नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 6 September 2010

प्रेम म्हणजे प्रेम असतं... त्यांचं आपलं सेमच असतं...

त्या दिवशी आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियाचं एक कुटुंब होतं. साठीच्या आसपासचे चटपटीत दिसणारे काका, त्यांच्याहून का कोण जाणे कमीतकमी दहा वर्षांनी मोठ्या वाटणाऱ्या काकी आणि त्यांचा २७/२८ वयोगटात मोडू शकेल असा ताड्माड मुलगा. मराठमोळा म्हणता येईल असाच काहीसा काकींचा पेहेराव होता. कमरेखाली येईल असा पोलका आणि गुढघ्याखाली जाईल असा परकर. ते आस्ट्रेलियन, आम्ही भारतीय, आमची वाटाडी रशियाला चिकटून असलेल्या एका चिमुकल्या गावातील चिनी आणि रस्ता बीजिंग मधला. आम्ही दोघी मायलेकी युवकाबरोबर मागे, त्यापुढे हे काकाकाकी आणि त्याहीपुढ़े चालकाबरोबर चिनीमकाव! दिवसाभरात आल्यासरशी बघता येईल ते पदरी पाडून घ्यावं आणि 'चला, पैसे वसूल' असं म्हणावं असा एक कट्टर भारतीय बाणा मनाशी बाळगून आम्ही प्रवास सुरु केला. कालच भरलेल्या पैश्यांत कायकाय दाखवलं जाणार आहे ह्याची यादी एका चिटोऱ्यावर लिहून घेतली होतीच. वर इंग्लिश मध्ये आणि खाली चिनी भाषेत! उगाच गोंधळ नको!
अकस्मात् काकांनी बॅगेतून कॅमेरा बाहेर काढला आणि त्यावर काहीतरी शोधायला सुरुवात केली. काही मिनिटांत त्यांचा शोध पूर्ण झाला आणि ते मागे वळले. आम्ही त्या छोट्याश्या स्क्रीनवर नजर केन्द्रित केली....आणि बघावं तर एका बाथटबात दहा वर्षापासून ते जेमतेम एक वर्षाच्या बाळापर्यंत १० मुले उभी! एकमेकांना चिकटून, धक्काबुक्की करत! सगळे मुलगे! "Our daughter's kids!" एकुलत्या एक मुलीला वाढवताना दमछाक झालेल्या मी विचारलं,"Ya? How old is she?"
"३२"
हे काय उत्तर झालं? मी लागले ना गणित मांडायला!
भारतीय आजोबा आणि हे आस्ट्रेलियन आजोबा ह्यांच्या भावप्रदर्शनात काडीचाही फरक नव्हता! आपल्याकडे नाही का सगळेच आजी आजोबा आपल्या नातवंडांचे फोटो आल्यागेल्याला, धरून, पकडून, मारून, मुटकून दाखवत असतात? मोठ्या अभिमानाचे तेच भाव काकांच्या चेहेऱ्यावर पसरले होते. बहुतेक आम्ही काही आमचा अविश्वास लपवून ठेवू शकलो नाही. पुढचा फोटो त्यांनी ३२ वर्षांच्या आपल्या कर्तबगार कन्येचा दाखवला. बया दिसत होती खरी तिशीची!

थोड्याच वेळात 'फॉर्बिडन सिटी'त पोचलो. एका ठिकाणी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. काका, काकींसोबत खालीच थांबले आणि आम्ही पायऱ्या चढू लागलो. परत आलो तर चिमुकल्या काकी एका चार फूट कट्ट्यावर बसलेल्या. पोरगा आमच्याबरोबर होता. काकांनी आम्हांला येताना बघितलं आणि बायकोला उतरवायला पुढे सरसावले. तरुण लेक म्हणाला,
" Wait Papa, I'll pick her up."
पण कसले काय! त्याचे मातापिता कसले त्याला ऐकतायत! नवऱ्याने उघडलेल्या दोन्ही हातांत काकींनी जी काही गोड उडी मारली! तिथे जर समुद्र असता आणि आम्ही जिथे उभे होतो ती जर 'Titanic' असती तर मी नक्की सांगते तुम्हांला, पुढच्या क्षणी लिओनार्दो आणि केटची ती गाजलेली रोमँटिक अदा आम्हांला बघायला मिळाली असती! काकांनी अलगद लाडक्या बायकोला धरतीवर उभे केले! मी हळूच मुलाकडे बघितलं. ह्यांचं हे नेहेमीचंच असे भाव घेउन हसत तो तिथून निघाला.
आम्ही दोघी देखिल 'पुढील प्रेक्षणीय' स्थळी निघालो!

Sunday, 5 September 2010

तुझ्याविना...

शाळा संध्याकाळी सुटायची. शाळेच्या बसने घरी आलं, बॅग टाकली की खाली खेळायला धावलं. मग कोणाकोणाची हजेरी लागलीय ते बघावं आणि ज्या सख्या आल्या नसतील त्यांच्या नावाने इमारतीखाली उभं राहून हाळी द्यावी. एक नाही, दोन नाही, अगदी श्वास लागेपर्यंत. (हाळी हा फारच पुस्तकी शब्द झाला. जे काही आम्ही करायचो त्याला बोंबाबोंब हाच शब्द खरं तर योग्य होईल. म्हणजे तुम्हा वाचकांसमोर बरोब्बर चित्र उभे राहील. तुमच्या कानावर ती बोंबही पडेल कदाचित. वेगवेगळ्या काकांकडून आणि वेगवेगळ्या मावश्यांकडून, त्यांचे कान किटवण्यावरून खूप ओरडादेखील खाल्ला. परंतु सुधारणेला जागा नव्हतीच कधी!) तर एव्हढ्या हाका मारून देखील कोणी दाद लागू दिली नाही तर मग दाणदाण आवाज करत जिना चढावं, घंटा वाजवावी आणि घरात प्रवेश मिळवावा. ("अगं, मुलगी ना तू? काय हे तुझं लक्षण?" ओरडल्या खाष्ट काकू! आता मुलगी आणि दाणदाण जिना चढणं, ह्याचा काय संबंध?) मग सखीची तयारी होईस्तोवर मावशींशी गप्पा, तिच्या धाकट्या भावंडांशी थट्टामस्करी आणि त्यावर मावशींनी नुकतीच केलेली गुळपापडीची गरमागरम वडी तळहातावर ठेवली तर अजूनच मजा! मग एकमेकींचे हात घट्ट धरून खाली धाव घ्यावी. सूर्य मावळेस्तोवर धुमाकूळ. सातच्या आत मात्र घरात!

हे आठवायचं कारण? मोबाईल मेला आणि जगाशी संबंध फक्त हे जाळं, घरचा आणि कार्यालयातील टेबलावरचा फोन ह्यावर मर्यादित राहिला. शनिवार-रविवार तर ऑफिसदेखील नाही. ह्या धोक्याची जाणीव शुक्रवारी संध्याकाळी, ऑफिसमधील माझ्या सर्विसिंगच्या कंपूला झाली होती आणि घरच्या फोन क्रमांकाची जोरदार मागणीही झाली. परंतु, "काय माझं डोकं फिरलंय?" असा त्रिवार निषेध जाहीर करून मागणी फेटाळल्याने हक्काची सुट्टी शांततेत गेली.

आज संध्याकाळी मैत्रिणीबरोबर भटकायला बाहेर पडायचे ठरवले. तिच्या घराखाली गाडी लावली आणि लक्षात आले. आज आपल्याकडे मोबाईल नाही. वरती संपर्क कसा साधणार? आणि जर तिला मी खाली आले आहे हे वरती कळलेच नाही तर सखी खाली कशी येणार? तिच्या इमारतीला, तळमजल्यावरून बोंब मारायची काही सोयही ठेवलेली नाही! मग तिच्या पाचव्या मजल्यावर जाऊन घंटा वाजवली आणि तिने हसतमुखाने दार उघडल्यावर हे सगळे मागचे हरवून गेलेले प्रसंग नजरेसमोर आले. गंमत वाटली. तो अनुभव जागा झाला. मग काकाकाकींशी मनसोक्त गप्पा, सोबत झकास कॉफी आणि मग घर सोडणे.

आजचा मला वाटतं चवथा दिवस. पूर्वी परदेशात घेतलेला एक जुना फोन दुरुस्तीच्या कारणास्तव त्याच्या मायदेशी परत पाठवला होता. तो मुंबईत शुक्रवारीच दाखल झालेला आहे. तब्येतपाणी सगळे एकदम ठीकठाक आहे अशी बातमी कानी आली आहे. परंतु ज्यांच्या बॅगेतून आगमन झाले आहे त्यांचा मुंबईतील दूरध्वनी क्रमांक माझ्या माहितीत नसल्याने (किंवा असला तरी देखील तो त्या मृत फोनच्या पुस्तकातच असण्याची शक्यता असल्याकारणाने) आता ते मित्रवर्य जेंव्हा फोन करतील तेंव्हाच त्या परदेशी फोनची घरी परतण्याची संभावना आहे! आणि तो, म्हणजे 'तो फोन' परतण्याची शक्यता असताना घाईघाईत दुसऱ्याला आणून उभं करणे म्हणजे प्रतारणाच झाली की हो! वाट बघण्यापलीकडे आता हातात काही नाही!

धीर धरी...धीरापोटी फळे गोमटी!

जाब

सगळ्याचा हिशोब....
मांडावा लागतो.
सगळ्यालाच उत्तर.
द्यावं लागतं.
एकदा एक मैत्रीण जेवायला आली. मी पावभाजी केली. तिने मला पद्धत विचारली.
टोमॅटो, बटाटा...मी सुरुवात केली.
"नाही! आलं किती इंची..लसणाच्या पाकळ्या किती...मोजमाप सांग."
आली का पंचाईत? मोजमाप तर मला येतंच नाही.
समोर काय वाढून ठेवलंय ते बघावं आणि गोडतिखटाचं माप ठरवावं.

आता ह्यांना प्रश्न पडतो.
"रडत का नाहीस?"
"बोलत का नाहीस?"
"You are very optimistic!"

मला तर काही कळत नाही.
असं काही मी ठरवलं नाही.
असा हिशोब मला मांडताच येत नाही.
असं मोजमाप मला करताच येत नाही.

त्याला तरी जमलंय का हे गणित?
किती इंची दुःख?
किती पाकळ्या सुख?
सगळीच तर ह्याची भेसळ!
थोडं चुकलेलं. थोडं बरोबर.
कोणाचंच नशीब 'परफेक्ट' नाही.
कोणाचंच साफ चुकलेलं नाही!
सगळाच ह्याचा 'जेमतेम' कारभार.

म्हणतेस,"अशी न बोलता राहू कशी शकतेस? सांग मला कोणाशी बोलतेस?"

म्हणतात, "माणसाने स्वतःशी मैत्री करावी. म्हणजे मग कोणाची गरज लागत नाही!"

लहानपणी फुटक्या बांगड्यांचा खेळ आम्ही खेळायचो.
रंगीबेरंगी तुकडे फेकावे...आणि मग एक एक करून वेचावे.
वेचताना दुसऱ्याला कणभरही धक्का पोचता कामा नये.
खेळाचा दुष्ट नियम.

तोच तर खेळ चाललाय माझा...
बेरंगी काचा तुझ्या आयुष्यातून वेचायचा...
त्यांचा स्पर्श तुला होऊ न देण्याचा.

Saturday, 4 September 2010

स्वप्न

वय वर्ष बहुतेक १२-१3.
गादी घालावी आणि दिवसभराच्या दंगामस्तीने थकूनभागून झोपून जावं. स्वप्ननगरीत पऱ्यांशी भेट व्हावी. त्यांच्याबरोबर उडावं. बागडावं.
पण नाही! माझ्या स्वप्नात रोज माझं कोण ना कोण तरी मरायचं!! धाकट्या बहिणींपैकी कोणी एक नाहीतर माझे बाबा!
रोज!! नेमाने!! नुसता छळ मांडला ह्या भुतांनी माझा. जरा गाढ झोप लागायची खोटी की झालं...धाकटी बहिण नाहीतर बाबा एकदम ऑक्सिजनवरच दिसायचे! जोरदार भोकाड! सगळ्यांची झोपमोड. मग बाबा जवळ घ्यायचे आणि थोपटवत मला शांत करत झोपवायचे! बराच वेळ म्हणे माझे हुंदके चालू असत.
तर एक दिवस रात्रीची ती रोजची वेळ आली...माझी बहिण ऑक्सिजनवर ठेवली गेली! मी दचकून जागी झाले. नेहेमीच्या सवयीने हंबरडा फोडला. जाऊन बहिणीला मिठी मारली! ती रोजच्या ह्या कटकटीने इतकी वैतागली होती कि मी तिला मिठी मारायची खोटी, तिने एकदम लाथा झाडायला सुरुवात केली!! बाबा धावले आणि मला त्या लत्ताप्रहारापासून दूर करून जवळ झोपवलं.

त्यानंतर मात्र माझ्या हुशार बाबांनी एक उपाययोजना आखली. त्यांच्याकडे एक दुमडता येणारा चाकू होता. तो त्यांनी माझ्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली. म्हणाले,"आता बघ. तुला अजिबात वाईट स्वप्न पडणार नाहीत! दुष्ट शक्ती आल्याच तर ह्या चाकूला बघून पळून जातील." कोकणातील तो म्हणे जालीम उपाय आहे! रोज मी अगदी नित्यनेमाने तो चाकू उशीखाली ठेवून निश्चिंत मनाने झोपी जायला सुरुवात केली.
आणि काय सांगावं? ती दुःस्वप्न कुठे पळून गेली ती आजतागायत नाही फिरकली! बाबांच्या जादुई चाकूला सगळी भूतं घाबरली!

पुढील कालावधीत एक घडलं....
एक दुःस्वप्न सत्यात उतरलं...

जाहीर कबुली

तो पाण्यात पडला आणि त्याने ना पडताना, ना पडल्यावर मला कळवले. म्हणजे ती आत्महत्याच होती असे म्हणता येईल. आत्महत्येचे कारण काय? कोण जाणे. काही लेखी लिहून ठेवेलेले मिळालेले नाही. म्हणजे मग खुनाची शंका मनात येतेच. परंतु, त्याच्या संपर्कात शेवटी मीच होते. आणि खून करण्याची माझी प्रवृत्ती आधीतरी कधी दिसून आलेली नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर प्रवृत्ती आहे असा दावा करता येईल. कारण आधी घडलेल्या तीन घटना त्याचीच ग्वाही देतात. परंतु ह्यावेळी घटनेची तीव्रता अधिक असल्याने खुनाचा नुस्ता प्रयत्न न रहाता त्याचा मृत्यूच ओढवलेला आहे. आणि त्यामुळे ह्या खुनाची जगभर चर्चा चालू आहे. तरीदेखील अटक संभावत नाही. कारण इतकेच की त्याला पुन्हा जीवनदान देण्याचा मी तितकाच मनापासून प्रयत्न देखील केलेला आहे. आणि त्या प्रयत्नांना साक्षीदार देखील उपस्थित होते. उलट मी त्यांना समोर ठेवूनच जोरदार प्रयत्न केलेले होते. आता त्या प्रयत्नांना यश मिळू नये ही प्रभूची इच्छा. त्याला मी कशी जबाबदार?
तरी देखील ही अपराधीपणाची बोच बाजूला ठेवून आणि जनहित मनाशी धरून त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याअगोदर त्याच्या मेंदूतील माहिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवण्याचा मी अखेरचा प्रयत्न लवकरच करणार आहे. परंतु त्यातही किती यश येईल हे पुन्हा त्या प्रभूवरच अवलंबून. मी माझा निष्पापपणा सिद्ध करण्यासाठी ह्याचा मृत्यू झाल्याझाल्या लगेच त्याची जागा दुसऱ्या कोणालाही घेऊ दिलेली नाही. उगाच न्यायदेवतेला शंका नको की, मी हे सगळे अतिशय पद्धतशीररीत्या आखणी करून केले. आता जागा घेण्यासाठी नवीन कोणी आणण्याइतकी माझी आर्थिक परिस्थितीच नाही ही बाब अलाहिदा. पण प्रयत्न चालू आहे. त्याच्या नसण्याने माझ्याव्यतिरिक्त बाकी जगाचेच अधिक नुकसान झाले आहे हे आता मला जरा उशिरा कळले आहे. त्यामुळे पुढच्या खेपेस असे काही करण्याआधी सर्व जगाला आधी कळवण्याची तसदी मी नक्कीच घेईन. म्हणजे माझ्या ब्लॉगवर माझे हे असे आत्मघातकी विचार मी टाकेन किंवा फेसबुकवर माझ्या स्टेटस मध्ये देखील मी जगजाहीर करेन. पण ह्या खेपेला मी असे काही केले नाही ह्याबद्दल क्षमस्व.

अहो, काय? मनात कसली शंका आणताय?? माझा मोबाईल फोन कमोडमध्ये पडला आणि मी त्यावर फ्लश करून त्याला त्या अर्धमेल्या अवथेत कमीतकमी १५ मिनिटे तरंगत ठेवून दिले. ह्याला कारण इतकेच की तो पडलेला मला कळलेच नाही! आणि मग त्याने फक्त १ दिवस तग धरला आणि मग परवा त्याने अखेर जगाचा निरोप घेतलेला आहे.

तुम्हांला काय वाटलं?
कमालच करता हो तुम्ही!
;)

Friday, 3 September 2010

बायको बघून घेईल

सकाळी सकाळी माझा एक मित्र मरणाच्या गोष्टी करत होता.
म्हटलं,"अरे, तुझ्या लेकाचं काय होईल?"
म्हणे,"बायको बघून घेईल!"
खरं आहे...बायको बघून घेईल.

आम्ही बायका नाही असा विचार करू शकत....
"मी मेले तर काय झालं? नवरा बघून घेईल!"

दुष्काळ

मला कळत नाही,
पाणी का येत नाही?

कोरडी जमीन
कोरडं आकाश
कोरड्या समुद्रात
नाव अडकली

मला कळत नाही,
पाणी का येत नाही?

आठवतं.
त्या स्मशान धगीत
तुझ्यावर रचलं मी माझं हृदय,
अस्थी तुझ्या लागल्या हाती
पण माझ्या हृदयाची राखही न मिळावी?

कळतं...
डोळ्यात माझ्या पाणी का येत नाही...