नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 14 July 2012

टूर'की'...भाग ९

टूर'की'...भाग १
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५
टूर'की'...भाग ६
टूर'की'...भाग ७
टूर'की'...भाग ८

"आई, बाहेर पडूया ? येताना मी आपल्या रस्त्याला लागून काही हॉटेल्स बघितली होती.  तिथे जाऊया जेवायला ?"

आम्हीं पहाटे निघालो होतो. आता अडीच वाजून गेले होते. दिलेल्या रूममध्ये बॅगा ठेवून झाल्या होत्या. खोली काही फार थाटामाटाची नव्हती. साधीसुधी. मात्र स्वच्छ. बैठी कौलारू घरं. समोर पाऊलवाट. प्रत्येक घराची एक स्वतंत्र वाट. ह्या वाटा एकत्र येऊन पुढे चालत गेलं तर डाव्या हाताला मोकळी जागा. हिरवळ त्यावर लिंबाची झाडं. लाकडी टेबलं. वर झाडावर लटकवलेले सुक्या भोपळ्याचे दिवे. उजव्या हाताला टेबल टेनिसची तयारी. त्याच्याच समोर गझीबो. म्हणजे छोटं छत असलेलं १२ फुट बाय १२ फुटांचं घर. गाद्या टाकलेलं. मधोमध तुर्की जाजम पसरलेलं. पाय पसरा, तुर्की चाय हातात घ्या, एक पुस्तक घ्या...नाहीतर हुक्का...आणि बसा मग आरामात. तासनतास.

आम्हीं ताजेतवाने झालो. रस्त्याला लागलो. तसं ऊन होतंच. कधीकधी गोष्टी छानच घडणार असतात. आणि मग त्या तशा गोष्टी घडाव्यात अशी पावलं आपण आपोआप उचलतो. आम्हीं पाच मिनिटे पुढे चालत गेलो आणि उजव्या हाताला 'माय लॅण्ड नेचर' हॉटेल दिसलं. पाय तिथे वळले. हेही बैठं हॉटेल. समोर भलंमोठं जाळीदार छत. त्याखाली बरीच टेबलं आणि खुर्च्या. आम्हीं तिथेच स्थानापन्न झालो. समोर मॅनेजरची केबिन होती. आत पुस्तकांची लाकडी कपाटं ! येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुले वाचनालय ! लेक तिथे वळली. हातात पुस्तक घेऊन बाहेर आली. खुर्ची, हातात पुस्तक, वर सुंदर जाळीदार छत. छताला द्राक्षांची झुलती किनार. त्यातच एखादं लालचुटुक जास्वंद. जमिनीवर झेपावणारे बिलोरी ऊन खडे....चमचम...चमचम. अप्रतिम. शांत. तितक्यात कोणी त्या केबिन मधून बाहेर आलं. पन्नाशीच्या आसपासचा ओझेल. हॉटेलचा एक भागीदार. गप्पा सुरु झाल्या. गप्पा रंगल्या.
"कुठून ?"
"इंडिया."
भारतातून थेट चिरालीला येणारे म्हणे आम्हीं पहिलेच पर्यटक. भारतीय येतात. परंतु, भारतातून नव्हे. लंडनहून. लंडनवासी. मग हे आश्चर्यच नव्हे काय...? "तुम्हीं कसे काय इथे पोचलात ? चिराली हे गाव कोणी तुम्हांला सांगितलं...?"
ज्या कुठल्या साईटवर आम्हीं चिरालीची माहिती बघितली त्या प्रत्येक साईटवर हे गाव छोटं आहे. शेजारीच ऑलिम्पसचे भग्न अवशेष आहेत. शांत निळा समुद्र किनारा आहे...फारसं काही करावयास नसणारं गाव आहे...असंच वर्णन आम्हांला सापडलं. म्हणून आम्हीं दोघी इथे येऊन पोचलो.
ओझेलला हे विचित्र वाटलं. तो हसला. "आज सूर्यास्तानंतर भेट देण्याजोगं एक ठिकाण सांगू का तुम्हांला ?"

तिथेच खास घरगुती तुर्की जेवण जेवून आमच्या हॉटेलवर परतलो. या हॉटेलचा एक भागीदार, सुलेमान. दुपारी आमचे ज्या मुलीने स्वागत केले ती सुलेमानची धाकटी बहिण. एसेगुल. ही बहिणभावंड घरगुती हॉटेल (pansiyon) सांभाळत होते. संध्याकाळी सातच्या आसपास, सुलेमान आणि सुलेमानाचा लेक मुस्तफा आमच्यासाठी गाडी काढून तयार होते.

मुस्तफा, सुलेमानच्या मांडीवर. स्टीयरिंग व्हील मुस्तफाच्या हातात. वय नऊ महिने. खुदुखुदू हसत साहेब चक्र फिरवत होते. पंधरा मिनिटे मुस्तफाने गरगर चक्र फिरवले. आम्हांला एका डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडले. थोड्याच वेळात काळोख पडू लागणार होता. उजव्या हाताला टेबलं टाकलेली होती. 'चाय'चा मोठा थोरला पिंप ठेवलेला होता. माणसे बसली होती...गप्पा रंगल्या होत्या.. समोर चाय होता. आम्हीं एक टॉर्च घ्यावा अशी ओझेलने दुपारी सुचना देऊन ठेवली होती. बाजूच्या दुकानात टॉर्च लटकत होते. एक ताब्यात घेतला. डोंगर चढावयास सुरुवात केली. आजची संध्याकाळ तुर्कस्तानातील डोंगरावर घालवायचा बेत होता. तुर्कस्तानात ट्रेक.
किमीरा. तीन प्राण्यांचे रूप धारण करणारी. दैत्यीण. भयानक किमीराचे मस्तक सिंहाचे, शरीर बोकडाचे, शेपटी सर्प. मुखातून उसळत्या ज्वाळा. इफिरया येथील राजपुत्र हिपोनेस ह्याने शिकार करता करता आपला बंधु, बेलेरॉस ह्याची हत्त्या केली. हे कृत्य करून, गर्वाने त्याने स्वत:चे नामकरण केले....बेलेरेफॉन्तेस. अर्थ...जो बेलेरॉसचे भक्षण करतो तो. आपल्या पुत्राच्या ह्या अपकृत्याने संतापून, 'इफिरया'च्या सम्राटाने बेलेरेफॉन्तेसला हद्दपार केले. राजपुत्राने सम्राट आरगोस ह्याकडे मदतीची याचना केली. शरणागताला हाकलून लावणे म्हणजे आत्मसन्मानची अवहेलना अशी राजा आरगोसची निष्ठा. त्याने बेलेरेफॉन्तेसची पाठवणी केली लिशियन राज्यात. तेथील सम्राटाला देशोधडीला लागलेल्या राजपुत्र बेलेरेफॉन्तेसची दया आली. दया येऊन त्याने काय करावे ? सम्राटाने बेलेरेफॉन्तेसला किमीराशी युद्ध करावयास धाडले. किमीराचे वास्तव्य होते ऑलिम्पस पर्वतावर. शूर बेलेरेफॉन्तेस त्याच्या पंख असलेल्या अश्वावर, पेगाससवर स्वार झाला. निघाला किमीराशी युद्ध करण्यास. किमीरा पुढे पेगासस तग धरू शकेल ? आकाश रंग बदलू लागले. रंगमंच जणू. पडदे क्षणाक्षणाला सरसर बदलत गेले. बेलेरेफॉन्तेसला घेऊन पेगासस उडाला थेट आकाशात. वेगाने पृथ्वीवर खाली येत असता, हातातील भाल्याने बेलेरेफॉन्तेसने किमीरावर जोरदार हल्ला चढवला. त्या भयावह दैत्यीणीला सर्व शक्तीनिशी खाली ढकलले. किमीरा खोलखोल जाऊ लागली. धरणी देखील बेलेरेफॉन्तेसच्या दैवी शक्तीपुढे हतबल ठरली. जसे एखादे तलम वस्त्र फाटावे तशी ती भेदत गेली. क्षणार्धात किमीराला शूर बेलेरेफॉन्तेसने खोल ढकलले. पाताळात नेले. तिला तिथेच जखमी सोडून पेगाससवर दिमाखात आरूढ झालेला बेलेरेफॉन्तेस विजयी भाला हवेत उंचावत वेगात वर आला. मात्र किमीरा पाताळात देखील कधी शांत झाली नाही. आजही ती प्रयत्न करीत रहाते. पार आकाशाला भिडण्याचा. तिच्या मुखातून भयानक ज्वाळा पृथ्वीला भेदून आजही आकाशाकडे झेप घेतात...पावसापाण्यात...उन्हातान्हात....बर्फाच्या माऱ्यात.

कुतूहलजनक ग्रीक कथा. पर्वत किमीरा येथील पृथ्वीतून आकाशाकडे झेपावणाऱ्या अग्नीच्या ज्वाळांमागची कथा. हजारो वर्षे सांगितली गेली...काळाबरोबर पुढे पुढे आली. ना त्या ज्वाळा विझल्या...ना ती कथा विरली. बेलेरेफॉन्तेसची ही विजयगाथा जतन करण्यासाठी व तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ऑलिम्पसमधील प्रजा पर्वतावर मशाली पेटवतात व सुसाट दौडत ऑलिम्पस गावात परततात. म्हणे जगातील हा सर्वात पहिला ऑलिम्पिक खेळ. कालांतराने अनेक विविध खेळ ह्यात जोडले गेले. ऑलिम्पिक मशाल देखील ह्याच किमीराच्या मुखातील ज्वालांवर बेतलेली आहे. तुर्कस्तानाचा असा दावा आहे. अर्थात ग्रीक जनतेची ऑलिम्पिक मशालीच्या उगमासंबंधी काही वेगळी कथा आहे. ह्या पूर्ण प्रदेशात चर्च, देवळे ह्यांचे भग्न अवशेष आजही दिसून येतात. हेफायस्तोस, अग्निदेवता, ह्या ग्रीक देवाची देवळे. तिथे वस्ती होती ह्याची ही चिन्हे. पृथ्वीच्या ह्या भौगोलिक रूपाचे यनार्तास (अग्निखडक) हे तुर्की नाव .

ट्रेक सुरू करण्याआधी पायथ्याशी फलकावर छापलेली ही कथा आम्हीं मायलेकींनी वाचली व मग चढायला सुरुवात केली. त्यामुळे काही वेगळेच स्फुरण. वर पोचल्यावर नक्की काय नजरेसमोर दिसणार आहे ह्याची पुसटशी देखील कल्पना येत नव्हती. आणि असे काही बघायला मिळणार आहे ह्याची आधी कल्पना नसल्याकारणाने जालावर शोध घेतला गेला नव्हता...एकही छायाचित्र बघितले गेले नव्हते. चढेस्तोवर अंधार पडायला हवा. कारण त्या अंधारातच ज्वाळा अधिक उठून दिसणार होत्या. चढणाऱ्या आम्हीं एकट्याच नव्हतो. वेगवेगळ्या देशांतील अनेक पर्यटक होते. नेहमी सूर्यास्त होण्याआधी डोंगर उतरण्यास सुरुवात होते. इथे उलटंच होतं. सगळेच अंधार पडण्याची वाट बघत चढ चढत होतो. आता येईल नंतर येईल करीत. काही माणसे परतत होती. "अजून किती चढ आहे ?" "फक्त दहा मिनिटे." उत्तर मिळत होतं.

अचानक समोर तिरपा जाणारा चढ दिसला. तुरळक गर्दी. काही फुटांच्या अंतरावर जमिनीतून वर झेपावणाऱ्या ज्वाळा. अशांत किमीरा.

अंधार वाढला. आग अधिक उठून दिसू लागली. लाल ज्वाळा. जणू वेगवेगळ्या अंतरावर जमिनीखाली कोणी मशाल घेऊन अथक उभे असावे. डोंगरावर कोणी अजरामर पणत्या पेटत ठेवाव्या. अदमासे २०० मशाली ह्या सर्व परिसरात आहेत. हजारो वर्षांपूर्वी, पायथ्याशी दूरवर असलेल्या समुद्रातील बोटी म्हणे ह्या मशालींचा उपयोग, मार्ग ठरवण्यासाठी करीत असत. अदमासे २५०० वर्षांपासून हा अग्नी जिवंत आहे. जवळ जाऊन बघितलं. वाकून वाकून बघितलं. मनात आलं, पुरातन काळात ज्यावेळी मनुष्याच्या नजरेस हे जेव्हां प्रथम नजरेस पडले असेल, त्यावेळी त्याची काय अवस्था झाली असेल ? सर्वात प्रथम ज्याने हे पाहिलं...त्याचं भयाने काय झालं असेल ? पायथ्याशी समुद्रावरून कधीतरी त्याची नजर वर गेली असेल. रात्रीच्या काळोखात ह्या ज्वाळा त्याला कधी दिसल्या असतील तर कधी सोसाट्याच्या वाऱ्यामागे त्या लुप्त झाल्या असतील...भुताटकी...भय सगळीकडे ग्रासून गेले असेल. आणि मग कल्पनाशक्तीची भरारी....तीन प्राण्यांचे एकत्र रूप धारण करणारी दैत्यीण...देव...दैत्य...युद्ध...सूड...वगैरे.

अभ्यासकांनी तीन निष्कर्ष काढले आहेत. एक म्हणजे इथे पृथ्वीच्या गर्भात लाव्हा आहे. त्याचा हा परिणाम आहे. दुसरा अभ्यास सांगतो, भूगर्भातील सततच्या हालाचालीचा हा परिणाम आहे. कायमस्वरूपी भेगा तयार झालेल्या आहेत. तिथून मिथेन वायू बाहेर पडतो. तिसरा निष्कर्ष...सतत बदल घडत असलेले खडक. Metamorphic rock. पृथ्वीच्या गर्भात असलेली उष्णता व अति दबाव ह्यामुळे आतील खडक सतत बदलत रहातात. त्यामुळे तयार झालेली आग जमिनीला पडलेल्या भेगांमधून बाहेर झेपावत रहाते.

पृथ्वीची एकेक आश्चर्ये. हजारो वर्षांपूर्वी अजाण मनुष्याने त्याला जोडलेली मिथ्थके.
शाळेत भूगोल हा असा शिकवत गेले असते तर त्या भूगोलाचे कधी ओझे वाटले नसते. डोळे मिटत असता देखील हातात पुस्तक धरून घोकंपट्टी करावी लागली नसती.

किमीरा पर्वत उतरण्यास सुरवात केली तेव्हां सुलेमानचा सल्ला आठवला. लेकीने टॉर्च लावला. उतरण एका पट्ट्यात दिसू लागली. लाल....केशरी...पायऱ्या....ओबडधोबड दगड. रातकिड्यांची जाग ऐकू येऊ लागली. उगाच डोळ्यांसमोर, त्या अंधारात हातात काठी घेऊन तोंडाने कसले अनाकलनीय मंत्र जपत चाललेली टोळकी दिसू लागली. निसटत्या उजेडात आम्हीं पायऱ्या उतरत गेलो. आमच्या पुढ्यात एक पाच वर्षांचा पोरगा. माकडाच्या गतीने उड्या मारत पोरगं उतरत होतं. अपुऱ्या प्रकाशात. रोजचा पायाखालचा रस्ता असल्यागत. कधीतरी माझ्या समोरचा टॉर्चचा उजेड धूसर झाला. लेक कुठे गेली म्हणून मी मागे वळून बघितलं. माझी लेक त्या पाच वर्षांच्या मुलाला हातातील टॉर्चने उजेड देत होती. आणि मी काळोखातच. हसू आलं. जपून मी खाली उतरू लागले. मागून ते पोरगं...आणि ही त्याची पुरत्या दहा मिनिटांची ताई !

चिरालीतील पहिला दिवस संपला. भौगोलिक चमत्कार. तुर्कस्तानात येऊन आम्हीं ट्रेक करू असं तर नव्हतं ठरवलं. त्यामुळे मी तयार केलेल्या त्या वर्ड डॉक्यूमेंटमध्ये तर हे नव्हतंच.
अविस्मरणीय. रोज एक नवल...आमची तुर्की सहल.
क्रमश:
ग्रीक चित्रे जालावरून साभार

Thursday, 12 July 2012

टूर'की'...भाग ८

२०१० साली 'युरोपियन सांस्कृतिक राजधानी' अशी जेव्हां इस्तान्बुलची ओळख होऊ लागली तेव्हां सात करोड पर्यटक इस्तान्बुलला भेट देऊन गेले. इति विकीपिडीया. इथे संस्कृती, इतिहास, मनोरंजन, खादाडी...अशा अनेक गोष्टी एकत्र नांदतात. त्यामुळे पर्यटक आपापल्या आवडीनुसार हवे ते करू शकतो. आनंद मिळवू शकतो. आता शहराचे आधुनिकीकरण झालेले आहे. बरेच उद्योगधंदे, मिडीया शहरात सर्वत्र पसरलेले आहेत. २०२० साली होणारे ऑलिम्पिक ह्या शहरात भरवण्याची संधी त्यांना मिळावी ह्यासाठी तुर्कस्तानाने म्हणे प्रस्ताव मांडला आहे. जर त्यांना ही संधी मिळाली, तर जगाला दाखवण्यासारखे, देण्यासारखे त्यांच्याकडे अलोट आहे हे खरेच.

पहाटे चारच्या सुमारास जेव्हां आम्हीं टॅक्सी करून निघालो तेव्हां इस्तान्बुल अजून निजलेले होते. नशिबाने निदान त्या वेळी तरी एकही तुर्क समुद्रात गळ टाकून, बगळ्यासारखा उभा दिसला नाही. मुंबईहून निघण्याआधी ह्या पूर्ण सहलीचे एक वर्ड डॉक्युमेंट मी बनवले होते. त्यात दिवसावार विमानाच्या वेळा, त्यात्या ठिकाणच्या हॉटेलचे पत्ते आणि त्या त्या गावी पोचल्यावर काय करावयाचे आमच्या मनात आहे हे उतरवले होते. थोडाफार इथेतिथे बदल होणे गृहीत धरून. खास तुर्कस्तानात जिभेचे चोचले कसे आणि कुठे पुरवायचे आहेत ह्याची देखील त्यात नोंद केली होती. रहाण्याच्या ठिकाणापासून अतातुर्क म्युझियम दूर असल्याकारणाने ते राहून गेलं होतं. तशाही बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या. दोन दिवस तीन रात्री पुऱ्या पडणाऱ्या नव्हत्याच. परंतु, सगळ्या गोष्टी अनुभवल्याच पाहिजेत असा अट्टाहास धरलेलाच नव्हता. प्रत्येक क्षण पूर्ण जगावयाचा होता. आयुष्यात अट्टाहास धरून काही मिळतं हा गैरसमज माझा आता दूर झालेला आहे. चांगली इच्छा मनी बाळगावी...प्रयत्न करावेत. जे मिळतं ते आपल्या नशिबात असतं. जे मिळत नाही ते आपल्या नशिबात कधीच नसतं. कधीकधी वाटतं...माझ्या हातात असं एक गोष्टीचं पुस्तक दिलं गेलं आहे, ज्यात मधली काही पानं नाहीत...माझी गोष्ट तशीच लिहिली गेली आहे...ती पानं गहाळ झालेली नसावीत...तर ती कधी लिहिली गेलीच नाहीत. थोडा वेळ मला कोणी एकटं सोडलं की माझे विचार हे तुर्की घोड्यावर बसून दौडू लागतात. 
इस्तान्बुल विमानतळावर पोचलो...विमानात बसलो....०६:३५वाजता विमान उडालं...आणि ०७:४५ वाजता अन्ताल्जा विमानतळावर टेकलं. वर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणेच.
पुढील प्रवास आकाशातून नव्हता. रस्त्यावरचा होता. आणि म्हणूनच दिवसाउजेडीचं विमानाचं बुकिंग केलं होतं. आमचं चिरालीतील हॉटेल हा एका तुर्की कुटुंबाने चालवलेला लघुउद्योग होता. जेव्हा हे बुकिंग केलं, तेव्हा त्यांच्या साईटवर, तिथे कसे पोचायचे ते दिलेलं होतं. प्रवास अदमासे तीन तासांचा होता. दोन बसेस करावयाच्या होत्या. अन्ताल्जा विमानतळातून बाहेर पडावं. एअरपोर्ट ट्रान्स्फर बस पकडावी. ओट्टोपार्क. उतू नये मातू नये...घेतला वसा टाकू नये. जे आखून घेतलं आहे ते तसंच करत पुढे सरकत जावं. ती चारचाकी, दीड तास पुढे नेईल. चालकाला सांगून ठेवावं. चिरालीला उतरणे आहे. तो एका ठराविक ठिकाणी उतरवेल. 'तिकीटा' बसमध्ये चढल्याचढल्या चालक देईल. खिडकीत जागा मिळाली आणि बॅगा डाव्या हाताला नजरेसमोरच राहिल्या तर ठीक आहे. कारण बॅगांना चाके असतात आणि गाडी चालू लागली की आपण पण पळावे असे त्यांच्या मनात येणे ह्यात वावगे ते काय ? फार तर आपण लक्ष ठेवावे. पुढले दोन तास आपल्या बॅगांची, उंदरासारखी चालू असलेली पळापळ बघावी. नाहीतर सरळ दुर्लक्ष करावे. इथे चोऱ्या होत नाहीत. त्यामुळे तुमची बॅग कोणीही स्वत:ची म्हणून उचलून नेणार नाही. ती एकटीच काय ते इथेतिथे मनसोक्त फिरेल आणि तुमच्याबरोबरच खाली उतरेल. मी आपली एकदा तिला नीट कोपऱ्यात ठेवावी म्हणून उठले. म्हटलं आपल्या बॅगांना वाटू नये...परक्या देशात काय बेवारश्यासारखे आपण पडलोय वगैरे म्हणून ! आणि वळून परत जागेवर जाऊन बसावं म्हटलं तर एक पन्नाशीचे गृहस्थ माझ्या जागेवर बसले होते. लेक पण काही बोलली नाही त्यांना. फक्त माझ्याकडे बघत बसली. मग मीच आपली जाऊन त्यांच्या समोर उभी राहिले आणि म्हटलं...my seat आहे म्हणून ! उठले मात्र सदगृहस्थ गृहस्थ लगेच. मागे जाऊन उभे राहिले. त्यांच्याबरोबर असलेली त्यांची तरुण मुलगी माझ्याकडे बघून गोड हसली. मी आपलं म्हणतेय ती त्यांची मुलगी होती म्हणून ! पण नेमकी बायको असायची !

आम्हीं दोघी हातात गुगलचे नकाशे घेऊन बसलो होतो. पण त्या नकाशातील नावे आणि डोळ्यांसमोर दिसत असलेली रस्त्यांची नावे ही काही केल्या मेली जुळेनात ! बसने जेव्हा एक उजवीकडे वळण घेतले त्यावेळी मी आपले लेकीला म्हटले..."हो गं ! इथे नकाशात पण उजवंच वळण दाखवलंय !"
"आई ! त्यातलं वळण आणि आता आपण घेतलेलं हे वळण अजिबात सारखं असणार नाहीये !"
"हो काय ? बरं. " तीन तासांचा प्रवास. कधी सरळ मार्ग तर कधी उजवे...कधी डावे वळण. अंतराळात बसून मार्गाचा आढावा गुगलने दिलाही असता कदाचित. परंतु, आयुष्यात सगळीच वळणे आधीच माहिती झाली तर जगण्यात तो काय आनंद ? अचानक एखादे वळण समोर उभे ठाकावे, आपला ना आपल्या गतीवर ताबा ना कुठल्याही निर्णयावर. वळण घेतले जाते...आणि आपण आयुष्यात पुढे निघून जातो. तसेच काहीसे. मी अशी किती जवळ जाऊन जाऊन 'क्लोजअप प्रिंट आउट' मारणार होते ? प्रत्येक वळण काही ह्या प्रिंट आउट मध्ये आले नसतेच ! माझी लेक अशी हुशारीने काहीतरी बोलली, की मला मी काहीतरी बावळटपणा केलाय ह्याचा खेद होण्यापेक्षा, कसं गं बाई माझं लेकरू...एकदम हुशार झालंय ! असंच वाटू लागतं ! ह्यात नवीन मी काहीच सांगितलेलं नाहीये...माहितेय मला. सगळ्याच आयांना हे असेच वाटत असणार ! असो...

लेकीने एकदा पुढे जाऊन चालकाला सांगितले..."चिराली"
त्याने मान डोलावली. तीनचारदा आमची बस थांबली. बाजूला बसलेलं तरुण जोडपं त्यांच्या इतकुश्या पिल्लाला सांभाळून घेत खाली उतरलं. मी उगाच त्या बाळावर माझी अनुभवी नजर टाकली. जरा कमी दिवसांचं आहे वाटतं त्यांचं बाळ...मी लेकीच्या कानात कुजबुजले. तिने डोळे वटारले. तिला ह्या मेल्या अशा आपल्या बायकी गप्पा मुळी म्हणजे मुळीच आवडत नाहीत ! आम्हीं साध्याश्या छोट्या गावी निघालो होतो. शहरासारखे हुशार, चटपटीत, तुर्क आम्हांला कमी दिसतील आणि साधेसुधे तुर्क अधिक...अशी मला आशा होती. बस पुन्हां थांबली. दोघी म्हाताऱ्या मैत्रिणी गलबलाट करत चढल्या. दार आपोआप बंद झालं...आम्हीं पुढे निघालो. मी वाकवाकून मागे पडू लागलेल्या बस स्टँडवरचा बोर्ड वाचायचा प्रयत्न केला. म्हटलं त्यावरचं नाव तरी आमच्या गुगल नकाशात असेल. पण नाहीच.
इथे काही तुर्क स्त्रिया डोक्यावरून घट्ट स्कार्फ बांधून तर काही आधुनिक. सुंदर कुरळे तपकिरी केस हवेत मोकळे सोडून. सर्व स्त्रिया दिसायला सुरेख. गोऱ्यापान. त्वचा नितळ. घारे तपकिरी डोळे. ह्यांची बाळे अगदी चित्रांत बघावी अशी गोंडस. मात्र मला तरी सगळी बाळं दिसायला सारखीच वाटली ! म्हणजे एखाद्या बाईने आपलं समजून दुसरीचंच बाळ तिच्या घरी नेलं तर तिला दोषी ठरवता यायचं नाही...इतके साम्य. पुरुष देखील गोरे. फक्त गोरा म्हणून दिसायला चांगला वाटावा इतकंच. इथले पुरुष 'सूर्य नमस्कार', वजने उचलणे वगैरे करत नसावेत बहुधा. त्यामुळे सिक्स अॅब्स राहिले दूरच...पोटं अंतर्यामी सुखी दिसत होती !

इतके पुढे आलो तरीही आमचा गुगल नकाशा आणि रस्त्यावरची नावे काही जुळेनात ! अंतराळातून घेतलेले ते फोटू...आणि आम्हीं खरेखुरे त्या रस्त्यांवर...कसे काय जुळायचे ते ? शेवटी एकदाची बस थांबली. सगळेच खाली उतरू लागले. आम्हीं पण पटापट बॅगा घेतल्या. खाली उतरलो. आता ? आता दुसरी बस. ही आपली साधीच. म्हणजे अगदीच आपली एशटी नव्हे. पण आधीची व्होल्व्हो म्हटली तर ही एशटी आणि व्होल्वोच्या मधली. डाव्या हाताला निळा समुद्र किनारा घेऊन बस निघाली. उजव्या हाताला डोंगर. चढ, घाट....करत करत...अचानक, हमरस्त्यावरील फलकांवरची गावांची नावे आणि आमचा नकाशा जुळू लागला. समुद्र डाव्या बाजूला आणि आम्ही बसलो होतो उजव्या हाताला. असं नेहमीच होतं...नाही का ? आपल्याला जी सीट मिळते त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला निसर्ग आपले सुंदर रूप दाखवत असतो. आमच्या बाजूला असलेले डोंगर तसेही काही हिरवे नव्हते. म्हणजे महाराष्ट्रात पावसाची एक सर पुरेशी असते, आपल्या डोंगरांना अंगावर हिरवागार शालू खेचून घ्यायला. मात्र दुबईतल्या डोंगरांपेक्षा हे डोंगर दिसायला बरे होते म्हणायचे. तिथले डोंगर बघून त्यावेळी मला त्यांच्याबद्दल फारच वाईट वाटलं होतं. म्हणजे नुसती वाळू, करडे पिवळट दगड एकावर एक रचून ठेवल्यागत. वादी...म्हणतात त्याला. ह्या डोंगरांनी कधी आपले हिरवेकंच डोंगर बघितले तर ह्यांचा किती जळफळाट  होईल...नाही का...असे मी तेव्हां माझ्या नवऱ्याला म्हटल्याचे आठवते. तुला एव्हढं हे दाखवायला घेऊन आलो तर तुझं आपलं काहीतरी वेगळंच ! असं तो म्हणाला...ते जाऊ द्या !

किती ते विषयांतर !

'चिराली'. चालक म्हणाला.
आम्हीं दोघी बसमधून उतरलो. आमच्या पुढे अजून दोन बायका...अशा आम्ही चौघी. बस पुढे निघून गेली तेव्हां समोर तीसेक फुटांवर गाड्या उभ्या दिसत होत्या. आम्हीं रस्ता ओलांडला. खुर्च्या टाकून तिथे काही माणसे आरामात गप्पा मारीत बसलेली होती. आम्हांला बघून त्यातील एक माणूस त्वरेने पुढे आला. टॅक्सी ? आम्हांला ज्या रस्त्यावर जायचे होते तोच रस्ता त्या दोघींचा होता. चौघी गाडीत बसलो. गाडी रस्त्यावर पळू लागली. रस्ता उतरणीचा. तसा अरुंद. गाडी उतरू लागली. नशीब हा प्रवास आम्हीं दिवसा करीत होतो. रात्र असती...मिट्ट काळोखात अरुंद रस्त्याने काही वेगळेच रूप धारण केले असते. सूर्यप्रकाशात छानशी नागमोडी वळणे घेणारा रस्ता रात्री, भयावह अजगर वाटला असता. त्या दोघी देखील मायलेकी होत्या. तुर्कस्तानातील. दोघी आमच्यासारख्याच फिरायला निघाल्या होत्या. त्यांचे हॉटेल आधी आले. त्या उतरून गेल्या....आम्हीं अजून पुढे. म्हटलं आहे तरी कुठे आमचं हॉटेल...मनात नसत्या शंका...बैठी हॉटेल्स, फुलांनी डवरलेल्या बागा...द्राक्षांचे मळे. मोकळ्या हवेत शंका हळुवार विरत चालली होती. इतक्यात चालकाने गाडी थांबवली. आमचं हॉटेल आलेलं होतं. टॅक्सी थांबली. चालक सामान उतरवू लागला.
"Welcome..." तिशीच्या आसपासची एक हसतमुख मुलगी पुढे आली.
मी टॅक्सीला पैसे देईस्तोवर...लेक आणि ती तरुणी एक पायवाट चालू लागल्या होत्या. दुतर्फा, झाडे होती. क्व्य्क क्व्य्क करीत एक कोंबडी...तिच्या मागे तिचा चिमुकला लवाजमा...
माझं पिल्लू पुढे...आणि मी मागे !

क्रमश:
नकाशा जालावरून साभार

Tuesday, 10 July 2012

टूर'की'...भाग ७

टूर'की'...भाग १
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३ 
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५
टूर'की'...भाग ६ 

इस्तान्बुल मधील दुसरा दिवस. सकाळी हॉटेलबाहेर पडताना मॅनेजरला विचारले होते. ग्रॅन्ड बझारला कसे पोचायचे ? बाहेर पडा, उजवीकडे वळा....चढ चढा. चालत रहा. जिथे पोचाल तो ग्रॅन्ड बझार. बाहेर  पडलो आणि एका सेकंदात दोघी मागे फिरलो. मी लोनली प्लानेटमध्ये वाचलं होतं, ग्रॅन्ड बझार १४५५ मध्ये बांधला गेला होता. व तिथे शतकानुशके दुकाने वाढत गेलेली आहेत. GPS शिवाय तिथे फिरणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. माझी लेक ही माझी GPS सर्विस आहे. मुंबईत, किंवा कुठेही. मला रस्ते कधी कळत नाहीत आणि ते लक्षात देखील रहात नाहीत. सुरवातीला काही वर्षे मला माझा एक भाऊ ऑफिसला सोडायला येत असे. आणि घ्यायला. मग त्याने जो काही रस्ता आखून दिलेला असे, मी त्याच रस्त्याने येत असे. उगाच ही वेगळी गल्ली, तो सुंदर रस्ता ही अशी काही धाडसे करण्याच्या फंदात मी कधीही पडत नाही. मला आठवतंय, शाळेत असताना एकदा प्रभादेवीला मुख्य रस्त्यावर मी हरवले होते ! आमचं घर तिथून दहा मिनिटांवर ! पण तरी देखील मी हरवले! 
"ह्या आपल्या हॉटेलच्या परिसराला काय म्हणतात ?" लेकीने आमच्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारले. त्यावर त्याचे जे काही उत्तर होते ते लक्षात रहाणे सहज शक्य नव्हते. मग तिने तिथलाच एक कागद उचलला आणि त्यांच्या हातात दिला. "Will you please write it on this ?" त्याने जे काही लिहिले त्याचा मराठीत तरी उच्चार हा असा होता... सेंमबरलीतास !
कागद खिशात घातला. आणि मग लागलो आम्हीं रस्त्याला.

ग्रॅन्ड बझार. १४५५ मधील थंडीच्या दिवसांत ह्या बाजाराचे बांधकाम प्रथम सुरू झाले होते. येथील बांधकामाचा अभ्यास केल्यावर त्याचे साधर्म्य १५ व्या शतकाच्या दुसऱ्या पर्वात सापडते. बेन्झेन्टाइन काळात इथे गुलामांची विक्री होत असे. संपूर्ण बाजाराला अनेक प्रवेशद्वारे आहेत. म्हणे १५४५ साली सुलतान सुलेमानने इथे अजून एक बाजार बांधून घेतला. अनेक लोकांनी आपली दुकाने टाकावयास सुरवात केली आणि मग कालांतराने पूर्वी वेगवेगळे असणारे हे दोन बाजार एकमेकांत मिसळून गेले. सतराव्या शतकाच्या आसपास सध्या उभा असलेला बाजार उभा राहिलेला होता. ह्या देशाविषयी काहीही वाचायला घेतले की अगदी तीनशे साली, चारशे साली...असे आकडे आपल्या समोर येतात ! बाजारात फिरताना भरभरून दिसत होते ते गालिचे, काचसामान, दागदागिने. इथे पैशांची घासाघीस केलीच पाहिजे हा नियम देखील मी वाचलेला होता. म्हणजे कॉलेजच्या दिवसांतील मुंबईमधील फॅशन स्ट्रीटने गिरवून घेतलेले हे कौशल्य इथे कामास येणार होते ! तसेही आम्हांला शॉपिंग करायचे नव्हतेच ! युरो X टर्किश लिरा =  रुपया...हे गणित एकूणच कठीण व मानसिक छळ करणारे ! त्यामुळे पाय मोकळे करावयास निघाल्यागत, गल्ल्यागल्ल्यांतून रिकामटेकडे फिरणे आणि इथेतिथे उगाच डोकावणे, ह्यापलीकडे तसा काही उद्योग नव्हता. 
एक सुंदर पर्स अगदी मनात भरून गेली. म्हणजे लेकीने अगदी खांद्यावर अडकवली. मी अगदी कौतुकबिवतूक केलं. वा वा सुंदर. हिंदुस्तान म्हटल्यासरशी त्याने आम्हांला विचारलं..."You know Tabbu ?" आम्हीं हसून माना डोलावल्या. त्याने लगेच वर भिंतीकडे बोट दाखवले. आम्हीं बघितले तर होत्या तब्बू बाई...फोटोत. ह्या दुकानदाराबरोबर. तिने म्हणे त्या दुकानातून चार बॅगा घेतल्या होत्या. एक अशी...एक तशी...आणि दोन अशातश्या ! असेल बाई ! लेकीला आवडलेल्या बॅगेचा आम्हीं तोंडी गुणाकार केला. मराठीत. उत्तर होतं चार हजार रुपये. मी काही बोलायच्या आत बॅग पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. ऐटीत.

दुसऱ्या दुकानात आम्हीं शिरलो. एक निळीशार नक्षीकाम असलेली प्लेट विकत घेण्याचा मी विचार केला. इथले एकूणच दुकानदार सगळे अगदी नम्र, आणि वाचा मृदू. 'Where are you from ? ह्याचे उत्तर आम्हीं दिले की एकूणच सलमान खान, शाहरूख खान असे संभाषण सुरू होत होते. मी घासाघीस सुरू केली. मात्र तो दुकानदार दोन मिनिटांसाठी बाहेर केला असता लेक माझ्या कानात कुजबुजली...बस झालं हा आई तुझं ! घे आता काहीतरी !"...म्हणजे एकदम माझ्या देशाचं नाव नको खराब करूस...असं काहीसं ! म्हटलं, घेतेच आहे गं मी ! मी आपली माझी 'last price' सांगितली. म्हणजे असं आपण दुसरच काहीतरी बघतोय असं करायचं आणि त्याला अशी अगदी खालची किंमत सांगून टाकायची ! तो मनमिळाऊ, नम्र दुकानदार हसला आणि मान डोलावून म्हणाला..."You got a good deal Mam ! You negotiate very well !" लेकीच्या तोंडाकडे बघून मला कळेचना...की हे माझं कौतुक झालंय...की कसली बाई कंजूष आहे...असं हा मनातल्या मनात म्हणतोय !
असो...



खरेदी केलेल्या चारपाच छोट्या गोष्टी, एका लहानश्या हॉटेलमध्ये 'चिकन शॉवरमा.
संपला आमचा 'ग्रॅन्ड विहार' ! लेकीने एकदा पुढे, एकदा मागे वळून बघितलं. दहा मिनिटांत, बझारच्या खोलवर गेलेलो आम्हीं, सकाळी ज्या बोळातून आत शिरलो होतो बरोब्बर त्याच बोळातून बाहेर आलो !

हॉटेलच्या रस्त्याला लागलो तेव्हा आमची पोटं भरलेली होती. मात्र आमच्या रत्यावरल्या एका छान हॉटेलचा आणि त्याच्या साठीच्या आसपासच्या अतिशय मधुरभाषी मालकाचा आम्हांला कालच शोध लागला होता. त्याने बाहेर रस्त्याला लागून पदपथावर छोटी टेबले टाकली होती. पाच सहा पायऱ्या उतरून आत जायचे, तिथे ठेवलेल्या पुस्तकांमधील आपल्याला हवे ते पुस्तक उचलायचे. आरामात बाहेर बसायचे. पुस्तक वाचतावाचता आम्हीं तिथे फस्त केले...पिस्ताचीयो.

गेल्या महिन्यात तुर्कस्तानात सूर्य धीम्या गतीने सरकत होता. कधी मनाला येईल त्यावेळी आकाशातून नाहीसा वगैरे होत होता. नऊच्या आसपास. बालपणापासून मी कायम सूर्याला समुद्रात डूबताना बघितलेलं होतं. इथे नेमकं उलट. समुद्र एका दिशेला आणि सूर्य त्याच्यावर रुसल्यासारखा दूरदूर सरकत कुठे भलतीचकडे. म्हणजे अगदी एखाद्या इमारती मागेबिगे. इमारतीच्या मागे जाऊन लपण्यात कसली मजा ? मात्र काळोख लवकर पडत नसे. ते आमच्या पथ्यावर पडलं. रस्त्यावर फिरण्यास तशी काही भीती वाटत नसे. एकदा दोनदा 'eve teasing' चा अनुभव आलाच. तरुण टवाळखोर कुठे सापडत नाहीत ? Indian ? Indian ?...आणि मग त्यांच्या मातृभाषेत काहीबाही. हे त्यांचं बोलणं कदाचित असभ्य असेलही. परंतु, ते आम्हांला न कळणाऱ्या भाषेत असल्याने 'एका कानाने ऐकावे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावे ' हे आचरणात आणणे तेव्हां  सहज जमून गेले ! त्यातूनही ह्या अशा लोकांचे आपण काय करायचे असते ह्याचे शिक्षण आपल्याला अक्कल आल्यापासून असतेच. तिथे आणि दुसरं काय करणार ? तरुण तुर्क...दुर्लक्ष.

चारच्या सुमारास लेकीच्या डोक्यात काही वेगळेच आले. आम्हीं दोघींनी आपापली पुस्तके उचलली. मी माझा कॅमेरा घेतला. समुद्राच्या दिशेने चालण्यास सुरवात केली. अर्थात मॅनेजरला आधी रस्ता विचारून. दुरून समुद्र दिसू लागला. भर दुपारी तुर्कांचा मासळी पकडण्याचा उद्योग चालूच होता. ही लोकं कामावर कधी जातात ? हे असे दिवसभर इथे मासे का पकडत बसतात ? असे एकदोन प्रश्र्न मनात उद्भवले. आम्हीं एक छानसं झाड बघितलं. मायलेकी पाय पसरून मस्त हिरवळीवर बसलो. समोर समुद्र. लेकीने तिचं पुस्तक उघडलं. मान त्यात खुपसली. मी इथेतिथे बघितलं. कॅमेरा चालू केला. गुढघे दुमडून त्यावर स्थिर विसावला. कॅमेऱ्याच्या डोळ्याने बघावयास सुरवात केली. जाणवलं...दूर, माझ्या कॅमेऱ्यासमोरून वेगवेगळी माणसं फिरत होती. कोणी उजवीकडून डावीकडे. तर कोणी डावीकडून उजवीकडे. कधी एखादं जोडपं...तर कधी एखादं चौकोनी कुटुंब. मी क्लिक करत गेले...त्यांना टिपत गेले. तुर्क मला प्रेमळ व कुटुंबवत्सल दिसला.

संध्याकाळी सातच्या आसपास बाहेर पडलो ते थेट अरिस्ता बाजाराच्या दिशेने. हा थोडा श्रीमंत बाजार. इथे दिसणारे गालिचे उंचीचे. रस्त्यावर सुबत्ता. दोन्ही बाजूंची हॉटेल्स अधिक देखणी. जालावर शोध घेताना ही हॉटेल्स का बरं सापडली नसतील..असा विचार मनात चमकून गेला. संध्याकाळ काही वेगळीच होती. कालची निराळी आजची आगळी. आता अंधार पडत होता. रस्त्यावर पर्यटक फिरत होते. आज आमच्या डोक्यात होते गिरक्या घेणारे दर्विश. इथे रोज एका हॉटेलमध्ये संध्याकाळी दोन कार्यक्रम होतात. बरेच पर्यटक तिथे येऊन हुक्क्याचा आस्वाद घेत, बोर्ड गेम खेळतात. आम्हीं तिथे पोचेस्तोवर पहिला कार्यक्रम नुकताच संपला होता. दुसरा रात्री दहा वाजता सुरू व्हायचा होता.  तेथून बाहेर आलो. काहीही न ठरवता रस्त्यावर चालायला सुरुवात केली. दहा वाजता इथे परतायचे इतकेच निश्चित. चालताचालता पोटपूजा. एका हॉटेल बाहेर ताजे चकचकीत मासे शोभेसाठी ठेवलेले दिसत होते. ह्याहून चवदार दुसरे काय असणार ? रस्त्यावर टेबले टाकली होती. त्यातले एक आम्हीं दोघींनी बळकावले.
सगळे वातावरण मन रिकामे, हलके करणारे. रोजच्या सारखा कुठलाही जटील प्रश्र्न डोक्यात अडकलेला नव्हता...शांत निवांत. डाव्या बाजूला छोटी स्टूल्स घेऊन तीन वादक गायक बसले होते. आपल्या कौशल्याने लोकांचे मनोरंजन करीत. आपल्याला हवा तो मासा निवडून आपल्या टेबलापाशी आलेल्या वेटरच्या हाती सुपूर्त करायचा. थोड्याच वेळात त्यांनी शिजवून आणलेला तुर्क मासा आपण चवीचवीने फस्त करावयाचा...ही संकल्पना. लेकीने मोठ्या प्रेमाने एक मासा निवडला....तितक्याच प्रेमाने माश्याला आत नेण्यात आलं. आणि इतक्यात वादकांनी आजच्या त्यांच्या भारतीय श्रोत्यांसाठी सुरु केलं ते हे गाणं...



दहा वाजत आले होते. आम्हीं हॉटेल Mesle पाशी पोचलो. कार्यक्रम अजून सुरू झाला नव्हता. मंच रिकामा होता. कोणी हुक्का पीत होतं. कोणी बोर्ड गेम खेळत होतं. तो काय खेळ आहे हे त्यांना विचारायचं माझ्या मनात खूप होतं. पण हुक्का ओढत बसलेल्या दहाबारा तरुणांजवळ जाऊन हा प्रश्र्न विचारण्याचे धैर्य नाही झाले. लगेच कॅमेरा बाहेर. मी इथले तिथले फोटो काढत होते. "आई, सुरू होतंय हं." समोर मंचावर दोन माणसे येऊन बसली होती. समोर माईक. हलकेच गाणं सुरू झालं. गाण्याला शब्द होते. पण अर्थ नव्हता. बऱ्याचदा अनाकलनीय भाषेतील गाणी अधिक आनंद देऊन जातात. उगाच अर्थात न अडकता त्यातले सूर आपल्याला गुंतवून टाकतात म्हणून असावे कदाचित. इतक्यात एक लांब बाह्यांचा पायघोळ झगा घालून मध्यम अंगचटीचा माणूस पुढे आला. मंचावर चढून मांडीपाशी दोन्ही हात एकत्र बांधून शांतपणे उभा राहिला. हळूवार संगीत सूर झाले. त्यात खोल आवाज मिसळला. दर्विश हलकेच गिरकी घेऊ लागला. एक...दोन...तीन...चार....अनेक...असंख्य...गोल..गोल....तो अनुभव एक धुंदी चढवणारा होता. आपण जरी एका जागेवर स्थिर असलो तरीही ते संगीत...उजवा हात आकाशाकडे झेपावणारा...डावा हात पृथ्वीशी नाते जोडणारा...आकाशातील देवाकडे आराधना करताना....पृथ्वीवरील भौतिक सुखांना नाकारणारा...काळाचे बंधन गिरकीसहित झुकारून देणारा....दर्विश. ती हालचाल....ते संगीत सर्व काही भारून टाकणारे होते...दहा मिनिटे एक टप्पा...दुसरा....तिसरा...
उगाच बालपणीचं...गोल गोल राणी...इतकं इतकं पाणी...आठवलं. चार गिरक्या काय नाही झाल्या की आम्हीं धाडकन जमिनीवर पडत असू. आणि कधीतरी नाहीच पडलो तर खोलीत गोलगोल करत भिंतीवर नाहीतर दारावर धाडकन आपटणे चालू असे. किती टेंगुळं आणि किती काय !
समोर हुक्का नाही पण टर्की चाय होता. माझा कॅमेरा व्हीडियो रेकॉर्डींग करीत सुटला होता. एकामागोमाग एक...


एक तास उलटला. दर्विश वाकून प्रेक्षकांचा निरोप घेऊन दिसेनासा झाला. आम्हीं देखील निघालो. चालत आमच्या हॉटेलपर्यंत जायचे होते. काळोख पडला होता. हॉटेल तिथून वीस मिनिटांच्या अंतरावर होते. आम्हीं चालायला लागलो. रस्ता निर्मनुष्य झालेला होता. चिटपाखरू रस्त्यावर दिसत नव्हते. दूरवरून समुद्र पक्षाची साद ऐकू येत होती. पक्षी कुठेही दिसत नव्हते. फक्त आसमंतात मधूनच टिपेला पोचणारा आवाज. एक भीती मनात शिरू बघत होती. मात्र तिला एकदा मनात प्रवेश करू दिला तर ती उगा भलभलते विचार उद्दीप्त करेल ह्याची खात्री होती. पुन्हां मला रस्ता ओळखता येत नाही हे आहेच. लेकीने पटापट पावले उचलली. तिच्याबरोबर मी.

पहाटे चारच्या सुमारास हॉटेल सोडावयाचे होते. ओनुर एअर. इस्तान्बुल ते अन्ताल्जा. पावणे आठचे विमान.

तीन रात्री. दोन दिवस. शहर सोडायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता.
आम्हीं भूमध्यसमुद्राच्या दिशेने निघणार होतो. एका छोट्या गावाकडे.
गाव चिराली.

क्रमश:

Sunday, 8 July 2012

टूर'की'...भाग ६

टूर'की'...भाग १ 
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५ 

उत्तर, पूर्व, आणि दक्षिण तीन दिशांनी पाण्याने वेढलेले, तुर्कस्तानातील सर्वात मोठे शहर इस्तान्बुल. गोल्डन हॉर्न, बॉस्फरस आणि मर्मरा समुद्र. एकेकाळी असलेली छोटी छोटी गावे, जंगले, सपाट प्रदेश एकत्रित करत करत सध्याचे शहर उभे केले गेले आहे. एका दिशेला गजबजलेले युरोपियन इस्तान्बुल. गोल्डन हॉर्नच्या पलीकडे शांत, श्रीमंत, छोटे छोटे किनारे, नौका, आकाशात विहारात असलेले समुद्रपक्षी आणि प्राचीन किल्ले घेऊन नटलेले एशियन इस्तान्बुल. आणि ह्यावर कळस म्हणजे बायझेन्टाइन ख्रिश्र्चन आणि ओट्टोमान इस्लाम ह्या परस्परविरोधी धर्मांचा इथे दिसणारा संगम. तीन दिवस शहरात फिरताना, युरोपियनांसाठी आशिया खंडात शिरण्याचे इस्तान्बुल हे प्रवेशद्वार होते ह्याची जाणीव मात्र पदोपदी झाली.

सकाळी आठ वाजता कॉम्प्लीमेंट्री ब्रेकफास्ट सुरु होईल हे आदल्या रात्री आम्हीं विचारून घेतले होते. डोळे उघडल्या उघडल्या भूक लागली आहे ही जाणीव पहिली होती.
"हॉटेलच्या गच्चीवर ब्रेकफास्टची टेबले टाकली आहेत." आम्हीं खोलीबाहेर आल्यावर आम्हांला मॅनेजरने सांगितले. कालच ताब्यात घेतलेले सर्व वाङमय हातात घेऊन आम्हीं जिने चढायला सुरवात केली. गच्चीत पाऊल टाकले तेव्हा साईटवर बघितलेले फोटो आणि डोळ्यांना दिसणारे दृश्य ह्यात तसे अंतर होते. फोटोमध्ये समोर अथांग निळाशार समुद्र दिसत होता. वास्तवात नजरेला, समुद्राचा थांग लागत होता. उजव्या हाताला ब्रेकफास्टचे टेबल मांडले होते. आम्हांला बसण्यासाठी एकच टेबल रिकामे होते. आणि ते काही गच्चीच्या कट्यापाशी नव्हते. सर्व हजर पाहुण्यांना एक स्मित हास्य व सुप्रभात करीत आम्हीं तिथे स्थिरावलो. मात्र आमच्या प्लेट्स रिकाम्या होईस्तोवर उजव्या कोपऱ्यातील कट्याजवळील टेबल रिकामे झाले. अर्ध्या भरलेल्या प्लेटा उचलल्या. टेबल बळकावले. आता समुद्र  नजरेस पडत होता.

आजूबाजूच्या इमारती, पूर्वी बुटक्या असाव्यात व काळाबरोबर त्यांची उंची वाढत गेली असावी असे वाटत होते. आकाशात स्वैर वावर समुद्रपक्षांचा. आसमंतात त्यांचाच आवाज. सतत कोणाला साद घातल्यागत. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हीं दिवसभर उनाडक्या करत असू, व इमारतीच्या पायथ्याशी उभ्या राहून, आकाशाच्या दिशेने माना खेचत जी कोणी सखी आली नसेल तिच्या नावे आरोळ्या ठोकत असू...त्याची आठवण झाली. एकदा माझे किंचाळणे ऐकून एका मैत्रिणीचे बाबा शेवटी गॅलेरीत येऊन उभे राहिले व कपाळाला सतराशे साठ आठ्या घालून मला म्हणाले, "किंचाळू नकोस ! स्वाती घरात नाहीये. आणि असली तरी मी तिला खाली पाठवणार नाही ! तिला अभ्यास आहे !" ह्यातील 'तिला अभ्यास आहे' हे वाक्य सूचक जागी जोर देऊन म्हटले असल्याकारणाने 'तुला अभ्यास नसला तरी तिला आहे' हे न बोलता मला सांगण्यात आले होते. मी मान खाली घालून बरं म्हटलं, चष्मा वर सारला आणि दुसऱ्या मैत्रिणीच्या नावे खिंकाळायला सुरवात केली ! आत ह्या गोष्टीशी त्या बिचाऱ्या समुद्रपक्षांचा संबध काय ?? काsssहीही नाही ! उगाच आपलं ! आठवलं म्हणून सांगितलं !
लेकीने बुकिंग करावयाच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आमच्या सुलतानेहमद परिसरातील हॉटेलच्या आसपासच सर्व प्रेक्षणीय स्थळे होती. मग 'चाय'चे घुटके घेत आणि माहितीपत्रकांत डोकावत तिने आजच्या दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला...

अया सोफिया, ब्लू मॉस्क, टर्किश नाईट शो, ग्रॅन्ड बझार, तोपकापी राजवाडा...रस्ते, गल्ल्या, बोळ, तुर्क स्त्रिया, तुर्क पुरुष, तुर्क पोरं आणि तुर्क बाळं....




इतिहासात अया सोफिया (तुर्की उच्चार) ह्या इमारतीने आयुष्यात दोनदा जाळपोळ झेलली. जसजशी राजवट बदलली तसतसे तिचे रूप बदलले. कथिड्रल ते मशीद ते म्युझियम हा असा अतिशय मिश्र इतिहास ह्या इमारतीचा आहे. सम्राट जस्टीनियन ह्याने जगात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे बांधकाम केले. ५३७ साली ह्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले व त्यानंतर १४५३ पर्यंत, हे जगातील सर्वात मोठे चर्च मानले जाई. इमारतीची उंची बघता, हे असे बांधकाम कसलेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना ३६० साली, कसे काय केले असेल हा विचार अक्षरश: तोंडात बोटे घालावयास भाग पाडतो. त्यानंतर 'महमद, दि काँकरर' (ह्याला आता मराठी इतिहासात काय नाव दिले असेल ह्याची मला काही कल्पना नाही!) ह्याने त्याची सत्ता आल्यावर त्या चर्चचे रुपांतर मशिदीत केले. आणि हे करताना भिंतींवर असलेली अतिशय सुंदर मोझॅक्स पांढरा रंग मारून मिटवून टाकली ! एखाद्या लहान मुलाचे चित्र रद्दीत जरी चुकून मिळाले तरीही ते फाडून टाकण्यास आपले मन धजावणार नाही. आणि इथे अप्रतिम अशा अगणित कलाकृती मिटवून टाकल्या गेल्या होत्या. अल्प स्वरूपात त्यातील काही चित्रे पुन्हा वर आणली गेली आहेत. हे काम किती कठीण असेल ! आतील चित्राला अजिबात धक्का न देता ते पुन्हां उजळवयाचे ! १९३५ साली अतातुर्क ह्यांनी ह्या मशिदीचे रुपांतर म्युझियम मध्ये केले. युनेस्कोने दिलेल्या अंशतः आर्थिक पाठिंब्यावर ह्या चित्रांचा पुनरुद्धार चालू आहे. जितका कालावधी मी तिथे होते तितका वेळ माझ्या डोळ्यांसमोर, अनेक माणसे पाशवी नृत्य करीत भिंतीवर, छतावर असलेल्या अलौकिक मोझॅक चित्रांची विटंबना करताना येत होती!

हिप्पोड्रोम वाटेत दिसतोच. बायझंटाइन सम्राटांची दुपार म्हणे इथे रथांच्या शर्यती बघण्यात व्यतीत होत असे ! १२०० वर्षे सम्राटांच्या दैनंदिन आयुष्याचा हा अतिशय महत्त्वाचा परिसर होता. व पुढील ४०० वर्षे त्यानंतर सत्तेवर आलेल्या ओट्टोमानांच्या आयुष्याचा. कित्येक दंगली, खूनखराबे ह्या परिसराने अनुभवले ! म्हणे विविध बायझंटाइन सम्राट व अनेक ओट्टोमान सम्राट, हिप्पोड्रोम अधिकाधिक सुंदर करण्यामागे असत. मात्र त्यांनी उभारलेल्या पुतळ्यांपैकी दुर्दैवाने आता काही मोजकेच इथे उभे आहेत.

तोपकापी राजवाडा ! प्र-चं-ड ! अफाट पसरेला. इथे वसलेल्या सम्राटांच्या कहाण्या काय सांगाव्या ? त्यांचे दागदागिने, अंगरखे, सोन्यात घडवलेले पाण्याचे घडे, सोनेरी तलवारी, हिरेजडीत मुकुट, लखलखती आसने ! सोनं...नाणी...हिरे...माणके....म्हणजे अगदी कचऱ्यासारखे होते ह्यांच्याकडे. वैभवाचा इतका अतिरेक होता की शेवटी मी हळूच लेकीच्या कानात म्हटले,"बघ गं बाई, कदाचित सोन्याचं टमरेल देखील सापडेल इथे !" "आsssई !" ती ओरडली माझ्यावर ते सोडून द्या तुम्हीं, पण तिथे नाहीतरी कोणालाही मराठीतला म कळत नव्हता. त्यामुळे हे माझे उद्गार मी मोठ्याने त्या दालनात फेकले असते तरीही कोणाला कळले नसते ! त्यांना असेच वाटले असते की ते सगळं बघून मी फारच अचंबित झाले आहे...व कदाचित बेशुद्ध वगैरे पडत असेन ! हे असेच काहीसे मला इजिप्त मधील म्युझियम बघताना वाटले होते. तुतानखामेनच्या वस्तू ! सगळं मेलं त्याचं सोन्याचं ! आणि मी एक इथे भारतीय नारी ! लेकीच्या लग्नासाठी तीळतीळ सोनं जमवतेय ! छ्या !
ओट्टोमान सम्राट अंगावर परिधान करीत त्या अंगरख्याच्या बाह्या म्हणजे आमचे जसे चुडीदार ! जर माझा हात अडीच फुटी असेल तर माझ्या अंगरख्याची बाही ही साडे आठ फुट लांब ! त्याच्या चुण्या करत-करत...करत-करत त्या अंगरख्यात आपण शिरायचे. म्हणजे मी पहाटे दोन वाजता उठले तरच हा सगळा उपद्वयाप करून, 'कदाचित' लंचटाईमपर्यंत ऑफिसात पोचेन ! कैच्याकै ! असे प्रचंड मापाचे कपडे घालणारे ओट्टोमान हे शरीराने इतके अगडबंब असूच शकत नाहीत. मग जेव्हां कधी ते त्यांचे शाही स्नान करावयास हमामखान्यात जात असत त्यावेळी त्यांचे दास 'जल्ला मेला ! मेल्याची बाडी इतकूशीच तर हाय ! उग्गाच हे भलं मोठ्ठं कायतरी फुगवून ठवलंय स्वत:ला !" असं नक्की एकमेकांत बोलत असणार ! आता मात्र माझ्या लेकीने माझ्यावर डोळे वटारले. 'अबब...बापरे...सॉलिड...'असे सातत्याने उद्गार काढीत आम्हीं कधीतरी तिथून बाहेर पडलो. तोपकापी राजवाडा....एका दिवसात बघण्याचे कामच नाही ! पण तसेही दुसऱ्याचे वैभव ते ! किती वेळ आपण त्याचे कौतुक करावयाचे ! हा मात्र एक गोष्ट होती ! आपल्या कोहिनूर हिऱ्यासारख्याच ह्यांच्या देखील बऱ्याच गोष्टी ब्रिटिशर्स घेऊन गेलेले आढळले ! आढळले म्हणजे ...त्यात्या जागा त्यांनी कपाटात रिकाम्या ठेवल्या आहेत...व खाली एक चिठ्ठी ! 'ब्रिटीश म्युझियम'...तेव्हा, तिथे जा...तिथे बघायला मिळेल !

थकल्याभागल्या आम्हीं एका इतिहास असलेल्या गोडधोडाच्या दुकानात जाऊन बसलो आणि टर्किश डिलाईट, बकलावा मागवला ! अ-हा-हा ! अप्रतिम. मुंबईत देखील पूर्वी हा पदार्थ चाखला होता. पण तुर्कस्तानात बसून तुर्की 'बकलावा' खाण्यातील गोडी काही औरच ! काल तुर्की चाय, अडाणा कबाब आणि आज बकलावा...जे जे पदार्थ ठरवून आलो होतो ते एकेक करून चाखणे चालू होते !


रात्री, बोटीवर. टर्किश नाईट शो ! बॉस्फोरस ह्या इस्तान्बूलच्या निमुळत्या समुद्रावर. रात्र काळी. रात्र नाचरी. रात्र धुंद. टर्किश विवाहातील नाचगाण्याचा एक टप्पा तेथील कलाकारांनी करून दाखवला. आपल्याबरोबर सर्वच प्रेक्षकांना आपल्या नाचात सहभागी करून घेतले. अख्खी बोट काही काळ हातात हात घालून गोलगोल फिरत होती. एकदा उजवा पाय, एकदा डावा पाय...हवेत उडवायचा ! त्या आधी बेली नर्तिकेने देखील असेच एका दोघांना पकडले. लागले बाईंबरोबर नाचू ! बाई त्यांना ठेका शिकवीत होत्या. एकदोघांनी बॉलीवूडसारखे बाईंना जवळबिवळ बोलावले. अगदी नोटा भोवती गोलगोल फिरवल्या. बाईंनी त्या ताब्यात घेतल्या. म्हातारे आजोबा देखील खुदूखुदू हसताना शेजारीच बसलेल्या आजींना सापडत होते. एकच विचित्र अनुभव. लेकीने तिथल्या वेटरकडे 'water' मागितले....त्यावेळी तो तिच्यासाठी व्होडकाचा ग्लास भरून आला !  त्याला बेनिफिट ऑफ डाउट द्यावा व आपण 'water' म्हटलेले त्याला कळले नसावे असे आम्हीं आपले मानून घेतले. वा त्या बेहोष बोटीवर पाणी मागणारे बहुतेक आम्हींच असावेत !

समुद्रातून बाहेर पडून जमिनीवर आलो तेव्हां दुसरा दिवस सुरु झाला होता. हॉटेलवर पोचलो. दमल्याभागलेल्या आम्हीं, काही क्षणांत निद्राधीन झालो.

क्रमश:

Friday, 6 July 2012

टूर'की'...५

टूर'की'...१
टूर'की'...२
टूर'की'...३
टूर'की'...४

आम्हीं पक्षी होतो. पंख पसरून तरंगत जात होतो. आकाश किंचितसेही थकले नव्हते. क्षितिजाला टेकले नव्हते. एखाद्या अथांग विवरातून आपण तरंगत चाललो आहोत असा भास. आमचा थवा तरंगत तरंगत खाली उतरू लागला. प्रवास लांबचा झाला होता. विसाव्याची ओढ होती. हलकेच आम्हीं पाय टेकवले. आणि डोळे उघडले.
खिडकीबाहेर गाड्यांचे दिवे लुकलुकत होते. छतावरील लाल दिवे विझू लागले. खटखट आवाज वेगवेगळ्या अंतरावरून ऐकू येऊ लागला. कंबरपट्टे सुटू लागले. आम्ही पायांवर उभे राहिलो. बाहेर देश वेगळा होता.
गेल्या दहा दिवसांत केलेला बेत अखेर पार पडला होता. आम्हीं मायलेकी तुर्कस्तानात येऊन पोचलो होतो. आता थोडाच अवधी मग बाहेर रस्त्याला देखील लागू.

बॅगा ताब्यात घेणे, पासपोर्टवर शिक्का मारून घेणे ह्यात थोडा वेळ गेला. ह्यापुढे जेनीचे आकाश वेगळे असणार होते व आमचे शहर वेगळे. जेनी ट्रॉली घेऊन वळली...तिला पाठमोरी बघत मी काही क्षण नुसतीच उभी राहिले. ती भेटली आणि आमचा मुंबई विमानतळावरचा वेळ न कंटाळता पुढे सरकला. मी वळले. काचेचा दरवाजा बाहेर ढकलला. इस्तान्बुलच्या रस्त्यावर आम्हीं दोघी उभ्या होतो. हाताच्या अंतरावर आमच्या नावाचा बोर्ड घेऊन हॉटेलचा माणूस उभा होता. त्याला ओळखीचा हात केला. पुढे येऊन त्याने सामान ताब्यात घेतले. आम्हीं त्याच्या मागे चालू लागलो. पुढल्या पंधराव्या मिनिटाला रस्त्याला लागलो होतो. बाहेर काळोख होता. थोड्याच वेळात उजव्या हाताला समुद्र दिसू लागला. रात्रीचे नऊ वाजले होते. समुद्राला लागून मोकळे हिरवे मैदान होते. चकाकता समुद्र. त्याला लागून हिरवे मैदान. कुठे कठड्याला टेकून समुद्रात गळ टाकून बसलेले रहिवासी. काही वेगळंच चित्र. एकेका फुटावर उभे असलेले तरुण तुर्क...म्हातारे...

हॉटेलपाशी पोचलो तेव्हां दहा वाजले होते. बॅगा आम्हांला देऊ केलेल्या खोलीमध्ये ठेवल्या. हातपाय धुतले. ताजेतवाने झालो.
"आता ?" मी विचारलं.
"पडूया बाहेर ?" लेकीने विचारलं.

हॉटेलबाहेर उभं राहून तिशीच्या मॅनेजरने हात लांब करून बोट दाखवलं. उजवीकडे. नंतर डावीकडे....त्या तिथे. म्हणे एक हॉटेल होतं...खात्रीचं. त्याने चाखून बघितलेलं. बाहेर पडताना, स्वागतकक्षातून इस्तान्बुलच्या माहितीचे वाङमय हातात घ्यायला मात्र विसरलो नाही. खाताखाता उद्या काय करायचे ते आज रात्रीच नको का ठरवायला ?
गल्ल्या तशा अरुंदच. काही घरं जुनी. काही नव्याने वर वाढवलेली. बोळं. पुन्हां परत आपल्या हॉटेलपाशी नक्की पोचू की नाही ही एक शंका डोकावलीच.
एका गल्लीच्या तोंडाशी वसलेले शेशमे रेस्टॉरंट. बैठ्या बांधकामासमोरील मोकळ्या हवेत थाटलेलं. माथ्यावर उतरतं छप्पर. टेबल खुर्च्या आटोपशीर. आम्हीं दोघी आत शिरलो तेव्हा ते तसं भरलेलंच होतं. सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. भारतीय आम्हीं एकटेच होतो. जोडपी त्यांची पेयं हलकेच पीत गप्पा मारत शांतपणे बसलेली होती. वेटर वर्ग सगळा तरुण. पांढरे शर्ट, काळी पॅन्ट.
"Where are you from ?" मोडक्या इंग्रजी उच्चारांतून एका रुबाबदार वेटरने विचारलं.
"इंडिया."
"हिंदुस्तान ?" त्याने भुवया उंचावून विचारलं. मंद हसला. बाजूच्या जोडप्याने वळून बघितलं.
मनात अभिमान भरून आला. मान नकळत ताठ झाली. आणि आमच्या चेहेऱ्यावर हसू पसरलं. प्रतिसाद हसरा मिळाला.

अडाणा कबाब आणि टर्की चाय.
तुर्कस्तानातील पहिली चव. रात्रीच्या शांत वातावरणात. आजूबाजूला हलकेच हसण्याचे आवाज. वेटरांची टेबलाभोवती सफाईदार हालचाल.
डोळे मिटून घेतले...
डेड लाईन्स, प्रेझेंटेशन्स...मिटींग्स...दिवसाचे चोवीस तास.
एक क्षण सर्व आठवलं...आठवलं ते बरं झालं...
नेहेमीच, हातात आलेले पहिले छायाचित्र सर्वात मागे जाते...आणि मग तेव्हांच गठ्ठ्यातून नवनवी छायाचित्रे नजरेसमोर येऊ लागतात. मोकळा श्वास...तुर्कस्तानातील काळे आभाळ...दूर समुद्र पक्षांनी दिलेली साद. पहिली मोकळी रात्र.

आम्हीं समुद्र पक्षी होतो.
क्रमश:

Wednesday, 4 July 2012

टूर'की'...भाग ४


शुक्रवारी, सकाळी ऑफिसला पोचल्यापोचल्या सर्वप्रथम इस्तान्बुलमधील हॉटेलचं आठ दिवसांचं बुकिंग रद्द करावयाच्या मागे लागले. एक्स्पेडीया डॉट कॉम. दूरध्वनी क्रमांक. फोन लागला. कोणी बाई हजर झाल्या. मी माझं नाव सांगितलं. बुकिंगचा तपशील दिला. ते आठ दिवसांचं बुकिंग मला रद्द करावयाचे आहे हे सांगितले. बाईंनी मला थोडं थांबण्यास सांगितलं. बहुतेक त्यांच्या संगणकावर त्यांनी शोधाशोध केली. पुन्हां फोनवर आल्या. मला सांगितले की त्यांनी बरीच शोधाशोध केली आहे परंतु, त्यांना काही माझे हे असले बुकिंग मिळत नाही आहे.
"म्हणजे ?"
"I can see your booking for 3 days. But the one which you are talking about is not there."
"What ?"
"Ya Mam...there is no booking on your name for 8 days in that particular hotel."
हे धक्कादायक होतं. मी त्याच बुकिंगवर तुर्कस्तानाचा विझा मिळवला होता !
"So...now ? What do I do ? I have to cancel that booking !"
म्हणजे जे नाहीच आहे...जे अस्तित्त्वातच नाही आहे...ते कसं बुवा रद्द करून घ्यायचं ?
"Just tell me while booking...which site did you visit ?"
"Of course ...Expedia !"
माझं काय डोकं फिरलंय...यात्रा डॉट कॉम वर बुकिंग करायचं...आणि रद्द करायला एक्स्पेडीयाला फोन लावायचा ? मूर्ख कुठली !
"No Mam...am saying ...Expedia.com or...Expedia.co.in ?"
"Oh ! My God ! There are two different sites ?"
"Of course ! Please check that ! Or else I will give you a number...you call them and get your booking canceled."
"Can't you do that for me ?" वैताग !
"No Mam...you only have to do it."

एक्स्पेडीया डॉट कॉम व एक्स्पेडीया डॉट को डॉट इन... ह्या एकमेकांशी संलग्न अशा दोन कंपन्या आहेत. एक भारतात...एक भारताबाहेर. दोघांचेही नंबर टोल फ्री. नशीब माझं !
बुकिंग करताना हा गोंधळ अजिबात लक्षात येत नाही...किंवा कदाचित ते माझ्या लक्षात आले नाही. माझे पहिले ३ दिवसांचे बुकिंग हे 'एक्स्पेडीया डॉट कॉम' वर होते व विझासाठी केलेले पूर्ण आठ दिवसांचे बुकिंग हे 'एक्स्पेडीया डॉट को डॉट इन' ह्या साईटवर झालेले होते. मी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर तो क्रमांक माझ्या ऑफिसच्या फोनवरून काही लागेना...मग मोबाईल...आता कोण जाणे मी कुठल्या देशात कोणाशी बोलत होते. बाई इंग्रजी वेगळ्याच ढंगात बोलत होत्या. मी माझा मोबाईल कानावर अगदी दाबून धरला...जसं काही फोन कानावर दाबून धरला की ते एकमेकांत मिसळून गेलेलं बोलणं मला स्पष्ट ऐकू येणार होतं ! एकदोन वाक्यांचा पुनरुच्चार केल्यावर का होईना... माझं बोलणं तिला आणि तिचं गूढ बोलणं मला कळलं...व आमचं आठ दिवसांचं बुकिंग रद्द झालं. डोक्यावरच एक ओझंच जसं काही उतरलं.
पुन्हां 'एक्स्पेडीया डॉट कॉम'चा क्रमांक फिरवला. कृपया आमचं ह्या ह्या तारखांचं ३ दिवसांचं बुकिंग कायम करा...."  ते मघाशी करून घेता नव्हतं आलं...कोण जाणे आठ दिवसांचं बुकिंग कॅन्सल झालं नाही तर हे ३ दिवस आणि त्या तारखा धरून अजून आठ दिवस...म्हणजे भारीच !
"You need to get these things sorted...You cannot confuse your customer for no fault of his ! It is not at all clear on your sites !" कान पिळल्याशिवाय सोडायचं नाही.
"Yes Mam, I will give your feedback to the company...."
"Please do that !" फटकारलं. फोन बंद केला.
परदेशी आमची अर्थव्यवस्था करण्यास कालच ट्रॅव्हल डेस्कला कळवले होते. पाऊण रक्कम ट्रॅव्हल कार्डावर व पाव रक्कम रोख. युरोज. ते कार्ड व पैसे माझ्याकडे ऑफिसच्या पत्त्यावर पाठवले गेले. ते ताब्यात घेतले व मी अर्धा दिवस लवकर ऑफिसमधून निघाले.

पहाटे पावणे दोनला आम्हां दोघींना घरातून बाहेर पडावयचे होते. अजून बॅगा अर्धवट भरलेल्या होत्या. घरात कोपऱ्यात. अर्ध्या उघड्या...अर्धपोटी.

विमानतळावर पोचलो तर विमान कुठल्या अंगणात उभे राहणार होते हे अजून ठरावयाचे होते. तसाच अर्धा तास गेला...एक तास गेला. अंगण ठरले. म्हणून रांगेत उभे राहिलो. घड्याळ तर सरकत होतं. आमची रांग मात्र अडकल्यासारखी. जागच्याजागीच. काही वेळाने समोर डेस्कवर हलकेच माणसे येऊन बसू लागली. मात्र काम करण्याची काही इच्छा नसल्यागत...स्वस्थ. इतक्यात लेक माझ्या कानी पुटपुटली. "आई, ती तिथे ना एक मुलगी दिसतेय...मला वाटतं ती तुझी मैत्रीण आहे !"
लेकीने दाखवलेल्या दिशेकडे मी वळले. काळ्याकुरळ्या केसांचा गोल घुमट...गोरा पसरट चेहरा...आणि बारीक डोळे. असामची जेनी !
मी मोठ्याने तिला हाक दिली. जेनी वळली...हाsss....करत तुरुतरू चालत बुटकीशी जेनी पुढे झाली. जेनी. माझ्याच ऑफिसमध्ये पूर्वी काम करणारी...आणि आता बँकॉकमध्ये स्थायिक झालेली.
"Hey ! What are you doing here ? Where are you going ?"

जेनी देखील तिच्या मैत्रिणींबरोबर तुर्कस्तानालाच भटकायला निघालेली होती. तिच्या मैत्रिणींनी बुकिंग केलं होतं टर्किश एअरलाइनचं आणि हिने रॉयल जॉरडॅनियनचं. कारण तुर्कस्तानावरून परतताना तिला जॉर्डनला भेट द्यायची होती. तिथला तिचा मित्र तिला पेत्राची सर करवणार होता ! झकास बेत होता बाईंचा. हे सगळं ऐकता ऐकता अर्धा तास निघून गेला आणि आमच्या लक्षात आलं...आम्ही अजून जिथल्या तिथेच उभे होतो. डिंकाने डकवल्यासारखे. बघता बघता ३ वाजून गेले होते. 
"थांब आई, मी विचारून येते." लेक म्हणाली.
मला ती डेस्कपाशी बोलताना दिसत होती...मान हलवत माझ्याकडे आली.  हसतहसत मला आणि जेनीला म्हणाली. 
"I have a news for you guys .."
"What ?" जेनीने बारीक डोळे त्यातल्यात्यात मोठे करून विचारलं.
"Our flight has been delayed by five hours. " लेक मंद मंद स्मित हास्य चेहेऱ्यावर पसरवत हलकेच म्हणाली.
"Whaat ?" आत्ताचं जेनीचं व्हॉट आणि काही क्षणापुर्वीचं व्हॉट ह्यात तब्बल पाच तासांचा फरक होता ! त्या चढत्या आवाजाने आजूबाजूचे प्रवासी आमच्याकडे बघू लागले. त्यांनाही उत्सुकता होतीच...नक्की गेलंय कुठे आमचं विमान ?
"Yes.." शांतपणा साईसारखा चेहेऱ्यावर पसरवत आणलेल्या बातमीवर लेकीने शिक्कामोर्तब केलं.

झाले होते ते असे...रॉयल जॉरडॅनियनचं विमान मुंबई विमानतळावर आलेलंच नव्हतं. आणि अजून पाच तास तरी येण्याची शक्यता नव्हती. सकाळी साडे दहाला विमान सुटण्याची शक्यता होती. ती देखील खात्री नाहीच...शक्यता.
मी शांतपणे लेकीकडे बघितलं. तिची अपेक्षा माझ्या रुद्रावताराची होती. जेनी तुरूतुरू डेस्कपाशी गेली. हातात इ-तिकिटाचा प्रिंट आउट. जेनी, इस्तान्बुलपर्यंत रॉयल जॉरडॅनियनने प्रवास करणार होती. परंतु, तिथे उतरल्यावर मात्र तुर्कस्तानातील दुसरे विमान घेऊन ती इझमीरला निघावयाची होती. इझमिरला तिने व तिच्या मैत्रिणींनी हॉटेल बुकिंग केलेलं होतं. जर ती इस्तान्बुल विमानतळावर उशिरा पोचली तर हमखास तिचं पुढचं विमान चुकणार होतं. पंचाईत होती. आत्तापर्यंत सर्वच प्रवाशांना कळून चुकलं होतं. विमान वेळेवर सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती. आमच्या सहप्रवाशांतील प्रत्येकाचं जॉर्डनला उतरल्यावर पुढे जाण्यासाठी कुठली ना कुठली तरी दुसरी फ़्लाईट  होती. एखादुसराच प्रवासी होता ज्याला जॉर्डनलाच जावयाचे होते. डेस्कवर चढत्या गोंधळाला तोंड देण्यासाठी कोणी एक चटपटीत तरुणी येऊन उभी राहिली. तिच्या पुढ्यात जेनी. व तिला एकटीच कशी उभी करणार म्हणून बाजूला मी. आमचे तिघींचे इ-तिकिटांचे प्रिंट आउट तिने हातात गेले. जेनीने विनवून विनवून तिला तिची समस्या सांगितली...म्हणजे जॉर्डन...इस्तान्बुल...इझमीर. मागे इतर लोकं होतीच. जॉर्डन...अॅमस्टडॅम. जॉर्डन...न्यूयॉर्क. जॉर्डन...वगैरे. जॉर्डन...वगैरे. ती रॉयल जॉरडॅनियनची ऑफिसर तरुणी सगळ्यांना अदबीने काहीनाकाही सांगू पहात होती. अकस्मात ती व तिचे सहकारी नाहीसे झाले...परत आले व त्यांनी पक्की बातमी दिली....टर्किश एअरलाइनच्या त्याच वेळी सुटणाऱ्या विमानात थोडीफार जागा आहे. परंतु, इतक्या लोकांच्या खाण्याची व्यवस्था नाही. आणि त्यांचा तसा नियमच आहे, जितके खाणे विमानावर घेतलेले असेल तितकेच प्रवासी विमानात भरावयाचे. त्यावर एकही नाही. तिने जेनीकडे बघून तिला सांगितले...I was trying for three of you ...but they refused to help.

त्या सगळ्या अस्वस्थ जनसमुदायात एक माणूस फिरत होता. गळ्यात कुठलासा बिल्ला लटकवून. त्याच्याबरोबर मध्यमवयीन स्त्रीपुरुषांचा एक गट होता. शांत एका जागी सगळे बसले होते. आणि हा त्यांचा ग्रुप लीडर काय ती धावपळ करत होता. ते मधुमेहाचे डॉक्टर्स होते. अमेरिकेत त्यांचे सेमिनार होते. त्यासाठी मंडळी निघाली होती. सेमिनारचा त्यांचा पहिला दिवस ह्या गोंधळामुळे चुकणार होता. टर्किश एअरलाइनने त्यांना देखील प्रवेश नाकारला होता. त्या सतरा जणांना...पुरेसा अन्नसाठा नसल्याकारणाने. हळूहळू एकेका माणसाने इथेतिथे पथारी पसरावयास सुरवात केली. लेकीने एक कोपरा बघितला, बॅगेतून दोन शाली काढल्या....अंथरूण झालं...पांघरूण झालं. दुसऱ्या मिनिटाला सुखी जीव निद्रिस्त झाला होता. मी रांगेतच खाली जमिनीवर बस्तान ठोकलं. २ बॅगा आणि मी. जेनी उगाच इथेतिथे फिरत राहिली. वेगवेगळ्या बातम्या अधूनमधून आणत राहिली.

खात्रीलायक आतल्या गोटाची खरंतर एकच बातमी होती. विमान सकाळी दहालाच सुटणार होतं. रॉयल जॉरडॅनियनने आमची सकाळची नाश्त्याची सोय केली होती. बाकी ते काहीही करू शकत नव्हते. घरी जाऊन यावं का....उगाच एक विचार मनातून डावीकडून उजवीकडे सरकला. मी बॅगांची राखण करत होते. दुरून जेनी हातात कॉफीचे दोन मग्स घेऊन आली. माझ्यासारखे अगदीच जमिनीवर मांडी ठोकून बसणे सर्वांनाच जमते असे नाही. मला जमते कारण आमच्या आर्ट स्कूलचे तसे आम्हांला ट्रेनिंगच आहे. रस्त्यात, स्टेशनात मिळेल तिथे बसा...व हातातील स्केच बुक बाहेर काढा....६B पेन्सिल कागदावर सपासप ओढायला लागा...स्केचिंग. त्यामुळे रस्त्यात बसणे आणि ऑफिसात खुर्चीत बसणे एकूण एकच. उलटे हे असे रस्त्यात बसून स्केचिंग करण्यातील मजा काही औरच. जेनी तशीही मला बऱ्याच वर्षांनी भेटली होती. मधली काही वर्षं तसा काही संपर्क नव्हता. फेसबुकवर देखील ती काही फार मोठी वावरणारी नव्हती. त्यामुळे JWT सोडल्यावर पुढे तिने कायकाय केले हे ऐकण्यात काही वेळ सहज व्यतीत होऊ शकत होता. माझ्या आयुष्यात तर गेल्या दोन वर्षांमध्ये घडामोडींनी एकदम एक्सलेटरच घेतलेले होते. जसं काही एखाद्या बॉलीवूडच्या आर्ट सिनेमाने अकस्मात व्यावसायिक सिनेमाचे रूप धारण करावे. दोनतीन कॉफ्या रिचवल्या तोपर्यंत सहा वाजले. दोघींच्या आयुष्यातील सर्व अपडेट्स एकमेकींना देऊन झाली. लेकीने झोप आटोपती घेतली. आम्हांला नाश्त्यासाठी कुठे पुढे विमानतळावरील विश्रामगृहाकडे हाकण्यात आले.

दात घासणे...तोंडावर पाणी फिरवणे....नाश्ता...कॉफी. इत्यादी.
प्रवासाची सुरवात होताहोता मायदेशीच पाय रेंगाळले होते. नाईलाज.
"एक लक्षात घे...आपल्याला नाहीतरी नऊ तास जॉर्डन विमानतळावर काढायचे होते...बरोबर ? त्यातले अर्धेअधिक इथेच संपले की ! आता मला वाटतं फार फार तर ३ तास काढावे लागतील आपल्याला जॉर्डनला." कोचावर मुरकूटी मारून शालीत गुरफटून गेलेल्या लेकीला मी म्हटले.
"अच्छा ! म्हणून तू इतका वेळ गप्प आहेस होय ? तरीच म्हटलं अजून तू हायपर कशी काय नाही झालीस !" अर्धवट डोळे उघडून माझ्याकडे बघत लेकीने तीर सोडला.
"गप्प गं ! वाईटातुन नेहेमी चांगलंच काढावं म्हणून म्हणतेय मी ! मला तर वाटतं...ह्या इतक्या सगळ्या प्रवाशांमध्ये सर्वात कमी गोंधळ आपलाच झाला असावा. कारण आपला तो जॉर्डनचा नऊ तासांचा हॉल्ट ! देव करतो ते सगळं बरोब्बर विचार करून करतो ! त्या परक्या विमानतळावर नऊ तास उगाच इथे तिथे फिरत बसण्यापेक्षा आपल्याच विमानतळावर वेळ काढणं कधीही बरं नाही का ?"
"हो ! कळलं ते !"

१ तास इथे आणि २ तास तिथे. काहीबाही करत वेळ संपला. प्रवासात वाचावं म्हणून पर्समध्ये एक पुस्तक ठेवलं होतं. पण जुनी मैत्रीण भेटली आणि मग पुस्तक पर्समध्येच गपगुमान पंख मिटून राहिलं. शेवटी एकदाचं आमचं लपून बसलेलं विमान अंगणात आलं. आम्हां सर्वांना पुकारण्यात आलं. इतस्तत: विखुरलेले गत रात्रीचे चेहरे पुन्हां दिसू लागले. काही झोपाळलेले तर काही ताजेतवाने. रांग लगबगीने विमानाच्या अरुंद रस्त्याला लागली. एकेक माणूस आत दिसेनासा झाला. आम्हीं सर्वात शेवटी उभे होतो. आत शिरलो त्यावेळी काहीजण स्थानापन्न झाले होते. तर काहीजण वरच्या कप्प्यात नसलेल्या जागेत आपापले सामान घुसवत होते. नजरानजर झाली की एक हलकेच ओळखीचे हास्य सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर येत होते. रात्रभर जमिनीवर अडकून पडलेले...आकाशात भरारी मारावयास उत्सुक सहप्रवासी.

इस देरी के लिये हमें खेद हैं....
कोणी बिनचेहऱ्याची गोड आवाजाची बाई बोलू लागली.

लेक खिडकीत बसली. 
आम्हीं खुर्चीचे पट्टे लावले. हलकासा खट्ट आवाज खात्री देऊन गेला....
नक्की निघालात आता तुम्हीं...तुर्कस्तानाला.
क्रमश:


Monday, 2 July 2012

टूर'की'...भाग ३

त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसचा मॅक बंद केला तेव्हा मी मेकमायट्रीप ही साईट सर्वात शेवटी बंद केली होती. आणि त्यावेळी एमिरेट्सची दोन तिकीटं ७५ हजारांपर्यंत होत होती. जाताना दुबईला ६ तासांचा एक विराम होता. आणि दुबईतील मित्रमंडळींना भेटण्याची एक संधी प्राप्त होत होती. टर्किश एअरलाइनचे विमान, मुंबई विमानतळावरून उडाले की थेट तुर्कस्थानाच्या विमानतळावर उतरत होते. मात्र एका माणसाचे तिकिटच मुळात ५७ हजारांचे होत होते. म्हटलं घरी जाऊ, लेकीबरोबर विचारविनिमय करू आणि मग एमिरेट्सचं बुकिंग करूनच टाकू.

घरी पोचून कामं आटपून मॅक सुरु केला. जाल चालू केलं. मेकमायट्रीप...एमिरेट्स...आणि एक धक्का...! एक तिकीट नव्वद हजार! चार तासात दर तिकिटामागे पंधरा हजाराने वाढ ! हे टाळता येण्यासारखं होतं...ऑफिसमध्ये होते तेव्हां ती दोन तिकिटं ब्लॉक करता आली असती ! पण ते केलं नव्हतं. मूर्खपणा झाला होता. एमिरेट्स रद्द...
"आता फक्त...रॉयल जॉरडॅनियन....बाकी आहे गं..." मी म्हटलं. " नऊ तास जॉर्डनला हॉल्ट आहे."
"नऊ तास ?! आई, इतका वेळ काय करणार आहोत आपण तिथे ??!!" लेक किंचाळली.
"इलाज नाही. येताना चारच तासांचा हॉल्ट आहे ! करून टाकूया आता बुकिंग ! नाहीतर हेही मिळणार नाही ! उद्या आपल्याला विझासाठी हे द्यायलाच हवंय."
"बरं...ठीकेय...कर मग आता...काय करणार दुसरं...आपण एकदम लास्ट मिनिट करतोय ना सगळं बुकिंग...म्हणून हे असं होतंय..."
क्रेडीट कार्ड...फ्लाइट बुकिंग...डन !
आता हॉटेल बुकिंग...
एक्स्पेडीया डॉट कॉम.
"आई, इस्तान्बुलमधला सुलतानेहमद भाग बघ...त्या एरीयातल्या हॉटेलचं आपल्याला बुकिंग करायला हवंय...हे बघ...आपल्याला जे काही बघायचंय ना ती सगळी ठिकाणं त्याच एरियात आहेत !"
"लोनली प्लानेट बघून सांगतेयस का ?"
"हो!"
"ठीक !"
मी 'एक्स्पेडीया डॉट कॉम'वर...हॉटेल्समध्ये...सुलतानेहमद, इस्तान्बुल टाईप केलं. चारपाच हॉटेल्स स्क्रीनवर हजर. फोर स्टार...थ्री स्टार...उजव्या हाताला एका रात्रीचे भाडे...गुणाकार...म्हणजे एका दिवसाचे इतके तर तीन दिवसांचे किती...वगैरे वगैरे. कॅल्क्यूलेटर ! मी हातचाबितचा धरेस्तोवर कॅल्क्यूलेटरचं उत्तर हजर ! 
"अगं, हे बघ गं...हे बरोबर वाटतंय हॉटेल. आणि तसं आपल्या बजेटमध्ये पण बसतंय !"
दोघींनी हॉटेलचे फोटो बघितले...तिथे दिलेला गुगल नकाशा बघितला..."ठीक आहे...चल करून टाकूया..."
कॅलेंडर...तारखा....इस्तान्बुलमध्ये घालवायचे दिवस...क्रेडीट कार्ड...हॉटेल बुकिंग ! डन !

दुसऱ्या दिवशी कुठलंही काम सुरु करण्याआधी सपनाला फ्लाइट बुकिंग व हॉटेल बुकिंगची कन्फरमेशन मेल्स फॉरवर्ड केली. त्यादिवशी आमच्या प्रवासावाबत दुसरं काही घडलं नाही.

दुसरा दिवस...सकाळ...
"अनघा, अगं, फक्त पहिल्या चार दिवसांचं बुकिंग चालणार नाही...तुमचं रिटर्न तिकिट ज्या दिवशीचं आहे त्या दिवसापर्यंतचं हॉटेल बुकिंग हवं राणी !"
"अगं, पण आम्हीं थोडेच तिथेच रहाणार आहोत ? तिथून निघणार आणि पुढे दुसरीकडे जाणार ना...?"
"मग तू जे काल हॉटेलचं बुकिंग केलयंस त्याच हॉटेलचं शेवटच्या दिवसापर्यतचं बुकिंग कर ! आणि ते कन्फरमेशन मेल मला पाठव. मी ते तुमच्या विझासाठी प्रोड्यूस करेन."
"पण मी जे काल तीन दिवसांचं बुकिंग केलंय त्याचं काय करू ?" मी चिंतेच्या प्रदेशात शिरायला फारसा वेळ नाही लागत !
"ते असू दे ! हे आठ दिवसांचं बुकिंग नंतर रद्द कर ! "
"उद्योगच आहे गं हा !"
"हम्म्म्म...आठवणीने कर मात्र रद्द...एकदा विझा आला हातात की...!"
होकार देत मी फोन ठेवला. हॉटेलच्या कन्फरमेशन मेलवरून पुन्हा त्याच हॉटेलच्या साइटवर. इस्तांबुलला पोचायचा दिवस...आणि तिथून निघायचा दिवस....हॉटेल बुकिंग...एकदा परत तपासून बघितलं...हॉटेलचे कॅन्सलेशन चार्जेस शून्य...हुश्श !...पुन्हां क्रेडीट कार्ड...बुकिंग डन !

बाजूच्या कागदावर तारखांचं गणित मांडतामांडता हॉटेल कन्फरमेशन मेल हजर. सपनाला फॉरवर्ड. तो शनिवार होता. आणि पुढल्या शनिवारचं आमचं तिकिट मी बुक केलेलं होतं. तुर्कस्तानाचा विझा चार दिवसांत मिळतो ह्या विश्वासाच्या आधारावर.

सोमवारी आमचे पेपर विझासाठी गेले. दुपारी ट्रॅव्हल डेस्कचा फोन. पेपर विझा ऑफिसमधील ऑफिसरने तपासले आहेत...ओके केलेले आहेत. आता उद्या सबमिट होतील.
"उद्या ?! म्हणजे मंगळवार ! म्हणजे एकदम शुक्रवारी येणार का आमचा विझा ? शनिवारी निघायचंय आम्हांला...लक्षात आहे ना?" पुन्हां चिंता प्रदेश !
"हो...काळजी नका करू...होईल सगळं बरोबर..."
"ठीक...मग मी तुला आमचा तिथे पोचल्यावरचा कार्यक्रम पाठवते...तारखांसाहित...तू जरा मला तिथला आतला प्रवास विमानाने केला तर किती पैसे होतील ते बघून सांगशील का ?"
"हो...मेल करा तारखा...आणि जागा."
आम्हीं दोघींनी बसून एक कच्चा कार्यक्रम तयार केला होता. तो मेल केला. संध्याकाळपर्यंत जे उत्तर आले त्यात तुर्कस्थानातील विमानात बसून भटकणे आम्हांला दर डोई ९० हजाराला पडत होते...हे काही खरे नाही. देशांतर्गत  बुकिंग देखील आपल्यालाच करावयास हवे !

इथेतिथे वाचत असताना एक माहिती मिळाली होती. ती अशी...जर टर्कीमध्ये इस्तान्बुल सोडून दुसऱ्या कुठल्याही शहरात फिरावयाचे असेल तर इस्तान्बुलमध्ये आधी शिरूच नका. विमानतळावर उतरल्याउतरल्या तुर्कस्थानातील जे दुसरे स्थळ पहावयाचे आहे त्यासाठीचे सुयोग्य अंतर्गत विमान पकडा. सगळं टर्की फिरून झाले की मग शेवटी इस्तान्बुलमध्ये परता...आणि मग काय ते विमानतळाबाहेर या व इस्तान्बुल भटकायचं तितकं भटका ! म्हणजे अर्थात जितक्या दिवसांचा विझा तुम्हांला मिळालाय तितके दिवस काय ते जीवाचे इस्तान्बुल करा. नेस्तनाबूत होईस्तोवर इस्तान्बुल ! आणि मग तेथून स्वदेशी परता !

आता इथे आमची थोडी गडबड होती. आम्हांला इस्तान्बुल शहर - कापाडोक्या - आणि एक समुद्रकिनारा बघायचा होता. म्हणजे तुर्कस्थानाचे एक पुढारलेले शहर - भूमध्यसागराचा एक निळा समुद्रकिनारा आणि कपाडोक्यामध्ये 'हॉट एअर बलून राईड' ! अशी आमची इच्छा तरी होती.
त्या इच्छेनुसार आम्हीं दोघींनी एक कच्चा आराखडा तयार केला. तो असा...
सर्वात महत्वाचं म्हणजे जॉर्डन मधील नऊ तासांचा हॉल्ट झेलून, इस्तान्बुल विमानातळावर उतरल्यावर पुन्हां एखाद्या डोमेस्टिक विमानात शिरण्यापेक्षा ३ दिवस तिथे राहून मग पुढल्या प्रवासास निघणे बरे पडेल असे वाटले. तेव्हां इस्तान्बुल - चिराली (सर्वात शांत किनारा...फारसे करण्यासारखे काही नाही...असे ह्या किनाऱ्याचे वर्णन सगळीकडे वाचावयास मिळत होते. वर्धनशी बोलणे झाल्यावर तो देखील कास किनारा सांगत होता. पण का कोण जाणे...माझे मन त्या चिरालीकडेच ओढ घेत होते ! हट्टीपणा ! दुसरे काही नाही ! ) -  आणि त्यानंतर सर्वात शेवटी कपाडोक्या, अशी भटकंती करावी असा विचार मनात धरला. व तुर्कस्थानातील देशांतर्गत विमान कंपन्या शोधण्यास सुरवात केली. चिरालीसाठीचे विमानतळ, अंताल्या. मध्येच वाचनात आले, तुर्कस्थानातील बसप्रवास हा सुरक्षित असतो. व खिशाला तो स्वस्त पडतो. इस्तान्बुल फिरून झाले की रात्री बस पकडायची व कपाडोक्या गाठायचे...असे काहीसे डोक्यात आले. पैसे बरेच वाचत होते. बसप्रवासाचा एक अनुभव मिळत होता. जालावर थोडा वेळ शोधाशोध केली...बसचे तिकिट...किती वाजताची बस...किती तासांचा प्रवास...वगैरे वगैरे. बुद्धीला झेपेल इतपत अभ्यास झाल्यावर शेवटी आईचं मन उसळून आलं...आणि लेकीला घेऊन परदेशात बसचा रात्रीचा प्रवास नकोसा वाटला. पैसे आणि तिची सुरक्षितता...ह्यात शेवटी महत्त्वाचे काय ठरणार ? हम्म्म्म...गुपचूप फिरून विमानाच्या बुकिंगमागे लागले.

पहाटेचे ३ वाजले त्यावेळी लेक झोपून गेली होती व माझा एक आराखडा तयार झाला होता. तुर्कस्थानातील ऑनूरपेगॅसस ह्या देशांतर्गत एअरलाईन्स मिळाल्या होत्या. इस्तान्बुल - अन्ताल्जा (चिराली) - कायसरी (कपाडोक्या). सर्व बुकिंग्स झाली होती...विमानं व हॉटेलं. कच्ची. विझा मिळाल्यावर ती सगळी पक्की करावयाची होती.

गुरुवारी दुपारी ट्रॅव्हल डेस्कचा फोन आला. आम्हां दोघींना विझा मिळालेला होता.

मात्र आता मधला एकच दिवस हाताशी होता. शुक्रवार. शनिवारी पहाटेचे पाच वाजताचे विमान पकडावयाचे होते. जॉर्डन, पावणे आठ वाजता. तिथून दुसरे विमान साडेपाच वाजता आणि शेवटी सात वाजून पन्नास मिनिटांनी इस्तान्बुल.

"विझा मिळाला !" लेकीला फोन करून लगेच कळवून टाकले.

रात्री घरी पोचले. लेकीने उडी मारून मला हाय फाय केले...मग दोघींनी घरभर उड्या मारल्या...हसलो...खिदळलो...दोघींनी मिळून कपाटात, वर सुस्तावलेल्या दोन बॅगा खाली घेतल्या...त्यांच्यावरची धूळ झटकली...तिने तिचे कपाट उघडले...मी माझे...टोप्या, कपडे बॅगेत जसजसे येऊन पडू लागले तसतश्या आमच्या बॅगा आळस झटकू लागल्या...आणि आम्हांला दोघींना ऐकू आलं...आमच्या दोन्ही बॅगा गुदगुल्या झाल्यागत खुदुखुदू हसत होत्या !

क्रमश: