नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 15 September 2012

निर्वासित

एखाद्या साध्या दिवाणखान्यात जरी ते चित्र दिसलं असतं तरी ते मनात इतकं घर करून नसतं राहिलं. परंतु, त्या सुरेख चित्राची पार्श्वभूमी विसरता न येण्यासारखीच होती.

हनुमान गल्ली. एकदोन वर्षांपूर्वी दोन्ही बाजूच्या पदपथावरील झोपड्या महानगरपालिकेने उठवल्या होत्या. तो इतिहास झाला. सद्य परिस्थितीत निळे छप्पर डोक्यावर ओढून घेऊन संसार मांडले गेले आहेत. सकाळी कचेरीत जातेवेळी मी त्या गल्लीत शिरते त्यावेळी काही माणसे रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेल्या गाड्या धूत असतात. जाताजाता एका क्षणाची नजर कुठल्या झोपडीत गेलीच तर एखादी बाई, काळे केस मोकळे सोडून फणी फिरवत बसलेली आढळते. बाहेर रस्त्यावर एखादा पुरुष बालदीतील पाणी डोक्यावर ओतून घेत असतो. लहान पोरं इथेतिथे उड्या मारीत असतात. हे झालं नेहेमीचं चित्र. मग त्या दिवशीच्या चित्रात वेगळेपण काय होते ?
खरं तर मला तिथून दिसेनासे होण्यास काही क्षण पुरतात. तरी त्या दोघांनी माझं लक्ष वेधून घेतलंच. सातेक वर्षांची फिकट गुलाबी रंगाचा झगा घातलेली एक मुलगी. तिच्या डाव्या हाताला पाचसहा वर्षांचा मुलगा. दोघेही रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेले होते. त्या ताईने जमिनीवर एक पुस्तक पसरले होते. आणि ती हातवारे करून तिच्या त्या छोट्या भावाला त्या पुस्तकातील काही वाचून दाखवीत होती. दोघेही अगदी दंग झाले होते. भाऊ आणि बहिणीचा नातं कोणी सांगावे नाही लागत. ते उमललेलं दिसून येतं. त्या निळ्या प्लास्टिकमधून लटकलेलं दारिद्र्य, खाचखळग्यांनी फुटलेला ओला रस्ता...आणि आपले दोन्ही हात पसरवून रस्त्यावर पसरलेले, आभाळ अंगावर घेणारे ते ज्ञान. 
काही चित्रं भान हरपवून टाकणारी असतात.

अंदाज असा आहे मुंबईतील इतर अनेक झोपडपट्टींप्रमाणे ही झोपडपट्टी देखील निर्वासित बांगलादेशी लोकांनी वसवलेली आहे. त्यांचा काळा रंग, चेहेऱ्याची ठेवण. हा अर्थात माझा अंदाज आहे. आणि आता आजूबाजूच्या अनेक गावागावांतून, देशांतून मुंबईत शिरकाव करणाऱ्या लोकांबद्दल प्रेमभाव मनात आणण्याची ताकद माझ्यात शिल्लक राहिलेली नाही. वाढती गुन्हेगारी, जाळपोळ...हे सर्व माझ्यासारख्या सामान्य माणसांना भयावह आहे. हतबल करणारे आहे. त्यामुळे एखादी तरुण मुलगी एक पोर कुशीत घेऊन गाडीपाशी भीक मारायला उभी राहिली....बंद काचेवर ठोठावू लागली...की आता मला दयेचे पाझर नाही फुटत. तर अकस्मात तिरस्कार उफाळून येतो. दुसऱ्याच क्षणाला माझ्या ह्या भावनेचा त्याग करावासा वाटतो. आणि हे जे दंद्व माझ्या मनात काही क्षण सुरू रहाते त्याची पूर्ण जबाबदारी मला आमच्या निलाजऱ्या पुढाऱ्यांना द्यावीशी वाटते. शहरभर लटकलेले त्यांच्या थोबडांचे फलक दिसतात आणि तोंडात शिव्या येतात...किडे पडतील !

तसलीमा नसरीन ह्यांचे 'फेरा' मध्ये वाचले. बांगला देशाची फाळणी. पाकिस्तान फाळणी वेळच्या भयंकर कथा 'सादत हसन मन्टो' ह्या उर्दू लेखकाच्या पुस्तकांतून वाचनात आल्या होत्या. कधीतरी वाटतं आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यास जन्मास यावयास हवे होते. त्यानंतर मंटोच्या कथा वाचून धस्स होतं. वाटतं कदाचित आपण जन्म घेतला तोच काळ ठीक होता.

'जेव्हा देशातील विशिष्ट विचारसरणीची काही माणसे इतरांवर दबाव आणून आपल्या सुंदर मायभूमीला अक्षरश: उद्ध्वस्त करतात, 'माणुसकी'सारख्या परमोच्च मूल्यालाच मूठमाती देतात, तेव्हा घडणारे बदल हे त्या देशाला प्रगती ऐवजी अधोगतीकडे नेणारे असतात.' तीच कथा आहे 'फेरा'ची.
त्यातील प्रस्तावनेत लेखिका मृणालिनी गडकरी म्हणतात...'तसे पाहिले तर आपल्या मायभूमीबद्दल प्रेम असणे, आपल्या मायभूमीच्या मातीची ओढ असणे स्वाभाविक आहे. अशी ओढ, असे प्रेम माणसात उपजत असतेच. म्हणूनच तर माणसाने जन्मभूमीला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. मातृभूमीचे पोवाडे माणूस पिढ्या-न-पिढ्या गात आला आहे. काही वेळा माणसाला मायभूमीपासून दूर जाण्याचा कटू निर्णय घ्यावा लागतो; पण मायभूमीपासून दूर गेल्यावर, त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या ह्या मातीच्या ओढीची त्याला विशेषत्वाने जाणीव होते. मायभूमीपासून दुरावणे माणसाला फार यातना देणारे ठरते.' कादंबरीची नायिका कल्याणी म्हणते, "वृक्ष एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर लावला, तर कदाचित तो जगेल, पण रुजणार नाही."
कथा मोजून नव्वद पानांची आहे. मात्र त्यातील नायिका आपल्याला बांगलादेशातील खळाळत्या ब्रम्हपुत्राच्या काठाशी तिच्याबरोबर बसवते, माडाच्या झावळ्यांमधून झिरपणारे तिच्या लाडक्या देशातील ऊन अंगावर घेऊ देते, जास्वंदीची लाल टपोरी फुलं....गेटवर फुललेली मधुमालती, हवाई मिठाई घेऊन दारावर येणारा फेरीवाला...सारवलेली अंगणं...पत्र्याची घरं....तळं...तळ्याकाठचा रानटी गुलाब...हिंदू कल्याणी आणि तिची सख्खी जिवाभावाची मुसलमान मैत्रीण शरीफा. 
भारताची फाळणी...नाला झालेली कल्याणीची क्षीण ब्रम्हपुत्रा.
त्यातील एक संवाद पार हबकवून टाकतो...
"त्या मुलांबरोबर काय खेळलास रे तू ?" कल्याणीने तिच्या छोट्या लेकराला, दीपनला, विचारले.
दीपन चिरक्या आवाजात म्हणाला," मी नाहीच खेळलो त्यांच्याबरोबर ते 'मुंग्या मुंग्यां'चा खेळ खेळत होते.'
'मुंग्या-मुंग्या' ? हा कसला खेळ ? मी तर कधीच नाव ऐकलं नाही ते !'
'अगं, भिंतीवर मुंग्यांची ओळ लागलेली असते ना, त्यातल्या निवडून निवडून लाल मुंग्या ती मारत होती आणि काळ्यांना सोडून देत होती. मी त्यांना 'असं का करता' म्हणून विचारलं, तर ते सगळे म्हणाले की काळ्या मुंग्या मुसलमान आहेत, म्हणून त्यांना सोडून द्यायचं आणि लाल मुंग्या म्हणजे हिंदू. त्यांना मारायचं.'
फाळणीत कल्याणीचा बळी पडू नये म्हणून कल्याणीच्या आईवडिलांनी तिला कलकत्याला पाठवून दिले आहे. मामाकडे. मात्र बांगला देशातील ब्रम्हपुत्रा नदीकाठी वसलेल्या हिरव्यागार गावात लहानाची मोठी झालेली कल्याणी कधीही कलकत्यात रमू शकलेली नाही. ते तिला धुळीने कळकटलेले, गर्दीने घुसमटलेले शहरच वाटत राहिले.

'फेरा' वाचले.
हजारो निर्वासित, ठाईठाई, भारतीय म्हणून मुंबईत नांदताना दिसतात त्यावेळी ते हे स्वखुशीने करीत नाहीत हे मला पहिल्यांदाच जाणवले.
मात्र...
कल्याणी जेव्हा एकवार भेट देण्यासाठी म्हणून बांगला देशी परत येते त्यावेळी तिला जसे तिचे लाडके गाव बकाल दिसते...तशी मला माझ्याच देशात....माझ्याच शहरात राहून...माझीच मुंबई दिवसागणिक क्षीण होत असलेली दिसते. कर्करोगाने ग्रासलेली...तीळतीळ संपत चाललेली...जिवंत असल्याचं न झेपणारं सोंग वठवणारी निर्वासितांची मुंबई. 
हे माझे दुर्दैव.

कधीतरी किडे पडलेले एक मृत शरीर नजरेस पडले होते.
जेव्हा ते शरीर पलटवले गेले त्यावेळी लाखो हजारो किडे विस्कटलेल्या पाठीतून भस्सकन बाहेर पडले होते...
चोहो दिशांना अस्ताव्यस्त फुटले होते.

तशीच ही मुंबई.

लहान बहिणभावांचं पुस्तकांत बुडून गेलेलं रस्त्यावरचं चित्र बघितलं...
पुस्तकात दोघेही बुडून गेले होते.
तिला वाचता येत होतं...आणि भावाला गोष्ट वाचून दाखवत होती. यांची शिक्षणाची आस, बंद काचांतून माझ्यापर्यंत झिरपली. ना तिचा चेहरा स्पष्ट दिसला...ना त्याचा. पण त्याने काय अडले ?
मीही अशीच माझ्या धाकट्या बहिणींना विंदा करंदीकरांच्या कविता वाचून दाखवत असे. हेंगाड वेंगाड...फेंगाड भेंगाड...आली आली भुताबाई....चार माणसे रोज खाई....असं काहीसं. दिवाणखान्यातील थंड लादीवर बसून वेडेवाकडे चेहेरे करत मी एक भारी नाटयप्रवेश करीत असे. आणि माझ्या दोघी बहिणी आठवड्यातून किमान एकदा तरी हा प्रयोग करण्यास मला भाग पाडीत असत.

निर्वासित...हा शिक्का.
माणूस...ही जात.
माझा केविलवाणा निर्वासित देश.
आणि दिवसागणिक माझ्या शरीरातून झिरपत, खाली मातीत मिसळून नाहीशी होत चाललेली माझी माणुसकी.

13 comments:

Alka Vibhas said...

hmm... निर्वासित माणुसकी,,, :(

Gouri said...

अनघा, काय नजर आहे तुझी! ही पोस्ट वाचून तरी वाटत नाही ती माणुसकी झिरपून चाललीय तुझ्यातून म्हणून.
यावरून मला मी मुंबईत होते तेंव्हाची गोष्ट आठवली. तेंव्हा मला रस्त्यात खूप वेळा माणसं भेटायची. गावाहून आलोय, पैसे संपले / हरवले / चोरीला गेले, अमूक तमूक ठिकाणी जायचंय अशी साधारण त्यांची गोष्ट. सुरुवातीला वाटलं, हा पैसे उकळण्याचा मार्ग झालेला दिसतोय इथे. नाही दिले पैसे. मग मी विचार केला, यातला एक जरी खरा असेल, तरी त्याला पैसे न देण्यात आपलं चुकतंय. यांना पाच रुपये देण्याने मी काही रस्त्यावर येणार नाहीये. मला हा फसवत असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे. त्याचा हिशोब त्याच्यापाशी. ज्या माणसाला नड आहे असं मला वाटतंय, त्याला शक्य असून मदत न करणं हा माझा निर्णय, आणि चुकीचा. मला बधीर होऊन जगायचं नसेल, तर मी द्यावेत त्याला पैसे.

हेरंब said...

जबरदस्त पोस्ट. काय कमेंट देऊ कळत नाहीये.

aativas said...

हा असा आंतरिक संघर्ष .. दोन्ही बाजू आपल्याला कळतात - त्यातली वेदना कळते आणि आकांक्षाही कळतात; हक्क कळतात आणि अगतिकताही कळते. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना मात्र यातलं काहीच कळत नाही हे आपलं दुर्दैव!

Anagha said...

अलका, हो...निर्वासित माणुसकी... :(

Anagha said...

गौरी, मीही हा असाच विचार करत असे/करते मदत करताना. पण आता हे डोक्यावरून पाणी गेलंय. सगळीच हानी झालेली आहे. त्यामुळे मला आता अशी मदत करून कोणालाही भीक मागून इथे पोट भरता येते ही भावना देणे देखील नकोसे वाटते.

Anagha said...

हेरंब, मनात जेव्हा अशी कटूता निर्माण होते ती गोंधळवून टाकणारी असते. आपलाच आपल्या चांगुलपणावरचा विश्वास उडून जातो.

Anagha said...

सविता, ह्या प्रश्नांना काहीच उत्तर नाहीत का ? :(

इंद्रधनु said...

खूप मनापासून लिहिता तुम्ही नेहमी... नक्कीच लहान सहान गोष्टी तितक्याच मनापासून अनुभवताही... बरेच प्रसंग पाहून मनात बऱ्याचदा वादळ तर उठतं पण ते तुमच्यासारखं शब्दबद्ध नाही करता येत....

rajiv said...

माणुसकीला नाही, तर वाचकाच्या त्याने डोळ्यावर ओढलेल्या कातड्यालाच निर्वासित केलंयस,
गुरफटून, मुटकुळे करून तो राहत असलेल्या कवचालाच निर्वासित केलंयस, मनाला महत्प्रयासाने आपल्यासारखे करू पहाणाऱ्या मुर्दाडपणालाच निर्वासित केलंयस तू अनघा !!
झणझणीत अंजन घातलयस !!

सौरभ said...

वाचुन माझा मनमोहनसिंह झाला. (विचार विचार विचार... अनेक विचार) :-|

Unknown said...

खाली मातीत मिसळून नाहीशी होत चाललेली माझी माणुसकी.,
सर्वांची, नाही का?

श्रिया (मोनिका रेगे) said...

वाह क्या बात है अनघा !! अप्रतीम लेख!