नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 8 October 2010

पृथ्वीवरील संध्याकाळ

मुंबईतील एखादा कलाविष्कार बघण्यासाठी सर्वोत्तम... पृथ्वी थिएटर. मुख्य रस्त्यावर वाहन असेल तर लावावं आणि समोरच्या बोळात शिरावं. सूर्यास्त होत आला असले तर वातावरणनिर्मितीत भरच. झाडाखाली वसलेले कँटीन, पिवळे कंदील, वर बांबूंचं छप्पर आणि त्यातून तिरीपीने अंगावर पडणारा केशरी प्रकाश. बाजूला माडांना लगडलेल्या नाजूक दिव्यांच्या माळा. झकास. आपण थोड्याच वेळात जो अनुभव घेणार आहोत त्यात कसं आधीपासूनच शिरायला होतं. एक मात्र धोका! आपण देखील कोणी बुद्धिजीवी आहोत असं उगाच वाटू लागतं!

आत नाट्यगृह ग्रीक अॅम्पी थिएटरचे छोटेसे रूप. जे कलाकार त्यांची कला प्रदर्शित करणार आहेत ते जसे काही आपल्यातीलच वाटावेत अशी त्याची रचना. नसरुद्दिन शहा हाताच्या अंतरावर. आविर्भाव करताना त्याच्या चेहेऱ्यावरची रेषा न रेषा दिसावी. आपण दिलेली दाद अगदी त्यांच्या कानी पडावी. इस्मत चुगताईंची कथा, हिबा शाहच्या तोंडून ऐकावी आणि अंगावर रोमांच उभे राहावे.

परवा योग आला. मकरंद देशपांडेंचे "पोहा गॉन राँग' हे हिंदी नाटक. संध्याकाळी सहाचा प्रयोग.

पोहे म्हटले की मुलगी बघायला गेलात कि लाजत लाजत समोरून येणारी; नाजुकशी, सुरेखशी मुलगी समोर येण्याचे दिवस तर आता गेले. आणि महाभारतातील सुदाम्याचे पोहे तर त्याहून जुने! परंतु, इथे एक मनुष्यजीव असा आहे, ज्याला पूर्ण खात्री आहे की तोच तो महाभारतातील सुदामा! सुदामा, त्याच्या बालपणीच्या दोघी मैत्रिणी आणि त्या मैत्रिणींना धरून येणारी इतर व्यक्तिमत्वे.
ह्या सुदाम्याचे काही आक्षेप आहेत. त्याच्या जिवलग मित्राबद्दल तक्रारी आहेत.
सर्वप्रथम त्याला महाभारतात त्याचे व्यक्तिचित्र नक्की का रंगवले गेले हेच कळत नाही. फक्त कृष्णाच्या व्यक्तिमत्वाला अजून एक कंगोरा देण्यासाठी हे व्यक्तिमत्व तयार केले गेले हा पहिला आक्षेप. म्हणजे बघा... इतका मोठा कृष्ण, तरी देखील आपल्या बालपणीच्या गरीब मित्राचा त्याला विसर नाही पडला!
दुसरा आक्षेप... कृष्णाने आपल्याला सोडून अर्जुनाला का युगपुरुष केले? मी जर बुद्धिमान आहे तर मलाच का नाही सांगितली गीता? मला सांगितली असती तर कदाचित उगाच १८ अध्याय उगाळत बसायला नसते लागले! लवकर तरी संपली असती. आणि हे इतके १८ अध्याय जेव्हा कृष्ण सांगत होता, त्यावेळी बाकीचे योध्ये रणभूमीवर, काय झोपा काढत होते?
हे आणि असेच काही इतर आक्षेप, म्हणजेच अनेक फोडण्या देऊन हे पोहे, चविष्ट होण्याचा प्रयत्न करतात. परंतु, वाटले सपकच. म्हणजे थोडे बिनचवीचे. पंधरा मिनिटाचे मध्यांतर टाळता आले असते. एक अंकी नाटक जरा बरे वाटले असते. दोनतीन प्रसंग अगदी उचलून ट्रॅशबिनमध्ये टाकता आले असते. मकरंद देशपांडे मात्र सुदामा म्हणून सही! आता ह्यापुढे कधीही सुदाम्यावरील काही लिखाण वाचनात आले तर मकरंद देशपांडे डोळ्यासमोर उभे रहाणार हे नक्की!

आपण एखादं अतिशय सुंदर नाटक बघितलं असा आनंद हे नाटक नसेल देऊ शकलं...पण ते पृथ्वी थिएटरचं मातीशी जवळीक साधणारं वातावरण...त्या वातावरणाने त्या भावनेवर कधीच मात केलेली असते!

मग पृथ्वीची गंमत काय इथेच संपली?

मी बाहेर येते, उजव्या हाताला वळते आणि तिथे असलेल्या पुस्तकांच्या दुनियेत डोकावते. तो अनुभवही वेगळाच. हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील, एखाददुसरं पुस्तक तरी मी विकत घेते.

जेव्हां बटव्यामधून लेखणी काढून, मी माझ्या नव्या पुस्तकावर स्थळकाळ लिहिते, तेव्हा कुठे माझी सोनेरी संध्याकाळ पूर्ण होते!

Thursday, 7 October 2010

रडकी पुस्तकं!

परवा सकाळी घड्याळाचे काटे ९चा इशारा करत डोळे वटारत होते. माझं आणि त्याचं कधीच पटलेलं नाही! त्यामुळे नेहेमीसारखीच माझी धावपळ चालू होती.
"आई, मला पैसे हवेत."
"अगं, माझ्याकडे आत्ता नाहीयेत. आणि मला एटीएम मध्ये जाऊन काढायला पण वेळ नाहीये. तुझ्याकडे देऊ का मी कार्डं? काढशील का तू?"
"दे."
रात्री ती मला कार्ड परत करायला विसरली आणि मी ते परत घ्यायला विसरले.
मग कालचे माझे आणि माझ्या लेकीचे एसमेस...
मी ऑफिसमध्ये. अदमासे दूपारचे ११ वाजले होते. माझ्या मोबाईलने त्याच्या पोटातील हालचालीचा एक आवाज काढला. लेकीचा एसेमेस आलेला होता..
So we got done with our lecture! and we came to watch a movie and I remembered I have your card, we went to Crossword and 2 books called me, So I had to buy them. They started crying when I said I can't buy them. So I didn't have an option.

मी...
ag, pn mi visarale card tuzyakadun ghyayalaa tari tu dyayachs naa kaal raatri parat!

लेक...
:)

रात्री जेवताना....
"काय ग, बाजारात आणि काय काय रडत होतं तुझ्याकडे बघून?"
"आई, खरं तर ना, चार पुस्तकं रडत होती, आम्हांला घरी घेऊन चल म्हणून. पण मी त्यांना समजावून सांगितलंय, मी एकदम तुम्हां चौघांना घेऊन गेले ना, तर माझी आई चिडेल माझ्यावर. म्हणून ना आज मी फक्त दोघांना घेऊन जाते आणि परत पुढच्या आठवड्यात येऊन तुम्हांला दोघांना घेऊन जाईन. चालेल? मग कुठे ती थांबली रडायची!"
"हो का? मला वाटलं, कोण जाणे आणखी कोण कोण रडतंय! जीन्स, पर्सेस, दागदागिने, टॉप्स....म्हणजे मग संध्याकाळपर्यंत माझं कार्डं रडू लागलं असतं..आणि रात्री मी रडले असते!"
"नाही ग आई. फक्त पुस्तकंच रडतात नेहेमी माझ्याकडे बघून!"

पुस्तकप्रेमी आजोबांची लाडकी नात बोलली! आणि त्याच बाबांची मी लेक! मग हसण्यापलीकडे काय करणार मी?
:)

Wednesday, 6 October 2010

मश्गुल

भरगच्च गुलाबी आणि त्यावर पांढऱ्या रंगाची उधळण. म्हणजे जसं काही गुलाबी दुलई अंथरावी आणि त्यावर आभाळातून पांढऱ्या रंगाने थबथबलेला कुंचला झटकावा. मग कुठेही विसावतील ते थेंब. त्या गुलाबी रंगांवर त्या पांढऱ्या मुक्त पद्खुणा किती खुलून दिसतात. मोजून एक दोन आणि तीन, लाल कौलारू घरे. आणि त्याला पडलेला सिमेंटचा उभा आडवा वेढा. त्यात ही बोगनवेल. तशीच दिसते ती. तिसऱ्या मजल्यावरून. गालीचा अंथरलेला. असा गालिचा, ज्यावर कधी पाऊल ठेवूच नये. उंचावर, हातात हनुवटी खुपसून तासनतास बसावं आणि तो नाजूक गालीचा डोळे भरून बघावा.

आपल्यातच मश्गुल असतात असे काही जीव. आजूबाजूला तोडफोड होते. आभाळ कोसळतं. धरणीकंप होतो. जग उलथंपालथं होतं. कधी इमले कोसळतात. पण ह्यांचं मात्र जगणं चालू. फुलणं चालू. पानगळ होते. नाही असं नाही. पण त्यातही त्यांचं फुलणं संपत नाही.
मग प्रश्न पडतो...वरून बघणाऱ्याला. त्याला वाटतं...खिजवते ही बोगनवेल!
"मी इतकं थैमान घातलं...जग तुझं स्मशानात पोचवलं....तुझं फुलणं तरी संपतच नाही?!"

आपल्यातच मश्गुल असे असतात काही जीव!

Tuesday, 5 October 2010

असेही अतिक्रमण!

सकाळचे ९.२०. ऑफिसजवळचा मोठा सिग्नल. माझी गाडी, मी सिग्नल व झीब्रा पट्टयांचा मान ठेवून उचित जागी थांबवते. मला उजव्या दिशेला वळायचं असतं म्हणून त्या रांगेत. अचूकरित्या सांगायचं म्हटलं तर बरोब्बर १२० सेकंद माझी गाडी स्तब्धता पाळते. आणि इथेच रोज एक नाट्य घडते. तर आपण आता बघु या आजचा दिवस...

रोल...
कॅमेरा...
अॅक्शन...
फिल्म सुरु होते त्यावेळी पांढरी झेन शांत उभी आहे. चालकाच्या खुर्चीत बाई आहेत. लाल सिग्नल नुकताच पडला आहे. एफएमवर 'मुन्नी बदनाम हुई' आताच सुरू झाले आहे. बाई आजूबाजूला बघत आपला वेळ घालवायचा प्रयत्न करीत आहेत. उजव्या हाताला डोक्यावरून फ्लायओव्हर झेपावलेला आहे. खाली जवळजवळ ३० भिकाऱ्यांची वस्ती आहे...चूल, बॅगा, अंघोळी. समोरच्याच पदपथावर असलेल्या पोलिसांच्या नजरेला, का कोण जाणे, पण ही वस्ती कधी पडलेलीच नाही. बाजूला उभ्या असलेल्या बऱ्याच गाड्यांना, आता भिकाऱ्यांनी विळखा घातलेला आहे. आपल्या गाडीच्या उजव्या बाजूने काळा ६/७ वर्षांचा मुलगा पुढे आलेला आहे. हातात दगड आहे. काचेवर दगड आपटायला सुरुवात. बाईंच्या कपाळाला आठ्या. चेहेरा हताश...ठक ठक ठक. काचेवर चरे. बाईंचा भीक देण्याला कट्टर विरोध. सिग्नलकडे आशेचा दृष्टीक्षेप. रेडीओ बोलतो आहे...'मैं झेंडू बाम हुई'. सिग्नल खाली असलेला इंडिकेटर वेळ दाखवतो...९८. अजून ९८ सेकंद शिल्लक आहेत...गाड्यांसाठी हिरवा लागायला.
cut to...मुलाच्या जोडीला आता त्याच्याचसारखी दिसणारी चार पाच वर्षांची मुलगी आलेली आहे. गळकं नाक, झिपरे केस. हात काचेवर आपटून बाईंचे लक्ष वेधायाचा प्रयत्न चालू केलेला आहे. काचेवर शेंबडाचे ठसे. पुलाखाली बसलेल्या मध्यमवयीन बाईंशी गाडीवाल्या बाईंची नजरभेट...त्या बाईचा क्लोज-अप...चेहेऱ्यावर विजयी हसू...'है तुझमे पुरी बोतल का नशा...बोतल का नशा'...

cut to...गाडीवाल्या बाई. सिग्नलकडे दृष्टीक्षेप...7० सेकंद बाकी...
cut to...सिग्नल. हिरवा सिग्नल आता पडलेला आहे. वेगवेगळ्या हॉर्नच्या आवाजांनी आसमंतात अकस्मात घाई निर्माण झालेली आहे...'मुन्नी बदनाम हुई, डार्लीग मेरे लिये'. भाऊ आणि बहिण मागे सरलेले आहेत. बाईंनी पहिला गियर टाकलेला आहे. तेव्हढ्यात त्यांच्या डाव्या बाजूने एक साधारण पस्तिशीचा तरुण इयरफोन लावून, लॅपटॉपचे दप्तर पाठीला लावून पुढे आलेला आहे. त्याने बाईंना थांबण्याचा इशारा केलेला आहे. आणि रस्ता पार करायला सुरुवात केलेली आहे. बाई थांबलेल्या आहेत. तरुण गाडीपुढून गेलेला आहे...cut to...बाईंनी क्लचवरचा पाय उचललेला आहे...'डार्लिंग तेरे लिये'...आता एक तरुणी पुढे आली आहे. सलवार खमीज, भुरभुरणारे केस आणि हसरा चेहेरा. बाईंना अधिकाराने हात दाखवण्यात आलेला आहे...'गाल गुलाबी,नैन शराबी रे'....रस्ता पार करायला तरुणीने सुरुवात केलेली आहे. बाईंचा पाय ब्रेकवर आलेला आहे. बाई आता सिग्नलकडे बघत आहेत. इंडिकेटर वेळ दाखवतो...३० सेकंद. हॉर्नचा आवाज शिगेला पोचलेला आहे. सरळ जाणाऱ्या गाड्यांची रांग सूतभर पुढे सरकू शकलेली आहे...cut to...बाईंनी गाडीला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाडी थोडी पुढे आलेली आहे. डावीकडून आता पाचसहा स्त्री पुरुषांचा घोळका सरसावलेला आहे. बाईना थांबण्यास सांगण्यात आलेले आहे. हताश बाईंचा पाय ब्रेकवर आलेला आहे...'तू झेंडू बाम हुई'...बाईंची सिग्नलवर नजर...इंडिकेटर...१० सेकंद...cut to...मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला आत्मविश्वासाने हातगाडी घेऊन सरसावला आहे. रस्ता पार करायची त्याला घाई आहे...इंडिकेटर...३सेकंद...Loud Sound प्यॅ प्यॅ प्यॅ...cut to...आता उजव्या बाजूने गाड्या पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे.सिग्नल लाल...बाई आणि इतर सर्व गाड्या जैसे थे स्थितीत...'आयटम बॉम्ब हुई, डार्लिंग तेरे लिये'...

मधुर भांडारकरांचा 'ट्राफिक सिग्नल' होता सिग्नलपाशी भीक मागणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून...हा शब्दरूपी सिनेमा एका वाहनचालकाच्या दृष्टीकोनातून. पादचाऱ्यांचे गाडीवरील आक्रमण, शब्दांत पकडण्याचा प्रयत्न.

पादचाऱ्यांचा हिरवा सिग्नल तोडून एखादी गाडी निघाली तर शिटी ऐकू येते. परवाना जप्त होतो. दंड बसतो. गाड्यांसाठी हिरवा असताना गाडीला थांबवून पुढे जाणाऱ्या पादाचाऱ्यांना रोखणारा काही नियम?

की अतिक्रमण आपल्या रक्तात शिरले आहे?
कधी गाडीचे माणसावर...
तर कधी माणसाचे गाडीवर!

'है ये दुनिया सब, मेरे लिये...है मेरे लिये!'

Sunday, 3 October 2010

डुप्लिकेट

"डुप्लिकेट करून घ्यायला हवं."
ड्रायव्हिंग परवान्याच्या पत्रावळ्या जवळजवळ वर्षभर सविताने सांभाळल्या होत्या. परंतु आता त्यातील छायाचित्राचे पानच गहाळ झाल्यामुळे त्वरित उपाय करणे गरजेचे झाले होते. एका शनिवारी, वेळात वेळ काढून ती तिच्या जुन्या ड्रायव्हिंग शाळेत पोचली होती. तेथील तरुण कारकुनासमोर तिने त्या पत्रावळ्या मांडल्या होत्या. त्याने छायाचित्राचे पान नसल्याबद्दल तक्रार न करता, मन लावून पत्रावळ्या क्रमवार लावल्या.
सविताने शरमेने विचारलं,"मग काय करायला हवंय मला त्यासाठी?"
त्याने खणातून फॉर्म काढला. तिच्याकडून भरून घेतला. २ फोटो, पत्रावळ्या आणि ६५० रुपये जमा करून घेतले आणि सोमवारी RTO च्या कार्यालात येण्याचे फर्मान काढले. पुढचा महिनाभर तो सोमवार आलाच नाही. तो महिना सविताने परवान्याशिवाय गाडी चालवली. नेहेमीच कसोशीने नियम पाळणाऱ्या सविताचा आणि वाहतूक पोलिसाचा त्या महिनाभरात संबध देखील आला नाही. शेवटी एक दिवस ड्रायव्हिंग शाळेतून फोन आला आणि RTO मधून आता तुमचा फॉर्म रद्दबादल केला जाईल अशी तंबी दिली गेली. मग सोमवार नाही तरी एक शुक्रवार उजाडला.
काळी पिवळी घेऊन RTO ला सविता पोचली तेंव्हा दुपारचे अकरा वाजले होते. वरुणराजाने आमच्या शहरातून आता काढता पाय घेतलेला आहे आणि सूर्यमहाराज विजयोत्सव साजरा करत आहेत. सविताला दूर उभी असलेली, ड्रायव्हिंग शाळेची गाडी दिसली. तिला दिलेल्या सूचनांचे पालन करित ती गाडीपाशी जाऊन उभी राहिली. चढती उन्हं असह्य व्ह्यायच्या थोडं आधी, एक गृहस्थ तिच्या दिशेने येताना तिला दिसले.
"काय काम आहे?"
"डुप्लिकेट करून घ्यायचंय. म्हणून तुमच्या माणसाने इथे तुमच्या गाडीपाशी उभं राहायला सांगितलंय."
"बरोबर. पण आमचे मास्तर इथेच होते इतका वेळ. आताच कुठे गेलेत."
पुढची पंधरा मिनिटे सूर्याचे शरसंधान तिने झेलले. मास्तर आले.
"डुप्लिकेटसाठी आलेय."
"हो. थांबा दोन मिनिटं."
मास्तरांनी नवीन परवान्यासाठी आलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांची उजळणी घेतली व त्यांच्या परीक्षेसाठी त्यांना तयार केलं. मग मास्तर तिच्याकडे वळले.
"चला मॅडम."
मॅडमांना एका खोलीत नेण्यात आलं. तिथे पुढच्या पाच मिनिटांत; फोटो काढणे, डाव्या आंगठ्याचा शिक्का घेणे आणि सही घेणे ही कामे उरकली गेली.
"मॅडम, सोमवारपर्यंत मिळून जाईल तुम्हांला डुप्लिकेट."
सविता सुटकेचा श्वास सोडत तिथून निघाली तेंव्हा साडे बारा झाले होते.

'डुप्लिकेट'या कथेचा पूर्वरित भाग इथे संपला.
उर्वरित भाग, पुढच्या पाचव्या मिनिटाला सुरु होणार होता.

जुन्या टॅक्स्या मोडीत काढण्याच्या आदेशामुळे RTO च्या परिसरात नव्या चकचकीत ताज्या काळ्यापिवळ्या दिसत होत्या.
"टॅक्सी!"
कोरी टॅक्सी सुळकन येऊन सवितासमोर थांबली. आत म्हातारेसे दिसणारे, पांढरी टोपी घातलेले काका ड्रायव्हर सीटवर बसले होते. आत शिरली तेव्हा दिसले, गाडीचे अजून प्लास्टिक देखील निघाले नव्हते.
"काका, नवीन गाडी?"
सविताचे निरीक्षण अचूक होते. काका मराठीच होते.
"हो. आताच रिसीट घेतली आणि पहिलं गिऱ्हाइक म्हणून तुम्ही सवाष्ण मिळालात!"
तरुण सविताच्या पोटात खड्डा पडला. घशात आवंढा आला. सतीविरोधी कायदा नकोसा झाला. कपाटात कडीकुलपात बंद करून ठेवलेलं मंगळसूत्र डोळ्यांसमोर गरकन फिरलं. पाच मिनिटे कोसळलेल्या डोंगराखालून जिवंत बाहेर पडण्यात गेली. काकांचा हात वारंवार हॉर्नवर पडत होता. आणि तो कर्कश आवाज सविताला खोल गर्तेत ढकलून देत होता. "काका, आपण हॉर्न कमी वाजवूया." काका हसले. "ठीक."
पाच मिनिटांच्या स्तब्धतेनंतर सविताने काकांना विचारले,"कोकणातले का तुम्ही?"
"नाही. पुण्याचा. गावी शेतीभाती आहे. घर आहे. चार मुलं आहेत. दोन मुलं. दोन मुली."
"मुलं शिकली?"
"एक मुलगा शेती सांभाळतो. एक भिमाशंकरला कारखान्यात काम करतो."
थोडा वेळ शांतता.
"मुलींची लग्न करून दिली. एका मुलीला दोन मुलं आहेत."
"थकला असाल नाही का काका, संसाराचा भार उचलून?"
"थकलो खरा. पण स्वतःचे पैसे स्वतःच मिळवलेले बरे म्हणून मुंबईत येऊन टॅक्सी चालवतो."
सविताचा हुंकार. मुंबईच्या चिकटलेल्या गर्दीत, टॅक्सी संथ गतीने सरकत होती.
"एक मुलगी तिच्या घरी सुखी आहे. दुसरी परत आलीय."
"काय झालं?"
"नवरा खूप दारू पितो. हिने सोडचिठ्ठी दिली. आणि घरी परत आली."
"केव्हढी आहे?"
"बत्तीस."
"मुलं?"
"नाही. पोरंबाळं नाहीत. मी म्हटलं तिला, तुझं दुसरं लग्न करून देतो. नको म्हणते."
काका नंतर गप्प होते. ऑफिसपर्यंत टॅक्सी पोचली. सविताने पैसे दिले आणि पर्स उचलली.
"मुलगी म्हणते...ओरिजिनल तो ओरिजिनल. आणि डुप्लिकेट तो डुप्लिकेट!"
"अं?"
सविता वर गेली. खुर्चीत जाऊन बसली. पाण्याबरोबर जड आवंढा गिळला.

कोण जाणे, सविता डुप्लिकेट लायसन्स कधी ताब्यात घेईल.

(सत्यकथेवर आधारित)

Saturday, 2 October 2010

आंबेघर

काळी रात्र होती. आणि त्या टेकडीवर अजून वीज चढली नव्हती. बरंच होतं. चांदण्यांना स्पर्धा नव्हती. काळी चंद्रकळा नेसावी आणि आसमंत चमकून उठावा. शंकराच्या डोक्यावरून धरणीकडे धाव घेणारी गंगा असाच खळखळ आवाज करत असेल काय? एक हात उंची असलेल्या आंब्याच्या रोपाला प्रश्न पडला. तसंच असावं. टेकडीवरचा धबधबा अवकाशात जाग राखून होता. चांदण्याच्या प्रकाशात चकाकणारं पाणी. जसा लखलखता रत्नहारच अवकाशातून ओघळावा. वाऱ्याची हलकीच झुळूक रोपाला डोलवत होती. रोपाची नजर राहून राहून थोड्याच अंतरावर असलेल्या त्या वेड्यावाकड्या सामुग्रीवर जात होती. कुदळ, फावडी, घमेली. आणि त्या बाजूला पडलेली रास. विटांची. का कोण जाणे पण त्या सरत्या रात्री रोपाच्या नाजूक देहातून भीतीची लहर गेली. त्या दिवशी भर दुपारी बरीच माणसे टेकडीवर येऊन गेली होती. आणि ही सर्व साधनसामुग्री पाठी सोडून गेली होती. रोपाचं वय कोवळं होतं. नुकतीच मान धरली होती. जनरीत माहिती नव्हती. कशाचीच ओळख नव्हती. काय होणार आता? मावळती चंद्रकोर काय देऊन जाईल? उगवता सूर्य काय घेऊन येईल? वाहत्या खळखळाटात तो सुस्कारा दाबून गेला.
"भय वाटतंय?" दूरवरून घनगंभीर आवाज आला. रोप दचकलं. कोण बोललं? मान उंचावून त्याने पलीकडे बघितलं. पण सगळंच तर जिथल्यातिथे होतं. मग?
"घाबरू नकोस गड्या!"
रोपाचा आवाज अति नाजूक. भीतीने तो हळूच उमटला. "कोण? कोण आहे?"
"अरे मी आहे. जरा समोर बघ पाहू. न घाबरता. तुझ्यासमोर जी रास पडली आहे, त्याच्या सर्वात वर शिखरावर मी आहे."
रोपाने मान अजूनच उंचावली. त्या नीट रचून ठेवलेल्या ढिगाऱ्याच्या माथ्यावर एक होतं खरं काही सर्वात वर. एकटं.
"बरोबर. मीच बोलते आहे तुझ्याशी. वीट. वीट म्हणतात मला."
अजून रोपाच्या तोंडून आवाज फुटत नव्हता.
"इथे आहे काय घाबरण्यासारखं? मला सखी समज."
धबधबा खाली झेपावतच होता.
"खरं तर कालपर्यंत तू एकटाच होतास. आज तर आम्ही आहोत तुझ्या सोबतीला. नाही का?"
वारा हलला. रोप शहारलं.
"पण तुम्ही कोण आहात? का आला आहात?"
"उद्यापासून इथे माणसे येतील. काम सुरु होईल."
"काम? कसलं काम?"
"अरे, इथे घर उभं रहाणार आहे. तुला काहीच माहित नाही?"
रोप फक्त डावीकडून उजवीकडे हललं.
त्या हालचालीने त्याची भीती आसमंतात शिरली. तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयावर जाऊन कोसळली. त्या धबधब्याला, त्या झुळूकीला आणि त्या प्रत्येक विटेला गलबलून आलं. रोप नाजूक होतं. त्याच्या भीतीचं भुयार उघडलं होतं. सगळ्यांना कळून चुकलं. तिथे घर वर येणार होतं. आणि भुईतून नुकतंच वर आलेलं हे इवलसं रोप थरारून गेलं होतं. त्याला नव्हतं कळत, त्याचं काय होणार होतं? काय त्या नवजन्मासाठी त्याला उखडून टाकलं जाणार होतं?
स्तबद्धता खाऊन टाकते. धबधबा देखील कसा नीरव होऊ शकतो? रोपाचं दुःखच तसं होतं. सुन्न करून टाकणारं.
वाऱ्याने सुस्कारा सोडला. इतका की दूरवर पडलेला एक कागद जमीन सोडून तरंगू लागला. छातीत भरलेला प्राणवायू जेव्हा संपला तेव्हा कागद त्या विटेपासून खाली थोड्या उंचीवर दुसऱ्या ढिगाऱ्यावर जाऊन टेकला होता. सखीची सुन्न नजर कागदावर पडली. कागद मोठा होता. हातभार लांबीचा. चांदण्यात दिसत होतं. त्यावरचा आलेख. सखी काही नवशिकी नव्हती. दुनियेतील रितीरिवाज जाणित होती. नजर बारीक केली. तिला कळून चुकलं, ते तिथे होणाऱ्या घराचंच चित्र होतं. वारा खिन्न होऊन पडलाच होता. कागदही हलण्याची चिन्ह नव्हतीच. आता मात्र सखी तो आलेख बारकाईने पाहू लागली. आणि हलकेच तीला हसू आलं. असं काय होतं त्यात?
तो हलका आवाज सगळ्यांच्याच कानी पोचला. रोपाने खाली घातलेली मान वर केली आणि तिच्याकडे नजर टाकली. चेहेऱ्यावर अविश्वास. का सखी आपल्या भीतीला हसली?
विटेने रोपाकडे नजर टाकली. तीला जाणवले. असे अवेळी हसणे कोणालाच नव्हते आवडले.
तरी ते हसू नाहीसं व्हायला तयार नव्हतं. वारा रागावला. त्याने हवेत हात फेकले. आणि कागद पुन्हा भिरभिरला. आता येऊन पडला तो रोपाच्या पायाशी.
वारा पुन्हा गुढघ्यात डोकं खुपसुन कोपऱ्यात जाऊन बसला. तो जग फिरला होता. अनेक पावसाळे बघितले होते. ही मानवाची जात पारखली होती. ते क्रूर आहेत. मोठे मोठे वृक्ष त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत, हे अनुभवी वारा जाणत होता. मग ह्या इवल्याश्या रोपाची काय कथा?
"अरे, त्या कागदाकडे नजर तरी टाका!" वीट म्हणाली.
रोपाने मान फिरवली. त्याच्या आकलनशक्तीच्या ते बाहेरचे होते. .
"नजर नको फिरवू. कागदाकडे बघ. मी तुला समजावून सांगते. बघू काय सांगतोय तो कागद आपल्याला."
रोपाने हताश नजर कागदावर टाकली.
"अरे तो आलेख आहे. जे घर होणार आहे त्याचा."
"मग?"
"आता नीट बघ. काय दिसतंय तुला?" वऱ्यालाची देखील उत्सुकता आता जागृत झाली. तो उठून रोपाच्या दिशेने चालू लागला. पण मग काय झाले? कागदाने भूमी सोडली आणि कुठे भलतीच दिशा पकडली. वीट आता मात्र वैतागली."अरे तू आहे तिथेच बस पाहू! निघाला भिरभिरायला! आणि तो कागद घेऊन ये जा पाहू. दे आपल्या रोपाला परत!" दमटावणीच्या सुराने घाबरून वारा थोडा भिरभिरला आणि त्याने कागद पुन्हा रोपाच्या पायाशी आणून उतरवला. एखादं हेलीकोप्टर हलकेच उतरवावं तसं.
"आता मी काय सांगते आहे ते ऐका. दिसतोय का रे तुला आलेख नीट?"
रोपाने डावीकडून उजवीकडे मान वेळावली. वारा पुढे सरसावला आणि त्याने उलटा पडलेला कागद रोपाला सरळ करून दिला.
"लक्ष देऊन बघ. त्या आलेखात तुला घर आहे ते दिसतंय?" पळभरच्या एकाग्रतेनंतर रोपाला आधीचं धूसर चित्र स्पष्ट दिसू लागलं. त्याने वरखाली मान हलवली.
"छान. आता त्याच्यापाठी तुला काय दिसतंय?"
तिरपी मान करत रोपाने कागदाकडे बघितले. आणि अजिबात हालचाल न करता वाऱ्याने देखील त्यात मान डोकावली.
"काय आहे?"
"काय असावं?"
रोप जरी बाल होतं तरी मंद नव्हतं. "आंब्याचं मोठं झाड आहे काय?"
"अरे असं विचारतोस काय? तो तूच आहेस नाही काय? आणि जरा निरखून बघ. घराकडे बघ त्या. दिसलं का तुला? अरे, त्या घराने तुला तोडून नाही टाकलेलं. उलट तुला त्याने कुशीत घेतलं आहे. बघ जरा. घर कसं तुझ्याभोवती वळसा देऊन गेलंय? आणि तू बघ जरा त्या चित्रात किती बहरला आहेस? सुरेख आंबे देखील लटकत आहेत. नाही का?"
रोपाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता बसत. घर असं असू शकतं? मला कुशीत घेऊन बसू शकतं?
आता मात्र वाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो नाचू लागला कागदाला पाठीवर घेऊन!

पहाटे जेंव्हा गवंडी आणि त्यांचा साहेब तिथे दाखल झाले तेंव्हा ह्या रात्रीच्या गंमतीचा त्यांना काय पत्ता? साहेब तरुण होते. तिशीच्या आसपासचे. हसतमुख. ते रोपाजवळ आले. आणि त्यांनी हलकेच त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. गवड्यांना हाळी देऊन सांगितले," बाबांनो, ह्याला जपायचे बरं का? हाच उद्या ह्या घराची शोभा असणार आहे. त्याला त्याचा मान देऊनच तर मी हे घर रेखाटलं आहे. वेळावलेलं. आंब्याला कुशीत घेऊन सुखावलेलं."

दूरवर वीट, माणसाच्या निर्मितीवर कधी नव्हे ती खुष झाली होती. आणि तिच्या त्या हसण्याला धबधबा आणि वाऱ्याची साथ होती. रोपाला वाऱ्याच्या गुदगुल्या हसवून सोडत होत्या.

का हे गुपित साहेबांना कळलं? ते का हलकेच हसत तिथून निघून गेले?

ही गोष्ट घडली त्याला आता झाली सात आठ वर्ष. पेण गावात एका टेकडीवर धबधब्याशेजारी हे लालबुंद घर आंब्याला कुशीत घेऊन विसावलं आहे. लाडावलेलं हे आंब्याचं झाड मे महिना लागायची खोटी, दीड वीत लांबीच्या मधुर आंब्यांची नुसती उधळण करतं. आंबे बरसातात असंच म्हणा ना!

कधी रात्रीच्या नीरव शांततेत कान देऊन ऐकलंत तर येतील तुम्हांला ह्या चौकडीच्या गप्पा ऐकू!
आंबा, घर, वारा आणि धबधबा!