नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 24 June 2013

किंवा…कदाचित…

वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्यातून पराकोटीची घटना घडते. मृत्यू. कधी एखादा तर कधी असंख्य. त्याला कारण कधी आपला स्वत:चा निष्काळजीपणा वा कधी दुसऱ्या कोणाचा. उदाहरणार्थ, कधी मी सिग्नल तोडून माझे वाहन पुढे आणलेले असते वा बागेत चालल्यासारखी मी भर रस्त्यात चालत असते. अशी अनेक कारणे असतात मृत्यू ओढवायाला. कधी भीषण तर कधी एखाद्या माणसाला शांत मरण येऊन जाते. म्हणतात ते त्याचे पुण्य असते.

मृत्यू हे सत्य आहे आणि तो वेगवेगळ्या स्वरूपात येतो.

मला फार लहानपणी माझ्या माणसांच्या मृत्यूची भीती वाटत असे. पराकोटीची भीती. बाबा कधी झोपलेले दिसले की मी वारंवार त्यांचा श्वास चालू आहे की नाही ह्याची खात्री करून घेत असे. त्यांच्या मृत्युच्या भीतीने मला रात्ररात्र झोप लागत नसे. कधी माझ्या स्वप्नात माझे बाबा मेलेले असत तर कधी माझी बहिण. रोज रात्री माझ्या रडत उठण्याला माझे बाबा सोडून सगळे कंटाळलेले होते. शेवटी बाबांनी माझ्या उशाखाली छोटा चाकू ठेवायला सुरवात केली आणि कसं कोण जाणे पण मला मृत्यूविषयी भीतीदायक स्वप्नं पडणे बंद झाले. हा बाबांचा कोकणातील रामबाण उपाय.

मग कधी बालपणीची मैत्रीण, कधी सख्खी आजी, कधी  एखाद्या मैत्रिणीचे बाबा, नेहेमी घरी येणारे एखादे काका असं करत करत मृत्यू आमच्या दारात आला आणि माझ्या बाबांना घेऊन गेला. ते फार भयंकर झाले. म्हणजे एखाद्या माणसाची नुसती ओळख होणे वेगळे आणि एखादा माणूस अगदी आरपार आपल्या घरात शिरणे वेगळे. हा तर कधीच नकोसा असलेला पाहुणा…
पण मग हे आयुष्यातील सत्य वळलं. त्यातील टाळता न येण्याचा अविर्भाज्य घटक कळला. हळूहळू एखादी मैत्रीण, शाळेतल्या एखाद्या लाडक्या बाई, मामेबहीण, मावसबहीण…काळाच्या ओघात नाहीसे होणाऱ्या माणसांची ही यादी वाढतीच असते…तेव्हा शेवटी त्याला इत्यादी इत्यादी लागू शकते हे पण जाणवले. कारणे वेगवेगळी. कधी हृदयविकाराचा झटका, कधी एखादा अपघात, इथेतिथे कर्करोग अशी विविध कारणे. बाबा गेले तेव्हा एक डॉक्टर मावशी म्हणाली, "मरायला शेवटी एक कारण लागतं." त्यावेळी हे असं मावशी कसं काय बोलू शकली वगैरे वगैरे वाटलं. बुद्धी थोडी बाल होती. आयुष्यात अजून बरंच काही शिकायचं होतं.

मृत्यू ही एक अंतिम आणि अटळ घटना असते. आणि तो शरीराचा होत असतो. आपल्या वागण्याने आपण आप्तांच्या आत्म्याला रोज जे क्लेश देत असतो तो त्या आत्म्याचा ऱ्हास अधिक वाईट. तीळतीळ मरण. आत्म्याचे.
हे झाले विषयांतर.

आपले आप्तस्वकीय गेले की होणाऱ्या दु:खाला सीमा नसते. आणि त्यात कुठलीही तुलना नसते. म्हणजे आज माझा नवरा गेला तेव्हा माझे दु:ख अधिक तुझा तर काय बाबाच गेलाय…असे काही डोक्यात येणे हा तद्दन मूर्खपणा. तसेच आज एखाद्या माणसाचे आईवडील वारले तर त्याला होणारे दु:ख; हे मला अनोळखी असेल वा माझ्यापर्यंत ते पोहोचूच शकत नाही…असे म्हणणे हे कितीसे बरोबर ? प्रत्येकाच्या आयुष्याला हा मृत्यू स्पर्श करून गेलेलाच असतो. काल, आज ना उद्या. आपल्या माणसाची चिता पेटवणे, ते कायदेशीर कागदपत्र तयार करून घेणे, मृतदेहाची ओळख पटवून देणे, आपल्या माणसांची  कुजलेली, किडे पडलेली शरीरे ताब्यात घेणे, त्यावर ते सोपस्कार करून त्यातून थंड डोक्याने बाहेर येऊन पुढले आयुष्य काहीच झाले नाही असे जगू लागणे हेच तर आयुष्य असते. शेवटी परीक्षा जिवंत माणसाची असते. मृत नाही. एकदा का हे कळले आणि वळले की जगता येते. त्यासाठी मरणाचे सगळेच प्रकार समजून घेण्याची गरज पडत नाही.

सध्या उत्तराखंडामधील मृत्यूच्या बातम्या आपण ऐकत आहोत. बघत आहोत. त्यात कोणाची चुकी ह्यावर चर्चा होत आहेत आणि काही दिवस होत रहातील. चर्चा करणे हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्राण्यांची भाषा मनुष्याला अवगत नसल्याकारणाने तिथे वाहून गेलेले घोडे, हरणे ह्यांच्या विषयी त्यांच्यात चर्चा झाली की नाही हे समजायला मार्ग नाही.

माझा स्वत:चा कर्मावर फार विश्वास आहे. थोडंफार वाचन आणि वडिलांच्या विचाराचा प्रभाव हे कारण असू शकेल. आज जे काही बरं म्हणा वा वाईट म्हणा माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी कर्माचे ते फळ आहे. कधी गोड तर कधी कडू. महाभारतामध्ये ज्यावेळी द्रौपदी कृष्णाला विचारते," माझ्यावर हा असा भयानक प्रसंग ओढवला (वस्त्रहरण) त्यात माझी काय चूक ?" त्यावरचे कृष्णाचे उत्तर मला माझी प्रत्येक कृती ही माझी जबाबदारी आहे हे समजून, जाणून घेण्यास भाग पाडते. आणि हलकेच हसू देखील आणते. "जातीचे कारण देऊन तू कर्णाला नाकारलेस. त्याचा अपमान केलास. कर्णाला वरले असतेस तर त्याने तुला वाटून घेतले नसते, असे द्यूतात लावले नसते. तेव्हा तू जे कर्म केलेस त्याची जबाबदारी उचल. ती नाकारू नकोस."
हे असे स्पष्ट उत्तर कृष्णाच्या जिवाभावाच्या सखीला, द्रौपदीला, फारसे आवडले नाही म्हणे.
तसेही समोरच्याने आपली चूक दाखवून दिलेली कोणाला आवडते ?

मग आता उत्तराखंडातील महाप्रलयामध्ये जी मनुष्यहानी झाली त्यात त्या माणसांचा दोष काय ?
कदाचित…
ह्याचे उत्तर ज्यात्या आत्म्याने शोधावयाचे असेल.

किंवा…
कदाचित…
देवाला, जो संदेश मनुष्यजातीपर्यंत पोहोचवायचा होता; तो संदेश पोचवण्याची कामगिरी…हेच त्या अनेक जीवितांचे कार्य असेल. आणि त्याचा संदेश फक्त एखाद्या व्यक्तीमार्फत नव्हे तर अनेक व्यक्तींमार्फत, तो मनुष्यजातीपर्यंत त्याने पोहोचवला असावा. मृत व्यक्तींचा आकडा जितका मोठा तितका त्या देवलोककडून आलेला संदेश महत्त्वाचा नव्हे काय ?

किंवा…
कदाचित…
ज्या देवावरील अतीव विश्वासाच्या आधारे; आत्यंतिक कष्ट सहन करीत त्याचे भक्त त्याच्या द्वारी पोहोचले होते…त्याच्या द्वारी शरीरत्याग करिता येणे…आत्मा अनंतात विलीन होणे हे एका परीने पुण्यच नव्हे काय ?

किंवा…
कदाचित…
भौगोलिकदृष्ट्या नाजूक व देवाचे वास्तव्य जेथे आहे ( असे मानले जाते आणि म्हणूनच तर तेथे रीघ लागते ) अशा परिसरात, बेसुमार व निसर्गाचे भान न ठेवता बांधकामे केली जात आहेत, त्याच्या वास्तव्याचे बाजारीकरण केले आहे; आणि असे असूनही तेथे श्रध्देच्या भावनेने जाणे म्हणजेच तिथे चालू असलेल्या पापामध्ये वाटेकरी होणे, असे त्या देवाचे म्हणणे असेल व त्या 'कर्मा'ची ही फळे नसतील असे कशावरून ?

किंवा…
कदाचित…
मनुष्यजातीकडून नित्य होणाऱ्या असह्य शारीरक क्लेशामुळे देव तिथून कधीच निघून गेला असेल.

किंवा…
कदाचित…
परवाचा महाप्रलय हा त्याचा कोप असेल….
"आता मला एकट्याला, शांततेने जगू द्या !" असा हा त्याचा आकांत असेल.

कोण जाणे. 


Friday, 21 June 2013

चिंधी...

"परवा स्कूटरवर मागे बसलेल्या एक बाई पडल्या आणि गेल्या."
"कशा पडल्या ?"
"रस्त्यात स्पीड ब्रेकर होता…त्याच्यावर रंग नव्हता मारला…त्यामुळे तो त्या बाईंच्या मुलाला, जो स्कूटर चालवत होता, त्याला कळला नाही…त्याने स्पीड कमी नाही केला…बाईंनी हेल्मेट नव्हतं घातलं…योगायोग जुळून आला…त्या उडाल्या…आणि खाली पडून गेल्या."
"काय यार…कसं पण येऊ शकतं ना मरण ? चिंधी एकदम !"

हल्ली काही सांगता येत नाही…
मरण 'चिंधी' येऊ शकेल…
मग आपण आपलं जगणं...
'भरजरी' विणलं तर ?

Thursday, 20 June 2013

पुन्हा वाचन…

कान आणि डोळे कार्यरत असले की तोंड बंद रहातं. एखाद्या मधमाशांच्या पोळ्यागत, आपला मेंदू नित्य नव्या ज्ञानाने प्रसरण पावू शकतो. आणि त्यातून आपले डोळे उघडतात.

मिलिंद बोकीलांचं 'गोष्ट मेंढा गावाची' हे पुस्तक. एक आदिवासी गाव. मेंढा. देवाजी, गावातील प्रत्येक गावकऱ्याला सोबत घेऊन सर्वांच्या विचारांत व त्यातून सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीला एक धडा म्हणून बेधडक अंगावर न घेता पळवाटा पकडणाऱ्याने, तर आधी हे पुस्तक मिळवावे.  
शहरातील आमची पाच बोटं एकजूट का नाही दाखवत ?
कारण त्या प्रत्येक बोटाला दुसऱ्यापेक्षा अधिक उंचीची आस आहे.

एका देशातील पक्षी जेव्हा दुसऱ्या देशातील भेटत असेल तेव्हा ते एकमेकांत  कुठल्या भाषेमध्ये संवाद साधीत असावेत ?
जर त्यांना कधीही ही पंचाईत पडत नसेल तर ती मला का पडावी ?
मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येतं कारण ती माझी मातृभाषा आहे. शाळेत इंग्रजी होतं तरीही इंग्रजीतून बोलण्याचा फारसा प्रसंग येत नसे. आणि कॉलेजमध्ये अर्धेअधिक मराठी बोलणारे त्यामुळे तिथेही काही अडले नाही. नोकरीला लागल्यावर मात्र कधी आणि कसे कोण जाणे परंतु इंग्रजी, जिभेला हलके वाटू लागले आणि डोळ्यांना झेपू लागले. परंतु, बंगाली भाषेचा आणि माझा संबंध शून्य. मुंबईत बरेच बंगाली आहेत परंतु त्यांना मातृभाषा येत नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचे दुर्दैव अधिक आहे. ते देखील माझ्यासारखेच ब्रिटीश जी भाषा सोडून गेले त्या भाषेचा आधार घेऊन रवींद्रनाथ टागोर वाचतात.

Chokher Bali.
वाळूकण. 
डोळ्यामध्ये खुपणारा.
आणि शिंपल्यामध्ये मोती फुलवणारा देखील वाळूकणच.
तरुण विधवा बिनोदिनी ही त्या वाळूकणासारखी.
रूपवती, बुद्धिमान, अहंकारी. सरळसाध्या, हळव्या, आशाच्या आयुष्याची होळी पेटविण्यास निघालेली ही बिनोदिनी.
रवीन्द्रनाथांच्या ओघवत्या बंगाली भाषेमधील हे पुस्तक मला वाचता आले असते तर काय बहार आली असती !

Broken nest and other stories.
पुन्हा भाषांतर.
ह्या कथेचा चित्रपट आला तो चारुलता ह्या नावाने. पुस्तकातील नायिकेचे नाव चारुलता. माझ्या सौभाग्याने मला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळाली होती. आणि नशिबाने ती मी दवडली नव्हती. चित्रपट आधी आणि त्यानंतर पुस्तक वाचणे ही तशी काही फारशी आनंदाची गोष्ट नव्हे. परंतु ज्यावेळी दिग्दर्शक सत्यजित रे असतात त्यावेळी त्या चित्रपटाविषयी असे काही बोलता येईल काय ? पुस्तकामध्ये टागोरांनी आपल्या शब्दांमध्ये श्रीमंत घरातील तरुण चारूचे उदास, एकटे दिवस टिपले आहेत तर चित्रपटात तेच सत्यजित रेंनी तितक्याच भकासतेने टिपले आहे. एकटेपणातून आपल्या दिराकडे नकळत ओढली जाणारी चारू…निर्बळ, हताश चारू. 
वितभर लांबीचं हे पुस्तक आणि कृष्ण धवल सिनेमा. त्यातील ही ९३ पानांची गोष्ट.
एकही शब्द जसा उणादुणा नाही तशीच चित्रपटामधील एकही चौकट ही अडगळ नाही.
त्याच पुस्तकातील The Ghat's tale, Notebook आणि Postmaster ह्या लघुकथा.
"आई, तुला त्यातली कुठली गोष्ट सर्वात आवडली ?"  माझ्या लेकीने पुस्तक वाचून संपवून पलंगावर ठेवता ठेवता मला विचारलं. मी विचारात पडले. "The Ghat's tale." मी म्हटलं. 
"तुला गं ?" 
"काही सांगताच येत नाही. पण मला वाटतं मला Postmaster आवडली."
हे पुस्तक नक्की मिळवा. संपल्याशिवाय खाली नाही ठेऊ शकणार तुम्ही.
मूळ तुर्क भाषेतील 'My name is Red' हे इंग्रजी पुस्तक वाचताना हे भाषांतर आहे असे अजिबात जाणवले नव्हते. दुर्दैवाने सदर बंगाली साहित्याचे तसे नाही म्हणता येत. बऱ्याच वेळा शब्द टोचतात. वाक्य खुपतात. भाषांतर सुंदर असायला हवं होतं अशी चुटपूट वाटत रहाते. 
"Why these translations are so bad?" मी माझ्या एका बंगाली मित्राला विचारलं. बंगाली लोकांचं इंग्रजी वाईट असतं असं न पटणारं उत्तर मला मिळालं. कोण जाणे माझ्या प्रश्नातील दु:ख त्याला झेपलं नसावं.
दुसऱ्या एका मूळ बंगाली 'इंग्रजी कॉपी रायटर'ला देखील मी हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला…God knows. मी म्हटलं," Why don't you try ?"
"My Bengali is not good!"

मराठी भाषेतील भाषांतर कदाचित मला खटकले नसते काय ?

The Little Prince.
हे पुस्तक तुम्ही अजून नाही वाचलंत तर काय वाचलंत ? 
हा आणि हाच प्रश्न योग्य आहे. इतके हे पुस्तक सुंदर आहे. १९४३ साली, ओंत्र दि सा-एक्झुबे ह्या फ्रेंच लेखकाचे हे पुस्तक, कमीतकमी २५० भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. माझ्या हातात हा छोटा राजपुत्र विसावला तो गौरीच्या घरातून. शंभर पानांची ही गोष्ट. जन्माला आल्यावर आपण धडपडत चालू लागलो होतो…कुठलेही नियम ज्ञात नव्हते. कागदावरच्या चार रेघांमध्ये, अवकाशातील कुठल्याही आकारामध्ये आपल्याला काहीही गवसू शके. हळूहळू ती नजर धुसर होत गेली…आणि तरी देखील आपल्याला समज आली असं उगाच वाटू लागलं. ह्या छोटेखानी जगप्रसिद्ध पुस्तकामधून; लहान राजपुत्राच्या नजरेतून आपण मोठ्यांची आयुष्याची कोडी बघू लागतो…आणि एक सुंदर आणि त्याच वेळी करुणेची एक अस्पष्ट छटा असं मनोहारी चित्र आपल्यासमोर उभं रहातं. 
लेखकाने पानापानावर रेखाटलेली ती सुरेख चित्र…शब्द, विचार, विविध कल्पनांची अखंड भरारी…आपल्याला हे सर्व अशा काही एका उंचीवर नेऊन ठेवतं तो अनुभव मुळातच शब्दातीत. 
आणि माझ्या शब्दांत इतुकी ताकद कुठली ?

सध्या अमेरिकेत रहात असलेली माझी एक भाची खूप छान छान पुस्तकं वाचत असते. त्यामुळे ती सध्या काय वाचतेय ह्याची मी अगदी आवर्जून तिच्या आईकडे चौकशी करत असते. ह्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं…'जय'.

देवदत्त पटनाईक ह्या तरुण लेखकाचं हे पुस्तक मग मी माझ्या लेकीच्या वाढदिवसाला भेट दिलं. तिने प्रथम वाचलं आणि त्यानंतर मी ते हातात घेतलं. वाचन चालू असलेलं पुस्तक, त्याच्या शेवटच्या पानापर्यंत सतत माझ्या बरोबर असतं. माझं पोट आणि माझं डोकं हे अगदी लहानपणापासून एकत्र जेवायला बसतात !

'जय' ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील विविध कथा लेखकाने आपल्यासमोर उभ्या केल्या आहेत. त्या अर्थात नव्या नाहीत, परंतु, त्यांना त्याने छोट्या छोट्या स्वरूपात, सरल भाषेत शब्दबद्ध करून, प्रत्येक गोष्टीखाली त्याने आपले विचार मांडले आहेत. महाभारत ज्यावेळी घडले, त्यावेळची समाजाची स्थिती, त्यावेळचे रीतीरिवाज, स्त्रियांचे विचारस्वातंत्र्य; हे इतक्या सुलभतेने त्याने आपल्यासमोर उभं केलं आहे की मनात विचार येतो…आपण ज्यावेळी महाभारत वाचलं त्यावेळी आपण नक्की काय वाचलं ? अर्थात महाभारत हे एक असे काव्य आहे जे तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमच्याबरोबर वाढत जातं. दुर्गा भागवतांचं 'व्यासपर्व' हे माझं फार लाडकं पुस्तक. त्यातून त्यांनी महाभारतातील वेगवेगळी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर वेगळ्या उजेडात आणली. जसं आम्ही आमच्या कॉलेजमध्ये स्थिरचित्र काढत असू. त्यावेळी समोरची मांडणी माझ्या खुर्चीतून मला जशी दिसे तशीच ती माझ्या सहविद्यार्थ्यांना दिसत नसे. त्याचा कोन वेगळा; त्याच्यासमोरच्या रचनेवर सूर्यप्रकाशाने मांडलेला खेळ वेगळा. तसं काहीसं. विचारांना प्रवृत्त करणारी पुस्तकं मला फार आवडतात. हे पुस्तक तर मध्येच मला हसायला भाग पाडी. "हे कधी माझ्या डोक्यातच आलं नाही !" असं म्हणून मी माझ्या लेकीला तिने वाचलं असूनही परत तिला वाचून दाखवी !

पटनाईकांनी स्वहस्ते काढलेल्या चित्रांचा उल्लेख न करणे हे म्हणजे अचानक स्मृतीभ्रंशाचा झटका आल्यासारखं !
माझ्या कचेरीतील बहुतेक सर्व तरुण इंग्रजी वाचकवर्गाने ह्या पुस्तकाचं वाचन कधीच केलंय. आणि त्यांना हे पुस्तक फार भावलंय देखील. त्यातल्या प्रत्येकाला मी एक प्रश्न हमखास विचारी, "Have you read the original Mahabharata ?" बहुतेक वेळा तरी मला उत्तर नकारार्थी मिळालं. आपल्या तरुणवर्गाची महाभारताशी ओळख अमर चित्रकथा वा टीव्ही मुळे झाली. पण मग त्याने नक्की काय बिघडलं ? मी जेव्हा महाभारत वाचलं त्यावेळी कदाचित लहान वयामुळे म्हणा किंवा बुद्धीदौर्बल्यामुळे म्हणा; मला एकही प्रश्न पडला नव्हता. परंतु, मला कधीही न पडलेले प्रश्न ह्या पुस्तकाने माझ्यासमोर आणले आणि त्यातील सगळ्या करड्या रंगाच्या नाना छटा माझ्यासमोर उलगडल्या !

… महाभारत माझी पाठ अशीतशी सोडणार नाही बहुतेक. आता इरावती कर्व्यांचं 'युगांत' मिळवलंय ! मराठी.
त्यांच्या अभ्यासातून, त्यांना दिसलेला तोच तो कृष्ण…आणि त्याचं ते महाभारत !
पटनाईक एका ठिकाणी म्हणतात, गांधारीने आपल्या शंभर मुलांकडे डोळे उघडे ठेवून बघितले असते तर कदाचित महाभारत घडले नसते !
मला आशा आहे युगांत मला आगळा वेगळा आनंद देईल.   

गेल्या दोन ते तीन महिन्यांत मी ही पुस्तकं वाचली. चांगलं काही वाचनात आलं तर ते आजूबाजूला पसरवावं असं मला फार वाटतं. म्हणजे एखादं चित्र छान जमून गेलं की ते वर्गात सगळ्यांना दाखवावं अशी इच्छा शाळेत देखील फार होई !

तसं काहीसं.

Monday, 10 June 2013

देहदान

आपले आयुष्य हे दुसऱ्याचे ओझे होऊ नये.
आकाशातून पुढे सरकताना ढग मागे ओझे ठेवून जात नाही.

सभोवताली सगळे मर्त्य मानव जेव्हा माझ्या मरणाविषयी बोलू लागले त्यावेळी मला जाणवले. आपला अवतार आता संपवायला हवा. इतर कोणी येऊन घाव घालण्याआगोदर आपणच आपले मरण ठरवावे. जन्म ह्याच माणसांनी दिला खरा. पण त्याला आता पन्नास वर्षे उलटली. आपल्या जन्मदात्या वृद्ध आई बापांचा सहवास म्हणजे डोक्यावरचे ओझे मानणारा हा माणूस. त्याला माझे कसले सोयर ?

"पुन्हा अर्ज पाठवून बघा. आणि आता काय करणार ?"
आमच्या सोसायटीच्या अंगणात मी उभा होतो. ताडमाड. नित्य भरपूर नारळ देत असे. कधी कोणाला त्रास नाही. पण अडचण झालो खरा. संस्थापक सभासदांनी जेव्हा इमारत उभी केली त्यावेळी असे बरेच माड पेरले. सोसायटीला आयते उत्पन्न आम्ही मिळवून दिले. परंतु, आता काळाची गरज वेगळी होती. इमारतीचे जेष्ठ सभासदांना 'लिफ्ट'ची गरज भासू लागली. ज्यावेळी इमारत उभी राहिली त्यावेळी सर्वात वरच्या मजल्यावरची घरे त्यांनी घेतली खरी. परंतु, जसा मी पन्नाशीला जाऊन ठेपलो तशी ही मंडळी सत्तरीच्या पुढे गेली. मी वरून खाली बघितले तर मला इमारतीची गच्ची दिसते. पण इतके आता आमच्या जेष्ठ नागरिकांना नाही चढवत. मग वास्तूशास्त्रज्ञ बोलावले गेले. अभ्यास झाला, नकाशे काढले गेले. आणि त्यात माझे मरण ओढवले. महानगरपालिकेला अर्ज गेले. नकार मिळाला. माड असा तोडता येणार नाही, असे सांगितले गेले. पुन्हा अर्ज पाठविला गेला. पुन्हा नकार. माड तोडण्यासाठी लागणारा खर्च काढला गेला. अंदाज काढल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पुढे सरकू शकत नाही. दहा हजाराचा एक अंदाज वर्तविला गेला. मरण महाग. पुन्हा एक अर्ज. पुन्हा नकार. हवं तर झाडाच्या फांद्या तोडा, पण तुम्ही झाड तोडू शकत नाही. महानगरपालिका म्हणाली. माझ्या भोवती बांधलेल्या लालचुटूक पाराभोवती जमून सर्व चर्चा होत. माझ्या कानावर तर पडतच. माझ्या अंगाखांद्यावर तुरूतुरू धावणारी खारुताई पण सर्व ऐकत असे. आणि मग कुजबुजे माझ्या कानात. मी विचार करू लागलो होतो. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा एका वास्तूशास्त्रज्ञाने माझ्याकडे बोट रोखले होते, तेव्हाच खरं तर मी विचारात पडलो होतो. सरळसोट विचार. कुठेही गुंता नाही. भूमीत रोवलेला पारंब्यांचा गुंता नाही.

अनुभव बरेच शिकवतो. कोणी माझ्या झावळ्यांवर घाला घातला नाही. म्हणजे मला शरीरत्याग करणे भाग होते. मी अडचण झालो होतो. माणसांना जाचक झालो होतो. आपली माणसं प्रगती करू पहात असता घरातील वृद्ध माणसांनी काळाची गरज मानून दूर व्ह्यावयास हवे. असे काही तरी.

काल मुंबईत पाऊस सुरू झाला. माझ्या विचारांना दिशा मिळाली. मी शरीर झोकून दिले. शरीर त्यागिले. जेव्हा समोर रस्त्यावर आडवा झालो तेव्हा एक मात्र केलं. पदपथाला लागून असलेल्या दोन गाड्यांच्या मधोमध जाऊन विसावलो. विजेचा खांब जपला. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान व्हायला नको….देता येईल तितके द्यावे…कोणाचे देणे डोक्यावर ठेवू नये. कुठून कुठून तरुण मंडळी धावली. दहा बारा नारळ हाहा म्हणता गायब झाले. कोणा तहानलेल्याच्या तोंडी पाणी आणि भुकेल्या पोटी खोबरे.

फायर ब्रिगेडची गाडी आली. माझे अवयव वेगवेगळे झाले. तुकडे केले गेले. 
झावळ्या, शहाळी आणि लांबसडक मजबूत खोड.
मी देहदान केले.

जसे जीवन तसे मरण कामी आले.

वरून कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धारा अंगावर घेत आमची कावरीबावरी खारुताई थरथरत उभी होती.
आवरता न येणारं खारं पाणी पावसाच्या धारेत कधीच मिसळून गेलं.


Thursday, 6 June 2013

नवे पान

महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी पेपरवाले काका यायचे; गेला महिना टाकलेल्या महाराष्ट्र टाईम्सचे पैसे जमा करण्यास. मला कडेवर घेऊन बाबा दार उघडीत. मग दरवाजापासून ते आत शयनगृहातील गोदरेज कपाटापर्यंत बाबांच्या कडेवर मी बसून असे. ते कपाट उघडीत. प्लास्टिकचा हिरव्या रंगाचा डबा बाहेर काढीत. त्यांनी आणि आईने महिन्याच्या पहिल्या तारखेलाच रात्री जागून दोघांच्या पगारातून वेगवेगळी पाकीटं तयार करून त्या डब्यात ठेवलेली असत. दूध, शाळा फी, वाणी, वगैरे. त्यात एक असे पेपर बिल. त्यातले पैसे बाबा पेपरवाले काका, बागवे ह्यांच्या हाती सुपूर्द करीत असत.

काका अजूनही डोळ्यासमोर येतात. काळसर वर्ण. पांढरा सदरा व पांढरा लेंगा. हातात पावती पुस्तक. हसतमुख चेहरा. बाबांच्या हातातून पैसे घेतले की जे काही एखाददुसरं मिनिट त्यांना पावती लिहिण्यास व फाडण्यास लागे त्यात त्यांच्या बाबांशी दोनचार वाक्यांच्या गप्पा होत असत. काका मान डोलावत निघून जात. बाबा दार बंद करून आत येत. मी कडेवरच. 

वर्तमानपत्र रोज दाराखालून सरकत असे. नित्यक्रम.
काही माणसं आपल्या आयुष्याला घड्याळ जोडतात.
अदृश्य घड्याळ. 

माझे घर आणि माझ्या आईबाबांचे घर ह्यात तसे फारसे अंतर नाही. त्यामुळे ज्यावेळी आम्ही इथे रहावयास आलो त्यावेळी बागव्यांशिवाय कोणी इतर पेपर टाकू शकेल असे कधी माझ्या मनात नाही आले. आमच्या घरी देखील पेपरवाले बागवेच वर्तमानपत्र टाकू लागले.

वर्तमान भूतकाळात जमा होत गेला.
आमच्या घरातील माणसांची गणती कमी अधिक होत गेली.
आणि कधीतरी "मी बागव्यांचा मुलगा. बाबा गेले. आता मी पेपर टाकीत जाईन." असे म्हणत एक मध्यम उंचीचा तरुण मुलगा दारात उभा राहिला. रहाट गाडगं अथक फिरू लागलं.

आत्मकथा जगता जगता, त्यातील लढे लढता लढता माझे इतर कादंबऱ्या वाचणे बंद पडले होते. वर्तमानपत्र वाचणे वाढले. कळायला लागल्यापासून जरी महाराष्ट्र टाईम्स डोळ्यांसमोर होता तरी आता ते वर्तमानपत्र शहाण्याने हातात धरण्याच्या लायकीचे वाटेनासे झाले. टाईम्सच घरात नको म्हटल्यावर टाईम्स ऑफ इंडिया देखील बंद करून टाकला. मग लोकसत्ता, डिएनए, हिंदुस्तान टाईम्स दरवाजाच्या कडीमागे रोवून ठाम उभे लागू लागले. जाणीवा विस्तारू लागल्या. निदान तसा समज होऊ लागला.

महिन्याच्या पहिल्या रविवारी धाकले बागवे पेपर बिल घेण्यासाठी येऊ लागले. आईवडीलांच्या चांगल्या सवयी आपण बहुधा उचलत नाही. आनुवंशिकतेने जे गुण येतात तेव्हढे फक्त आपल्यात शिरतात. त्यामुळे बागवे माझ्यासमोर पेपर बिल धरत, व मी त्यांना तितकी रक्कम देऊन टाके. आईबाबा करीत तसा महिन्याचा खर्च लिहून ठेवणे वगैरे लग्नाच्या सुरवातीला काही वर्षं केलं.
चांगल्या सवयी सदऱ्यावर पडलेल्या गुलाबाच्या पाकळीसारख्या असतात. मागमूस न ठेवता गळून जातात.

गेले काही महिने मात्र रोजचे वर्तमानपत्र दारी येण्याची वेळ हळूहळू पुढे सरकू लागली. घड्याळ बेताल झालं. पुढे पुढे सरकू लागलं. कधी आठ. कधी नऊ. तर कधी पार दहा. बागव्यांना फोन लावले. विनंत्या केल्या. पत्र टाकणाऱ्या मुलाची वेळ साधून गाठ घेतली. उशिरा येण्यामागचे त्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. "मला नऊ वाजता घरातून निघणे भाग आहे…त्यामुळे तू नऊला पाच मिनिटं असताना पेपर टाकलास तर काय फायदा ? मला वाचायलाच वेळ मिळत नाही. रद्दी फक्त वाढते…बाकी काही नाही !" चांगले शब्द…थोडा ओरडा…विनंत्या…आवाज वरखाली करीत मी माझा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून पाहिला. प्रश्नाच्या मुळापाशी शिरून त्या मुळाचा नायनाट झाला तर प्रश्न पुन्हा उद्भवणार नाही अशी आशा मला नेहेमीच असते.

"एक तारखेपर्यंत बघा. नाहीतर बंद करा." धाकले बागवे एकदा फोन केला तेव्हा म्हणाले.
"बरं."
बऱ्याचदा कमी शब्दांमागे विचारांची आवर्तने दडलेली असतात.

'बागवे' हे आडनाव…त्यांचे वडील, माझे वडील…वर्तमानपत्र वाचण्याची माझी सुरवात…वगैरे.
विचारांना चित्रांची जोड. आमच्या घराचा दरवाजा…थोरले बागवे…आणीबाणीच्या काळात रोजच्या पेपराची वाट बघणारे बाबा…

घडाळ्यात नऊ…खांद्याला पर्स…उबदार घराबाहेर पडून बंद वातानुकुलित कचेरीत शिरण्याची वेळ…दार उघडले तर पायाशी वर्तमानपत्र. 'रविवारी रद्दीवाल्याला बोलवायला हवं. कपाटात रद्दी ओसंडून वहायला लागली आहे.'

पहाटे साडेसहाच्या सुमारास चालून परत येताना दिसले होते, तळमजल्यावरील आंबेकरांच्या दारात त्यांचा पेपर विसावला होता.

त्यांच्या दरवाजाची घंटा वाजवून, त्यांच्या पेपरवाल्याचा दूरध्वनी क्रमांक घेण्यास मोजून दोन मिनिटे.
"मी निगवेकर. आंबेकरांच्या घरी तुम्ही पेपर टाकता ना ? सकाळी साडे सहाच्या आत ? उद्यापासून आमच्या दारी पण तुम्ही पेपर टाका."
"टाकतो."

दुसरा फोन…
"बागवे, मी निगवेकर बोलतेय. उद्यापासून तुम्ही टाकू नका आमच्या दारात पेपर."
"चालेल."

माझ्या आठवणींचा बाडबिस्तरा मी आवरला, कचऱ्याच्या पिशवीत भरला, घराबाहेर ठेवून दिला. जिथे बागवे पेपर ठेवीत असत…तिथेच !

बागव्यांच्या वडलांशी मी बालपणी नातं जोडलं होतं. बाबांच्या कडेवर बसून. त्यांच्या मुलाशी त्याचा काय संबंध ? 'चालेल'…ह्या एका शब्दात मला त्या मागे पडलेल्या आठवणीतून बागव्यांनी बाहेर आणलं…धाकले बागवे वर्तमानपत्र टाकण्याचा धंदा करीत होते… दारोदार नाती जोडीत फिरत नव्हते !

तसंही…
झाडाचे एखादे पान गळले तर त्या झाडाच्या आयुष्यात असा काय फरक ?
तिथे नवे पान फुटते…जागा भरून निघते.
मलाही हे अंगवळणी पाडून घ्यायला हवे.


Saturday, 1 June 2013

अचानक...

आजवर रस्त्याला होती फार वळणं…नको इतके फाटे…नको तितके चढ आणि नको तितके उतार. अनेक.
कधी धाप कधी थकवा. कंटाळलो. थकलो. नको ते जीणं वगैरे. 
अचानक आज…रस्त्याला वळणं नाहीत, रस्ता नागमोडी नाही, रस्त्याला एकही फाटा नाही. चढ नाही. उतार देखील नाही. हल्ली तो चंद्र मंदावत नाही. आजकाल हा सूर्य विसावत नाही.
सगळं धुसर, नजरेला दिसेनासं.
डोळे घट्ट मिटून उघडावे म्हटलं…दिसेल एखादं वळण, येईल एखादा फाटा. एखादा.
थकून का होईना पुन्हा धावू लागेल माझा रस्ता.

दुसरं काही दिसलं नाही…पण
…डेड एन्डचा बोर्ड मात्र स्पष्ट दिसला.

( कर्करोग हा असा रोग आहे म्हणतात जो आपल्याला आपला ह्या पृथ्वीवरचा कालावधी ठरवून देतो. काही दिवस. काही महिने. कदाचित एखादं वर्ष.  तो कालावधी आपण आपली बाकी राहिलेली कामे उरकण्यासाठी वापरावा अशी शहाण्यासुरत्या माणसाकडून अपेक्षा असते. परंतु, हे असे साक्षात मरण समोर उभे असता, यमाचा फास आकाशात आपल्या डोक्याभोवतीच फिरत असताना त्या माणसाचे नक्की काय होत असेल…? )