच्या ह्या बिल्डींगमध्ये ना एक मुलगा होता तो आमची रांगोळी काढून झाली आणि आम्ही दार बंद केलं रे केलं की पायाने पुसून टाकायचा! आता गेला तो US ला!! Boys I tell you ! ;)
Yes Boyz I tell you!!!! How mean. Dharun marlach asta me tyanna if I sae them touching that rangoli!
hehe! अगं, त्याचा बाप एव्हढा अगडबंब आहे की घाबरली असतीस तू! :p
सुंदर !!! ’शब्दचित्र’ या category मध्ये छान बसते तुझे लिखाण.
जितके सुंदर तुझ्या बाबांचे चित्र आहे... शेजारीच... तितकेच.
:) धन्यवाद गं अलका!
दोन दोन तास मान खाली घालून हळूवार हातांनी नक्षी काढणं, मग रंग भरणं... सगळंच आठवलं. छान लेख लिहिला आहेस. आताशा मी रांगोळी काढत नाही पण तुझ्या एका लेखाने मला १० वर्षं मागे नेलं.
किती मज्जा असायची नाही का? मी करते हा उद्योग अजूनही! लेकीच्या मदतीने! धन्यवाद गं कांचन. :)
आमच्या दारात पण काढणार का ? ;)
मला रांगोळी नाय जमत चांगली. सध्या रांगोळी शिका प्रकल्प चाललाय त्यामुळे. संधी मिळाली की काढून बघत असते ... दिवाळीला एकटीच घरी होते तरी रांगोळ्या काढून झाल्या माझ्या :)
गौरी! चल, आता पुण्यात आले की येतेच मी तुझ्याकडे रांगोळी काढायला!!! तुझं आल्याचं फूल पण मिळेल का मग बघायला??? :)
आमच्या दारात पण काढणार का ? ;)
दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीत मुंबईत होते तेव्हा माझ्या भाचीने रंग, रांगोळी आणि काही साचे (मावशीच्या कला कौशल्याची कल्पना आली असावी तिला...) दिले होते...त्यातले साचे काय ते माझी लाज राखतात...रंग घालण्यासारख काही उरतच नाही.... तिने दिलेलं सामान किती वर्ष पुरणार माहित नाही...कमी झाल्यासारखं वाटतच नाही...
दिवाळीच्या शुभेच्छा ...
अपर्णा, पुढच्या वर्षी येतेच मी माझी टीम घेऊन!! तुलाही शुभेच्छा गं! :)
farach sundar lekh !!
sagla chitra agadi jasa chya tasa dolya samor ubha rahila..
as if i am one of ur younger sis...
I miss those days!
Keep writing.. always!
Best wishes, Sanju
संजू, मला खूप छान वाटलं तुझी उस्फूर्त प्रतिक्रिया वाचून!! खूप खूप आभार! येत जा अशीच! :)
Post a Comment