नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 23 December 2012

ओळखपरेड

लहानपणी पातळ पुस्तकं मिळत असत. मोठ्या अक्षरांची. A४ हून लहान आकाराची. सोनेरी सफरचंद...उडता घोडा वगैरे. त्यातील राजकन्या रूपवती असे...अचानक एके दिवशी अतिशय भयावह राक्षस तिला पळवून नेत असे. दूर दूर उंच उंच पर्वतावर तिला ठेवीत असे. ही बातमी वाऱ्यासारखी दुनियाभर पसरे. दिवसांमागून दिवस उलटत. आणि कुठूनतरी एक रुबाबदार राजपुत्र उडत्या घोड्यावर बसून येई. राक्षसाशी तुंबळ युद्ध करी. त्याचा समूळ नायनाट केल्यावर राजपुत्र त्याच उडत्या घोड्यावर राजकन्येला घेऊन स्वार होई. तिला तिच्या देशात, तिच्या महाली घेऊन येई...तिच्याशी विवाह करून...पुढे कित्येक वर्षं सुखाने राज्य करी.

त्यानंतर आयुष्यात आला रावण. त्याने सीतेला खांद्यावर बसवून पळवून नेले. अशोक वृक्षाखाली तिला विद्रूप राक्षसीणींच्या बंदोबस्तात ठेवले. आणि तिची रोज मनधरणी केली. तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून. 

पुढील आयुष्यात अनेक राक्षसांशी ओळख झाली. नरकासुर, महिषासुर, कंस वगैरे वगैरे. नरकासुराने असंख्य स्त्रियांवर अत्याचार केले. त्या त्या देवाने जन्म घेऊन त्या त्या राक्षसाचा वध केला. वेळोवेळी मानवजातीला जगणे सुसह्य करून दिले.

शाळेत जाण्यासाठी बस होती. इमारतीच्या खाली सकाळी बस येत असे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आणून सोडत असे. बसने मुलगी गेली तर ती सुरक्षित राहील अशी आई बाबांची खात्री होती. सात आठ वर्षांची असताना आमच्या शाळेच्या बसचा क्लिनर 'घाणेरडा' होता. लहान लहान मुलींना आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या शरीराशी तो चाळे करीत असे. हे चुकीचे आहे आणि ह्याविरुद्ध आपण तोंड उघडावयास हवे...आपल्या आईबाबांना सांगावयास हवे हे कळले नाही...कोणालाच.

रस्त्यात अचानक एखाद्या रिकाम्या गल्लीत एखादा माणूस स्वत:च्या शरीराशी विचित्र चाळे करीत असताना आढळे. त्यावेळी दुसऱ्या पदपथावर जाउन खाली मान घालून चालू पडावे.

कॉलेजसाठी बेस्टच्या बसने येजा करावी लागे. मुद्दाम आपल्या शरीराला हात लावला जात आहे हे कळले की आपण गर्दीतून कसेबसे सरकावे व कुठल्यातरी एखाद्या कोपऱ्यात उभे रहावे.

आपल्याच तंद्रीत इमारतीत शिरावे आणि अचानक पाठून कोणी शरीराला विळखा घालावा. आपण आकांताने किंचाळावे....माणसे जमा करावीत...चेहरा नसलेला माणूस पळून जावा...कोणाच्याही तावडीत न सापडता.

अशा प्रकारचा अनुभव एखाद्या माझ्या सखीला तिच्या आयुष्यात आलाच नसेल हे अशक्य.

राक्षस पुस्तकात वाचले. तेव्हा प्रश्न पडले नाहीत. पण आता पडतात...राक्षस राजकन्येला जेव्हा कैद करून ठेवत असे, काय तेव्हा तो तिच्यावर बलात्कार करीत असे ? ज्यावेळी राजपुत्र राक्षसाचा वध करून राजकन्येची सुटका करीत असे त्यावेळी तिची अवस्था नक्की कशी असे ? त्या अवस्थेत तिला पाहून देखील काय राजपुत्र तिचा पत्नी म्हणून स्वीकार करीत असे ?

रावणाने सीतेची फक्त मनधरणी केली व तिच्यावर बलात्कार केला नाही अशी आपली समजूत आहे की रावण हा एक सद्गुणी राक्षस होता ?

थोरामोठ्यांसमोर स्वाक्षऱ्या केल्या म्हणून नवऱ्याला स्वत:च्या सुखासाठी बायकोवर बलात्कार करण्याचा काय राजरोस कायदेशीर अधिकार मिळतो ?

स्वत: दारू पिऊन मदमस्त झाल्यावर आपला मित्र आपल्या बायकोवर हात टाकतो आहे ह्याचे भान देखील न ठेवणाऱ्या नवऱ्याचे 'राजपुत्राचे देखले कवच' गळून पडलेले बायकोला कळते...मग हे त्याच्या लक्षात कधीच येत नाही काय ?

सादत हसन मंटो. त्याची 'खोल दो' कथा. अवाक करून गेली. पोटात खड्डा पडला...त्यातील तरुण मुलगी आता आपल्या जिवंतपणी आपल्या नजरेपासून कधीही दूर जाणार नाही...हे कळले.

राक्षस सद्गुणी होते.
कारण त्यांच्या माता राक्षसीणी होत्या...बाप राक्षस होते.
त्यामुळे ते बघताक्षणी ओळखू येत होते. कुरूप, अवाढव्य, दहा डोकी...इत्यादी.
आता माणसाने राक्षसाला जन्म घालावयास सुरवात केली आहे.
त्यामुळे आता त्याचे डोळे त्याच्या आईसारखे...नाक बापासारखे...बोटे आजीसारखी...आणि केस आजोबांसारखे.
इंद्रिय मात्र राक्षसाचे.

सखे, आपणच तर ह्यांना जन्म देणार...
मग आता आपण ह्यांना कसे ओळखायचे ?
आणि आपले देव तर आपण मंदिरांत नेऊन बसवले.
त्यामुळे त्या देवळातील मुर्तींतून बाहेर प्रकटबिकट होऊन आपल्या लज्जारक्षणासाठी साड्यांच्या स्पेशल इफेक्टची शक्यता देखील शून्य.
बघ बाई.
राक्षसाची जन्मदात्री देखील तूच.
आणि त्याच्या शरीराखाली चोळामोळा होऊन फाटून निघणारी देखील तूच.

14 comments:

Suhas Diwakar Zele said...

... !!!

रोहन... said...

:(

सौरभ said...

:-|

लिना said...

हेच नेमक चालू होतं गेले काही दिवस ...मेंदूचं भजं ...

श्रद्धा said...

shabdach nahiyet bolayala!!! :( :(

Abhishek said...

सुशिक्षित सुसंस्कृत.... भारतीय! :(
पुरोगामी की मागास! :(
विचार, अतिविचार की अविचार! :(
दिवसाचे ते सूर की रात्रीचे तेच असुर! :(
स्वत: विचार करू शकण्याची ऐपत बाळगतो तर कली ला का कोसतो? मंथन मंथन, खोल खोल, पण रत्नांच नाव नाहीये...

Anagha said...

सुहास, हे वाचून प्रत्येकाने त्यावर विचार करावा असे मला वाटते. कारण हे असे अनुभव कोणत्याही स्त्रीसाठी...त्यात तिच्या वयाचा काहीही संबंध नाही...काही नवीन नाहीत.

Anagha said...

रोहन, मला काही हळवे लिहायचे नव्हते...त्या उलट, विचारांना थोडी जरी चालना मिळाली तर मी हे लिहिले हे बरे झाले असेच मी मानेन.

Anagha said...

सौरभ...

Anagha said...

लिना, प्रत्येकीचे अनुभव वेगवेगळे....अंगावर काटा आणणारे.

Anagha said...

श्रद्धा, लिनाला म्हटले तेच मी तुलाही म्हणेन.

Anagha said...

हेरंब, ह्यात धक्कादायक असे काहीही नाही.

भानस said...

... :(:(

Yogesh said...

>>आता माणसाने राक्षसला जन्म घालायल सुरुवात केली आहे

ह्या सोबत अगदी १००% सहमत.

ताई...यामागील नक्की कारण काय असु शकेल?

आपण आपल्या संस्कृतीशी घेतलेली फ़ारकत....की चंगळवाद, की मृगजळाच्या मागे धावयची मनोवृत्ती ....की पाश्चत्य संस्कृतीच अंधानुकरण???

ज्या सनातन देशाच्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षे स्त्री ला दैवत मानल गेल त्याच भुमीमध्ये स्त्री ला केवळ उपभोगाची वस्तु म्हणुन पाहिल जातय.....चुक होते आहे हे समजतय पण ती सुधारण्याची कोणी कष्ट घेत नाही.