बाहेरील उघड्या जगात मनीषला त्यातल्यात्यात बरी नोकरी लागल्यावर सर्वप्रथम लीनाशी लग्न करणे भाग होते. दोघांना हातातहात घालून शहरात फिरून आठ वर्षे उलटली होती. तिचे आईवडील काही अजून धीर धरणार नव्हते. तो कमावत असलेल्या चार हजारात घर चालवणे हे प्रेमाने भारलेल्या लीनाच्या विश्वात काही कठीण नव्हते. ना घर ना दार अशा स्थितीत दोघांनी लग्न केले. मग बोरिवलीमध्ये भाड्याने मिळेल त्या घरात मजल दर मजल करीत त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य सुरु केले. माहेरी तशी खात्यापित्या घरातील लीना व इथे कामाला बाई देखील नसलेले घर अगदी जबाबदारीने सांभाळणारी लीना. चित्र तसे दृष्ट लागण्यासारखेच होते. पहाटे उठून मनिषसाठी चविष्ट नाश्त्याची लीनाची धडपड, त्याचे कपडे धुणे, कपड्यांना रोज इस्त्री करून ठेवणे, घरचं केर लादी करून धावतपळत ती लोकल पकडणे, कचेरीत वेळेवर पोचणे आणि परतीच्या रस्त्यावर मैत्रिणींना विचारून काहीतरी रोज नवनवे पदार्थ मनिषसाठी करणे. एकूण मनीषचा संसार छान चालू झाला होता. लीनाचा संसार छान होता की नाही हा प्रश्र्न तिच्या बुद्धीक्षमतेच्या बाहेरचाच होता. कारण लीना प्रेमात होती. व प्रेम आंधळे असते. प्रेम बुद्धिमान असते असे कोणी म्हटलेले ऐकिवात तरी नाही.
मनीषच्या ह्या घरात एक दिवस शेखरने शिरकाव केला. अधूनमधून आठवड्यातून एकदा असे करीत करीत कधी ते रोजचेच झाले हे ना त्या मनीषला कळले ना लीनाला. ती फक्त चार चपात्या अधिक करू लागली. व एक वाटी भात अधिक घालू लागली. त्यांचा संसार नवनवलाईचा. कोवळ्या वयात सुरु केलेला. पण म्हणून शेखर हा असा आपल्याकडेच का रहातो आहे वा मग आपल्याला आता एकांत मिळत नाही अशी एकही प्रेमळ म्हणा वा बायकी कुरबूर लीनाने कधी नवऱ्याच्या कानाशी केली नाही. उलट मनीषबरोबर लीनादेखील, शेखरच्या त्या तथाकथित प्रेमभंगात त्याच्या पाठीमागे ठाम उभी राहिली. शेखर रात्र रात्र अश्रु ढाळे व लीना त्याचे सांत्वन करी. त्याच्या आवडीनिवडी जपून त्याला खाऊपिऊ घाली. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्याला हातावर मीठ लागते हेही तिने लक्षात ठेवले होते. ते म्हणे त्याच्या तोंडाला येणाऱ्या कुबट वासावरील औषध होते. दिवस संपत आला की आज काय खावेसे वाटत आहे हे शेखर तिला तिच्या कचेरीत फोन करून सांगुन ठेवी. मग मुंबई रेल्वेच्या धक्काबुक्कीतून शिल्लक राहून ती अगदी प्रेमाने त्याच्या आवडीचे जेवण तयार ठेवी. असे एक दोन वर्षे चालले. लीनाने अगदी आपला मोठा भाऊ जसा जपावा तसाच त्याला जपला. अगदी त्या पहिलीच्या घरी जाऊन, तिला भेटून, तिला राजी करण्याचा देखील तिने एक प्रयत्न केला. म्हणजे शेखरने व मनीषने अगदी तिला पढवून पहिलीकडे पाठवून दिले होते. लीना शेखरच्या बहिणीला घेऊन गेली. दोघी तिच्याशी प्रेमाने बोलल्या. लीनाने दिराची व बहिणीने भावाची अवस्था अगदी डोळ्यात अश्रू आणून सांगितली.
"अगं, नाही गं जगू शकत तुझ्याशिवाय शेखर." शेखरचा रडका चेहेरा डोळ्यांसमोर आणून लीना कळवळून तिला म्हणाली.
शेखरच्या सख्ख्या बहिणीपेक्षा तिनेच तर स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं होतं त्याचं दु:ख.
परंतु, आपल्या जन्मदात्यांना दुखावून ह्याच्याशी लग्न करण्याची तिची तयारी नव्हती. तिचा ठाम नकार घेऊन दोघी घरी परतल्या. लीना आपली पुन्हा आपल्या ह्या दिराला जपू लागली. त्याला संगीताची जाण. लीनाला आवड. मग दोघे रात्र रात्र बसून गाणी निवडत, त्याच्या कसेटी करून घेत. मनीष लीनाच्या नवीन संसारातील पहिली खरेदी म्हणून आणलेल्या टेपरेकॉर्डवर दोघे मग गाणी ऐकत बसत. कधी आशा मेहेंदी हसन ह्यांच्या गझला तर कधी मादक मुबारक बेगम.
शेखरचा हा ग्रीष्म काही काळ चालू राहिला. मात्र ह्या अतीव दु:खाच्या कालावधीत दुसरीशी असलेले शरीरसंबंध चालूच राहिल्याने तुटून पडलेले ते ह्रदय पुन्हा बिनतोड जोडण्यास मदत झाली. मन व शरीर हे दोन वेगवेगळे जिन्नस आहेत. त्यांचा एकमेकांशी काडीचा संबंध नाही हा त्या दोघांचाही पक्का विचार. त्याची जगण्याची पद्धति व विचार हे आपल्या विचारांशी मिळतेजुळते आहेत ह्याची जाणीव ठेऊन, आपल्या जिवलग सखीशी असलेल्या त्याच्या शरीरिक संबंधांची माहिती असून देखिल तिने त्याला धरून ठेवले.
आपल्या कथेतील ह्या चौथ्या व्यक्तिमत्वाचे नाव आहे गौरी. गौरी पाच फुट. सावळी. काळे तपकिरी दाट केस. खांद्यावर मोकळे सोडले तर अगदी समुद्राच्या बेभान लाटांप्रमाणे. स्वभाव काहीसा स्वार्थी. पुरुषांना भाळवण्याची एक मादकता शरीरात. गौरी व शेखरचे लग्न झाले. एकमेकांना साजेसे दोन फासे एकत्र पडले. सहा. सहा.
शेखर गौरी व मनीष लीना आपापले संसार चालवू लागले. मनीष लीना बोरिवलीत. शेखर गौरी गोरेगावात. संसारात कधी तिखट मीठ गोड आंबट तर कधी अगदी कडू. संसारच तो. चौघे एकत्र आले की शेखर मनीषच्या गप्पा रंगत. दारु सोबत. गौरी लीना ह्यांचे कधी फारसे सूत जमले नाही. परंतु, दोघींचे नवरे जीवाभावाचे मित्र त्यामुळे ह्या बायकांचे जमतेय वा नाही ह्याला तसे फारसे महत्व नव्हते. आणि त्यातूनही दारूमुळे होणारा प्रचंड मानसिक त्रास लीनाने कॉलेजमध्येच मनीषच्या कानावर वारंवार घातला होता. परंतु, तो तिचा त्रास हा दुर्लक्ष करण्याइतपत मनीषला वाटत होता. बायका उगाच राईचा पर्वत करतात असे काहीसे त्याचे म्हणणे.
मधल्या काळात मनीष लीनाच्या संसारात एक फूल जन्माला आले. फुलाचे नाव प्राजक्ता. लीनाने ही नवीन जबाबदारी मन लावून पोटाशी घेतली. नोकरी सोडून ती घरीच प्राजक्ताचा सांभाळ करू लागली. प्राजक्ताचे बोबडे बोल आणि धडपड. मान धरणे ह्यापासून ती अगदी पार स्वत:च्या पायावर उभं रहाण्यापर्यंत. अध्येमध्ये आजारपणे. मुंबईपासून दूर घर व मनीषची सर्वस्व वाहून टाकावे लागणारी नोकरी. दिवसाचे २४ तास कमी. मग कधी त्याचे घरी येणे न येणे. उशिरा येणे. घर, प्राजक्ता व मनीष हे एव्हढेच लीनाचे जग. त्यातील घर व प्राजक्ता ह्यांची तिला प्रत्येक क्षणी सोबत. व मनीषची मोजून चार क्षण. घर चालवणे व ह्या स्पर्धात्मक जगात टिकाव लावून धरणे हे कठीणच.
असो. ही कथा ना मनीष लीनाची. ना शेखर गौरीची. ती तर लीना शेखरची.
गोरेगावात शेखर गौरीकडे पुत्ररत्न जन्मास आले. राहुल.
लीनाचं फूल तीन वर्षांचं झालं. मनीष लीना धकाधकीचं दूरचं घर सोडून मुंबईत आले. कर्ज काढून. लीनाने पुन्हा नोकरी सुरु केली. अर्ध्या दिवसाची. म्हणजे सूर्याचे सरळसरळ दोन तुकड्यात विभाजन. प्राजक्ताला सांभाळणे व नोकरी जपणे. मनीषने रात्रंदिवस मेहेनत सुरु केली. कर्जाची रक्कम हळूहळू खाली उतरू लागली.
इथे मनीष लीनाकडून स्फूर्ती घेऊन गौरी शेखर ह्यांनी देखील गोरेगावहून बूड हलवले. मुंबईत स्थाईक झाले. आता ह्या चौघांतील तीनजण नोकरी करणारे. मनीष, लीना व शेखर.
10 comments:
"लीनाने पुन्हा नोकरी सुरु केली. अर्ध्या दिवसाची. म्हणजे सूर्याचे सरळसरळ दोन तुकड्यात विभाजन."
.
.
.
किती समर्पक वर्णन लीनाच्या त्या सगळ्या ओढाताणीचे...!!
मलाही "म्हणजे सूर्याचे सरळसरळ दोन तुकड्यात विभाजन" हे खुपच आवडलं.
Please post other parts ASAP
farach utsukta lagley
आभार राजीव. :)
हेरंबा, धन्यवाद. :)
निशा, लिहितेय पटापट...नीट लिहायला हवं ना...म्हणून जरा वेळ लागतोय ! मोजून चार व्यक्तिमत्वे लिहायचीयत ना ! :)
आभार हं प्रतिक्रियेबद्दल. :)
अधीर झालोय...पुढचा भाग वाचायला घेतो....
श्रीराज, :)
प्रेमात पडलेल्या ओढीने संसार करण्याची आस ठेवणार्या अनेक मुलींची कुतरओढीचे प्रतिक... लीना.
खरेच, मुली इतक्या का वाहून घेतात. कदाचित युगानुयुगे रोमारोमात कुटकुटके भरलेले कुठलेसे रसायन हे...
गती पकडलीस अनघा. :)
खरंय...प्रेमात पडून लग्न केलं की काही अपेक्षा मनात धरून वा गृहीत धरून ते लग्न केलेलं असतं...
आणि त्यातून त्याग करायला निघतात व नकळत स्वत:साठी एक खड्डा खणत जातात...
धन्यवाद गं भाग्यश्री... :)
Post a Comment