नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 10 September 2011

साधन

थोर साहित्यिकांना हा प्रश्र्न कोणी नाही विचारणार कदाचित. परंतु, माझ्या सारख्यांना विचारू शकतो. म्हणजे, चित्र काढत होतीस तोपर्यंत ठीक होतं आता लिहावसं का वाटलं....? वगैरे.

मी एखादी वस्तू वा सेवा विकत असते त्यावेळी मी काही प्रत्यक्षपणे तुमच्यापुढे येऊन उभी रहात नाही. वेगवेगळ्या माध्यमातून मी हा उद्योग करत असते. कधी रेडिओ कधी टीव्ही तर कधी वर्तमानपत्र. एखाद्या वस्तूतील अगदी अल्प गोष्ट (USP - Unique Selling Propositions) मोठ्यात मोठी करून सांगण्याच्या हातोटीवर माझे जाहिरातक्षेत्रातील कौशल्य अवलंबून रहातं. हे कौशल्य कधी अनुभवातून कधी टक्केटोणपे खात मिळवलेलं...ह्या शिडीवर चित्रकलेची पायरी अगदी पार तळाची.

ब्लॉग. अगदी प्रत्यक्ष समोरासमोर नाही परंतु, आपण गप्पा मारतो...कधी सहमत होऊन तर कधी असहमत असलो तरीही. कसलाही आग्रह नाही. मैत्रीचा हट्ट नाही....नकळत जुळलेली वीण. एक गोष्ट मात्र नक्की. कसलाही खोटेपणा नाही. असत्याची कास नाही. सत्य व केवळ सत्य.

आयुष्याच्या मध्यांतरावर चक्रीवादळात सापडले असता हाताशी लागलेला एक ओंडका.

देशी परदेशी...कोर्टकचेऱ्या.
देशी परदेशी...पोलीस स्टेशने.
देशी परदेशी...इस्पितळे.
आणि देशी परदेशी...स्मशानभूमी.

काही सांगता येण्यासारखे.
बरेचसे सांगता न येण्यासारखे.

वास्तवात, खूप जगून झालेलं आहे. तश्या न कळत्या वयात एका जीवाला जन्म दिला...खूप मोठी जबाबदारी अंगावर घेतली. त्या जीवाला स्वत:च्या पायावर उभं रहाता येण्याइतपत ती जबाबदारी देखील पार पाडत आणली.

एखादी जाहिरात यशस्वी करताना बऱ्याचदा त्यात असत्य ७५% व सत्य फक्त २५% असते. मूळ स्वभाव तर तो नाही. आयुष्यातील बरीचशी नाती, स्वभावातील ह्या गोष्टीमुळे दुखावलेली. जाणून बुजून दूर सारलेली. पाठ फिरवून चालू पडण्याची सवय. वा खोड म्हणा.

हा ब्लॉग लिहिताना....तो चालवताना मला सर्वात भिडून गेलेली एकच गोष्ट...मला इथे कुठलाही मुखवटा घेऊन उभं राहायचं नाही...मला काहीही विकायचं नाही. महत्त्वाचं म्हणजे स्वत्व विकायचं नाही. चेहरा लपवायचा नाही.

सत्य हेच माझं नेहेमी बळ होतं...
तेच मला बुडवत असतं...
तेच मला तारून नेत असतं.

खरं तर फुटक्या काचेला देखील सुंदर बनवता येतं...
काळ्याकुट्ट ढगांतून भयप्रद वीज कडाडत भेदून जाते...पुढल्या क्षणी तेच ढग पुन्हा एकजीव होऊन जातात.
सुकून गेलेल्या ओंडक्यावर उमललेलं रोप किती वेळा दिसतं.
परंतु, ह्या सर्व उपमा असतात. वास्तवात असं काही नसतं.
एकेक करून जमवलेल्या झोपेच्या गोळ्या कचरा पेटीत फेकून दिल्या.
जगण्याचा प्रयत्न मीही केला.

कित्येक जण, दुर्धर आजारातून बाहेर पडतात. पुन्हा हसत खेळत जगू लागतात. आपली मनं, त्यांचं हे बळ बघून काही शिकून जातात.
फक्त एकच असतं...शरीराला झालेले रोग जगाला सांगता येतात...त्यावर केलेली मात...कधी मनाने तर कधी उपचाराने...हे सर्व जगाला सांगता येतं. जगाकडून जगण्याचं बळ मिळवता येतं.
परंतु, मनाची दु:खं, मनाच्या वेदना अशा सांगता नाही येत.

परवा कचेरीत आम्ही 'bounce back' वर चर्चा करत होतो. ह्या चर्चेला आम्ही 'brain storming' म्हणतो ! प्रत्येकाकडे 'bounce back' करण्याची शक्ती असते...वा असणे आवश्यक आहे. आयुष्यात कुठल्या दिशेने कधी झंझावात येईल सांगता नाही येत. आणि त्यात भुईसपाट होणे हे नैसर्गिक. परंतु, त्या फटक्यानंतर उठून उभे रहाणे...आणि पुढील वाटेला लागणे हे महत्त्वाचे. आणि ते करण्यासाठी प्रत्येकाचे काही वेगळे अस्त्र असते...काही वेगळे माध्यम असते. कधी नकळत तर कधी जाणून बुजून हातात धरलेले.

माझे लिखाण हे माझे साधन.
माझ्या नकळत...माझ्या हातात दिले गेलेले.
कुठल्याही मंदिरात नसलेल्या माझ्या देवाने.

26 comments:

विनायक पंडित said...

अनघा! सुपर्ब लिहिलंय तुम्ही! अगदी मनाला भिडणारं! लिखाण आणि काही न लपवणं हे अगदी अगदी तसंच! समानधर्मी मिळाल्याचा आनंद आहे! हॅट्स ऑफ! :)

Gouri said...

काय म्हणू?

अशीच फक्त लिहित रहा, का उतारा म्हणून लिहायची वेळ तुझ्यावर न येवो?

एक मात्र आहे, जे काही तुला लिहिणं भाग पाडतंय त्यात आमचा फयदा आहे. खूप काही वाचायला मिळतंय इथे.

All In the Day's Work said...

अतिशय मोहक, सरळ आणि प्रामाणिक. मन भारावून गेल.

तृप्ती said...

:)

sahajach said...

>>>> अशीच फक्त लिहित रहा, का उतारा म्हणून लिहायची वेळ तुझ्यावर न येवो?

अगदी अगदी!!!

अनघा अगं हे साधन काहिही न घेता बरच काही देतय आपल्याला, नाही का!!

अपर्णा said...

अनघा, खूप छान पोस्ट....सत्य आणि सत्य हेच तुझ्या ब्लॉगवर वारंवार यायचं, तुझ्याशी संवाद साधायचं कारण गं...मस्तच लिहितेस आमच्यासाठी अनुभव वाचायचं साधन असं म्हणायला हवं...लिहिते रहो...

अनघा said...

धन्यवाद विनायक. :)

अनघा said...

गौरी ! खूप खूप आभार ! :)

अनघा said...

All in the day's work...आभार.

अनघा said...

तृप्ती...

अनघा said...

हो ग तन्वी... :)
आभार हं.

अनघा said...

:) अपर्णा, आभार. :)

BinaryBandya™ said...

अतिशय सुंदर ..

आनंद पत्रे said...

सुंदर लिहिलंय अन खूप जिगरबाज आहेस ताई!

अनघा said...

बंड्या, धन्यवाद. :)

अनघा said...

आनंद, न होऊन सांगते कोणाला...अशी परिस्थिती ! :)
आभार रे. :)

Raindrop said...

read khushwant shings autobiography....truth, love & a little malice....open frank ani no lapva lapvi....fakta mryada to olandun zato ani tu dharun chalates....pan kuch to hai similarity in expression of self and moklepana....tujhyat and him mein.

हेरंब said...

काय प्रतिक्रिया देऊ तेच कळत नाहीये.

अतिशय प्रामाणिक पोस्ट !! अर्थात तुझं सगळंच लिखाण नेहमीच अतिशय प्रामाणिक असतं म्हणा..

वर सगळ्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे (उशिरा प्रतिक्रिया दिल्याची शिक्षा म्हणून हे म्हणावं लागतं ;) ) अधिकाधिक लिहीत रहा जेणेकरून आम्हाला सतत नवीन नवीन वाचायची संधी मिळत राहील..

अनघा said...

वंदू.... :)

अनघा said...

हेरंबा, मला कधी कधी आश्चर्य वाटतं...कसे काय हे असे सूर जुळू शकतात...दूरदूर...पलीकडल्या गावात...दूर शहरात...साता समुद्रापलीकडे... ? :)

श्रीराज said...

... म्हणून तर आम्ही तुला मानतो :)

अनघा. तुला एक सांगू... आजपर्यंत मला, तू म्हणतेस तसं, मुखवटा काढून कधीच लिहिता नाही आलं... आणि यापुढे ते लिहिता येईल असं ही नाही वाटत..का कुणास ठाऊक... कदाचित भीतीमुळे असेल... पण ते नाही होत माझ्याकडून... काहीतरी झाकावं लागतंच. मी खूप भित्रा असेन बहुधा :(

अनघा said...

श्रीराज...मरण असं कितीसं दूर आहे...कुठे थापा मारत बसू...राहिलेला काळ ? नाही का ? :)

sanket said...

अब्बब.. अप्रतिम मांडलंय बाय..अल्फ़ाज़ों में जादू हैं आपके... प्रामाणिक लिहतेस म्हणून आम्ही प्रामाणिकपणे वाचतो..

" सवालों को हमने यूँ हल करना सीख लिया..
रोज मरना मुश्किल था तो जीना सीख लिया.. "

काय, बरोबर ना ? :P
( बाकी प्रस्तुत शेराबद्दल शायर ’संकेत तुमसरी’ ह्यांचे आभार ! )

अनघा said...

" सवालों को हमने यूँ हल करना सीख लिया..
रोज मरना मुश्किल था तो जीना सीख लिया.. "
सही सही स्वामी ! मला खूप आवडलं ! :)
'भोगिले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागिले..." :)

सौरभ said...

ह्या साधनाने आम्ही एकदम सधन झालो आहोत... (वैचारीक/बौद्धीक/भावनिक/मानसिक)दॄष्ट्या...

(हे जाम फिलॉसॉफिकल कमेंट वाट्टंय मला)

अनघा said...

साधन..साधन...व्वा ! :D सौरभा !