नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 12 September 2012

बेकरी

"चार रुपयांना तीन पाव."

पूर्वी रस्त्यावर असलेली बेकरी आता सिमेंटच्या उंच इमारतीच्या तळमजल्यावर वसू लागली आहे.
त्या काळी मागेच त्यांची भट्टी असे. व दिवसाच्या ठराविक वेळी तिथे गेलं तर गरमागरम पाव मिळत. ते असे नुसतेच खाण्याची मौज काही औरच. रोज संध्याकाळी आई मला ऑफिसमधून येताना आजीकडून घेऊन निघे. आणि आमच्या घरी पोचण्याच्या रस्त्यावर उजव्या हाताला ही बेकरी होती. आई पाव घेई आणि त्यातला एक मी रस्त्यातच खायला सुरवात करत असे. किरणांचा पिसारा आवरत सूर्य आपला परतीच्या मार्गी लागलेला असे. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड पुस्तकावर अंधुकसा पडे. पण कॉमिक्स नेहेमीच अशी वेड्यावाकड्या परिस्थितीत वाचली की त्यात अधिक गंमत येते. म्हणजे अगदी आरामात ऐसपैस कोचावर बसून ते वाचणे आणि अर्धवट प्रकाशात, रस्त्यावरून चालता चालता ते वाचणे. अकस्मात वेताळाने त्याची कवटी शत्रूच्या हनुवटीवर उमटवावी आणि बरोबर त्याच वेळी आईने माझ्या पाठीत एक धपाटा घालावा ! डाव्या हातात वेताळ आणि उजव्या हातात गरमागरम पाव. आईला हे फारसे काही कौतुकाचे वाटत नसे. कारण माझे डोळे पुस्तकात आणि दोन्ही हात कामात गुंतलेले. त्यामुळे एकतर तिला हातात धरायला माझा हात मिळत नसे. आणि मी स्वत:च्या डोळ्यांनी रस्ता बघत नसे ! त्यामुळे बखोटीला धरून फरफरटत मला घरी घेऊन जाण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा मार्ग नसे.

त्यावेळी हा पाव नक्की कितीला मिळत असे ? कोण जाणे. 

परवा मी तिथेच तीन पाव विकत घेतले तेव्हा त्याचे चार रुपये झाले. माझ्या उजव्या हाताला एक लहान अंगच
टीच्या बाई देखील पाव घेत होत्या. लालसर पातळ अंगावर गुंडाळलेलं होतं. आर्थिक परिस्थिती तशी बेताची वाटत होती. त्यांनी चार रुपये दिले. बेकरीवाल्याने जुन्या वर्तमानपत्रात तीन पाव गुंडाळले आणि त्यांच्या हातात दिले. तिथेच उभे राहून बाईंनी कागद उघडला व पाव हातात घेतले. पाव वरखाली केला आणि त्या बेकरीवाल्याला म्हणाल्या,"पाव किती लहान झालाय."
मी माझ्या हातातल्या पावाकडे बघितले. खरंच पाव जणू आक्रसला होता. लहानपणी इथून घेतलेला पाव मला दहा मिनिटांवर असलेल्या घरापर्यंत पोचेस्तोवर पुरत असे. पण हा पाव तर बेकरीतून निघून खाली पायऱ्या उतरेस्तोवर संपून देखील गेला असता. मी बाईंकडे बघितलं. त्या अजूनही पाव हाताळत होत्या. कोण जाणे त्यांच्या मनात काय वादळ उठलं होतं. तीन पाव....तीन लेकरं....कसे पुरणार...अजून एखादा घ्यावा का...मग पैसे ? चेहेऱ्यावर गोंधळ होता.
"माझे चार आणे तुझ्याचकडे राहिले की रे !" वर बघत
त्या बेकरीवाल्याला म्हणाल्या. चार आणे शेवटचे बघून काही वर्षे उलटली. त्यामुळे पुढल्या खरेदीत ते धरले जातील असा हिशेब असावा.
माझ्या पोटात खड्डा पडला. त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले.
मी त्यांच्याकडे बघून हळूच हसले. त्यांनी पुन्हा कागदात पाव गुंडाळून घेतले आणि हसल्या. त्यांच्या मऊसूत चेहेऱ्यावर ते हास्य हलकेच पसरत गेलं. काही ओठ नुसतेच हसतात. असे हसतात की ते हसलेत ह्याचा त्यांच्याच डोळ्यांना सुगावा देखील लागत नाही. बाईंचं हसू तसं नव्हतं. त्या इतक्या सुरेख हसल्या की त्यांचे डोळे देखील हसले.
"फारच झालेय ना महागाई ?" मी हळूच म्हटले.
"नाहीतर काय !" बाईंनी उजवीकडे मान उडवली व हसल्या.
मी पायऱ्या उतरून खाली आले. हातातील चार पाव गाडीतील सीटवर जाऊन बसले. आताही बेकरीपासून घर दहा मिनिटांवर आहे. पण पाव गाडीत बसले होते. आणि माझ्या हातात कॉमिक नव्हतं !

बारा इंची ताट...त्यात तीन इंची पाव...चार रुपये...आणि बाईंची ती सुहास्य मुद्रा.
कशाचाच
ताळमेळ नव्हता.
मात्र त्या महागाईच्या ज्वा
ळांतून तावूनसुलाखून आलेले ते एक हास्य लाखमोलाचे होते.

10 comments:

Anonymous said...

कॉमिक्स, बेकरी, पाव सगळ्या सगळ्याला ममं म्हणावं असं मनात येतानाच पोस्टने वळण घेतलं... आणि म्हणावं वाटलं की अनघा पोस्टचं हे असं वळणं आयूष्याकडे पहाण्याची तूझी दृष्टी दाखवतं... hats off बाई !!
एक वेगळीच तूलना तरी एक सुरेख शेवट आणि विचार (माझ्याही मनात आता :) )...

Abhishek said...

कमेंट करायची तर आहे, पण काय करावी अस नकळतय! अमूल्य! :) मी ही थोडं शेअर करतो...

श्रद्धा said...


Anagha Tai,
ayushyatali valana phar valandar padhatine dakhavata tumhi..:)

हेरंब said...

पाव लहान झालेत हे तर नक्कीच पण कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला ते जाणवतंच असं नाही. तुला ते जाणवतं हाच तुझा मोठेपणा !

Pankaj - भटकंती Unlimited said...

सगळीकडेच माणसाची भूक मोठी झालीये. हेच पाव लहान होण्याचे प्रमुख कारण.

Shriraj said...

:)
(सुचत नाहीये काय बोलू ते, म्हणून हे मूक-हास्य)

Anonymous said...

>>>पाव लहान झालेत हे तर नक्कीच पण कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला ते जाणवतंच असं नाही. तुला ते जाणवतं हाच तुझा मोठेपणा !

ए मला हेच लिहायचे होते... शब्दच सापडले नव्हते !!

Trupti said...

मस्त ग...आई ने फरफटत नेणे..वाचताना धपाटा.
आणि आवडती गोष्ट रस्त्यात च खाणे :):)
सुरेख पोस्ट!

सौरभ said...

हि पोस्ट लईच भिडलीये. त्या बाईंसाठी प्रार्थना...

vishal said...

किरनांचा पसारा आवरत .....फारच छान उपमा दिलीत,मस्तच लिहिलंय ....