नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 29 June 2012

टूर'की'...भाग २

एकूणच थोडं इथेतिथे बघितलं की कळत होतं. जगाच्या नकाशावर हे टर्की म्हणजेच तुर्कस्थान तळहाताएव्हढं दिसत असेलही कदाचित, पण हा तळहात असंख्य रेषा, डोंगरदऱ्या ह्यांनी बहरलेला होता. आठ हजार वर्षांचा इतिहास जर त्या हाताने झेलला असेल तर तो हात किती आश्चर्यांनी डवरलेला, मनोहर झाला असेल ?

संस्कृतीची सुरवात झाली ती अन्तालीया इथून. सुरवातीच्या काळात हिताइट ( Hittite ) त्यानंतर पर्शियन. इसवीसनापूर्व १९० सुमारास व्यापाराच्या उद्देशाने रोमन. रोमनांनी स्थानिक ख्रिश्चन समाजावर केलेले अत्याचार. स्वसंरक्षणासाठी हा समाज विखुरला तो चवथ्या शतकापर्यंत भरकटला. परंतु, दस्तुरखुद्द रोमन सम्राट कॉन्स्टेनटाइन ह्यानेच धर्मांतर करून कॉन्स्टेनटीनोपल ( सध्याचे इस्तान्बुल ) उभारले. पुढे कॉन्स्टेनटीनोपल, बायझेन्टाइन साम्राजाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला. रोमचा, ग्रीक भाषा बोलणारा हा ख्रिश्चन समाज पुढे म्हणे जवळजवळ १००० वर्षे अस्तित्त्वात होता. हे इथेच संपत नाही. बायझेन्टाइन साम्राज्याच्या पुढे ठाकले सेल्जूक तुर्क. त्यानंतर ऑटोमान तुर्क. ऑटोमान तुर्कांनी अन्टालीया प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला व पंधराव्या शतकापर्यंत बायझेन्टाइन साम्राज्याचा समूळ नायनाट केला. पुढे ऑटोमान सर्वत्र पसरत गेले पार व्हिएन्नाच्या सीमेपर्यंत. १९१२ पर्यंत ग्रीक व सरबेयिन, इस्तानबुलवर हल्ला करून आले व पहिले जागतिक युद्ध सुरू असताना व त्यानंतरच्या काळात युरोपियन देशांनी एकूणच इस्तान्बुलची विल्हेवाट लावण्याचे ठरवलेलेच दिसून येते. त्यावेळी मुस्तफा केमाल अतातुर्क ह्यांच्या प्रभावी नेतृत्त्वाने हा देश वाचवला होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात अतातुर्क व त्यांचे सैनिक, ह्यांनी सर्व परदेशी हल्ले परतवून लावले. व १९२३ मध्ये तुर्क रिपब्लिकची स्थापना केली. त्यावेळेपासून टर्की हे आधुनिकीकरण अवलंबून आहे. यशस्वीरीत्या लोकशाही अवलंबून जागतिक पातळीवर स्वत:चे स्थान मिळवून आहे...

जगाच्या पातळीवर कुठेही गेलो तरीही अत्याचारांच्या खाणाखुणा ह्या दिसतातच. कधी प्राचीन तर कधी अर्वाचीन. जालावर वरील माहिती मिळाली. चीनमधील अजगरास्तव पसरलेल्या भिंतीची आठवण झाली. जगातील आश्चर्य म्हणून ओळखली जाणारी ती भिंत म्हणे पाडली तर आत लाखो प्रेतं सापडतील. गवंड्यांची वगैरे. भिंत बांधली जात असता कधी त्यांना मृत्यू आला तर तिथल्या तिथेच त्यांची शरीरे फेकून देण्यात असत...लगेच पुढे काम चालू !

लोनली प्लानेटकडून आलेल्या माहितीमध्ये इस्तान्बुल, कपाडोक्या आणि टरक्वाइज कोस्ट ह्यांचा ठळकपणे उल्लेख होता. त्यावर लिखाण होते. तेथील जागा, प्रेक्षणीय स्थळे, रहाण्याची विविध हॉटेल्स, स्वस्त, मध्यम व भारी, सर्व प्रकारची माहिती. टरक्वाइज कोस्ट म्हणजे टर्कीचा भूमध्यसागरी किनारा.
नकाशा बघितला असता ह्या तीन जागा करावयाच्या म्हणजे एक त्रिकोणी प्रवास होता. इस्तान्बुल डावीकडे वर, कपाडोक्या मध्यावर आणि टरक्वाइज कोस्टसाठी जायचं म्हणजे टर्किचा पायथा गाठायचा. कपाडोक्या करण्यासाठी नेवसेहीर वा कायसेरी एअरपोर्ट आणि टरक्वाइज कोस्ट करण्यासाठी अन्तालीया. कठीणेय ! टरक्वाइज कोस्टला भरपूर किनारे. भूमध्यसमुद्र. सायप्रस हे बेट ज्या समुद्रात आहे तो हा. सायप्रसला भेट देऊन जवळजवळ १२ ते १५ वर्ष उलटून गेली होती. आपण गोव्याला जातो तेव्हा कोणी बागा तर कलंगुट तर कोणी अंजुनाला जातं...तसंच ह्या टरक्वाइज कोस्टचे वैभव दिसत होतं. आपण आपापल्या आवडीनुसार किनारा निवडावा. गर्दीचा समुद्र किनारा हवा की एखादा निवांत, गाज व आपला श्वास इतकंच काय ते जाणवून देणारा....हे ज्याचे त्याने ठरवावे.

"काय ग, कायकाय करायचंय तुला ?" मी लेकीला विचारले.
"वर्धनने, आई जे पाठवलंय तेच आपण फॉलो करुया !"
"अगं पण त्यात पण खूप काही आहे ! म्हणजे ते टरक्वाइज कोस्टच बघ ना ! किती लांबसडक मैलोनमैल आहे तो किनारा ! त्यात कुठे जायचं आपण ?"
"हम्म्म्म...कास करुया का ?"
"कास खूप गर्दीचं वाटतंय ! हे वाच ना ! ह्या साईटवर बघ. ह्या लेखकाने एकुणेक किनाऱ्यांबद्द्ल माहिती दिलीय ! ते वाचून घेतेस का जरा ?"
"ती नाही आई, ही साइट बघ...इथे जास्त नीट सांगितलंय." लेक तिच्या मॅकबुकवर आणि मी माझ्या मॅक वर ! जालावर खणणं चालू होतं...आम्हां दोघींचं ! ही लिंक...ती लिंक...मेलामेली...पुढचे चारपाच दिवस आमचं हेच चालू राहिलं. त्यात विझासाठीचे सगळे कागद गोळा करणे आले. अॉफिसकडून सुट्टी मंजुरीचा आलेला कागद फायलीत गेला, इन्कम टॅक्सचे तीन वर्षांचे कागद जागेवर बसले, पासपोर्टच्या कॉपीज...दोघींच्या दोन फायली.

"अनघा, अगं, कुठल्या हॉटेलचं बुकिंग करतेयस ? ते पण लागेल ना विझासाठी अप्लाय करताना..." आमच्या ट्रॅव्हल डेस्कवरची सपना.
"अजून ठरवलं नाहीये गं ! आज घरी गेले की बसते लेकीबरोबर आणि ठरवतो आम्हीं दोघी."
"चालेल. पण उद्यापर्यंत नक्की मेल कर हॉटेल बुकिंगचं कन्फरमेशन. आणि फ़्लाईटची तिकीटं !"
"हो. करते."
"अगं, तुम्हां दोघींना ह्या सोळाला निघायचंय ना...म्हणून मी घाई करतेय !"
"ते कळलं गं मला ! पण वेळ तर मिळाला पाहिजे ना एकत्र बसून बुकिंग्स करायला ! मला वेळ असतो तेव्हा ही माझी लेक काहीतरी वेगळंच मेलं करत असते ! आणि तिला वेळ असतो तेव्हा मी ऑफिसमध्ये मरत असते !"
"हम्म्म्म...कर गं पण बाई आज हे बुकिंगचं काम !"

मी दिवसाभरात दोन कामं मात्र केली होती. कामाच्या अधेमध्ये वेळ काढून मेकमायट्रीप आणि यात्रा डॉट कॉमच्या साईटींना भेटी दिल्या होत्या. आणि आमच्या तारखा टाकून राउंड ट्रीपची तिकीटं नक्की कितीला पडतायत ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच वेळी सपनाला देखील सांगून टाकलं होतं...ह्या ह्या आमच्या तारखा...तेव्हा तू पण जरा बघ आमचं तिकीट नक्की कितीला मिळतंय ते. संध्याकाळपर्यंत सपनाचं मेल येऊन मेलबॉक्समध्ये बसलं. हम्म्म्म...भारीच महाग मेलं ! बघू...आपण पण बघुया प्रयत्न करून ! मेकमायट्रीप...यात्रा डॉट कॉम...एमिरेट्स...टर्किश एअरलाइन...रॉयल जॉरडॅनियन...२ तिकीटं...८०, ९०, १ लाख ! हम्म्म्म...कसं होणार माझं ! सकाळी बघितलेला तिकीटांचा भाव आणि संध्याकाळी बघितलेला भाव...दोन तिकीटांमागे जवळजवळ १०/१० हजारांचा फरक ! उगाच काहीतरी मनात आलं...काही वर्षांपूर्वी आम्हीं दोघं नवरा बायको अमेरिकेला फिरायला निघालो होतो. आजतागायत मला माहित नाही...किती खर्च आला...कोण जाणे. जवळजवळ महिनाभर अमेरिका. एका टोकापासून पार दुसऱ्या टोकापर्यंत. एकदा का पुरुषाने लग्न केलं की बायकोचा खर्च आपोआपच त्याच्या डोक्यावर येऊन पडतो. म्हणजे आम्हीं बायका कमावत्या असो वा नसो...घर आम्हीं चालवतो...मुलं सांभाळतो...त्या कामांची कधीही कोणी किंमत करायला जाऊ नये. परंतु, शेवटी पैसे हे एक भौतिक गोष्ट झाली. ती काहीही करायला गेलं की लागतेच. म्हणजे हा एकटाच फिरला असता तर बरोब्बर निम्म्याने खर्च झाला असता. आज मला त्याची आठवण झाली...आणि वाटलं...कोण जाणे लहान वयात लग्न केलं तेव्हा ह्याने आता आपल्याला पैसे दुपटीने लागणार हा विचार तरी केला होता का...knowing him...नसेलच केला ! चार हजार पगार...त्यात एकाचं काय आणि दोघांचं काय...अगदी आनंदात जमून गेलं...ह्या सर्व गोष्टींची आठवण झाली...
असो...
क्रमश:
टर्कीचा नकाशा जालावरून साभार

Thursday, 28 June 2012

टूर'की'...

पाळंमुळं आत खोलवर नेणं व खंबीर ताठ मानेनं उभं रहाणं सहजसाध्य नसतच. दिवसरात्र, ऊनपावसात नाजूक मुळांमध्ये शक्ती येईस्तोवर अख्खा पिंपळ कितीदा तरी गदागद झेलपाटत रहातो. मात्र त्या प्रत्येक वादळानंतर त्याची मुळं अधिकच भुईत खोल आत मार्ग काढत रहातात. आणि मग वारा किती का अकस्मात घुसावा, पिंपळ जमीन सोडत नाही. आपली शक्तीस्थानं, आपली खंबीर मुळं कधी आकाशाकडे उघडी पाडत नाही. ज्यावेळी तो कोलमडून पडलेला दिसून येतो, त्यावेळी तो स्वेच्छेने मृत्यूला आधीन झालेला असतो. कारण जीवनाचे गणित तर बरोबरच व्हावयास हवे. कोणी अनंतात विलीन व्हावे तेव्हाच कोणी पहिला टाहो फोडावा.
काय पिंपळ थकत नसेल ? येणाऱ्या वाऱ्याला आपले एकेक पान आदराने त्यानेच वहावे. सतत सतर्क राहून.

हे असेच काहीसे मला वाटत होते. म्हणजे मी कोणी थोर नव्हे. मी पिंपळ नव्हे. परंतु, मेहेनत फार झाली होती. जीवाचा फार आटापिटा झाला होता. लेकीचे शिक्षण सध्या तरी झाले आहे असे ती म्हणाली होती. "आई, आता आधी नोकरी आणि नंतर पी.एच.डी."
ऑफिसात अहोरात्र कष्ट झाले होते त्यामुळे सुट्टी मिळणे फारसे कठीण दिसत नव्हते. "चल तर मग...आपण कुठेतरी फिरायला जाऊ." मी लेकीला म्हटले.
"चालेल. पण मग लगेच जाऊन यायला हवं. मला नोकरी शोधायचीय. आणि ती मिळाली की मग तर नाहीच जाता यायचं लगेच."
म्हणजे अगदी पुढल्या दहा दिवसांत ठरवायला हवं आणि तयारी देखील व्हायला हवी.
पहिला संपर्क 'थॉमस कुक'. म्हटलं बघू तरी इतक्या कमी वेळात कुठे जाता येईल आणि नक्की किती खर्च होईल. एक अंदाज काढणे गरजेचेच. मी जे काही तिथे सांगितले त्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत मला मेल आले. २/३ जागा शक्य होत्या. मॉरीशस, केनया, ग्रीस...
"नाही गं आई...! मला काही प्राणीबिणी बघायचे नाहीयेत !" केनया बाद !
"मॉरीशस ? ह्म्मम्म्म्म...I don't know Mama !" आईबरोबर नाही वाटतं जात कोणी मॉरीशसला ! बाद.
"ग्रीस नको गं आई ! काहीतरी वेगळंच करुया आपण !"
"प्राग, टर्की ?"
"Ya..that would be nice !"

सकाळी पुन्हा थॉमस कुक. ग्रीस दहा दिवसांत कठीण आहे. केनया आणि मॉरीशस शक्य आहे. कारण तिथे 'विझा ऑन अरायव्हल' आहे. मग म्हटलं "ठीक आहे. मला एकूण खर्च आणि कार्यक्रम पाठवून तर द्या. बघते मी. ग्रीस, केनया आणि मॉरीशसचा पाठवा. टर्की आहे का शक्य?"
"पुढल्या दहा दिवसांत कठीण आहे. आणि आमच्या ग्रुप ट्रिप्स निघतायत त्या अगदी लगेच आहेत. पण तोपर्यंत तुमचा दोघींचा विझा वगैरे नाही येणार."
संध्याकाळी लेकीच्या कानावर हे घातलं.
"पण आई, आपण कशाला त्यांच्या ग्रुप बरोबर जायचं ? आपण दोघीच जाऊया ना ! चीन नाही का केलं आपण दोघी दोघींनी ? तस्संच !"
"नक्की टर्कीच करायचं ना गं ?" पुन्हा एकदा विचारून घेतलं.
"हो हो!" मान जोरात डूलली.
पुन्हा थॉमस कुक. "Is Turkey safe ?"
"Ya ! Ofcourse !"
दुसरा दिवस. ऑफिसच्या ट्रॅव्हल डेस्कला फोन लावला. विझा ? चार दिवसांत मिळेल विझा. एक यादी...जरुरी कागदपत्रांची. घराचा पत्ता, त्याचा पुरावा...फोन बिल, सोसायटी बिल इत्यादी इत्यादी...पासपोर्ट, ३ वर्षांचे इन्कम टॅक्स कागद, ऑफिसकडून सुट्टी मंजुरी पत्र. बॉसची केबिन गाठली. मेहेनत फळाला आली. हसतमुखाने परवानगी मिळाली ! तातडीने टेबल गाठलं. मॅकवरून ऑफिसचं मेल उघडलं. सुट्टीचा अर्ज सोडला.
संध्याकाळी थॉमस कुकच्या टर्की कार्यक्रमाचे प्रिंट आउट घेऊनच घरी परतले. म्हटलं एक रेफरन्स पॉइंट असावा समोर. नाहीतर कळणार कसं...कायकाय बघायला आहे ते टर्कीत ?! सहा रात्री आणि सात दिवस. इस्तान्बुल, अंकारा, कपाडोकीया, कुसादासी, इझमीर...वगैरे वगैरे.
"हे काही खरं नाही. फारच आहे ! चल आपण आधी नकाशा बघुया. आणि मग 'लोनली प्लानेट' काय म्हणतंय ते बघुया."
पृथ्वीवर टर्की मध्येच चपखल बसलेला आढळला. कंठमणी जसा. एका बाजूला भूमध्यसमुद्र तर दुसरा किनारा 'काळ्या समुद्राचा.' एशिया आणि युरोप दोन्ही शेजारी. हे म्हणजे एकदम आमच्या सोसायटीसारखी वसाहत. मिश्र. मराठी, गुजराती, पारशी...!
"वर्धनशी बोलतेस का जरा ? त्याला पण विचारून बघ न कायकाय करायला हवंय ते!" वर्धन, माझा भाचा. 'लोनली प्लानेट' मासिकाचा संपादक. लेकीचं वर्धनशी बोलणं झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडून टर्कीवर माहितीपूर्ण पीडीएफ फाईल मेलवर दाखल झाली. पुन्हा प्रिंट आउट्स. संध्याकाळी दोघी बसलो त्यात डोकं घालून. समोर जाल सुरू. लोनली प्लानेट, गुगल मॅप, बुकिंग डॉट कॉम, एक्स्पेडिया...
क्रमश:
(पृथ्वीचा नकाशा जालावरून साभार) 









Tuesday, 12 June 2012

भांडाभांडी

गेल्या एका महिन्यात दोन बायकांशी भांडणे झाली. भांडणेच म्हणावीत. उगा 'वादविवाद' असे संबोधून त्याला थोर स्वरूप का द्यावे ?

प्रसंग पहिला.
स्थळ माझी गल्ली. वेळ रात्रीचे साडे आठ.
दिवस तसा बरा संपला होता. आता एक उजव्या हाताचे वळण आणि आमची इमारत दृष्टीक्षेपात. आठ वाजून गेलेत...जेवायला काय करावं...भाजी आणायची राहून गेलीय...फ्रिझमध्ये कायकाय आहे कोण जाणे....आज फ्रिझच रिकामा करावा का...फार पदार्थ पडून राहिलेत...इत्यादी इत्यादी.

आमची गल्ली म्हटली तर रुंद आणि म्हटली तर अरुंद. आपले देशवासी ज्या पध्दतीत गाड्या चालवत असतात तिथे हमरस्ता काय आणि गल्ली काय. अगदी सहा पदरी रस्ता देखील आम्हांला अरुंदच वाटत असतो. डाव्या हाताला समोर एक ऐसपैस काळी गाडी उभी होती. उजव्या हाताला आमच्या अशोकचे वडापावचे साम्राज्य. त्या स्टॉल पुढ्यात चारचाकी, दुचाकी, दोन पायी....असे वेगवेगळे प्रकार आरामात उभे असतात. वेडेवाकडे. गरमागरम बटाटा वड्यांचा स्वाद घेत. बोटे चाटत. दिवसाच्या कोणत्याही वेळेला त्या बाजूचे चित्र हे असेच असते. त्यामुळे माझ्या गाडीची गती अगदी संथ होती. इतक्यात त्या काळ्या गाडीमागून एक पस्तिशीच्या आसपासची महिला गाडीच्या पुढ्यात आली. माझी नजर तिच्यावर पडावी आणि तिने हातातून कागदाचा भल्या मोठ्या घागरीच्या आकाराचा बोळा टपदिशी रस्त्यात टाकावा...ह्यात माझेच दुर्दैव फार. त्या कागदावरून तिने आपला मालकीहक्क सोडावा आणि त्याच क्षणी तिची आणि माझी नजरानजर व्हावी...हे असे जेव्हा घडते त्यावेळी मला बऱ्याचदा वाटते...ह्या समोरच्या व्यक्तीचे आणि माझे काहीतरी गेल्या जन्मीचे नाते असावे. कारण नाहीतर हे माझ्याच समोर का घडावे ?
मी गाडीत बसल्याबसल्या बाईंना खुणेने विनंती केली...तो कागदाचा बोळा त्यांनी पुन्हा ताब्यात घ्यावा व कचराकुंडीत टाकावा. बाईंना नाही पटले..त्यांनी खुणेने ते मला सांगितले. मी देखील खमकीच. गुमान घरी जावं तर नाही. गाडीतून खाली उतरले. म्हटले, कृपया हा कागद उचला व कचराकुंडीत टाका.
बाई म्हणाल्या की मी त्यांच्याशी फार अरेरावीने बोलत आहे...व ते त्यांना मुळीच आवडले नाही. त्यांच्या मते 'कृपया' ह्याच अर्थाचा इंग्रजी भाषेतील शब्द माझ्या वाक्यांना अजिबात नम्रता देत नव्हता.
तरी मी माझे म्हणणे पुढे रेटलेच. म्हटले, मी तर तुम्हांला तुमच्या भाषेत प्लीज म्हटले आहे.
नाही...तेव्हढे पुरेसे नाही. तुमचे हावभाव फारच अरेरावीचे होते.
मी पुन्हापुन्हां बाईंना सांगून बघितले. त्यांनी नाही ऐकले. मी खाली वाकले. बोळा उचलला व बाईंच्या गाडीवर ठेवून दिला. म्हटले ही गल्ली माझी आहे...हा रस्ता माझा आहे...तो तुम्हीं घाण करू नये...तुमचा कचरा तुम्हीं घरी न्यावा...व घरातील कचरा कुंडीत टाकावा.
आता बाई अधिकच संतापल्या. मी तुम्हांला माझा बोळा उचलावयास सांगितला नव्हता. तो मी उचलणारच होते. पण तुम्ही ज्या पद्धतीने मला हे करावयास सांगितलेत ते मला आवडले नाही.
अहो बाई तुम्हीं ज्या प्रकारे माझ्या रस्त्यावर कचरा केलात ते मला आवडले नाही.
तुला नाही आवडले तर तू अख्खी गल्ली साफ कर ना...घे झाडू...आणि बस कचरा काढत. बाई उद्गारल्या.
ह्म्म्म... माझ्या डोळ्यांसमोर चित्र आले...एका हातात झाडू...आणि दुसऱ्या हातात टोपली...आमची गल्ली साफ. मला काही फरक पडला नाही. मला कचरा काढावयास आवडते. विशेष करून कचरा काढून झाल्यावर घर जे काही सुखावते ते जाणून घ्यावयास मला फार आवडते. त्यामुळे स्वच्छ झालेली माझी गल्ली किती खुष होईल हे माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात चमकून गेले. तसेही हे काम आम्हांला आमच्या शाळेने शिकविले होतेच.

इतक्यात बाईंचे पतीदेव छोट्या बाळाला कडेवर घेऊन पुढे आले. त्यांनी नम्रतेने आपल्या पत्नीचा हात धरला....व तिला घरी चलण्याची त्यांनी विनंती केली.
मी देखील गाडीकडे वळले. गेली पाच मिनिटे मी माझी गल्ली अरुंद करून ठेवली होती. गाडीत बसले व गाडी सुरु केली.

माणसाला इंग्रजी आले, लांबसडक गाड्या फिरवता आल्या...ह्याचा अर्थ तो माणूस सुशिक्षित आहे असा होतो काय ?
अजिबात नाही.
म्हणजेच शिक्षण माणसाला सुसंस्कृत बनवत नाही.
मग नक्की सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा ह्या दोन गोष्टी माणूस नक्की कोठून शिकतो ?
ही एक गोष्ट.
त्यापुढे जाऊन विचार येतो...
ह्या अशा मूर्ख माणसांकडे दुर्लक्ष करणे उचित, की भर रस्त्यात ही माणसे कशी मूर्ख व ढोंगी आहेत हे उघडकीस आणणे हे उचित ? त्यांचा सुशिक्षितेचा बुरखा फाडणे उचित ?

कोण जाणे ?
गत जन्मीचे देणे फेडण्यास ही अशी माणसे मला आजकाल पदोपदी भेटू लागली आहेत हेच खरे.

दुसरे भांडण पुढील एक दोन दिवसांत...

Wednesday, 6 June 2012

अलिबाबा आणि चाळीस चोर

महिन्याभरापूर्वी घरचा मॅ अकस्मात क्रॅश झाला. त्यावरील वर्ष दीड वर्ष साठवलेली सर्व कामे आणि सगळे फोटो उडाले. ते सगळे परत मिळण्याची शक्यता क्षीणच.
मॅकचे जसे काही ब्रेन हॅम्रेज झाले. मैं कौन हूँ...मैंहाँ हूँ वगैरे. आणि कोणत्याही उपायाने त्याची स्मरणशक्ती काही मी त्याला परत मिळवून देऊ शकले नाही. आणि ह्या त्याच्या आजारपणात माझ्या आयुष्यातील २ वर्षे देखील अकस्मात पुसली गेली. छायाचित्रांच्या रूपात जमवलेली.

"बॅकअप नाही का घेतलेला ?" एका अनुभवी मित्राने विचारले.
"नाही."
दोन माणसांच्या नात्यात, बहुतेकवेळा तरी एका माणसावर; ते नाते जपण्याची जबाबदारी अधिक असते. तसेच माझ्या व मॅकच्या आधुनिक नात्यात ही जबाबदारी 'मॅक' ने स्वीकारली होती. आणि मी त्या नात्याची तिळमात्र देखील काळजी न घेतल्याने मॅक संतापला. व त्या संतापाच्या भरात अतीव रक्तदाबामुळे त्याचे ब्रेन हॅम्रेज झाले. ह्यात नुकसान कोणाचे झाले ? तर माझे. वेळीच जबाबदारीने वागले असते, त्याची आब राखली असती, तर हे असे नसते झाले. तो रात्रंदिवस माझ्यासाठी राबतो आहे हे लक्षात घेतले असते, त्याला त्या कामात थोडा हातभार लावला असता तर हे नाते नक्कीच अधिक काळ जपले गेले असते.
मॅकला कधीही काहीही होत नाही. हे त्या अनुभवी मित्राचे म्हणणे होते. त्यामुळे तू warranty extend करण्याच्या भानगडीत पडू नकोस. पैसे वर आलेत का ? असेही तो म्हणाला होता.
माझे नशीब बलवत्तर म्हणून मी त्याचे हे म्हणणे दुर्लक्षिले होते. एका महिन्यापूर्वीच मॅकचा विमा उतरवला होता. त्यामुळे त्याच्या शरीरात निदान दुसरा मेंदू बसवता आला. विना खर्च. आणि त्याचे शरीर पुन्हा काम करू लागले. दिवसरात्र.
आता निदान मला शहाणपण येईल व मॅकच्या नव्या मेंदूवर फार भार न टाकता, त्याला बाहेरून दुसरा एक आधार नक्की देईन.
हे अनुभवानंतर आलेले शहाणपण.

संकटं म्हणजे जसे 'अलिबाबा आणि चाळीस चोर' मधील रांजणात लपून बसलेले चोर.
अदृश्य रांजण...अदृश्य संकटं.
उकळतं तेल ओतून त्यांना मारून देखील टाकता येत नाहीत.
गुपचूप एक चोर वर येतो, त्याला नेस्तनाबूत करून पुढल्या रस्त्याला लागावं तर तोपर्यंत दुसरा मान वर काढतो.
कधीकधी एकाच वेळी दोनतीन चोर रांजणाबाहेर झेप घेत रहातात.

ज्यावेळी 'मल्टी टास्किंग'च्या जोशात आपण असतो, त्यावेळी संकटे देखील 'मल्टी डिरेक्शन्स'मधून झेपावत रहातात.
आईच्या भूमिकेत असताना एक प्रश्र्न, मुलीच्या भूमिकेत शिरावे तर दुसरा प्रश्र्न, आणि नोकरदाराच्या भूमिकेत अजून दहा प्रश्र्न.
दहा दिशा...आणि अंगावर झेपावणारा...दशमुखी सर्प.
आणि त्याच्या विरोधात दोन हात...दोन पाय...
आणि एकमात्र डोकं !