आज खरं तर देशप्रेमाची गीते गुणगुणावीत, गपगुमान भाषणे ऐकावी.
उगाच स्वत:ला सुजाण समजू नये.
डोक्याचा भुसा करून घेऊ नये.
रोज सकाळी मी वर्तमानपत्र उघडते.
एक नागरिक म्हणून वाचू लागते. जीवाचा संताप होतो.
एक स्त्री म्हणून वाचू लागले. जीव धास्तावतो.
पंचवीस वर्षीय पल्लवीचा खून होतो त्यावेळी मी माझ्या घरात निवांत झोपलेली असते. त्या रात्री दोनवेळा तिच्या घराची वीज तोडली जाते, दोन वेळा तिच्याच बोलावण्याने घरात प्रवेश मिळवला जातो. तिसऱ्या वेळी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. तिने तीव्र विरोध केला म्हणून तिला मारून टाकले जाते. म्हणे पल्लवी तोकडे कपडे घाली. सरळ तळघरातील तिच्या गाडीपाशी जाई. म्हणे इमारतीत कधी कोणाशी ती बोलत नसे. रात्री तिने चौकीदाराला वीज केली म्हणून बोलावून घेतले आणि त्यावेळी ती त्याच्याशी घरातील गेलेल्या विजेविषयी त्याच्याशी बोलली. मुंबई शहरात कधीही कुठल्याही स्त्रीशी तो बोलत नसे. ती त्याच्याशी बोलली त्यावरून म्हणे त्याला असे वाटले की पल्लवीला त्याच्यात 'इंटरेस्ट' आहे...म्हणे सुमारे पाच वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर येथून ह्या माणसाला घरातून हाकलून देण्यात आले आहे...गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे !
शहराची मनस्थिती काही ठीक नाही. शहर निराश आहे. शहर वैफल्यग्रस्त आहे. शहराच्या डोक्यात लाव्हा आहे. कल्लोळ आहे.
काल सौतीचंदचे नाव घेऊन एका माणसाचा मला फोन आला. सौतीचंद रंगारी. माझ्या मामेबहिणीने सर्वप्रथम त्याची माझ्याशी ओळख करून दिली होती. अतिशय विश्वासू. एकदोनदा त्याच्याकडून घराला रंग मी लावून घेतला आणि सौतीचंद घरचाच झाला. काही कालावधी लोटल्यानंतर तर त्याच्यावर घर सोपवून मी बाहेरगावी जात असे. सौतीचंद मन लावून प्रामाणिकपणे काम करी. पंधरा दिवसांनी मी परतत असे. माझे घर नवा रंग अंगावर पांघरून प्रसन्न हसत माझे स्वागत करी. गावी बायकापोरे सोडून मुंबईत आलेला सौतीचंद त्यानंतर कधीतरी आपल्या गावी परतला. मग परत पोटापाण्यासाठी म्हणून कधी मुंबईकडे फिरकला नाही. मात्र त्याच्या ओळखीने असे कोणी त्याच्या गावचे रंगारी फोन करीत. एके वर्षी मी त्याच्या मेव्हण्यावर रंगकाम सोपवले देखील. पण ते तितकेच. काल जेव्हां पुनश्च सौतीचंदचे नाव घेऊन कोणी मला फोन केला, त्यावेळी सध्या काही मला रंगकाम काढावयाचे नाही असे मी सांगितले. फोन ठेवला. माझे उत्तर तर खरेच होते. पण काय माझ्या भिंतीच्या रंगाचे पोपडे उडालेले असते, तर त्या अनोळखी माणसाला घरात घेण्याइतके धैर्य आता माझ्या अंगात अजूनही शिल्लक आहे ?
मध्यंतरी दोन अनोळखी फोननंबरवरून माझ्या मोबाईलवर फोन येत होते. वेळ वाटेल ती, बोलणे अश्लील. शेवटी, पोलीस स्टेशन गाठले. त्यांना ते नंबर दिले. माझ्यासमोर पोलिसाने त्यातील एक फोन लावला. त्यानंतर त्या क्रमांकावरून पुन्हा कधी फोन नाही आला. दुसरा क्रमांक, अंधेरीचा कुठल्या दुकानातील. दुकानाचा मालक नसला की तेथील हा कामगार म्हणे माझा नंबर लावत असे. आणि कल्पनाशक्ती लढवत, तोंडाला येईल ते बोलत असे. पोलिसांनी त्याला धमकावले. मला फोन येणे थांबले.
परवा, कार्यालयातून बाहेर पडत असताना, मी लिफ्टने जाण्यापेक्षा जिना धरला. तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत जाण्यासाठीचे जिने दोन मिनिटांचे आहेत. आमच्या मजल्यावरून खाली उतरू लागलो की मागे दरवाजा बंद होतो. तळमजल्यावरचा दरवाजा बहुधा उघडा असतो. सध्या आमच्या पाच मजली इमारतीत कुठल्यातरी कार्यालयाचे नुतनीकरण चालू आहे. मी उतरू लागले त्यावेळी जिन्यात माणसांचे बोलण्याचे आवाज कानावर पडू लागले, आणि काही माणसे वर येऊ लागली. मी खाली मान घालून उतरत होते. सबंध त्या अरुंद परिसरात घामट, कुबट असा सिमेंटमिश्रित वास पसरलेला होता. आपण जरी मान खाली घातली तरी बहुतेकवेळा तरी आपल्याकडे एकटक लागलेल्या नजरा आपल्याला जाणवतात. तसेच माझे झाले. हातात घमेली, फावडी घेऊन चाललेली ती माणसे म्हणजे चेहेरे नसलेली एक अदृश्य शक्ती वाटू लागली. ती टाळून लवकर तळमजला येईल तर बरे असे मला वाटू लागले.
आसपास वावरणाऱ्या अपरिचित माणसांची ही वाढती संख्या मनातील भीतीला खतपाणी घालते.
"Mama says...don't talk to strangers." ह्याची आता सतत आठवण होते.
कोण जाणे, मुंबईचे सुजाण नागरिक, कुठून धैर्य गोळा करतात आणि रस्त्यावर जागोजागी बसलेल्या अनोळखी माणसांकडून खरेदी करतात. अनोळखी माणसांच्या गरजा भागवतात. जोपर्यंत या ना त्या मार्गे त्यांची पोटे आम्हीं भरणार तोपर्यंत हा मुंबईचा वाढता लोंढा कसा कमी होणार ?
हल्ली पायी जाण्याचे प्रसंग कमी येतात. परंतु, रस्त्यात तिरस्काराची भावना सगळीकडे तरंगत असल्यासारखे वाटते. तिरस्कार, असंतुष्टता...एक तवंग सर्वत्र पसरलेला. एक ठिणगी पडायची खोटी...भडका हा उडणारच.
इजिप्तमध्ये समजू लागले की माणूस आपला पिरॅमीड बांधू लागे...भावेल ती जागा...झेपेल तो आवाका. आपला आपण सुंदर पिरॅमीड उभारायचा. मोठा स्वावलंबी माणूस म्हणावयाचा ! हे सदगृहस्थ जेव्हां देवाला प्यारे होत...तेव्हां त्याला मंचावर घ्यावयाचा...सर्वात आधी टोचणीने खरवडून त्याचा मेंदू बाहेर काढावयाचा. सुगंधी तेलमालिश करावयाचे. त्याच्या सुरेख पिरॅमीडमध्ये न्यावयाचे. सोनेनाणी, दासदासी, कुत्रे, मांजर, माकड, बिकड. त्याचे संगती आत नेऊन बसवायाचे.
फरक आहे...आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे...
आम्हीं आता प्रेते आहोत...रिकाम्या डोक्याची प्रेते...जिवंतपणी आम्हीं आमचे डोके रिकामे केले आहे...आमचा मेंदू कधीच काढून आम्हींच समुद्राला वाहिला आहे...स्वत:च आता अंगाला तेलमालिश करीत आहोत.
आमची प्रेते कालातीत...
आमचे मरण अबाधित...
मुंबई...स्वरचित पिरॅमीड.
आमचे मरण अबाधित...
मुंबई...स्वरचित पिरॅमीड.
15 comments:
:( :(
:(
का ग?
वाईट तर खूपच काही आहे आपल्या जवळपास. वाढतंय ते, भीती वाटावी अश्या वेगाने. पण थोडंफार चांगलंही आहे ... त्याची दखल घ्यायलाच हवी ना ... अंधारात बुडून जाऊन कसं चालेल?
such a sad situation... i wonder if there's anything that's still working in India...aplyach gharatc, aplyach galli-bolat insecure vaTave hyapekha vaait kay...:(
हेरंब, काहीतरी जबरदस्त चुकतंय...आणि उत्तर आपल्यासाठी दुसरा कोणीही शोधणार नाही आहे...कोणीही 'शिवाजी', जन्माला येणार नाही आहे.
योगेश, नक्की कशाचे वाईट वाटतंय ?...उघड्यावर पडलेल्या शहराचे...की माझ्या निराशाजनक विचारांचे ?
सिद्धार्थ, ?
गौरे, वाईट ज्या गतीने वाढतंय, त्यापुढे चांगले फार कमी वेगात वाढतंय असं वाटतं. आज एक स्वप्नातील पुस्तक समोर आलंय...Open Mumbai, Re-envisioning the city and its open spaces. स्वप्न सुंदर आहेत.
Kavs, मला माहित आहे की माझ्या ह्या पोस्टमध्ये नक्कीच निराशाजनक लिखाण झाले आहे. मात्र गौरी म्हणते तसं तर आहेच. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अभिमानाने मान उंचवणाऱ्याच आहेत. फक्त असं काहीतरी इतक्या जवळ घडतं, तेव्हा हादरून जायला होतंच. परदेशातील भयंकर हादरवून टाकणाऱ्या कथा वाचून तिथल्या स्त्रियांबद्दल देखील असेच नाही का वाटतं आपल्याला ? तसंच.
दृष्टीकोन .. पेपर वाचला, बातम्या पाहिल्या टिव्हीवर की खरंच सर्व वाईट चालू आहे असं वाटतं... अन संवेदना थोडी बोथट केली की मस्त जगता येत.. ...' ' सदा सुखी टाईप...
मुंबई एकट्यांची गर्दी असलेलं शहर आहे.
खरं तर सगळंच फार वाईट चाललंय असं नाही आहे ना आनंद...पण चांगले जे घडते आहे ते आपल्यासमोर आणलेच जात नाही. मग निराश वाटू लागते. आपल्या गौरी बाईं सारखं आता आपणच बाहेर पडलं पाहिजे....चांगल्या कामाच्या शोधात...कोण जाणे मग कदाचित आपल्यालाही मिळून जाईल काहीतरी...आणि आपला खारीचा वाटा उचलला जाऊ लागेल.
अगदी खरंय सौरभ.
ह्या ब्लॉग ला इ-मेल ने सब्स्क्राइब कारण जमू शकत का?
ब्लॉगवर आलो ते बेकरीच्या खुशखुशीत पोस्टमुळे, पण मग एकामागे एक पोस्ट्स वाचूच लागलो, आणि या पोस्टला मात्र थांबून कमेंट द्यावी असे वाटले,
रामनामजपचे अप्लिकेशन करायला ही वाईट माणसं आपल्याला भाग पाडतात...
इथे जे लिहून आलंय ते सर्वांनाच वाटतंय, बोलायलाही आपण सध्या घाबरतोय. हे वाईट आहे, तिकडे चांगलेही आहे हा प्रश्न नाही पण जे घडतेय तेच का दाबून मुटकून न बोलता सहन करायचं..जर चांगलं घडत असेल तर त्याचही प्रतिबिंब पडेलच ना आपल्या बोलण्यातून..
ही विफलता पोखरतेय सर्वांनाच.. thanks, अगदी जवळचं लिहिल्याबद्दल..
Post a Comment