नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 30 November 2011

कोरा कॅनव्हास

एक बदक. संथ वहात जाणाऱ्या एका तळ्यातील एक बदक. जशा लहरी उमटल्या तसं ते बदक पाण्याबरोबर वहात होतं. किंवा एक दिशा त्याने ठरवून घेतली. परंतु, त्या दिशेला पुढे नक्की काय येतं...ह्याचा काही थांगपत्ता नव्हता. निघालं आपलं तरंगत. तरंगत. कधी पंख झटकत तर कधी मान वेळावत. आजूबाजूच्या जगात नक्की काय चालू आहे, जग नक्की कुठल्या दिशेने जात आहे काही म्हणजे काहीही माहित नाही.

मी.
बदक.
दहावी द्यायची. आणि जेजेला प्रवेश घ्यायचा. त्यानंतर मग फक्त चित्र काढायची. बाकी काहीच नाही. चाललंय आपलं तरंगत.

'जे जे स्कूल' हे कॉलेजचं नाव आहे. तिथे प्रथम फाउन्डेशन करावे लागते. एक वर्ष. त्यानंतर म्हणजे त्या एका वर्षात तुम्हांला तुमचा कल कुठे आहे ते कळते असा एक समज आहे. म्हणजे तसे कळायलाच हवे. कारण पुढे जाऊन चार वर्षे बदकाला 'अप्लाइड आर्ट' किंवा 'फाइन आर्ट' ह्या दोनांपैकी एका प्रभागात प्रवेश घ्यावयास हवा. पण हे बदकाला अजिबात माहिती नव्हते. अख्खं वर्ष गेलं तरी तो काय तो कल कुठे आहे हेही कळले नव्हते. अप्लाइड आर्ट म्हणजे काय ? आणि फाइन आर्ट मध्ये कागद, पेन्सिल्स, रंग ह्यांचे नक्की काय करतात काही माहित नाही. भाजी की भरीत ? कोण जाणे ! अशी परिस्थिती ! अज्ञानात सुख असतं ! कारण आपल्याला काहीतरी माहित नाही आहे हेच माहित नसतं ! मग ते फाउन्डेशनचं एक वर्ष संपत आलं. कल कुठे आहे हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने चालून झालं...आणि काय माहित कोणी सल्ला दिला पण मी अप्लाइड आर्टला प्रवेश घेतला. आता मागे वळून बघितलं तर कळतं. कॉलेजमधील पुढील चार वर्ष आणि बाहेरील उघड्या जाहिरात क्षेत्राचा, तसा काडीचाही संबध नव्हता. म्हणजे आज मी जे काही करते ते मी तिथे शिकले का ? तसं नाही वाटत. कारण, प्रवाहात तरंगणं वेगळं आणि पाण्यात हातपाय मारून पुढे जाणं वेगळं. 

शिक्षण चालू असता आम्हीं सर्व विद्यार्थ्यांनी संप केला. म्हणजे आमच्या पुढाऱ्यांनी वगैरे आम्हांला सांगितले की आता उद्यापासून वर्गात बसायचे नाही. त्या ऐवजी सर्वांनी विद्यापीठाच्या बाहेर रस्त्यावर बस्तान मांडायचे. मग आम्ही सर्वांनी तसेच केले. संप बरेच दिवस चालला. आम्हीं बरेच दिवस रस्त्यावर बसलो. अगदी खाऊचा डबा वगैरे घेऊन रस्त्यावर. आणि डबा खायची कॉलेजची वेळ झाली की मग रस्त्यावर डबा उघडायचा आणि खायचा. संपाचे कारण मोठे होते. आणि बरोबर देखील होते. इतके पाच वर्षांचे शिक्षण घेऊन देखील पूर्वी आम्हांला फक्त डिप्लोमाच मिळत असे. हे चुकीचे आहे असे सगळे पुढारी म्हणाले. हे पुढारी म्हणजे कॉलेजची वरच्या वर्गांतील मुले वगैरे. मग आमची मागणी मान्य झाली. आम्हांला डिग्री देण्यात यावी असा निर्णय झाला. परंतु, त्यासाठी सहा महिन्यांचा एक 'ब्रिज कोर्स' आखण्यात आला. पुढील काही वर्षांसाठी. बाबा म्हणाले की डिप्लोमाचे काही खरे नाही. तुला डिग्री घेतलीच पाहिजे. मग पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मी पुन्हा एकदा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बाकी कुठल्याही मैत्रिणीचे आईवडील असे काही बहुधा म्हणाले नसावेत. कारण एकटी मी परत एकदा कॉलेजला जाऊ लागले होते.

ह्या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमात 'History Of Art' हा एक विषय होता. म्हणजे पुस्तकं वगैरे होती. आणि एक गोंडसश्या दिसणाऱ्या बाई येत असत. बरीच माहिती देत असत. जगभरच्या कलाविश्वाची. त्यात इमारती, पेंटिंग, भांडीकुंडी सगळेच येत असे. विविध देश. विविध कला शैली. भली मोठी पुस्तके. लांबच लांब नोट्स. आता हा अशा प्रकारचा अभ्यास करण्याची सवय तर मोडली होती. शेवटचा अभ्यास दहावीत केला होता. म्हणजे एकदम घोकंपट्टी वगैरे. त्यावर पाच वर्षे उलटून गेली होती. आणि पाच वर्षे म्हणजे अर्धे दशक. मग परीक्षेच्या दिवशी पहिल्याच पेपरला अगदी पेनाचं टोपण काढलं आणि लिहायला सुरूवात करावी म्हटलं तर काही म्हणजे काहीही आठवेना. अगदी म्हणजे कसं डोकं कोणी उघडावं, त्यावर एखादा टीपकागद ठेवावा आणि सगळं कसं टिपून घेऊन जावं. म्हणजे डोकं कसं पुन्हा रिकामं. रिकामा घडा. मग कसं कोण जाणे थोड्या वेळाने आठवलं. आणि लिहिली पूर्ण उत्तर पत्रिका. कधीतरी पुढे निकाल लागला. मी उत्तीर्ण झाले. अगदी पदवीधारक. BFA. कंसात बॅचलर ऑफ अप्लाइड आर्ट.

आता ह्या सर्व गोष्टींना बरीच वर्षे उलटून गेली. मात्र अजून मध्ये मध्ये उगाच वाटत असे. कॅनव्हास आणावा. पेंटीग सुरु करावे. ग्राफिक वगैरे. म्हणजे उगाच रियालिस्टिकच्या फंदात आपण पडू नये. आपण आपले कसे ग्राफिक करावे. म्हणजे जगविख्यात चित्रकार पिकासो सारखे. नाक उत्तरेला आणि डोळा दक्षिणेला. वगैरे वगैरे. 

परवा स्पेनमध्ये असताना बार्सिलोनाला जाण्याचा योग आला. बार्सिलोनामध्ये पिकासोची आर्ट गॅलरी आहे. त्याच्या कलेचे दालन. त्याच्या कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळातील चित्रे तिथे बघावयास मिळतात. गल्ल्याबोळ शोधतशोधत मी तिथे पोचले. स्पेनमधील गल्ल्या काय आणि तेथील बोळ काय. सर्वच सुंदर. त्यामुळे त्या दालनाचा शोध तसा रम्यच झाला. दालनाबाहेरील जग मात्र वेगळं होतं. म्हणजे जर रविवार म्हणून गल्ल्या सुन्या म्हटल्या तर दालनासमोर गजबजाट. मग रांगेत उभी राहिले. तिकीट काढलं. दगडी पायऱ्या चढले. आणि काचेच्या दरवाजासमोर पोचले. पाब्लो पिकासो. तिथे तिकीट दाखवलं. प्रवेश मिळवला. 

पिकासो. 'क्युबिझम' ह्या कला चळवळीचा प्रवर्तक. एखादी वस्तू वा एखादा चेहेरा, हा एकाच कोनातून न बघता वेगवेगळ्या कोनांमधून एकाच वेळी बघणे. व तसे चित्रात उतरवणे. यामुळे आपल्या डोक्यात वर्षानुवर्ष जे नियम घट्ट बसून राहिलेले आहेत एखादी गोष्ट बघण्याबाबतचे, त्यालाच पार तडा वगैरे. आणि आपल्याला नवी दृष्टी...
हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास. हे इतपत मला ज्ञात होते. 

मी दालनात प्रवेश केला. थबकले. माझ्या समोर साक्षात पिकासोची चित्रे होती. मुंबईत कधी काळी त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते. त्यावेळी आई बाबांना घेऊन मी तिथे गेले होते. 'क्युबिझम' मधील त्याची चित्रे. त्रिकोण, चौकोन, पिवळा, लाल, हिरवा. परंतु येथील पहिले दालन ? पहिल्या दालनात पहिल्या चित्रासमोर मी उभी राहिले. आणि पुन्हा पुन्हा बघत राहिले. अतिशय रियालिस्टिक पोर्ट्रेट. त्यापुढे तितकेच खरेखुरे लँडस्केप. मग त्यापुढे अशीच कितीतरी खरीखुरी चित्रे. जसा निसर्ग तशी त्याची चित्रे. तसेच हुबेहूब रंग. तेच पर्स्पेक्टीव्ह. हा पिकासो मला माहितीच नव्हता. मला ह्याची ओळख देखील नव्हती. पिकासो म्हणजे ठळक रंग, वेडेवाकडे आकार. मुक्त. स्वैर. त्यांना मी ओळखत होते. पण आज जे नजरेसमोर होते ते काही भलतेच. बिछान्यावर आजारी स्त्री, तिचा अशक्त हात हातात धरून तिची नाडी तपासणारा काळ्या कोटातील डॉक्टर आणि पलीकडे कडेवर मुल घेऊन उभी असली जोगीण. हे कसे शक्य आहे ? अशक्य ! म्हणजे पिकासोच्या रक्तारक्तात नसानसात माणसाची अॅनाटॉमी इतकी भिनलेली होती...म्हणून तोच फक्त तोच इतके स्वातंत्र्य घेऊन मुक्तपणे वेगवेगळ्या कोनांमधून मनुष्याच्या शरीराकडे बघू शकत होता ! एकाच वेळी. मी कोपऱ्यात उभी राहिले. मला हसू फुटले. मला आठवले किती वेळा कळत नकळत माझ्या मनात हा विचार येऊन गेला होता...पेंटिंग सुरु करावे...रियालिस्टिक नको...ग्राफिक करावे...पिकासोसारखे...इथे डोळे...तिथे नाक...वगैरे वगैरे...हसू आलं...अज्ञानाचा पडदा माझ्या उघड्या डोळ्यांनी फाडला.
पिकासो काही वेगळाच होता. जे कॉलेजमध्ये घोकलं होतं...ते कोण जाणे काय होतं....त्यावर डिग्री मिळवली...बाबा सुखावले. मात्र आज मी सुखावले...हसले...माझे अज्ञान अफाट होते. आणि आज ते दूर झाले होते.
वाटले पुन्हा जे जे च्या त्या भव्य दारातून आत शिरावे. व्हिटी स्थानकासमोरचा तो दरवाजा. दाट जुने वृक्ष. वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलणारी हिरवी पाने. चोरून जमिनीकडे धाव घेणारी सूर्याची ती नाजुकशी किरणे. मोजून गोळा केल्या तर शंभर तरी जमतील अशा त्या लालचुटूक गुंजा. सकाळचे फक्त साडेसात वाजलेले असावेत. दोन वेण्या. नाकावर जाड भिंगांचा चष्मा. मात्र ह्यावेळी उजव्या बाजूला वळावे. डाव्या हाताला आर्किटेक्चरची इमारत पार करावी आणि त्या अद्वितीय फाइन आर्टच्या इमारतीत शिरावे.
म्हणावे...मला प्रवेश द्या...
मला चित्रकला शिकवा.






















(शेवटचे छायाचित्र जालावरून साभार)

13 comments:

तृप्ती said...

:)

rajiv said...

बदकाचे एकदम थ्यांक्यू बरं का आम्ही !! आमच्यासाठी पिकासोचे हे दर्शन व त्यातले वास्तव सौंदर्य उलगडल्याबद्दल !!
बदकाचे जाड भिंगाचा चष्मा लावून दोन वेण्या पुढे घेऊन दारात उभे राहून " मला चित्रकला शिकायची आहे..." , हे सांगणे खूपच भावून गेले ...

अनघा... अशीच रहा ... प्रांजळ लिखाणासहीत ..!

Gouri said...

अनघा, हेच बदक आमच्याकडे पण होतं बरं का ... जर्मनमध्ये एम ए करून आयुष्यात पुढे काय करायचंय याचा कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं तरी पत्ता नव्हता... अजूनही शोधतेच आहे म्हणा :)
आणि पिकासोला पण सेम पिंच. अगदी हेच ऍमस्टरडॅमला व्हॅन गॉ बघून झालं होतं :) पहिल्यांदाच थोडंफार समजलं या एका कानाच्या वेडसर माणसाला कलाजगतात एवढा मान का ते!

Anagha said...

तृप्ती, :)

Anagha said...

राजीव, आभार. :)

Anagha said...

गौरी, एका कानाचा वेडसर माणूस !!! :p :D :D :D

हेरंब said...

क्वॅक क्वॅक क्वॅक...

बदकांची भाषा --> माणसांची भाषा
क्वॅक क्वॅक क्वॅक --> "मस्त मस्त मस्त"

Shriraj said...

पॅक पॅक पॅक पॅक बदक पलाला कुनाच्या देशी गेला? || धृ ||
अरे जाहिराती करुनशान आलाय कन्टाला पिकासो पायजे मला...

:P

Mohana Prabhudesai Joglekar said...

सुबोध जावडेकरांची ’माणसांची भाषा’ नावाची कथा आहे. बदकामुळे त्याची आठवण झाली. एकंदरीत आपल्या शिक्षण पद्धतीने अशी बदकं खूप निर्माण केलेली आहेत. माझाही त्यात समावेश :-). छान लेखन. आवडलं.

Anagha said...

श्रीराज !!! :D :D

Anagha said...

क्वॅक क्वॅक क्वॅक...
हे मी थांकू थांकू थांकू म्हटलंय तुला हेरंबा ! माझ्या भाषेत ! :D :D

Anagha said...

मला आपलं वाटतं पण की हल्ली मुलांना खूप कळतं आपल्याला पुढे काय करायचं ते...नाही का ?

आभार मोहना... :)

सौरभ said...

वाह वाह वाह!!! कमाल. ते जे चर्चमधल्या लग्नसोहळ्याचं चित्र आहे त्यात कपड्यांचे जे बारकावे रंगवलेत!!! थोर...

@श्रीराजः LOL =))