नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 31 July 2012

'टूर'की...भाग १२

'टूर'की...भाग १   'टूर'की...भाग २   'टूर'की...भाग ३   'टूर'की...भाग ४   'टूर'की...भाग ५   'टूर'की...भाग ६   'टूर'की...भाग ७   'टूर'की...भाग ८    'टूर'की...भाग ९   'टूर'की...भाग १०   'टूर'की...भाग ११

लाकडी दरवाज्यातून लालबुंद मखमली छोटा फ्रॉक घातलेली एक सुंदर गोरीपान तरुणी हसतमुखाने आमचे स्वागत करायला पुढे आली तेव्हा आम्हांला सोडून आमची बस वळून तिच्या परतीच्या रस्त्याला लागली होती. तरुणीच्या मागोमाग एक तरुण तुर्क. तिने त्याला आमच्या बॅगा उचलण्याचा इशारा केला. आणि "वेलकम..." म्हणत वळून हॉटेलच्या दिशेने चालू लागली. दोघेही आमची वाट पहात जागत राहिले होते. तेस, ऑस्ट्रेलियन सुंदर तरुणी. पर्यटन विषयक अभ्यास करत करत तुर्कस्तानात पोचली होती आणि ह्या देशाच्या प्रेमात पडली. आता इथेच कपाडोक्क्यात रहाते. कधी उशीर झाला तर मागे तिची खोली आहे नाहीतर तिने थोडं दूर एक छोटं घर घेतलं आहे. फारसा काही मोठा पगार मिळत नाही. पण ह्या शहराला सोडून परत मायदेशी देखील जाववत नाही. आम्हीं आल्याची नोंद संगणकावर करता करता तिच्याशी झालेल्या गप्पांतून हे कळलं. हे हॉटेल म्हणे कधी काळी एक गुहा होती. ह्या सर्व परिसरात अशी बरीच हॉटेल्स गुहेत वसवलेली आहेत. आता मात्र नवे हॉटेल बांधायला बंदी आहे. रिसेप्शनच्या बरोबर वर आमची खोली होती. सकाळी आम्हीं कायकाय करू शकतो ? मी विचारले. तिने लगेच दोनतीन माहिती पत्रके आमच्यासमोर धरली. वेझीर केव्ह तसे शहराच्या केंद्रस्थानी होते. काही गोष्टी पायी बघता येण्यासारख्या होत्या, तर काही एखादी मार्गदर्शक भ्रमणयात्रा करणे योग्य होते. 'हॉट एअर बलून'चा खर्च नक्की किती होता. माझा पुढला प्रश्र्न. तिने उत्तर दिले. 'हॉट एअर बलून' साठी पहाटे चार वाजता हॉटेल सोडायचे होते. ठीक आहे मग...आम्हीं परवा 'हॉट एअर बलून राईड' करू. आणि उद्या एक मार्गदर्शक भ्रमणयात्रा. त्यात कायकाय आम्हांला बघायला आवडेल हे तिला सांगून टाकले. ठीक आहे. तेस म्हणाली. उद्या ती आमचं परवाचं 'हॉट एअर बलून'चं बुकिंग करेल. सकाळी आठ वाजता खाली सज्ज्यावर नाश्ता लागतो. तिथे बसून तुम्हीं नाश्ता घेऊ शकता आणि त्यानंतर भ्रमणयात्रा करावयास प्रस्थान करू शकता. ठरला आमचा कार्यक्रम! उद्या इहलारा व्हॅली आणि परवा पहाटे...अनेक फोटो आजवर बघितले होते...कित्येक लेख वाचले होते.... 'हॉट एअर बलून राईड'!

हसतमुख तेसने आमचा सर्व थकवा पळवून लावला होता. आम्हीं वर आमच्या रूमवर गेलो.  पांढऱ्या भिंती, लाकडी, दगडी मला अगदी मनापासून आवडेल अशी सजावट. आम्हीं कपडे बदलून गाडीवर पहुडलो, त्यावेळी आता सकाळी उजेडात हे शहर कसं दिसेल ह्याचा मी विचार करत होते. सुरवात छान झाली होती. इथले दोन दिवस शेवटचे होते. आमच्या सहलीतले. त्यानंतर मायदेशी परत फिरायचे होते. डोळ्यांवर झोप येऊ लागली...खडबडीत गुहा...अंधार...थंड हवा...दूर कुठेतरी कुत्र्याची जाग...सर्व स्वप्नवत...२०१२ की कास्य युग....येण्यापूर्वी चाळलेली माहिती कुठेतरी हलकेच मनात फिरत राहिली. सकाळी आठ वाजता अमेरिकन नाश्ता...हाफ फ्राय...कॉर्नफ्लेक्स...ब्रेड बटर जॅम...आणि त्यावर दोन छोटे पांढरे खास लहानसे तुर्की कप, त्यात वर पसरलेल्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब अंगावर पाडून घेणारा गडद तपकिरी तुर्की चहा. नऊच्या सुमारास दरवाजातून एक तरुण डोकावला...हातात एक छोटी चिठ्ठी. आम्हीं त्याच्याबरोबर बाहेर पडलो. थोडं दूर एक छोटी बस उभी होती. त्यात आधीच काही पर्यटक बसलेले होते. ब्रिटन, चीन, अमेरिका...भारत. आम्हांला घेऊन बस निघाली. आमची मार्गदर्शक एक तरुणी होती. बावीस वर्षांची. गोरी, तुर्की. इंजे. तिनेही पर्यटन विषयक अभ्यास केलेला होता. तुर्कस्तान आता जागतिक पर्यटक खेचत होता...जे जो वांछील ते तो लाभो...ह्या तत्त्वाला जणू अनुसरून.
कपाडोक्या. शब्दाचा अर्थ, 'सुंदर घोड्यांचा देश'. तुर्कस्तानाच्या तसे केंद्रस्थानी. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा इथे ज्वालामुखी उसळत होते, त्यावेळी कोणाला कल्पना असेल, की हा देश एखाद्या परीकथेतील देश दिसू लागेल. हॅन्स अॅण्डरसनच्या परीकथा. कुठे लांबच लांब पसरलेले लाल पहाड, तर कुठे पिवळ्या दगडांचे उंच बुटके सुळके. एखादा नितळ पाण्याचा झरा. त्यात धुंदीत तरंगणारी बदके. भौगोलिक आश्चर्ये आणि त्या रचनेला धरून घडत गेलेला इतिहास, ह्यामुळे कपाडोक्क्या प्रदेश मनात भरून जातो. पहिली भेट ज्वालामुखी विवर. डाळिंबी तलाव. इथे डाळिंबाची खूप झाडे आहेत म्हणून हे नाव. मला फोटो काढायला एकही सापडेना हे मात्र खरेच!


दुसरी भेट 'भूमिगत शहरा'ची. डेरीन्कुयू. हे असं ऐकलं तर त्यात इतकं काही विशेष वाटत नाही. पण जे काही आम्हीं बघितलं ते अविस्मरणीय होतं! भारताचा स्वत:चा इतिहास, त्यातील लेणी, गुहा काही कमी नाहीत. त्यात काप्पाडोक्याला ज्वालामुखींची जोड. सगळी भौगोलिक रचनाच वेगळी. इ.सन. पूर्व पाचव्या शतकात म्हणे हे शहर वसायला सुरुवात झाली. कास्य युगामध्ये हत्ताय किंवा हात्ती ह्या नावाने काप्पाडोक्या ओळखले जाई. प्रदेशावर वेगवेगळे राजे, सम्राट येऊन गेले. राज्य करून गेले. युद्ध, लढाया, अत्याचार, गुलामी. शेतकरी वर्ग कायम गुलामगिरीत. व त्यामुळे जेव्हा परकीय हल्ले झाले त्यावेळी त्यांची मानसिकता त्या गुलामगिरीसाठी तयार झालेली होती. वर्षानुवर्षे गुलामगिरी केल्याकारणाने, त्यांना त्यात काही नवे नव्हते. काप्पाडोक्यातील ज्वालामुखींनी तयार केलेल्या मऊ दगडामध्ये जमिनीखाली एक संपूर्ण शहर वसलेले आहे. खोल आत. तुर्कस्तानामधील खोदून उजेडात आणलेल्या अशा शहरांमधील सर्वात लांब असे भूमिगत शहर. म्हणे वर जमिनीवर घरे असत. परंतु, शत्रूचा आकस्मिक हल्ला झाला की अख्खाच्या अख्खा गाव भूमिगत होई. हल्लेखोर गावातून नाहीसे होईस्तोवर सर्वजण तेथेच रहात. महिना...दोन महिने...महिनोंमहिने. काय नाही तेथे? शयनकक्ष, गोठे, तबेले, मद्याचे, अन्नाचे गुदाम, दगडी चुली, स्वयंपाकघर. तिथे छताकडे नजर टाकावी तर चुलीच्या धगीने काजळी जमा झालेले छत. चर्चेस, कन्फेशन बॉक्सेस, कब्रस्तान...जेमतेम दीड फूट रुंदीचे रस्ते, कधी खोल उतरते, कधी चढते. बाहेर चंद्र का सूर्य कार्यरत, आत पत्ता लागणे कठीण. मध्येच उंचावर लांबसडक चिमणी सारखे काही आकाशाच्या दिशेने वर झेपावताना दिसले. त्यातून म्हणे वर आवाज द्यायचा, बाहेरची हालचाल आत कान देऊन ऐकायची. भन्नाट. किती नाट्ये इथे घडली असतील. ज्यावेळी आपले जमिनीवरचे वसलेले गाव सोडून रहिवासी आत आसरा घेत असतील त्यावेळी त्यात किती वृद्ध माणसे असतील, किती बालके, किती तान्ही बाळे... किती दिवस भरत आलेल्या गरोदर स्त्रिया...झोंबती थंडी, थैमान घालणारा वारा, झंझावती वादळ, सूड उगवण्यासाठीच दाखल झालेला पाऊस, भाजून काढणारा उन्हाळा...हालांना ना पारावार. बाहेर शत्रूला कधीतरी ह्या वसाहतीचा पत्ता लागत असेल...शत्रू आत घुसत असेल...खून, रक्ताचे साडे, स्त्रियांवरील अत्याचार. अवाक. एकविसाव्या ह्या गतिमान, जगातली मी एक तिथे उभी रहाते... तेव्हा मी का कोण जाणे...हजारो वर्षांपूर्वीच्या वेदना असह्य झालेल्या घटका भरलेल्या त्या गरोदर बाईचा हात पकडून बसलेली असते. घुसमट होते. अतीव घुसमट. मी लेकीला हाक मारते...लेक खूप पुढे निघून गेलेली असते. त्या काळोखी बोगद्यांतून तरी देखील तिला माझी हाक येते... सहपर्यटकांच्या गर्दीतून वाट काढत माझ्या बाजूला ती येऊन ठेपते... "आई, काय झालं ?" "मला बाहेर जायचंय... I need to go out !" "पाणी पी पाहू तू..." ती मला सांगते. मी पाण्याचा एक घोट घेते. दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करते. मंद प्रकाशात लेकीच्या चेहेऱ्यावर भीती दिसते. मी हळूच हसते...स्वगत सुरु होतं....पडणार मी बाहेर....अजून पाच मिनिटं...मी बाहेर पडणार....आणि मी श्वास घेणार....इथे श्वास नाही घेता येत मला...घुसमट...प्रचंड घुसमट. काही सेकंदांत मला थोडं बरं वाटतं...आई...? लेक विचारते. मी हसते....मला आता बरं वाटलेलं असतं...काही क्षणांची घुसमट. ज्या जागी मी उभी होते कोण जाणे...माझ्या दोन पावलांनी जिथे जमीन स्पर्शिली होती...त्याच जमिनीवर खडतर आयुष्य जगणाऱ्या त्या माझ्यासारख्याच स्त्रियांचे काय हाल झाले असतील ? विचित्र. इजिप्तमध्ये असाच एक पिरॅमिड खोल खोल खाली उतरलो होतो आम्हीं. संपूर्ण उताराचे छत कमी उंचीचे. कारण का तर म्हणे आत झोपलेल्या शरीराचा आदर ठेवला जावा म्हणून नतमस्तक खाली उतरावे...अशीच पिरॅमिडची रचना. असंख्य प्रेते..माणसांची, मांजरींची, वानरांची. पण का कोण जाणे...आज ह्या गुहेत उभे राहून जे काही जाणवत होते ते तसे काहीच तिथे नव्हते जाणवले. त्या पिरॅमिडांचा देखील असा अतिप्राचीन इतिहास, तिथे गुलामांवरचे अत्याचार. वळणाऱ्या पायऱ्या चढत आम्हीं दोघी वर आलो. भसकन उजेड अंगावर आला. श्वास मोकळा झाला. डोळे दिपले. भुयारातून बाहेर येताना कित्येक शतकांचा प्रवास केला होता. पर्यटकांसाठी फक्त निम्मा भाग उघडण्यात आलेला आहे. जिथपर्यंत शोध लागला आहेत तिथपर्यंत, संशोधकांना म्हणे न्हाणीघर मात्र अजून सापडलेलं नाही!


तिथून पुढे इहलारा दरी. रोमन सैनिकांपासून सुरक्षित जागा शोधण्यासाठी स्त्रिया, मुले, सामानसुमानासहीत भयभीत होवून पळणारे ख्रिश्चन, पहिल्यांदा आसऱ्याला आले ते ह्या दरीत. वाहता स्वच्छ पाण्याचा झरा, झाडी, चारी बाजूंनी उंचउंच डोगर, त्यात दडलेल्या गुहा. लपून बसण्यासाठी सुयोग्य जागा. मग तिथेंच वस्त्या उभ्या राहिल्या. असंख्य मठ, कित्येक चर्चेस. कबुतरांना निरोप्या म्हणून वापरले जायचे हे कुठेतरी इतिहासात आपण वाचतो. आणि बॉलीवूडने एखादी गोष्ट दाखवली की ती लक्षात पण फार पक्की रहाते. त्याबरोबर एखादं गाणं तर अगदी डोक्यात घट्ट बसून जातं. म्हणजे कबुतर म्हटलं की कबुतर जा जा जा...गुणगुणणं सुरू! इथे डोंगराडोंगरांतून दिसणाऱ्या गुहांबरोबर आजूबाजूला पसरलेल्या छोट्या खाचा काय असाव्यात हा प्रश्र्न पडला आणि त्याचं इंजे, आमची मार्गदर्शक, हिने दिलेलं उत्तर अगदी डोळयासमोर चित्र आणून देणारं ठरलं. ती माणसाने कबुतरांसाठी बनवलेली घरे होती. तिथे कबुतरांसाठी खाणे पिणे ठेवले जाई. व त्यांना चिठ्ठ्या पोहोचवण्याचे काम शिकवले जाई. माकडाला शिकवणे, कुत्र्याला शिकवणे ह्या कदाचित सोप्प्या गोष्टी असाव्यात. आजवर मी कुठल्याही जनावराला अगदी हे तिथे नेऊन ठेव इतके देखील शिकवलेले नाही. माणसाला शिकवण्यापेक्षा एखाद्या प्राण्याला शिकवले असते तर हाताला कदाचित यश आले असते. मनुष्याचे पूर्वज कबुतरांना शिकवत. म्हणजे त्याच्या पायाला चिठ्ठी बांधून ही आता त्या त्या प्रदेशात ह्याला त्याला नेऊन दे! हे कसे शिकवायचे? असो. त्यांच्या अंड्याचा बलक हा नैसर्गिक रंगात मिसळला जाई. त्यामुळे रंग भिंतींवर पक्का बसे. तसेच त्यांच्या मलापासून रंग बनवले जात. ह्या सर्व गोष्टींमुळे कबुतराची शिकार करणे हे पापच मानले जाई. त्यांना देवाच्या जागी समजले जाई. डोंगरांचा एक संपूर्ण परिसर 'पिजन व्हॅली' म्हणून ओळखला जातो. सगळी दरी, ह्या दोन प्रकारच्या घरांनी भरून गेलेली. माणसे व कबुतरे दोघांचे हे एकमेकांना इतके धरून रहाणे गंमतीशीर. आणि कबुतरं ती करडीच. ज्यांचा मला ती फार घाण करून ठेवतात म्हणून वैताग येतो ! काळ वेगळा, गरजा वेगळ्या, देव वेगळे आणि माणूस वेगळा. रस्त्यातून जाता जाता इंजेने आम्हांला ही माहिती दिली.

नदीला धरून इहालारा दरीत जवळजवळ आम्हीं अर्धा तास चाललो होतो. रस्ता संपला तिथे आमची खाण्याची व्यवस्था केलेली होती. सगळ्यांनाच भुका लागलेल्या होत्या. टेबलावर अन्नपदार्थ येणे आणि टेबल रिकामे होणे ह्यात फक्त दहा मिनिटांचे अंतर होते.


परतताना आकाशात अस्ताव्यस्त पसरलेला एक मठ. इथेही, गोदामे, लांबसडक जेवणाचे दगडी टेबल, काळवंडलेल्या छताचे स्वयंपाकघर, भित्तीचित्रे. हे सर्व प्राचीन आहे की काही शतकेच जुने ? वर उंचीवरून खाली बघितले की वाटते...दूर क्षितिजावरून उंटांचा तांडा दाखल होईल. खाली त्यांचा तबेला आहेच... तिथे त्यांना बांधले जाईल, आणि मग वर चढून येतील लांब पायघोळ झगे घातलेले गोरे, मठवासी... कल्पनाशक्तीवर हॉलीवूडचा पगडा! 

बसने आम्हांला वेझीर केव्हच्या दारात सोडले. वातावरण थंड होते. म्हटलं तर थकवा होता म्हटलं तर अजून भटकायची हौस होती. रिसेप्शनमध्ये तेस होतीच. "आता चालू शकाल?" तिने विचारले. किती लांब? लेकीने तिला प्रतिप्रश्र्न केला. थोडंच. खाली उतरा. अलीच्या कॅफे सफक मध्ये जा...तुम्हांला नक्की आवडेल. 

अलीचे कॅफे सफक. लोनली प्लानेटने, ट्रीप अॅडव्हायझरने त्याला चांगले रेटिंग दिलेले आहे. ती प्रशस्तीपत्रके भिंतीवर फार दिमाखात बसलेली होती. पूर्वापार म्हणे ह्या रस्त्यावर अलीच्या पूर्वजांची दुकाने होती. आता मात्र ली आणि त्याची आई, ह्या दोघांनी कॅफे चालवायला घेतला आहे. रस्त्याला लागूनच आहे. पर्यटक येतात, तुर्की चहा पितात. नाहीतर अलीच्या आईच्या हातचा अडाणा कबाब. अली येतो, तुमच्याशी झकास गप्पा मारतो. चॉकलेट क्रेप खाऊन बघा असा प्रेमाने सल्ला देखील देतो. माझी लेक पुस्तक घेऊन आलेली असते...त्याबरोबर तुर्की चहा. आता तिच्यासाठी मी अदृश्य झालेली असते. 

कपाडोक्यातील पहिला दिवस संपत आलेला असतो. इथेही सूर्य रमतगमत मावळतो. सर्व आमच्या फायद्याचे. पोटपूजा करून नऊच्या सुमारास आम्हीं आमच्या हॉटेलवर परततो. दूर कुठे पुन्हां तो कुत्रा एकटाच गात असतो. शहर काळोखात बुडत असते. काल काळोखात राक्षस वाटलेले उंच डोंगर, त्यातील गुहा उगाच ओळखीच्या वाटू लागतात. काळोखात त्याच्या पूर्वजांच्या घरात शिरणारे एखादे कबुतर देखील आपलेसे वाटू लागते. 

मायदेश सोडून एक महिन्याच्या वर मला परदेशात रहाता येत नाही हे खरेच. पण तरी देखील ऑस्ट्रेलियातील आपले घर सोडून इथेच वस्तीला आलेली तेस आता मी समजू शकते.
(क्रमश:)

Sunday, 29 July 2012

'टूर'की...भाग ११

'टूर'की...भाग १   'टूर'की...भाग २   'टूर'की...भाग ३   'टूर'की...भाग ४   'टूर'की...भाग ५   'टूर'की...भाग ६   'टूर'की...भाग ७   'टूर'की...भाग ८    'टूर'की...भाग ९   'टूर'की...भाग १०

चिरालीतील शेवटची सकाळ.
अरुंद पण मोकळ्या रस्त्यावरील सायकलवरील फेरफटका...मायदेशातील समुद्राची आठवण करून देणारा तो खारट श्वास. श्वासाबरोबर शरीरात शिरणारी स्तब्धता. डोळे हलकेच मिटले, माथ्याच्या मध्यावर लक्ष केंद्रित केलं तर ती शांतता श्वासातून अंतरंगात शिरते...हलकेच वलयं माथ्याच्या मध्यभागी फिरू लागतात. पद्मासन न घालता देखील मनामध्ये ॐ उमटतो. शांत. ध्यानस्थ.

चिराली गावातील ज्या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलं होतं ते तसं काही फार मोठं नव्हतं. एका कुटुंबाने त्यांच्या मालकीच्या परिसरात बागा, कोंबडीपालन, व हॉटेल असा व्यवसाय मांडला होता. मात्र तेथील तरुण हसतमुख मालकीण ऐसगुल, तिचा नवरा, तिचा भाऊ सुलेमान आणि तिचा लेक, गोंडस मुस्तफा...मनमिळाऊ माणसे होती. आमचे दिवस हलकेफुलके सरले होते. दोन दिवस. दोन रात्री. आज सर्व हिशोब करायचे होते. आणि तिथून निघायचे होते. मुंबईहून निघताना काही पैसे मी ट्रॅव्हल कार्डावर टाकून घेतले होते व काही रोकड बरोबर घेतली होती. सर्व ठिकाणच्या हॉटेलचे पैसे हे या कार्डावरून भरावयाचे होते. व बाकी गरजेसाठी, रोख रक्कम होतीच. स्वयंपाकघराला लागूनच एक प्रशस्त खोली होती. जिथे संगणक वगैरे ठेवून ऑफिस थाटलेले होते. त्यामुळे तुर्की ऐसगुल कधी स्वयंपाकघरात उभी राहून आपल्या पाहुण्यांचा स्वयंपाक सांभाळताना दिसे, कधी मुस्तफाची मनोधरणी करत त्याच्या मुखी दोन घास भरवताना आढळे तर कधी संगणकावर बसून येणारी नवीन बुकिंग्स करताना दिसे. कपाळावर कधीही एकही आठी न उमटवता. मोडक्या तोडक्या का होईना...ऐसगुल, इंग्रजीतून ब्रिटीश बाईशी सहज संवाद साधताना दिसे. एकूणच बघितले तर जगभरातील स्त्रियांच्या मनोबलापुढे देव देखील हात जोडत असावा. व स्वत:च्या ह्या सबळ निर्मितीबद्दल स्वत:लाच रोज शाबासकी देत असावा !

ऐसगुलने तिच्या संगणकावर हिशोब मांडला. मी मुंबईत बसून थोडी आगावू रक्कम भरली होती त्याचं तिने गणित मांडलं. तिची बेरीज आणि माझी वजाबाकी तंतोतंत जुळली. मी ऐसगुल पुढे माझं ट्रॅव्हल कार्ड धरलं. तिच्या मशीनमध्ये तिने कार्ड सारलं. आणि संकट ओढवलं. माझं कार्ड तिचं मशीन घेईना. सतत 'insufficient funds' असा प्रिंट आउट येऊ लागला. एकदा झालं, दोनदा झालं. तिचा नवरा मदतीला आला. तरी तेच. सुलेमान आणि ऐसगुलने तुर्की भाषेत काही चर्चा केली. "यु गो विथ सुलेमान. माय कझिन सिस्टर हॅझ अनदर होटेल हियर. गो अॅन्ड ट्राय देअर." ऐसगुल मला म्हणाली. चिंतामग्न मी. आम्ही दोघी मायलेकींनी बाजूलाच असलेल्या ओझेलच्या माय लॅण्डकडे प्रथम धाव घेतली. लेकीने सकाळी सकाळी एक तुपट बकलावा फस्त केला. मी तेच कार्ड वापरून बघितलं...कार्ड व्यवस्थित चाललं. सुलेमान, मी, लेक आता त्यांच्या कझिन सिस्टरकडे. कार्डाचा पुन्हां असहकार. 'insufficient funds'! हे अशक्य होतं. कार्डावरचे पैसे संपले ? आमचा प्रवास अजून संपलेला नव्हता. अजून कपाडोक्या बाकी होतं. कार्ड जर आत्ताच रिकामं झालं असेल तर मग कपाडोक्या मधील हॉटेलचं बिल आम्हीं कुठून भरणार होतो ? चिंता ! अखेर वॉलेट काढलं. क्रेडीट कार्ड ऐसगुलच्या स्वाधीन केलं. माझे पैसे तिच्या खाती जमा झाले. प्रवासात कुठेही मी क्रेडीट कार्ड वापरणार नाही..हा माझा निश्चय भंग पावला. माझ्याकडे जे पैसे अस्तित्वात आहेत त्यावर मी ही संपूर्ण सहल करेन असे मी निघतानाच ठरवले होते. भलेमोठे आकडे...क्रेडीट कार्डाची बिलं मला भयभीत करतात. अडीअडचणीला म्हणून क्रेडीट कार्ड माझ्या वॉलेटमध्ये नेहेमीच जागा अडवून असतं. पण फक्त अडीअडचणीला. आज अकस्मात उद्भवलेल्या अडचणीवर शेवटी क्रेडीट कार्डाने मात केली आणि आम्हीं चिरालीतून बाहेर पडलो. तुर्कस्तानातील, समुद्रकिनारी वसलेले छोटे गाव. त्या गावातील ऐसगुलचे ते छोटसं हॉटेलं. माय लॅण्ड तसे नावाजलेले होते. मोठे होते. तिथे ट्रॅव्हल कार्ड चालले. ऐसगुलकडे नाही चालले. कपाडोक्याला चालेल अशी मनाची समजून घालत, आम्हीं परतीच्या प्रवासाला लागलो. आता मात्र अंताल्या बसस्थानकापर्यंत एक टॅक्सी व पुढे दुसरी टॅक्सी. बस टाळली. 


पेगासस एअरलाईन. तुर्कस्तानातील अंतर्गत विमाने इस्तान्बुलला स्पर्श केल्याशिवाय पुढे जात नाहीत. कपाडोक्याला जाण्यासाठी, कायसेरी किंवा नेवशेर ह्या विमानतळावर आपण पोचायला हवे. आणि अंताल्या विमानतळावरून कायसेरीला जाणे काही फार दूर अंतराचे नाही. पण ते सगळे नकाशावर. कायसेरीला जाण्यासाठी विमान तुम्हांला अन्ताल्यावरून उचलेल, इस्तान्बुलला नेऊन ठेवेल. मग तिथून तुम्हीं थोडे चाला. पायीपायी...दुसऱ्या गेटवर या. तिथून कदाचित तेच विमान तुम्हांला कायसेरीला घेऊन जाईल ! पण थेट अंताल्या ते कायसेरी नाही ! ह्या मागची कारणे मला माहित नाहीत. आणि ती शोधायचा मी जालावर तसा प्रयत्न देखील केलेला नाही !  
कायसेरी विमानतळावरून तसे हॉटेलचे अंतर बरेच होते. आम्ही जालावरून बुकिंग करतानाच विमानतळावरून आम्हांला उचलणे आणि परत नेऊन सोडणे ह्याचे विनंतीपत्र दिलेले होते. उगाच नाही ते साहस करण्याची तशी हौस नव्हतीच. आमच्या सोबत अजून पाच सहा प्रवासी चालकाने उचलले. आणि आम्हीं रस्त्याला लागलो. बाहेर काळोख पडला होता. डोंगर म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक ठराविक आकार येतो. म्हणजे शाळेत असताना कधी डोंगर, नदी, घर असं काही काढायला सागितलं की आपसूक, हातात बसून गेलेले आकार कागदावर उतरत. आणि आतापर्यंत जे काही डोंगर बघितले होते, त्यांचे आकार देखील डोक्यात बसलेल्या आकाराच्या फार काही विरोधातील नव्हते. परंतु, इथे खिडकीबाहेर काही विचित्र काळेकुळकुळीत आकार क्षितिजावर उभे होते. काळसर निळं आकाश, व त्यापुढे काळंनिळं काहीतरी...ते नक्की काय आहे, हे सूर्याच्या कृपेशिवाय कळणे अशक्य. उंच राक्षसांची टोळी उभी असावी जणू. लहानमोठे राक्षस. खाली रस्त्यावर पळणाऱ्या गाड्यांकडे आकाशातून नजर ठेऊन. आमची मिनी बस शहरात आत आत निघाली होती. विमानतळ दूर राहिला होता. मुक्कामस्थळे येऊ लागली व सहप्रवासी एकेक करून उतरू लागले. एकच बस धीम्या गतीत पुढेमागे सरकू शकेल इतके रस्ते निमुळते. वर्तुळाकार आरसे कोपऱ्यात भिंतीवर सर्वत्र अडकवले होते. व त्यावर समोरून येणाऱ्या गाड्या आणि आमची बस सुसंवाद साधत सहजगत्या चालत होत्या. एकेक करून सहप्रवासी उतरू लागले. आणि आमच्या हॉटेलच्या अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका येऊ लागली. शेवटी आम्हीं दोघीच राहिलो. कधी येणार अगं आपलं हॉटेलं ? कुठे कोपऱ्यात निवडलंय आपण ! मी लेकीला म्हटले.
"वेझीर केव्ह...!" चालक उद्गारला. आम्हीं टुणकन उठलो. बॅगा समोरच ठेवलेल्या होत्या. त्या ताब्यात घेतल्या आणि खाली उतरलो. काळोखात पांढरट दिसणारी भिंत, लाकडी दरवाजा...आत दूर दिसणारे काही बांधकाम. कधीकधी मला वाटतं...मी कशी काय बाबा अशी एकदम परक्या शहरात रात्रीबेरात्री जाऊन उभी ठाकते कोण जाणे...भीती कशी नाही वाटत मला ! मी लेकीकडे बघितलं..."छान दिसतंय हं आई हॉटेल..." "हं...चल बाई आता पटापट. रात्र उलटून गेलीय गं !" तिच्या चेहेऱ्यावर मात्र चिंतेचा मागमूस देखील दिसत नाही. आणि मला हसू येतं...वाटतं...हिला माझ्यामुळे डेअरिंग येत...आणि मला हिच्यामुळे ! निघाल्यात आपल्या मायलेकी ! मजल दर मजल !

(क्रमश:)
नकाशा जालावरून साभार  

Wednesday, 18 July 2012

टूर'की'...भाग १०


दगडांची घरे. दगडांची मंदिरे. झाडीत लपलेली शांत वस्ती. समोर नदी. बारा महिने भरून वहाणारी. अल्याड गाव. पल्याड गाव. बोचरा हिवाळा. थैमान पावसाळा. प्रखर उन्हाळा. कालमान. बाल्य, तारुण्य, वार्धक्य. कालातीत. धीट सूर्य. भित्रा चंद्र. भर काळोखात अकस्मात हल्ला. लुटालूट, बलात्कार, खून. कत्तली. रक्त. हाडमांस. मृत्यूचे थैमान. वस्ती नष्ट. पिढ्या गायब. चाचे. समुद्रातून जमिनीवर जहाजातून येणारे लोंढे. अशांत ऑलिम्पस किनारा.

समुद्र निळाशार समोर आणि त्यात हातपाय नाही मारायचे हे काही खरं नाही. चिराली समुद्राचा अपमान. सकाळी त्याचा मान राखून झाला. बागेत बसून नाश्ता झाला. एक डुलकी झाली. त्यानंतर दिवस खरा सुरु झाला. दोन सायकली घेतल्या. सायकलींवरून आम्हीं मायलेकी निघालो. ऑलिम्पसच्या दिशेने. भग्न अवशेषांपर्यंत रस्ता नाही. समुद्रकिनारी आपल्या सायकली लावायच्या. आणि वाळूत पाय टेकवायचे. चालायला सुरुवात करायची. डाव्या हाताला समुद्र. सानथोर पर्यटक. कोणी पाण्यात. कोणी किनाऱ्यावर. उन्हात विसावलेले. किनारी छोटे मोठे, रंगीबेरंगी गोटे विखुरलेले. निळे पाणी, पिवळी वाळू, त्यानंतर गोटे, पुन्हां वाळू. असा पट्ट्यांमध्ये किनारा. वाळू तापलेली. पायाला चटके देणारी. माणसामाणसामध्ये फरक किती. तेच ऊन अंगावर घेत तरुण तरुणी विसावलेल्या. आणि आमच्या पायात स्लिपर्स असून देखील तप्त वाळूचे आमच्या पायांना चटके. शेवटी, आपल्या शरीराला ऊन माहित असतं...गोऱ्यांना त्याचं नाविन्य. ते ऊन अंगावर घेत होते. आम्हीं विचार करत होतो...शूज घातले असते तर बरं झालं असतं. पायांना चटके नसते बसले. किनारा लांबसडक होता. सकाळी पाण्यात गेलो होतो तेव्हां देखील पाण्याची फार खळखळ नव्हती. समुद्र शांत होता. उगाच थैमान नव्हते. संथ निळ्या लाटा, पायाला गार गोट्यांचा स्पर्श, डोळे मिटले तर सर्वत्र शांतता. पाण्याचाच काय तो आवाज. सहजगत्या हात जोडले जावेत. मनात ॐ उमटावा. किनारा ३.५ किलोमीटर लांबीचा. गाव त्या टोकाला. रोमन भग्न अवशेष. आम्हीं त्यांच्या शोधात निघालो होतो. दूर हिरवे डोंगर दिसत होते. दाट झाडी. आयुष्यातली विसेक मिनिटे सरली आणि एक वळण आले. अकस्मात. समुद्र आपल्या मार्गे डाव्या दिशेने पुढे जात होता. मात्र वाळूचा मार्ग उजव्या हाताला वळला होता. आता समोर नदी होती. नदी सागराला मिळत होती. नदीकाठी झाडी, त्यात गुलाबी फुलांच्या डवरलेल्या फांद्या. वाकून समुद्राकडे नजर टाकणाऱ्या. समुद्र त्याच्या धुंदीत. आपल्या मार्गाने पुढे निघून जाणारा. अबोल नदी त्यात मिसळून जाणारी. कधी कुठे....हे तिलाही कळत नसावे. गोडे पाणी खाऱ्या पाण्यात मिसळून गेले....स्वत:चे स्वभावधर्म विसरले....कोणाला कधी जाणवले ? 
ऑलिम्पस. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील महत्त्वाचे लिशियन शहर. हेफायस्तोस ही मूळ देवता. अग्निदेवता. जवळच असलेल्या चिराली गावातील, किमिरा ह्या अनादी अग्नीपासून ह्या देवाची उत्पत्ती झाली असावी. समुद्रावरून वहाणाऱ्या वाऱ्यावर बसून चाचे येत. शहर लुटत. ताबा घेत. इ. स. दुसऱ्या शतकामध्ये रोमन सम्राटांनी चाच्यांकडून हे शहर बळकावले. हल्ल्यांना परतवण्यासाठी किल्ले उभारले. शेवटी पंधराव्या शतकात तुर्कस्तानात ऑट्टोमान सम्राट हजर झाले. आणि हे शहर पुन्हां रिकामे झाले.


तुटक्या कोसळलेल्या अवशेषांमधून चालताना, फिरताना काही वेगळेच वाटते. त्यातून अगदी इ.स.पूर्व इतिहास असेल तर अधिकच. आपण हॉलीवूड्चे चित्रपट बघत असतो. कुठल्या ना कुठल्या चित्रपटाने हा असा जुना इतिहास आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा केलेला असतो. त्यामुळे अशा पतन पावलेल्या शहरांतून, गावामधून फिरत असता आपोआप ती चित्रे डोळ्यांसमोर येऊ लागतात. त्याकाळचे त्यांचे वेष, त्या स्त्रिया, ती बालके....ती युद्धे...ते चाचे...ते दरोडे. खडतर आयुष्य. आत जंगलात लपून बसलेलं, नदी आणि समुद्र ह्यांच्या संगमापाशी वसलेलं एक शहर. शेतीभाती, व्यापार, आवकजावक. गावातून वहाता झुळझुळ झरा. आसमंतात घुमून राहिलेला किड्यांचा आवाज. पाऊल टाकले की सुक्या पानांचा आवाज. वरून लटकलेल्या फांद्या...मोकळ्या जागांतून जमिनीवर येणारं ऊन. थोडा अंधार पडला की भुतांचंच गाव वाटत असावं. मध्येच पायाशी नजर जाते तेव्हा एखादा छोटासा दगडाचा तुकडा दृष्टीक्षेपात येतो. त्यावरही नक्षीकाम. कोणा माणसाने मन लावून एकेक छेद दिला असेल. एकेक फुल...एकेक पान. कदाचित त्यानंतर माझाच हात त्या दगडावर पडला असेल. काही विचित्र भावना थरारून जाते. वाटतं हा तुकडा घेऊन मायदेशी परतावं. "घेऊन जाऊया का गं हा तुकडा घरी ?" "नको....!" लेक म्हणते. मग मला आठवतं. ज्याज्या देशाला भेटी देण्याचा योग येतो त्या त्या देशातून मी तिथली दगड व माती छोट्या बाटलीत भरून घेऊन येते. स्पेनला माओरका बेटावरून जमा केलेले दगड तेथील विमानतळावर अडवले होते. बॅग उघडायला वगैरे लागली. मी हे असे माती, दगडधोंडे का जमवलेत ह्याचे त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. म्हणजे....काही तसं काही खास कारण नाही....सहजच. सहजच म्हणजे ? म्हणजे मी असे जमवते....काय ? दगड ? अं ? हो...म्हणजे जिथे जाईन तिथली माती आणि दगड !...हे असं स्पष्टीकरण देताना माझं मलाच काहीतरी असं म्हणजे स्टुपिड वगैरे वाटलं होतं....पण सोडली नाही मी माझी दगड माती. पुन्हा बॅगेत टाकली...आणि घेऊन आले घरी ! आता जर अडवले, तर हा कोरीव कामाचा दगड ताब्यात ठेवल्याकारणास्तव चोरीचा आळच यायचा ! गुमान सुक्या पानांवर तुकडा ठेवून दिला. जमिनीवर विखुरलेलं अप्रतिम मोझॅक. अपार मेहेनत. 
  
गावातून बाहेर आलो. तेव्हा बाहेर पुन्हा निळं आकाश आणि निळं समुद्र. आत असं काही असेल ह्याचा बाहेर तसा काही मागमूस लागत नाही. वसाहत....लुटारू चाच्यांपासून थोडीफार लपून रहात असावी. वाळूतून पुन्हा परतीचा रस्ता. वाळू थंडावली होती. उन्हं थोडी मवाळली होती. समुद्रात बोटी डुलत होत्या. माणसे तरंगत होती. इथे सूर्य समुद्रात डुबक्या घेत नाही. त्याचं आणि समुद्राचं मुळी संध्याकाळी जमत नाही. म्हणजे दिवसभर भांड भांड भांडून नवरा बायको जसे रात्र झाली की सगळी भांडणं विसरतात...पण ते सगळं आपल्या देशी....आपला सूर्य आणि आपला समुद्र...रोज रात्री आपली रुसवेफुगवे विसरतात आणि मिठीत गुड्डूप होतात. ह्याचं मात्र भलतंच. एकाचं तोंड एकीकडे तर दुसऱ्याचं दुसऱ्याच दिशेला.
रात्री पुन्हा माय लॅण्ड... ओझेलशी गप्पा. ओरहान पामुक. इस्तान्बुलमधील तुर्क लेखक. २००६ सालचा वाङमयातील नोबेल विजेता. My Name is Red. मी वाचलं आहे हे पुस्तक. अतिशय वेगळं. आणि मला प्रचंड आवडलेलं पुस्तक. सगळ्यांनाच आवडेल की नाही खात्री नाही. परंतु, मला त्यातील वाङमयीन मूल्यासाठीच, त्याच्या लिखाणाच्या शैलीसाठीच हे पुस्तक अतिशय आवडलेलं होतं. इस्तान्बुलमध्ये जिथे कुठे दिसेल तिथे माझी लेक मला ते पुस्तक विकत घेण्याचा आग्रह करीत होती. "आई, त्याच्या देशात तू त्याचं पुस्तक विकत घेशील ! किती छान ! घे ना गं !" पण माझं सगळं गणितच वेगळं. मी पैसे 'कन्व्हर्ट' करीत राहिले. मुंबईत कमी किमतीत मिळेल गं मला...असं तिला सांगत राहिले. ओझेल मुळचा इस्तान्बुलचा रहिवासी. आयुष्यातील रहाटगाडग्याचा कंटाळा आला आणि म्हणून चिरालीत समुद्रकिनारी एक जागा विकत घेतली. आणि हे हॉटेल थाटलं. निसर्गाची जवळीक साधत. ओरहान पामुक ह्याबद्दल इथल्या लोकांना काय वाटतं ? अभिमान ?....विषय सरकत गेला पुढे पुढे....अभिमान...पूर्वी वाटत असे. इथल्या लोकांना त्याचा खूप अभिमान वाटत असे...आता नाही वाटत. का बरं ? मी विचारलं. कारण आता तो मुलाखतींमध्ये, सभांमध्ये तोंडाला येईल ते बरळतो. म्हणजे ? म्हणजे अशी काही मुद्दाम मतं मांडतो जेणेकरून सतत त्याच्यावर चर्चा होत राहील...लेकीने माझ्याकडे बघितलं. तिला माझं ह्या लेखकावरचं प्रेम माहित होतं. "आई, म्हणजे इथला सलमान रश्दी आहे वाटतं तो !" मी हसले. ओझेलला तसा फारसा रश्दी ओळखीचा नव्हता. विषय तिथे तुटला. अकस्मात दूर कुठेतरी आकाश कडाडलं. वीज चमकली. आभाळ फुटलं. ओझेल आणि मंडळी धावपळ करू लागली. लाकडी सामान छताखाली घेऊ लागले. त्यांच्याबरोबर आम्हीं दोघी देखील इथे तिथे धावलो. उशीर झाला होता. उद्या सकाळी अकराच्या सुमारास चिराली सोडायचे होते. कपाडोक्यासाठी सकाळी विमानात बसावयाचे होते. दोघी सायकलींवर स्वार झालो. निमुळत्या रस्त्याला लागलो. उगाच ते भग्न गाव डोळ्यांसमोर येत होते...

इ. स. पूर्व गाव. अंधारात लपलेलं. मशाली पेटलेल्या. पावसाचा मारा. विजांचा कडकडाट. उसळत्या लाटांचा खोल आवाज. दगडी घरं. आईच्या कुशीत बाळं. क्षणाक्षणाला दचकून उठणारी बाळं. लांब पांढरीशुभ्र दाढी लोंबणारी वृद्ध अनुभवी माणसं...
...समग्र हॉलीवूड.

(क्रमश:)

Saturday, 14 July 2012

टूर'की'...भाग ९

टूर'की'...भाग १
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५
टूर'की'...भाग ६
टूर'की'...भाग ७
टूर'की'...भाग ८

"आई, बाहेर पडूया ? येताना मी आपल्या रस्त्याला लागून काही हॉटेल्स बघितली होती.  तिथे जाऊया जेवायला ?"

आम्हीं पहाटे निघालो होतो. आता अडीच वाजून गेले होते. दिलेल्या रूममध्ये बॅगा ठेवून झाल्या होत्या. खोली काही फार थाटामाटाची नव्हती. साधीसुधी. मात्र स्वच्छ. बैठी कौलारू घरं. समोर पाऊलवाट. प्रत्येक घराची एक स्वतंत्र वाट. ह्या वाटा एकत्र येऊन पुढे चालत गेलं तर डाव्या हाताला मोकळी जागा. हिरवळ त्यावर लिंबाची झाडं. लाकडी टेबलं. वर झाडावर लटकवलेले सुक्या भोपळ्याचे दिवे. उजव्या हाताला टेबल टेनिसची तयारी. त्याच्याच समोर गझीबो. म्हणजे छोटं छत असलेलं १२ फुट बाय १२ फुटांचं घर. गाद्या टाकलेलं. मधोमध तुर्की जाजम पसरलेलं. पाय पसरा, तुर्की चाय हातात घ्या, एक पुस्तक घ्या...नाहीतर हुक्का...आणि बसा मग आरामात. तासनतास.

आम्हीं ताजेतवाने झालो. रस्त्याला लागलो. तसं ऊन होतंच. कधीकधी गोष्टी छानच घडणार असतात. आणि मग त्या तशा गोष्टी घडाव्यात अशी पावलं आपण आपोआप उचलतो. आम्हीं पाच मिनिटे पुढे चालत गेलो आणि उजव्या हाताला 'माय लॅण्ड नेचर' हॉटेल दिसलं. पाय तिथे वळले. हेही बैठं हॉटेल. समोर भलंमोठं जाळीदार छत. त्याखाली बरीच टेबलं आणि खुर्च्या. आम्हीं तिथेच स्थानापन्न झालो. समोर मॅनेजरची केबिन होती. आत पुस्तकांची लाकडी कपाटं ! येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुले वाचनालय ! लेक तिथे वळली. हातात पुस्तक घेऊन बाहेर आली. खुर्ची, हातात पुस्तक, वर सुंदर जाळीदार छत. छताला द्राक्षांची झुलती किनार. त्यातच एखादं लालचुटुक जास्वंद. जमिनीवर झेपावणारे बिलोरी ऊन खडे....चमचम...चमचम. अप्रतिम. शांत. तितक्यात कोणी त्या केबिन मधून बाहेर आलं. पन्नाशीच्या आसपासचा ओझेल. हॉटेलचा एक भागीदार. गप्पा सुरु झाल्या. गप्पा रंगल्या.
"कुठून ?"
"इंडिया."
भारतातून थेट चिरालीला येणारे म्हणे आम्हीं पहिलेच पर्यटक. भारतीय येतात. परंतु, भारतातून नव्हे. लंडनहून. लंडनवासी. मग हे आश्चर्यच नव्हे काय...? "तुम्हीं कसे काय इथे पोचलात ? चिराली हे गाव कोणी तुम्हांला सांगितलं...?"
ज्या कुठल्या साईटवर आम्हीं चिरालीची माहिती बघितली त्या प्रत्येक साईटवर हे गाव छोटं आहे. शेजारीच ऑलिम्पसचे भग्न अवशेष आहेत. शांत निळा समुद्र किनारा आहे...फारसं काही करावयास नसणारं गाव आहे...असंच वर्णन आम्हांला सापडलं. म्हणून आम्हीं दोघी इथे येऊन पोचलो.
ओझेलला हे विचित्र वाटलं. तो हसला. "आज सूर्यास्तानंतर भेट देण्याजोगं एक ठिकाण सांगू का तुम्हांला ?"

तिथेच खास घरगुती तुर्की जेवण जेवून आमच्या हॉटेलवर परतलो. या हॉटेलचा एक भागीदार, सुलेमान. दुपारी आमचे ज्या मुलीने स्वागत केले ती सुलेमानची धाकटी बहिण. एसेगुल. ही बहिणभावंड घरगुती हॉटेल (pansiyon) सांभाळत होते. संध्याकाळी सातच्या आसपास, सुलेमान आणि सुलेमानाचा लेक मुस्तफा आमच्यासाठी गाडी काढून तयार होते.

मुस्तफा, सुलेमानच्या मांडीवर. स्टीयरिंग व्हील मुस्तफाच्या हातात. वय नऊ महिने. खुदुखुदू हसत साहेब चक्र फिरवत होते. पंधरा मिनिटे मुस्तफाने गरगर चक्र फिरवले. आम्हांला एका डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडले. थोड्याच वेळात काळोख पडू लागणार होता. उजव्या हाताला टेबलं टाकलेली होती. 'चाय'चा मोठा थोरला पिंप ठेवलेला होता. माणसे बसली होती...गप्पा रंगल्या होत्या.. समोर चाय होता. आम्हीं एक टॉर्च घ्यावा अशी ओझेलने दुपारी सुचना देऊन ठेवली होती. बाजूच्या दुकानात टॉर्च लटकत होते. एक ताब्यात घेतला. डोंगर चढावयास सुरुवात केली. आजची संध्याकाळ तुर्कस्तानातील डोंगरावर घालवायचा बेत होता. तुर्कस्तानात ट्रेक.
किमीरा. तीन प्राण्यांचे रूप धारण करणारी. दैत्यीण. भयानक किमीराचे मस्तक सिंहाचे, शरीर बोकडाचे, शेपटी सर्प. मुखातून उसळत्या ज्वाळा. इफिरया येथील राजपुत्र हिपोनेस ह्याने शिकार करता करता आपला बंधु, बेलेरॉस ह्याची हत्त्या केली. हे कृत्य करून, गर्वाने त्याने स्वत:चे नामकरण केले....बेलेरेफॉन्तेस. अर्थ...जो बेलेरॉसचे भक्षण करतो तो. आपल्या पुत्राच्या ह्या अपकृत्याने संतापून, 'इफिरया'च्या सम्राटाने बेलेरेफॉन्तेसला हद्दपार केले. राजपुत्राने सम्राट आरगोस ह्याकडे मदतीची याचना केली. शरणागताला हाकलून लावणे म्हणजे आत्मसन्मानची अवहेलना अशी राजा आरगोसची निष्ठा. त्याने बेलेरेफॉन्तेसची पाठवणी केली लिशियन राज्यात. तेथील सम्राटाला देशोधडीला लागलेल्या राजपुत्र बेलेरेफॉन्तेसची दया आली. दया येऊन त्याने काय करावे ? सम्राटाने बेलेरेफॉन्तेसला किमीराशी युद्ध करावयास धाडले. किमीराचे वास्तव्य होते ऑलिम्पस पर्वतावर. शूर बेलेरेफॉन्तेस त्याच्या पंख असलेल्या अश्वावर, पेगाससवर स्वार झाला. निघाला किमीराशी युद्ध करण्यास. किमीरा पुढे पेगासस तग धरू शकेल ? आकाश रंग बदलू लागले. रंगमंच जणू. पडदे क्षणाक्षणाला सरसर बदलत गेले. बेलेरेफॉन्तेसला घेऊन पेगासस उडाला थेट आकाशात. वेगाने पृथ्वीवर खाली येत असता, हातातील भाल्याने बेलेरेफॉन्तेसने किमीरावर जोरदार हल्ला चढवला. त्या भयावह दैत्यीणीला सर्व शक्तीनिशी खाली ढकलले. किमीरा खोलखोल जाऊ लागली. धरणी देखील बेलेरेफॉन्तेसच्या दैवी शक्तीपुढे हतबल ठरली. जसे एखादे तलम वस्त्र फाटावे तशी ती भेदत गेली. क्षणार्धात किमीराला शूर बेलेरेफॉन्तेसने खोल ढकलले. पाताळात नेले. तिला तिथेच जखमी सोडून पेगाससवर दिमाखात आरूढ झालेला बेलेरेफॉन्तेस विजयी भाला हवेत उंचावत वेगात वर आला. मात्र किमीरा पाताळात देखील कधी शांत झाली नाही. आजही ती प्रयत्न करीत रहाते. पार आकाशाला भिडण्याचा. तिच्या मुखातून भयानक ज्वाळा पृथ्वीला भेदून आजही आकाशाकडे झेप घेतात...पावसापाण्यात...उन्हातान्हात....बर्फाच्या माऱ्यात.

कुतूहलजनक ग्रीक कथा. पर्वत किमीरा येथील पृथ्वीतून आकाशाकडे झेपावणाऱ्या अग्नीच्या ज्वाळांमागची कथा. हजारो वर्षे सांगितली गेली...काळाबरोबर पुढे पुढे आली. ना त्या ज्वाळा विझल्या...ना ती कथा विरली. बेलेरेफॉन्तेसची ही विजयगाथा जतन करण्यासाठी व तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ऑलिम्पसमधील प्रजा पर्वतावर मशाली पेटवतात व सुसाट दौडत ऑलिम्पस गावात परततात. म्हणे जगातील हा सर्वात पहिला ऑलिम्पिक खेळ. कालांतराने अनेक विविध खेळ ह्यात जोडले गेले. ऑलिम्पिक मशाल देखील ह्याच किमीराच्या मुखातील ज्वालांवर बेतलेली आहे. तुर्कस्तानाचा असा दावा आहे. अर्थात ग्रीक जनतेची ऑलिम्पिक मशालीच्या उगमासंबंधी काही वेगळी कथा आहे. ह्या पूर्ण प्रदेशात चर्च, देवळे ह्यांचे भग्न अवशेष आजही दिसून येतात. हेफायस्तोस, अग्निदेवता, ह्या ग्रीक देवाची देवळे. तिथे वस्ती होती ह्याची ही चिन्हे. पृथ्वीच्या ह्या भौगोलिक रूपाचे यनार्तास (अग्निखडक) हे तुर्की नाव .

ट्रेक सुरू करण्याआधी पायथ्याशी फलकावर छापलेली ही कथा आम्हीं मायलेकींनी वाचली व मग चढायला सुरुवात केली. त्यामुळे काही वेगळेच स्फुरण. वर पोचल्यावर नक्की काय नजरेसमोर दिसणार आहे ह्याची पुसटशी देखील कल्पना येत नव्हती. आणि असे काही बघायला मिळणार आहे ह्याची आधी कल्पना नसल्याकारणाने जालावर शोध घेतला गेला नव्हता...एकही छायाचित्र बघितले गेले नव्हते. चढेस्तोवर अंधार पडायला हवा. कारण त्या अंधारातच ज्वाळा अधिक उठून दिसणार होत्या. चढणाऱ्या आम्हीं एकट्याच नव्हतो. वेगवेगळ्या देशांतील अनेक पर्यटक होते. नेहमी सूर्यास्त होण्याआधी डोंगर उतरण्यास सुरुवात होते. इथे उलटंच होतं. सगळेच अंधार पडण्याची वाट बघत चढ चढत होतो. आता येईल नंतर येईल करीत. काही माणसे परतत होती. "अजून किती चढ आहे ?" "फक्त दहा मिनिटे." उत्तर मिळत होतं.

अचानक समोर तिरपा जाणारा चढ दिसला. तुरळक गर्दी. काही फुटांच्या अंतरावर जमिनीतून वर झेपावणाऱ्या ज्वाळा. अशांत किमीरा.

अंधार वाढला. आग अधिक उठून दिसू लागली. लाल ज्वाळा. जणू वेगवेगळ्या अंतरावर जमिनीखाली कोणी मशाल घेऊन अथक उभे असावे. डोंगरावर कोणी अजरामर पणत्या पेटत ठेवाव्या. अदमासे २०० मशाली ह्या सर्व परिसरात आहेत. हजारो वर्षांपूर्वी, पायथ्याशी दूरवर असलेल्या समुद्रातील बोटी म्हणे ह्या मशालींचा उपयोग, मार्ग ठरवण्यासाठी करीत असत. अदमासे २५०० वर्षांपासून हा अग्नी जिवंत आहे. जवळ जाऊन बघितलं. वाकून वाकून बघितलं. मनात आलं, पुरातन काळात ज्यावेळी मनुष्याच्या नजरेस हे जेव्हां प्रथम नजरेस पडले असेल, त्यावेळी त्याची काय अवस्था झाली असेल ? सर्वात प्रथम ज्याने हे पाहिलं...त्याचं भयाने काय झालं असेल ? पायथ्याशी समुद्रावरून कधीतरी त्याची नजर वर गेली असेल. रात्रीच्या काळोखात ह्या ज्वाळा त्याला कधी दिसल्या असतील तर कधी सोसाट्याच्या वाऱ्यामागे त्या लुप्त झाल्या असतील...भुताटकी...भय सगळीकडे ग्रासून गेले असेल. आणि मग कल्पनाशक्तीची भरारी....तीन प्राण्यांचे एकत्र रूप धारण करणारी दैत्यीण...देव...दैत्य...युद्ध...सूड...वगैरे.

अभ्यासकांनी तीन निष्कर्ष काढले आहेत. एक म्हणजे इथे पृथ्वीच्या गर्भात लाव्हा आहे. त्याचा हा परिणाम आहे. दुसरा अभ्यास सांगतो, भूगर्भातील सततच्या हालाचालीचा हा परिणाम आहे. कायमस्वरूपी भेगा तयार झालेल्या आहेत. तिथून मिथेन वायू बाहेर पडतो. तिसरा निष्कर्ष...सतत बदल घडत असलेले खडक. Metamorphic rock. पृथ्वीच्या गर्भात असलेली उष्णता व अति दबाव ह्यामुळे आतील खडक सतत बदलत रहातात. त्यामुळे तयार झालेली आग जमिनीला पडलेल्या भेगांमधून बाहेर झेपावत रहाते.

पृथ्वीची एकेक आश्चर्ये. हजारो वर्षांपूर्वी अजाण मनुष्याने त्याला जोडलेली मिथ्थके.
शाळेत भूगोल हा असा शिकवत गेले असते तर त्या भूगोलाचे कधी ओझे वाटले नसते. डोळे मिटत असता देखील हातात पुस्तक धरून घोकंपट्टी करावी लागली नसती.

किमीरा पर्वत उतरण्यास सुरवात केली तेव्हां सुलेमानचा सल्ला आठवला. लेकीने टॉर्च लावला. उतरण एका पट्ट्यात दिसू लागली. लाल....केशरी...पायऱ्या....ओबडधोबड दगड. रातकिड्यांची जाग ऐकू येऊ लागली. उगाच डोळ्यांसमोर, त्या अंधारात हातात काठी घेऊन तोंडाने कसले अनाकलनीय मंत्र जपत चाललेली टोळकी दिसू लागली. निसटत्या उजेडात आम्हीं पायऱ्या उतरत गेलो. आमच्या पुढ्यात एक पाच वर्षांचा पोरगा. माकडाच्या गतीने उड्या मारत पोरगं उतरत होतं. अपुऱ्या प्रकाशात. रोजचा पायाखालचा रस्ता असल्यागत. कधीतरी माझ्या समोरचा टॉर्चचा उजेड धूसर झाला. लेक कुठे गेली म्हणून मी मागे वळून बघितलं. माझी लेक त्या पाच वर्षांच्या मुलाला हातातील टॉर्चने उजेड देत होती. आणि मी काळोखातच. हसू आलं. जपून मी खाली उतरू लागले. मागून ते पोरगं...आणि ही त्याची पुरत्या दहा मिनिटांची ताई !

चिरालीतील पहिला दिवस संपला. भौगोलिक चमत्कार. तुर्कस्तानात येऊन आम्हीं ट्रेक करू असं तर नव्हतं ठरवलं. त्यामुळे मी तयार केलेल्या त्या वर्ड डॉक्यूमेंटमध्ये तर हे नव्हतंच.
अविस्मरणीय. रोज एक नवल...आमची तुर्की सहल.
क्रमश:
ग्रीक चित्रे जालावरून साभार

Thursday, 12 July 2012

टूर'की'...भाग ८

२०१० साली 'युरोपियन सांस्कृतिक राजधानी' अशी जेव्हां इस्तान्बुलची ओळख होऊ लागली तेव्हां सात करोड पर्यटक इस्तान्बुलला भेट देऊन गेले. इति विकीपिडीया. इथे संस्कृती, इतिहास, मनोरंजन, खादाडी...अशा अनेक गोष्टी एकत्र नांदतात. त्यामुळे पर्यटक आपापल्या आवडीनुसार हवे ते करू शकतो. आनंद मिळवू शकतो. आता शहराचे आधुनिकीकरण झालेले आहे. बरेच उद्योगधंदे, मिडीया शहरात सर्वत्र पसरलेले आहेत. २०२० साली होणारे ऑलिम्पिक ह्या शहरात भरवण्याची संधी त्यांना मिळावी ह्यासाठी तुर्कस्तानाने म्हणे प्रस्ताव मांडला आहे. जर त्यांना ही संधी मिळाली, तर जगाला दाखवण्यासारखे, देण्यासारखे त्यांच्याकडे अलोट आहे हे खरेच.

पहाटे चारच्या सुमारास जेव्हां आम्हीं टॅक्सी करून निघालो तेव्हां इस्तान्बुल अजून निजलेले होते. नशिबाने निदान त्या वेळी तरी एकही तुर्क समुद्रात गळ टाकून, बगळ्यासारखा उभा दिसला नाही. मुंबईहून निघण्याआधी ह्या पूर्ण सहलीचे एक वर्ड डॉक्युमेंट मी बनवले होते. त्यात दिवसावार विमानाच्या वेळा, त्यात्या ठिकाणच्या हॉटेलचे पत्ते आणि त्या त्या गावी पोचल्यावर काय करावयाचे आमच्या मनात आहे हे उतरवले होते. थोडाफार इथेतिथे बदल होणे गृहीत धरून. खास तुर्कस्तानात जिभेचे चोचले कसे आणि कुठे पुरवायचे आहेत ह्याची देखील त्यात नोंद केली होती. रहाण्याच्या ठिकाणापासून अतातुर्क म्युझियम दूर असल्याकारणाने ते राहून गेलं होतं. तशाही बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या. दोन दिवस तीन रात्री पुऱ्या पडणाऱ्या नव्हत्याच. परंतु, सगळ्या गोष्टी अनुभवल्याच पाहिजेत असा अट्टाहास धरलेलाच नव्हता. प्रत्येक क्षण पूर्ण जगावयाचा होता. आयुष्यात अट्टाहास धरून काही मिळतं हा गैरसमज माझा आता दूर झालेला आहे. चांगली इच्छा मनी बाळगावी...प्रयत्न करावेत. जे मिळतं ते आपल्या नशिबात असतं. जे मिळत नाही ते आपल्या नशिबात कधीच नसतं. कधीकधी वाटतं...माझ्या हातात असं एक गोष्टीचं पुस्तक दिलं गेलं आहे, ज्यात मधली काही पानं नाहीत...माझी गोष्ट तशीच लिहिली गेली आहे...ती पानं गहाळ झालेली नसावीत...तर ती कधी लिहिली गेलीच नाहीत. थोडा वेळ मला कोणी एकटं सोडलं की माझे विचार हे तुर्की घोड्यावर बसून दौडू लागतात. 
इस्तान्बुल विमानतळावर पोचलो...विमानात बसलो....०६:३५वाजता विमान उडालं...आणि ०७:४५ वाजता अन्ताल्जा विमानतळावर टेकलं. वर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणेच.
पुढील प्रवास आकाशातून नव्हता. रस्त्यावरचा होता. आणि म्हणूनच दिवसाउजेडीचं विमानाचं बुकिंग केलं होतं. आमचं चिरालीतील हॉटेल हा एका तुर्की कुटुंबाने चालवलेला लघुउद्योग होता. जेव्हा हे बुकिंग केलं, तेव्हा त्यांच्या साईटवर, तिथे कसे पोचायचे ते दिलेलं होतं. प्रवास अदमासे तीन तासांचा होता. दोन बसेस करावयाच्या होत्या. अन्ताल्जा विमानतळातून बाहेर पडावं. एअरपोर्ट ट्रान्स्फर बस पकडावी. ओट्टोपार्क. उतू नये मातू नये...घेतला वसा टाकू नये. जे आखून घेतलं आहे ते तसंच करत पुढे सरकत जावं. ती चारचाकी, दीड तास पुढे नेईल. चालकाला सांगून ठेवावं. चिरालीला उतरणे आहे. तो एका ठराविक ठिकाणी उतरवेल. 'तिकीटा' बसमध्ये चढल्याचढल्या चालक देईल. खिडकीत जागा मिळाली आणि बॅगा डाव्या हाताला नजरेसमोरच राहिल्या तर ठीक आहे. कारण बॅगांना चाके असतात आणि गाडी चालू लागली की आपण पण पळावे असे त्यांच्या मनात येणे ह्यात वावगे ते काय ? फार तर आपण लक्ष ठेवावे. पुढले दोन तास आपल्या बॅगांची, उंदरासारखी चालू असलेली पळापळ बघावी. नाहीतर सरळ दुर्लक्ष करावे. इथे चोऱ्या होत नाहीत. त्यामुळे तुमची बॅग कोणीही स्वत:ची म्हणून उचलून नेणार नाही. ती एकटीच काय ते इथेतिथे मनसोक्त फिरेल आणि तुमच्याबरोबरच खाली उतरेल. मी आपली एकदा तिला नीट कोपऱ्यात ठेवावी म्हणून उठले. म्हटलं आपल्या बॅगांना वाटू नये...परक्या देशात काय बेवारश्यासारखे आपण पडलोय वगैरे म्हणून ! आणि वळून परत जागेवर जाऊन बसावं म्हटलं तर एक पन्नाशीचे गृहस्थ माझ्या जागेवर बसले होते. लेक पण काही बोलली नाही त्यांना. फक्त माझ्याकडे बघत बसली. मग मीच आपली जाऊन त्यांच्या समोर उभी राहिले आणि म्हटलं...my seat आहे म्हणून ! उठले मात्र सदगृहस्थ गृहस्थ लगेच. मागे जाऊन उभे राहिले. त्यांच्याबरोबर असलेली त्यांची तरुण मुलगी माझ्याकडे बघून गोड हसली. मी आपलं म्हणतेय ती त्यांची मुलगी होती म्हणून ! पण नेमकी बायको असायची !

आम्हीं दोघी हातात गुगलचे नकाशे घेऊन बसलो होतो. पण त्या नकाशातील नावे आणि डोळ्यांसमोर दिसत असलेली रस्त्यांची नावे ही काही केल्या मेली जुळेनात ! बसने जेव्हा एक उजवीकडे वळण घेतले त्यावेळी मी आपले लेकीला म्हटले..."हो गं ! इथे नकाशात पण उजवंच वळण दाखवलंय !"
"आई ! त्यातलं वळण आणि आता आपण घेतलेलं हे वळण अजिबात सारखं असणार नाहीये !"
"हो काय ? बरं. " तीन तासांचा प्रवास. कधी सरळ मार्ग तर कधी उजवे...कधी डावे वळण. अंतराळात बसून मार्गाचा आढावा गुगलने दिलाही असता कदाचित. परंतु, आयुष्यात सगळीच वळणे आधीच माहिती झाली तर जगण्यात तो काय आनंद ? अचानक एखादे वळण समोर उभे ठाकावे, आपला ना आपल्या गतीवर ताबा ना कुठल्याही निर्णयावर. वळण घेतले जाते...आणि आपण आयुष्यात पुढे निघून जातो. तसेच काहीसे. मी अशी किती जवळ जाऊन जाऊन 'क्लोजअप प्रिंट आउट' मारणार होते ? प्रत्येक वळण काही ह्या प्रिंट आउट मध्ये आले नसतेच ! माझी लेक अशी हुशारीने काहीतरी बोलली, की मला मी काहीतरी बावळटपणा केलाय ह्याचा खेद होण्यापेक्षा, कसं गं बाई माझं लेकरू...एकदम हुशार झालंय ! असंच वाटू लागतं ! ह्यात नवीन मी काहीच सांगितलेलं नाहीये...माहितेय मला. सगळ्याच आयांना हे असेच वाटत असणार ! असो...

लेकीने एकदा पुढे जाऊन चालकाला सांगितले..."चिराली"
त्याने मान डोलावली. तीनचारदा आमची बस थांबली. बाजूला बसलेलं तरुण जोडपं त्यांच्या इतकुश्या पिल्लाला सांभाळून घेत खाली उतरलं. मी उगाच त्या बाळावर माझी अनुभवी नजर टाकली. जरा कमी दिवसांचं आहे वाटतं त्यांचं बाळ...मी लेकीच्या कानात कुजबुजले. तिने डोळे वटारले. तिला ह्या मेल्या अशा आपल्या बायकी गप्पा मुळी म्हणजे मुळीच आवडत नाहीत ! आम्हीं साध्याश्या छोट्या गावी निघालो होतो. शहरासारखे हुशार, चटपटीत, तुर्क आम्हांला कमी दिसतील आणि साधेसुधे तुर्क अधिक...अशी मला आशा होती. बस पुन्हां थांबली. दोघी म्हाताऱ्या मैत्रिणी गलबलाट करत चढल्या. दार आपोआप बंद झालं...आम्हीं पुढे निघालो. मी वाकवाकून मागे पडू लागलेल्या बस स्टँडवरचा बोर्ड वाचायचा प्रयत्न केला. म्हटलं त्यावरचं नाव तरी आमच्या गुगल नकाशात असेल. पण नाहीच.
इथे काही तुर्क स्त्रिया डोक्यावरून घट्ट स्कार्फ बांधून तर काही आधुनिक. सुंदर कुरळे तपकिरी केस हवेत मोकळे सोडून. सर्व स्त्रिया दिसायला सुरेख. गोऱ्यापान. त्वचा नितळ. घारे तपकिरी डोळे. ह्यांची बाळे अगदी चित्रांत बघावी अशी गोंडस. मात्र मला तरी सगळी बाळं दिसायला सारखीच वाटली ! म्हणजे एखाद्या बाईने आपलं समजून दुसरीचंच बाळ तिच्या घरी नेलं तर तिला दोषी ठरवता यायचं नाही...इतके साम्य. पुरुष देखील गोरे. फक्त गोरा म्हणून दिसायला चांगला वाटावा इतकंच. इथले पुरुष 'सूर्य नमस्कार', वजने उचलणे वगैरे करत नसावेत बहुधा. त्यामुळे सिक्स अॅब्स राहिले दूरच...पोटं अंतर्यामी सुखी दिसत होती !

इतके पुढे आलो तरीही आमचा गुगल नकाशा आणि रस्त्यावरची नावे काही जुळेनात ! अंतराळातून घेतलेले ते फोटू...आणि आम्हीं खरेखुरे त्या रस्त्यांवर...कसे काय जुळायचे ते ? शेवटी एकदाची बस थांबली. सगळेच खाली उतरू लागले. आम्हीं पण पटापट बॅगा घेतल्या. खाली उतरलो. आता ? आता दुसरी बस. ही आपली साधीच. म्हणजे अगदीच आपली एशटी नव्हे. पण आधीची व्होल्व्हो म्हटली तर ही एशटी आणि व्होल्वोच्या मधली. डाव्या हाताला निळा समुद्र किनारा घेऊन बस निघाली. उजव्या हाताला डोंगर. चढ, घाट....करत करत...अचानक, हमरस्त्यावरील फलकांवरची गावांची नावे आणि आमचा नकाशा जुळू लागला. समुद्र डाव्या बाजूला आणि आम्ही बसलो होतो उजव्या हाताला. असं नेहमीच होतं...नाही का ? आपल्याला जी सीट मिळते त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला निसर्ग आपले सुंदर रूप दाखवत असतो. आमच्या बाजूला असलेले डोंगर तसेही काही हिरवे नव्हते. म्हणजे महाराष्ट्रात पावसाची एक सर पुरेशी असते, आपल्या डोंगरांना अंगावर हिरवागार शालू खेचून घ्यायला. मात्र दुबईतल्या डोंगरांपेक्षा हे डोंगर दिसायला बरे होते म्हणायचे. तिथले डोंगर बघून त्यावेळी मला त्यांच्याबद्दल फारच वाईट वाटलं होतं. म्हणजे नुसती वाळू, करडे पिवळट दगड एकावर एक रचून ठेवल्यागत. वादी...म्हणतात त्याला. ह्या डोंगरांनी कधी आपले हिरवेकंच डोंगर बघितले तर ह्यांचा किती जळफळाट  होईल...नाही का...असे मी तेव्हां माझ्या नवऱ्याला म्हटल्याचे आठवते. तुला एव्हढं हे दाखवायला घेऊन आलो तर तुझं आपलं काहीतरी वेगळंच ! असं तो म्हणाला...ते जाऊ द्या !

किती ते विषयांतर !

'चिराली'. चालक म्हणाला.
आम्हीं दोघी बसमधून उतरलो. आमच्या पुढे अजून दोन बायका...अशा आम्ही चौघी. बस पुढे निघून गेली तेव्हां समोर तीसेक फुटांवर गाड्या उभ्या दिसत होत्या. आम्हीं रस्ता ओलांडला. खुर्च्या टाकून तिथे काही माणसे आरामात गप्पा मारीत बसलेली होती. आम्हांला बघून त्यातील एक माणूस त्वरेने पुढे आला. टॅक्सी ? आम्हांला ज्या रस्त्यावर जायचे होते तोच रस्ता त्या दोघींचा होता. चौघी गाडीत बसलो. गाडी रस्त्यावर पळू लागली. रस्ता उतरणीचा. तसा अरुंद. गाडी उतरू लागली. नशीब हा प्रवास आम्हीं दिवसा करीत होतो. रात्र असती...मिट्ट काळोखात अरुंद रस्त्याने काही वेगळेच रूप धारण केले असते. सूर्यप्रकाशात छानशी नागमोडी वळणे घेणारा रस्ता रात्री, भयावह अजगर वाटला असता. त्या दोघी देखील मायलेकी होत्या. तुर्कस्तानातील. दोघी आमच्यासारख्याच फिरायला निघाल्या होत्या. त्यांचे हॉटेल आधी आले. त्या उतरून गेल्या....आम्हीं अजून पुढे. म्हटलं आहे तरी कुठे आमचं हॉटेल...मनात नसत्या शंका...बैठी हॉटेल्स, फुलांनी डवरलेल्या बागा...द्राक्षांचे मळे. मोकळ्या हवेत शंका हळुवार विरत चालली होती. इतक्यात चालकाने गाडी थांबवली. आमचं हॉटेल आलेलं होतं. टॅक्सी थांबली. चालक सामान उतरवू लागला.
"Welcome..." तिशीच्या आसपासची एक हसतमुख मुलगी पुढे आली.
मी टॅक्सीला पैसे देईस्तोवर...लेक आणि ती तरुणी एक पायवाट चालू लागल्या होत्या. दुतर्फा, झाडे होती. क्व्य्क क्व्य्क करीत एक कोंबडी...तिच्या मागे तिचा चिमुकला लवाजमा...
माझं पिल्लू पुढे...आणि मी मागे !

क्रमश:
नकाशा जालावरून साभार

Tuesday, 10 July 2012

टूर'की'...भाग ७

टूर'की'...भाग १
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३ 
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५
टूर'की'...भाग ६ 

इस्तान्बुल मधील दुसरा दिवस. सकाळी हॉटेलबाहेर पडताना मॅनेजरला विचारले होते. ग्रॅन्ड बझारला कसे पोचायचे ? बाहेर पडा, उजवीकडे वळा....चढ चढा. चालत रहा. जिथे पोचाल तो ग्रॅन्ड बझार. बाहेर  पडलो आणि एका सेकंदात दोघी मागे फिरलो. मी लोनली प्लानेटमध्ये वाचलं होतं, ग्रॅन्ड बझार १४५५ मध्ये बांधला गेला होता. व तिथे शतकानुशके दुकाने वाढत गेलेली आहेत. GPS शिवाय तिथे फिरणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. माझी लेक ही माझी GPS सर्विस आहे. मुंबईत, किंवा कुठेही. मला रस्ते कधी कळत नाहीत आणि ते लक्षात देखील रहात नाहीत. सुरवातीला काही वर्षे मला माझा एक भाऊ ऑफिसला सोडायला येत असे. आणि घ्यायला. मग त्याने जो काही रस्ता आखून दिलेला असे, मी त्याच रस्त्याने येत असे. उगाच ही वेगळी गल्ली, तो सुंदर रस्ता ही अशी काही धाडसे करण्याच्या फंदात मी कधीही पडत नाही. मला आठवतंय, शाळेत असताना एकदा प्रभादेवीला मुख्य रस्त्यावर मी हरवले होते ! आमचं घर तिथून दहा मिनिटांवर ! पण तरी देखील मी हरवले! 
"ह्या आपल्या हॉटेलच्या परिसराला काय म्हणतात ?" लेकीने आमच्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारले. त्यावर त्याचे जे काही उत्तर होते ते लक्षात रहाणे सहज शक्य नव्हते. मग तिने तिथलाच एक कागद उचलला आणि त्यांच्या हातात दिला. "Will you please write it on this ?" त्याने जे काही लिहिले त्याचा मराठीत तरी उच्चार हा असा होता... सेंमबरलीतास !
कागद खिशात घातला. आणि मग लागलो आम्हीं रस्त्याला.

ग्रॅन्ड बझार. १४५५ मधील थंडीच्या दिवसांत ह्या बाजाराचे बांधकाम प्रथम सुरू झाले होते. येथील बांधकामाचा अभ्यास केल्यावर त्याचे साधर्म्य १५ व्या शतकाच्या दुसऱ्या पर्वात सापडते. बेन्झेन्टाइन काळात इथे गुलामांची विक्री होत असे. संपूर्ण बाजाराला अनेक प्रवेशद्वारे आहेत. म्हणे १५४५ साली सुलतान सुलेमानने इथे अजून एक बाजार बांधून घेतला. अनेक लोकांनी आपली दुकाने टाकावयास सुरवात केली आणि मग कालांतराने पूर्वी वेगवेगळे असणारे हे दोन बाजार एकमेकांत मिसळून गेले. सतराव्या शतकाच्या आसपास सध्या उभा असलेला बाजार उभा राहिलेला होता. ह्या देशाविषयी काहीही वाचायला घेतले की अगदी तीनशे साली, चारशे साली...असे आकडे आपल्या समोर येतात ! बाजारात फिरताना भरभरून दिसत होते ते गालिचे, काचसामान, दागदागिने. इथे पैशांची घासाघीस केलीच पाहिजे हा नियम देखील मी वाचलेला होता. म्हणजे कॉलेजच्या दिवसांतील मुंबईमधील फॅशन स्ट्रीटने गिरवून घेतलेले हे कौशल्य इथे कामास येणार होते ! तसेही आम्हांला शॉपिंग करायचे नव्हतेच ! युरो X टर्किश लिरा =  रुपया...हे गणित एकूणच कठीण व मानसिक छळ करणारे ! त्यामुळे पाय मोकळे करावयास निघाल्यागत, गल्ल्यागल्ल्यांतून रिकामटेकडे फिरणे आणि इथेतिथे उगाच डोकावणे, ह्यापलीकडे तसा काही उद्योग नव्हता. 
एक सुंदर पर्स अगदी मनात भरून गेली. म्हणजे लेकीने अगदी खांद्यावर अडकवली. मी अगदी कौतुकबिवतूक केलं. वा वा सुंदर. हिंदुस्तान म्हटल्यासरशी त्याने आम्हांला विचारलं..."You know Tabbu ?" आम्हीं हसून माना डोलावल्या. त्याने लगेच वर भिंतीकडे बोट दाखवले. आम्हीं बघितले तर होत्या तब्बू बाई...फोटोत. ह्या दुकानदाराबरोबर. तिने म्हणे त्या दुकानातून चार बॅगा घेतल्या होत्या. एक अशी...एक तशी...आणि दोन अशातश्या ! असेल बाई ! लेकीला आवडलेल्या बॅगेचा आम्हीं तोंडी गुणाकार केला. मराठीत. उत्तर होतं चार हजार रुपये. मी काही बोलायच्या आत बॅग पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. ऐटीत.

दुसऱ्या दुकानात आम्हीं शिरलो. एक निळीशार नक्षीकाम असलेली प्लेट विकत घेण्याचा मी विचार केला. इथले एकूणच दुकानदार सगळे अगदी नम्र, आणि वाचा मृदू. 'Where are you from ? ह्याचे उत्तर आम्हीं दिले की एकूणच सलमान खान, शाहरूख खान असे संभाषण सुरू होत होते. मी घासाघीस सुरू केली. मात्र तो दुकानदार दोन मिनिटांसाठी बाहेर केला असता लेक माझ्या कानात कुजबुजली...बस झालं हा आई तुझं ! घे आता काहीतरी !"...म्हणजे एकदम माझ्या देशाचं नाव नको खराब करूस...असं काहीसं ! म्हटलं, घेतेच आहे गं मी ! मी आपली माझी 'last price' सांगितली. म्हणजे असं आपण दुसरच काहीतरी बघतोय असं करायचं आणि त्याला अशी अगदी खालची किंमत सांगून टाकायची ! तो मनमिळाऊ, नम्र दुकानदार हसला आणि मान डोलावून म्हणाला..."You got a good deal Mam ! You negotiate very well !" लेकीच्या तोंडाकडे बघून मला कळेचना...की हे माझं कौतुक झालंय...की कसली बाई कंजूष आहे...असं हा मनातल्या मनात म्हणतोय !
असो...



खरेदी केलेल्या चारपाच छोट्या गोष्टी, एका लहानश्या हॉटेलमध्ये 'चिकन शॉवरमा.
संपला आमचा 'ग्रॅन्ड विहार' ! लेकीने एकदा पुढे, एकदा मागे वळून बघितलं. दहा मिनिटांत, बझारच्या खोलवर गेलेलो आम्हीं, सकाळी ज्या बोळातून आत शिरलो होतो बरोब्बर त्याच बोळातून बाहेर आलो !

हॉटेलच्या रस्त्याला लागलो तेव्हा आमची पोटं भरलेली होती. मात्र आमच्या रत्यावरल्या एका छान हॉटेलचा आणि त्याच्या साठीच्या आसपासच्या अतिशय मधुरभाषी मालकाचा आम्हांला कालच शोध लागला होता. त्याने बाहेर रस्त्याला लागून पदपथावर छोटी टेबले टाकली होती. पाच सहा पायऱ्या उतरून आत जायचे, तिथे ठेवलेल्या पुस्तकांमधील आपल्याला हवे ते पुस्तक उचलायचे. आरामात बाहेर बसायचे. पुस्तक वाचतावाचता आम्हीं तिथे फस्त केले...पिस्ताचीयो.

गेल्या महिन्यात तुर्कस्तानात सूर्य धीम्या गतीने सरकत होता. कधी मनाला येईल त्यावेळी आकाशातून नाहीसा वगैरे होत होता. नऊच्या आसपास. बालपणापासून मी कायम सूर्याला समुद्रात डूबताना बघितलेलं होतं. इथे नेमकं उलट. समुद्र एका दिशेला आणि सूर्य त्याच्यावर रुसल्यासारखा दूरदूर सरकत कुठे भलतीचकडे. म्हणजे अगदी एखाद्या इमारती मागेबिगे. इमारतीच्या मागे जाऊन लपण्यात कसली मजा ? मात्र काळोख लवकर पडत नसे. ते आमच्या पथ्यावर पडलं. रस्त्यावर फिरण्यास तशी काही भीती वाटत नसे. एकदा दोनदा 'eve teasing' चा अनुभव आलाच. तरुण टवाळखोर कुठे सापडत नाहीत ? Indian ? Indian ?...आणि मग त्यांच्या मातृभाषेत काहीबाही. हे त्यांचं बोलणं कदाचित असभ्य असेलही. परंतु, ते आम्हांला न कळणाऱ्या भाषेत असल्याने 'एका कानाने ऐकावे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यावे ' हे आचरणात आणणे तेव्हां  सहज जमून गेले ! त्यातूनही ह्या अशा लोकांचे आपण काय करायचे असते ह्याचे शिक्षण आपल्याला अक्कल आल्यापासून असतेच. तिथे आणि दुसरं काय करणार ? तरुण तुर्क...दुर्लक्ष.

चारच्या सुमारास लेकीच्या डोक्यात काही वेगळेच आले. आम्हीं दोघींनी आपापली पुस्तके उचलली. मी माझा कॅमेरा घेतला. समुद्राच्या दिशेने चालण्यास सुरवात केली. अर्थात मॅनेजरला आधी रस्ता विचारून. दुरून समुद्र दिसू लागला. भर दुपारी तुर्कांचा मासळी पकडण्याचा उद्योग चालूच होता. ही लोकं कामावर कधी जातात ? हे असे दिवसभर इथे मासे का पकडत बसतात ? असे एकदोन प्रश्र्न मनात उद्भवले. आम्हीं एक छानसं झाड बघितलं. मायलेकी पाय पसरून मस्त हिरवळीवर बसलो. समोर समुद्र. लेकीने तिचं पुस्तक उघडलं. मान त्यात खुपसली. मी इथेतिथे बघितलं. कॅमेरा चालू केला. गुढघे दुमडून त्यावर स्थिर विसावला. कॅमेऱ्याच्या डोळ्याने बघावयास सुरवात केली. जाणवलं...दूर, माझ्या कॅमेऱ्यासमोरून वेगवेगळी माणसं फिरत होती. कोणी उजवीकडून डावीकडे. तर कोणी डावीकडून उजवीकडे. कधी एखादं जोडपं...तर कधी एखादं चौकोनी कुटुंब. मी क्लिक करत गेले...त्यांना टिपत गेले. तुर्क मला प्रेमळ व कुटुंबवत्सल दिसला.

संध्याकाळी सातच्या आसपास बाहेर पडलो ते थेट अरिस्ता बाजाराच्या दिशेने. हा थोडा श्रीमंत बाजार. इथे दिसणारे गालिचे उंचीचे. रस्त्यावर सुबत्ता. दोन्ही बाजूंची हॉटेल्स अधिक देखणी. जालावर शोध घेताना ही हॉटेल्स का बरं सापडली नसतील..असा विचार मनात चमकून गेला. संध्याकाळ काही वेगळीच होती. कालची निराळी आजची आगळी. आता अंधार पडत होता. रस्त्यावर पर्यटक फिरत होते. आज आमच्या डोक्यात होते गिरक्या घेणारे दर्विश. इथे रोज एका हॉटेलमध्ये संध्याकाळी दोन कार्यक्रम होतात. बरेच पर्यटक तिथे येऊन हुक्क्याचा आस्वाद घेत, बोर्ड गेम खेळतात. आम्हीं तिथे पोचेस्तोवर पहिला कार्यक्रम नुकताच संपला होता. दुसरा रात्री दहा वाजता सुरू व्हायचा होता.  तेथून बाहेर आलो. काहीही न ठरवता रस्त्यावर चालायला सुरुवात केली. दहा वाजता इथे परतायचे इतकेच निश्चित. चालताचालता पोटपूजा. एका हॉटेल बाहेर ताजे चकचकीत मासे शोभेसाठी ठेवलेले दिसत होते. ह्याहून चवदार दुसरे काय असणार ? रस्त्यावर टेबले टाकली होती. त्यातले एक आम्हीं दोघींनी बळकावले.
सगळे वातावरण मन रिकामे, हलके करणारे. रोजच्या सारखा कुठलाही जटील प्रश्र्न डोक्यात अडकलेला नव्हता...शांत निवांत. डाव्या बाजूला छोटी स्टूल्स घेऊन तीन वादक गायक बसले होते. आपल्या कौशल्याने लोकांचे मनोरंजन करीत. आपल्याला हवा तो मासा निवडून आपल्या टेबलापाशी आलेल्या वेटरच्या हाती सुपूर्त करायचा. थोड्याच वेळात त्यांनी शिजवून आणलेला तुर्क मासा आपण चवीचवीने फस्त करावयाचा...ही संकल्पना. लेकीने मोठ्या प्रेमाने एक मासा निवडला....तितक्याच प्रेमाने माश्याला आत नेण्यात आलं. आणि इतक्यात वादकांनी आजच्या त्यांच्या भारतीय श्रोत्यांसाठी सुरु केलं ते हे गाणं...



दहा वाजत आले होते. आम्हीं हॉटेल Mesle पाशी पोचलो. कार्यक्रम अजून सुरू झाला नव्हता. मंच रिकामा होता. कोणी हुक्का पीत होतं. कोणी बोर्ड गेम खेळत होतं. तो काय खेळ आहे हे त्यांना विचारायचं माझ्या मनात खूप होतं. पण हुक्का ओढत बसलेल्या दहाबारा तरुणांजवळ जाऊन हा प्रश्र्न विचारण्याचे धैर्य नाही झाले. लगेच कॅमेरा बाहेर. मी इथले तिथले फोटो काढत होते. "आई, सुरू होतंय हं." समोर मंचावर दोन माणसे येऊन बसली होती. समोर माईक. हलकेच गाणं सुरू झालं. गाण्याला शब्द होते. पण अर्थ नव्हता. बऱ्याचदा अनाकलनीय भाषेतील गाणी अधिक आनंद देऊन जातात. उगाच अर्थात न अडकता त्यातले सूर आपल्याला गुंतवून टाकतात म्हणून असावे कदाचित. इतक्यात एक लांब बाह्यांचा पायघोळ झगा घालून मध्यम अंगचटीचा माणूस पुढे आला. मंचावर चढून मांडीपाशी दोन्ही हात एकत्र बांधून शांतपणे उभा राहिला. हळूवार संगीत सूर झाले. त्यात खोल आवाज मिसळला. दर्विश हलकेच गिरकी घेऊ लागला. एक...दोन...तीन...चार....अनेक...असंख्य...गोल..गोल....तो अनुभव एक धुंदी चढवणारा होता. आपण जरी एका जागेवर स्थिर असलो तरीही ते संगीत...उजवा हात आकाशाकडे झेपावणारा...डावा हात पृथ्वीशी नाते जोडणारा...आकाशातील देवाकडे आराधना करताना....पृथ्वीवरील भौतिक सुखांना नाकारणारा...काळाचे बंधन गिरकीसहित झुकारून देणारा....दर्विश. ती हालचाल....ते संगीत सर्व काही भारून टाकणारे होते...दहा मिनिटे एक टप्पा...दुसरा....तिसरा...
उगाच बालपणीचं...गोल गोल राणी...इतकं इतकं पाणी...आठवलं. चार गिरक्या काय नाही झाल्या की आम्हीं धाडकन जमिनीवर पडत असू. आणि कधीतरी नाहीच पडलो तर खोलीत गोलगोल करत भिंतीवर नाहीतर दारावर धाडकन आपटणे चालू असे. किती टेंगुळं आणि किती काय !
समोर हुक्का नाही पण टर्की चाय होता. माझा कॅमेरा व्हीडियो रेकॉर्डींग करीत सुटला होता. एकामागोमाग एक...


एक तास उलटला. दर्विश वाकून प्रेक्षकांचा निरोप घेऊन दिसेनासा झाला. आम्हीं देखील निघालो. चालत आमच्या हॉटेलपर्यंत जायचे होते. काळोख पडला होता. हॉटेल तिथून वीस मिनिटांच्या अंतरावर होते. आम्हीं चालायला लागलो. रस्ता निर्मनुष्य झालेला होता. चिटपाखरू रस्त्यावर दिसत नव्हते. दूरवरून समुद्र पक्षाची साद ऐकू येत होती. पक्षी कुठेही दिसत नव्हते. फक्त आसमंतात मधूनच टिपेला पोचणारा आवाज. एक भीती मनात शिरू बघत होती. मात्र तिला एकदा मनात प्रवेश करू दिला तर ती उगा भलभलते विचार उद्दीप्त करेल ह्याची खात्री होती. पुन्हां मला रस्ता ओळखता येत नाही हे आहेच. लेकीने पटापट पावले उचलली. तिच्याबरोबर मी.

पहाटे चारच्या सुमारास हॉटेल सोडावयाचे होते. ओनुर एअर. इस्तान्बुल ते अन्ताल्जा. पावणे आठचे विमान.

तीन रात्री. दोन दिवस. शहर सोडायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता.
आम्हीं भूमध्यसमुद्राच्या दिशेने निघणार होतो. एका छोट्या गावाकडे.
गाव चिराली.

क्रमश: