'टूर'की...भाग १ 'टूर'की...भाग २ 'टूर'की...भाग ३ 'टूर'की...भाग ४ 'टूर'की...भाग ५ 'टूर'की...भाग ६ 'टूर'की...भाग ७ 'टूर'की...भाग ८ 'टूर'की...भाग ९ 'टूर'की...भाग १० 'टूर'की...भाग ११ 'टूर'की...भाग १२
पहाटे, तीन वाजता उठून अगदी तयारी वगैरे. आजपर्यंत बऱ्याच वेळा आकाशात उडालो होतो. त्यात काय विशेष ? पण बंद विमानात आत सुरक्षित उडणे वेगळे आणि एखाद्या पक्ष्यासारखे मोकळा श्वास घेत आकाशात विहार करणे वेगळे. त्यामुळे वर आकाशात नक्की किती थंडी असेल, ह्याचा तसा काही पूर्वानुभव नव्हता. हा स्वेटर, ही शाल...ही कानटोपी..अशी चर्चा रात्री झाली होती. आणि रात्रीच कपडेबिपडे, स्वेटरबिटर खुर्चीवर अगदी तयारीत बसले होते. आम्हीं उठण्याची वाट पहात. मी आधी तयार झाले आणि चार वाजता कपाडोक्यिया कसे दिसते हे बघायला दार उघडून बाहेर आले. सगळं स्वप्नवत. गडद निळं आकाश. काळे डोंगरांचे सुळके. नजरेस आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक गुहा. आम्हीं एका गुहेत, जशी अस्वले. लेक बाहेर आली. गुहेच्या पायऱ्या उतरून खाली आलो. खालील मोकळ्या चौकात शांतता होती. हलका वारा वहात होता. बाजूच्या भिंतीवरील गुलाबाची वेल व त्यावरील टप्पोरे लाल गुलाब डुलक्या काढत होते. मुख्य दरवाजा उघडून आम्हीं बाहेर पडलो. तिथे छोटी बस उभी होती. आत आधीच काही पर्यटक बसलेले होते. वातावरणात एक उत्सुकता होती.
अंधारातून बस निघाली. अरुंद गल्ल्या, चढउतार. बस पुढेपुढे जात होती. शहर मागे मागे पडत होते. आता क्षितिजावर फुगे दिसू लागले. दूर अंतरावर बोटाच्या एका पेराएव्हढे. आकाशात आपोआप वेगवेगळे स्तर तयार होत होते. काही फुगे अगदी नजरेपार. तर काही थोडे जवळ. नजीकच्या फुग्यांवरचे वेगवेगळे रंग, अजूनही न उजाडलेल्या आकाशात धूसर दिसून येत होते. रंगीत फुग्यांचे नवथर आकाश अनोळखी. बस थांबली. आम्हीं सगळे पक्षी तुरूतुरू खाली उतरलो. समोर एक प्रशस्त दिवाणखाना दिसत होता. तिथे सर्वांनी एकत्र जमावयाचे होते. अदमासे शेकडा पक्षी जमा झाले होते. आत थोडी उबदार हवा. गरमागरम तुर्की चहा आणि बिस्किटं आमची वाट बघत होते. आम्हीं दोघी हातात चहाचा ग्लास घेऊन बाहेर आलो. ढग बाजूला सारून सूर्य पुढे सरसावत होता. क्षितिजावरचे पाय उचलून एखाददुसरा फुगा प्रवासास निघाला देखील होता. आम्हांला आमची व आमच्या हॉटेलची नावे विचारण्यात आली. गर्दीत एक भारतीय तरुण जोडपं होतं. आमची नजरानजर झाली. देशी नात्याचं एक स्मितहास्य मी दिलं. प्रत्युत्तर यथातथा. विविध रंगांचे बिल्ले वाटले जात होते. आम्हांला केशरी रंगाचा बिल्ला देण्यात आला. दोघींनी बिल्ला गळ्यात अडकवला.
"Orange." आमच्या रंगाचा पुकारा झाला. आम्हीं दहा केशरी पक्षी होतो.
"That one is yours." एक अवाढव्य फुगा आडवा झोपला होता. त्याच्या पोटाशी अडकवलेल्या वेताच्या टोपलीत एक अनुभवी माणूस बसला होता. त्याच्या हाताशी चार गॅस सिलिंडर्स होती. आगीच्या ज्वाळा फुग्याच्या पोटात शिरत होत्या. फुग्याच्या पोटात हवा भरली जात होती. भक्भक आवाज निघत होता. असे बरेच फुगे आडवे झोपले होते. जणू एखाद्या शर्यतीआधीचं 'वॉर्म अप' चालू होतं.
हळूहळू आमचा फुगा जागा झाला. आम्हीं सगळे त्याच्या अवतीभोवती गोळा झालो. कोणी लहान कोणी मोठे, कोणी जेष्ठ नागरिक. काही पुरुष काही महिला. वेगवेगळ्या देशांतून त्यावेळी एकत्र झालेले, आकाशात तरंगण्याची एक हौस मनात धरून. फुग्याला कठडा होता. त्यावर हातांचा जोर देऊन आत उतरावयाचे होते. फुग्याचे नेहेमीचे मित्र आम्हांला मदत करत होते. आधी लेक आणि नंतर मी. आम्हीं दोघी आत उतरलो. आत टोपलीचे दोन विभाग केले होते. मध्ये एक आडवी काठी टाकून. आमच्या बाजूला आमचा पायलट उभा होता. थोडा स्थूल पन्नाशीच्या आसपासचा अँड्र्यूज. सुरवातीच्या काळात वैमानिकाचे काम करणारा अँड्र्यूज आजपर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या देशांत पर्यटकांना आकाशात तरंगवत होता. आणि आमच्या हॉटेलच्या ऑस्ट्रेलियन तेसप्रमाणेच गेली काही वर्षे तुर्कस्तानात स्थायिक झाला होता.
अँड्र्यूज फुग्याची तपासणी करत होता. त्याच्या मदतीला जमिनीवर चार तरुण होते. त्यांना बाहेर काही सुचना देत आत इथे तिथे वाकून बघत तो मोठ्या बारकाईने फुग्याचे तब्येतपाणी बघत होता. अखेर सगळे त्याच्या मनासारखे झाले. आणि आमचा फुगा उड्डाण करावयास तयार झाला. आम्हीं पक्षी आपापल्या जागा पकडू तयार उभे होतो. अकस्मात एक छायाचित्रकार आम्हांला हाळी देत आमच्या बाजूला येऊन उभा राहिला. कॅमेरा आमच्यावर रोखून खटखट आमचे फोटो काढले गेले. आता उत्सुकता शिगेला पोचली होती. सगळ्यांचा उत्साह भरभरून वाहू लागला.
आणि शेवटी आमच्या फुग्याच्या दोऱ्या जमिनीवरून सोडण्यात आल्या. फुग्याने भुईवरचे पाय वर ओढून घेतले. आणि आमच्या नकळत आम्हीं फूट दर फूट वरवर जाऊ लागलो. काही क्षणापूर्वी नजरेसमोर उभ्या असलेल्या गाड्यांची छते दिसू लागली. आणि डोंगर वर नव्हे तर नजरेसमोर दिसू लागले. रस्ते, डोंगर, दऱ्या, अँड्र्यूजचे चार मदतनीस...सर्वच एकदम गलिव्हरच्या गोष्टीतील ठेंगू. ठेंगू देश. ते चौघे आम्हांला हात करू लागले. आम्हीही हात उंचावले. अस्पष्ट हास्य त्यांच्या चेहेऱ्यावर देखील दिसले.
"Let's kiss that balloon!" अँड्र्यूज म्हणाला. आम्हीं खालची नजर उचलून आता समोर बघितलं. कोणाला किस करायचंय ते कळेना. आमचा फुगा समोर तरंगणाऱ्या फुग्याच्या दिशेने झेपावत होता. हलकेच जाऊन त्या फुग्याला टेकला. जसे काही एका मैत्रिणीने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या गालावर आपले गाल हलकेच टेकवावे. दोन अवाढव्य फुग्यांचे मुलायम चुंबन. हळूहळू आम्हीं त्या फुग्यापासून दूर जाऊ लागलो.
कालपर्यंत उंच दिसणारे सुळके आता खाली होते. खोल खाली लाल दरी होती. आम्हीं कपाडोक्यियातील प्रसिद्ध 'रोज व्हॅली' वरून चाललो होतो. 'रोज व्हॅली'चे असे नामकरण होण्यामागे कारण तिथला लाल दगड. वेगवेगळे ज्वालामुखी आणि त्यातून निर्माण झालेले विविध प्रकारचे दगड. कपाडोक्यियाचे वैभव. खाली पृथ्वीवर अगणित दऱ्या दिसत होत्या. फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या वस्तीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या. भूतकाळ आणि वर्तमानकाळ मनात एकत्र झाला. वाटलं, समजा पृथ्वीवर ह्या घटकेला कास्य युग चालू असते, आणि आकाशात एकविसावे शतक. दऱ्याखोऱ्यांतून खडतर जीवन जगणाऱ्या त्या वस्त्यांमधील समजा एखाद्याचे लक्ष वर गेले असते...आणि उजाडता उजाडता त्याला आम्हीं असे तरंगत जाताना दिसलो असतो...तर त्याच्यासाठी काय आम्हीं पुष्पक विमानातील माणसे झालो असतो...? "आई, कायपण हा !" लेक हसायला लागली.
आम्हीं अजून वर गेलो. संपूर्ण शहर आता दृष्टीक्षेपात येत होते. जुने कपाडोक्यिया आणि त्याला लगटून वसलेले नवे कपाडोक्यिया. आमचा फुगा मधेच स्वत:भोवती हळूवार गिरकी होत होता. त्यामुळे आम्हां सर्वांना भोवतालचे संपूर्ण दृश्य दिसत होते. एका क्षणी पाठ असलेले आमच्या पुढ्यात उभे राही...आणि मग आम्हीं तिथून पुढे सरकू...अजून वर...वर...अजून वर. समोर रंगीबेरंगी काही फुगे. खाली ? अधिक काही फुगे. वर ? अजून काही फुगे. फुग्यांचे आकाश...फुग्यांची दुनिया. मी एक फुगा. तरंगता...हलकीफुलका. भाषा विविध...आम्हीं मराठी, कोणी इंग्रजी...कोणी कळती...कोणी नकळती. श्वास हलका...मन हलकं...शरीर तरंगतं. अंगावर एखादी उबदार शाल पसरावी तसे सूर्याचे कोवळे सोनेरी ऊन ढगांआडून आमच्या अंगावर पसरले. कोणाचा गोरा चेहेरा अधिकच उजळला...कोणाचे सोनेरी केस चमकू लागले. विमानासारखे नव्हे...आकाशात उड्डाण केल्यापासून एकाच प्रकारचा प्रकाश. खिडकी बंद केलीत तर बाहेर काय आहे पत्ता लागणार नाही...सकाळ की संध्याकाळ.
आज आम्हीं शब्दश: हवेत होतो. तरंगता तरंगता अँड्र्यूज आम्हांला आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होता. आम्हांला आमचा हात फुग्याबाहेर काढता येत होता. अजून थोडं पुढे गेलो तर डोंगर हाताशी होता. हवा सुखद थंडगार होती. माऊथ पीस मधून अँड्र्यूजचा आजूबाजूला उडणाऱ्या फुग्यांबरोबर संवादबिंवाद चालू होता. त्याच्या मित्रांना तो त्यांचा फुगा नक्की कुठे आहे...त्या त्या मित्राचा फुगा आत्ता नेमका कुठे आहे ही देखील माहिती देत होता. मी उगाच कठड्यावरून खाली वाकते. कठडा कमरेच्या वरपर्यंत होता. म्हटलं तरी पडणे कठीण. तरी लेक ओरडते ! "आई, खाली वाकू नकोस !" खाली नजर टाकली तर एकदम काही काळे दिसले...म्हटलं मला काही प्राचीन काळचं फक्त मलाच वगैरे दिसत असावं....पण नाही ! कुठल्याश्या गाडीचा तो काळा टायर होता ! तिथे येऊन कसा काय पडला होता तो ? कोण जाणे. माझ्या मनात आपले 'एका टायरचे आत्मचरित्र' सुरू होते. मी लेकीला काही बोलत नाही...नाहीतर उगाच 'आई, कायपण हा !' असे ती परत म्हणाली असती !
"Now we will be going back..." अँड्र्यूज जाहीर करतो. एक तास संपला ? आयुष्यातील एक तास उडून गेला ? कधी आणि कुठे ? आकाशात उडाला की कुठल्या दरीत सांडला...कोण जाणे.
कपाडोक्यिया आकाशात आम्हीं हजेरी लावून गेलो...कपाडोक्यियाच्या आकाशाला स्पर्श करून गेलो.
दहा दिवसांपूर्वी तुर्कस्तानात प्रवेश केल्यापासून... जमीन. डोंगर. नदी. गुहा. समुद्र. दऱ्या. झाडे. वृक्ष. फुले...आणि आज पहाटे पहाटे...मोकळे आभाळ.
वाऱ्यासोबत फुगा वहात होता. काल जेव्हां चिरालीत अकस्मात पाऊस दाखल झाला होता, त्यावेळी तिथल्या ओझेलच्या मनात एक शंका आली होती. कपाडोक्यियामध्ये देखील पाऊस पडू लागला तर फुगे नाही उडवले जाणार. आम्हीं थोडे हिरमुसले होतो. वाटलं होतं, आलो खरे इथपर्यंत, पण निसर्गाने साथ नाही दिली तर ? तसे घडणार नव्हते. कपाडोक्यियामध्ये संध्याकाळी पाऊस सुरू होत होता. पहाटे मात्र वहाता वारा...जो फुग्याला समवेत घेऊन हलकेच आसमंतात तरंगत होता. फुगा जिथून उडाला तेथेच त्याच जमिनीवर तो परत उतरेल ह्याची काही शाश्वती नाही. वारा नेईल तेथे...ती त्याची दिशा. आणि ती त्याची त्या क्षणापुरती जमीन. वर आमच्याकडे लक्ष ठेवत खाली जमिनीवर अँड्र्यूजचे चार मित्र गाडीत बसून आमचा पाठलाग करत होते. जसजसा फुगा खाली उतरू लागला, तसतशी त्याची उतरण्याची जागा त्यांना कळत गेली. भराभर आपापली जागा पकडून ते जय्यत तयारीत जमिनीवर उभे राहिले. सगळ्यांनी आपापले कॅमेरे आत ठेवावेत. कठड्याला घट्ट पकडावे आणि गुढघ्यात वाकून उभे राहावे. जर चुकून फुगा वेगात खाली जमिनीवर आदळला तर कोणाच्याही पाठीच्या मणक्याला काही इजा पोहोचू नये ह्यासाठी ही अँड्र्यूजने घेतलेली काळजी. आज्ञाधारक मुलांसारखे आम्हीं सगळे उभे राहिलो. फुगा खाली खाली उतरू लागला. हलकेच एका क्षणी फुग्याने जमिनीला पाय टेकवले, आणि त्याने सरळ अंग सोडून दिले. आमच्या डोक्यावरचा फुगीर घुमट आता खाली वहात गेला. अँड्र्यूजच्या मित्रांनी फुग्याचे सगळे दोरखंड ताब्यात घेतले. फुगा देखील शहाणा मुलगा होता. दमूनभागून भुईवर आडवा झाला. आम्हीं एकेक करून बाहेर आलो. कुठल्या वेगळ्याच ठिकाणी आम्हीं उतरलो होतो. आजूबाजूला झाडे...दगड...आणि ते सुळके. बाजूला मित्रांनी एक टेबल टाकले होते. जमिनीवर झालेल्या सुरक्षित आगमनाबद्दल आता जल्लोष होता. शॅम्पेनची बाटली उघडली जाणार होती.
अँड्र्यूजने बाटली हातात घेतली. अजून सकाळचे फक्त सात वाजले होते. ऊन कोवळे होते. बाटलीचा छोटा बिल्ला उडाला आणि एक क्षण उन्हात चमकत अलगद बाजूला दगडावर विसावला. कुठेही लहानसा देखील कचरा सोडायचा नाही...ह्या तत्वाने अँड्र्यूजच्या एका सहकाऱ्याने बिल्ला उचलून तात्पुरत्या तयार केलेल्या कचरापेटीत टाकला. अँड्र्यूजच्या हातातील हिरवी बाटली उत्साहात उसळत होती. फेसाळते मद्य उन्हात चमकू लागले होते. अँड्र्यूज एकेक ग्लास भरू लागला. सगळेच वातावरण हलके होते...आनंद..जल्लोष. आकाशात केलेला एक तासाचा प्रवास सगळ्यांची मने हलकी करून गेला होता.
रस्त्यावर आमची छोटी बस आमची वाट बघत उभी होती. आम्हीं परतीच्या रस्त्याला लागलो त्यावेळी घडयाळामध्ये आठ वाजत आलेले होते. दूर रस्त्यावर अँड्र्यूजची पत्नी गाडी घेऊन त्याच्यासाठी आली होती. हसत हसत अँड्र्यूजने व तिने आम्हांला हात केला. आमची बस रस्त्याला लागली...आणि ते व त्यांची गाडी नजरेआड गेले. जसे काही क्षणांपूर्वी जमिनीवरील गाड्या क्षणार्धात ठिबक्यांमध्ये रुपांतरीत होत होत्या.
आमचा आजचा तुर्कस्तानातील शेवटचा दिवस होता. सहल संपत आली होती. उद्या मुंबईचे आकाश आणि मुंबईची जमीन गाठावयाची होती.
नेहेमीच एखादी सहल ठरवत असताना त्या संपूर्ण सहलीचा सर्वोच्च आनंदाचा क्षण काय असेल ह्याची थोडीबहुत कल्पना आपल्याला असते. तसेच ह्यावेळी आमचे झाले होते. हॉट एअर बलून राईड हा आमच्या तुर्कस्तानातील प्रवासाचा असाच एक अत्त्युच्च आनंदाचा क्षण असेल अशी आमची पक्की खात्री होती. कारण ह्या आधी कधी हे केले नव्हते. बालीला असताना तेथील समुद्रावर पॅरासेलिंग केले होते. ते देखील एकट्याने. पण तरी देखील हा अनुभव अवर्णनीय. मात्र तुर्कस्तानात आल्या दिवसापासून प्रत्येक दिवस हे असेच आनंदाचे अनेक क्षण देऊन जात होता. एक नव्हे. कित्येक. कधी इतिहासातील अजब कहाण्या तर कधी भौगोलिक आश्चर्ये. कधी जिभेचे चोचले, तर कधी मन:शांतीचा एखादा हलकासा क्षण.
कुठलाही देश असा दहा दिवसांत संपूर्ण बघून होणे अशक्य. त्यातून तो तुर्कस्तानासारखा, इतिहास, भूगोल संपन्न असेल तर अशक्यप्रायच. भारतात आयुष्य गेलं तरी देखील त्यातला एखादा वाळूचा कण काय तो हाताशी लागला असेच म्हणावे लागेल. मात्र आम्हीं जे ठरवले जसे ते झाले...तुर्कस्तानातील दोन शहरे, एक गाव आणि भूमध्य समुद्रात डुबकी. हसतमुख प्रेमळ रहिवासी, खाण्याची रेलचेल, स्वच्छ रंगीबेरंगी शहरे. सुरक्षित गावे. एखादा पर्यटक, उंचउंच डोंगर पायदळी तुडवणारा. कोणी पट्टीचा पोहणारा. कोणी आळशी, कोणी जिभेचा शौकीन, कोणी संगीतप्रेमी, कोणी इतिहास प्रेमी. तर कोणी आमच्यासारखे...सगळ्यांत थोडीथोडी गोडी. तुर्कस्तान. जो जे वांछिल तो ते लाभो...राहून राहून हे मनात येते. पर्यटकांसाठी पर्वणी.
दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हीं आकाशात होतो. मात्र आज आभाळ आमच्यापासून दूर होते. परके परके. हातात न येणारे. पहाटे छत्रपती शिवाजी विमानतळावर पोहोचलो, तेव्हां अनेक आनंदाचे क्षण खाती जमा झाले होते. मायलेकी दहा दिवस सतत एकत्र होतो. आयुष्यातील बेरीज वाढली होती. वजाबाकी थोडी कमी झाली होती हे कबूल करावयास हवे.
देव बरेच काही काढून घेतो...मात्र जगण्यासाठी काही देत देखील रहातो. त्यासाठी अहोरात्र मेहेनत करावी का लागेना.
उलट कदाचित आनंद जर स्वकष्टाने मिळवता आला तर तो अत्युच्चच.
नाही का ?
समाप्त !
:)
12 comments:
निव्वळ अल्टिमेट सफर घडवून आणलीस...
हा प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं गं, शब्दरूपी माझीसुद्धा झालेली "टूर"की ... :) :)
जबरदस्त !! इति श्री टर्की टूर कथा सुफळ संपूर्ण !! :)
अनघा,
केल्याने देशाटन ...... या उक्तीने बहुधा स्थलवर्णन व स्थलचित्रे वाचकाला अनुभवायला मिळतात..
तू मात्र स्वतःबरोबरच आमच्या मनातील तंतुवाद्य छेडून अशा काही लहरी प्रेरित केल्यास कि... कालातीत असा शतकानुशतकातील मनोव्यापारांचाही प्रवास करवलयास !
या मनाच्या तरलतेमधूनच गाठून दिलेला सुखाचा परमोच्च बिंदू म्हणजे हि 'फुगा सफर' व त्यातील चित्रे चल-चित्रे !!
अप्रतिम अनुभव लेखन !!
"आनंद जर स्वकष्टाने मिळवता आला तर तो अत्युच्चच" ....
खरेय ..१३ भाग वाचूनच तो आम्हालाही मिळवता आल्याने अत्युच्चच आहे नाही का :)
khup divsaani vachun bar vatal khup chan lihites ha gun j.j. madhe kalala navta kharch chaaaaaaaaaaaaaan.
he lekhan malahi prawasacha anubhav deun gel hi tuzayaa lihinyatali takat
lihit raha. raghav.
मजा आली वाचायला.
आता पुढचा प्रवास कुठे? :-)
सुहास, लिहायला सुरवात केली आणि मग आपोआप सबंध सहलीला एक रूप आलं. त्यातले अनुभव आपल्याला किती कायकाय शिकवून गेले आहेत हे माझं मला कळलं. तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत वाचलंत ह्याने एक हुरूप येतो हे मात्र नक्की. :)
हेरंबा, हे वाक्य शेवटी टाकायचं डोक्यात आलेलं माझ्या ! पण मला ते रात्री धड आठवेचना !!! :p :)
राजीव आभार आभार ! भारीच झालं बाबा हे सगळं लिहिणं ! म्हणजे रोज छोट्या छोट्या पोस्टा टाकणं वेगळं आणि हे असं इतकं सगळं लिहिणं म्हणजे अतीच ! म्हणून गेले दोनतीन दिवस माझा श्रमपरिहार चालू आहे ! :p :) :)
राघव, मनापासून धन्यवाद ! :) :)
सविता, आता पुढील आयुष्याचा प्रवास.... ! :) :)
Anagha,
Khup mast vatale Turkey che pravas varnan vachun.
Europe madhe pahanyachya deshanchya list madhe Turkey add kele ahe tuzya mule :)
Sonali Kelkar
नक्की जा सोनाली. तुला पण आवडेल बघ ! :) :)
Post a Comment