:) मी खालील पोस्ट लिहिली किंवा लिहायला घेतली त्यावेळी त्यावर गैरसमज होऊ शकतील हे कळले नव्हते. पण तसं होताना दिसू लागलं. म्हणून मग माहिती काढली. तेव्हा ही माहिती मिळाली. तेव्हा मला वाटतं आधी लिंक बघून घ्या आणि मगच पोस्ट वाचा....कदाचित गैरसमज कमी होतील. :)
काही प्रसंग एका क्षणात घडून जातात. आपल्याला चमकवून जातात. आणि विचारात पाडतात.
काही प्रसंग एका क्षणात घडून जातात. आपल्याला चमकवून जातात. आणि विचारात पाडतात.
आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाच्या हुद्द्यानुसार जागा ठरलेल्या आहेत. सरसकट एकत्र बसणे हे इथल्या तत्वज्ञानात बसत नाही त्यामुळे ते आचरणात आणण्याचा काही संबंध येत नाही. माझ्या पाठी माझा एक मित्र बसतो व पुढे एक. अर्ध्या उंचीच्या छोट्या छोट्या काचेच्या भिंती आमच्यातील अंतर ठरवतात. माझ्या उजव्या हाताला छतापासून कमरेच्या उंचीपर्यंत आलेली खिडकी आहे. निळसर झाक असलेली काचबंद. संपूर्ण कार्यालय वातानुकुलीत असल्याकारणाने ती कायम बंद असते. वरून खालपर्यंत पोचणारा केशरी रंगाचा पडदा प्रत्येक खिडकीला आहे. भल्या मोठ्या प्रशस्त अशा दालनाला अंदाजे नऊ खिडक्या आहेत. आणि बारा महिने चोवीस तास फक्त माझा पडदा वर जाऊन छताला चिकटलेला असतो. कारण बाहेरून माझ्या अंगावर येणारा सूर्यप्रकाश मला आवडतो. अगदी ऊन काही येत नाही, पण नक्की बाहेर काय चालू आहे ते आत कळू शकते. म्हणजे माझे आकाश आक्रसत नेणाऱ्या उंचच इमारती आहेत. तसेच नजर खाली उतरवली, तर लाल कौलारू घरे देखील आहेत. माझ्या अगदी खिडकीपाशी कधी एखादा कावळा येऊन मला हाक मारून जातो, तर कधी एखादी चिमुकली चिमणी तिची ख्यालीखुशाली कळवून जाते. मग मीही त्यांना काहीबाही सांगत बसते. त्यासाठी आम्हांला कुठलीही भाषा यावी लागत नाही हे आमच्या मैत्रीचे वैशिष्ट्य. आमची आपली मौनीभाषा. आपले नाही परंतु, सूर्यदेवाचे काम आटपत आलेले आहे, काळोख पसरू लागला आहे, आकाश भरून आले आहे, प्रचंड वादळ सुटले आहे, हे सर्व मला माझी खिडकी सांगत असते.
माझ्या पुढे बसणारा माझा मित्र हा तसा मला सतत दिसून येत नाही. कारण तो आमच्या मधल्या भिंतीमागे असतो. मात्र सकाळी हजर झालो की 'सुप्रभात' अशी हाळी एकमेकांना आम्हीं नक्की देतो. तोही मराठी आहे आणि मग त्या 'गुड मॉर्निंग'पेक्षा मला आपलं सुप्रभात अधिक जवळचं वाटतं. त्यामुळे हा माझा मित्र जेव्हा नव्याने आमच्या कंपनीमध्ये दाखल झाला, त्यावेळी मी आपला हा मराठी पायंडा घालून टाकला. नाहीतर आंग्लाळलेल्या आमच्या कार्यालयात, संवाद, परिसंवाद, शिवीगाळ, स्तुतिसुमने इत्यादी इंग्रजी भाषेतील वेगवेगळे प्रकार त्यात्या गरजेनुसार वापरले जातात. माझ्या मित्राचे नाव काय ? तसेही नाव कळल्यानेच ही गोष्ट पुढे सरकणार आहे अशा काही ह्या घटनेला मर्यादा नाहीत. कारण त्याचे नाव गणेश, राहुल, वा अमित असले तरीही घटना तशीच रहाते. फक्त मराठी असल्याकारणाने आमचा संवाद हा मराठीत झाला हे नक्की.
मला वाटतं फार पूर्वापार एक ठराविक प्रकारची काळ्या तिळांपासून बनवलेली सुपारी खाण्याची माझ्या ह्या मित्राला सवय आहे. त्यामुळे त्याच्या मंचावर उजव्या हाताला एक चांगला अर्धा फुट उंचीचा प्लास्टिकचा डबा ह्या सुपारीने कायम भरलेला असतो. मित्र उदार अंत:करणाचा असल्याकारणाने, आत कडीकुलुपात सुपारी लपवून ठेवणे हे काही त्याच्या स्वभावधर्मात बसत नाही. येण्याजाण्याच्या रस्त्याच्याच बाजूला त्याने आपला हा डबा ठेवला आहे. व तिथून येताजाता सर्वचजण दिवसातून कमीतकमी चार ते पाच वेळा तो डबा उघडून त्यातील सुपारी आपल्या मुखात टाकीत असतात. आतील सुपारी कमी कमी होत जाते ती बंद डब्याच्या बाहेरून खालीखाली जाणाऱ्या तपकिरी रंगावरून कळते. मग हा आपला नवीन पाकीट विकत आणून त्यात सुपारी भरून टाकतो. आणि द्रौपदीच्या थाळीप्रमाणे आम जनतेला दिवसभर चघळायला सुपारीचा पुरवठा विनासायास मिळत रहातो. ही सुपारी खाल्याने आपण करीत असलेल्या ठराविक 'डाएट' वर काही विपरीत परिणाम तर होत नसेल ना अशी एक चर्चा स्त्रीवर्गात चालू रहाते. अधूनमधून गुगलवरती काळे तीळ हा शब्द टाकून त्यावर माहिती मिळवली जाते व मिळालेल्या माहितीची आपापसात देवाणघेवाण होते. बाकी पुढे सुपारीचे चर्वण मात्र चालूच रहाते.
त्या दिवशी अशीच मिटिंगवरून माझ्या जागेवर परत येत असताना मी मित्राच्या मंचापाशी मधेच थबकले. तो त्याच्या कामात मग्न होता. डबा उघडून मी सुपारी हातावर घेतली. आणि त्याला म्हटले, "तू असलास वा नसलास, आम्हीं आपले सगळेजण तुझ्या सुपारीवर येताजाता ताव मारीत असतो."
तो हसला व म्हणाला,"अरे ! ठीक आहे ना."
मी त्यावर म्हटले,"कोणी डबा उघडून घेताना इथेतिथे पाडलेले काळे तीळ मी आपली साफ करून ठेवते हा. मी पाडले नसले तरीही. उगाच तुझं टेबल अस्वच्छ नको दिसायला. नाही का?"
तो हसला. चष्म्यातून त्या डब्याकडे बघत तत्परतेने उद्गारला,"अच्छा ! म्हणजे तू पुरावा नष्ट करतेस तर !"
मी चमकले. मला एक क्षण काही कळले नाही. नक्की त्या त्याच्या विनोदावर हसावयाचे आहे, की आपली कृती ही चोरीत मोडली गेली ह्याचा धक्का मला बसला आहे, हे त्या क्षणी कळले नाही. मी हं हं केले आणि जागेवर जाऊन बसले.
काय आपल्या तोंडून प्रतिक्षिप्ततेने निघालेले उद्गार, हे आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या; परंतु कालौघात खोल मनाआड दडलेल्या घटनांची एक प्रतिक्रिया म्हणून नकळत बाहेर पडतात ? नाहीतर 'पुरावा', 'चोरी' हे शब्द असे अचानक कसे उद्गारले जात असावेत ?
आम्हीं आमच्या कार्यालयात एक वर्कशॉप बऱ्याचदा करतो. 'फ्री असोसिएशन' असे त्याचे नाव आहे. म्हणजे समोरील फलकावर एकेक शब्द लिहिले जातात. आपण तो शब्द वाचल्यावर पहिल्या क्षणी कुठला दुसरा शब्द येतो, तो सांगायचा असतो. जसं इथे मित्राने 'स्वच्छ' आणि 'पुरावा नष्ट करणे' ह्या दोन शब्दांची जोड केली. आपल्या ह्या मनाच्या खेळाचे आपल्यालाच बऱ्याचदा आश्चर्य वाटू लागते. कारण कधी एखादा शब्द वाचून असा काही वेगळाच शब्द आपल्या डोक्यात येतो की आपणच चकित होतो. आणि मग कधी त्यावर आपण विचार केला तर आपल्याच काही आत दडून गेलेल्या त्या शब्दाशी निगडीत अशा आठवणी जाग्या होतात.
ही घटना घडली त्यावेळी मला त्या वर्कशॉपची आठवण झाली. ह्यात माझी त्या मित्राशी असलेली मैत्री तुटण्याचा प्रश्र्न नव्हता. फक्त हे असे का होत असेल ह्यावर विचार मात्र जरूर करावा वाटला. आपल्या मनातील गुंतागुंत, ही इतकी एकमेकांत गुरफटलेली असते, की त्यापुढे कदाचित गुंतून गेलेला एखादा लोकरीचा गोंडा देखील सोपा वाटून जावा.
(मी ही पोस्ट प्रसिद्ध केली व नंतर वाटू लागले की मला काय म्हणायचे आहे ते नीट स्पष्ट नाही झालेले. आणि म्हणून शेवटची चार/पाच वाक्ये मी पोस्ट एडीट करून वाढवली आहेत. मला आशा आहे की काहीही गैरसमज न होता आता मला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. :) )
ही घटना घडली त्यावेळी मला त्या वर्कशॉपची आठवण झाली. ह्यात माझी त्या मित्राशी असलेली मैत्री तुटण्याचा प्रश्र्न नव्हता. फक्त हे असे का होत असेल ह्यावर विचार मात्र जरूर करावा वाटला. आपल्या मनातील गुंतागुंत, ही इतकी एकमेकांत गुरफटलेली असते, की त्यापुढे कदाचित गुंतून गेलेला एखादा लोकरीचा गोंडा देखील सोपा वाटून जावा.
(मी ही पोस्ट प्रसिद्ध केली व नंतर वाटू लागले की मला काय म्हणायचे आहे ते नीट स्पष्ट नाही झालेले. आणि म्हणून शेवटची चार/पाच वाक्ये मी पोस्ट एडीट करून वाढवली आहेत. मला आशा आहे की काहीही गैरसमज न होता आता मला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. :) )
15 comments:
अनघा - एक सांगू, आपण स्त्रियाच असा खूप विचार करतो ग. बघ ना सुरुवातीला तो " त्यात काय ?" असा म्हणाला ना. कधी कधी आपण ज्याला "read between the lines" म्हणतो ते ना थोडे जास्तच करतो. आणि विचार चक्र चालूच राहते. आपणच आपल्याला त्रास करून घेतो.
हे हे हे ! अरे असं कही नसतं अगं! तू जरा जास्तच विचार करतेस छोट्या छोट्या गोष्टींचा की माझा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे... :डःडःडः
"अच्छा ! म्हणजे तू पुरावा नष्ट करतेस तर ..!!" -
अनघा ..या उद्गारांवरून तुझ्या मनात येऊन गेलेला विचार खरेच रास्त आहे...
तू केलेल्या साफसफाई ऐवजी तो एकदम 'पुरावा' वर पोचला...म्हणजे कुठेतरी त्याच्या मनाने ' स्वच्छ करणे' या क्रियेची सांगड ' नामोनिशाण न रहाणे' याच्याशी घातलेली आहे ...व अशी क्रिया त्याच्या नजरेने बऱ्याचवेळा टिपलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
त्यामुळे तुझ्या ह्याच शब्दाने त्याच्या मनाने एकदम उडी मारून ती क्रिया पण त्याच पद्धतीत बसवून, ते मन प्रतिक्रिया देते झाले असावे.
तेंव्हा ....माणसाच्या मनाचे का...ही खरे नाही ...हेच खरे :D
असूही शकेल हेरंब. पण संदर्भ काही ना काही असतोच. :)
अनघा, त्रास नाही...पण विचारात पडले. कारण एका सेकंदात ज्यावेळी आपण वेगळाच संदर्भ देतो, त्यावेळी आपल्या सुप्त मनातील एखादी आठवण त्याला जोडली गेली असेल काय असा प्रश्र्न पडतो. उदाहरणार्थ, आईला चोरून, मी कधी लाडू खाल्ला असेल व तिला कळू नये म्हणून गुपचूप वाटी स्वच्छ धुवून ठेवली असेल तर कोणी 'स्वच्छ' असा शब्द उच्चारल्यावर माझ्या मनात 'पुरावा नष्ट करणे' येऊ शकते. नाही का? ह्यात त्याने मला चोर म्हटले असे काही मला नव्हते म्हणायचे. :)
दीपक, छोट्या छोट्या गोष्टींतून विचार करून 'ग्राहकाच्या' (consumer) मनात डोकावण्याची (insights) आमची सवय आणि गरज असते ना म्हणून असं होत असावं. :)
राजीव, ह्या आजच्या पोस्टवर माझ्या 'मानसशास्त्र' पदवीधारक लेकीशी चर्चा झाली. तिने मला अनुमोदन दिले म्हणजे भारीच ! नाही का ? :) :)
माहित नाही मला कितपत कळलंय..कदाचीत नुस्तं वाचल्याने त्या मित्राने केलेली एक शाब्दिक कोटी किंवा गम्मत पेक्षा मलातरी काही विशेष वाटलं नाही ब्वा.......तू सांग की मीच कमी विचार करतेय... ;)
हेरंब, बायका हा असा जनरलाईज्ड शब्द नसता वापरला तर बरं झालं असतं +++++++
अनघा अगं असं नाही पण कदाचीत तू त्याला प्रत्यक्ष ओळखते तर तुझं read between the lines आणि आमचं यात तफ़ावत असणारच नं गं? असो.....शुभ विकांत...:)
उगाचच गैरसमज करून घेताहेत असे वाटतेय. आज कालच्या ऑफिस मध्ये मराठी मित्र मिळणे कमी असतात. (मराठी मित्र म्हणालो...मराठी माणसे नाही. माणसे भेटतात...मित्र कमी) उगाच संशय आणून मैत्रीचे नाते कशाला तोडायचे. 'मन चंगा तो कटोती मे गंगा'. आपले मन स्वच्छ असेल तर कशाला काळजी करायची.
माझ्या मते तुमच्या मित्राने काय संगती लावली असेल (ती काय असेल त्यालाच माहिती - कदाचित ती नुसतीच शाब्दिक कोटी असेल!) - यापेक्षा तू त्या संगतीचा अर्थ असा का लावलास याचा शोध महत्त्वाचा - म्हणजे केवळ विनोद म्हणून सोडून देण्याऐवजी त्याचा इतका विचार करण्याचं काय कारण ....
पण जाऊ दे, मी अजून जास्त विचार करायला सांगतेय तुला. खरं तर इतका विचार करण्याजोगा प्रसंग नाही हा .. :-)
तील की खाल. आपलं बाल की खाल. होतं असं बायकांच कधी कधी :-)
आणि पुरुषांना बरेचदा आपण काय बोलून जातो याचं भान नसतं. नंतर कुणीतरी लक्षात आणून दिल्यावर प्रकाश पडतो.
भोवरा, इथे मी गैरसमज करून घेतला नाही आहे आणि तसे माझ्या मनात देखील आलेले नाही. माझ्यासाठी मैत्री हा शब्द अतिशय महत्त्वाचा आणि खोल अर्थ असलेला आहे. इतका वरवरचा नाही.
फक्त 'फ्री असोसीएशन' मधले ट्रेनिंग नेहेमी घेतल्याकारणाने असा जेव्हा एखादा वेगळा शब्द समोर येतो तेव्हा 'कहानी में ट्विस्ट' हे डोक्यात येते. त्या शब्दाला त्या माणसाचे काही अनुभव, संदर्भ जोडलेले असतात हे मला ज्ञात आहे. इतकेच. :)
सविता, मी वर 'भोवरा' ह्यांना म्हटले तसे. हे माझे 'consumer insights' शोधण्यासाठीचे मनाचे झालेले ट्रेनिंग आहे. व 'फ्री असोसिएशन' ह्या पद्धतीमध्ये मांडले गेलेले विचार मला विचार करण्यास भाग पाडतात. मला स्वत:ला देखील असे स्वत:बद्दल बरेच धक्के अशा ट्रेनिंग सेशन मध्ये बसतात. इथे ह्या प्रसंगाचे मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. 'तो हे असे कसे मला बोलू शकला...'ह्या धर्तीचा एकही विचार माझ्या मनाला शिवला नाही. तो प्रसंग 'फ्री असोसिएशन' च्या शास्त्राची अनुभूती देतो असे मात्र वाटते.
:) पंकज, पुरुष आणि बायका ह्यात असा काही फारसा फरक नाही. बोलायचे म्हटले तर कोणीही काहीही बोलू शकतो. आणि इथे तो हे मला कसे काय बोलू शकला ह्याचा विचार नाहीच आहे. विचार करून बघ...आपण हे असे का बनलो...आपण एखाद्या ठराविक वेळी असे का बोललो...अशीच का शाब्दिक कोटी केली...ह्याचा नीट विचार केला तर त्यामागे कुठेना कुठे तरी दडून बसलेली एखादी स्वत:बद्दलची वा इतरांबद्दलची आठवण असते. माझे मानसशास्त्राचे अपुरे ज्ञान मला हे इतके नक्की सांगते. :)
Post a Comment