नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 27 February 2013

मित्र

खरं तर ही काही 'पोस्ट' नव्हे. आणि 'पोस्ट' ह्या इंग्रजी शब्दाचे मराठीमध्ये भाषांतर म्हणजे 'लेख'...तो तर हा नव्हेच. हे विचार आहेत. माझ्या मनात आलेले. माझ्या अनुभवांवर बेतलेले.

आयुष्याचा जोडीदार शोधला...आणि तो मित्र असावा असा हट्ट धरला. अपेक्षा धरली. मित्र ह्याची व्याख्या होईल काय ? आणि एखाद्या स्त्रीला मित्र असावा काय ? किंवा असा मित्र तिने शोधावाच का ? तिला गरजच काय ? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहू शकतात. वा कदाचित तुम्ही ज्या वातावरणात मोठे झाला असाल, त्याला अनुसरून असे प्रश्न तुमच्या मनात येणार देखील नाहीत. परंतु, पती हा, परमेश्वर सोडा पण निदान मित्र तरी असावा असा मी नाहक हट्ट धरला. आणि ह्या हट्टाचे परिणाम देखील भोगले.

शाळेमध्ये हे मित्रबित्र प्रकरण असण्याची वेळच आली नाही. कारण मुळातच आम्ही मुली, मुलांशी बोलत नसू. साधं कुठे एखाद्या मुलाच्या बाजूने जाण्याचा प्रसंग ओढवलाच तर 'साईड प्लीज' असे म्हणून तिथल्या तिथे उभ्या रहात असू. व तो मुलगा बाजूला झाला तर त्याच्या भवताली फिरणाऱ्या हवेच्या कणांचा देखील आपल्याला स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घेत आम्ही पुढे सरकत असू. मात्र कॉलेजमध्ये पाऊल टाकले आणि हे चित्र बदलून गेले. आसपास बिनधास्त फिरणारी मुलं दिसू लागली. व ती पुढे येऊन आम्हा मुलींशी बोलू वगैरे लागली. परंतु, एखाद्या मुलाला मित्र म्हणण्याची हिंमत प्रत्येकीने प्रत्येकीच्या स्वभावधर्मानुसार वेगवेगळा काल व्यतीत करून मिळवली. 
नाहीतर रक्षाबंधन हे नेमेचि येतेच.

माझा नवरा जेव्हा कॉलेजमध्ये सहविद्यार्थी म्हणून माझ्या समोर आला, त्यावेळी त्या क्षणी मी प्रेमात पडले. आणि अगदी ह्याच्याशीच लग्न वगैरे आयुष्याचे निर्णय मनाने आपोआप घेऊन टाकले. म्हणजे, हा समोर दिसणारा हुशार विद्यार्थी, एक मित्र म्हणून कसा आहे हे समजून घेतले गेले नाही. प्रियकर आणि मग नवरा. झालं. इतकं सगळं सोपं हे त्या कोषातील वयामध्ये वाटलं. आणि त्यातूनच मग आपला नवरा हा आपला मित्र तर असणारच असा समज नकळत करून घेतला गेला. त्याला कोणताही पुरावा नव्हता. कुठल्याही प्रसंगात तो आपल्यासाठी फक्त 'मित्र' म्हणून उभा राहू शकतो काय ह्याचा विचार करता येण्याइतकी माझ्या बुद्धीची कुवत तेव्हा नव्हती. ह्या सर्व गोष्टी अनुभवानेच शिकल्या जातात. वा पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशा प्रकारे.

आज माझा जिवलग मित्र, अतिशय आजारी आहे. प्रथम...मलेरिया असेल, नाहीतर विषमज्वर, किंवा डेंग्यू...ते नाही तर कावीळ...आणि शेवटी तीही नाही म्हणता तर क्षयरोग असावा असे स्वत:चे समज करून घेत होता. आणि साक्षात कर्करोग उभा ठाकला.
"हे असं काही मला होईल असं कधी वाटलंच नाही गं मला."
आपण कर्ण आहोत....कवचकुंडलं घेऊन जन्माला आलो आहोत...असंच आपल्याला का वाटत रहातं ?
शरीर एक रणक्षेत्र मानावे तर कर्करोगाने आपले सैन्य चारी दिशांना पसरवलेले आहे.
पुढचा लढा. अनिश्चित.

मित्र, हा असा असावा ज्याच्यापुढे मन मोकळे करून बोलता यावे. मनाची डूब अपार असते. आपल्या मनाची खोली आपल्यालाच कळत नाही. परंतु, आपण एखादी घागर पुरती रिकामी केली तर त्यातील गाळ देखील बदाबदा बाहेर येतो. व घागर घासून, चकाकवून पुन्हा फडताळावर ठेवता येते. हा माझा मित्र, पुरुष असल्याने मला विचारांचा तो एक वेगळा आरसा समोर आणून देतो. एखाद्या घटनेचा मी एक स्त्री म्हणून विचार करीत असेन तर त्याच प्रसंगाचे दुसरे रूप. मी त्याच्या समोर धरलेला आरसा, 'हा माझ्या ओळखीचाच नाही' असे म्हणून त्याने कधी धुडकावून लावला नाही. तर त्या उलट माझ्या आरश्यात डोकावून मग तो त्या आरश्याची मागील बाजू माझ्या समोर आणून ठेवत असतो. आजतागायत हे असेच झाले आहे. माझ्या आयुष्यात किती असे प्रसंग आले जेव्हा माझा बांध फुटला आहे. समोर पसरलेला राणीच्या नेकलेसचा भर भरतीचा उसळता समुद्र आणि माझ्या डोळ्यांचा गदगदणारा समुद्र. हे दोन्ही त्याने तितक्यात शांतपणे, तटस्थतेने निरखले. मला सावरले. अंगाला एका बोटाचाहि स्पर्श न करता. जेव्हा भरती येते त्यावेळी समुद्र आपल्या पोटात दडलेले सर्व किनाऱ्यावर आणून टाकून जातो. मी ही तेच केले. काहीही न लपवता...मी ह्या माझ्या किनाऱ्यावर मोकळी होत होते.
माझा किनारा.
त्याने ना कधी आलेल्या लोंढ्याला थांबवले.
ना ते कवटाळले.

किनारा नसलेला समुद्र धोक्याचा.


Sunday, 10 February 2013

पुन्हा वाचन आणि चित्रपट...

मनाशी काही निश्चय करून नव्हे परंतु, बऱ्याचदा वाचलेली पुस्तके व पाहिलेले चित्रपट ह्यात, जगभरातील स्त्रिया, त्यांच्यावरील अन्याय व अत्याचार, त्यांच्या स्त्रीत्वाविषयी भूमिका, ह्या संदर्भात वाचले जाते व ते मनात कुठे ना कुठेतरी कोरले जाते. त्यात कधी स्वत:ला गुंफले जाते. आपल्यावर कळत नकळत झालेल्या अन्यायाविषयी चिंतन केले जाते.

सर्वात प्रथम आठवण होते ती चिमुकल्या 'हायडी'ची.
आल्प्ससारख्या बर्फाळ प्रदेशात, आपल्या आजोबांसमवेत रहाणारी चिमुरडी हायडी. माझ्याकडे हे पुस्तक आहे. टीव्हीवर फारा वर्षांपूर्वी दाखवली गेलेली अॅनिमेशन सिरीज देखील मी मोठ्या प्रेमाने बघितली होती. ती बागडणारी, रुसून बसणारी हायडी, आजोबांपासून दूर पाठवली गेल्याकारणाने सतत आजारी पडू लागलेली हायडी माझ्या लेकीइतकीच माझी लाडकी होती. आणि ज्यावेळी ही सिरीज टीव्हीवर दाखवली गेली त्यावेळी माझी लेकही त्याच वयाची असल्याकारणाने तर माझा जीव हायडीवरील संकटे बघून तीळतीळ तुटे. पुस्तक आणि चित्रपट ह्यांची जर तुलना केली तर माझे झुकते माप नेहेमी पुस्तकाकडे जाते. परंतु, हायडीच्या बाबतीत मात्र माझे तसे होत नाही. छोट्या पडद्यावर बागडणारी हायडी ही माझी दुसरी लेक होती, जी रोज अगदी दुपारी ठरलेल्या वेळी माझ्या पुढ्यात येई. तिच्या वेदना माझ्या होत. तिचे डोळे माझे होत...आम्हां दोघींचे अश्रू, एकाच वेळी आमच्या गालावर ओघळू लागत.

'मेमॉयर्स ऑफ गेशा'.
हे पुस्तक मी आधी वाचले. नंतर चित्रपट बघितला गेला. चित्रपटाने खोल आतवर जपानमधील चित्र नक्की नजरेसमोर दिले. परंतु, पुस्तकात चियोबरोबर तिच्या बालपणापासून मी मोठी झाले. तो अनुभव मला त्या चित्रपटाने नाही दिला. तिथे मी त्रयस्थच राहिले. व चियो माझ्यासमोर तिच्या आठवणी फक्त चित्ररुपाने दाखवित गेली. पुस्तकाने मात्र मला भरपूर दिले. जपानमधील एक स्त्री, तिचे अगदी लहान वयापासून गेशा म्हणून तयार होत जाणे, त्यासाठी तिने घेतलेले कष्ट, त्यातील व्यावसायिक चढाओढ, स्वार्थ, सूड ह्या सर्व भावना मला आत्मचिंतन करावयास भाग पाडू लागल्या. आमचे देश, त्यातील संकल्पना वेगळ्या, परंतु, काय चियो फक्त जपानी होती ? मला असे नाही वाटले. ती एक स्त्री होती, तिच्या देशातील, बालपणी तिच्यावर लादले गेलेली निवड, व समज आल्यावर आयुष्यातील काही चुकीचे तर काही बरोबर घेतलेले गेलेले निर्णय, त्यासाठी तिने केलेले विचार हे पुन्हा आम्ही दोघींनी एकत्र बसून केले. चित्रपट पाहिल्यावर ही चियो माझ्यापासून अक्षरश: दूर जाऊ लागली. चित्रपटाने, आम्हां दोघींमध्ये एक भिंत उभी करू घातली. व प्रयत्नपूर्वक मला त्या भिंतीची एकेक वीट पाडावी लागली.

पर्ल बक ह्या जगप्रसिद्ध लेखिकेची 'पिओनी'.
१८५० मध्ये चीनमधील ज्यू कुटुंबामध्ये विकली गेलेली चिनी पिओनी. त्या घराने तिला नोकरापेक्षा वरची परंतु, लेकीपेक्षा खालची जागा दिलेली आहे.  आपण एकेक पान उलटत जातो. ती व त्या घरातील एकुलत्या एका मुलाचे बालपण, एकत्र हसणे, खेळणे, मग तारुण्यात पदार्पण, तिचे त्याच्या प्रेमात पडणे....परंतु, त्याच्याशी विवाह अशक्यप्राय असणे...आयुष्याचे हे कटू सत्य तिने जिरवणे, परंतु तरीही त्याच्या दिमतीला सदैव तैनात असणे...हे सर्व व अजून काही आपण तिच्याबरोबरच जगतो. आयुष्यात तिने घेतलेला शेवटचा निर्णय आपण देखील स्वीकारतो. त्या निर्णयाबरोबर जे जीवन पिओनी स्वीकारते....आपणही स्वीकारतो. शेवटचे पान आपल्यासमोर कधी आले ते कळत नाही. पुस्तक आपण बंद करतो. आपला पुढला दिवस मग पिओनी शिवाय उजाडतो. मात्र आपली खात्री असते....आपण पिओनीला जिथे सोडून आलो आहोत....ती तिथे सुरक्षित आहे. एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात तिच्या मनाविरुद्ध, शरीराविरुद्ध कुठलीही घटना आता ह्यापुढे घडणार नाही. 
माझ्या माहितीप्रमाणे ह्या कादंबरीवर चित्रपट आलेला नाही. आणि ते मला बरेच वाटते.

२००८ साली आलेला प्रियांका चोप्राचा 'फॅशन'.
ह्यावरील कादंबरी असण्याची शक्यता दिसत नाही. जाहिरातक्षेत्रात वावरत असल्याने ह्या क्षेत्राचे व बॉलीवूडचे नाते माझ्या ओळखीचे आहेच. वडिलांच्या इच्छेविरुद्ध चित्रपटात नाव कमावण्यासाठी घरातून एकटीच बाहेर पडलेली मेघना, मला फारशी अनोळखी वाटत नाही. ज्या मुलींबरोबर मी रोज काम करीत असते त्यातील बऱ्याच मुली अशाच कुठल्या ना  कुठल्यातरी छोट्या शहरातून, शिकून आता इथे मुंबईत स्थायिक झाल्या आहेत. मी फारशी 'पार्टी पर्सन' नसले तरीही काही पार्ट्या ह्या टाळता येण्यासारख्या नसतात. मग त्यातील दारू, नृत्य हे सर्व आपल्यासमोर बेभान होत जातं. आपण तिथे असतो, व नसतो देखील. आणि जेव्हा दुसरा दिवस उजाडतो, तेव्हा काल रात्री आपण जे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेले असते, ते आपल्या स्मृतिकोषातून कायमचे हद्दपार करावयाचे असते. इथे हे आपल्याला पटले, नाही पटले ह्याचा काडीचाही संबंध आपण ठेवायचा नसतो. कुटुंबाशी संबंध तोडून टाकावे लागलेली मेघना, आपल्या व्यवसायक्षेत्राची एकेक पायरी ज्या वेगाने चढते त्याच वेगाने घसरत जाते. बेधुंद अवस्थेत  असताना अनोळखी माणसाबरोबर एका बिछान्यात तिला एके दिवशी जेव्हा जाग येते त्यावेळी तिला धक्का बसतो. ती उध्वस्त होते. आपण हे काय करीत आहोत, ह्याचा तिला विचार करावासा वाटतो. त्या प्रसंगातून मला जाणीव झाली होती ती एकच. माणसाला आपल्या माणसांची, आपल्या कुटुंबाची, त्यांच्या मानसिक आधाराची गरज असते. तेच त्याचे मनोबल असते. भान आल्यावर, आपल्या आई वडिलांच्या पाठींब्याच्या बळावर, पुढे जेव्हा जेव्हा त्याच क्षेत्रात ती पुन्हा उभी राहू पहाते, तेव्हा कुठलाही अडथळा तिला रोखू शकत नाही. तिला टाळ्यांच्या कडकडाटात खंबीर उभी राहिलेली पहातच आपण चित्रपटगृह सोडतो.

पुन्हा पुस्तक.
पर्सपोलीस. मारीजान सत्रपी ह्या इराणी मुलीच्या आठवणी, कॉमिक पुस्तकाच्या काळ्या पांढऱ्या चित्रपटलातून आपल्या समोर येतात. ती वयाच्या तिच्या सहाव्या वर्षापासून आपल्याला आठवणी सांगत आहे...ते थेट तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत. तिच्या ह्या आठवणींना पार्श्वभूमी आहे इराणमधील बदलांची. त्यातील चित्रे नीट बघितली तर आपल्याला त्यात बऱ्याच वेळा काही प्रतीके सापडतात. मिश्र शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अचानक स्त्रियांवर बुरखा घेण्याची सक्ती करण्यात येते. व मग मारीजान व तिच्या चिमुरड्या मैत्रिणी हा बदल कशा प्रकारे स्वीकारतात ते चित्रात बघण्यासारखे आहे. तिचे मध्यमवर्गीय आईवडील हे पुढारलेल्या विचारांचे व सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या बाहेर होणाऱ्या धार्मिक व राजकीय बदलांवर त्यांच्या आपापसात चर्चा ह्या रोजच्याच आहेत. त्या ऐकतच मारीजान मोठी होत असते. व त्यातून तिला स्वतंत्र विचार करण्याची सवय होत जाते. मात्र ज्यावेळी तेहरान मधील परिस्थिती इराकच्या हल्ल्याने अतिशय अस्थिर होते, त्यावेळी आपल्या लाडक्या लेकीला आपल्यापासून दूर ठेवण्याचा, परदेशी पाठवण्याचा निर्णय तिचे आईवडील घेतात. त्यानंतर तिचे आयुष्य कशी वळणे घेत जाते, ती कधी कुठे आणि कशी भरकटते, ती कशी स्वत:ला सावरते, हे सर्व चित्रातून आपल्यासमोर येत जाते. मला वाटतं मारीजानचे आयुष्य आपण चित्रात बघतो, ही त्या गोष्टीची शक्ती आहे. हेच जर शब्दांत आपल्या समोर आले असते, तर ते इतके परिणामकारक झाले नसते. ह्या पुस्तकावर अॅनिमेशन चित्रपट केला गेला आहे. मी तो बघितलेला मात्र नाही. मात्र ज्या ज्या वेळी माझ्या कामामध्ये अॅनिमेशन वापरण्याची शक्यता येते, त्यावेळी मी नेहेमीच ह्या चित्रपटाची युट्यूबची लिंक समोरच्याला दाखवत असते. संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग मात्र नाही आलेला. नेहेमीप्रमाणे इथे देखील मी  मारिजानच्या गोष्टीजागी स्वत:ला ठेवून बघते. शहर असुरक्षित झाल्याने मी माझ्या छोट्या लेकीला कुठे परदेशी पाठवेन काय असा मी स्वत:ला प्रश्न विचारते. उगाच. आणि माझे स्वत:ला उत्तर हे नकारार्थी येते. काय व्ह्यावयाचे आहे ते आपले एकत्रच होऊ दे...पण माझ्या मुलीला युद्धप्रसंगी जगात एकटी मी पाठवू शकत नाही असे मला वाटते. 
हे पुस्तक अजून शक्तिशाली होऊ शकले असते, त्यात कुठेतरी काहीतरी कमी पडते आहे असे मात्र मला फार वाटते.

ह्या अशा जगभरच्या स्त्रिया. त्यांच्या कधी हळव्या, कधी आपल्याला जगण्याचे बळ देणाऱ्या कथा. 
मध्यंतरीच्या काळात काही वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या एका स्त्रीची मुलाखत वाचनात आली होती. त्यात तिने एक वाक्य म्हटले होते, ते मला फार काही सांगून गेले होते. पटून गेले होते. 'एक घटना म्हणजे आयुष्य नव्हे. आयुष्य बरेच काही असते, वेगळेच असते.' एखादी घटना आपले आयुष्य नक्कीच बदलून टाकते. परंतु, ती एक घटना म्हणजे आपले आयुष्य नसते. फक्त कोणतीही एक घटना जेव्हा घडते त्यावेळी ती आपल्यावर आदळते, आपल्याला आरपार छेदून जाते. परंतु, खरेच ती घटना म्हणजेच आयुष्य असते काय ? की आयुष्य त्यापलीकडले असते ? अचानक कोणी खोल विहिरीत ढकलून दिल्यावर आपण हातपाय मारतो, वर येतो...घुसमट होताहोता पहिला श्वास घेत. तोच श्वास महत्वाचा असतो....आणि त्यापुढील आपला प्रत्येक श्वास हा आपल्याला हात मारावयास शिकवतो....आणि आपण 'आपला' तलाव पोहू लागतो....नव्या दमाने.