समुद्रामध्ये
लांबसडक अवाढव्य आकाराच्या पायपातून गलिच्छ हिरवंपिवळं पाणी भसाभसा बाहेर
पडावं तसा हिरवा सिग्नल लागताच रंगीबेरंगी गाड्या बदबदत धावू लागल्या. माझी
गाडी उजव्या हाताला वळली तेव्हा रस्त्याच्या कडेला असंख्य हिरवे अवयव पडले
होते. त्यांचा एक वेडावाकडा डोंगरच तयार झाला होता. बाजूला उभी असलेल्या
गाडीत ते तुटकेफुटके अवयव भरले जात होते. गाडी भरली की तिथून निघणार होती
आणि मग कुठेतरी मुंबईच्या बाहेर ती रिकामी केली जाणार होती. पदपथावर
तुटकंमुटकं झाड मान खाली घालून उभं होतं तेव्हा ते जखमी आणि हताश दिसत
होतं. त्याच्या खांद्यावरून, मांडीतून जर रक्त वाहू लागलं असतं तर मुंबईला
२००७ च्या प्रलयाचीच आठवण झाली असती. मात्र रक्ताळलेला प्रलय.
रस्त्यावर सगळेच गांधारी असतात. इच्छा असती तर जग दिसू शकतं, परिस्थिती बदलता येते. मात्र गांधारीची इच्छा तशी कधीच नव्हती. आंधळा नवरा माथी मारला म्हणून मातापित्याला शिक्षा. तसे हे आमचे मुंबईकर. इच्छा असती तर उघड्या डोळ्यांनी बघता आले असते. पण पट्टीच बांधली की बरं असतं. एका प्रवाहात वहात जाता येतं. आंधळेपणाची जमेची बाजू.
तर गांधाऱ्या पळून गेल्या.
जेव्हा पहाट झाली तेव्हा त्या झाडाला कुठे माहित होतं…डोक्याची, हातांची ही शेवटची पहाट. वहाणाऱ्या वाऱ्याबरोबर शेवटचा खेळ. ते अखेरचे डोलणे, ते शेवटचे धुसमुसणे. चिवचिव करीत चिमण्या उडून गेल्या तेव्हा काय त्यांना माहित होते….सूर्य मावळेल...आपण परतू, त्यावेळी आपले घरटे तर सोडाच पण आपल्या पायाखालचे सर्वच नष्ट झाले असेल ?

ह्या सगळ्यात एक बरं आहे म्हणायचं. झाडाला पुन्हा अवयव फुटतील. पाय शाबूत तर बाकी सगळे पुन्हा त्याच्या धडातून बाहेर पडू लागतील.
इतके भाग्य मोनिका मोरेचे कुठले ?
जन्म माणसाचा.
नियतीने हात कापले तरी मानवजातीला त्याच्या धडावर पुन्हा काही हातपाय उगवीत नाहीत !
नियतीने हात कापले तरी मानवजातीला त्याच्या धडावर पुन्हा काही हातपाय उगवीत नाहीत !
आता त्या नशिबाला कोण काय करणार ?
अख्खी मानवजात गांधारी.