नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 9 November 2011

माझे घर...माझा रस्ता...

तो काही वेगळा दिवस नव्हता. सूर्य उगवला. मी उठले. कामं आटपली आणि बाहेर पडले. आमच्या एका गल्लीच्या तोंडाशी एक विहीर आहे. मुंबईत हे ऐकलं की कसं अप्रूप वाटतं. परंतु, ते फक्त दूर राहून वाटू शकतं. म्हणजे, 'दुरून डोंगर साजरे'च्या धर्तीवर. ज्यांच्या अरुंद अशा गल्लीत विहीर देखील असते त्यांना त्या विहिरीच्या मालकाचा बहुतेक वेळा त्रासच होतो. जसा आठवड्यातून किमान चार दिवस मला होतो. घड्याळाच्या काट्यावर जीव अडकवून, गाडी काढून बाहेर पडावं आणि विहीर उपसून, पोटात तुडुंब पाणी भरून, तीन चार टँकर्स बाहेर पडावेत. वेगवेगळ्या दिशेने. आणि दिशा पकडण्यासाठी, ही टँकर्सची धूडं कधी डावीकडे, कधी उजवीकडे, पुढे, मागे तर कधी अगदी १८० अंशांत फिरत असतात. मग तुम्हांला शहराची कुठलीही दिशा का धरावयाची असेनात, त्या क्षणी तरी त्या अजस्त्र धूडाला वाट करून देणे तुम्हांला भाग असते. आणि म्हणून 'का बरं आमच्या गल्लीत विहीर आहे' असा एक उद्वेग मनात डोकावून जातो.

त्या दिवशी ह्या अशाच प्रकारे दिवसाला सुरुवात झाली. एक टँकर उंट बनून गोल वळत होता. माझ्या पुढे दोन गाड्या थांबल्या होत्या. मी देखील थांबले. जवळच कॉलेज असल्याकारणाने तरुणाई इथे तिथे फिरताना नेहेमीच आढळते. मान उंचावून दूर नजर टाकली तर उंट अगदी तोल सांभाळत वळत होता. ह्यात किमान पंधरा मिनिटे सहज निघून जाणार होती. 'लेट मार्क' निश्चित होता. खिडकीबाहेर काही विद्यार्थी उभे होते. उंटाची कसरत बघत. माझ्या उजव्या बाजूला देखील अशीच वर्दळ थांबली होती. तेव्हढ्यापुरता दिवस जसा तटस्थ झाला होता. आरशातून बघितलं तर मागे आता तीन चार गाड्या येऊन उभ्या राहिल्या होत्या. तेव्हढ्यात, त्याने कावा साधला.
काय बरं झालं ? माझ्यापासून थोडं पुढे उभा असलेल्या एका मुलाने त्याच्या हातातील कागदाचा बोळा रस्त्यावर फेकला. काळा रस्ता. त्यावर पांढरा बोळा. नाही चांगला दिसला. टाकणारा उंटाकडे बघत उभा होता. त्याच्या मते त्या कागदाशी असलेला त्याचा संबंध संपलेला होता. परंतु, त्याच्या दुर्दैवाने गाडीत मी होते. आणि मला तरी ते तुटते संबंध रस्त्यावर येणे पटले नाही. मी गाडीतून उतरले. बोळा उचलला. त्याच्याकडे गेले. "तुला नको आहे का हा कागद ?"
"अं ?.....हो....काय झालं ?"
"नको असेल तर तुझ्या घरी टाक ना...कुठेही टाक...पण तुझ्या घरात....माझ्या ह्या रस्त्यावर नको."
मागे एक बाई उभ्या होत्या. मध्यमवयीन. नाकावर चष्मा. अंगावर साडी. फिसकन हसल्या. आजूबाजूची लोकं आमच्याकडे बघू लागली. मुलगा कावराबावरा झाला. त्याने त्या नको झालेल्या कागदाला पुन्हा खिशात सारलं. मी गाडीत जाऊन बसले. उंट हलला. गाड्या आपापल्या मार्गाला लागल्या.

आमच्या घराचे केरलादी वैभवी करते. सकाळीच. त्यामुळे मी बाहेर पडते त्या आधीच घर लख्ख होऊन जाते. खुशीत हसू लागते. परंतु, वैभवी साफ करणारच आहे म्हणून मग दिवसभर मी व माझी लेक काय इतस्तत: कागदाचे बोळे फेकत रहातो ? थुंकाथुंकी करतो ? नाही. का बरं ? कारण हे आमचं घर आहे. मग काय तो रस्ता माझा नाही ? तो साफ ठेवण्यासाठी जो माणूस काम करतो, त्याचा पगार देखील माझ्याच पगारातून जात असतो. मग ? मग काय म्हणून त्या मुलाला, मी माझा रस्ता त्याच्या XXचा असल्यासारखा वापरू देऊ ?

अजून एक गोष्ट.
ह्यातून मी नक्की काय साधलं...असला विचार करणं मी बंद केलेलं आहे. त्या क्षणी तो मुलगा खजील झाला. त्या बाई हसल्या...आजुबाजूची माणसे बघू लागली...आणि मी मिळवली. मग त्याचे ते खजीलपण क्षणभंगुर का असेनात...पुढल्या गल्लीत जाऊन त्याने तो बोळा पुन्हां एकदा रस्त्यावर का फेकला असेनात.

जे करता येण्यासारखे होते...तितके मी केले होते.
मी तो क्षण गमावला नव्हता.
कमावला नक्कीच होता.
निदान माझ्यासाठी.

21 comments:

Gouri said...

अनघा, तो क्षण नक्कीच कमावलास ... रस्त्यावर पडणारा एक बोळा तरी वाचवून - आणि उंटाने वाट अडवल्यामुळे वैताग न करून :)

नागेश देशपांडे said...

Nice Post. Keep writing.

neela said...

सहीच!!!! :)

BinaryBandya™ said...

मी तर अशा लोकांना डोस देणे हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे असे समजतो :)

हेरंब said...

त्या मुलाने त्या उंटाला मजबूत शिव्या घातल्या असणार :P

Shriraj said...

ताईसाहेब, आपलं कर्तव्य आपण बजावायलाच पाहिजे आणि हे जग स्वच्छ ठेवणं हे तर अगदी आद्य कर्तव्यच आहे आपलं. ते काय म्हणतात न -

Cleanliness is next to godliness

Anagha said...

:) गौरी, वैताग ना ?! रोज इथे ड्रायव्हिंग करताना तो मी भरमसाठ करते हा ! :D

Anagha said...

सौरभ, :D

Anagha said...

नागेश, धन्यवाद :)

Anagha said...

नीला :) आभार गं.

Anagha said...

डोस ! मस्त ! बंड्या, छोडने का नही ! :D

Anagha said...

:) असतील असतील... हेरंबा, ह्या कॉलेजच्या मुलांच्या तोंडच्या शिव्या ऐकून हल्ली मला धक्केच बसत असतात ! :)

Anagha said...

श्रीराज, :)

आनंद पत्रे said...

हाच तो फॉलोवर जो कमी झालाय :P

Mohana Prabhudesai Joglekar said...

सुंदर, बोलावसं वाटतं अशा गोष्टींना आळा घालावा म्हणून पण कसं बोलायचं म्हणून जमलं नव्हतं, तुमचा दृष्टीकोन पाहून आपणही कृती करावीशी वाटतेय :-)

Trupti said...

:)mast ch

Anagha said...

:D आनंद बुवा...गूढ अजून उकललेलंच नाहीये !

Anagha said...

मोहना, ब्लॉगवर स्वागत. :)

माझा आपला खारीचा वाटा ! हो ना ? :)

Anagha said...

तृप्ती... :)

Unknown said...

छानच लिहिता तुम्ही, सध्या सोप्या भाषेत सहज मराठी वाचायला मिळालं आणि आवडून गेलं.

तुमची कृतीही अत्यंत कौतुकास्पदच खरी. चटकन आपण अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य करून आपापल्या कामाला लागतो, पण हेही आपले एक कर्तव्यच आहे हे खरे.

मी तुमच्या लेखनाचा पंखा झालेलो आहे ह्यात वादच नाही.
लिहित राहावे, वाचत राहूच !

Anagha said...

:) हर्षल, ब्लॉगवर स्वागत.
आणि प्रतिक्रियेबद्दल आभार आभार. :)

(तुमचं नाव शोधून काढलं मी ! कारण जे काही दिसतंय ते नक्की कसं बोलायचं किंवा कसं लिहायचं तेच कळेना ! :) म्हणून जरा शोध घेतला...
:)