नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 12 July 2011

वाफारा

मरणप्राय वेदना. डोकेदुखी. मेंदूत एखादी बारीकशी गाठ झाल्याने ज्या वेदना होत असतील त्या वेदनांचे भान ठेवून इतकेच म्हणेन की माझ्या डोकेदुखीच्या वेदना देखील थोड्या अती होत्या. एखादी तान मंद स्वरात कानी पडावी आणि हलकेच चढत जाऊन अगदी तारस्वरात जाऊन पोचावी अशी काहीशी ती वेदना होती. डोक्यात कुठे तरी काहीतरी गडबड चालू होती व त्याचे बाह्य स्वरूप म्हणून त्या कळा. नाहीतर त्या अंतर्गत घडामोडींचे ज्ञान मला कुठून होणार ? घसरत पलंगाखाली गेलेली एक सपाता काढण्यासाठी वाकणे देखील अशक्यप्राय. नुसती मान खाली केली तर सर्दी नसताना देखील सर्रकन नाकातून पाण्याची धार.

स्वत:साठी डॉक्टरांकडे जाणे हे एक स्वयंपाकघरात जाऊन
एकटीसाठी साग्रसंगीत जेवण करण्याइतकेच कठीण काम. कधीकाळी गेले होते त्यावेळी सायनसचे निदान केले होते व त्यानुसार औषधे लिहून दिली गेली होती. कपाळावरची कुठलीशी शीर हे असे पाणी साठवून घेत होती व मी वाकले की नळ सोडावा अशी धार सुटत होती. सर्दीबिर्दी थोडी देखील नाही.

औषधे नेहेमीच कोणी प्रेमाने दिली की त्या प्रेमाच्या धाकाने घेतली जातात. स्वत: उठून नियमित औषधे घेणे म्हणजे आपण जगण्याचा उगा हट्ट करतोय...असं काहीसं वाटू लागतं. अर्थात आपण जर नीट औषधे घेतली नाहीत तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना नसता त्रास होईल ह्याची एक बोच मनी असतेच. पण ती बोच नेहेमीच 'सेल्फ गिल्ट' ह्यात मोडते. अशा ह्या 'आत्म बोचणी' चा एक गगनचुंबी थरच माझ्या डोक्यात वास्तव्याला आहे. आणि ही बोच काही नियमित औषधे घेण्यास तितकीशी प्रवृत्त करत नाही.

आणि मग ती विचारांची घोडदौड...दिशाहीन.
गेल्याच महिन्यात सख्खी मैत्रीण मेंदूतील एका अशाच गाठीचं निमित्त होऊन सरळ निघूनच गेली आहे. मग काय ? कोण आवरणार त्या मोकाट घोड्याला ?
...आपण आता मेलो तर नक्की कोणाचं काय नुकसान होईल...आपल्या माणसांना आपण दु:खाची खाईत वगैरे ढकलू हे ठीक आहे...त्यावर काळ हे थोड्याबहुत प्रमाणात उत्तर असते...परंतु, आर्थिक खाईत तर आपण आपल्या माणसांना ढकलणार नाही ना...हे अधिक महत्त्वाचे. आपण आपले मृत्यूपत्र नेमके बनवले आहे की नाही...आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत की नाही वगैरे वगैरे...दुखऱ्या मेंदूला अगदी किसणीवर घेतल्यासारखे...खरवडून बारीक कीस.

"मला जरा पाणी गरम करून देतेस का ? मी वाफारा घेते." दृश्य स्वरूपात नसलेल्या सर्दीला देखील वाफारा घेऊन बरे वाटेल अशी आपली एक आशा. लेकीने गरमगरम पाणी आणून दिलं. आणि एक पंचा. मी पंच्यात डोकं खुपसलं.

मंचावर बसलेल्या भांड्यातील पाण्यात
काही क्षण तरंग निर्माण होत होते. मग ते हलकेच स्थिर झाले. त्या ऊन पाण्यातून सगळी कोंदटलेली उष्णता हळुवार बाहेर पडू लागली. चेहेऱ्याला स्पर्श करू लागली. मी डोळे हलकेच मिटले. त्या दाटलेल्या उष्ण भावनांचा तो कोमट स्पर्श...दुखऱ्या कपाळाला झाला. आणि नस न नस मोकळी होऊ लागली...कोण ती कुठली एक सुजरी नस..त्या उबदार जिवंत ओंजारगोंजारण्याने सुखावली...मोकळी मोकळी झाली...हळुवार, शांत झाली.

हे इतकंच तर हवं असतं... त्या दुखऱ्या जाणीवेला.

15 comments:

अपर्णा said...

स्वत:साठी डॉक्टरांकडे जाणे हे एक स्वयंपाकघरात जाऊन एकटीसाठी साग्रसंगीत जेवण करण्याइतकेच कठीण काम ...++++++

आता बर वाटतय न ग????

Raindrop said...

u r right...warmth always has that effect....of easing out pain...wonder why people still choose to be cold to each other. here..a warm hug...get better soon :)

विनायक पंडित said...

अनघा! अप्रतिम! काय बोलू? लवकर बरय़ा व्हा! @raindrop I totally agree with what u have said!

Anagha said...

अपर्णा, अगं, वाफारा घेतला आणि काय बाबा एक जादूच झाली ! हे जर इतकं सोप्पं होतं तर मी गेले काही महिने, सलग दहादहा पंधरापंधरा दिवस डोकेदुखी का सहन करत होते असा आता प्रश्र्न पडलाय !
आभार गं ! :)

Anagha said...

Thanks a ton Vandu ! Am perfectly all right now !:)

Anagha said...

:) विनायक, झाले मी लगेच बरी ! खूप खूप आभार! :)

Anonymous said...

self guilt आणि नंतर ते शेवटचं वाक्य...

खरंतर तुम्ही वाफेनं नाही... लेकीच्या प्रेमाने जास्त बर्‍या झालात! नाही का? :)

BinaryBandya™ said...

इतकंच तर हवं असतं... त्या दुखऱ्या जाणीवेला.

सगळेच असेच असतात का ?
स्वतःला काही झाले की दवाखान्यात न जाता चाल ढकल करत रहायची ..
पण जवळचा कुणी आजारी पडला तर त्याला कधी एखादा दवाखान्यात पळवतो असे होऊन जाते ..

भानस said...

बरी आहेस ना गं? कधी कधी मन छोट्याश्या गोष्टीवरून जे मोकाट सुटतं ते पार टोकाचे विचार करकरून मेंदूचे भुसकट करून टाकतं... उगाचच!

दुखणी अंगावर काढायची सवय अमंळ जास्तीच भिनलीये आपल्यात... :(

काळजी घे बयो!

सौरभ said...

नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांमधे नळ बसवले तर माणुस कसा दिसेल??? प्रयत्न करुन बघायला हरकत नाही... माझ्यामते एक "Subject" प्रयोग करुन बघण्यास योग्य आहे... :P ;) :D

Shriraj said...

तू पण ना... असं काही बोलतेस की मग आम्हाला ही सायनस झाल्यासारखा वाटतो... जणू काही डोक्यातली कुठलीतरी शीर भावनांनी कुंद झालेय आणि आम्ही काहीच करू शकत नाहीये. यावर औषध एकच, ते म्हणजे तू ठणठणीत असणे. त्यामुळे काळजी घे; म्हणजे आम्हालाही बरं वाटेल :)

का कुणास ठाऊक मला तुझा पहिला पोस्ट आठवला...

"I don't know whether am thinking or am sinking!"

Anagha said...

खरं आहे आल्हाद. :)
आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

खरं आहे बंड्या...असं होतं खरं.
...आणि त्यातून आम्ही दोघी एकदम आजारी पडलो की झालंच मग ! :(

Anagha said...

मोकाट डोकं...मोकाट कुत्र्यागत ! :)

बरी आहे गं भाग्यश्री मी आता. आभार ! :)

Anagha said...

श्रीराज ! खूप खूप आभार ! बरी आहे रे मी आता ! :)