नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 29 June 2012

टूर'की'...भाग २

एकूणच थोडं इथेतिथे बघितलं की कळत होतं. जगाच्या नकाशावर हे टर्की म्हणजेच तुर्कस्थान तळहाताएव्हढं दिसत असेलही कदाचित, पण हा तळहात असंख्य रेषा, डोंगरदऱ्या ह्यांनी बहरलेला होता. आठ हजार वर्षांचा इतिहास जर त्या हाताने झेलला असेल तर तो हात किती आश्चर्यांनी डवरलेला, मनोहर झाला असेल ?

संस्कृतीची सुरवात झाली ती अन्तालीया इथून. सुरवातीच्या काळात हिताइट ( Hittite ) त्यानंतर पर्शियन. इसवीसनापूर्व १९० सुमारास व्यापाराच्या उद्देशाने रोमन. रोमनांनी स्थानिक ख्रिश्चन समाजावर केलेले अत्याचार. स्वसंरक्षणासाठी हा समाज विखुरला तो चवथ्या शतकापर्यंत भरकटला. परंतु, दस्तुरखुद्द रोमन सम्राट कॉन्स्टेनटाइन ह्यानेच धर्मांतर करून कॉन्स्टेनटीनोपल ( सध्याचे इस्तान्बुल ) उभारले. पुढे कॉन्स्टेनटीनोपल, बायझेन्टाइन साम्राजाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला. रोमचा, ग्रीक भाषा बोलणारा हा ख्रिश्चन समाज पुढे म्हणे जवळजवळ १००० वर्षे अस्तित्त्वात होता. हे इथेच संपत नाही. बायझेन्टाइन साम्राज्याच्या पुढे ठाकले सेल्जूक तुर्क. त्यानंतर ऑटोमान तुर्क. ऑटोमान तुर्कांनी अन्टालीया प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला व पंधराव्या शतकापर्यंत बायझेन्टाइन साम्राज्याचा समूळ नायनाट केला. पुढे ऑटोमान सर्वत्र पसरत गेले पार व्हिएन्नाच्या सीमेपर्यंत. १९१२ पर्यंत ग्रीक व सरबेयिन, इस्तानबुलवर हल्ला करून आले व पहिले जागतिक युद्ध सुरू असताना व त्यानंतरच्या काळात युरोपियन देशांनी एकूणच इस्तान्बुलची विल्हेवाट लावण्याचे ठरवलेलेच दिसून येते. त्यावेळी मुस्तफा केमाल अतातुर्क ह्यांच्या प्रभावी नेतृत्त्वाने हा देश वाचवला होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात अतातुर्क व त्यांचे सैनिक, ह्यांनी सर्व परदेशी हल्ले परतवून लावले. व १९२३ मध्ये तुर्क रिपब्लिकची स्थापना केली. त्यावेळेपासून टर्की हे आधुनिकीकरण अवलंबून आहे. यशस्वीरीत्या लोकशाही अवलंबून जागतिक पातळीवर स्वत:चे स्थान मिळवून आहे...

जगाच्या पातळीवर कुठेही गेलो तरीही अत्याचारांच्या खाणाखुणा ह्या दिसतातच. कधी प्राचीन तर कधी अर्वाचीन. जालावर वरील माहिती मिळाली. चीनमधील अजगरास्तव पसरलेल्या भिंतीची आठवण झाली. जगातील आश्चर्य म्हणून ओळखली जाणारी ती भिंत म्हणे पाडली तर आत लाखो प्रेतं सापडतील. गवंड्यांची वगैरे. भिंत बांधली जात असता कधी त्यांना मृत्यू आला तर तिथल्या तिथेच त्यांची शरीरे फेकून देण्यात असत...लगेच पुढे काम चालू !

लोनली प्लानेटकडून आलेल्या माहितीमध्ये इस्तान्बुल, कपाडोक्या आणि टरक्वाइज कोस्ट ह्यांचा ठळकपणे उल्लेख होता. त्यावर लिखाण होते. तेथील जागा, प्रेक्षणीय स्थळे, रहाण्याची विविध हॉटेल्स, स्वस्त, मध्यम व भारी, सर्व प्रकारची माहिती. टरक्वाइज कोस्ट म्हणजे टर्कीचा भूमध्यसागरी किनारा.
नकाशा बघितला असता ह्या तीन जागा करावयाच्या म्हणजे एक त्रिकोणी प्रवास होता. इस्तान्बुल डावीकडे वर, कपाडोक्या मध्यावर आणि टरक्वाइज कोस्टसाठी जायचं म्हणजे टर्किचा पायथा गाठायचा. कपाडोक्या करण्यासाठी नेवसेहीर वा कायसेरी एअरपोर्ट आणि टरक्वाइज कोस्ट करण्यासाठी अन्तालीया. कठीणेय ! टरक्वाइज कोस्टला भरपूर किनारे. भूमध्यसमुद्र. सायप्रस हे बेट ज्या समुद्रात आहे तो हा. सायप्रसला भेट देऊन जवळजवळ १२ ते १५ वर्ष उलटून गेली होती. आपण गोव्याला जातो तेव्हा कोणी बागा तर कलंगुट तर कोणी अंजुनाला जातं...तसंच ह्या टरक्वाइज कोस्टचे वैभव दिसत होतं. आपण आपापल्या आवडीनुसार किनारा निवडावा. गर्दीचा समुद्र किनारा हवा की एखादा निवांत, गाज व आपला श्वास इतकंच काय ते जाणवून देणारा....हे ज्याचे त्याने ठरवावे.

"काय ग, कायकाय करायचंय तुला ?" मी लेकीला विचारले.
"वर्धनने, आई जे पाठवलंय तेच आपण फॉलो करुया !"
"अगं पण त्यात पण खूप काही आहे ! म्हणजे ते टरक्वाइज कोस्टच बघ ना ! किती लांबसडक मैलोनमैल आहे तो किनारा ! त्यात कुठे जायचं आपण ?"
"हम्म्म्म...कास करुया का ?"
"कास खूप गर्दीचं वाटतंय ! हे वाच ना ! ह्या साईटवर बघ. ह्या लेखकाने एकुणेक किनाऱ्यांबद्द्ल माहिती दिलीय ! ते वाचून घेतेस का जरा ?"
"ती नाही आई, ही साइट बघ...इथे जास्त नीट सांगितलंय." लेक तिच्या मॅकबुकवर आणि मी माझ्या मॅक वर ! जालावर खणणं चालू होतं...आम्हां दोघींचं ! ही लिंक...ती लिंक...मेलामेली...पुढचे चारपाच दिवस आमचं हेच चालू राहिलं. त्यात विझासाठीचे सगळे कागद गोळा करणे आले. अॉफिसकडून सुट्टी मंजुरीचा आलेला कागद फायलीत गेला, इन्कम टॅक्सचे तीन वर्षांचे कागद जागेवर बसले, पासपोर्टच्या कॉपीज...दोघींच्या दोन फायली.

"अनघा, अगं, कुठल्या हॉटेलचं बुकिंग करतेयस ? ते पण लागेल ना विझासाठी अप्लाय करताना..." आमच्या ट्रॅव्हल डेस्कवरची सपना.
"अजून ठरवलं नाहीये गं ! आज घरी गेले की बसते लेकीबरोबर आणि ठरवतो आम्हीं दोघी."
"चालेल. पण उद्यापर्यंत नक्की मेल कर हॉटेल बुकिंगचं कन्फरमेशन. आणि फ़्लाईटची तिकीटं !"
"हो. करते."
"अगं, तुम्हां दोघींना ह्या सोळाला निघायचंय ना...म्हणून मी घाई करतेय !"
"ते कळलं गं मला ! पण वेळ तर मिळाला पाहिजे ना एकत्र बसून बुकिंग्स करायला ! मला वेळ असतो तेव्हा ही माझी लेक काहीतरी वेगळंच मेलं करत असते ! आणि तिला वेळ असतो तेव्हा मी ऑफिसमध्ये मरत असते !"
"हम्म्म्म...कर गं पण बाई आज हे बुकिंगचं काम !"

मी दिवसाभरात दोन कामं मात्र केली होती. कामाच्या अधेमध्ये वेळ काढून मेकमायट्रीप आणि यात्रा डॉट कॉमच्या साईटींना भेटी दिल्या होत्या. आणि आमच्या तारखा टाकून राउंड ट्रीपची तिकीटं नक्की कितीला पडतायत ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच वेळी सपनाला देखील सांगून टाकलं होतं...ह्या ह्या आमच्या तारखा...तेव्हा तू पण जरा बघ आमचं तिकीट नक्की कितीला मिळतंय ते. संध्याकाळपर्यंत सपनाचं मेल येऊन मेलबॉक्समध्ये बसलं. हम्म्म्म...भारीच महाग मेलं ! बघू...आपण पण बघुया प्रयत्न करून ! मेकमायट्रीप...यात्रा डॉट कॉम...एमिरेट्स...टर्किश एअरलाइन...रॉयल जॉरडॅनियन...२ तिकीटं...८०, ९०, १ लाख ! हम्म्म्म...कसं होणार माझं ! सकाळी बघितलेला तिकीटांचा भाव आणि संध्याकाळी बघितलेला भाव...दोन तिकीटांमागे जवळजवळ १०/१० हजारांचा फरक ! उगाच काहीतरी मनात आलं...काही वर्षांपूर्वी आम्हीं दोघं नवरा बायको अमेरिकेला फिरायला निघालो होतो. आजतागायत मला माहित नाही...किती खर्च आला...कोण जाणे. जवळजवळ महिनाभर अमेरिका. एका टोकापासून पार दुसऱ्या टोकापर्यंत. एकदा का पुरुषाने लग्न केलं की बायकोचा खर्च आपोआपच त्याच्या डोक्यावर येऊन पडतो. म्हणजे आम्हीं बायका कमावत्या असो वा नसो...घर आम्हीं चालवतो...मुलं सांभाळतो...त्या कामांची कधीही कोणी किंमत करायला जाऊ नये. परंतु, शेवटी पैसे हे एक भौतिक गोष्ट झाली. ती काहीही करायला गेलं की लागतेच. म्हणजे हा एकटाच फिरला असता तर बरोब्बर निम्म्याने खर्च झाला असता. आज मला त्याची आठवण झाली...आणि वाटलं...कोण जाणे लहान वयात लग्न केलं तेव्हा ह्याने आता आपल्याला पैसे दुपटीने लागणार हा विचार तरी केला होता का...knowing him...नसेलच केला ! चार हजार पगार...त्यात एकाचं काय आणि दोघांचं काय...अगदी आनंदात जमून गेलं...ह्या सर्व गोष्टींची आठवण झाली...
असो...
क्रमश:
टर्कीचा नकाशा जालावरून साभार

12 comments:

rajiv said...

भूगोलाबरोबर इतिहास देखील... म्हणजे केकवर क्रीम ..!!
छानच !!

Harshal Bhave said...

Yeu de yeu de....
Vaat baghtoy !

aativas said...

वाचते आहे .. पुढील भागाची वाट पाहते आहे.

अनघा said...

राजीव, :)

अनघा said...

हर्षल, लिहितेय. खूप खूप आभार. :)

अनघा said...

सविता, :)

Ninad Kulkarni said...

पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.

श्रीराज said...

तुर्कीचा त्रिकोणी प्रवास करण्याची कल्पना तर छान आहे! पण तुम्ही प्रत्यक्षात प्रवास कसा केलात याचे कुतूहल वाटते आहे.

अनघा said...

निनाद, लिहिला आहे. :) :)
आणि आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

अनघा said...

तुर्कीचा त्रिकोणी प्रवास. :) श्रीराज, लिहितेय लिहितेय...

सौरभ said...

लेखाच्या शेवटाला ये ईपर्यंत फक्त अतातुर्क हेच नाव लक्षात राहिलं.. सोप्पय लक्षात ठेवायला. :D

अनघा said...

:) सौरभा, आणि आज जे काही तुर्कस्तान उभं आहे..त्याचं श्रेय अतातुर्क ह्यांनाच जातं. जिथेतिथे त्यांचा फोटो दिसतो :)