नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 14 March 2013

देवावर विश्वास ?

"तुझा देवावर विश्वास आहे ? आश्चर्यच वाटतंय मला !"
माझी मैत्रीण मला जेव्हा असं म्हणाली तेव्हा मी थोडी विचारात पडले.

माझ्या बाबांचा देवावर विश्वास होता का ? होता. परंतु, आपला देवावर विश्वास आहे ह्याचा पुरावा उभा करण्यासाठी वा इतर कुठल्याही कारणासाठी ते कुठल्या देवळात गेले नाहीत. त्यांना थोडा जरी रिकामा वेळ मिळाला तरी ते लगेच आपल्या पुस्तकांच्या विश्वात शिरत असत. व मग आम्ही तीन लेकी आणि त्यांची बायको हा संसाराचा व्याप त्यांना तसा त्रासदायकच वाटे.
म्हणजे पुस्तकं हेच त्यांचं दैवत होतं.

माझ्या आईचा देवावर विश्वास आहे काय ? आहे. परंतु, तिला थोडा मोकळा वेळ मिळाला की ती लगेच आपल्या थकलेल्या शरीराला पीडा देऊन नातवंडांना आवडणारा एखादा पदार्थ करते. त्यातून तिला पाच नातवंडं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या पार उत्तर दक्षिण ध्रुवाइतक्या एकमेकांशी फारकत घेतल्यागत. आमच्या गल्लीच्या टोकाशी असलेलं शंकराचं मंदिर तिचं फार लाडकं. मात्र तिथेही ती वर्षातून एखादवेळी गेली तर. म्हणजे कदाचित देवालाच कधी वाटलं ही बाई बऱ्याच दिवसांत इथे दिसली नाही, आणि म्हणून त्याने कधी तिचे पाय त्याच्या दिशेने वळवले तरच ! 
आईचे दैवत म्हणजे स्वयंपाकघर.

बहिणी ?
एका बहिणीचे दैवत हे 'गणित हा विषय' आणि विद्यार्थ्यांना तो क्लिष्ट विषय 'प्रेमाने शिकवणे' हे आहे. आणि दुसऱ्या बहिणीची एकूण पाच दैवतं आहेत. माझी लेक, आमच्या दुसऱ्या बहिणीची दोन मुलं आणि तिच्या स्वत:च्या दोन लेकी. ही तिची दैवतं खुष की भक्त खुष.

माझी काय कथा आहे ?
माझा देवाच्या बुद्धीचातुर्यावर गाढा विश्वास आहे. म्हणजे आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आपल्याला अजिबात कळत नाही आणि तो मात्र सगळं 'सेटिंग' बरोबर करीत असतो ह्याच्यावर माझा फारच विश्वास आहे. आणि हा विश्वास त्याने स्वकर्तुत्वाने मिळवला आहे. आज मी जी काही घडले, हे त्याने मला घडवले. कित्येकदा पाडले, अनेकदा ठेचाळले. मात्र हे सर्व काही त्याने ठरवून माझे अगदी 'ट्रेनिंग' केल्यासारखे केले. त्यामुळे हा माझा त्याच्यावरचा विश्वास त्याने स्वत: कमावलेला आहे. त्या विश्वासाला त्याने आजतागायत तडा जाऊ दिलेला नाही.

आणि त्यातून देव सर्वत्र आहे हे मला फार पटते. त्यामुळे हातातली कामं टाकून देवळासमोरील रांगेत उभे रहाणे मला कधीही जमलेले नाही. माझी कामं करण्याची क्षमता, आणि त्यातील वैविध्य हे देवाने आणि मी एकत्र कमावलेलं आहे. मी आपली आहे त्या जागी त्याला नमस्कार करते, आणि पुढे आलेल्या कामाचा फडशा पाडते. माझा त्याच्यावरील विश्वास हा मी उरकलेल्या कामातून त्याच्यापर्यंत पोचतो. रांगेत उभे राहून वेळेचा दुरुपयोग करीत दिलेला पुरावा, माझ्याकडून त्याला अजिबात अपेक्षित नसतो. आणि तसंही देवळात एखाद्या गेलं की तो हळद कुंकू, फुलं लावण्याचा क्रम माझ्या कधीही लक्षात रहात नाही. मग मी आपली माझ्या पुढे असलेल्या माणसाकडे लक्ष ठेवते, आणि त्याने वा तिने ज्या क्रमाने जे काही वाहिलं असेल तसं वहाते आणि नमस्कार करून त्या प्रसंगातून बाहेर पडते.

"माझा 'देवावर' म्हणजे त्याच्या दूरदृष्टीवर विश्वास आहे." मी मैत्रिणीला म्हटले.
तिला त्यातील अर्थ कळला की नाही कोण जाणे. माझ्यापुढील कामाची 'डेड लाईन' त्यावेळी अधिक तातडीची होती.
आणि मला त्याच्या विश्वासाला तडा देणे फारसे आवडत नाही.
:)

6 comments:

Anonymous said...

खरंय, जसा भाव तसाच देव असतो...

अन आपण त्याच्यावर विश्वास ठेवला न ठेवला तरी फरक नाही पडत त्याला! तो मात्र आपल्यावर केवढा विश्वास ठेवतो...

आपण त्याच्या अस्तित्त्वावरच वाद घालत असताना, किती किती नात्यामधून आपल्यावर तो प्रेम करत राहतो...

आणि सेटिंगचा मुद्द्दा बेहद्द मान्य आहे! खरंच खूप ट्रेनिंग दिलंय त्याने काहीही फी न घेता...

खूपच गोड पोस्ट अहे!

swarup said...

खूपच छान !!!

Abhishek said...

देव सर्वत्र आहे; म्हणजे कुठेच नाहीये...
हे वाक्य when everything is special; nothing is... वर आधारित आहे... लॉजिकली बसत की नाही, संभ्रम आहे... शेवटी आहे म्हटलं तरी न मानणारे तोच बनवतो... त्याची लीला, माया, कीर्ती,..., etc(महिलादिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा) अगाध आहे

Prof. Narendra Vichare said...

अनघा, एखाद्याने एखादे ईप्सित साध्य करण्याकरीता सर्व मानवी प्रयत्न केल्या नंतर मात्र मी त्या व्यक्तीला धीर देण्याकरिता " आपण आपले प्रयत्न केले, आता याच्या पुढे देवाक काळजी " असा आशावाद दाखवितो.

Shriraj said...

माझा ही देवावर विश्वास आहे... आणि त्याहून जास्त देवत्वावर

सौरभ said...

:) ekjacktly :)