नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 24 October 2011

कोर्ट केस क्र. ११००/अ/११

त्या दिवशी मी वेळेत घरी आले होते. संधिकाली घरी येणं हे फार क्वचित होत असल्याकारणाने त्याचे काही वेगळेच अप्रूप वाटून जाते. अत्याधुनिक कचेरीतील त्या निळ्या खिडकीपल्याड दिवस आहे की रात्र सुरु झाली आहे ह्याची कोणतीही निशाणी आत आपल्याला स्पर्श देखील करीत  नाही. बाहेर सूर्य डुबून जावा, सर्व दिशांना हलका सोनेरी प्रकाश पसरावा, हळुवार सगळा परिसर  काळोखात बुडू लागावा...आणि अशा कातरवेळी आपण घरी असावं. मग आपण दिवे लावू नयेत, घर उजळवू नये...त्या अंगावर पसरत जाणाऱ्या अंधारात आपणही धूसर व्हावं...त्यात हळूहळू नाहीसं व्हावं. आपणच आपल्याला दिसेनासे होतो. मनातले फक्त विचार जाणवतात...पण हातपाय हळूहळू नाहीसे...म्हणजे आपण असून नसल्यासारखे. हे असं स्वप्न देखील किती महाग. कधीही पैशाची चिंता भासू नये ह्या भीतीमागे ते स्वप्न दडून बसलेलं. पण त्या दिवशी मला कधी नव्हे ते देवाने लवकर घरी पाठवलं होतं. त्याला बरं सगळं माहित असतं ! काहीही न करता मी बसून राहिले होते. खिडकीत. सतत काहीतरी करतच राहिले पाहिजे हा विचार आता मी माझ्यापासून जाणूनबुजून दूर ठेवू लागले आहे. काहीही न करता पाय पसरून बसावयास मिळणे हे फार महाग झाले आहे...त्यामुळे हे घडले असावे. तितक्यात दरवाजात किल्ली फिरल्याचा आवाज झाला. दार उघडून आई आत आली. आली आणि मटकन समोरच्या सोफ्यावर बसली. लगेच उठली आणि आत गेली. परत बाहेर. वयोमानापरत्वे ती आता थोडी वाकली आहे. संधिवाताचा त्रास आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रोज संध्याकाळी थोडा वेळ चालण्याचा व्यायाम करून ती घरी परतते. मला आधी वाटले, नेहेमीसारखी आई फिरून आलेली आहे. तरतर चालत दाराकडे गेली. दार उघडून बाहेर निघाली. हे थोडं काहीतरी विचित्रच चालू होतं.
"आई, कुठे चाललीस ?" मी उठून विचारलं. सगळ्यांनाच अंधारात बसायला आवडत नाही. आणि लक्ष्मी येण्याच्या वेळी अंधारात बसायला तशीही मला भीतीच वाटते. उगाच तेव्हढंच कारण मनाशी धरून लक्ष्मी, माझ्या घरात शिरायची नाही. मी दिवे लावले.
"आई, अगं आत्ताच आलीस ना फिरून ? मग परत कुठे निघालीस ?" आई काही बोलेना. कावरीबावरी.
"काय झालंय आई ?" काहीतरी विचित्र घडलं होतं. मी दारात तिच्या पुढ्यात उभी राहिले. ती मागे फिरली. पुन्हा सोफ्यावर बसली.
"अगं, ती माणसं मला म्हणाली की ते पोलीस आहेत."
आता परिस्थितीचं गांभीर्य अंगावर येऊ लागलं.
"काय झालंय ? कोण म्हणालं तुला ते पोलीस आहेत म्हणून ?"
"अगं, ते म्हणाले की इथे चोर फिरत असतात आणि म्हाताऱ्या माणसांना लुबाडतात..."
"मग ?"
"ते मला म्हणाले की अंगावरचे दागिने काढून द्या...ते नीट माझ्या पिशवीत टाकतील...नाहीतर हे चोर लुबाडतील. मी त्यांना म्हटलं की माझं घर इथेच आहे...मी आता दोन मिनिटांत घरी पोचेन...""
मी काहीच बोलू शकले नाही.
"पण तरी ते म्हणाले की तुम्हांला कळणार पण नाही ते कधी हात मारतील....द्या तुम्ही आमच्याकडे...मी तुमच्या पर्समध्येच टाकेन...अगं, मग मी काढली गळ्यातली सोन्याची माळ...त्यांनी ती घेतली आणि मला म्हणाले की बघा आम्ही तुमच्या पिशवीत टाकतोय...पण नाहीये ग माझ्या पिशवीत."
"आई..."
"म्हणून मी परत जाऊन बघत होते...कुठे पडली का म्हणून..."
"ठीक...मी कपडे बदलते...आपण पोलीस स्टेशनला जाऊ."
"पोलीस स्टेशनला जायला लागेल ?"
"मग काय करणार आपण आई ?"
"त्यांचा फोटो असलेलं कार्ड पण दाखवलं गं त्यांनी मला..."
मी कपडे बदलून आले...आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. जेष्ठ नागरिक म्हणून पोलीस बरे वागले. बसायला वगैरे जागा दिली.
"काय झालं ?"
मी सांगायला सुरुवात केली.
"अहो...ह्या आपल्या परिसरात अशा खूप केसेस ऐकू यायला लागल्यात..." अनुभवी पोलीस म्हणाले.
दोन तीन पोलीस जमले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले.
"काय झालं ?"
मी पुन्हा सगळं सांगितलं. आई बाजूला बसली होती. गळा ओकाबोका.
अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना हुकूम दिला. आईशी बोलून घटनाक्रम लिहून घेण्याचा.
आईसमोर एक पोलीस उभी जाड वही घेऊन बसला. आईला प्रश्र्न विचारण्यास सुरुवात केली. आईने सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसाने लिहून घेतला.
आईला त्या तीन माणसांनी सांगितले की आमच्या परिसरात चोर मोकाट सुटले आहेत. ते कधीही तिच्या सोन्याच्या माळेवर हात मारू शकतात. तेव्हा तिने ती काढून त्यांच्या हाती द्यावी, ते लगेच ती माळ तिच्याच पर्स मध्ये टाकतील. म्हणून तिने तसे केले. त्यांनी तिची पर्स हातात घेतली, उघडली परंतु, ते गेल्यानंतर तिने बघितले तर पर्समध्ये तिची बोरमाळ नव्हती.
"किती किंमतीची होती तुमची माळ ?"
आई कावरीबावरी झाली.
"आई, ते विचारतायत किती किंमतीची होती माळ."
"हो. कळलं ते मला. ऐकलंय मी."
पोलीस वहीतली मान उचलून आईकडे बघत बसले होते.
"आता जवळपास छत्तीस चाळीस हजारांपर्यंत असेल ती माळ....मी घेतली तेव्हाच ती........."
आई पुढे काय बोलली मला ऐकू नाही आलं. पोलीस माझ्याकडे बघत राहिला. मी आईकडे.
"आई, एव्हढी महाग होती ती माळ ?"
"असणार ना गं..."
पोलिसाचे लिखाण संपल्यावर वरच्या मजल्यावर आम्हांला नेण्यात आले. आईसमोर प्रचंड वजनाच्या जाडजूड चार ते पाच वह्या ठेवण्यात आल्या.
"आजी, ह्यात बघा...फोटो आहेत...कोणाची ओळख पटते का बघा." पोलिसाने आईला सांगितले.
गोंधळलेली आई. मी वहीची पानं पलटत होते...आई एखाददुसऱ्या फोटोकडे बघून अधेमध्ये मान डोलावत होती. त्यावर बाजूला बसलेले पोलीस चर्चा करत होते...हा सध्या ह्या परिसरात आहे...हा मालाडला दिसला होता...वगैरे वगैरे. एक तास तिथे घालवल्यावर आम्ही तिथून निघालो.
"कदाचित तुम्हांला उद्या आमच्या क्रॉफर्ड मार्केटच्या ठाण्यात यावे लागेल. ओळखपरेडसाठी. आम्ही तुमच्यासाठी जीप पाठवू."
तसे काही झाले नाही. आणि मग बरेच महिने उलटले.

परवा आमच्या पोलीस स्टेशनने एक कागद घरी आणून दिला. मजकूर हा असा...
आपण या पोलीस ठाण्यास तीन अनोळखी इसमांविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या संदर्भात आपणांस असे कळवण्यात येते आहे की, पुराव्या अभावी सदर प्रकरणावरील कारवाई तात्पुरती बंद करण्यात आली आहे. व 'गुन्हा खरा परंतु शोध न लागलेला' असे त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पुढील कोणत्याही तारखेस तपासाचे काम पुन्हा सुरु केल्यास आपणास त्याप्रमाणे कळविण्यात येईल.
सदरहू गुन्ह्याची मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ५ वे न्यायालय, मुंबई यांचे न्यायालयात कोर्ट केस क्र. ११००/अ/११, दि. १६/०५/११ अन्वये 'अ' समरी मंजूर झालेली आहे.

मंगळसूत्र काढून ठेवल्यापासून गेली नऊ वर्ष गळ्यात ती बोर माळ घालत होती. वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून नोकरी करणारी माझी आई. आधी भावांना घर चालवण्यासाठी मदत म्हणून. आणि नंतर स्वत:च्या संसाराचा वाढता डोलारा सांभाळण्यासाठी. आम्हां तिघी बहिणींची तयारी करून धावतपळत ट्रेन पकडून ते मस्टर सांभाळण्याची ती तिची सकाळची जीवतोड धांदल आणि संध्याकाळी पुन्हा ताजं जेवण, ताज्या चपात्या आमच्या ताटात वाढण्याची तिची ती कसरत. काहींचं आयुष्य धकाधकीचं लिहिलेलं असतं. माझ्या मध्यमवर्गीय आईच्या घामाच्या चकाकत्या मण्यांची ती बोरमाळ. म्हणतात शत्रूचे देखील वाईट चिंतू नये. परंतु, स्वर्गात ज्यावेळी देव हृदयाचे वाटप करत होता त्यावेळी मी पतंग उडवत होते. त्यामुळे माझ्याकडे इतके विशाल हृदय नाही. आणि शरीरात किडे पडणे म्हणजे काय हे माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितले आहे. तसाच काहीसा शाप मी त्या चोरांना देते.
इतकी वर्ष आई ती बोरमाळ गळ्यात घालून वावरत होती. पण मला त्याची किंमत माहिती नव्हती. आईला माहित होती. परंतु, सद्य परिस्थितीत घराच्या बाहेर पाऊल टाकले की वाढलेला धोका अजून तिच्या लक्षात नव्हता आला. आणि त्या अज्ञानामुळे ती त्या चोरांच्या तावडीत सापडली. त्यांनी नक्की हिच्यावर बरेच दिवस पाळत ठेवली असावी. तिच्या गळ्यातील माळेची किंमत मला नव्हती परंतु, त्यांनी मात्र ती बरोब्बर हेरली होती. एक तर पोलिसांच्या वरचढ चोर आहेत...वा पोलिसांना त्यांचे मोल दिले गेले असावे. त्यामुळे 'तू चोरी कर मी शोध घेतल्यासारखे दाखवतो'....असे काही असू शकते. मनात अशी शंका हमखास येते.

मुंबई सुरक्षित राहिलेली नाही.
खरंय.
वर्तमानपत्रात जेष्ठ नागरिकांच्या खुनाच्या रोज इतक्या बातम्या वाचत असतो. तरीही अक्कल आली नाही ?
नाही आली.
म्हाताऱ्या बाईने इतका महागडा दागिना रोज अंगावर बाळगावाच का ?
चूक झाली.
पुन्हापुन्हां जाऊन त्या पोलीस ठाण्यात चौकशी केली का ?
नाही.
मग आता आम्हांला का सांगितली जातेय ही गोष्ट ?
उगाच.
वाचकाला काही संदेश द्यावयाचा आहे काय ?
नाही.
का ?
कारण ही काही इसापनीतीची गोष्ट नाही !
मग काय आहे ?
ही बदलत्या मुंबईची कहाणी आहे. 
इथे माणुसकीची पणती विझलेली आहे. 
'फास्ट मनी'चा झगमगता अनार गगनाला भिडला आहे.

नशीब म्हणायचं, आईचा जीव नाही गेला.

16 comments:

अपर्णा said...

अनघा काय बोलू ग...:((
कालच बाबा सांगत होते अशा घटनांविषयी आणि आजच हे वाचलं तर कसतरीच वाटलं बघ.कुठे जातेय आपली मुंबई....:((

Shriraj said...

अनघा, म्हणून तर हताश व्हायला होतं. आपण आयुष्यभर मरमर मरतो... एकेक वस्तू पै-पै जमवून मिळवतो आणि कधीतरी ती क्रूरपणे कुणीतरी हिसकावून नेतं . प्रामाणिकपणे जगणं काही सोपं नाही...

Shardul said...

शेवटच्या चार ओळी..

Raindrop said...

:(

Anagha said...

अपर्णा, पावलोपावली धोका जाणवतो आता...
रस्त्यात काही नाही बरोबर वाटलं तरीही काही बोलायची म्हणजे जीवाची भीती !

Anagha said...

श्रीराज, प्रामाणिकपणे मरणं मात्र अधिक सुखावह असेल हे मला नक्की माहितेय....मग जगणं कितीही का कठीण असेनात !

Anagha said...

शार्दुल...मला आता वाटत चाललंय की ह्या बदलत्या मुंबईत जगण्याला मी नालायक ठरू लागले आहे.
आभार प्रतिक्रियेबद्दल.

Anagha said...

वंदू...आईचं वाईट वाटतं....तिने जे काही थोडं फार जमवलेलं आहे...त्यामागे तिचे अक्षरश: रोजचे कष्ट आहेत.

तृप्ती said...

अनघा, वाचून वाईट वाटलं पण त्या माळेपायी काही ईजा केली नाही हे सुद्धा महत्वाचं. काळजी घ्या.

Anagha said...

तृप्ती, तुझं इतकं मृदू वाक्य वाचून मला खूप बरं वाटलं....आणि मलाच माझं शेवटचं वाक्य मग किती कठोर वाटलं...
काय करू ? झालेय खरी मी अशी...

हेरंब said...

>> त्यामुळे माझ्याकडे इतके विशाल हृदय नाही.

त्याची गरजही नाही. असलं हृदय असलं की उगाच शाप देण्याच्या लायकीच्या माणसांनाही उगाच माणुसकीने वगैरे विचार करून माफ केलं जातं which they don't deserve simply !! आहे तशीच रहा..

आणि काळजी घे !

सौरभ said...

this is crazy!!! ह्या बातम्या फक्त पेपरात वाचल्यात!!! छत्तिस हजार गेले त्याहून माळ गेली हे फार मनस्ताप देणारं असेल नक्कीच. निर्जिव गोष्टींवरपण आपला बराच जीव जडलेला असतो.

Gouri said...

अनघा, अग सोनं गेलं पण आईला त्यांनी काही केलं नाही हे मोलाचं. :(

Anagha said...

हेरंब...मला कळतच नाही पण कधीकधी...नक्की कुठल्या 'फ्रंट'वर काळजी घेऊ ?! :)

Anagha said...

खरंय सौरभ...अनेक निर्जीव गोष्टीत आपला जीव गुंतलेला असतो...

Anagha said...

गौरे, खरंय....ती आणि इतकी नाजूक झालेली आहे की थोडा जरी धक्का लागला तर तोल जाईल तिचा ! मानसिक बळावर सगळं चालू असतं तिचं...