नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 9 October 2013

माझा गणपती

गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे आम गणपतींचं दर्शन घ्यायला मी जात नाही. कारण एखाद्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो, तेथील भक्त गणतीमध्ये आपण एक आकडा वाढवला तर त्याचा अर्थ त्या गणपतीचे भक्त ज्या विचारांनी उत्सव साजरा करितात त्याला आपला पाठींबा आहे असा होतो. मी नसत्या फंदात पडत नाही. ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की 'मी' न गेल्याने सार्वजनिक मंडळांना काही फरक पडतो. पण प्रश्न मला रात्री शांत झोप लागण्याचा असतो. आणि मला झोपायला फार म्हणजे फारच आवडतं. इतकं की लहानपणी मी झोपून कित्येक तासांनी उठले की मला पत्ता नसायचा…तोच दिवस आहे की रात्र उलटून गेली आहे आणि दुसरा दिवस उजाडला आहे ! तर मला शांत झोपायला आवडतं आणि दिवसभर उगाच चुकीच्या गोष्टी करून गादीवर पडलं की डोक्यात भुंगा शिरतो. 
म्हणून माझ्या स्वत:च्या मन:शांतीसाठी, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या उत्सवांच्या फंदात मी पडत नाही.

असो.
तर गेल्या वर्षीपासून मला एक अतिशय सुंदर गणपती सापडला आहे. आमच्या ऑफिस समोरच्या रुस्तम चाळीतला गणपती. हा नवसाचा गणपती आहे. दोन तीन दशकांचे वय ह्या गणपतीचे आहे. चाळीतील लहान मुले त्याची सजावट करतात. चाळीतला चित्रकार एका ठराविक भिंतीवर गणपतीचे सुंदर, रेखीव चित्र काढतो. त्याच्या पुढे टेबल टाकून मुले एखादी कल्पना घेऊन भन्नाट सजावट करतात. विसर्जनाच्या दिवशी नारळाच्या पाण्याने भिंत पुसून काढली जाते. 
बस. 
इतकं सहज. इतकं सुंदर
ना ढोल ताशा ! ना भक्तीचा तमाशा ! 

मला त्या चित्रातील गणपतीच्या अस्तित्वाविषयी तिळमात्र देखील शंका नाही. बाकीचे राजेबिजे, जेव्हा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्राला त्सुनामी येऊन गेल्याचं भग्न रूप देतात तेव्हा हा गणपती शांत चित्ताने लाकडी कठड्याला लटकणाऱ्या डालडाच्या डब्यातल्या तुळशीच्या हिरव्या रोपाच्या शीराशीरांतून वहात असतो !
















आत्ताच बातमी वाचली !!!!!
'लोकसत्ता गणेश मूर्ती स्पर्धे'तील 'पर्यावरणस्नेही' सजावटीचे विशेष पारितोषिक लोअर परळ येथील रुस्तम रहिवाशी गणेशोत्सव मंडळाला मिळाले.
खूष ! एकदम खुष !

4 comments:

Raindrop said...

what a wonderful way of welcoming and sending off Ganapati. Ani kitti sundar pan.

Prof. Narendra Vichare said...

अनघा, या गणपतीच्या आजूबाजूचे डेकोरेशन मंडळाची कार्यकर्ता मुलेच स्वत:हून करतात. परंतु गणपतीचे चित्र मात्र सावंतवाडी च्या बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट कॉलेजचे माजी विद्यार्थी शैलेश वारंग, वैनतेय घाडीगांवकर आणि सहदेव गावकर हे विद्यार्थी मित्र मिळून रंगवितात. त्यापैकी शैलेश वारंग आणि वैनतेय घाडीगांवकर गेली अनेक वर्षे हा स्तुत्य उपक्रम करीत आहेत. या दोघांनीही जे. जे. मधून एम. एफ. ए. ही फाईन आर्ट (अप्लाईड) चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दोघेही फर्स्ट मध्ये पास झाले. (सुदैवाने मी त्यांचा गाईड टिचर होतो.) गत वर्षी देखील या गणपतीने पारितोषिक पटकावले होते… या मंडळाचे, कार्यकर्त्यांचे आणि माझ्या या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन …

Abhishek said...

उत्तमच! :)

सौरभ said...

loully :D :)