नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 21 April 2013

मी माझा यमराज…

काल रात्री बाबुलनाथ समोरील रस्त्यावरून घराकडे परतत असताना…
उजव्या हाताचे वळण घेण्याकरिता एक सिग्नल लागतो. सिग्नल हिरवा होता. गाडी मी चालवित नव्हते. समाजाचे जाणकार व सुजाण नागरिक व आमचे कौटुंबिक मित्र गाडी चालवित होते. गाडी काही फारशी वेगात नव्हती. त्यांनी वळण घेतले व त्याचवेळी एक तरुणी मोठ्या आत्मविश्वासाने पुढे सरसावली. रस्ता पार करू लागली. मित्राने गाडीचा वेग कमी केला. तरुणीने रस्ता सुखरूप पार केला. झोकात वळून मागे राहिलेल्या तिच्या मित्रमंडळींकडे मोठ्या अभिमानाने बघू लागली. चेहेऱ्यावर हसू आले की चेहरा सुंदर दिसू लागतो.
"मी गाडी पार शेवटच्या क्षणापर्यंत नेली असती." मी म्हटले.
"मी नाही नेली."
"का ?"
"कारण माझं असं मत आहे की समोरचा चुकला म्हणून आपण चूक करू नये."
"पण मग तो चुकला हे कसं त्याला कळणार ? आता ती मुलगी कसा मी सिग्नल तोडून रस्ता ओलांडला ह्या आत्मविश्वासात पुढचे आयुष्य जगणार आहे. व हा असा आत्मविश्वास वाढल्याने ती आजतोवर जसे हेच करीत आली आहे तेच ती पुढेही करीत रहाणार आहे."
"तू काय केलं असतंस ?"
"मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गाडी आहे त्याच वेगात नेली असती, व तिला निदान एक क्षण तरी अतीव भीतीचा जगणे भाग पाडले असते. माझा स्वत:च्या ड्रायव्हिंगवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी बरोबर शेवटच्या क्षणाला गाडी थांबवली असती. मनात येईल तेव्हा सिग्नल तोडून, रस्ता ओलांडून आपण फारच मोठे शौर्याचे काम केले आहे हा असला फालतू आत्मविश्वास मी तिला मिळवून दिला नसता !"
"आणि आयत्या वेळी तुझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला असता तर ?"
"ह्म्म्म…हरकत नाही…मी तुरुंगात गेले असते…कारण पादचारी कितीही चुकला तरीही गाडीचालकावरच गुन्हा दाखल करण्याची आपल्या देशाची रीत आहे. नियम पाळणे महत्त्वाचे. हे अशी रोज उठून आयुष्याची भीक मागणे फार चुकीचे."

परवा एकदा मी हिंदू कॉलनीच्या गल्लीतून बाहेर पडून डाव्या हाताचे वळण घेण्यासाठी थांबले होते. पुढे महिला पोलिस कार्यरत होती. व तिने गल्लीच्या सर्व गाड्या रोखून धरल्या होत्या. माझ्या गाडीच्या उजव्या हाताला एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांची बाईक घेऊन अवतरले. मागे दोन्ही पाय एका बाजूला घेऊन बसलेली त्यांची स्थूल आकाराची पत्नी. व पुढे दोन मुले. साधारण पाच आणि आठ वयोमानाची. मला चांभारचौकश्या फार. मी काच खाली केली.
"अहो साहेब."
"बोला."
"तुम्ही हेल्मेट घातलंत…"
"हो…म्हणजे काय ? घातलेचे."
"पण मग मागे बसलेल्या बाईसाहेबांनी आणि तुमच्या दोन मुलांनी ?"
"ते ठीके ओ. "
"ठीके कसं ? हल्लीच मी किमान असे दोन अपघात वाचले. चालकाने हेल्मेट घातलं होतं आणि ट्रकने उडवलं. मग तो चालक वाचला…त्याची बायकापोरं मेली. आपल्या माणसांवर आपलं प्रेम नसतं का ओ ?"
"चुकताय तुम्ही" साहेब मला म्हणाले.
"असेल ना…पण सांगा ना तुम्ही मग…मी कुठे चुकतेय ते." मागे बसलेल्या बाईसाहेबांनी माझ्याकडे अतिशय निर्विकार कटाक्ष टाकला. दोन्ही मुले माझ्याकडे वळून पाहू लागली. त्यांच्या बापाशी हे असे बोलण्याची कोणाची टाप झाली हे त्यांना बघावेसे वाटले की काय असे माझ्या मनात आले.
"साफ चुकीचे विचार आहेत तुमचे."

खरं तर मी माझा मुद्दा असा कधी अर्धवट सोडत नाही.
परंतु गत्यंतर नव्हते. महिला पोलिसांनी आमची गल्ली सोडली. एखाद्या धरणाचे बांध मोकळे केल्यावर पाणी जसे ओसंडून वहाते तशा सगळ्या गाड्या टिळक ब्रिजवर ओतल्या गेल्या.

बाईंच्या यजमानांचे रूप धारण करून खरे तर यमराज आपल्या रेड्यावर स्वार झालेले नसावेत...
एव्हढाच विचार मनाशी धरून मी माझा रथ पळवू लागले.


1 comment:

सौरभ said...

:D let it go :D :P