मैत्री, प्राजक्ताचं फूल वगैरे...
की मैत्री, सूर्याचे किरण ?अंधारात प्रकाशाची ती रेघ…
की उन्हाची एक तिरीप आणि मैत्रीच्या नाजूक फुलाचा अखेरचा श्वास.
आयुष्यात मित्रमैत्रिणींची गरज कोणाला नसते ?
काही नाती आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतात तर काही खोल गर्तेतून देखील सहजगत्या बाहेर काढतात.
आपल्या हातून सत्कृत्ये घडवून आणतात.
जगण्याला दिशा देतात.
मला दोन्ही अनुभवयास मिळाली.
आयुष्याचे धडे घेतले.
शहाणी झाले.
थोडीफार.
कुंभार घड्याला आकार देत असतो, त्यावेळी घडा किती वेदना सहन करतो.…कोण जाणे.
कठीण प्रसंगांमध्ये कोणत्याही मैत्रीकडून अर्थसहाय्य न लागणे हे उत्तम.
नाही तर आयुष्यभर जपलेल्या मैत्रीची नको इतकी लक्त्तरे निघतात.
कारण त्या 'अर्था' वर आपण मैत्रीतील 'अर्था'चे ओझे लादतो.
आपल्या भविष्याची, पुर्वसुचना न देता येणाऱ्या वावटळींसाठी आपण आपली कवचकुंडले निर्माण करावी.
आपल्या लाडक्यांना, आपल्यासाठी, आपल्या मैत्रीपुढे हात पसरायला आपण भाग पाडू नये.
अर्थात भाग आपण पाडत नाही.
भाग परिस्थिती पाडते.
मात्र अशी हतबल परिस्थिती आपली होण्यास आपणच जबाबदार नसतो काय ?
आपली मैत्री आपल्या माणसांशी असते.
आपल्या जिवाभावाच्या ह्या माणसांनी त्यांच्या आयुष्याची गणिते मांडलेली असतात.
तशीही सध्याच्या काळात प्रत्येकाने आपले, आपल्या कुवतीप्रमाणे गणित हे मांडलेलेच असावे.
आपल्या चुकलेल्या गणितांसाठी, वा आपण कधी गणित मांडलेच नाही म्हणून, कोणा मित्राकडे 'हातचा' मागावा लागू नये. मैत्रीखातर आपल्याला 'हातचा' पुरवण्याने मग एकतर त्याचे त्याने मांडलेले गणित चुकते…
वा…
आपली इतक्या वर्षांची मैत्री…आणि त्यातून एक हातचा देखील उसना मिळू नये ?
असे घातकी विचार आपल्या मनात येऊ लागतात.
तशीही आयुष्य ही एक वजाबाकी.
आयुष्याच्या दिवसांची, रोजची वजाबाकी.
आणि परिस्थितीने निर्माण झालेली आपल्या भोवतालच्या मित्रांची वजाबाकी.
आपण थोडे जबाबदारीने वागलो, तर मात्र ही दुसरी वजाबाकी आपण थांबवू शकतो.
मैत्री आणि अर्थ.
मैत्रीचा अर्थ.
अर्थपूर्ण मैत्री.
मैत्री.
आयुष्याचा अर्थ.
तात्पर्य:
अर्थ आणि मैत्री.
आपण आपले दोन ध्रुवांवर ठेवावे.
खिळा मारून.
अढळ.
नाहीतर हातातील मधुर पेयामध्ये, आपल्याच हाताने विष मिसळल्यासारखे.