नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 31 August 2011

आभूषण प्रेमाचे...

सख्यांनो,
कानाच्या पाळीहून मोठी सुवर्ण कर्णफुले...नाजूक मानेला घट्ट गळाभेट करून बसलेला ठसठशीत हार....लांबसडक बोटांना उठाव देणाऱ्या सुवर्णाच्या अंगठ्या...

...इतके सर्व दागिने बँकेच्या लॉकरमधून यातायात करून काढून आणावे...तासभर मेहेनत करून अंगावर चढवावे...दर्पणाने पहिली दाद द्यावी...सख्यांच्या नजरेत उगाच एक मत्सराची झाक उमटावी...

...आणि हे सर्व उपद्वयाप करून शेवटी ज्यावेळी निद्रादेवीपुढे नतमस्तक व्हावे त्यावेळी हे सर्व उतरवून ठेवणे भागच...हे सर्व अंगावर लेऊन निद्रादेवीची आराधना केली तर ती प्रसन्न होते काय ? कशी होणार ? थोडी मान वळवली तर टोकेरी कर्णफुले गालाला टोचणार...हार वेडावाकडा मानेला बोचकारणार...एखाद्या अंगठीने झोपेत डोळ्याला जखम न केली म्हणजे मिळवली...

...उग्र सोन्यापेक्षा त्या निरागस निसर्गाची मदत घेऊन आपण ही आभूषणे बनवली तर ? महागड्या सोन्याच्या दागिन्यांचा हट्ट जिवलगापुढे केलात तर कदाचित वक्रदृष्टीच पदरी पडेल...परंतु त्याच्यापुढे अंगणात विराजमान झालेला, शुभ्र नाजूक पिवळी छटा असलेला टपोरा चाफा आणून ठेवा...आणि मग करा मागणी शुभ्र हिऱ्यांच्या मधोमध, चपखल बसलेल्या पुष्कराजाच्या अंगठीची...

घ्या हातात तो चाफा...


उमटवा एकेक नाजूक नखक्षत पाकळ्यांवर...


वळवा एकेक पाकळी देठाकडे...




आता हळुवार त्या नखक्षतांतून येऊ द्या तो देठ बाहेर. अगदी नाजूकतेने...बरं का...हे जिवलगाला सांगायला मात्र विसरू नका...नाहीतर मग येईल तुटकीमुटकी अंगठी हातात...


फूल नाजूक मग त्याची हाताळणी हवी नाजूक...हो ना ?

झाली आपली मुद्रिका तयार...काही क्षणांत...नाजुकशी...हलक्या पीत छटेची...




...सीता...शुभ्र दागिन्यांनी सजलेली...
काय श्रीरामाने ओवल्या असतील त्या माळा...तो गजरा...ती कर्णफुले ?
तिच्या चेहेऱ्यावर पसरलेल्या मंद स्मितहास्यात, कुठे आहे वनवासाची खंत ?
श्रीरामाची साथ...श्रीरामाचे प्रेम...
त्याची तुलना काय सुवर्णाशी...?

(श्रीराम सीता व लक्ष्मणाचे मनोहारी चित्र, जालावरून साभार...)

Wednesday 24 August 2011

गेम

देव काहीतरी डोक्यात घेऊन गेम प्लान करतो...
मला अजिबात विश्वासात घेत नाही...
मी उगाच मग इथेतिथे भरकटते...
तो फक्त मजा बघतो.
त्याच्यावर विश्वास ठेवते म्हणून काय झालं ?
थोडी तरी कल्पना नाही का देता येत ?
एकमेकांना विश्वासात घेऊन गोष्टी केल्या तर त्या यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते...
साधी गोष्ट कळत नाही त्याला.

जसा काही कॅरमचा एक डाव...
मी मांडून ठेवते.
तो येतो...
एका फटक्यात डाव फोडून जातो.
मी मग एकटीच बसते...
काळा दिवस आणि पांढरी रात्र...
गर्तेत सारत !



Monday 22 August 2011

त्वमेव माता...पिता त्वमेव...

सैतान जन्म घेतो तेव्हा नेमकं काय घडतं ?
तारा खचतो ?
मेघ कपाळ बडवतात ?
वादळ सैरावैरा धावतं ?
वृक्ष अंग टाकतात ?

काय सैतान सांगून जन्मास येतो ?

असंख्य माता...असंख्य पिता...
एकाचवेळी...
वेगवेगळ्या स्थळी...
सैतान बालकांना जन्म घालतात....
पोटचं पोर ते...
ओंजारून गोंजारून वाढवावयास हवे.
कुशीत निजवावं...त्याने बोबडं बोलावं...
दुडूदुडू धावावं...त्याला तीट लावावं.
जगभर बाळं अशीच तर वाढतात...
दिवसागणिक बलदंड होतात.
घरोघरी...गल्लीगल्ली...
कोण ह्याचे माता...कोण पिता ?
का ह्यांच्या पोटी सैतान पोरे जन्माला येतात ?
ते असे उफराटे काय करितात ?
आणि अकस्मात हे सैतान अनाथ का होतात ?
बेवारशी भटकताना का दिसून येतात ?

चला विचार करुया.
शोध घेऊया.
का बरे ह्यांच्या पोटी सैतानच जन्म घेतात ?
आणा पकडून त्या मातापित्याला...
चला शोध घेऊया...
ह्यांच्या पोटी का सैतान जन्म घेतात ?

शोध आता अटळ आहे.
विलंब तर झाला आहे...
पण काय वेळ टळून गेली आहे ?

चला या...
एकेक करून उत्तरे द्या...
काय म्हणता ?
मी कोण ?
प्रश्र्न विचारणारा मी कोण ?
हा अधिकार मला कोणी दिला ?
समजा, मी कृष्ण आहे.
कलियुगात तळहातावर गीता आहे.
तीवर एक हात ठेवा.
आणि मग उत्तरे द्या.
का पोटी सैतान जन्म घेतात ?
का कालौघात सैतानाचे आईबाप हरवून जातात ?
आसमंतात घिरट्या घालणाऱ्या, त्या अनाथ सैतानाचे मायबाप आज शोधावयाचे आहेत.

बाई, रहा तुम्ही रहा उभ्या...
सांगा...आम्हांला दु:ख सांगा.
"अहो तुम्हांस आता कसे सांगावे ? आमच्या पोटच्या पोराने आम्हांस देशोधडीस लावले...आमचे बाळ माजले."
"बुवा, आता तुम्ही सांगा. असे तुम्ही काय केले...आपले बाळ का टाकून दिले ?
"आम्ही अज्ञानी. ना आम्ही हे जाणिले. आम्हांला ना वेळ...ना काळ...सगळीच घाई घाई..."
"मग, त्या घाईघाईत असे तुम्ही काय केले...?"
"आम्ही लेकाला दोन हिरव्या काड्या घातल्या...पोराला ते भावले...चटक लागली...झिंग चढली...दुसरे काही दिसेनासे झाले...खा खा सुटली...प्रत्येक वाटसरूकडे हिरवा चारा मागू लागे. आमचे नाव खराब झाले...म्हणून आम्ही त्याचे नाव टाकिले."

"हो हो..आम्ही देखील असेच केले...." हल्लागुल्ला. आरडा ओरडा...पार नभाला भिडला.

"थांबा थांबा...ओरडू नका...शांत व्हा...बसून घ्या...लक्षात घ्या...हा एक शोध आहे...एक विचारमंथन आहे...मग आता सांगा...आपण काय करायचे....? इतुके मोठे केलेले हे तुमचे बाळ...आता कोणी त्याचे काय करावे ? जन्मास तुम्ही घातिले...मग त्याचे तुम्हांलाच ओझे झाले ? हे असे उफराटे कसे काय झाले ? रडू नका...असा आक्रोश करू नका...आक्रोशाने काय प्रश्र्न सुटतात ? आता तरी तुम्हांला कळिले...तुम्हांला धीर कसा तो नाही...माज त्याला नाही...तुम्हांला आहे...हिरवा चारा डोक्यावर घेऊन नाचला...संयम, श्रम, स्वेदाचे महत्त्व विसरला...तो हिरवा रंग, तुमच्यावर चढला...डोळ्यांत उतरला...आणि तुमच्या लेकराच्या नसानसात भिनला...तुमचेच ते गोंडस बाळ, सैतान पुरुष झाले...आता इथे आमच्या द्वारी धाव घेता...उपाय पुसता...आता दुजा काय उपाय....सांग बयो...सांगा बुवा...माना खाली काय घालता...आम्ही सांगतो...आमचे ऐका..आता नाही आम्ही फिरून अवतरणार...ह्या तुमच्या लेकाला तुम्हीच मारणार...ब्रम्हास्त्र तुम्हीं उपसावे. सुदर्शनचक्र तुम्ही सोडावे...घातले जे जन्माला...ते तुमचे पोटचे पोर सैतान बनले. आता त्याला टाकून काय होणार ? कोणता प्रश्र्न उलगडणार ? त्याला तुम्हीच जन्म दिला हे सत्य तुम्ही धुडकारले...काय त्याला अनाथ जगू द्यावे...? तो धुमसला...अस्ताव्यस्त पसरला...येईल मार्गी ते खाऊ लागला...असंख्य हस्त...असंख्य पाद...पसरावयाला कितीसा काळ ? आता समजून घ्या...व्हा पुढे...युद्धात खून माफ असतात...खरे तर युद्धात खूनच नसतात...आठवते ना मी तेव्हा काय सांगितले...आपलेच बंधू, आपलेच सगे. आपलेच सोयरे. मग कसला विचार...आता नाही तर केव्हा...शुभस्य शीघ्रम म्हणावे...कितीही टाळले...तरी आता जग जाणे...तुम्हीं त्यास जन्मास घातले...तुम्हीं त्यास वाढविले. आता त्याचे शरसंधान दुसरे कोण करणार ? अहो बुवा, अहो बाई...उगा आपले पाप दुसऱ्या माथी मारू नये...स्वत:शी सत्य बोलावे...हा भ्रष्ट्र सैतान जन्मास तुम्हींच घातिला...तुम्हां कळले नाही...त्याला कधी भस्म्या झाला. बायांनो, बाप्यांनो, ह्या तुमच्या पोराची...भ्रष्टाचाराची सांगा दुसरा कोण खांडोळी करणार ? व्हा पुढे...शुरासारखे...षंढ तुम्ही बनू नका...रणांगणातून पळ काढू नका...त्याचा शिरच्छेद करा...कोथळा बाहेर काढा...हे एक तरी पुण्य करा...ह्या भस्मासुराचा नाश जर तुम्ही केला...स्वर्गद्वारी मी उभा राहीन स्वागतासाठी तुमच्या...आणि तुम्हीच सांगा...तुम्हींच थोडा विचार करा...इतिहासात किती माता जन्मास आल्या...देशहितासाठी त्या नाळेचा त्यांनी तुकडा पाडीला...चला, काही नाही तर तसे काही करून दाखवा...त्या तुमच्याच पोटच्या पोराच्या गळ्याला एक नख लावा.
तुम्हीच विचारीत होता...
सैतान जन्माला येतो तेव्हा नक्की काय घडतं...?
काय सैतान सांगून जन्मास येतो ?

होय...सैतान सांगून जन्मास येतो...तो तुमच्या मनी जन्म घेतो...जेव्हा हिरव्या नोटा तुम्हीं कोणापुढे नाचवता त्याक्षणी तो जन्म घेतो...जन्मदाता तुम्हीं असता. जन्मत:च केलेले त्याचे विकट हास्य तुम्हां ऐकू येत नाही...कारण एकच...तुमच्या धुंदीत तुम्ही बहिरे व आंधळे झालेले असता...एका क्षणात तो जन्म घेतो....दुसऱ्या क्षणी त्याला भस्म्या होतो.
चला, आज जन्माचे सार्थक करा...भविष्य स्वत:च्या हाती घ्या...
त्या तुमच्याच पोटच्या पोराच्या गळ्याला तुम्हींच हिंमतीने नख लावा.


Thursday 18 August 2011

मैत्री...आपली तुपली

पावसाळा सुरु आहे. हिरवे हिरवे गार गालिचे, मुलायम शालू वगैरे धरतीने आपल्या घरात, अंगावर पांघरून घेतले आहेत. एकूणच नैसर्गिक वैभवाने ती नटलेली आहे. आनंदी आहे. तर त्याच त्या शालूच्या भरजरी कलाकुसरीत एक वेलबुट्टी आहे गवताच्या तणांची. जीवाच्या घाईने उचललेले पाऊल क्षणभर थांबवा आणि डोकवा रस्त्याच्या कडेला भरभरून उगवलेल्या त्या णां. तिथेच मिळेल तुम्हांला आपली मैत्री...मैत्री नाजूक...आणि तरीही सर्वत्र पसरलेली...अगदी जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी देखील...मग घेऊया का शोध, आपण आपल्या मैत्रीचा ? काय उतरेल ती त्या नाजूक कसोटीस...आपली तुपली मैत्री ?

सर्वत्र पसरलेले हे तण. त्या धरतीला आधी विचारा...चालेल का तिच्या शालूतील वेलबुट्टी आपण थोडी खुडली तर ?


आता त्या तणांना थोडं तयार करा आपल्या परीक्षेसाठी...


चला...आता एका बाजूने तुम्ही एक तण पकडा...एका बाजूने मी...परीक्षा दोघांना द्यावयाची आहे...नाही का ? :)
त्या पातळश्या तणाला अगदी हलकेच दुभागा...तुम्ही तुमच्या बाजूने...मी माझ्या...आता तितक्याच हळुवारपणे दुभागत या हलकेच पुढे...जपा हं...मैत्री आहे ती...नाजुकशी...आपली....नाही जपलेत प्रेमाने...तर जाईल ना तुटून...मग दु:ख करून काय उपयोग ? तुटलेले तण काय जोडले जातात थोडेच...?



तुटली का ? आहे ना नाजूक ? हिरवीकंच. पण नाजूक. ठीक आहे...ठेवा तो तण बाजूला...विसरून जा...कधी काळी एक तडा गेला होता आपल्या मैत्रीला.

चला...पुन्हा करुया सुरुवात...नव्याने...तेव्हढ्याच जोमाने...मैत्री तर करायचीच आहे आपल्याला...मग का हार मानायची ? हो ना ? उचला पाहू दुसरा तण. पुन्हा तितक्याच प्रेमाने...जपून...दुभागा...आणि या पुढे...तुम्ही माझ्या दिशेने...मी तुमच्या दिशेने...प्रयत्न दोघांनी करावयाचे आहेत. नाते हे दोघांनी जपायाचे आहे..तितक्याच हळुवारपणे...तुमच्या हातात दोन भाग आहेत ना...मग द्या त्यातील एक माझ्या हातात. आणि हा घ्या माझा नाजूक तण तुमच्या हातात... आता माझे नाजूक मन अर्धे ताब्यात तुमच्या...जसे तुमचे माझ्या ताब्यात...


अजून थोडे पुढे...बघा...काय झाले ? किती नाजूकपणे काळजी घेत आलात ना तुम्ही पुढे ? झाला ना हलकाच हिरवा चौरस तयार ? किती सुंदर...किती तो हळवा...किती नाजूक...आपल्या तुपल्या मैत्रीचा तो नाजूक धागा....जपला तुम्ही...जपला मी...



आता कधीही न तुटणारा...आपल्या तुपल्या मैत्रीचा हा नाजूक बंध....हो ना ?


बालपणी, अगदी जिवलग मैत्रिणंींबरोबर ही मैत्रीची परीक्षा खूप वेळा दिली. आणि जेव्हा जेव्हा ती चौकट तुटून गेली तेव्हा तेव्हा अगदी डोळ्यात पाणी आणून ती अतूट होण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले. परवा मुंबई गोवा हमरस्त्यावर हे वाऱ्याच्या झोक्यावर डोलणारे तण दिसले आणि ही आठवण जागी झाली...म्हणून मग परत एकदा ती चौकट अगदी तितक्याच असोशीने तयार केली...तुमच्याबरोबर.
:)

Monday 15 August 2011

Happy Day...?

"मी अजिबात कोणालाही 'Happy Independence Day' म्हणणार नाहीये."
माझी लेक सकाळचा चहा पितापिता मला म्हणाली. मी देशभरातील आनंदी जाहिराती पहात होते. वर्तमानपत्रातील. मराठी, इंग्लिश. फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज. काही जाहिराती ब्लॅअॅन्ड व्हाईट तर काही कलर. एकूण कसं आनंदी आनंदी. वेगवेगळ्या कंपन्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य लक्षात घेऊन केलेल्या जाहिराती. कसले श्रीमंत आहोत आपण...माझ्या मनाने विचारांचा तो धागा पकडला होता...
"अं ?"
"हो आणि तशा अर्थाचा एसेमेस, फॉवर्ड देखील नाही करणारेय."
"काय झालं काय ?"
"कारण हॅपी होण्यासारखी परिस्थितीच नाहीये. कोणी जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्याचं आता काय झालंय ? आनंदी होण्यासारखं आहे काय त्यात ?"
"ह्म्म्म. आणि देशभरातील नागरिकांनी happy राहावे ह्यासाठी कोण काय करणार आहे ?"
भारताची पुढील पिढी गप्प झाली.
"काय गं ?"
बाई, हातात मोबाईल घेऊन काहीतरी टुकूटुकू करत होत्या.
"ज्यावेळी देशासाठी काही करण्याचा प्रश्र्न उभा रहातो, त्यावेळी 'समोरचा' किती करतो आहे ह्यावर 'मी' काय करणार आहे हे ठरत नाही. ज्या आपल्या नेत्यांचा तुला अभिमान वाटतो...महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल...ह्यांनी समोरचा किती व काय करतो आहे हे बघून स्वत: किती व काय करायचे आहे हे ठरवले असेल काय ? जन्माला येतो, तो नेता नसतो...तुझ्यामाझ्यासारखंच एक बाळ जन्म घेत असावं...नाही का ? परंतु, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून, ती बदलण्यासाठी, दुसऱ्याची वाट न बघता 'मी' काय करू शकतो ह्याचा विचार त्यांनी केला...व बदल घडवून आणला... हो की नाही ? व तोच बदल घडवता घडवता कुठल्या तरी एका पायरीवर ते 'नेता' झाले."
शांतता.
"मला माहितेय, आपण आपल्या नात्यांत हा विचार नक्की करतो. निदान समोरच्याने 'मी' त्याच्यासाठी जे करत आहे त्याची जाण तरी ठेवावी अशी अपेक्षा आपण नक्की धरतो...व त्यात चूक ते काय ? परंतु, बाळा, देशासाठी काही करताना अशी अपेक्षा ठेवणे बरोबर आहे काय ? देशासाठी आपण काही करू शकलो...लहान मोठे काहीही...कारण त्यात लहान आणि मोठे असे नसतेच...तर त्यातून जे मानसिक समाधान मिळेल तेच किती मोठे असेल...नाही का ? म्हणजेच...देशकार्य करून जे मला समाधान मिळेल ते माझे मीच 'मला' दिले...असे नाही का ? म्हणजे...तो त्या Happy Independence Day मधील happiness तूच तुला देशील...नाही काय ?"
"हं..." पिढी हुंकारली.
"...पण तो एसेमेस फॉवर्ड न करणे हे मात्र बरोबरच आहे....ते म्हणजे आपण आपल्या पैश्यांची किंमत न ठेवता..त्या मोबाईल कंपन्यांना आपल्या भावनांच्या जोरावर फुकटचे पैसे कमावू देणे हे आहे...म्हणजे माझ्या देशाभिमानाचा ते बाजार करणार...व त्यावर मस्त पैसे कमावणार....मला कोण एसेमेस पाठवतंय...ह्यावर मी त्या व्यक्तीचे देशप्रेम अजिबात ठरवत नाही...आणि त्यापुढे जाऊन सांगायचं म्हणजे, तू मला त्या मूर्खपणाच्या एसेमेससाठी पैसे भरायला लावू नकोस...अजिबात भरणार नाही मी तुझं मोबाईल बिल मग."
"हा...म्हणजे तसले एसेमेसेस मी फॉवर्ड नाहीच केले पाहिजेत...हो ना ?"
"अजिबात नाही केले पाहिजेत...फक्त माझं कारण व तुझं कारण ह्यात फरक आहे."
"हा...तो फरक कळला...आणि हो..पटला..."
घाबरली वाटतं भारताची पुढील पिढी...
मी असातसा सोडत नाही माझा मुद्दा...!
माहितेय माझ्या लेकीला...!
:)

Monday 8 August 2011

सखा

तो दिवस तसाच होता. सूर्य डुबून गेला होता त्याच्या अदाकारीचा रास्त मान राखित चंद्र अजूनही विंगेत थांबून होता. पृथ्वी पोरकी. ना सूर्य ना चंद्र. असे काहीसे. मी जशी एखाद्या भव्य नाट्यगृहात एकटीच. समोरील रंगमंचावरून त्याने नि:शब्द निघून जावे आणि असे थरारक नाट्य मागे ठेवावे. हे असे अजून दुसरा कोण करणार. एकमेव रंगकर्मी.

मरीन ड्राईव्हचा कट्टा. समोर करडा समुद्र. खळाळता. मी एकटीच बसले होते. तसेच मी ठरवले होते. ना कोणाला फोन केला. ना फेसबुकवर स्टेटस टाकलं. पुढचे काही क्षण फक्त माझेच मला हवे होते. कारण काहीही नाही. कधी असे केले नव्हते आणि हेच कारण मला पुरेसे होते. केशरी निळं आकाश करडं क्षितीज. क्षितीज किती खोटं. किती ती दिशाभूल. कोणी समजा उतरले पाण्यात...पोहून जाऊ त्या क्षितिजाला हात लावून लगेच परत येऊ...तर....मृगजळ...फसवणूक...

"काल जे बोलत होतीस...मला नाही पटलं." मी दचकून मान वळवली. करड्या निळ्या रंगांचा पट्यापट्यांचा पायजमा, उधळलेले बेभान कुरळे केस, सैलसा कुर्ता करड्या रंगाचा. सावळ्या रंगाचा, चाळीशीच्या आसपासचा तो. माझ्या अगदी जवळ एक पाय वर घेऊन बसला होता. कोण हा ? कुठून आला ? मला कसा दिसला नाही ? मी थोडी दूर झाले. चेहेरा ओळखीचा नव्हता. "कोण तू ?" माझ्या स्वरातील भय मला जाणवले. अजून अंधार नव्हता पडला. तोच एक धीर होता.
"ते नाही महत्त्वाचं." कपाळावर झेपावणाऱ्या बटा मागे सारत तो म्हणाला. नजर भेदक. आरपार.
"पण मी नाही ओळखत तुला. प्लीज जा पाहू इथून !" मी म्हटलं.
"माझं ऐकून घे. मग ठरव हाकलवून द्यायचं की ह्यापुढे आपण एकत्र राहायचं..."
चष्मा काढून मी हातात धरला. त्यावर सूक्ष्म बाष्प जमा होत होते...समोरचे धूसर होत चालले होते. तेव्हढाच एक क्षण मिळाला मला विचार करायला. "डोकं फिरलंय का तुझं ?"
समुद्रावर नजर स्थिर करीत तो बोलू लागला. जसा काही माझा प्रश्र्न कानीच नाही पडला.
"तू म्हणालीस मी कमी आहे. काल तुझ्या मैत्रिणीशी बोलत होतीस." आता गोंधळ आणि चीड दोन्ही एकाचवेळी डोक्यात पिंगा घालू लागले होते. परंतु, पुढे नाही ऐकले तर फक्त गोंधळ वाढेल हे मात्र जाणवले.
"कोणालाही कमी लेखणे वाईट. दुसऱ्याच्या मोठेपणाची जाणीव ठेवणे चांगले. परंतु, त्यासाठी मला कमी लेखायची गरज नव्हती." वारा त्याच्या चेहेऱ्यावर आपटत होता. त्याचे कुरळे केस मागे फेकले गेले होते. भव्य कपाळ, बुद्धिमत्ता दर्शवते. मी एकही शब्द उच्चारला नाही. तो कोण आहे हे अजूनही कळले नव्हते. मग मी काय बोलावे ?
"जर मी कमी पडत आहे तर मग मी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे ? काय मी अजून स्वत:ला बलशाली करावे ? मग तू खुष होशील ? पण तुझा काय भरवसा ? जेव्हाजेव्हा मी माझी सर्व शक्ती पणाला लावली, त्या त्या वेळी तू असह्य होऊन आक्रोश केलास...तेव्हा हे नाही लक्षात घेतलेस, तो मीच होतो ज्याच्यामुळे तुझी शक्ती वाढत होती..."
त्याचा गूढ गंभीर आवाज...त्याला खोल समुद्राच्या गाजेची साथ...वाढत चाललेला अंधार. काय समजावे ?
वाऱ्यावर उडणारी माझी ओढणी मी घट्ट लपेटून घेतली. तेव्हढाच आधार. अकस्मात ओठांवर खारट चव लागली. मी गालावर हात फिरवला...नव्हते कळले का कधी डोळे भरून आले. काय समुद्राने खारे थेंब उडवले माझ्या डोळ्यांनी ते टिपले ?
काही क्षण तो थांबला. लाटा किनाऱ्यावर आपटत होत्या...कोणी जसे माझा दरवाजा ठोठावत होते.
"हे तुला सांगावेसे वाटले...म्हणून आलो. मी जसा आहे तसेच तू मला स्वीकारावेस. असे मला मनापासून वाटते..." तो उठू लागला. मी त्याचा हात धरला. हात कणखर, खंबीर.
"मला कळतंय. माझं चुकलं. काल ती कोणाचं दु: सांगत होती...अतीव दु:...कोणी कसे सहन करावे...ते अलोट दु: ऐकून वाटले...ह्यापुढे माझे दु: किती तोकडे ?"
...माझा हात अजूनही त्याच्या हातात होता. त्याने सोडवून घेतला एकटक समुद्रावर लावलेली नजर वळवून त्याने प्रथमच माझ्याकडे बघितले.
"हे एव्हढेच तुला सांगण्यास आलो होतो. दुसऱ्याचे दु: ना तुझ्या दु:खाहून कमी तसेच ना ते तुझ्या दु:खाहून मोठे. त्यात तुलना का करावी...जसे आहे तसेच आपले मानावे...त्याचा मान राखावा....त्यातून आपण घडत जातो ह्याची जाण ठेवावी...इतकेच..."
आता मीच पुढे झाले...त्याच्या जवळ सरकले. त्याच्या खांद्यावर डोके ठेवले हलकेच डोळे मिटून घेतले. किती मला हलके वाटले.
माझ्या त्या प्रेमळ दु:खाने माझे कपाळ हलकेच थोपटले.
कोण जाणे किती वेळ गेला. डोळे पुन्हा उघडले तेव्हा पूर्ण अंधारून आलं होतं. माझ्या बाजूला कोणी नव्हतं...
राणीचा हार चमकत होता. मुंबई वेगात हलत होती. ती रात्री अधिक वेगात धावते असे मला बरेचदा वाटते.
मी तिथून निघाले.
माझे दु: माझ्या मनात गुडूप झाले.
माझं दुखावलेलं दु:ख.
माझ्या सुखाच्या जोडीला.

Saturday 6 August 2011

Product development...भाग ३

Product development...भाग १
Product development...भाग २

दिवस पुढे सरकत होता. काळजी वाढत होती. माझ्या चेहेऱ्यावर व तशीच त्या कामाशी निगडीत सर्वांच्या चेहेऱ्यावर. जसे काही दुपारच्या रंगीत तालिमीच्या वेळी माझ्या दगडाची पिलावळ झाली आणि मग प्रत्येकजण काळजीचा एकेक दगड छातीवर घेऊन वावरू लागला. काय होणार...कसं होणार...वगैरे वगैरे.

उरलेले काम पुरे करण्याची घाई. मुख्यमंत्र्यांनी दिलेली वेळ रात्रीचे आठ.
भेट त्याच वेळी होईल काय ? शाश्वती नाही.
किती जणांना परवानगी आहे? जास्तीत जास्त दहा लोकं चालू शकतील.
मग कोणकोण जाणार आहे ?
हा X ८ आणि ती X २. म्हणजेच आठ पुरुष आणि दोन बायका.
कोण कायकाय बोलणार ? हे तू, ते तो आणि ते तो आणि तो.
हे आणि ह्या धर्तीवरचे संवाद सतत कानावर पडत होते.

"Let me know if you want to practice..." इति सर्विसिंग. बॉसने दिलेल्या सूचनांना अनुसरून. मग मी पुन्हा तालीम केली काय ? नाही केली. का बरं ? माज. कसला हो पण ? आहे. लोकांना खूप असतो. मला थोडा आहे.
मी शांतपणे जागेवर बसून काम पुरं केलं. डोकं आणि शरीर हे एकजुटीने काम करतात. बरं की वाईट ? वाईट. माझ्या डोक्याला ताप झाला की माझ्या शरीरात ताप चढतो. नेहेमीच. कपाळ गरम. अंगात कणकण. दोनतीन रात्र झोप नाही. आणि दिवस उजाडला तो असा. आत्मविश्वासाचं वारूळ पोखरणारा.

संध्याकाळी पाचपर्यंत काम जवळपास पूर्ण होत आलं. सर्वांचंच. अगदी ऑडिओ व्हिज्युअल्ससकट. मग भलेमोठे काळे पोर्टफोलिओ इथेतिथे फिरू लागले. पंधरा दिवसांची सर्वांची मेहेनत आत जाऊन बसली. पोर्टफोलिओ उतू जाऊ लागले. मॅकवरील प्रत्येक कामाची जेपेग बनू लागली. पॉवर पाँईंट प्रेझेंटेशन फुगू लागलं. नाटक सुरु होण्याआधीची पडद्याआडची तयारी. धावपळ. लगबग. व्हेअर इज दिस अॅन्ड व्हेर इज दॅट ? हॅव यु टेकन दॅट ? डिड यु डिलीट दॅट स्लाइड...थ्रो दॅट...हु इज अरेंजिंग द स्पीकर्स ? टेक ३/४ कॉपीस ऑफ द सीडीस...डिलीट इट. इट'स रबिश ! डॅम गुड या ! व्हेरी नीट ! अगदी सनई चौघडा वाजाचा बाकी...एकेक पात्र तयार होऊ लागलं. आणि सहा वाजता मी आरशात बघितलं. मरमर कामे करणाऱ्या रोजगारावर जगणारा मजूर. त्वरेने बाजूचेच फिनिक्स मिल्स कंपाउंड गाठले. आंबा रंग ? माहितेय ना ? ही अशी रंगांची नावे क्रिएटिव्ह डिरेक्टरच्या खुर्चीत बसून घेणे म्हणजे...ह्म्म्म ! पण आंबा रंगात जी गंमत आहे ती त्या 'क्रोम येलो'त नाही, त्याला मी काय करू ? मराठमोळा चुडीदार अंगावर. ओढणीबिढणीसकट. आणि अर्ध्या तासात पुन्हा खुर्ची...इथेतिथे येरझारा...खुर्ची...येरझारा.

शेवटी एकदाचे आरडाओरडा करीत आमचे सैन्य निघाले. हरहर महादेव ? तसेच काहीतरी. कोण कोणाच्या गाडीतून जाणार ? सामान्य गोष्ट नव्हे. मी माझी गाडी काढणे अपेक्षित आहे काय ? इतक्या गाड्यांना तिथे पार्किग मिळणार आहे काय ? आय अॅम टेकिंग माय कार...कम विथ मी...यू आर गोइंग विथ हुम ? पाच मिनिटे चर्चा...दरवाज्यांची उघडझाप. खाडखाड. लांबसडक गाड्या बेसमेंटमधून बाहेर. जशा बिळातून घुशी. माझी रवानगी बॉसच्या गाडीत.

टाऊन. शहरात दिवेलागणी कधीच झालेली होती. लालहिरवे दिवे स्पष्ट उघडझाप करीत होते. एकूणच चढत जाणाऱ्या टेन्शन्समध्ये ट्रॅफिक जॅम भर घालत होता. बॉस स्वत: वाहन हाकत होता व बाजूला मी. माझं कोकरू हृदय कधीच मला विचारू लागले होते...'कॅन आय जस्ट नॉट डू माय जॉब राइट नाव ? फाइंन्डीग इट बीट डिफिकल्ट...'. अरे बाबा, मरेन ना मी ! कर रे बाबा तू तुझं काम...आणि मला माझं काम नीट करु दे ! हे प्रेझेन्टेशन म्हणजे आयुष्य नव्हे...हे सगळं दोन तासात आटपणार...मग आपण घरी जाणार...आणि मग मी झोपणार....म्हणजे मी झोपणार...पण तू तुझं कामच करणार...मी सांगितलं माझ्या कोकराला.
"व्हॉट ? व्हॉट आर यु थिंकिंग ?"...बॉस.
"अं ? नथिंग..."
"नो...यु जस्ट नॉडेड..."
...हो काय ? अरे पण तू समोर बघ ना...गाडी चालव ना...माझे मौन. मी ओठ पसरले...त्यालाच हसणे म्हणतात काय ? त्यावेळी तरी तसे नाही वाटले. Whatever !!

टाऊनमधील एका प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक छोट्यामोठ्या खोल्या त्या राजकीय पक्षाने राखून ठेवल्या होत्या. त्यातील एक खोली आम्हांला मिळाली. दिस इज टू स्मॉल या...आस्क फॉर द नेक्स्ट रूम ना...आय थिंक दॅट वन इज बिगर...ट्रेनीज, जुनिअर्स एकदोन बरोबर आणले गेले होते...ही धावपळ करायला। मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. अजून तासभर तरी जाईल असा निरोप आम्हांला मिळाला. ८.३०. लेट्स सेट अप हियर ओन्ली या. सीडी प्लेअर, डॉल्बी सिस्टीम...हे ! आय थिंक दिस स्पीकर इज नॉट वर्किंग !...व्हॉट !...या ! यू डिड्न्ट चेक इट बिफोर ऑर व्हॉट ?...स्टुपिड....आय डिड या...देन ? कानावर पडणारी वाक्ये...मग कोणीतरी काहीतरी केले...आणि आमचे स्पीकर्स चालू झाले. सटासट सगळे इलेक्ट्रॉनिक्स ठरवून दिलेल्या जागेवर गेले. त्यानंतर माणसे...कोण कुठे बसणार हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय...माझी खुर्ची ठरवण्यात आली. बॉसच्या बाजूला. आता मी बाजूला बसून ह्याचे हातवारे कसे काय बघणार ? त्याने सांगितलंय ना मला...अधूनमधून त्याच्याकडे बघायला...Whatever !! मी माझी नजर भोवताली फिरवली. लांबसडक आयताकृती मंच. आयताकृती खोली. दालन म्हणता न येण्याजोगी. दरवाज्यासमोर आडवा लागलेला मंच. बरोब्बर दरवाज्याला तोंड करून माझे आसन. माझ्या उजव्या बाजूला बॉस. डाव्या बाजूला काटकोनात बसलेली आमची पूर्ण टोळी. डाव्या भिंतीवर स्क्रीन. अकस्मात खोलीचे दार उघडले व आमचे 'सी.इ.ओ' हजर झाले. ओह ! हे पण असणार काय ? आता त्या खोलीत एकूण वरिष्ठ अधिकारी तीन. मुंबई क्रिएटिव्ह हेड, मुंबई ब्रान्च हेड आणि आमचे सी.इ.ओ ! म्हणजे एकूण सर्व श्रेष्ठ हजर ! हम्म्म्म.
आता ? आता वाट बघणे. आम्ही फक्त एक एजन्सी चालवतो. आमचे मुख्यमंत्री राज्य चालवायचा प्रयत्न करतात. पैसे कोण देणार ? ते. म्हणजे मग मोठा कोण ? ते ! ग्राहक देव. आम्हांला थांबणे भाग. अर्धा तास. एक तास...चुळबूळ चुळबूळ. हे म्हणजे आचारी जेवण तयार करून वाट बघत बसण्यासारखं...पंगत काही बसत नाही...ताटं काही लागत नाहीत.

अकरा वाजले. अर्थात रात्रीचे ! आणि पळापळ झाली. मुख्यमंत्र्यांचे सहकारी इथे तिथे पळू लागले. आमच्या खोलीत दोघेतिघे डोकावून गेले. आता येतील हा साहेब...तुम्हीं तयार आहात ना ? आमचे साहेब त्यांच्या मराठीत...हो हो. आमी वाट बघतोय. मग पुन्हा आमचे आम्हीं खोलीत एकटे. लेट इट स्टार्ट या नाव.

आणि दरवाजा उघडला. साहेब अवतरले. मागून पाचजण. आम्हीं सगळे उभे राहिलो. का ? अर्थात मान द्यायला ! साहेब स्थानापन्न झाले. मग आम्हीही बसलो. ओळखपाळख. आमची बिझनेस कार्ड्स त्यांच्या पुढ्यात मंचावर रांगेत बसली. त्या खोलीत पंधरा लोकांत बायका दोनच. मुंबई क्रिएटिव्ह हेड आणि दुसरी अर्थात मी ! समजून घ्या हो !
बोलायला सुरुवात. आधी सी.ई.ओ...मी असा असा.
मग मुंबई ब्रान्च हेड...मी तसा तसा.
मग क्रिएटिव्ह हेड...मी अशी अशी.
रोजचे खाडखाड इंग्लिश कोपऱ्यात जाऊन बसले. मराठी रुबाबात पुढे आले.
मोजून पंचवीस मिनिटे तुम्हांला दिली जातील असा आधीच निरोप आम्हांला दिला गेला होता. त्यावर पुन्हा साहेबांनी शिक्कामोर्तब केलं.
"ठीकेय...मी आपल्याला लगेच माझं प्रेझेंटेशन दाखवतो...पटकन आटपतो..."
"करा सुरु..."
सर्वांच्या माना वळल्या. नजरा भिंतीवरील शुभ्र पडद्यावर टेकल्या. बॉसने त्याच्या लॅटॉपवर बटणे दाबली...एकेक स्लाईड पडू लागली. पहिला रूट समोर येऊ लागला. बॉसच्या डाव्या बाजूला पडदा व उजव्या बाजूला साहेब बसलेले. साहेबांच्या समोर पडदा. त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव टिपण्याची आमची चोरटी धडपड. आत्तापर्यंत भाव ठीकच होते. शेवटची स्लाईड पडली. आणि एव्ही सुरु झाला. जोरदार कविता गुरु ठाकूर. संगीत अजित परब. आम्हा तिघांची ती मेहेनत. साहेबांनी मान हलवली. नकारार्थी. "हे असे आम्हांला म्हणायचे नाही. हे चुकीचे आहे." ताबडतोब, साहेबांच्या आजूबाजूला बसलेले त्यांचे सहकारी त्यातील चुका वेचू लागले.
"तुमी त्यावरचे आमी केलेले काम बघून घेता का...तर बरा होईल..." बॉस.
साहेबांनी खोलीभर चिंतेची फवारणी केली होती. आमच्या दिशेने.
"पटकन दाखवा.."
संदीप पुढे झाला. "हो हो...मी लगेच दाखवतो..."
आगगाडी सुरु...लॉंच फिल्म...पहिला डबा...प्रेस...दुसरा डबा...साहेबांची चलबिचल...चेल्यांचं अकडंतिकडं...बॉसची आवराआवर. पहिला रूट कत्तल.
चिंता आता सर्वत्र पसरली होती. फवारणीच इतकी प्रखर.
"आमी अजून काही केलंय...आपण बघणार का ?"
"काय आणलंय अजून ?" साहेब.
पेशवीणीची शालू खरेदी म्हणे अशी व्हायची. राज्याराज्यांतून वेगवेगळ्या ढंगांचे शालू घेऊन व्यापारी येत. आणि पेशवीण थाटात नाके मुरडी...शालू वर शालू समोर पसरले जात...व पेशवीणीचे नाक म्हणे मुरुडून मुरडून दुखे. असो...आम्हीं काही इतिके शालू आणिले नव्हिते.
"नाही. अजून एक रूट आणला होता."
"चला,दाखवा मग लवकर." साहेबांनी फर्मावले. बॉसच्या उजव्या हाताला साहेबांचा एक चेला बसला होता. तो बॉसच्या कानी कुजबुजला. आटपा लवकर.
"हो हो." बॉसची नजर माझ्याकडे.
आंबा रंगाचा कुर्ता व आंबा रंगाची ओढणी. मी खुर्चीतून उठले. ओढणी मागे सारली. पडद्यावर दुसऱ्या रूटची एकदम शेवटची स्लाइड टाकली गेली होती. इलाज नव्हता. आता वेळ संपत आलेली होती. एव्ही सुरु झाला. पुन्हा गुरु ठाकूर आणि अजित परब. व त्या गाण्यावर आमच्या फिल्म विभागाने एका रात्रीत तयार केलेले प्रभावी ऑडियो व्हिज्युअल.
तुतारी...घोड्यांच्या टापा...मावळ्यांची ललकारी. लई भारी.
शेवटची स्लाइड सर्वात महत्त्वाची. टॅग लाईनची. आणि तीच टॅग लाईन ओवून पूर्ण गाणे गुंफलेले. जोरकस. अख्ख्या खोलीने तो ताल पकडला...तुतारी घुमली...अंगावर काटा आला.
आणि पुढे काय जाहले...स्मरत नाही. मी बोलायला सुरुवात केली. एकामागून एक...दुपारची आगगाडी नाहीशी झाली होती. आता घोडदौड होती. अतिशय सराईतासारखी. माझ्या आजूबाजूला कोण आहे ह्याचा मला विसर पडला. माझ्यासाठी त्या खोलीत कुणीही नव्हते. ना मुंबई क्रिएटिव्ह हेड, ना मुंबई ब्रान्च हेड आणि ना आमचे सी.इ.ओ. माझ्या बोलण्याला मान डोलावणारे साहेब व त्यांच्या समोर मी ताठ उभी...फक्त स्वच्छ आवाजात एकेक बोर्ड त्यांच्यासमोर धरत...व त्यावर एखाददुसरे वाक्य बोलत. फिल्म्स झाल्या...प्रेस झाले...होर्डींग्स....साहेब व त्यांचे चेले बघत गेले. माना डोलवत गेले. आम्हीं ह्यावर एक रेडिओ देखील केला आहे. मी ऐकवू का ? मी विचारले. साहेबांनी मान डोलावली. मी माझी नाटिका सुरु केली. त्या रेडिओ स्पॉटमधील प्रत्येक व्यक्तिमत्त्वात मी आपोआप शिरले...त्यातील शाळकरी मुलगा मी झाले...त्याची ताई मी होते...व त्याचे बाबा देखील मीच होते.
खरं तर माझ्यासाठी फक्त पाच मिनिटे उरली होती. पण ती मिनिटे कधी संपली व त्यावर अर्धा तास कसा ओलांडला कळले नाही. माझे प्रेझेंटेशन संपले. आणि आम्हीं सर्व क्रिएटिव्ह लोकं खोलीबाहेर आलो. मला सगळ्यांनी गराडा घातला. मिठ्या मारल्या.
"You were too good Anags !"..."Congrats ya !"...."Superb !" हे आणि असेच अनेक.
आत इतर गोष्टींविषयी चर्चा. आम्हीं अजूनही बाहेरच उभे. वीसेक मिनिटानंतर साहेब बाहेर आले. माझ्या आजूबाजूचे सगळे तोपर्यंत पांगले होते. साहेबांच्या हातात फाईल्स. त्यांच्या उजव्या बाजूला दोन हातांवर मी उभी. "You are a very good presenter !" साहेब मनापासून उद्गारले.

मग किती मिटींगा आल्या...किती प्रेझेंटेशन्स झाली.
अशाच एका मोठ्या प्रेझेंटेशन नंतर बाहेर पडल्यापडल्या बॉस म्हणाला..."You are a very good presenter !"
हल्लीच कधीतरी एक प्रश्र्न मी कोणाला विचारला...मी आपल्या सी.इ.ओ.ला आठवते तरी काय ?
"What are you saying ! According to him you are the best presenter the company has !"

मी फक्त हसते.
शाळेत सुरु झालेले माझे काटेरी वर्तुळ तोडून मी हलकेच बाहेर पडले होते.
मावळ्यांच्या त्या तुतारीने छातीवरील जुन्या पाषाणाला, जबरदस्त सुरुंग लावला होता.

समाप्त.




Tuesday 2 August 2011

Product development...भाग २

Product development...भाग १

महाराष्ट्रातील निवडणुकांचे दिवस जसजसे पुढे सरकत होते तसतश्या पैश्यांच्या उलाढाली वाढत होत्या. करोडो रुपये. फक्त एका महिन्यात. हल्ली कार्य दिसून येत नसल्याकारणाने जाहिराती भरमसाठ कराव्या लागतात. नाही का ? टिळकांनी कधी रस्तोरस्ती फलक लावले ? काय गांधीजींनी रंगीबेरंगी जाहिराती छापल्या ?

एका पक्षाचे, जाहिरातींचे काम आम्हांला मिळावे म्हणून आमच्या एजन्सीचा प्रयत्न होता. एकाचवेळी अनेक एजन्सीज ह्या चढाओढीत उतरणार होत्या. आणि ते काम मिळणार होते मात्र एकाच एजन्सीला. ह्या सर्व जाहिरातींची भाषा, बहुतेक करून मराठी असणार होती. आमचे अख्खे ऑफिस त्यावर काम करणार होते. प्लानर्स, सर्विसिंग, क्रिएटीव्ह, फिल्म विभाग आणि अगदी डिसपॅचदेखील. पंधरा दिवस. रात्रंदिवस.

ज्या पक्षासाठी काम करत होतो त्या पक्षाची विचारधारा मनाला पटत होती का ? एक विचार मनाला टोचून गेला. नाही असे नाही. पण आता असा कुठला पक्ष आहे ज्याचे आचारविचार मनाला पटतात ? नाही ना ? मग द्या सोडून. उगाच डोक्याला नाट !

ह्या सर्व प्रकाराला आम्ही आमच्या रोजच्या भाषेत 'पिच्च' म्हणतो. म्हणजे स्पर्धा असे म्हणता येईल. गुणवारी ठरवण्यासाठी बऱ्याच बाबी लक्षात घेतल्या जातात. फक्त 'क्रिएटीव्हीटी'वर ही स्पर्धा कोणी कधी कमीच जिंकते.

तर आम्ही कामाला लागलो. मिटींगा झडू लागल्या. मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये बरेच मॅक हलवले गेले. वेगवेगळ्या टीम्स तिथे एकत्र बसून भेजा फ्राय करू लागल्या. गरमागरम तवा...त्यावर लुसलुशीत भेजा ! मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न फुटावे तसतश्या टपाटप कल्पना (आयडीया) फुलत होत्या व फुटत होत्या. व त्याच गतीने बॉस मंडळी आमचे गरमागरम पॉपकॉर्न काचेबंद खिडकीबाहेर फेकून देत होते. टप टप. हलकेच... तरंगत तरंगत मग ते पॉपकॉर्न गतप्राण होऊन जमिनीवर पडत असावेत. आणि खाली सडा...पांढऱ्या पारिजातकाचा नव्हे. मृत कल्पनांचा ! लगेच अश्या पोटावर पडलेल्या रक्ताळलेल्या बायका का बरं आल्या डोळ्यासमोर ? हा ! 'ती' कल्पना. 'तो' कल्पना नाही. ढँन्टढँण !...फ्रस्ट्रेशन म्हणतात ह्याला...जे आम्हा सर्वांना आलं होतं. आठवड्याभरात.

मग एका रविवारी. मी व माझा एक मराठी मित्र. दोघेही आर्ट. कॉपी नाही. पण शेवटी आर्ट आणि कॉपी काय फरक ? नाही का ? कल्पनांना भाषा नसते. मग त्या रविवारी आम्ही दोघांनी कल्पनेची ऐशी की तैशी केली. डझनावारी कागद उलटेपुलटे वापरले. निराशेच्या भरात टराटरा फाडले. ढीगभर स्क्रिबल्स केली. पाच सहा वेगवेगळ्या साइट्सवर इमेजेस सर्च केली. आणि ! आणि दोन तासांनी 'घेऊन टाक' ! घेऊन टाक झालं ! म्हणजेच 'आयडीया क्रॅक' केली ! अडकित्यात अक्रोड घ्यावा व जोर लावावा. क्रॅक ! झाली ! झाली ! आयडीया क्रॅक झाली !
मग पुढे हेडलाईन्स, बेसलाईन्स, कॉपी...वगैरे वगैरे. मराठी...मराठी आणि मराठी. करुनशान टाकलं. हापिसात बसून. सोमवारच्या मिटिंगसाठी सगळं तयार केलं ! लेआउट सकट ! आणि टॅ ! सोमवारी टॅक अप्रुव्हल ! सब बॉसेसने हम दोनोंकी कल्पना को पसंद किया....क्योंकी हमारी कल्पना एकदम कडक थी !

मग पुढचे पाच दिवस एक्झिक्यूशन ! हा रूट तुम्हीं आता फिल्ममध्ये कसा पुढे नेणार...आणि त्याचा रेडिओ स्पॉट कसा होणार ? लॉंचअॅड कशी असणार ? फोलोअप अॅडसचं काय होणार ? हे व असे बॉसेसना पडलेल्या प्रश्र्नांची उत्तरे. एक ढीग. कल्पनांची एक रास. मॅकवरच्या फोल्डरची वजनवाढ. १ जीबी. २ जीबी, १० जीबी...मेंदूचा किलोभर कीस आणि फोल्डरच्या वजनात १ जीबीची भर. फायलीत फाईल. प्रेस, होर्डींग्स, रेडिओ, फिल्म्स, एव्ही, इनोव्हेटिव्ह प्रेस अॅड्स, इनोव्हेटिव्ह होर्डींग्स...ब्ला ब्ला आणि ब्ला.

पाच दिवस नो झोप.
क्लिक, सेव्ह, डिलीट.
फोटोशॉप, गुगल, इलस्ट्रेटर...
फोल्डर त्यात दहा फोल्डर्स आणि दहा फोल्डर्स मध्ये प्रत्येकात कमीतकमी ५ फाइल्स.

तो दिवस उजाडला. "Hey ! Sharp at 11 o'clock. Big conference room. We all are meeting...be there with all your stuff...try to carry everything." बॉसची सेकी.
थप्पी. मी माझी थप्पी उचलली. दुसरा ग्रुप. त्यांची माझ्यासारखीच एक थप्पी. त्यांचा रूट देखील इंटरनल प्रेझेंटेशनसाठी जय्यत तयार. रंगीत तालीम. त्या राजकीय पक्षाने रात्री आठ वाजताची वेळ आम्हांला दिली होती. त्या आधी आम्ही सर्वजण एकत्र बसून, रंगीत तालीम करत होतो.
प्रथम बॉसचे पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशन. हे तुम्हीं (म्हणजे त्या राजकीय पक्षाने ) आम्हांला ब्रीफ केलंत...आम्ही त्यावर असा असा अभ्यास केला...त्या अभ्यासात आम्हांला असं असं मिळालं...आणि म्हणून आम्ही हा एक असा रूट घेतला..."Ya. Now Sandy you'll take over." तो रूट प्रेझेंट करणारा संदीप. एक मराठी मुलगा. इंग्लिश माध्यमात शिकलेला. कॉपी रायटर. संदीपला आज्ञा दिली गेली. संदीप उभा राहिला....एक छोटं भाषण...हा रूट आम्ही का घेतला...व घेतला तो घेतला...तो पुढे कसा नेला...ही अशी दिसणार व बोलणार तुमची फिल्म, हा असा गाणार तुमच्यासाठी रेडिओ, ही घ्या तुमच्यासाठीच खास बनवलेली प्रेस अॅड आणि हे बघा कसं झकास दिसतंय तुमचं होर्डिंग...

बॉसच्या बाजुलाच मी दोन फुटांवर. का बरं ? का बरं मी समोर नाही बसले ? Whatever ! हातात कागद...कागदावर फिल्म स्क्रिप्ट्स. टेबलावर पुढ्यात प्रेस अॅड्स आणि वगैरे आणि वगैरे. ह्या वगैरेची उंची एक फुट.
आणि हळूहळू...अगदी हळूहळू तो माझ्या हृदयावर येऊन बसू लागला. नकळत. ज्यावेळी स्थिरस्थावर झाला त्यावेळी तो शाळेतला प्रचंड आकाराचा जुना दगड, मला पुन्हा एकदा जाणवला. श्वास घ्यायला त्रास. हातपाय थरथर.
संपलं संदीपचं. " Nice. That's good ya ! Very nice !" सगळे म्हणू लागले. संदीप चेहेराभर हसला.
"ya...now Anagha, I will go back to my presentation...and I will give a little background of your route...okay ?" इति बॉस. मी जड मान हलवली.
३ मिनिटांचं PPT ! संपायला तीनच मिनिटं लागली...आणि सगळ्यांच्या नजरा तडक माझ्याकडे लागल्या. लांबसडक गोल टेबलाभोवती आम्ही सगळे बसलो होतो. बॉस माझ्या उजव्या हाताला. काहीजण डाव्या हाताला. काही समोर. जवळपास दहा बारा लोकं. बसूनच प्रेझेन्टेशन करायचं होतं. मी सुरु केलं...हे आणि हे आणि असं आणि तसं...तसं आणि तसं...धाडधाड. चार मिनिटं आणि माझं बोलून संपलंच. हातातील कागदांची चळत संपली. २/३ स्क्रिप्ट्स, २/३ रेडिओ. समोरचे वेगवेगळे प्रिंट आउट्स. पोस्टर्स, होर्डींग्स, लॉंअॅड, फोलोअप अॅड्स...पंधरा दिवसांची अहोरात्र मेहेनत आणि मोजून चार मिनिटांची आगगाडी. आली कधी आणि गेली कुठे...कोणाला काही म्हणून काहीही पत्ता लागला नाही. सगळे गप्प. चिडीचूप.
"Anagha, you are going too fast. See, I'll tell you. You do one thing...you look at me in between your presentation. If I do this...that means you are going too fast and you need to go slow...ya ? Don't worry...you will be fine."
...असं, म्हणजे बॉसने हात हळूच टेबलावरून उचलला आणि हलकेच दोनदा खालीवर केला.
"ya...I will keep that in mind." क्षीण स्वरात मी पुटपुटले.
"Or do you want me to ask someone else to present ? Tell me."
कल्पना माझी. आणि सादर कोणीतरी दुसराच करणार...मग अप्रेझलच्या वेळी हा सर्व एपिसोड माझ्या विरोधात जाणार ! गटांगळ्या खाताना दिसलं मला सगळं...तोच तो दगड गळ्याशी बांधून...इन्क्रिमेंट, प्रमोशन सगळं खोल खोल...
"No...I'll do it." त्या दगडाच्या खालून माझा खोल खोल क्षीण आवाज.
"And practice again in the afternoon...ya ? Ask somebody to sit in front of you and practice...okay ?"

मी मराठी. प्रेझेन्टेशन मराठी माणसांना द्यावयाचे होते. आपल्या मराठी राजकारण्यांना.

परीक्षा होती. जी मी एकदा नापास झालेले होते. त्यावर बरीच वर्षे उलटली म्हणून काय झाले ?
वर्षे उलटली म्हणून काय माणूस बदलतो ?

क्रमश: