नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 30 June 2010

'वाढ'दिवस - सत्यकथेवर आधारित

काल एका आईने लेकाचा वाढदिवस केला.
मावश्या आल्या. काका आला. मामा आला.
केक मावशीने आणला.
काकाने पण आणला.
मामाचा तर भाचा लाडकाच होता.
तो केक बरोबर फुले घेऊन आला.
घरभर फुलं.
पिवळी, लाल, जांभळी आणि निशिगंधाची लांबसडक कांडी.
घमघमाट घरभर.
संगीत घरभर.
माणसं घरभर.
लेकाचे मित्र घरभर.
लेक सगळ्यांचा लाडका.
सत्तावीस वर्षांचा.
कोणाशी बोलू? कोणाशी हसू?
तिला आवाज ऐकू येईनासा झाला.
कोपऱ्यातून पार्टी सुंदरच दिसली.
दर वर्षासारखी सुंदरच रंगली.

मग केक कापला. प्लेटा भरल्या.
हसायला, डुलायला.
वेळच नाही पुरला.

प्रथम घड्याळ भानावर आलं.
हळूहळू घर रिकामं झालं.
आवरा आवर केली..फ्रीजमध्ये भांडी गेली.
केक सकाळी बिल्डींग मध्ये वाटू.
आईने विचार केला.

ती रात्र चिवट होती.

पहाटे पहिला केक दुधवाल्याला गेला.
नंतर कचरेवाली, इस्त्रीवाला....वॉचमनला देखील न विसरता दिला.

एकंच झालं...
इस्त्रीवाला कपडे घ्यायला थोडा वेळ थांबला.
"आंटी, किसका बर्थडे था?" विचारता झाला.
"मेरे बेटे का."
"हां? कहाँ है?"

चोंबडा नुसता.
आंटी तरतर आत निघून गेल्या.

कामवालीने टोपलीत फुलांचा हार कोंबून भरला.
काल मावशीने लाडक्या भाच्याच्या फोटोला, घातलेला ताज्या गुलाबाचा हार
नाहीतरी आता कोमेजुनच गेला होता.

Tuesday, 29 June 2010

पासष्टावी कला

काही वर्षांपूर्वी, माश्या मारायचे काम मी अतिशय सुंदर करत असे.
बाबांनी आम्हांला शिकवलंच होतं. कुठलंही काम एकदा अंगावर घेतलं की ते मन लावून आणि सुंदरच करावं. बाबांनी कौतुक करावं म्हणून मी झाडू अगदी जमिनीला घासून घासून कचरा काढत असे. बाबा देखील काही कमी नाहीत! माझा कचरा काढून झाला की पाय घासून खोलीभर एक चक्कर मारायचे. आणि मग पसंतीस माझं काम उतरलं तर म्हणायचे,"अनघा, कचरा बरिक छान काढते !" माझ्या अंगावर मुठभर मांसाची वाढ!

तर हे जरा विषयांतर झालं.

ह्या स्वभावधर्मानुसार माझ्यावर जेंव्हा माश्या मारायची वेळ आली तेंव्हा मी ते देखील काम अगदी मनावर घेतलं. त्यावर अभ्यास केला आणि काही दिवसातच ती देखील कला आत्मसात केली.
तुम्हांला आता प्रश्न पडला असेल की माझ्यावर ही वेळ आधी आलीच कशी! सांगते, ऐका!

छोटं बाळ नुकतंच निजलेलं असताना एका माशीमुळे त्याला जाग यावी आणि मग पुढच्या सगळ्याच कामांची उलथापालथ व्हावी ह्यासारखी वैतागवाणी गोष्ट दुसरी नसेल! आणि त्यातून मला जेंव्हा बाळ झालं तेंव्हा ही हल्लीची 'बाळ झाकून ठेवता' येण्याची सोय मुळीच नव्हती! आमच्या डोंबिवलीत तरी नव्हती! मग मी भराभर स्वयंपाकघरातील कामे आटपून माझ्या लेकीशेजारी हातात प्लास्टिकची एका विशिष्ट पद्धतीने बनवलेली तलवार घेऊन बसत असे. पावसाळ्यात हा त्रास भयंकर. सुरुवातीला मी माशी मारली की एक झप्प असा आवाज येत असे आणि मग ही माझी पालथी झोपलेली लेक बरोब्बर मान वर करून माझ्याकडे बघे! कि मग झालं. पुढची सगळी शांतता भंग. ते काही खरं नाही. गावी, बाबा लहान असताना म्हणे पट्टा छान मारायचे...सफाईने. तेच लक्ष्य डोक्यात धरून मग मी अशी काही हात फिरवायला शिकले की त्या माशीला मी हवेतल्या हवेत निर्वाणाला पाठवत असे. धारातीर्थी पडताना ती टुप्प असा देखील आवाज काढू शकत नसे! समजा लेकीजवळ जाऊन एखादी माशी बसलीच तर तिचा कारभार देखील मी असा काही शिताफीने संपवत असे की लेकीच्या ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागू नये! तिच्या अंगावर बसायची त्यांची काय बिशाद? तीने निदान एखादा तास झोपावे म्हणजे मला वर्तमानपत्र तरी सुखाने वाचता येईल एव्हढीच माझी इच्छा. आणि मग रोज गेला बाजारी माझ्या रणभूमीवर दहा ते पंधरा तरी माश्या मरून पडलेल्या असत! दुपारच्या निवांत झोपेमुळे लेकीने बाळसं धरलं ती गोष्ट पण लक्षात घ्यायलाच हवी.

कर्तव्यदक्ष्य नवरा रात्री घरी आल्यावर विचारत असे,"आज काय केलंत तुम्ही दोघींनी?"
"तुझ्या लेकीने चारदा बसायचा प्रयत्न केला, पाचदा पडली आणि मी माश्या मारल्या."

माश्या मारणे ही देखील एक कलाच आहे हे काही मी त्याला पटवून देऊ शकले नाही!

मैत्री

मैत्रीचं जाळं असतं....
मैत्रीचं पोळं असतं...

जाळं दूरदूर पसरतं.
मूळ विसरतं.
एका झटक्यात निखळून जातं.

पोळं मधुर असतं..
एकमेकांना धरून असतं.
कोणी आक्रमण केलं तर
डंख करून एकजात आत्मदहन करतं!

माझं नाही जाळं.
माझं आपलं छोटंसं पोळं.

जाळपोळ करण्यापेक्षा बरं!

Monday, 28 June 2010

पाटा आणि वरवंटा

काळा कुळकुळीत खरखरीत पाटा आणि गुळगुळीत वरवंटा.
रंगात साधर्म्य परंतु स्वभावात वैविध्य. एकमेकांना पूरक. म्हणतात ना संसारात हे असंच असावं. एकमेकांशी मग चांगलं सूत जमत. दोघेही गुळमुळीत किंवा दोघेही रुक्ष! काही खरं नाही!
हे मिक्सरंच युग येण्यापूर्वी आईकडे मी पाट्यावरवंट्यावरच वाटण वाटत असे. ती मजाच काही और. खोबरं, लाल मिरच्या, धने, लसूण सगळं कसं पाट्यावर घ्यावं आणि जरुरीपुरतं पाणी घालून तालात सुरुवात करावी.
डंगडग डडंगडग! जिम वगैरे करायची काही गरज नाही. चांगलं पोटाशी पाय घेऊन खाली बसावं आणि हातात जड वरवंटा घुमवावा. झाले की बायसेप्स तयार! आणि बरोबरच पोटावरची चरबी जळलीच म्हणायची!
वाटणाचं पोत आपल्या हाती. अगदी गंधासारखं मऊ हवंय की हातात ओली वाळू धरल्यासारखं हवंय. चटणी कधी मुलायम वाटणासारखी वाटू नये आणि वाटण कधी रवाळ असू नये. कालवणात तरंगताना माश्याला देखील कसं छान वाटायला हवं. त्याला वाटण बोचायला नको. तेच मिरचीचा ठेचा जर मऊसुत केलात तर काय उपयोग?
गल्लीत खाली टाकी घ्या टाकी अशी हाळी ऐकू आली की आई आम्हाला दामटवायची टाकीवालीला बोलवायला.
हा सगळा माझा तालमय आनंद एकदाच माझ्या अंगावर म्हणजे डोळ्यांवर आला होता.
झणझणित मिरचीचं वाटण वाटलं आणि नंतर लगेच, अगदी तळहाताचा तो वासही गेला नसेल इतक्यात त्याच तळहातावर धरून, स्वच्छ घासूनपुसून डोळ्यात लेन्सेस घातल्या तेंव्हा! डोळ्यात अंजन घालणे किंवा मिरचीची धुरी देणे हे अगदी ह्याची डोळा अनुभवले!

तरी देखील तुम्ही काही म्हणा...
ह्या यंत्रयुगात हे साधेसुधे नियमित करण्याचे व्यायाम नाहीसे गेले आणि मग चरबी जाळायला, घोटीव दंड कमवायला आधुनिक व्यायामशाळा गाठाव्या लागू लागल्या.
अर्थात त्यातून देखील नवनवीन नोकऱ्या निघाल्या, कामधंदे निघाले ही बाब अलाहिदा!

Saturday, 26 June 2010

'धडा लोकलचा'

सकाळी चालत्या लोकल मध्ये डोंबिवलीला चढून दादरला उतरायचे. आणि संध्याकाळी भर गर्दीत दादरला चढून डोंबिवलीला उतरायचे. ह्या एका कृती भोवती माझं दिवसभरंच गणित मांडलं जायचं.
सगळं कसं घड्याळ्याच्या काट्यावर. अगदी बॅले नर्तकीसारखा ताल. काटा इथे तर हातात ब्रश, काटा थोडा पुढे तर स्टोव्ह वर पाण्याचं पातेलं...जसं काही त्यात थोडी जरी चूक झाली तर ते घड्याळ, दोन काट्यांच्या चिमटीत मला धरून फेकुनच देईल.
ह्या मुंबईतल्या लोकलने रोजच्यारोज प्रवास करणाऱ्या बायकांकडून जगाने 'वेळ नियोजनाचे' धडे का घेऊ नयेत? प्रिन्स चार्लसला आमचे फक्त डबेवाले दिसले, आम्ही बायका नाही दिसलो!
जरी जायचं दादरला तरी देखील आधी जावं ठाकुर्लीला. जागा मिळण्याची शक्यता जास्त. खात्री नाही...पण शक्यता नाकारता येत नाही. त्यातून जर गरोदर असाल आणि अगदी सुरुवातीचे महिने असतील तर तुमची खैर नाही. मळमळतंय म्हणून मदतीच्या अपेक्षेने आपल्या भगिनीसमाजाकडे बघाल, अगदी तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगाल देखील. परंतु, काय आम्ही नाही काढली पोरं? तूच राहिलीस का ग गरोदर? असेच भाव चेहऱ्यावर दिसतील.

जन्मल्यापासून दादरला रहाणाऱ्या मला हे सगळं शिकून घ्यायला थोडा वेळच लागला. आणि चढल्याचढल्या, बरोब्बर लवकर उतरणारी बाई हेरून आपली सीट रिझर्व करून ठेवणे तर शेवटपर्यंत नाही जमले! मी शिकू शकले अशी तंत्र हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी. जागा मिळाली आणि पुढच्या पाचव्या मिनिटाला झोप यायला लागली की आपले डोके आपल्याच ताब्यात ठेऊन कसे झोपायचे हे मी शेजारच्या बायकांच्या रोजच्या शिव्या ऐकून नशिबाने लवकर शिकले! आणि मग बरोब्बर 'दिवा' गेलं की डोक्यात कुठूनतरी गजर वाजायला लागायचा. घरच्या घड्याळाचे प्रताप असणार. नोकर न मी त्याची! मिनिटभर जास्त तरी का तो मला झोपून देईल? चालत्या आगगाडीत बसून भाजी निवडून ठेवणे हे जरी सुरुवातीला लज्जास्पद वाटले तरी देखील हळूहळू ती काळाची गरज ठरू लागली. गाडीत बाहेर लटकणे प्रथम भीतीदायक वाटले, पण मग हळूहळू ते जिमन्यॅस्टिक देखील अवगत झाले. शेवटी नियमित सरावाचाच तर सगळा प्रश्न!
पाकशास्त्रात नुकताच शिरकाव केल्यामुळे रोज घायाळ शरीर घेऊन मी ट्रेन मध्ये शिरले की बायका अगदी हिची सासरची माणसं हिला मारहाण करतात की काय ह्या शंकेनेच बघत असंत! कधी बोटं कापलेली तर कधी हातावर किळसवाणे पाण्याने भरलेले टपोरे मोठे मोठे फोड! तव्याच्या वेगवेगळ्या लांबीच्या जळक्या खुणा तर रोजच्याच.

आज जरी तो धकाधकीचा प्रवास माझ्या आयुष्यातून खूप दूर राहिला असेल....तरी देखील मुंबईच्या लोकलने त्या वेळी शिकवलेले ते धडे माझ्या नवीन, कोवळ्या संसाराच्या धड्यातीलच एक होते. एखादा धडा खूप महत्वाचा असतो तसा...

Friday, 25 June 2010

गोगलगाय

लहानपणी, पावसाळ्यात घरासमोरच्या लांबसडक भिंतीवर खुपश्या गोगलगाई दिसू लागत. त्यांच्या दिशा वेगवेगळ्या, मात्र गती एकसारखी. काळपट शेवाळी भिंतीवर त्या पिवळट गोगलगायी कितीही लपून रहायचा प्रयत्न करीत असल्या तरी देखील, मी त्यांना बरोबर उचलून दूर एका ठराविक जागेवर आणून ठेवत असे. एकेक करून भिंतीवरच्या एकजात सगळ्यांना उचलून...काही छोट्या तर काही मोठ्या. फुगीर, टपोऱ्या. अगदी मोजून. कधी वीस तर कधी तीस. जशी काही मी त्यांची सभाच भरवत असे. काही क्षण एका जागेवर स्तब्ध बसून त्या मुक्या गोगलगायी परत आपापल्या दिशेने हळूहळू चालायला सुरुवात करत असत.
मी त्यांची, त्यांनी मनाशी आखलेल्या प्रवासाची दिशाच बदलत असे...
त्यांनी अथक प्रयत्नानंतर जी काही मजल गाठली असेल ती पुसून टाकत असे...
माझ्या मनाला येईल ती दिशा रोज त्यांना देत असे...

आता मला त्यांची आठवण येते.
त्यांना जे मी दिशाहीन करून ठेवत असे ते आठवते.

गती माझीही संथ...
नियती मला उचलून ठेवत असते....
तिला हव्या त्या दिशेला तोंड करून....
मग मी त्या दिशेने चालू लागते....
ती मला परत उचलेस्तोवर...

Thursday, 24 June 2010

ओलावा

ऑफिसमधील खिडकीपाशी दोनच जीव... मी आणि माझं चिमुकलं रोप.
खिडकी निळ्या काचेची...वर्षाचे बारा महिने बाहेरचं जग अंधारून टाकणारी. म्हणजे काम करताना माणसाला पत्ता लागू नये दिवस संपला कधी ह्याचा!
रोजच्यासारखं आल्याआल्या, रोपाला मी पाणी घालायला गेले. पण आज त्याची नजर बाहेर लागून राहिलेली. त्याच्या नजरेला धरून मी देखील बाहेर बघितलं. बाहेर आमच्या अंधारलेल्या जगात पाऊस लागला होता.

ही खिडकी म्हणजे एखादं भलंमोठं एकसुरी चित्रच टांगून ठेवलेलं. काळसर निळा, गडद करडा आणि काळपट हिरवा...एकसुरीपण तोडणारी एकंच गोष्ट. पावसात स्नान करून शुचित झालेली लालबुंद कौलं.
मी माझ्या रोपाकडे बघितलं...पिंजऱ्यात जखडून ठेवलेला पक्षी भकास नजरेने बाहेरच्या मोकळ्या दुनियेकडे बघत असतो. हे माझं रोप एकटक, त्या वरून पडणाऱ्या मुसळधार पाण्याकडे बघत होतं...माझ्या हातात होती माझी शिळ्या पाण्याची बाटली....

मन आसुसलेलं ओलाव्यासाठी...जटेतून जोशात निघालेला आणि मार्गात अडसर न घेता माथ्यावर पडणारा...

मग मी माझ्या रोपाचं दृश्यच बदललं...त्याला उचलून माझ्या घराच्या उघड्या खिडकीत आणून बसवलं...

पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर ते थरथरलं...
निदान मी त्याचं तरी भविष्य बदललं...