नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 25 July 2011

माणूस...असा आणि तसा.

दोनतीन वेगवेगळे प्रसंग. ठिकाणे वेगळी. वेळ वेगळी. दिवस वेगळा. समान काय तर कधी अप्रत्यक्षरीत्या तर कधी प्रत्यक्षरीत्या, मी त्या प्रसंगांचा एक भाग। प्रसंग साधेसुधे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य प्रसंग. आणि म्हणूनच महत्त्वाचे. कारण सामान्य माणसांना घेऊन समाज तयार होतो. एकेक मुंगी रात्रंदिवस मेहनत करते. प्रचंड वारूळ उभे रहाते. अशाच एखाद्या मुंगीवर कॅमेरा लावला व त्याच जागेवर स्थिर रहात फक्त लेन्स फिरवत नजरेसमोरील दृश्य विस्तारित गेलो तर... एक मुंगी, असंख्य मुंग्या, त्यांची लगबग आणि मग ते वारूळ.

...गेल्या रविवारी मी व माझी लेक सिटीलाइट मार्केटमध्ये बाजारहाट करावयास गेलो होतो. सर्व आटपून बाहेर आलो व लक्षात आले, सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरलो. कोथिंबीर. बाहेर पडताना उजव्या हाताला एक बाई मिरच्या कोथिंबीर विकत असते. एक लाकडी बाकडं व पुढ्यात दुसऱ्या बाकड्यावर ह्या बारीकसारीक परंतु सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. कित्येक वर्ष ती तिथे आहे. पूर्वी फक्त मिरच्या कोथिंबीर मिळायचं पण हळूहळू प्रगती होतहोत एकदोन पालेभाज्या ती ठेवू लागली. काळी, ठेंगणी, कमरेखालपर्यंत एक पोलका. त्याखाली परकर, हाच वेष. ह्यात बदल काहीही नाही. कधीतरी तो पोलका सफेद दिसावा. त्यानंतर त्यावर पिवळट झाक असे. आणि एक बाब मात्र तिची इतक्या वर्षांत नाही बदलली. तिचं हसू. माणसाचे मन जर नितळ तर हसू देखील तसंच. चेहेऱ्यावर पसरणारं. हलकेच एखादी थैली उघडावी आणि आतील अस्सल हिरे झळकून उठावे.
"कोथिंबीर दे ग" मी म्हटलं.
"किती दिवसांनी येतेयस ताई." हातात कोथिंबीर गोळा करताकरता ती म्हणाली. मी कानकोंडी. रस्त्यावरून भाजी घेणे माझ्या तत्वांत बसत नाही म्हणून मी नेहेमीच आत बाजारात जाऊन सर्व आठवड्याचा बाजारहाट आटोपूनच बाहेर पडते. बाहेर पडताच उजव्या हाताला ती दिसते. कधी एकटी तर कधी १३/१४ वर्षांची सावळीशी तरतरीत मुलगी सोबतीला. बाबांबरोबर मी यायचे त्यावेळी बाबा तिच्याचकडून मिरच्या कोथिंबीर घ्यायचे. आणि काका कसे आहात अशी सुरुवात करत दर रविवारी त्यांच्या गप्पा रंगत. मी नियमितरित्या तिच्याकडे खरेदी करत नाही हे तिलाही माहित आहे. पण म्हणून तिने कधी हाक मारून हटकले नाही.
"आज लेक पण आली तुझ्याबरोबर ?" तिने मला विचारले.
"हो बाई. आलीय खरी आज माझ्या नशिबाने." मी म्हटलं. "मुलगी ?" मी तिला पुढे विचारलं.
"ताईची ! ताईची मुलगी आता पंधरावीला आहे. अभ्यास करत असते. म्हणून नाही आली आज." मान खाली घालून ती भराभर कोथिंबीरीची जुडी करू लागली.
कुठेतरी मला माझ्या प्रश्र्नाच्या योग्यतेची खात्री नव्हतीच...आणि म्हणूनच मी 'तुझी मुलगी कुठेय' असा प्रश्र्न नव्हता केला. फक्त मुलगी हे एव्हढंच प्रश्नार्थक बोलले होते. खिन्न. खिन्न झाले मी. तिचं कधी लग्न झालं नसावं. कधी संसार थाटला गेला नसावा. अख्खं आयुष्य कोथिंबीरीच्या जुड्या करण्यात घालवायचं...आपली भावंड सांभाळायची...त्यांच्या संसाराची जुडी बांधायची....आपल्या आयुष्याचे देठ एकेक खुडून.
माझं चुकलंच...मी नको होतं असं विचारायला...तिथून निघाल्यावर मी लेकीच्या कानाशी पुटपुटले. तिने माझ्याकडे बघितलं आणि हसली.

एकदा का पाऊस पडला की आपल्या रस्त्यांवरील खड्डे जलमय होतात. त्यात मी काय नवीन सांगितलं. त्या दिवशी सकाळी कचेरीत येत होते. नवनवीन इमारती कॉम्प्लान न पिता उंची वाढवत आहेत. ती उंची बघून भयाने पोटात खड्डा पडावा तसे रस्ते भोकाळत आहेत. हनुमान गल्ली देखील त्यातीलच. गाडी चालवत असता त्या खड्डयांच्या खोलीचा अंदाज येणे हे म्हणजे एखाद्या स्त्रीच्या अंत:करणाची खोली कळण्याइतके कठीण. नाही का ? गल्ली असल्याने माझ्या गाडीचा वेग काही फारसा नव्हता. सकाळी नवाच्या सुमारास ह्या रस्त्यावर नोकरदारांची रहदारी असते. शनिवार रविवार सोडून. काही पायी तर काही गाड्यांमध्ये. 'ऋतू हिरवा' सीडी वाजत होती. बाहेर पावसाळी व गाडीत आशाताईंचा पाऊस. मी संथसंथ खालीवर चालले होते...स्वरांवर, खड्डयांवर. आणि अकस्मात माझा खोलीचा अंदाज चुकला. पुढील चाकांखाली आलेला खड्डा नको इतका खोल होता. त्यात भरून राहिलेले पाणी वेगात अस्ताव्यस्त फेकले गेले. मी दोन्ही बाजूला चोरटी नजर टाकली. उजव्या बाजूला दोन नोकरदार महिला व डाव्या बाजूला एक नीटनेटके कपडे घातलेला अजून एक नोकरदार. मी त्यांच्या कपड्यांचा चांगलाच शिमगा केला होता. ते सर्व मातकट पाणी सलवार खामिजावर एक मुक्त कलाकुसर करून गेलं आणि त्या पुरुषाच्या विजारीचा रंग कुठला होता हे विचारायची पाळी ! त्या सहा डोळ्यांतील तिरस्कार एकदम घायाळ करून गेला. मला कळत होतं...आता पुढचा दिवस ह्या बायका काय अशाच बरबटलेल्या कपड्यांत बसणार होत्या ? आणि तो पुरुष तरी काय करणार होता ? गाडी मी अधिकच संथ केली...उजवा हात स्टीयरींग व्हीलवरून उचलला...सपशेल माफी मागितली. ते तिघे मला माफ करू शकले की नाही तेच जाणो...आणि पुढला दिवस त्यांनी त्यांच्यात्यांच्या कचेरीत कसा काय घालवला हेही तेच जाणोत ! माझं मन आपलं दिवसभर मला टोचत राहिलं...एखादी अणकुचीदार सुई...हृदयाला बोचत रहाते.

काल सकाळी घरातून खाली उतरले. दिसत होतं...आज गाडी धुतलेली नव्हती. "क्या हुआ ? गाडी धोया नही ?" बाजूच्या गाडीवर ओलं फडका फिरवणाऱ्या कृष्णाला मी विचारलं. कृष्णा. आमचा गाडीला, रोज 'वरवर' साफ करणारा. काम फारसं मनावर घ्यायचं नाही हे त्याचं जीवन तत्व. अगदी कामचुकार. थातुरमातुर काम करून टाकायचं आणि एक तारखेला मात्र बरोब्बर पगारासाठी दारात उभं राहायचं. पैश्याची अडचण कायम. आणि आमच्या अख्ख्या वसाहतीत मी एकटीच 'अंबानी' आहे ह्याची त्याला खात्री. एकदा रत्नागिरीवरून परतताना, रस्त्यात माणगावला घेतलेले खारे शेंगदाणे व पाण्याच्या तीन रिकाम्या बाटल्या, दहा दिवसांनी मला गाडीत सीटखाली सापडल्या. म्हणजे बोला ! फक्त मॅट्स काढून धुवायच्या व वरून गाडी पुसून घ्यायची की झालं आमच्या कृष्णाचं काम ! कामचोर!
"कल गाडी बाहर निकला नही ! इधरही था ! इसलिये आज नही धोया."
"गाडी इधर था...बाहर निकला नही... इससे तेरा क्या लेनादेना ? तू तेरा काम कर ना ! "
"नही...नजर चुकवत कृष्णा पुटपुटला. "वो आज मैं लेट आया..."
"हां...तो फिर, वो बोल ना ! तू लेट आया इसलिये गाडी धोया नही ! खालीफुकट गाडी पे क्यों डाल रहा है ! फालतू में !"
चुकी मान्य करायची नाही. तत्परतेने सोंगटी पुढे सरकवून द्यायची...कुठलाही आर्थिक स्तर असो...हे तंत्र जमून गेले की तग धरता येण्याची खात्री !
गाडी चालू करता, मंद आवाजात सुरु होणारी मराठी भावगीतं...सगळ्या प्रकारच्या वैतागावर माझा हा एक रामबाण उपाय.
...भेट तुझी माझी स्मरते...अरुण दाते.

आणि शेवटचा एक. रात्रीचे साडेदहा. शिवाजी पार्कसमोरील पेट्रोल पंप. आत शिरताच डाव्या हाताला हवा भरणे. टायरमध्ये हवा भरून मी पेट्रोल भरायला गाडी पुढे घेऊन आले आणि गाडीतून उतरले. स्लीपबुक व पेन हातात...त्यावर तारीख टाकत होते. ते नियमित भरून एकदा संपलं की पेट्रोल पंपाकडे सुपूर्द करावयाचे असते. त्याच्या बळावर आमच्या कचेरीतून पैसे वसूल करून घेणे ही त्यांची जबाबदारी. म्हणजेच महागड्या पेट्रोलचे पैसे ऑफिस देते ! तितक्यात कर्कश हॉर्नचा आवाज सुरु झाला. क्षणभरही न थांबता. मी मान वर करून बघितलं. एक दुचाकी. त्यावर एक १९/२० वर्षांचा मुलगा स्वार व त्याच वयाचा एक मुलगा खाली उभा. हिरवागार टीशर्ट, अर्धी चड्डी हा त्या बसलेल्या मुलाचा पेहेराव. त्याचाच हात हॉर्नवर चिकटून बसला होता बहुधा. शिवाजी पार्क थोडंफार अजून हलत होतं. परंतु, आसपासच्या इमारतीतील दिवे तसे मंदावलेले होते. दिवसभर थकलेले जीव हळूहळू झोपावयच्या तयारीत असावेत.
"काय झालं ?" मी माझ्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्याला विचारलं. "त्याला काय झालं ?"
"कुछ नही मॅडम ! उसको जल्दी पेट्रोल भरना है."
किर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र... हॉर्न चालूच....
"पर इतना हॉर्न ? भरेगाही ना कोई ना कोई..."
"मॅडम अब क्या बताऊँ ? ये एरिया में इन लडकोंने तंग करके रखा है !"
"कौन है ये लडके ?"
त्याची पाठ होती पार्ककडे. त्याने फक्त मान थोडी उजवीकडे वळवली व मागे गल्लीकडे हलकाच इशारा केला. किर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र... हॉर्न चालूच....अजून वातावरणाची ऐशी की तैशीच. आता मी धरून चालेन की माझ्या गाडीत पेट्रोल भरणारा माणूस उत्तर प्रदेशीय होता. मागे शिवाजी पार्कसमोर एक झेंडा रहातो. त्याचा रोख त्या झेंड्याकडे असेलही. परंतु, मला त्या क्षणाला कोणा उत्तर प्रदेशीय माणसाचा त्रास होत नव्हता, ना कोणा मनसे वा शिवसैनिकाचा त्रास होत होता. मला मुळातच एका अतिशय बेजबाबदार 'माणसा'चा त्रास होत होता. मग्रुरीने अति तीव्र आवाज करून आसपासच्या माणसांचा, वातावरणाचा शून्य विचार करणाऱ्या त्या मनोवृत्तीचा मला प्रचंड त्रास होत होता. तेथील असंख्य लोकांना त्यावेळी तो होत होता....हा कोणाचा मुलगा होता....काय माहित...तो कोणता झेंडा घेऊन होता काय माहित...तो काय शिकला होता कोण जाणे...परंतु, ज्याने कोणी हा गुंड घडवला होता मला 'त्याचा' तिरस्कार आला. हा असा जंगली घडवणाऱ्या पालकांचा तिरस्कार आला...ही अशी बेदरकार वृत्ती घडवणाऱ्या पुढाऱ्यांचा मला तिटकारा आला. एकूणच...डोक्यात गेला तो माझ्या.
"बॉस, काय झालं ?" मी पुढे जाऊन त्या मुलाला विचारलं.
"पेट्रोल ! कधीचे उभे आहोत आम्ही इथे !"
"पण तो माणूस रिकामा झाला की येईलच नाही का तुमच्याकडे ? आणि देईलच भरून पेट्रोल. न भरून सांगतो कुणाला ?"
"अरे ! थांबायला वेळ नाही आम्हांला !"
"ते कळलं आम्हां सर्वांना...इतका वेळ तुम्ही जो नॉन स्टॉप हॉर्न वाजवताय त्यावरून." माझ्याशी बोलण्याच्या नादात त्याचा हॉर्न बंद झाला होता.
"म काय तर ? किती वेळ थांबणार आम्ही !"
"म्हणजे तुम्ही जर असा इतका आवाज केला नसता तर तो आलाच नसता काय तुमच्याकडे ?"
"म्हणजे ?"
"नाही...म्हणजे जगाने तुमच्याकडे बघावं ह्याकरता हे इतकंच करू शकता काय तुम्ही ?"
"बाई...काय म्हणायचं तरी काय तुम्हांला ?"
"काही नाही...मला एकूणच तुमच्याकडे बघून हे कळलं की बाकी तुमच्या अंगात इतर काडीचंही कर्तृत्व नाही...आणि त्यामुळे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ही असली त्रासदायक, घृणास्पद कृती करण्यापलीकडे, तुम्ही तरी काय करू शकता...नाही का ? दया येतेय मला तुमची...."
माझ्या गाडीचे पेट्रोल भरून झाले होते...मी सही करून स्लीप पेट्रोल भरणाऱ्या माणसाकडे सुपूर्त केली. गाडीत जाऊन बसले व गाडी सुरु केली....
केतकीच्या बनात....सुमन कल्याणपूर.
तो मुलगा अधिक लक्ष देण्याच्या लायकीचा नव्हता. माझ्यासाठी.

कित्येक वर्षे हसतमुखाने मिरच्या कोथिंबीर विकणारी, स्वत:च्या श्रमांचे महत्त्व जाणणारी माझी मैत्रीण. आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटत रहावी अशी. वृत्तीने श्रीमंत. नागरिक क्रमांक एक.
कोणा कंत्राटदाराच्या पैसेखाऊ वृत्तीमुळे नकळत हातून अपराध घडल्याने, कोणाचे नाहक शिव्याशाप झेलणारी केविलवाणी मी. नागरिक क्रमांक दोन.
पैसे कमावण्यासाठी का होईना परंतु, हातात घेतलेले काम चांगलेच व्हावयास हवे...ह्या वृत्तीचा मागमूसही नसणारा कृष्णा. नागरिक क्रमांक तीन.
लहान वयातच, कोणाच्या जीवावर मगरूरी अंगात माजवून घेणारा, बिन नावाचा...माझ्या दारात मत मागावयास निदान उभा राहू नये. अनाचारी. नागरिक क्रमांक चार.

माणसे.
काही, असामान्य.
काही, केविलवाणी.
काही, बेरकी.
आणि...काही कलंक.

18 comments:

भानस said...

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकीच आपलीही प्रतिक्रिया... कधी वर कधी खाली... :)अ‍ॅक्शन आणि रिअ‍ॅक्शनचा अव्याहत चालणारा खेळ.

काही लोकं मात्र डोक्यातच जातात...

बाकी, त्या तिघांनी तुझी मनापासून मागितलेली माफी केवळ नाटकीपणा म्हणून घेतली असेल तर अजूनच... :(:(

Raindrop said...

garaj nastanna jenvha loka namra rahtaat ti loka ounah punah bhetavi ashi vaatataat.....

Shriraj said...

अनघा, खुप प्रामाणिकपणे लिहिलयस गं....

तो जो पंप आहे न. तिथे मी मागे ऑडिटसाठी गेलेलो. मला हा लेख वाचताना अचानक आठवलं...ती समोरची इमारत वगैरे

हेरंब said...

ह्म्म्म.. खरंच.. प्रत्येक व्यक्ती भिन्न, तिचे संस्कार, पार्श्वभूमी, सामाजिक पातळी सगळंच भिन्न !! त्यामुळे प्रत्येक व्यक्ती म्हणजे नवा अनुभवच !

तृप्ती said...

व्यक्ती तितक्या प्रकृती :)

अपर्णा said...

सगळ्या प्रकारच्या वैतागावर माझा हा एक रामबाण उपाय..:)

त्याबाबतीत आपलं तुपलं शेम हाय असं दिसतंय.मी पण गाणी ऐकते किंवा मनातल्या मनात तरी ती वाजत असतात...:D
बाकी व्यक्ती तितक्या प्रकृती...(हे उत्तर सामायिक असणार आहे तरी पण लिहितेय...)

रोहन... said...

तू चालताना असे कुठल्या गाडीने पाणी तुझ्या अंगावर उडवले असते तर तू काय म्हणाली असतील," अरे. आता खड्डा मध्ये आला त्यात त्याचा काय दोष." :) आणि हेच तू गाडी चालवताना झाले की तूच विचार करतेस, "अरेरे. नेमका खड्डा आला आणि.... "

'आतले आणि बाहेरचे' आठवला. १०० मध्ये २-३ लोक असे विचार करणारे, म्हणजे आतले आणि बाकी बाहेरचे. आतल्यांना शिव्या देणारे... :) तेंव्हा त्रास कोणाला होणार ते सांगायला नकोच. केविलवाणे बिचारे... :)

विनायक पंडित said...

१००% पटतं तुमचं म्हणणं! संवेदनशील माणसांना त्रास, अडचणी असं सगळं कायमच. का आपण इतके संवेदनशील रहातो असं वाटतं काही काही वेळा! पण संवेदना झुगारूनही देता येत नाहीत.वाढता मद्दडपणा कुठे नेणार आहे यांना आणि आपल्याला, समजत नाही.:(

Anagha said...

बहुतेक तरी तसंच झालं असेल गं भाग्यश्री... पण मग मी मनापासून मागितली ना माफी....मग द्यायचं सोडून ! नाही का ? :) :)

आभार गं...सगळ्या प्रकृती पकडता पकडता नेहेमीपेक्षा मोठीच झाली ही पोस्ट ! :p

Anagha said...

वंदू, अगदी खरं गं...आणि हल्ली जरा दिसून येत नाही ना म्हणून...मग ही अशी निखळ भावना दिसली की किती बरं वाटतं... हो ना ? :)

Anagha said...

ह्म्म्म :) आभार श्रीराज.

Anagha said...

आणि हेरंबा, त्या नव्या अनुभवातून आपण काय शिकणार ? कारण जुना अनुभव थोडाच कामी येणार नव्या व्यक्ती भेटल्या की ? ! तेव्हा धडे लक्षात ठेऊनबिऊन काहीही उपयोग नाही ! प्रत्येक वाटेवर वेगळंच काही व्यक्तिमत्व उभं ! :)

Anagha said...

तृप्ती, आभार गं ! :)
सगळ्या प्रकृती पकडता पकडता...भली मोठ्ठी झाली ना पोस्ट ? :(
:)

Anagha said...

अपर्णा, आहेत ना आपली गाणी म्हणजे एकदम रामबाण उपाय ? दे टाळी मग ! :D
आभार गं ! :)

Anagha said...

ह्म्म्म... आणि आपण तर काही करूच शकत नाही आपली केविलवाणी परिस्थिती बदलायला ! :(
आभार रे रोहणा. :)

Anagha said...

आणि आता तर आपलं फ्रस्ट्रेशन अधिकच वाढलंय विनायक...आपण लवकर संतापायला लागलोय. कारण बाहेरील परिस्थितीबाबत आपण हतबल झालोय ! :(

धन्यवाद...इतकी भलीमोठी पोस्ट वाचल्याबद्दल ! :):)

सौरभ said...

:D :D :D

नीरजा पटवर्धन said...

चुकी मान्य करायची नाही. तत्परतेने सोंगटी पुढे सरकवून द्यायची...कुठलाही आर्थिक स्तर असो...हे तंत्र जमून गेले की तग धरता येण्याची खात्री !<<<<
अगग! तमाम ऒफिसबॊयज, असिस्टंटस सगळे एका वाक्यात वर्णन करून सांगितलेस की.. :)

बाकी मी गाडीत असते तर तुझ्यासारखीच माफी मागितली असती आणि गाडीबाहेर असते तर गाडीवाल्याला शिव्या घातल्या असत्या.. मी फारशी सहृदय नाही ते जाऊदेतच.. :)

एकुणात निष्कारण हॊर्न वाजवत रहायचं. काहीही गरज, कारण नसताना आपल्याचकडे लक्ष वेधलं जाईल ते बघत रहायचं.. सगळीकडेच झालीये ही प्रवृत्ती सध्या. इतकं की आपण आपल्याकडे जेव्हा लक्ष वेधून घेत नाही तेव्हा आपण मूर्खच ठरावं अशी. :)