नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 15 December 2012

कुणाविना...

बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली. हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही. आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन दोन वर्षं होतील. म्हणजे सिद्धांताला पुरावे मिळाले. ह्या सगळ्या आपल्या बालसमजुती असतात. माझ्या ह्या समजुती अगदी माझी लेक दोन वर्षांची झाली तरी टिकून होत्या. म्हणजे आमच्या शेजारचे काका अकस्मात गेले त्यावेळी मला अगदी ठामपणे वाटले होते...आता वर्षभरात काकी पण जातील म्हणून. पण तसं काही झालं नाही. त्यानंतरही बरीच वर्षं काकी जिवंत होत्या. बालवयात प्रेमपत्र वगैरे लिहिताना मी बऱ्याचदा लिहिलं होतं...तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही वगैरे वगैरे. तसलं काही झालं नाही. ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. आपल्याला कोणी असं बोललंबिललं तर अगदी म्हणणं खोडून टाकायची गरज नाही...पण उगाच त्यावर विश्वास ठेवायला जाऊ नये. कारण आपले जगणे हे आपले असते. आपण शेवटी स्वत:साठी जगत असतो...स्वत:च्या कर्तव्यांसाठी जगतो...आपल्या टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्यासाठी जगतो.

हल्ली असं बऱ्याचदा होतं...विचारांची वावटळ आणि समोरील पडद्यावर टंकित करता येण्याची गती...ह्यांचा मेळ जुळत नाही. विचार सुसाट लाटेसारखे किनाऱ्यावर आपटून माघारी निघून देखील जातात...आणि मी तिथेच उभी असते....पायाखालचा ओला स्पर्श सुकवत. बधिर. एक लाट...दुसरी लाट...शुभ्र फेस वाळूच्या आरपार झिरपतो...आणि माझे विचार फेसाइतकेच अल्प आयुष्य घेऊन झिरपून जातात...
अस्तित्वाचे नामोनिशाण न ठेवता. 

माझी लेक मला बोलता बोलता म्हणून जाते..."आई, तुझं आयुष्य फार इव्हेन्टफुल झालंय...."

इव्हेन्टफुल आयुष्य...
आणि इव्हेन्ट मॅनेजमेंटचा ना ओ का ठो मला माहिती...!


Tuesday, 11 December 2012

तीन...दोन...एक

स्वत:ला ओळखेओळखेस्तोवर अर्ध आयुष्य जातं...आणि जोडीदाराला पूर्ण ओळखतो असं मानून त्याच्यावर आपण आयुष्य सोपवतो !
कसला मूर्खपणा आहे हा !
सोळाव्या वर्षी...तळपत्या उन्हात देखील आकाशात इंद्रधनुष्य असतं...कुजक्या नाल्यात डवरलेले गुलाब दिसतात...!
अक्कलखाती आयुष्य जातं !

पानाला पिवळजर्द होऊन धारातीर्थी पडल्यावर कळत असेल काय....वर हे इतकं अथांग आभाळ पसरलं होतं...त्याच्या देखील नकळत...अचानक एखादी वीज त्याचे हृदय फाडून जाते...आणि तरी सुद्धा ते आभाळ जणू सर्व आलबेलच आहे असा आव आणून, पृथ्वीवर सावली धरून उभं रहातं !
कमाल आहे नाही का?
जाणवतं का कधी हे तुम्हांला ?

मला सध्या हे असंच सुचतंय !
काळजी नका करू...
मी आभाळाकडून बरंच काही शिकतेय !
:)



Sunday, 9 December 2012

सैरभैर

आभाळाला सीमा नसते...नियम एक. नदी संथ वहाते...नियम दोन. समुद्र पृथ्वीचा सोबती...नियम क्रमांक तीन.
नियमबाह्य घडते तेव्हा आभाळ फाटते. नदी हंबरडा फोडते. पृथ्वीची साथ सोडून समुद्र आकाशाकडे झेपावतो.
आई प्रेमळ असावी...आयुष्याने धरलेली पहिली अपेक्षा...नियम नव्हे.
मात्र हा एक अपेक्षाभंग...माथ्यावरचे आभाळ फाडतो...डोळ्यांच्या नदीला पूर आणतो...आणि समुद्राची लाट उर फाटून नेते...
...एकूण काय....एक अपेक्षाभंग...आयुष्य सैरभैर वगैरे.

Thursday, 6 December 2012

घुबडकथा

हळव्या चिमणीचं नक्की काय झालं ?
तिचं घुबड कधी झालं ?
वादळ आलं ? उल्कापात झाला ?
कोवळ्या चिमणीचं नक्की घुबड का झालं ?
व्हायचं ते झालं...
घडायचं तेच घडलं.
गळला एकेक दिस....
ढळलं एकेक पीस.
मऊ लोण्याचं शेण झालं...
गुलाबी रंगाचं मातेरं झालं.
बघताबघता ह्या चिमणीचं घुबड झालं.

Wednesday, 28 November 2012

जाळपोळ

डोक्यात जाणारी माणसं वाढलीत.
आणि हृदयाची लोकसंख्या घटलीय.
म्हणूनच बहुधा डोक्यात राख घालून घ्यावीशी वाटते.
आणि वाटते हृदयाची करावी जाळपोळ.

Wednesday, 21 November 2012

प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका.
कित्येक प्रश्न. त्या प्रश्नांना कुठलीही वर्गवारी नाही. एका वाक्यात उत्तरे द्या, सविस्तर उत्तरे द्या, गाळलेले शब्द भरा...असे काहीही नाही. फक्त प्रश्न.
आणि त्यातून सगळे सोडवलेच पाहिजेत असेही नाही. काही प्रश्न आपल्यासमोर फक्त मांडण्यात आले आहेत, मात्र ते आपण सोडवायचे मात्र नाही आहेत अशी पुसटशी देखील कल्पना दिली जात नाहीत.
मी मात्र सगळेच प्रश्न गांभीर्याने सोडवू पहात होते.
काही प्रश्न काळ सोडवणार आहे व काही थोडेच मी सोडवायचे आहेत हे आधीच कळू शकलं असतं तर कदाचित आयुष्य जगणं थोडं सोपं झालं असतं.
उगाच दिवस उलटतात, महिने सरतात आणि वर्षे निसटतात.
आणि मग मागे वळून बघितल्यावर जाणवते...

...तो प्रश्न मी कधी सोडवूच शकले नाही.
आणि तो कधी सुटलाच नाही.

कोवळ्या वयात कल्पना फार भराऱ्या वगैरे घेतात.
उगाच आत्मवल्गना स्वत:च्याच मनाशी, स्वत:बद्दलच्या.
आयुष्य संपता संपता सगळाच भ्रमनिरास होतो.

आणि हे सगळे इतके कठीण प्रश्न मी सोडवायचे आहेत का ?....ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर मिळते.

कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी द्यावयाचेच नव्हते.

परीक्षेला 'काळ' बसला होता !