नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 30 October 2011

गुंता ?

असं का असतं...
दिवसभर...पूर्ण दिवस तो माझ्यासोबत असतो. एक क्षण देखील मला एकटीला सोडत नाही. त्याच्या संगे मी माझा दिवस व्यतीत करते. असो सुखाचा वा असो दु:खाचा.
पण तरीही...तरी देखील, दिवस संपता संपता तो दूर दूर जाऊ लागतो. मी त्याला कितीही का धरून ठेवेना...तो नाही ऐकत माझं...हळूहळू धूसर होऊ लागतो...आणि एका क्षणी दिसेनासा होतो. अदृश्य होऊन जातो. पुढील काही क्षण...काही पळ मी एकटी बसून रहाते. गुढघ्यात मान खुपसून. घाबरून. कसनुसं होतं. अगदी एकटं एकटं वाटू लागतं. तो अंधार अंगावर येऊ लागतो...विक्राळ आंधळा अंधार. आणि...आणि मग काय होतं ? अस्पष्ट असा तो सुस्पष्ट होत जातो...तो माझा दुसरा सखा हसत हसत दृश्य होऊ लागतो. माझी सोबत करावयास त्या अंधारात तो पुढे येतो. मग आम्हीं दोघे...पुढील क्षण न क्षण एकत्र असतो. मी त्याचा हात घट्ट धरून आणि तो माझ्या माथ्यावरून हलकेच हात फिरवत.
पण काय हे तरी शाश्वत असतं ? छे ! थोडं का भान हरपावं माझं...विसरून जावं मी मला...तो दूर होऊ लागतो...मी कितीही त्याला पकडून ठेवावं, तो मला सोडून जातो. असहाय्य मला, दूर लोटून तो निघून जातो.
मग ? मग काय होतं...?
...काय सांगावं...?
...माझा तो पहिला सखा पुन्हां पुढे येतो...
खोल खोल गर्तेत कोसळणाऱ्या मला त्याच्या बलशाली मिठीत सावरून नेतो.

पण हे असं का होतं...?

सखा तर एकच असावा ना ?
आयुष्यात एकाचीच तर साथ असावी ना ?
काय हा मोह आहे ?
वा हा निसर्गाचा एक नियम आहे ?
आणि रोज तो मला पटवू पहात आहे ?
एकाच व्यक्तीत नसतात ते सगळे गुण...जे हवेहवेसे वाटतात.
मन बापडे शोध घेत रहाते. उगा वेडेपिसे होते.
जे गुण मला सूर्यात मिळतात...ते तर त्या चंद्रात कधीच नसतात.
चंद्र मला जे सहजगत्या उदार हस्ते देऊ पहातो...ते त्या सूर्याच्या कधी ध्यानीमनी देखील नसते.
कोमल, शीतल चंद्र हा चंद्र असतो...आणि तो तप्त, उग्र सूर्य हा सूर्य.
मला का दोघांची ओढ वाटावी...
का मी ह्याचे गुण त्याच्यात आणि त्याचे गुण ह्याच्यात शोधावे ?

...माझं सरळ साधं आयुष्य मी फुका गुंतागुंतीचं करून टाकावं...?

हे असं का बरं असावं ?

14 comments:

Shriraj said...

चंद्र हा हवाहवासाच वाटतो. त्यामुळे बघ ना कशा त्याच्या अवतीभवती आकाशातल्या आणि जमिनीवरच्या असंख्य चांदण्या घुटमळताना दिसतात!

rajiv said...

सूर्य-चंद्र !!!
सूर्याच्या तप्ततेपासून काही काळ मानवाची सुटका होण्यासाठी व त्याच्या जिवाला थोडी शीतलता मिळून,
उद्याच्या आव्हानांचा परामर्श घेण्याची ताकद मानवाला देण्यासाठीच निसर्गाने ही योजना केली आहे.
तेंव्हा कधी त्याचे आयुष्य साधे सरळ होऊन जाते तर कधी गुंतागुंतीचे.
ह्म्म्म !! गुंतागुंत ...हा पण एक निसर्ग नियमच आहे....
दैनंदिन घटनांचा सुरेख ताळेबंद मांडलयस. खूपच छान !!

BinaryBandya™ said...

परिपूर्ण काहीच नसते ना (आपणसुद्धा) म्हणून कदाचित गुंता ..

shweta pawar said...

superb anagha... hi guntagunt anekanchya manatali aahe... kas g herates he sarv??????

Anagha said...

:) :) श्रीराज, जळू नको रे त्या बिचाऱ्यावर ! ;)

Anagha said...

राजीव, एक प्रयत्न केलाय खरा ! आभार. :)

Anagha said...

खरंय बंड्या, परिपूर्ण असे काहीच नसते. आपणही नसतो...पण समोरच्याकडून 'आपल्या दृष्टीने' परिपूर्ण अशी साथ हवी असते...निदान तशी आपली अपेक्षा असते.
आभार रे. :)

Anagha said...

श्वेताबाई ! आहात कुठे तुम्हीं ?!
मनात कुठेतरी एक काळजी लावून नाहीशी होतेस ! :)

माणूस म्हणून जगण्याच्या प्रयत्नात हे कुठेतरी थोडंफार जाणवतं... :)
आभार गं ! :)

हेरंब said...

अनघा, मस्तच !! नेहमीच्या गोष्टींकडे पाहण्याचा एक एकदम वेगळा दृष्टीकोन !

Anagha said...

थॅन्कू थॅन्कू हेरंबा ! :)

सौरभ said...

ओ मड्डमजी.. हमरे पास एक शाम्पू है! उसको लगवो सब गुंता सुलझावो!!! शाम्पू एक-दो घोट पिवोगे तो चांद-सूरज एकसाथ फुगडी घालते हुए दिखेंगे!!! बल्ले बल्ले जी बल्ले बल्ले!!!

Gouri said...

अनघा, माझी पोस्ट वाच बघू गुंत्यावरची ... पॉवर पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे , सिक्युरिटी पाहिजे म्हणून सगळा गुंता निर्माण होतो बरं ;)
(नेहेमीप्रमाणेच) मस्तच लिहिलं आहेस.

Anagha said...

सौरभ!!!!! :D :D :D

Anagha said...

:) :) मस्त होती ती पोस्ट तुझी गौरी ! :)