नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 26 January 2014

माझा सोनचाफा...

परवा खारमधील एका रस्त्यावरून जात होते. अर्थात माझ्या आयुष्याप्रमाणेच माझ्या चारचाकीची चालक देखील मीच. त्यामुळे आजूबाजूचे फार काही न्याहाळता येत नाही. मात्र अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या नजरेत येतातच. असंख्य तारकांनी भरलेल्या आकाशाकडे जेव्हा आपण बघतो, त्यावेळी नाही का त्या गर्दीत देखील एखादा तारा 'मी मी ' करीत आपले बोट उंचावीत असतोच. तसाच तो वृक्ष होता. टपोऱ्या फिकट जांभळ्या फुलांनी बहरलेला. त्याचं नाव ? कोण जाणे. ह्या विषयावरचे माझे ज्ञान अगाधच. जसे माझे नाव त्याला माहित नव्हते तसेच त्याचे नाव मला माहित नव्हते. मुंबईतील रस्ते आपल्याला त्यांच्या अंगावर एकही क्षण थांबू देत नाहीत. त्यामुळे मीही क्षणात तिथून हाकलले गेले. मात्र त्याने काहीच बिघडले नाही. कारण काही फुटांच्या अंतरावर त्या वृक्षाचे बंधुराज त्याच रंगाचे लोंबते अलंकार घालून मिरवत उभे होते. भारीच. सुंदर.

काल मी त्याच रस्त्यावरून घराच्या दिशने परतत होते. तर पुन्हा डाव्या हाताला ह्याचा तिसरा बंधू ! आणि ह्याचे काही वेगळेच प्रताप. अंगावर फिकट जांभळे अलंकार होतेच. मात्र घे बाबा, तू नको नाराज होऊस असे म्हणून त्याने पदपथावर अक्षरश: जांभळा गालिचा पसरला होता ! अतिशय सुंदर ! म्हणजे मी जर 'बंपर टू बंपर' गाडी चालवत नसते तर खरं तर गाडी आहे तशीच सोडून खाली उतरायला हवं होतं ! अंगावर फुलं झेलायला ! पण मग मी उभी कुठे राहिले असते ? कारण एका इंचाची देखील जागा त्या वृक्षाने मोकळी सोडली नव्हती ! आणि मी थोडीच त्या नाजूक फुलांवर पाय देऊन उभी राहू शकले असते ?!
अशक्य !

मला माझ्या पेणमधील अंगणातील सोनचाफ्याची आठवण झाली.
सरळसोट आकाशाकडे माझा सोनचाफा मान उंचावत निघून गेला आहे. गेली पाच वर्ष. त्या हिरव्या झाडावर मात्र एकही चाफा उगवला नाही. आजतागायत.
खाली पसरलेली लाल माती, वरून पडणाऱ्या सुगंधी वर्षावाची वाट पहात राहिली.
तिच्या बरोबर मीही.
माझ्या ह्या झाडाने फुलं दिली नाहीत…
पण मी कधी म्हटलं की, माझ्या अंगणात फक्त दात्याला स्थान आहे ?
बऱ्याचदा मी त्याला मिठी मारते…त्याच्या जवळ गेलं की मला वाटतेच त्याला मिठी मारावीशी.
कोण जाणे का मला दु:खाची साद ऐकू येते.
मध्यंतरी धुंवाधार पावसाच्या वेड्यावाकड्या झपाट्यात, माझा रोज नाजूक फुलणारा पारिजात उन्मळून पडला.
त्याच्या शेजारीच हा सोनचाफा.
त्या पावसाचा मारा ह्याने सोसला.
सोसतो.
तो आयुष्यातून उन्मळत नाही.
मीही.

6 comments:

Trupti said...

loved it!love you :)

Anagha said...

छानच वाटलं मला ! तुझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया वाचून !!!!! :) आभार मानत नाहीये !:)

Abhishek said...

खोल खोल...! :) ... शांत, मऊ, घनदाट, नितळ.... अशा विहिरीशेजारी बसल्यासारख वाटल (तळ्याकाठी का नाही, माहित नाही!)

विषयांतर -
खोल ... गहिरे अथवा उघड... :) शब्द शब्द, अर्थ अर्थ!

सौरभ said...

kya baat hai... asa fulanni lagadlela zaad nusta baghun pan bara vatta :D

हेरंब said...

अप्रतिम !

Gouri said...

आज वाचलं मी हे! सुं द र!
ते जांभळं झाड जॅकरांडाचं का ग?
एकदम "चाफा खंत करी काही केल्या फुलेना ..." का? पण सोनचाफ्याला आपण बोललेलं, न बोललेलं सगळं समजतं बरं! :)