नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 31 March 2011

बोलके आत्मे...

"Let's go for a cup of coffee!"
"Ya...why not?"
कार्यालातील कर्मचाऱ्यांची संख्या अवाढव्य असल्याकारणाने इथल्या काही लोकांची नावे देखील माहित नसतात. पण ह्या आमंत्रणामागील नाव माहित होते. फक्त कामाचे ग्रुप्स वेगवेगळे असल्याकारणाने हाय हॅलो पलीकडे कधी बोलण्याचा प्रसंग नव्हता आला. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीची ही गोष्ट. हे आमंत्रण अजून एकदा दिले गेल्यावर मात्र एक दिवस आम्ही निघालो. कार्यालयाच्या आवारातच खाली CCD आहे. ज्याची बरेचदा आम्हाला मदतच होते. गुफ्तगू करता येते...कार्यालयातील रोजच्या राजकारणाची तापलेली चर्चा देखील तिथेच होते.

मोठमोठ्या काचांच्या खिडक्या. आणि त्या खिडक्यांना लागून असलेल्या कोचावर जागा मिळणे म्हणजे भारीच. स्थानापन्न झालो. समोरासमोर नाही तर अगदी बाजूबाजूला. का बरं? कोण जाणे?
"I lost my father some years back. It was a shock for me." मोनाने संभाषणाला सुरुवात केली.
शांतता. ह्यावर काहीही बोलणे म्हणजे भावनांचा अपमान हे नुकत्याच घडलेल्या घटनेने शिकवलेले होते.
"I went through depression then..."
एकुलत्या एक मोनाचे वडील काही वर्षांपूर्वी गेलेले होते. अचानक. त्यानंतर त्या धक्यातून आईला सावरताना मोनाला स्वत:ला सावरणे फार कठीण गेले. ती एक आर्ट डिरेक्टर. एका कामाच्या संदर्भात तिची एका महिलेशी ओळख झाली. महिला एक पुस्तक लिहित होती. त्याचे मुखपृष्ठ मोनाने करावे ही तिची इच्छा. मोनाने ते काम घेतले...व अधिकाधिक ओळखीतून मोनाला त्या महिलेत भावनिक आसरा मिळाला. त्यांचा पुत्र अकाली मृत्यू पावला होता. आणि त्यातून बाहेर पडतापडता हळूहळू त्यांना जाणवले ते असे....त्यांचा पुत्र त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होता. रोज ठराविक वेळी...ठराविक भाषेत. त्या अनुभवावर आधारित होते ते पुस्तक. जे मोना सजवत होती. वाटतं...मोना त्या बाईना मदत करत नव्हती तर त्या बाई मोनाला मदत करत होत्या. तिच्या गत वडिलांशी संवाद साधावयास. अथक प्रयत्नानंतर मोनाने ते कौशल्य स्वत: आत्मसात केले. आणि, मोनाचे वडील, त्यांचा आत्मा तिच्याशी बोलू लागला.
कॉफी आली.
संवादाचा रोख मृत्यूशी होता. ज्याने नुकताच माझ्या घराला स्पर्श केला होता. तिचे वडील काही वर्षांपूर्वी गेले होते. माझा नवरा एका महिन्यापूर्वी गेलेला होता. ठीक.
"Then?"
मोनाने तिच्या पर्समधून एक छोटी वही काढली. उघडली. माझ्यासमोर धरली.
"You won't understand the language." जिवंत माणसांची भाषा समजून घेताघेता नाकी दम. तिने उघडलेल्या वहीच्या पानावर लेखणीने मारलेले फक्त फराटे होते.
"But I understand. When my father talks to me..I start scribbling on the paper..."
"Ya? Good."
"Anagha, I want to tell you something."
"That I have understood by now. Tell." दगड. मन दगड.
"That day I was meditating and I sensed that something unusual was happening....souls come..they talk to me...they give me messages..and they expect me to tell their dear ones...that day Anagha, your husband came...he spoke to me...."
आत्मा झाला तरी नवऱ्याचा...महिना नाही झाला तर...तो असा येऊन परक्या बाईशी गप्पा मारायला लागला तर काय मोठं सुंदर वाटणार होतं?
"Ya? Good. So what did he tell you?"
"I have typed it in Word and have got a print out for you....he is very sorry Anagha...he is very sorry that he left you like this ...half way in the journey..."
त्याचं स्टेशन आलं...तो उतरून गेला. फक्त मला माहित नव्हतं की ते त्याचं स्टेशन होतं. त्याला नक्की माहित होतं. Simple.
दगड. मन दगड.
"Give me the paper. I will read it later."
अजून एकदा. अजून एकदा तिचं मेल आलं. नीट त्या आत्म्याशी केल्या गेलेल्या संवादाचा अभ्यास केला. माझ्या नवऱ्याने तिला दिलेल्या निरोपाचा मी थोडा अभ्यास केला. त्यात काही विशेष होतं? नव्हतं. एखादा अकाली गेलेला नवरा in general आपल्या बायकोला जे सांगेल तसलंच काहीसं ते होतं. जे काही आम्हां फक्त दोघांना किंवा आम्हां तिघांच्या छोट्याश्या कुटुंबालाच माहित असेल..असे त्यात काहीच नव्हते...जेणेकरून माझा ह्या आत्म्याशी होणाऱ्या संवादावर विश्वास बसेल. बसला? नाही. मला ह्या सर्व प्रकारावर विश्वास ठेवणे अशक्य वाटले. त्यात genuine असे काही नाही वाटले. तिने तिच्या दु:खावर उत्तर म्हणून हा वडिलांशी संवाद करण्याचा मार्ग शोधला असावा. माझ्या दु:खावर हे उत्तर होऊ शकत नाही.
मग तिनेही माझ्या नवऱ्याशी वेळीअवेळी गप्पा मारणे थांबवले. CCD तील आम्हीं एकत्र घेतलेली ती पहिली आणि शेवटची कॉफी. तिच्याकडून आलेले ते शेवटचे मेल.

मोना. इथे एक ग्रुप हेड. तिच्या हाताखालील माणसे...सर्व माझे जवळचे मित्र. Work front वर...सर्वांचे आत्मे दु:खी!
ह्यातच सर्व आलं!
:)

Wednesday, 30 March 2011

माझे घर...गुराखी कोण?

तशी गोष्ट जुनीच आहे.
दुचाकी वाहनावर डाव्या हाताने पुढे पुढे करत होते त्यावेळची.
दुसऱ्या दिवशी कसलासा सण होता. पिवळ्याधमक झेंडूच्या चिंचपेटीने प्रवेशद्वाराला नाही नटवलं तर तो सण कसला. म्हणून दादर स्थानकाच्या फुलबाजाराच्या दिशेने निघाले होते. कबुतरखान्यावरून सरळ गेलं की स्थानक आलंच. तिथे बाजूला दुचाकी लावावी आणि त्या फुलांच्या सुवासिक दुनियेत शिरावं असा विचार. गल्लीच्या तोंडाशी पोचले तर दिसत होतं...गल्ली सोन्याने मढली होती...झंडूच झंडू. दुचाकी म्हणजे काही चार चाकी नव्हे. त्यात काय डावी उजवी करत पोचेन मी दुकानापर्यंत.

"ए बाई! कुठे निघालीस?"
गल्लीच्या तोंडाशीच एक गुटगुटीत प्रश्र्न उभा होता. बाई रस्त्यावर तोरण विकत घेत होत्या. चष्मा नाकावर थोडा खाली घसरलेला, वय अदमासे ४५. मध्यमवर्गीय. माझ्यासारख्याच.
"मला पण तोरण घ्यायचंय!"
"मग घे की! पण ती स्कूटर हाकत कुठे निघालीस?"
"ही गल्ली काही 'नो एन्ट्री' ची नव्हे!"
"तर तर? मग काय झालं? गर्दी दिसत नाही का?"
"पण मला वाटतंय की ही गर्दी उगाच रस्त्यावर ह्या उभ्या असलेल्या फेरीवाल्यांमुळे झालेली आहे!"
फेरीवाले हा शब्द ऐकून बरेच कान टवकारलेले जाणवले. म्हणजे कधी राणीच्या बागेत गेलात तर दिसत नाही का, आपली चाहूल लागून तेथील प्राणी कसे कान टवकारून आपली दखल घेतात...तसंच काहीसं. फक्त इथले प्राणी मोकाट होते...कधीही हिंस्त्र होऊ शकणारे.
"बाईसाहेब, पण तुम्हांला असं नाही का वाटत की थोडंच पुढे गेलात तर आहेत ना छानपैकी दुकाने थाटलेली. का रस्त्यावरून घेताय फुलं? त्यात त्या दुकानवाल्यांचं देखील नुकसानच नाही का? आणि तुमच्यामुळेच तर रस्त्यावर नाहक गर्दी होत नाहीये का?"
"लागली शहाणपण शिकवायला!"
"एsss बाई! चल निघ इथून!" फेरीवाले आणि त्यांची एकजूट. ग्राहकांची एक नागरिक म्हणून एकजूट? शून्य.
स्वत:ला व रस्त्यावरील पादचाऱ्यांना सांभाळत दुचाकी गल्लीत घातली. शांतपणे. टोकाला जाऊन दुकानातून मस्त टवटवीत तोरण घेतलं आणि परतले.

दोन एक वर्षांपूर्वी. एमबीए झालेली एक मैत्रीण. विषय मुंबईतील फेरीवाल्यांचा. सुळसुळाट व त्यांच्यामुळे होणारा त्रास.
"आपणच नाही घेतलं पाहिजे गं त्यांच्याकडून सामान! आपल्याला सगळ्याचीच घाई. आपला वेळ वाचवायला आपण त्यांच्याकडून माल घेतो. आणि त्याचाच ते फायदा घेतात. आणि म्हणून तर आता त्यांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे."
माझं घोडं...मी दामटवलं.
"अरे! वेळ कोणाला आहे गं! पटकन सामान मिळून जातं! ही दुकानं किती दूर असतात!"
"एक भाजीवाला आमच्या घरी भाजी घेऊन येतो! आम्ही घेतो त्याच्याकडून!" चर्चेत भाग घेणारी माझी दुसरी सखी.
"अगं, पण सिटीलाइटचा बाजार तुमच्या हाकेच्या अंतरावर!"
"तर काय झालं?"
"म्हणजे आपणच दोषी नाही का ह्या फेरीवाल्यांच्या त्रासाला?"
"अरेच्चा! पण महानगरपालिकेची जबाबदारी नाही का त्यांना हटवायची? ते ह्यांच्याकडून हप्ता खातात. आणि म्हणून हे आता असे पसरलेत!"
"अगं बाई! पण साधं सरळ नाहीये का? तुम्ही मुळी घेऊच नका ना त्यांच्याकडून सामान! म्हणजे ह्याला आळा नाही का बसणार? जर त्यांचा माल खपलाच नाही, त्यांना ह्यातून पैसा मिळालाच नाही तर त्यांना इथून निघून जाण्यापलीकडे दुसरा काही पर्याय उरेल काय?"

वाद...विवाद...आणि डोक्याला शॉट!

माझ्या घरात कोणी घुसतो...त्याची गरज? पैसा. माझ्याकडे आहे? आहे. माझ्याकडे वेळ नाही! मी त्याचा माल उचलायला मदत करावी...मग त्याने हातपाय पसरवावेत! माझ्या घरात कधीकाळी कोपऱ्यात पडलेलं हे जनावर. आता त्याने अजस्त्र हातपाय पसरवावेत. जसा एखादा अजगर. आणि मग माझी उलटी बोंबाबोंब. मला पडलेला विसर....ह्याचे आगतस्वागत तर मीच नाही का केलेले?

वैताग आहे यार! माझी जबाबदारी कशातच नाही! माझेच घर..माझेच गाव...पण त्याचे रक्षण करायची जबाबदारी माझी नाहीच!
परवा एक बातमी होती....'Stations to be no-hawker zones. Pedestrian-friendly. The BMC plans to start drive against encrochments at Dadar, Kurla and Andheri stations.

Pedestrian-friendly?
Pedestrians ना विचारा एकदा! ते किती ह्या hawkersच्या friend's list मध्ये आहेत!

ह्या पादाचाऱ्याला त्रासाची कटकट करता येते...परंतु स्वत: जबाबदारीने वागण्याची तयारी नाही!

माझे घर?
...BMC ने सांभाळावे यार!
प्लीज!

Sunday, 27 March 2011

सं...वाद!

असा एखादा दिवस येतो न की तो काही ऐकतच नाही. म्हणजे, तू ठरवच! मग बघ मी काय करतो ते!...असं काहीसं डोक्यात घेऊन तो उजाडतो. डोक्यात काही वैर घेऊनच अवतरावा जसा.
पडदे पाडलेले असले की अंधार आणि उजेड ह्याचा काही थांगपत्ता नाही लागत. परंतु, डोळ्यांनी आपलंच एक घड्याळ लावून घेतले असते. सहा म्हणजे सहा. एकाही वाराचे लाड नाहीत!

कधी नव्हे ते अगदी लेकीने देखील लवकर डोळे उघडावेत आणि बाजारात बरोबर येण्याची इच्छा दर्शवावी म्हणजे अगदी दुधात साखर.
"चल! पटकन जाऊन येऊ! नऊ वाजेपर्यंत पटकन येऊ हा! बघायचाय ना आपल्याला टीव्हीवरचा कार्यक्रम?"
आज मॅडम जेवण करणार होत्या. इटालियन.
सिटीलाईट मार्केटमध्ये रविवारच्या दिवशी जाणे म्हणजे अगदी आनंदाची गोष्ट. अख्खा बाजार चकाकता. चमचम चमचम. इथून तिथून हाळी. गुटगुटीत, ह्या माझ्या कोळीणी. सख्या!
"ताई! ये ग!"
"अगं, बघतेस ना! आज लेक आलीय माझी! आज मटण खायचंय बाईंना! आणि त्याच करणार आहेत!"
"हो का? अरे व्वा! लेक तुझी जेवण करायला लागली की गं!"
"मग काय तर!"
गेलो कित्येक वर्षांच्या प्रसाद काकांकडे. चोखंदळ बाबांनी निवडून काढलेला आमचा मटणवाला! उगाच नाहीत्या गोष्टीत चिंता नाही. मटण ताजं मिळणार...कित्येक वर्षात जून मटण नाहीच घेतलेलं, एका विश्वासाच्या जोरावर.

लगबगीने घरी आलो. नऊ वाजायच्या आत पोचायचे म्हणून. 'स्टार माझा' वरचा बक्षीस समारंभ बघण्यासाठीची घाई. इमारतीत पाऊल टाकलं. नेहेमीसारखी इमारत नव्हती. अंधारलेली. का बरं?
"असं सगळं अंधारल्यासारखं का वाटतंय?"
"वीज गेलीय वाटतं!"
आता दादरमध्ये अशी तशी वीज नाही जात. पण आज गेली. नऊ वाजता गेली आणि साडे नऊच्या आसपास आली.
मग? नाही बघितला माझा बक्षीस समारंभ!
ठीक. स्वयंपाकाला लागावं.

"तुझी नव्हती का इच्छा की मी माझा बक्षीस समारंभ बघावा?"
"असं कुठे म्हटलं मी?"
"म्हटलं नाहीस. करून दाखवलस."
"अरे! तू पण ना! फालतू हा काहीतरी!"
"अख्ख्या दादरला कशाला त्रास द्यायचा त्याच्यासाठी? फक्त आमचा टीव्ही बंद पाडला असतास तरी काम साधून गेलं असतं की तुझं!"
"अगं माझे आई! मी काही नाही केलं!"
"तू ठरवल्याशिवाय काही होतं का? तुला काय करायचं ते कर तू! मी आता तुझ्याशी वाद घालायचाच बंद केलाय! साधीच गोष्ट मनात होती. पण तेही तुला बघवलं नाही ह्यातच सर्व आलं."
"आईशप्पत! तू पण ना!"

वेडाबागडा माझा देव माझ्याशी माझ्याच भाषेत बोलतो!

"आई, आपण ना मस्त वेगळा ब्रेड आणूया! म्हणजे गार्लिक किंवा असाच काहीतरी! ह्या इटालियन डिश बरोबर मस्त लागेल!"
"चालेल! चल आणूया!"
शिवाजी पार्क. ओव्हन फ्रेश. दोन मिनिटांच्या अंतरावर.
बेकरीत दोन मिनिटांचच तर काम.
"तू जाऊन आणतेस का"
"नको! तू पण चल! मजा येईल आपल्याला दोघी दोघींना!"
डाव्या हाताला गाडी लावली. गेलो दोघी दोघी. गार्लिक ब्रेड, हर्ब रोल आणि साधा पाव.
पाचव्या मिनिटाला बाहेर. बाहेर दोनतीन बायका. आरडा आणि ओरडा!
"तिथे लावली होती का गाडी तुम्हीं?"
"माहीम चौकीत जा आता!"
गेलो.
३००रुपये दंड. ३७५ ला पाव पडला.
जेवणातला आनंद काही कमी नाही झाला!

"मी माझा आनंद जर तुझ्यावर सोपवला ना तर तो चुलीत घालशील तू!"
"झालं पुन्हा तुझं सुरु?!"
"पण मला एक कळत नाहीये! माझं स्वगत तू कशाला ऐकत बसतोस?! आणि त्यावर उलट कशाला बोलतोस?!"
"च्यायला! तू माझ्याशी बोलत असतेस ना पण?"
"आणि तुला सगळं ऐकू येत काय? मग इतक्यांदा इतकी साकडं घातली! ती नाही कधी तुला ऐकू आली? ही तुझी आंधळ्या बहिऱ्याची सोंगं ना, थांबव आता!"

"आई! कोणाशी बोलतेयस तू?"
"मी कुठे काय बोलले?!"
"अगं पण मग मान कशाला उडवलीस हवेत?"
"आता गप्प हा तू! छान झालंय मटण! खा आता गपचूप!"

साधं स्वगत करायची पण सोय नाही राहिलेली ह्या जगात!

Saturday, 26 March 2011

मॅक मॅक!

मॅमॅक!
मॅमॅक!
परवा, बाबांच्या १०० वर्षे जुन्या टेबलावर मॅक स्थापना केली. म्हणजे टेबलावर मॅक आणि पाठी माझ्याकडे लक्ष ठेवून बाबा.

देवाधर्मातील रीतिभाती जरी कमी कळत असल्या तरी देखील कुठलीही आणि कोणाचीही स्थापना ही काही आशा आकांक्षा मनात धरून केली जाते इतपत ज्ञान आहे. त्यामुळे ही स्थापना देखील तसेच काही मनात योजून केलेली आहे. म्हणजे आता घरातच मॅक असल्याकारणाने कामे घरात आटपता येतील. दिवसाढवळ्या घर नजरेस पडत नाही असे न होता, आता सातच्या आत घरात ही बाबांची आज्ञा थोडी फार पाळता येईल. गॅलेरीत ताठ मानेने अगदी दूरदूर नजर लावून वाट बघणारे बाबा आता लेक समोरच बसून काय ते बटणं बडवतेय हे बघून कदाचित थोडे सुखावतील. चित्र काढून काही पैसे मिळणार नाहीत. मग पोटापाण्यासाठी मला काहीतरी करता यावे म्हणून बाबांनी मला एका टायपिंगच्या क्लासला घातले होते. फार काही झेपले नाही. पहिली परीक्षा दिली आणि मग संपलं. त्याची आठवण मला बऱ्याचदा कीबोर्ड बडवताना होते. आता बाबाच समोर आहेत म्हणजे मग ते पण स्वत:च्या निर्णयावर खुष झाले असतील...करते ही बाई काहीतरी उपयोग...असेच म्हणत असतील.

मी माझ्या एका मित्राला सांगत होते...
"आला हा माझा मॅक!"
"हो? अरे व्वा!"
"अरे, आता ना मी घरी लवकर येऊ शकेन! नाही का? नाहीतर आठवडा आठवडा घर उजेडात दिसत नव्हतं!"
"हाsss....म्हणजे आता ऑफिस दिसणार नाही!"
:)

काल...
आईईईई बेडरूम मधून हाक आली!
"काय गं?"
"बस इथे! बस म्हणतेय ना!"
डोकं आलं मांडीवर!
"अगं, तो जॉब द्यायचाय ना!"
"अजिबात आवडत नाहीये हे मला! तू घरात आहेस पण माझ्याकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये! येतेस आणि त्याच्यासमोर बसतेस!"
"ए! इमोशनल अत्याचार नको हा!"

...हे आणि असेच! दोन दिवसात! मॅकविषयी तक्रारींचा सूर लागलेला आहे!

असं वाटतं, ह्या मॅकची वाट बघत कामं जशी काही दारात उभी होती! हा आत शिरल्याशिरल्या एकदम लोंढाच आत शिरलाय...कामांचा!
:)


Tuesday, 22 March 2011

बालभारती

घडामोडी घडत असतात. परिणाम कधी चांगला कधी वाईट. मग त्यावर चर्चा, उहापोह. कारणमिमांसा...वगैरे वगैरे.

जे घडले आहे ते मांडले नाही, त्यावर विचार केला गेला नाही तर त्यातून धडे कसे घेतले जाणार? असा प्रश्न मनात उभा रहातो.

घटना कधी जागतिक स्तरावरील असतात, कधी असतो कोणा एका देशाचा प्रश्न, कधी जिल्ह्याचा, कधी गावाचा, कधी गल्लीचा आणि शेवटी कधी एका घराचा. एका कुटुंबाचा.
परंतु, त्या सर्वात समान धागा? माणूस. त्याचे हक्क, त्याची कर्तव्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या भावना. आणि हा माणूस कोण? तर तुम्हीं आम्ही.

एखादा अनार फोडला तर काळ्याभोर आकाशात नयनरम्य दृश्य उभारतं. अगदी दूर दूर कोणा एका फुटपाथावर आकाशाकडे नजर लावून निद्रेची प्रतिक्षा करणारा देखील एक क्षणभर सुखावून जातो. हे कधी होतं, तर एखादी आनंददायी गोष्ट अगदी जगभर फोडली तर.

मग कोणाच्या दु:खाचं काय? ते सांगून, ते ऐकून नक्की काय घडतं? का फक्त त्या माणसाचं मन हलकं होतं? की त्याही पलीकडे काही?

जपानमध्ये नैसर्गिक जुळी आपत्ती उभी रहाते. पृथ्वीवरील सर्व देश आपापले घर पडताळून बघू लागतात. पुढच्यास ठेच लागते. मागचा शहाणा होतो. निदान तसे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. कोणाचे दु:ख कोणाला जागे करते. शहाणपण देऊ करते.

काय आपण फक्त एखाद्या झाडाला लागलेली फळे आहोत? जेणेकरून त्यातील एखाद्या फळाला कीड लागली तरी शेजारच्या दुसऱ्या फळाला त्याचा थांगपत्ता नसेल. त्याविरुद्ध स्वत:हून काही काळजी घेण्याची क्षमता देखील नसेल.

दु:ख काही एखादा मोती नव्हे...हातास लागला तर त्याचा गाजावाजा करू नये...गुपचूप पुरचुंडी करावी, खिशात सारावी...मजल दर मजल करत राहावे.

दु:ख, एक बालभारती... ते तिथे आहे...त्यातून शिकण्यासारखे बरेच आहे...फक्त वरवर चाळले, तर फक्त पांढऱ्यावर काळे आहे. परंतु, धडे मन लावून वाचले तर फायदाच आहे. कधी त्यात स्वत:ला बसवून, तर कधी दूरवरून न्याहाळून.

बालभारती उघडे टाकण्यामागे हा एकमेव उद्देश आहे.

Friday, 18 March 2011

बाऊ?

अंधार पडून जुना झाला होता. डोक्यावर येऊन पडलेली कामे आटपता आटपता सकाळचे नऊ आणि रात्रीचे नऊ...नेहाचे घड्याळ तिला एव्हढेच दाखवत असे. त्यात दिवसाभरात कधीतरी पोटात काही घालणे म्हणजे फक्त 'साखरेची बरणी रिकामी झालीय, त्यात साखर भरून ठेवणे' असे. इतकेच.

सकाळी घरातून निघाल्याक्षणी कामांची एक यादीच तिच्या डोक्यावर घिरट्या घालू लागे. आणि कार्यालयातून घरी परतताना घरच्या काळज्या रोज चुकता एक अवाढव्य गोणी बनून डोक्यावर आपटत असत.
ठीक. नाहीतरी घरातील कमावत्या बाईची वेगळी काय कहाणी असणार?

गाडी तिची, चालवणारी ती. म्हणजे गाडीतले क्षण हे दिवसाभरातील तिचे फक्त तिचे म्हणता येतील असे एकांताचे क्षण. आज तिने मग तिच्या कॉलेजमधील मित्राला फोन लावला. कधीकधी आयुष्यात मागे वळून बघितलं तर काही चांगल्या घटना घडून गेलेल्या जाणवतात. काळाच्या चाचणीत टिकून राहिलेल्या. तसाच हा तिचा मित्र. खरं तर तिच्या नवऱ्याचा. आणि म्हणून तिच्या आयुष्यात आलेला. नवरा नुकताच काळाच्या ओघात दृष्टीआड झालेला पण ह्या निखळ मैत्रीला कसली गणितं नव्हती. सध्याच्या जगात मित्र म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवता येणाऱ्यांची संख्या कशी अगदी एक आणि दोन. विचारपूस करण्यासाठी फोन लावला होता. म्हणजे तुझ्या णांगणावर काय चालू आहे आणि माझे पानिपत झाले आहे...हा आणि असाच संवाद...बरेच महिने नव्हते बोलणे झाले. म्हणून आज ठरवून नंबर फिरवला होता.

"बोल गं. कशी आहेस? काय चाललंय?"
"काही नाही रे. चालू आहे रोजचीच लढाई."
"लेक काय म्हणतोय?"
"ठीक आहे. अजून धक्यातून तितकासा सावरलेला नाही."
"का? काय झालं?"
"काही नाही. वजन खूप घटलंय. डॉक्टरकडे नेलं होतं."
"मग?"
"सगळ्या चाचण्या केल्या. शारीरिकदृष्ट्या सगळं तर ठीक आहे. पण वजन खूपच कमी झालंय."
"मग? आता?"
"काही नाही. मानसिक आहे."
"हम्म्म्म."
"आईवडिलांच्या चुकीच्या वागण्याने मुलांवर जे वाईट परिणाम होतात ते आता जाणवतंय!"
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही. आपण मोठ्या लोकांना आपण करतोय ते सगळंच बरोबर वाटत असतं. म्हणजे आपले आईवडील आपल्या बाबतीत चुकले असं तर आपल्याला नेहेमीच वाटतं. पण आपण आपल्या मुलांबाबतीत चुकतोय हे काही आपल्याला मान्य करता येत नाही. नाही का?"
"कोणावर रोख आहे तुझा?"
"रोख कोणावरच नाही. टाळी काही एका हाताने वाजत नाही. परंतु, ह्याच्या अति मद्यपानामुळे घरावर जे दुष्ट परिणाम झाले ते होणारच होते. नाही का?"
"हे मला अजिबात पटत नाही!"
"ह्यात पटण्यासारखं काय आहे?"
"काय यार! तो काय मारझोड करत होता? की बलात्कार केले? फक्त दारूच तर पीत होता. फुकट तुम्ही बायका इतके आरोप करता काय त्याच्यावर? अजिबात मान्य नाही मला हे!"
"आम्ही बायका?"
"मग काय तर! अजिबात पटले नाही हे मला!"
"पण तुला हे मान्य करायलाच हवं असं मी कधी म्हटलं?"
मित्राचं आपल्या गत मित्रावरचं निष्पाप प्रेम. आता काहीही संवाद होणे अशक्य. तिचा आजवरचा अनुभव. आणि हे जसं तिला माहित होतं तसंच ते त्यालाही माहितीच होतं. फोन तोडला गेला होता.

नवऱ्याने उभे केलेले वेडेविद्रे प्रसंग! दु:खाचे क्षण नेहेमीच सुखाच्या क्षणांपेक्षा अधिक घर करून रहातात. त्यांनी खोल खोल जखमा ज्या केलेल्या असतात. गाडी रोज मऊ रूमालाने पुसली म्हणून काय तिच्यावर गेलेले ओरखडे नाहीसे होतात?
मारझोड? नव्हती. बलात्कार? माणसाच्या जगात बलात्कार हे फक्त शरीरावर होतात. कदाचित वरच्या दरबारात मनावरील झालेल्या बलात्कारांचा देखील हिशोब ठेवला जाईल.

नेहाने दारावरची घंटा वाजवली. एकांत संपला होता. उघड्या दारात अक्राळ विक्राळ गोणी तयारच होती.

Thursday, 17 March 2011

ठोंब्या!























काल ठोंब्या इथे येऊन बसला आणि माझी मैत्रीण, वंदू, हिला तिचे बरेच ठोंब्या आठवले...

ठोंब्याचे मित्र निघाले त्याला भेटायला...दिल्लीवरून! :)

Wednesday, 16 March 2011

ह्याला प्रेम ऐसे नाव...?

त्याचं असं झालं...

सकाळी गाडी इमारतीच्या आवारातून बाहेर काढली ना काढली तोच डाव्या हाताला एक विशीतील तरुणी तोंडावर उजवा हात घट्ट दाबून हमसाहमशी रडताना दिसली. सडपातळ. जीन्स आणि एक फिकट रंगाचा टॉप अंगावर. साधीसुधी. पदपथावर उभी नव्हती आणि भर रस्त्यात देखील नव्हती. काहीतरी विपरीत घडलं होतं. डोळे मिटून तिचं एकटीने मूक आक्रंदन चालू होतं. थोडं पुढे जाऊन मी गाडी बाजूला लावली. तिच्या जवळ गेले. पाठीवर हात ठेवला आणि विचारलं..."काय झालं?"
तिने मान नकारार्थी डोलावली आणि तशीच पाय फरफटत पुढे निघाली. अजूनही रुमाल तोंडावर. शरीर गदगदत.
तेव्हढ्यात समोरील कॉलेजच्या प्रवेशद्वारातून २/३ मुले पुढे झाली. माझ्याकडे बघून म्हणाली..."कोणी तरी मारून गेलं तिला."
"मारून गेलं? म्हणजे?"
"एक मुलगा बाईकवरून आला आणि तिला उलट्या हाताने थोबाडीत मारून गेला."
तिच्याकडे परत बघितलं तर हा संवाद तिच्या गावी नव्हता. पाय खेचत ती पुढे निघाली होती. रडत.
अजून एक मुलगा आता पुढे आला. दुसऱ्याला म्हणाला,"अरे, काहीतरी अफेअर असणार रे!"
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही....त्यांचं काहीतरी अफेअर असणार. आणि त्यातून आता त्याने येऊन हिला मारली!"
"तुमच्या समोरच झालं का हे?"
"हो! तिथेच होतो आम्ही उभे!"
ती आता गल्लीच्या मध्यावर पोचली होती...पाय ओढत.

प्रत्येकाने आयुष्यात प्रेमात हे पडायलाच हवं. असा एक समज. माझा. मग जग सुंदर दिसू लागतं. काळवेळ भान हरपतं. तहानभूक हरपते. सुंदर आकाश, ओला पाउस, ओसळता समुद्र, हातात हात आणि लांबचलांब रस्ते. भर गर्दीत देखील अख्खीच्या अख्खी गर्दी आपोआप नाहीशी करणारे हे क्षण. मन सुंदर. हळुवार क्षण.

आता वाटतं हे तर राज कपूर स्टाइल प्रेम. जुन्या जमान्यातील. ब्लॅअँड व्हाइट. म्हणजे जेव्हां 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेमच असतं...' असं काही मन गुणगुणायचं त्यावेळेच्या ह्या गोष्टी. प्रेमाची पहिली पायरी, त्याग असतो...आपण देत जावे त्यातून आपल्यालाच आनंद मिळतो आहे ह्याचा आपण विचार करावा...आपल्याला त्याची परतफेड मिळते किंवा नाही ह्याकडे लक्ष देऊ नये...इत्यादी इत्यादी.
....ब्ला ब्ला आणि ब्ला.

तुमचं आमचं सेम नाही राहिलं राव प्रेम...आमचं वेगळं...तुमचं वेगळं...

आता ह्या प्रेमाची भीती वाटते...एका नाण्याच्या जश्या दोन बाजू...तश्या ह्या प्रेमाला दोनच बाजू. प्रेम आणि सूड.

हे काही सुखावणारं प्रकरण नाही राहिलेलं राव...

ही प्रेमभावना म्हणजे एका वेगळ्याच सुडभावनेचे बाह्यस्वरूप. थोडा कालावधी गेला...फळ थोडं जून झालं....वरील साल सुकून पडलं तर आत काही विद्रूपच...रक्ताळलेलं...

त्यावेळी समोरच उभे राहून बघ्यांची भूमिका करणारे हे...तिच्या मदतीला कोणी नाही पुढे आलं...एका सटक्यात तिचा न्याय करून टाकला गेला होता...अफेअर...she deserved that hard slap...

दिवस गेला....
तिची ती थोडी वाकलेली पाठ...थरथरणारं शरीर...रस्त्यावर पाय खेचताना येणारा तो चपलांचा आवाज..आणि... "अरे, काहीतरी अफेअर असणार रे!"

...हे काहीतरी वेगळंच आहे...
कधी शरीरात जंत होऊ लागतात...आणि शरीराला पत्ता नाही लागत....ते असेच पोसले जातात...वस्ती वस्ती वाढवतात...आणि मग वेदनांचा कल्लोळ.

...समाजाचे हे असेच काहीसे जंताळलेले रूप...

Tuesday, 15 March 2011

नित्य नवीन...

कोणाच्या ब्लॉगवरील प्रोफाइलमध्ये डोकावलं तर प्रत्येकाने स्वत:बद्दल काही ना काही लिहिलेलं सापडतं. प्रत्येकाला माहिती असतं...तो किंवा ती कशी आहे, कोण आहे...वगैरे वगैरे!

पण मला नाही ना माहित! तेच तर मी शोधतेय! ब्लॉग लिखाणातून!

म्हणजे जसं, रोज मी अथांग पसरलेल्या जलाशयासमोर बसलेली असते...एका खडकावर...हनुवटी तळहातावर घेऊन...चंद्र विरघळत गेलेला असतो...सूर्य डोकावू लागलेला असतो...तो गूढ जलाशय हळूहळू नजरेसमोर येऊ लागतो...मग हलकेच माझं प्रतिबिंब मला दिसू लागतं. पण मग वाऱ्याची झुळूक येते...पाणी थरारतं...जुनं पाणी क्षणात पुढे सरकतं...नवीन पाणी माझ्यासमोर येतं.

तेव्हा मला मीच नवीन नाही का दिसत?
तसंच काहीसं...

म्हणून मग माझं प्रोफाइल पान रोज कोरंच रहातं!

Sunday, 13 March 2011

विहीर

प्रभातकाळी, आज एक बरं झालं...
कोरड्या विहिरीला पाणी लागलं.

वर्ष उलटून गेलं...
भूकंप झाले, जमीन सरकली, आभाळ कोसळलं....
पण हिने पाणी नाही काढलं...

सगळ्यांनीच आता बंड केलंय...
विहिरीविरुद्ध आवाज उठवलाय...
वासेच त्यांनी फिरवायला घेतलेत...
कसं नाही पाणी लागत चंगच बांधलाय...

त्यांच्या श्रमांना फळ आलं...

कोरड्या विहिरीला आज प्रभातकाळी पाणी लागलं...


Friday, 11 March 2011

शिक्का

प्रत्येक कार्यालयाची काम करण्याची एक पद्धती असते. प्रणाली असते.

एक अतिभव्य कार्यालय. एच आर विभाग. त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या? अगणित. त्यांचे कामाचे तास? २४ X ७. अथक. ज्याने ही माणसे त्याच्यासाठी शोधली आहेत त्याची पारख हिऱ्यांची आहे. अतिशय बारकाईने ही नेमणूक केली गेलेली आहे. त्यांचे काम काय?

त्याने प्रत्येकाकडे काही माणसांची यादी दिलेली आहे. व पाच शिक्के. समजा एका कर्मचाऱ्याकडे दहा माणसांची नावे. एका शिक्क्यावर आहे 'हुशारी'. दुसऱ्यावर 'लबाडी'. तिसऱ्यावर समाधानकारक. चवथ्यावर असमाधानकारक. पाचव्यावर मूर्खता. त्या एका कर्मचाऱ्याचे काम काय? तर त्याने त्याला दिलेल्या माणसांच्या प्रत्येक क्षणावर नजर ठेवायची आहे. व तो मनुष्य निद्रिस्त झाल्यावर त्यातील एक शिक्का उचलून त्या माणसाच्या त्या दिवसाच्या कागदावर मारायचा आहे. म्हणजे तो माणूस त्या दिवशी कसा वागला आहे ते बारकाईने न्याहाळून तो शिक्का मारला जाणे अपेक्षित आहे. त्या दिवशी तो माणूस लबाडीने वागला आहे की माणुसकीने...की काही भयंकर. आणि मग त्याच्या आयुष्याची वर्ष संपता संपता त्या व्यक्तीची ती नोंदणी पूर्ण करून त्याच्या नावाची एक फाईल केली जाते. त्यावरील डकवलेल्या कागदावर एक तक्ता असतो. पाच कॉलम्सचा. त्याखाली आकडे टाकलेले...गोळाबेरजेचे. म्हणजे लबाडी १ लक्ष, हुशारी पन्नास हजार....वगैरे वगैरे. इथे त्या कर्मचाऱ्याचे त्या व्यक्तिसंदर्भातील काम संपते...

आता तो गठ्ठा जातो त्यांच्या वरिष्ठाकडे. वरिष्ठ एकमेव. तो नजर टाकतो फक्त त्या टक्केवारीकडे. त्याच्या माणसांनी केलेल्या कामावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. नि:संशय. त्याची फक्त एक नजर. त्या माणसाने, त्याचे आयुष्य कशा प्रकारे घालवले आहे ह्याचा सर्वंकष विचार करायला चाणाक्ष देवाला काही क्षण पुरतात. त्या टक्केवारीवरून. आणि त्याच्याकडे शिक्के किती? फक्त दोन. पुण्यवान आणि पापी. त्या फाईलवर शेवटचा त्याचा शिक्का. संपलं.

दान म्हणून मिळालेले एक आयुष्य संपते. दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा हिशोब संपतो. आणि मग पुढील जन्म त्या मनुष्यव्यक्तीला कुठलं दिलं जावं हे ठरते. त्या पापी आत्म्याला अधांतरी लटकत ठेवावे वा किडामुंगीचे आयुष्य दान करावे हे त्या 'रिपोर्ट कार्डा'वर ठरते.

जर माझ्या कार्डावर काल 'मूर्ख' हा शिक्का पडला असेल तर त्याच क्षणाला मी कित्येक वर्ष ज्याला मित्र मानत आले त्याच्या कार्डावर 'लबाड' हा शिक्का मारला गेला असलाच पाहिजे.

कधी घरात टीव्ही चालू आहे म्हणून नजरेस ह्या मालिका पडल्याच तर प्रश्र्न पडे, कोणाला एव्हढा वेळ असतो कपट कारस्थाने करायला? आणि का कोणी आपली बुद्धी व वेळ असा घालवावा?

बेसावध मी होते. नाते मैत्रीचे. ह्या नात्यातील पुरुष कधी मला जिवलग नव्हता. पण काय मित्र आणि शत्रू, ह्यामध्ये काहीच नसते? अगदी घट्ट मैत्री, जिवाभावाची मैत्री आणि अगदी साधी एक मैत्री असेही काही मैत्रीचे स्तर असतात की नसतातच?

एका मित्राने ह्या मुंबईतील जागेच्या निमित्ताने दहा वर्षांपूर्वी पाठीत खुपसलेला खंजीर काल हृदयापर्यंत पोचला...आणि माझ्या ह्या कथित मित्राचाच मित्र, एका हपापलेल्या बिल्डरने, हसतहसत माझी मूर्खता मला जाणवून दिली. चुकीच्या माणसांना मित्र म्हणून घरात घ्यायची माझ्या नवऱ्याची खोड मला पुन्हां नडली!

शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यांची हाव नाही संपणार आणि माझा मूर्खपणा नाही कधी संपणार.

रं आहे...देवाने ज्या कर्मचाऱ्याकडे माझे नाव दिले आहे त्याचे काम सोप्पे. झोपेत देखील करता येण्यासारखे. रोज तोच तो एकच तर शिक्का उचलायचा आणि खाडकन माझ्या दैनिक रिपोर्टवर मारायचा.

टॅक! शिक्कामोर्तब!
'मूर्ख'!

Sunday, 6 March 2011

मूळव्याध

"I'll tell you!"
"What?"
"त्याचं काय आहे माहितेय का आई तुला?"
"कसलं काय आहे...?"
"म्हणजे मुली सुधारल्यात...शिकल्या...पैसे वगैरे कमवायला लागल्या...सगळं झालं!"
"मग? बिनसलं कुठे?!"
"अगं, पण ज्या वेगात मुली सुधारल्या ना...? त्या वेगात मुलं नाही ना सुधारली!"
"म्हणजे?"
"अगं, मी बघते ना...माझ्या मैत्रिणी, त्यांचे बॉयफ्रेण्डस...आणि त्यांची भांडणं! म्हणजे त्यांच्या भांडणांचे विषय!"
"अं?"
"अगं, अजूनही ना आई, ह्या मुलांना ना आपली बायको तशीच हवीशी असते! म्हणजे तिने करावी काय ती करियर बिरीयर! पण बाकी सर्वच बाबतीत तिचे विचार घरगुतीच हवेत!"
"अगं! नाही गं! सुधारलेत गं ते!"
"मुली ज्या वेगात आई त्यांच्या विचारात mature झाल्यात ना तेव्हढी ही मुलं नाही झालेली! त्यामुळे फक्त भांडणं वाढलीयत! आणि divorce वाढलेयत!"
"ह्म्म्म! हे तर आमच्या पिढीचं जुनं रडगाणं!"
"अहं! काहीही बदललेलं नाहीये! अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे! आणि ह्यांना सुधारायला अजून चार पिढ्या जाणार आहेत! They are slow learners!"
"पण ह्याचा अर्थ, आमच्या पिढीने आपल्या मुली त्यांच्या पायावर उभ्या तर केल्या, पण त्याचवेळी ह्या स्वावलंबी मुलींसाठी आपल्या मुलांची मानसिकता तयार नाही केली! असाच नाही का अर्थ होत?"
"Of course! You guys need to be blamed!"

टॅक!! आसूड आसूड!

"काय? गप्प काय बसलीस?"
"मग माझे आई, आपण आशा करू की तुझे दोन छोटे मावसभाऊ मोठे होऊन सुधारलेले असतील!"
"काय माहित?! हे तरी कसे होणार आहेत कोण जाणे!"
"अगं तू नको काळजी करू! ते बघतायत ना त्यांची ताई करियर करताना!"
"I hope so! I hope त्यांच्या डोक्यात शिरेल तोपर्यंत!"
"हम्म्म्म"

तर मंडळी, काय म्हणणं आहे? तक्रार तर अजूनही मूळ धरूनच आहे की!
भारतीय तरुणांविषयी असलेली ही भारतीय तरुणींची प्राचीन तक्रार म्हणजे जुनी मूळव्याध आहे की काय?

तुमच्या मते कुठे बसतात आपली तरुण पुरुष मंडळी? सुधारित? पुरोगामी? की.....
:)

Saturday, 5 March 2011

वाचन...

'Luka and the fire of life' सलमान रश्दी...संपवलं. कल्पनाशक्तीचं वारू जर मोकळं सोडून दिलं तर ते कसं कुठल्या कुठे पोचू शकतं त्याचा अनुभव...म्हणजे हे पुस्तक. लुकाबरोबर त्याच्या लाडक्या बाबांचे प्राण वाचवण्यासाठीचे हे एका अर्थी प्रवासवर्णन...जादुई नगरीतून गालिचावर बसून, विना तिकीट. पुस्तकाचा शेवटचा परिच्छेद खूप आवडून गेला...अगदी पूर्ण कुटुंबांबरोबर कोजागिरीच्या रात्री, गच्चीवर कुटुंबांबरोबर केशरयुक्त मधुर दुधाचा आस्वाद घेतल्यागत...

त्यानंतर...'सारे प्रवासी घडीचे'...दळवी काकांबरोबर. त्यांनी शेवटच्या पानावर 'पुस्तकात उल्लेखलेली सर्व व्यक्तिचित्रे ही कल्पनेतील आहेत' असे म्हटले आहे. मग हे अचंबित करणारेच आहे. नाही काय? हे इतके सुंदर बारीकसारीक व्यक्ती विशेष? कसे कल्पिले त्यांनी? त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभीच रहात नाही काय? मी काय काकांना प्रशस्तीपत्रक देणार! माझे पंधरा दिवस त्यांच्या बरोबर त्यांच्या गावी गेले...इतकेच मी म्हणेन. घाऱ्या डोळ्यांचे, स्थूल शरीरयष्टीचे दळवीकाका. "दळवी, आमची लेक तुमचं हे पुस्तक पुन्हां पुन्हां वाचून हसत बसलेली असते, बरं का..." बाबांनी त्यांच्या ह्या मित्राला सांगितले होते. बाबांची ही लेक म्हणजे माझी मधली बहिण.
धुळकट झालेले, काळाच्या ओघात पडिक झालेले काकांचे पुस्तकातील घर...आणि बाबांचं गावाकडील बोडकं घर... मन उदास उदास करतं...

आता? पुढे?

पुढे 'व्यंकटेश माडगूळकर यांची कथा'. श्री. अरविंद गोखले यांनी प्रस्तावनेच्या आरंभी म्हटले आहे. 'लेखक : माडगूळकर' हे शीर्षक वाचले की, 'लोभस शब्दकळा ल्यायलेले, उत्कृष्ट शैलीतील, सोपे वाटणारे पण मन भारून टाकणारे असे काही वाचावयास मिळणार याची वाचकांना पावती मिळते.'

मला वाटते, आपण प्रत्येकाने ह्या लेखकांचे लिखाण अधून मधून वाचलेच पाहिजे. नाहीतर हल्लीच्या काळातील मराठी लिखाणात, कुठे मिळते हे असे काही कालातीत वाचण्यास? किती तरी शब्द आपण विसरूनही गेलेलो आहोत. आणि मग उगाच बोंबाबोंब करीत रहातो...मराठी जिवंत राखण्यासाठी. काय आपण हल्ली जे वाचतो, आपण जे सध्या लिहितो...ते सुंदर आहे? सरळधोपट काहीबाही वेडविद्रं लिहून टाकतो...आणि तसंच कोणी काही लिहिलेलं वाचत रहातो...
कित्येक शब्द नाहीसे झालेल्याचे दु: आहे ...माझ्या समृद्ध मराठी भाषेचे असंख्य अवयव इथेतिथे गळून पडले...कधी ते कळले देखील नाही...आपलीच डोळेझाक...दुसरे काय?



Friday, 4 March 2011

पुण्ण्याची यादी

जवळजवळ पंचवीस वर्ष उलटून गेली त्या घटनेला. परंतु, जसे मनावर घेतलेले बाण लक्षात रहातात तसेच काही फुलासारखे हळुवार स्पर्श देखील मनात घर करून रहातातच.

...त्या वर्षी सिमेन्स कंपनीच्या कॅलेंडरचा विषय होता भारतातील सुप्रसिद्ध स्थळे. त्यात त्यांनी माझ्या नवऱ्याकडून एक चित्र काढून घेतलं होतं. जलरंगात. मानधन मिळालं ५०० रुपये. मग साहेबांनी एक सायकल विकत घेतली. खूप लहानपणी वडिलांकडे हट्ट करून बघितला होता. पण शेवटी स्वकमाईची गोष्टच न्यारी. कालांतराने सायकल जुनी झाली. मध्यंतरी आमचं लग्न झालं. डोंबिवलीत संसाराला सुरुवात केली.

मी ती सायकल चालवण्याचा प्रसंग तसा कधी आला नव्हता. परंतु, एका काळोख्या रात्री डोंबिवलीत माझ्या अंगात हट्टाचं भूत शिरलं. आमच्या घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर त्याच्या 'मित्र कमी आणि कुटुंबाचा भाग अधिक' अशा एका दोस्ताचं घर होतं. आम्ही तिथे निघालो होतो. आत्तापर्यंत त्या सायकलीचं पळण्याचं वय टळून गेलेलं होतं.
"मी चालवू का रे सायकल? मी चालवते...हळूहळू चालवते. तू ये मागून!"
"नको! एक तर काळोख झालाय आणि सायकलचं हॅण्डल नीट नाहीये. वाकडं झालंय!"
"तू उगाचच सांगतोयस! तुला द्यायचीच नाहीये मला चालवायला!"
"अगं, ही गल्ली पण बघ ना किती काळोखी झालीय!"
घडायचं असलं की ते घडतंच. मी हट्टी बायको झाले आणि स्वार झाले...निघाले. सायकलची हाडं म्हातारी झालेली होती. वयोमानानुसार. रस्त्यात काळोख मिट्ट होता. समोरून रिक्षा आली. मी हँडल वळवायचा कसोशीने प्रयत्न केला. पण सायकलीला कळतं तरीही वळत नव्हतं. रिक्षाचा आरसा आपटला. बरोबर खांद्यावर. तोल गेला. भूईसपाट. काळोखातून अस्सल मालवणी शिव्या, बायकी आवाजात ऐकू येऊ लागल्या. रिक्षात एक आजी होत्या. संतापलेल्या. मी खांदा धरून कळवळत खाली बसले होते. पाठी बघितलं तर त्या अंधारात नवरा काही दिसला नाही. रिक्षावाल्याला वेदना ऐकू आल्या. "आजी, त्यांनाच खूप लागलंय बहुतेक!"
तोपर्यंत साहेब आले. पुढे त्याने सायकल कुठे ठेवली, मला तिथून कसं नेलं...तोच जाणे. पण रात्रीत हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. एक्स रे काढला गेला....कॉलर बोन फ्रॅक्चर.
तसे फारसे हट्ट नाही केले कधी...पण हा एक हट्ट हाडाला जन्माची चीर पाडून गेला.

मग कामावरून सुट्टी. घरी विश्रांती...डोंबिवलीची लोकं तसं बघायला ऑफिसच्या वेळेच्या जवळजवळ तीन तास तरी आधी ऑफिससाठी घराबाहेर पडतात. व कामाच्या स्वरूपामुळे हा कधीतरी 'जमलं तर' घरी परतत असे. उजवा हात गळ्यात घेऊन मी तर बिछान्यावर. मग जेवणखाण?
...इथे धावून आल्या आमच्या वहिनी...

कृष्णधवल 'सुजाता'तील ती मोहक नूतन? तसाच काहीसा सावळा चेहेरा. सडपातळ शरीरयष्टी. साधं सुती पातळ. लग्नाआधी कुठल्याशा रुग्णालयात परिचारिकेची नोकरी त्या करित असत. परंतु, सून घर सांभाळणारी हवी, कमावती नको...म्हणून मग तितक्याच जबाबदारीने त्यांनी त्या घरात पाऊल टाकलं होतं. त्या घराशी माझा संबंध? मघाशी म्हटल्याप्रमाणे 'मित्र कमी आणि कुटुंबाचा भाग अधिक' अश्या त्या दोस्ताच्या, ह्या थोरल्या वहिनी. आणि म्हणून माझ्याही वहिनीच. माझी त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा त्यांना दोन मुलं होती. मुलगा शिशूवर्गात आणि मुलगी तिसरी चवथीत. भरलेलं घर...जवळ जवळ दहा बारा माणसांचं. सव्वा फूट रुंदीचा कणकेचा मळलेला गोळा. चपात्या मोजायला घेतल्याच तर रोजचा आकडा चाळीसला पंधरा मिनिटात मागे टाकत असे. सगळ्यांचे जेवण साग्रसंगीत करणे, मुलांना शाळेत सोडणे आणि मग त्यांचा नवीन पेशंट. मी!

सकाळी अकराच्या सुमारास दरवाजाची घंटा वाजत असे. हसऱ्या चेहेऱ्याच्या वहिनी दारात उभ्या. थकवाबिकवा? काही रडगाणं वगैरे? काही कौटुंबिक तक्रारी? नव्हत्या. त्यांच्या काही तक्रारी नव्हत्या. मग भराभर स्वयंपाकघरात शिरायचं. अर्ध्या तासात आम्हां दोघांसाठी दोन्ही वेळेचं जेवण आटपायचं. मग पुढल्या कामाकडे. रोज मला प्रेमाने न्हाऊ घालायचं आणि मग खाऊ पण घालायचं. मग असतील नसतील ती भांडी घासायची, ओटा आवरायचा. की झालीच वेळ, लेकीची शाळा सुटायची.
"दमलात ना वहिनी?"
"ह्हो! एव्हढंसं काम करून?!"

माणसामाणसाची स्मरणशक्ती. वेगवेगळी. काहींची कमकुवत. काहींची इतकी तीव्र की न केलेल्या गोष्टी देखील आपणच केल्या, असेच काहीसे त्यांना वाटत रहाते. आणि मग मोबदल्याची आस.
ह्या दुसऱ्यासाठी काही करण्याच्या गुणात रक्ताचा काही संबंध असतो? नाही दिसला. रक्ताची माणसं तुमच्यासाठी केलेल्या कामाची यादी बाळगताना दिसली. वारंवार उगाळताना दिसली. आणि ह्या वहिनी!
"आठवतं वहिनी, तुम्ही येऊन कित्ती दिवस मला भरवत होता...!"
"चल! काय नको ते घेऊन बसलीयस!?"

'नको ते'? कोणी श्रम आणि वेळ दिला...त्याची आठवण ठेवली. दु:ख, 'नको ते' म्हणून दूर सारावं. तुमचे हे प्रेम मी काय विसरणार? जसे कोणी नाहक केलेले शरसंधान माझ्या मनाने लक्षात ठेवले, तसेच हे तुमचे प्रेम देखील माझ्या त्याच मनाने हळुवार जपले. माझ्या मनाचा हिशोब एकच. प्रेम आणि घाव...त्याने सारखेच जोपासले.

पुण्याला अकरावीच्या दाखल्यासाठी सकाळी हसतखेळत गेलेलं आपलं लेकरू, अॅम्ब्युलन्सने जेव्हा मध्यरात्री डेड बॉडी म्हणून आणून दिलं...त्यावेळी ह्या मायाळू 'सुजाता'चं काय झालं असेल?

आधीही म्हटलं होतं...आताही तेच वाटतं....वाट्टेल तश्या गोष्टी लिहायची खोडच आहे 'त्याची'!
माझी नाही ही, त्याची सवय आहे.
...शोकांतिका लिहायची...त्याची सवय आहे.

...कोणी केलेल्या पुण्ण्याची यादी विसरायची ही त्याची खोड आहे.

Tuesday, 1 March 2011

एक कायदेशीर प्रतिक्रिया

माझ्या कालच्या पोस्टवरील, अॅडव्होकेट राजीव फलटणकर ह्यांची प्रतिक्रिया ही अतिशय माहितीपूर्ण वाटली...म्हणून आजची पोस्ट म्हणून त्यांची तीच प्रतिक्रिया टाकत आहे...
आशा आहे की ती मला जशी महत्त्वाची वाटली तशीच तुम्हांला देखील वाटेल.
:)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

माझ्या गेल्या २०-२५ वर्षातील वकिली व्यवसायातील अनुभवातून हे कळून आलेय की - व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरेय! आपकमाईतील सोडाच पण जेंव्हा वारस म्हणून बापकमाई हातात येते तेंव्हा आधीच्या पिढ्यांचे ती मिळवण्यात लागलेले कष्ट लक्षात न घेता, वाढून आलेले ताट आपले एकट्याचे आहे असे समजून त्यावर ताव मारण्याची वृत्ती ही व्यक्ती सापेक्ष आहे.स्थावर इस्टेटीच्या `आकाश फाडून जाणाऱ्या किमती' ह्या या सगळ्या नात्यांच्या ऱ्हासास मुख्यत्वे कारणीभूत होत आहेत. सुशिक्षितपणाचा त्यात काहीही संबंध नसतो.

म्हणूनच मी इथे नमूद करू इच्छितो की-

१. पूर्वज जी संपत्ती सोडून गेले आहेत ती आपली एकट्याची नाहीच आहे...तीच्यावर त्यांच्या सर्व वारसांचा हक्क आहे. कारण ती आपण मिळवलेली नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येक भावाचा व बहिणीचा त्यावर आपल्या इतकाच हक्क आहे व हे तत्व आता कायद्याने पण मान्य केलेलं आहे.

२. सर्व वारस हे सारखेच हक्कदार आहेत. परंतु `हाजीर तो वजीर' वा `कसेल त्याची जमीन' या न्यायाचा गैर अवलंब करून, इतर वारसांचे हक्क डावलले जातात व त्यामुळे सर्वच नात्यात दुरावा निर्माण होतो. कारण धनाची (विना कष्ट) अभिलाषा बहुश: प्रत्येकाला कमीअधिक प्रमाणात असतेच. परंतु आपल्याच रक्ताच्या पाठच्या व/वा पुढच्या माणसाचे हक्क हिरावून/ नाकारून, आपण आपल्या मुलांसमोर आपल्या आप्पलपोटेपणाचे /स्वार्थाचे एक उदाहरण घालून, त्यांच्यामध्ये नसलेली विषवेली अंकुरून ठेवतो.
यावर उत्तम उपाय म्हणजे `इच्छापत्र '! आपल्या संपत्तीचे आपणच वाटप करून ठेवावे म्हणजे वारसांना ते मंजूर नसले तरी बंधनकारक असते व त्यायोगे कदाचित उदभवू शकणाऱ्या वादाचे मूळ कारण नष्ट होऊ शकेल व नाती दृढ राहण्यास मदत होईल.

३.आज लोकं इस्टेटीला नामांकन करून ठेवतात. पण हे नामांकन ही फक्त एक कार्यालयीन सोय आहे. ते इच्छापत्र नाही. व त्यामुळे मृत्यू पावणाऱ्याच्या अज्ञानातून, त्याच्या वारसांत मात्र त्यावरून वाद निर्माण होतात. ज्याचे नाव नामांकनावर आहे त्याचा गैरसमज (सोईस्कररित्या) होतो की - माझे नाव ह्या इस्टेटीवर नामांकन म्हणून आहे ह्याचा अर्थ ही इस्टेट माझीच आहे. म्हणून नामांकनाबरोबरच इच्छापत्र लिहून ठेवणे हे आवश्यकच आहे.

खरे तर जी बापकमाई आपल्यापर्यंत येते तिचे आपण रखवालदार असतो व त्याचे संवर्धन करून पुढील पिढ्यांच्या हातात ते सोपवणे हे आपले कार्य असायला हवे.

माझा एक अनुभव - माझ्या एका पारशी पक्षकाराने (७८ वर्षे) आपले घर आपल्या वारसांना [१ मुलगा (बदफैली), १ मुलगी (विवाहित) , पत्नी ] यांना न देता त्यांच्या ५० वर्षे शेजारी असलेल्या (आता २ कि.मी.वर असलेल्या) मुस्लीम दाम्पत्याला दिले. मात्र पैसे सगळे पत्नीला दिले. हे इच्छापत्र करीत असताना मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. तेंव्हा त्या पारशी गृहस्थाने सांगितले की माझ्या माघारी माझी पत्नीला धमकावून माझा मुलगा घर हिसकवून घेईल व मुलगी, ७५ वर्षाच्या आईला परदेशात नेणार नाही. मात्र माझे शेजारी हे माझ्या पत्नीचा आईप्रमाणे सांभाळ करतील ही मला खात्री आहे.
५ वर्षांनी ते गृहस्थ गेल्यावर मी पुढील कामे केली: - एक आठवडा घरात आईला डांबून ठेवणाऱ्या, अचानक उपटलेल्या मुलाला पोलिसांकरवी अटक, आईची सुटका व पुढील ७ वर्षे त्या पूर्वीच्या शेजारच्या मुस्लीम दाम्पत्त्याने केलेली त्या स्त्रीची स्वतःच्या आईप्रमाणे केलेली सेवा, याचे भरल्या डोळ्यांनी घेतलेले दर्शन!

त्या पारशी गृहस्थांची माणसाची पारख किती अचूक होती!