नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 28 September 2013

हार

नव्याकोऱ्या गाडीला ठोकलं जाणं तरी ठीक आहे.

गाडी ऑफिसखाली एका जागी स्थिर उभी असताना रात्री दीड वाजता एका टँकरने ठोकली. गाजावाजा झाला. सिक्युरिटीने मला खाली बोलावलं. अवाक. हतबल. वगैरे.

त्यानंतर पुढले दोन महिने ऑफिसच्या इमारतीच्या एचआर खात्याशी व टँकरच्या चालकाशी बैठकी झाल्या. त्याच्यावर मी दया दाखवावी अशी त्या चालकाची मागणी होती. आणि ती दया त्याच्या मालकाने त्याच्यावर दाखवावी असा माझा मुद्दा होता. गाडीच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च त्याच्या मालकाने द्यावयाचे नाकारले. मग विमा. त्यातून गाडीची दुरुस्ती झाली. एक महिना उलटून गेला परंतु, विमाच्या वरच्या खर्चाची भरपाई ना त्या मालकाकडून झाली ना चालकाकडून. इमारतीच्या एचआर खात्याने मला तारखा द्यायला सुरवात केली.

अजून थोडे दिवस गेले.
त्यावर अजून थोडे दिवस उलटले.
तसंही हे वर्ष घसरगुंडीवर बसल्यासारखं घसरलंय.
साधारण दोन महिने पार घसरले.

मी एचआरच्या अमितला दूरध्वनी लावला.
"काय झालं माझ्या पैश्यांचं ?"
"मिळणार तुम्हांला मॅडम."
"मिळणार हे तुम्ही मला गेले दोन महिने सांगताय."
"बघतो मी…त्याच्या मालकाला सांगितलंय…देईल म्हणालाय तो…"
"नवीन काहीतरी सांगा राव तुम्ही मला !"
"तसं नाही मॅडम…"
"बॉस ! तसं नाही तर कसं ? तुम्हाला काय वाटलं काय हे सगळं म्हणजे ? काय टाईमपास चाललाय माझा ? तुम्हाला स्वत:ला तुमच्या शब्दाचा मान नाही ! फुकटच्या तारखा सांगताय च्यायला  तुम्ही गेले कित्येक दिवस !"
"मॅडम, थोडा संयम बाळगायला हवा तुम्ही."
"संयम च्यायला गेला तुमचा चुलीत ! आज जर नाही माझे पैसे दिलेत ना तुम्ही तर आज संध्याकाळी त्या टँकरची वाट लावली नाही ना तर नावाची अनघा नाही मी ! दगड धोंडे मारून तोडफोड करून टाकेन मी ! च्यायला ! कोणाला सांगता तुम्ही संयम ठेवायला ?! मला ?! तुमची गाडी अशी कोणी फोडली असती म्हणजे ठेवला असता काय तुम्ही तुमचा तो संयम ! डोक्यात जाऊ नका राव तुम्ही ! गपगुमान माझे पैसे त्याच्याकडून मिळवून द्या ! नाहीतर फोडून टाकेन आज रात्री त्याचा टँकर !"
"मॅडम, मला पंधरा मिनिटं द्या…मी परत फोन करतो तुम्हाला."

पंधरा मिनिटात चेक माझ्या ऑफिसच्या रिसेप्शनला ठेवला गेला.

गाडी फोडल्याच्या दु:खापेक्षाही आता माझं दु:ख आयुष्यभर डोक्याला मुंग्या आणणारं होतं.
मी दोन महिने सामोपचाराने घेत होते…मला तारखा दिल्या गेल्या. 
मी अर्ध्या मिनिटासाठी मानसिक संतुलन जाऊ दिलं… ताडताड बोलले…जे माझ्या बाबांनी, गुरुवर्यांनी कधी शिकवलं नाही अशा भाषेत बोलले…
…पुढल्या क्षणी मला माझे पैसे मिळाले.

कितीही काहीही झाले तरी लढा हा सनदशीर मार्गानेच द्यावयाचा ही माझ्या बाबांची शिकवण आहे. लढा देण्याजोगे लहानमोठे प्रसंग आयुष्यात समोर उभे ठाकणार आहेतच. परंतु हे लढे अरेरावी, दंगेधोपे, जाळपोळ ह्या मार्गाने सोडावयाचे नाहीत. आपण आपल्या तत्वांचा मार्ग सोडला तर आपण आणि गुंड ह्यात फरक तो काय ?
सद्य परिस्थितीत सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेचा झालेला अंत; माझ्या शब्दांमधून कर्कश बाहेर पडला. आणि मी त्या अंताचा एक पुरावा बनले. 
ही माझी हार आहे.
माझ्या विचारांची हार आहे.
माझ्या वैचारिक घसरणीला…अध:पतनाला माझी मीच जबाबदार आहे.

17 comments:

Sakhi said...

नाठाळाच्या माथी ... हे ही सत्यवचन आहे ...
सो हार नव्हे ही...
जीत आहे, सेलिब्रेशन करा... कुठे यायचे ते कळवा :)

तृप्ती said...

अनघा, ही तुझी "रिअ‍ॅक्शन" होती दोन महिने चाललेल्या गोष्टींना. अशा किंवा कशा भाषेत बोलायला नको हे तुझं तुलाच जाणवलं ना. तू रोजच अशी वागा-बोलायला लागलीस तर ती तुला मिळालेल्या शिकवणीची हार होइल.

Gouri said...

नाठाळाच्या माथी ... हे तर खरंच. असं बोलायची वेळ येतेच कधी ना कधी. पण मला वाटतं आपलं डोकं फिरू न देता हे बोलण्याचं कौशल्य मिळवलं, (अवघड आहे हे फार!) तर बेश्ट! म्हणजे मग तिथे हार नसते. नाही का?

Unknown said...

कधी कधी अस्सच वागावे लागते...

Abhishek said...

कलियुग... कृष्ण नीती... उत्तरोत्तर

Raindrop said...

I think your half a minute of ranting worked for you not because you lost your cool for half a minute. It worked because it came after a silence of 2 months and years of cultured interactions. Imagine if you were a dangebaaz from the beginning, they would have dealt with you in a different way (gundagiri & all). When a quiet person speaks loudly for a minute, it had more effect than a loud person screaming for an hour.

But yes what you say is right that now a days people are taking the easy way out and starting to do halla-gulla from day one.

Anagha said...

सखी, ज्यावेळी असे वागल्यानेच फक्त यश मिळू शकते अशी परिस्थिती येते त्यावेळी ही समाजाची घसरण आहे असे मला वाटते. 'मी माझा' असे एककल्ली बघून कसे चालेल ? मी ह्या समाजाचा भाग आहे आणि त्यामुळे देशाचे इतर नागरिक जसे वेगवेगळ्या प्रसंगामधून आपले मानसिक संतुलन पटापट हरवताना दिसत आहेत त्यावेळी मी त्या स्तरावर माझी, समाजाचा एक घटक, ह्या अर्थाने हार झाली असेच समजेन. हो ना ? :)

Anagha said...

तृप्ती, हल्ली अशा प्रकारचे प्रसंग दिवसागणिक समोर उभे रहातात आणि आपला संताप फार पटकन मर्यादेची पातळी ओलांडतो. कारण समाज हवालदिल झाला आहे. निराश आहे. त्यामुळे थोडी सुद्धा ठिणगी पुरेशी होते…तोल सुटायला. :)

Anagha said...

गौरी, अगदी खरं. वर म्हटल्याप्रमाणे, वर्तमानपत्रामधून म्हणा वा स्वत:च्या अनुभवामुळे म्हणा आपल्यावर अन्यायाची होत असल्याची भावना आत रुजू घातली आहे. आणि त्यामुळे छोटीशी घटना देखील तोल सुटायला पुरेशी होते. मला माझे पैसे मिळाले बाकी कशाला विचार करू असे नाही करता येत. नाही का ?

Shriraj said...

Tuzya jagi ubha rahun baghitla tar tuza vagna samajta...ani tula vatlela dukkha hi

Anagha said...

अमर, मला वाटतं कधीकधी देखील आपण असे वागू नये. कारण एका नागरिकाचे 'कधीकधी' हे असंख्य नागरिकांचा विचार केला असता जाळपोळ, दंगेधोपे ह्यात रुपांतर होते. हल्ली एखाद्या माणसाने अतिरेकी कृती केली तर त्यात असंख्य नागरिक सामील होतात आणि दंगेभोपे होतात, ह्याचा अर्थ प्रत्येकाला माझ्यावर अन्याय होत आहे असे खोल आणि प्रबळ वाटू लागले आहे. तोल हा सांभाळता यायला हवा. :)

Anagha said...

अभिषेक, आणि आपण सुजाण नागरिक (मी आहे असे वाटत होते मला !) त्या कलियुगाचे बळी ! हो ना ? काही लांड्यालबाड्या केल्या की आपल्याला पटकन कृष्णाचा आधार मिळतो ! :) :) :)

Anagha said...

Vandu, you are right. My worry is am changing from a quiet person to a loud person....that is not what I have been taught...AS A CITIZEN, I CANNOT AND SHOULD NOT LOSE MY TEMPER....WHATEVER HAPPENS....

Anagha said...

श्रीराज, सध्या आपली परीक्षेची वेळ आहे. कठीण प्रसंगाला डोकं ठिकाणावर ठेवून नाही तोंड दिलं तर मग उपयोग काय शाळाबिळा करून ? We need to see a bigger picture. हो ना ?

Unknown said...

मला वाटत तुम्ही योग्य केलेत. एखाद्या गोष्टीसाठी पुरेसा वेळ देवून सुधा समोरची व्यक्ती दाद देत नसेल, वेळ काढूपणा करत असेल तर या मार्गाचा अवलंब करणे स्वाभाविक आहे. यात वाईट वाटून घेण्यासारखं काही आहे असे मला वाटत नाही

भानस said...

" संयम, सामोपचार आणि सौजन्य " ही प्रबळ स्थाने असायला हवीत आपल्या स्वभावातील पण त्याचा दुसर्‍याने " हत्यार " म्हणून उपयोग करता नये.

जे झाले ते चांगलेच झाले. :)

सौरभ said...

AS A CITIZEN, I CANNOT AND SHOULD NOT LOSE MY TEMPER....WHATEVER HAPPENS.... >> Sometimes it is valid to lose temper to MAKE THINGS HAPPEN...

Cheers :)