नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 14 April 2014

वस्तू...?

सगळ्या पुरुषांना एकाच रांगेत बसवणे हे एखाद्या सज्जन पुरुषासाठी अन्यायकारक ठरेल. आणि असे काही करणे हे चुकीचेच. मात्र आपल्या नेहेमीच्या उठबशीतील एखादा मित्र जेव्हा विचित्र काही बोलून जातो तेव्हा आपण व्यवसायानिमित्त का होईना परंतु चुकीच्या पुरुषाच्या सहवासात असतो ह्याची जाणीव होते.

घडला तो प्रसंग असा…

"ही ह्याची ह्याची 'माल' होती." मी माझ्या कथित मित्राच्या बाजूला उभी होते व त्याच्या संगणकावर असलेली एका मॉडेलची छबी बघून कौतुक करत होते.
"त्याचा काय संबंध ?"
"नाही…सांगतोय. तिचे संबंध होते त्याच्याबरोबर."
"गरज नाही सांगण्याची. असतील संबंध…पण त्याच्याशी तुमचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीला तुम्ही 'माल' म्हणताय हेच फार चुकीचे आहे !" माझा चढा आवाज आजूबाजूला बसलेल्या इतर पुरुषवर्गाने ऐकला हे नक्की.
"हो काय ? बरं." चूक मनापासून मान्य नसताना समोरच्याला फक्त गप्प करण्यासाठी उडवाउडवी केलेली असली की ती त्रासदायक होते.

ज्याला मित्र म्हणत होतो, त्याच्याकडून जे शब्द उच्चारले गेले त्यातून त्याचा एक घातक कंगोरा माझ्या नजरेसमोर आला. आपण हातात कलायडीस्कोप फिरवत असू आणि अचानक आत गोलगोल फिरणाऱ्या वर्तुळावर एखादा राक्षसी चेहेरा समोर यावा आणि आपण दचकुन जावं…असं काहीसं.

एखाद्या पुरुषावर संस्कारांचे बंधन असल्यास हा विचार त्याच्या मनोसरोवरात वर तरंगताना फारसा दिसत नाही. परंतु, संधी मिळताच वर उसळी मारतो हे नक्की. आणि त्यातून एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रीचा 'माल' असा उल्लेख असभ्य. मग अगदी ती स्त्री कोणत्याही कारणाने देहविक्रय करीत असली तरीही तिला 'माल' म्हणणे हे सद्गृहस्थाचे लक्षण नव्हे.

बलात्कार करणाऱ्याचे, त्याच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या स्त्रीवरचे भीषण अत्याचार वाचले, की हे हिंस्त्र श्वापद पुरुषामध्ये दडलेले असते व संधी मिळताच उफाळून वर येऊ शकते अशी भीती का वाटू नये ?

त्याहून अधिक म्हणजे हिंस्त्र श्वापदाची अशा प्रकारची झडप ही फक्त एक चूक म्हणून लक्षात घेतली जावी असे आपले नेते देखील उदार मनाने आपल्या भाषणात बोलू लागतात तेव्हा त्यांच्या दडलेल्या श्वापदाने अशाच प्रकारे उसळ्या मारून किती हल्ले केले असतील की काय असे वाटू लागते.


7 comments:

गौरी said...

अनघाताई अगदी खरे लिहिले अहेस. स्त्रियांना objectify करणे आपल्याकडे अगदी सर्रास चालते आणि बरेचदा अनेक स्त्रियांना देखील त्यात वावगे असे काहीच वाटत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकता आणि शोभा कपूर नावाच्या स्त्री निर्मात्यांच्या सिनेमात दाखविण्यात येणारी आणि खतपाणी घालणारी स्त्रियांबद्दलची पुरुषी मानसिकता. अश्या वेळी मुग गिळून गप्प बसण्याऐवजी विरोध प्रकट करणेच अधिक योग्य, समोरच त्याला किती seriously घेतो यापेक्षा आपण मूक संमत दर्शवत नाही हे समाधान जास्त महत्वाच…

सारिका said...

kharach aahe he anaghatai....mandani sadhi aani uttam..!!

Shriraj said...

Tula maza bolna thoda nirashjanak vatel... pan purushancha ha svabhav mitavun takne thode kathinach vatte, karan jar jungle sodlyanantar itkya kalane hi kahi purush tasech vagat astil tar lagech tyanchyat (mhanje amchyat) kahi farak padel hi sambhavna kamich vatte. Arthat mhanunach "virodh" karne, he atyavashyak ahe.

Anagha said...

गौरी, अगदी बरोबर. आपल्यासमोर काही चुकीचे घडत असताना त्यावर आपला विरोध प्रगट न करणे म्हणजे नकळत का होईना त्याला मूक संमती दिल्यासारखेच आहे.
प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

Anagha said...

सारिका, धन्यवाद गं. :)

Anagha said...

श्रीराज, खरंय तुझं म्हणणं. निराशाजनक नाही वाटले मला. ह्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे मला. मात्र निदान आपण ज्यांना आपले मित्र म्हणतो, त्यांना देखील विरोध करायचा नाही… मग बदल घडवून आणण्यासाठी आपल्या परीने नक्की कसा आणि कुठे प्रयत्न करणार आहोत ? नाही का ? तेव्हा आपण आपले प्रयत्न करीत राहायचे. :)

Trupti said...

अगदी खरे..आणि जेव्हा असा माणूस रोजच्या संपर्कात येणारा असेल तर त्रासदायकच होते..असा अनुभव सध्या येतोय मला..पण असो.
बाकी लिहिलेस बेस:)