नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 23 August 2012

नाण्याच्या दोन बाजू

दशक उलटून गेले ह्या घटनेला.
त्यादिवशी इरॉसला सहा ते नऊचा 'रश आर २' बघून आम्हीं निघालो होतो. मी, माझी लेक आणि तिच्या दोघी मैत्रिणी. पोटपूजा आटपून घराच्या रस्त्याला लागेस्तोवर दहा वाजत आले होते. दिवस दुर्गाविसर्जनाचा होता. रस्त्यारस्त्यावर मिरवणुका निघाल्या होत्या. मुंबई, पुन्हां रंगली होती. नाचगाणे चालू होते. काही दिवसांपूर्वी गणेशविसर्जन आणि आता दुर्गा विसर्जन. आमचे देव सभ्य. आम्हीं भक्त असभ्य. मी गाडी चालवत होते. खिडक्या बंद होत्या. राणीचा चमचमता हार आम्हीं पार केला. पुढे सिग्नल. बाण हिरवा झाला आणि मी गाडी काढली. डाव्या हाताला बाबुलनाथ मंदिर. वेग तसा यथातथाच. आणि अकस्मात माझ्यासमोरील गाडीच्या काचेवर थाडकन काही आपटले आणि जमिनीवर कोसळले. ब्रेक आपोआप लावला गेला. गाडी थांबली. काचेचा पार कलायडोस्कोप झाला होता. मी दार उघडून उजव्या हाताने गाडीपुढे आले. समोर एक मानवी शरीर पडले होते. हातपाय तडफडत होते. गर्दी जमली. फुटकी काच इतस्तत: विखुरली आणि काही क्षणांपूर्वी रस्त्यावर इतस्तत: विखुरलेली माणसे, आता गाडीभोवती एकत्रित झाली. मी काही बोलेस्तोवर पडलेला माणूस उठून उभा राहू लागला.
"गलती हो गयी !"
"गलती ? पागल हो क्या ? अरे, तुम आये कहाँ से ??"
"वो मैं वहाँ से...."
माणूस शहरात नवा होता. त्या दिवशी सकाळीच दाखल झाला होता. दुर्गा विसर्जनाची गंमत पहाण्यासाठी म्हणून तो बाहेर पडला होता. उजव्या बाजूने रस्ता ओलांडण्यासाठी इतरांबरोबर जो सुसाट धावत निघाला तो मधल्या दुभाजकावर न थांबता तसाच पुढे आला. व गाडीवर आपटला. शहराची धावती वाहतूक अजून त्याच्या अंगवळणी पडणे बाकी होते. त्यामुळे, दुभाजकावर थांबून डावीकडून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेणे त्याला जमले नाही. मग त्याचा वेग आणि माझ्या गाडीचा वेग, त्याला भुईसपाट करून गेले. त्याला उभे फारसे रहाता येत नव्हते. गर्दीतून एक पोलीस पुढे आला.
"हा माणूस एकदम धावत आला आणि गाडीवर आपटलाच !" मी पोलिसाला सांगू लागले.
"मी बघितलंय काय झालं ते. तुमची चुकी नव्हती."
"पण आता काय करायचं ?"
"मी बघतो. तुम्ही निघा."
"नाही. तसं नको. मला सांगा तुम्ही ह्यांना कुठे घेऊन जाणार ?" माणूस तसा तिशीच्या आसपासचा वाटत होता. पायाने लंगडत होता त्या अर्थी पायाला काही मार लागला असावा. रक्तस्त्राव मात्र कुठेही नव्हता.
"केइएमला नेतो. सरकारी इस्पितळात न्यायला हवे."
"ठीक. मी ह्या मुलींना घरी सोडून येते तिथे."
"तुम्ही यायची काही तशी गरज नाही."
"नाही. मी येते. अर्ध्या तासात पोचते तिथे."
आम्हीं घरी गेलो. मुलींना सोडलं आणि मी इस्पितळाचा रस्ता धरला.
इस्पितळं रात्री उदास वाटत असतात. बायका पुरुष इथेतिथे घोळका करून उभे होते. आपापल्या रोग्याविषयी चिंतीत आणि गोंधळलेले. त्यांच्या डोक्यावर पडणारा पिवळा उजेड. पिवळ्या भिंती. गडद हिरवे जाडजूड पडदे. जणू वाऱ्याने पडदा सुद्धा हलू नये.
"मुझे माफ किजीये. गलती हो गयी." पिवळट चादरीच्या बिछान्यावर पडलेला तो माणूस वारंवार माफी मागत होता.
"वो ठीक है..."
त्या माणसाच्या पायाला फ्रॅक्चर होतं. तो पुन्हापुन्हा त्याच्या चुकीची माफी मागत होता. माझ्यासाठी माणुसकीची जबाबदारी ही कायद्याच्या वर आहे. मी त्याला रोख काही रक्कम दिली. तेथून निघाले तेव्हां दोन वाजून गेले होते.

परवा ह्या प्रसंगाची आठवण झाली. कारण निवेदिता नथानी. मोबाईलवर संभाषण करीत, मरीन ड्राइव्हवरील दुभाजकावर न थांबता, निवेदिता भर रस्त्यात खाली उतरली. आणि डाव्या बाजूने वेगात येणाऱ्या स्कोडा गाडीच्या पुढ्यात अकस्मात उभी राहिली. क्षणार्धात, गाडीने तिला आकाशात भिरकावले. ती जमिनीवर आपटली. बॉम्बे हॉस्पिटल येथे तिला नेण्यात आले व मृत म्हणून घोषित करण्यात आले. निवेदिताच्या आयुष्याची गोष्ट ही फक्त २३ वर्षांची होती. तिच्या वडिलांची कहाणी मात्र अजून पुढे चालू आहे. कोलकत्यावरून ते तिचे मृत शरीर घेऊन जाण्यासाठी मुंबईत आले होते असे वर्तमानपत्रात वाचावयास मिळाले. त्यांच्या कहाणीने हे एक दु:खद वळण घेतले आहे. त्यातून ते आता कधी आणि कसे बाहेर पडतील...वा कधी पडू शकतील की नाही हे देव जाणे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये ज्यावेळी ही बातमी आली त्याचवेळी बातमी शेजारी त्यांनी तेथील रहिवाश्यांचे म्हणणे छापले होते. एक म्हणजे तिथे फार वेगाने वाहने धावतात. दोन, तिथे झीब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तीन, आम्हीं कर भरतो आणि त्यामुळे आमच्या मुलभूत गरजा पुरवल्या गेल्याच पाहिजेत.
त्याच बातमीत ट्राफिक पोलिसांचे काय म्हणणे आहे ते देखील छापले होते. सुविधा अधिक हव्यात हे मान्य. परंतु, पादचाऱ्यांसाठी तिथे पदपथ आहे. परंतु, ते त्यावरून चालत नाहीत. चालत्या वाहनांमधून शिवाशिवीचा खेळ करीत असतात. त्यांनी जबाबदारीने वागावयास हवे. निदान जिथे सतत वाहने वेगात जातयेत असतात त्या मार्गांवर पादचाऱ्यांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावयास हवी. 

मुंबईची मी नागरिक आहे. आणि ह्याच मुंबईतील रस्त्यांवर पायी चालत लहानाची मोठी झाली आहे. त्यानंतर दुचाकी चालवली आहे. व आज चारचाकी चालवते आहे. आजपर्यन्तच्या आयुष्यात स्वच्छेने नव्हे परंतु, वाहतुकीतील अनेक कटू प्रसंगाना सामोरी गेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजू मी समजून घेऊ शकते. एक जबाबदार नागरिक म्हणून मी नक्की कुठे कधी काय वागावयास हवे ह्याचे भान मी नक्की राखू शकते.

ज्यावेळी मी जे करीत असेन त्या कालावधीसाठीचे वाहतुकीचे नियम हे माझ्यासाठी लागू होतात. म्हणजेच, ज्यावेळी मी माझ्या दोन पायांनी चालत असेन तेव्हां, माझ्यासाठी पदपथ असतो, व रस्ता ओलांडताना झीब्रा क्रॉसिंग असते. बऱ्याचदा असे होते, की पदपथ असतो, परंतु, आपल्याच कृपेने तेथे फेरीवाले नांदत असतात. त्यामुळे आपल्याला त्यावरून चालणे अशक्य बनते. मात्र शक्य असल्यास मी तरीही त्यातूनच मार्ग काढीत पदपथाचा वापर करते.
ज्यावेळी मी वाहन चालवत असते, त्यावेळी फुका कर्कश भोंगा वाजवणे मला स्वत:ला कानाला फार त्रास देऊन जाते. एकदाही भोंगा न वाजवता मी बऱ्याचदा कचेरीत जाते आणि तशीच आवाज न करता परत देखील येते. तो दिवस माझा फार आनंदाचा असतो. झीब्रा क्रॉसिंग ही गोष्ट चार चाकांसाठी नाही ह्याची मला खात्री आहे. आणि सिग्नलमधील हिरवा रंग प्रेमाचा. लाल रंग धोक्याचा व पिवळा रंग हा धोक्याची ताकीद देणारा असतो हे मला माझ्या शाळेने शिकवले आहे. आणि माझी स्मरणशक्ती शाबूत आहे. पादचाऱ्यांचा मी मान ठेवला तर ते माझा मान ठेवतील इतकी ही गोष्ट माझ्यासाठी साधी आणि सरळ आहे. चालत असताना भर रस्त्यात, एखाद्या गाडीला हात दाखवून माझ्यासाठी थांबण्यास भाग पाडणे हे म्हणजे 'मी कोणी म्हातारी, वा अशक्त किंवा रुग्ण आहे...आणि ते बघून तुम्हीं गाडीवाले माझ्यासाठी थांबा', अशी मी भीक मागत आहे असे मला वाटते. भीक मागण्याचे क्षेत्र माझे नव्हे.
एखादी चारचाकी गाडी कधी पदपथावर जाऊ शकते का ? नाही. तेव्हां मी माझ्या दोन पायांनी भर रस्त्यावर रमतगमत चालत नाही.

हक्कांची जाणीव आपली फार तीव्र आहे...मग कर्तव्याची इतकी बोथट का ?
हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र हक्काची बाजू अतिशय ठसठशीत आहे. त्याउलट कर्तव्याचे चित्र पुसट होत गेले आहे. मुलभूत हक्क फार काळ डावलले गेले असल्याने ही परिस्थिती ओढवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, जितके एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य नाकारू, आणि ही कर्तव्ये म्हणजे काही मोठे सीमेवर जाऊन शत्रूशी लढणे ह्यासारखे जीवावर उदार होण्यासारखी देखील नाहीत...तितकेच आपले आपणच आपल्या हक्कांपासून दूर फेकले जाऊ...असे नाही का वाटत ?

कर्तव्य बजावणे व हक्क मिळवणे ह्या दोन्ही गोष्टी, इंग्रजी अक्षर 'v' सारख्या संलग्न आहेत.
त्यामुळे त्यांना समान महत्त्व आपण दिले तरच एक नागरिक म्हणून आपण जगताना  'V for Victory' असे म्हणू शकू.

17 comments:

अनघा said...

"माझ्यासाठी माणुसकीची जबाबदारी ही कायद्याच्या वर आहे.">>> आवडले अगदी मनापासून!
जबाबदार नागरिक शाळेत नुसते नागरिकशास्त्र शिकून बनता येत असतं तर किती बरं झालं असतं? मोबाईल वर बोलत किती जीव गमावल्यानंतर आपण शहाणे होणार आहोत? की नाहीच.....?

aativas said...

आपण नियम काही पाळायलाच तयार नाही .. सबको जल्दी है ....अशा दुर्दैवी घटना मग पुन्हापुन्हा घडत राहतात ..

vyankatesh said...

"पादचाऱ्यांचा मी मान ठेवला तर ते माझा मान ठेवतील इतकी ही गोष्ट माझ्यासाठी साधी आणि सरळ आहे. चालत असताना भर रस्त्यात, एखाद्या गाडीला हात दाखवून माझ्यासाठी थांबण्यास भाग पाडणे हे म्हणजे 'मी कोणी म्हातारी, वा अशक्त किंवा रुग्ण आहे...आणि ते बघून तुम्हीं गाडीवाले माझ्यासाठी थांबा', अशी मी भीक मागत आहे असे मला वाटते. भीक मागण्याचे क्षेत्र माझे नव्हे." ...Superb lines i like most and experienced such situations in Pune especially.

आनंद पत्रे said...

लास्ट बट वन पॅरा अतिशय आवडला... असा विचार नव्हता केलेला.. मस्त एकदम...

rajiv said...

" माझ्यासाठी माणुसकीची जबाबदारी ही कायद्याच्या वर आहे "
अनघा, कोणतीही कायदेशीर जबाबदारी नसताना देखील तुझी नैतिक सामाजिक बांधिलकी तुला रात्री दोन वाजता इस्पितळात नेण्यास कारणीभूत ठरली हि गोष्ट मला स्पृहणीय वाटतेय !! शाब्बास !!


हक्कांची जाणीव आपली फार तीव्र आहे...मग कर्तव्याची इतकी बोथट का ? >>> प्रत्येक गोष्ट 'दुसऱ्याने' करावी.. :पण त्याची सुरवात 'मी' का करावी ..हि जी एक विचारधारा समाजात रुजत गेलीय...त्याचा हा परिपाक आहे ( म्हणजे जे काही वाट्टोळे झालेय ते )...आणि हाच विचार सर्व थरावर सर्व बाबतीत दिसून येत आहे. :(

हेरंब said...

त्या V अक्षरातली कर्तव्याची बाजू आपण कायमच नाकारत आलोय ! :(

Anagha said...

अनघा, शहाणे होण्यासाठी आपण वेडे झालेलोच नाही आहोत.

Anagha said...

सविता, खरंय.
घाईघाईत पृथ्वीवर आलेलो आहोत...आता वर जायची घाई आहे.
जन्माला येऊन काही केलंच पाहिजे अशी कोणावर जबाबदारी टाकलेली नाही...त्यामुळे जबाबदारीने जगण्याचा प्रश्र्न उरलेला नाही.

Anagha said...

व्यंकटेश, पुण्याची परिस्थिती देखील मुंबईहून काही वेगळी नाही..हे ऐकून आहे मी. घरोघरी मातीच्या चुली.
प्रतिक्रियेबद्दल आभार.

Anagha said...

आनंद, :)

Anagha said...

राजीव, कारण पोलीस वगैरे बाजूलाच...मला माझंच मन जास्त खातं ! त्यामुळे बाकी कोणाला घाबरण्याऐवजी मी माझ्या मनाला घाबरते !! :) :)

Anagha said...

मला प्रश्र्न पडतो हेरंब...आपल्यासमोर आपले आईवडील होते...तत्त्वांना धरून आयुष्य जगणारे. पण मग नव्या पिढीसमोर हे सर्व काय चाललंय ?!

Sakhi said...


रस्ता ओलांडणे ही एक क्रिया..

या पलीकडे जाऊन अश्या कित्येक गोष्टी येतात ह्या सिविक सेन्सच्या दृष्टीने महत्वाच्या ..पण बिनदिक्कत त्याची लक्तरे वेशीवर टांगली जातात... अन जे पाळतील त्यांना वेड्यात काढण्याचे प्रकार जास्त नाही का.. साध्यासाध्या गोष्टी जिथे पालक स्वतः सवयीने चुकीच्या करतात.. तिथे मुलांना कसली शिदोरी आपण जन्मभरासाठी देतो याचा विचार करणे दूरच...

तू म्हणालीस ते खरेच.. हे सीमेवर जाऊन जीव पणाला लावण्यासारखे कठीण नाही.. पण .. ह्या "पण" चा काही इलाज नाही..
स्वतः अन आपल्या वर्तुळात जेवढे करता येईल तेवढे करत राहणे.. हेच एक हातात


तुझ्या ड्रायविंगच्या/ वरच्या पोस्टचा मिळून एक छान पुस्तक होईल ...Drive with Care :D

सौरभ said...

:-|

Anagha said...

भक्ती ! :D :D

Anagha said...

सौरभ, अळीमिळी ?

सिद्धार्थ said...

>> एकदाही भोंगा न वाजवता मी बऱ्याचदा कचेरीत जाते आणि तशीच आवाज न करता परत देखील येते.

Hats off for this!!!