नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 19 April 2014

झिम्मा

परवा वाचनालयात गेले दिवाळी मासिक परत करायला. तेव्हा दूर नजरेसमोर 'झिम्मा' मोठ्या दिमाखात उभे दिसले. विजयाबाई मेहता ह्यांचे आत्मकथन ! माझी वर्गणी ही फक्त दिवाळी मासिकांसाठी असल्याने मला हे पुस्तक हातात मिळणार नाही हे नक्की. तरी म्हटलं विचारून बघू. समोर बसलेल्या बाईंनी मान वर देखील न करता नकारार्थी मान हलवली तेव्हा मी जरा खट्टूच झाले. मात्र कधीकधी एखाद्या पुस्तकाचीच इच्छा असते बहुधा ! त्यामुळे त्याच दिवशी संध्याकाळी मैत्रिणीच्या घरी गेले बऱ्याच दिवसांनी निवांत गप्पा मारायला तर काका म्हणाले, "आहे तर ! माझ्याकडे आहे झिम्मा !" लगेच मी ते ताब्यात घेऊन टाकले ! आणि मग पुढले आठ दहा दिवस फक्त झिम्मा !

आता हे काही झिम्माचे परीक्षण नव्हे. कारण तितकी माझी कुवत नाही. फुका कशाला आव आणावा ? मात्र मी खूप शिकले ह्या पुस्तकातून. जसं सारेगम कार्यक्रमामध्ये जेव्हा हृदयनाथ मंगेशकर एखाद्या चालीविषयी बोलत तेव्हा, कित्येक वर्ष अगदी मान डोलावत ऐकलेले गाणे मी नव्यानेच ऐकू लागले. जसं मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मी आणि माझी लेक मोठ्या आवडीने बघत असू त्यावेळी, विविध देशांतील पदार्थ आपल्या समोर जेव्हा आणून ठेवले जातात, तेव्हापासून तो अगदी जीभ ते पोट हा प्रवास करेस्तोवर त्याकडे नक्की कसे बघावे, त्यातून आनंद कसा घ्यावा हे मी शिकले. तसंच अगदी तस्सच एखादे नाटक आपल्यासमोर जेव्हा उभे रहाते…आणि आपण मारे थाटात बसून ते बघतो त्यावेळी त्यातील प्रत्येक हालचालीमागे जो विचार आहे तो आता माझ्यासमोर पोचू लागला ! 

मध्यंतरी पृथ्वी थिएटरमध्ये गुलाजारांचे एक नाटक बघण्यात आले होते. आधीच पृथ्वीच्या अर्धवर्तुळाकार बैठकीत बसून एखादे नाटक बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्यातून जे काही त्या दिवशी नजरेसमोर घडले ते अकल्पनीय होते. संगीत, अभिनय, प्रत्येक कलावंताची एकेक हालचाल. डोळ्यात अक्षरश: पाणी. ते तेव्हा का उभे राहिले ह्याची समज मला आज आली.

अगदी बालपणापासून अंगात असलेली बाईंची अभ्यासू वृत्ती. पानोपानी त्याचा प्रत्यय येतो. आणि पानोपानी मी स्वत:कडे बघत होते. काय आमच्या घरात अभ्यासू वातावरण नव्हते ? होते. प्रचंड होते. पुस्तकांनी मागील भिंती हळूहळू दिसेनाश्या होत होत्या. बाबांशी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी येणाऱ्या मंडळीची संख्या वाढती होती. आबालवृद्ध…सगळेच. मग मी ह्या ज्ञानगंगेत राहून कोरडी कशी राहिले ? दुर्दैव. काही असामान्य हातून घडण्यासाठी जी दृष्टी लागते, जी वृत्ती लागते तिचा अभाव. आणि त्यातून वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेमात पडल्यावर तर वाटलं की हेच आयुष्य. म्हणजे प्रेमबीम…संसारबिंवसार…मुलंबिलं ! कर्म माझं ! बाईंनी संसार केला…मुलं वाढवली. मात्र आपली अभ्यासाची ओढ…तिच्याशी फारकत आजतागायत घेतली नाही. आपली आई, आपल्या पहिल्या सासूबाई दुर्गा खोटे. आपल्या दुसऱ्या सासूबाई, नवरे ह्या सगळ्याच्या पाठींब्यामुळे आपण हे सर्व करू शकलो ह्याची जाणीव त्यांच्या लिखाणातून दिसतेच. पाठींबा त्यांच्या मंडळींचा आणि जोम स्व:शक्तीचा.

माझ्या आयुष्यात त्यांचे एकही नाटक मी पाहिलेले नाही. म्हणजे मी अगदी लहान होते त्यावेळी त्यांची नाटके वाहवा मिळवत होती. आणि त्या काळी काही रेकॉडिंग करून जतन करण्याची प्रथा नव्हतीच. त्यामुळे आपल्यापर्यंत त्यांचे कर्तुत्व तसे काही पोहोचत नाहीच. मात्र त्यांनी त्यांच्या शब्दांतून जे आपल्यासमोर जे नाट्य उभं केलं आहे ते मला तरी फार मोहवून गेलं.

आयुष्य जगताना  संकटं आणि अडचणी कोणासमोर उभी रहात नाहीत ? सतत काहीनाकाही कामाने स्वत:ला वेढून घेण्याची वृत्ती…आणि त्यातूनच आलेल्या संकटाला मागे टाकून पार पुढे निघून जाण्याची शक्ती. रोजच्या आयुष्यात देखील कितीतरी आहे त्यांच्याकडून घेण्यासारखं.

मी विचार केला होता…किंवा केला आहे…त्यांच्या एखाद्या कार्यशाळेत सहभागी होण्याचा. कॉलेजमध्ये असताना माझ्या बाबांनी मला नाटकात काम करण्याला अनुमती तर दिलीच नसती. ही तर काळ्या दगडावरची रेघ. मग काय मी आता नाटकात काम ?  छ्या ! ते आपले क्षेत्र नव्हे. परंतु विजया मेहता बाईंसोबत, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत जर मला काही दिवस काढता आले तर का नाही ? ती वृत्ती, तो अभ्यासू बाणा जवळून अनुभवता आला, त्यातला एखादा कण टिपता आला तर, का नाही ?

झिम्माची कमलाकर नाडकर्णी ह्यांनी केलेली समीक्षा. मला फार पटली आहे असे नव्हे. उलट त्यांना ज्या त्रुटी वाटल्या त्या मला जमेच्या बाजू वाटल्या ! असो. इथे लिंक दिली आहे, जेणेकरून झिम्मावर तुम्हाला समीक्षा स्वरूप काही वाचावेसे वाटले तर तुमच्या हाताशी असावे.
नाही का ?


Monday, 14 April 2014

वस्तू...?

सगळ्या पुरुषांना एकाच रांगेत बसवणे हे एखाद्या सज्जन पुरुषासाठी अन्यायकारक ठरेल. आणि असे काही करणे हे चुकीचेच. मात्र आपल्या नेहेमीच्या उठबशीतील एखादा मित्र जेव्हा विचित्र काही बोलून जातो तेव्हा आपण व्यवसायानिमित्त का होईना परंतु चुकीच्या पुरुषाच्या सहवासात असतो ह्याची जाणीव होते.

घडला तो प्रसंग असा…

"ही ह्याची ह्याची 'माल' होती." मी माझ्या कथित मित्राच्या बाजूला उभी होते व त्याच्या संगणकावर असलेली एका मॉडेलची छबी बघून कौतुक करत होते.
"त्याचा काय संबंध ?"
"नाही…सांगतोय. तिचे संबंध होते त्याच्याबरोबर."
"गरज नाही सांगण्याची. असतील संबंध…पण त्याच्याशी तुमचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीला तुम्ही 'माल' म्हणताय हेच फार चुकीचे आहे !" माझा चढा आवाज आजूबाजूला बसलेल्या इतर पुरुषवर्गाने ऐकला हे नक्की.
"हो काय ? बरं." चूक मनापासून मान्य नसताना समोरच्याला फक्त गप्प करण्यासाठी उडवाउडवी केलेली असली की ती त्रासदायक होते.

ज्याला मित्र म्हणत होतो, त्याच्याकडून जे शब्द उच्चारले गेले त्यातून त्याचा एक घातक कंगोरा माझ्या नजरेसमोर आला. आपण हातात कलायडीस्कोप फिरवत असू आणि अचानक आत गोलगोल फिरणाऱ्या वर्तुळावर एखादा राक्षसी चेहेरा समोर यावा आणि आपण दचकुन जावं…असं काहीसं.

एखाद्या पुरुषावर संस्कारांचे बंधन असल्यास हा विचार त्याच्या मनोसरोवरात वर तरंगताना फारसा दिसत नाही. परंतु, संधी मिळताच वर उसळी मारतो हे नक्की. आणि त्यातून एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रीचा 'माल' असा उल्लेख असभ्य. मग अगदी ती स्त्री कोणत्याही कारणाने देहविक्रय करीत असली तरीही तिला 'माल' म्हणणे हे सद्गृहस्थाचे लक्षण नव्हे.

बलात्कार करणाऱ्याचे, त्याच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या स्त्रीवरचे भीषण अत्याचार वाचले, की हे हिंस्त्र श्वापद पुरुषामध्ये दडलेले असते व संधी मिळताच उफाळून वर येऊ शकते अशी भीती का वाटू नये ?

त्याहून अधिक म्हणजे हिंस्त्र श्वापदाची अशा प्रकारची झडप ही फक्त एक चूक म्हणून लक्षात घेतली जावी असे आपले नेते देखील उदार मनाने आपल्या भाषणात बोलू लागतात तेव्हा त्यांच्या दडलेल्या श्वापदाने अशाच प्रकारे उसळ्या मारून किती हल्ले केले असतील की काय असे वाटू लागते.


Friday, 4 April 2014

चित्र...

एखादं चित्र मनात घर करून रहातं.
पुन्हा पुन्हा नजरेसमोर तरळत रहातं.
जणू संथ वहाणाऱ्या पाण्यावर तरंगणारं पान.
कधी नजरेला पडतं तर कधी हलकेच पाण्याखाली लपून बसतं.

तसंच एक चित्र का कोण जाणे पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात दडून बसलं आहे. 

त्यादिवशी मी रत्नागिरीत होते. काही तास फक्त थांबायचं होतं व परतीच्या रस्त्याला लागायचं होतं. मी हॉटेलच्या खोलीमधील खिडकी उघडली. खिडकीबाहेर आपल्याच नादात डोलणारी आंब्याची डहाळी नजरेस पडली. आणि तिच्यावर झोका घेणारी कोकिळा !

काही गोष्टी मला वाटतं आपल्या रक्तात वहात असतात. दडून. 
आपल्याच रक्तात वहाणाऱ्या गोष्टींचा आपल्यालाच थांगपत्ता नसतो.

मलाही बाबांच्या गावी घर हवं.
लालचुटूक कौलारू घर.
त्याला जावं तिथे खिडक्या हव्यात.
समोर आंब्याचं झाड हवं.
आंब्याचं झाड मला सतत दिसायला हवं.
आणि आंब्याच्या झाडाला देखील सतत नजरेला मी पडायला हवी.
आम्ही दोघे सखेसोबती.
झाडावर कोकिळा हवी.
पानांची सळसळ. 
जोडीला तिने जोडीदाराला घातलेली साद...

… मात्र तिच्या सादेला प्रतिसाद मिळावा !