आज चव्हाट्यावरच मांडायचं ठरवलंय...
उगीच नाही...गरज दिसली म्हणून.
प्रसंग एक.
"मामा, आज ह्या घराची पुर्नबांधणी होणार आहे...मग तू तुझ्या भावंडांबद्दल काय ठरवलं आहेस?"
"तू कोण मला विचारणारी? निघ! निघ इथून!"
"आई सध्या अमेरिकेत आहे. तिच्या सांगण्यावरून हे मी तुला विचारतेय. आणि तुझा गैरसमज होतोय मामा. मी तुझ्या घरात उभी नाही. मी माझ्या आजीआजोबांच्या घरात उभी आहे. ज्या घरावर माझ्या आईचाही तितकाच हक्क आहे, जितका तुझा आहे."
"चालती होतेस की धक्के मारून बाहेर काढू तुला!"
हे घर दादरमधील. जवळजवळ १२०० स्क़े.फीट. एक बंगला. त्यातील तळमजला माझ्या आजोबांनी भाड्याने घेतलेला. ज्यावेळी हा माझा धाकटा मामा जन्माला होता की नाही हीच शंका. ३ मुलगे, पाच मुली असा पूर्वी चालून जाणारा, आजीआजोबांचा मोठा परिवार. त्या त्या वेळी घरातील मोठ्या व्यक्तींनी अपुऱ्या ज्ञानामुळे म्हणा वा आपल्या माणसांवरील अवाजवी विश्वासामुळे म्हणा, कायद्याची मदत घेतलेली नाही. मुलींची लग्न झाली. मुलगे आपापल्या व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थाईक झाले. मग घरात राहिला कोण...तर धाकटा मामा. मध्यंतरीच्या काळात मोठ्या मामाने परत येण्याची इच्छा दर्शवली, पत्राद्वारे. परंतु त्या पत्रांना कचऱ्याचा डबा दिसला. त्यांना कधीही प्रत्युत्तर मिळाले नाही. प्रत्येक भावंडं आपापल्या संसाराचं रहाटगाडगं चालवत राहिलं...आपापल्या कुवतीनुसार. कित्येक रक्षाबंधने आली, कित्येक भाऊबिजी गेल्या. मामाने सहकुटूंब बहिणींकडे जेवणे झोडली. (हो. आता वेळच अशी आली आहे की त्या आनंददायी क्षणांचा हिशोब काढावा) मग आता काय झाले? काय बिघडले?
आमचे वकील म्हणतात...हा दादरमध्ये जागा असण्याचा तोटा आहे. जागा आणि नाती....जागांच्या भावांचा आलेख चढता आणि नातीगोती? आलेख उतरता...अगदी रसातळाला.
मामाने आता मुंबई कोर्टाला काय सांगितले?...बहिणींची लग्ने होऊन त्या दुसऱ्या घरी गेल्या...आता त्यांचा ह्या जागेशी काय संबंध?
...पुढे काय? पुढे फक्त वाद आणि भांडण.
परिणाम? मनं दुखावणे...रक्ताची नाती दुरावणे.
प्रसंग २.
"आमची अहमदाबादमध्ये मोठी जागा आहे. आम्ही दोघे भाऊ. आणि आम्हांला एक बहिण आहे."
"मग?"
"म्हणजे तुला म्हणायचंय की आमच्या लग्न झालेल्या बहिणीचा देखील त्या जागेवर आमच्या इतकाच हक्क आहे?!"
"अर्थात! भारतीय कायद्यातील सुधारणेनुसार आता वारसाहक्काने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मुलाइतकाच मुलीचाही अधिकार आहे!"
"ह्म्म्म"
"नाहीतर त्याच न्यायाने तुला आज एक मुलगी आहे आणि दोन मुलगे आहेत. मग उद्या तुझ्या मुलांनी तुझ्या लाडक्या लेकीचा हक्क नाकारला तर चालेल काय तुला?"
वरील संवाद मी व माझा एक जुना मित्र यांमधील.
प्रसंग ३.
"ताईचं लग्न झालं यार! ती गेली अमेरिकेला! आता तिचा काय हक्क ह्या घरावर?"
"का म्हणून? हे घर तिच्या आईवडिलांचं आहे...मग तिचा वारसा हक्क का नाही लागू होणार इथे?"
...पुढे काय? फक्त वाद आणि भांडण.
परिणाम? मनं दुखावणे...रक्ताची नाती दुरावणे.
प्रसंग ४.
एका इस्टेटीचे भागीदार किती?
५७!
चार बहिणी. पाच भाऊ. एका जोडप्याच्या मूळ वृक्षाच्या ह्या ५७ फांद्या.
भागीदारीची वेळ आली. त्यातील काही भाऊ व बहिणी हयात नाहीत. तरी देखील, जी वाटणी झाली तिचे पूर्णपणे ५७ भाग झाले. आपापसात ते वाटून घेतले गेले...नाती पुढे चालू राहिली. आनंद दिवसागणिक द्विगुणीत झाला...कसलेही गालबोट न लागता.
नाती महत्वाची.
आहेत ना? आपली मुले...गुण्यागोविंदाने, एकमेकांना धरून पुढे जावीत...असं मनापासून वाटतं ना?
आपला भाऊ, आपली बहिण...जसे आपण एकत्र लहानाचे मोठे झालो...तसेच आता आयुष्यात येणाऱ्या बऱ्या व वाईट प्रसंगांना एकत्रित सामोरे जावे, अशीच भावना आहे ना?
कोर्टाची पायरी चढावी लागू नये असेच वाटते ना?
मग, मी माझे इच्छापत्र तयार केले ह्याचा अर्थ माझा माझ्या मुलांवर अविश्वास आहे, असा का होतो?
ह्या उलट, माझे माझ्या मुलांवर जीवापाड प्रेम आहे...आपापसात बेबनाव न होता, त्यांनी आयुष्यात एकमेकांना धरून राहावे असेच मला वाटते आणि म्हणून मी माझे इच्छापत्र तयार करून ठेवेन, असा नाही का होत?
म्हणजेच माझ्या प्रेमाला, कायद्याची जोड देऊन ते प्रेम मी अधिक दृढ नाही का करत?
इथे मी माझ्या आदरणीय आजोबांना अपराधी ठरवत आहे काय? त्यावेळी ह्या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्प्या नव्हत्या हे मला लक्षात घेतलेच पाहिजे. त्यांचे मरण आले अकस्मात. परंतु कोणीच कधीही कायद्याचे भान न ठेवल्याने आता एक कुटुंब वृक्षच मुळापासून उखडला गेला. मनं दुखावली...वर्षानुवर्षे जे आनंदाचे क्षण एकत्रित अनुभवले होते, ते सर्व खोटे ठरले...दांभिकता बाहेर आली. वरून रसरशीत दिसणारं सोनेरी सफरचंद...आत पूर्ण किडकं निघालं.
आजही माझे समकालीन देखील तसाच चुकीचा विचार करताना दिसतात. म्हणून ही सुचनेची घंटा.
माझा धडा मी अतिशय दु:खदरित्या, अपमानकारकरित्या घेतला. आजही दर महिन्याला 'तारीख पे तारीख' गेली की जखम अधिकाधिक खोलच होते. जसं कोणी ड्रील मशीन चालवावे.
...म्हणून आणली आज नाती...
चव्हाट्यावर.
29 comments:
मुंबईतच, घरावरूनच, लेखी व्यवहार नसल्यामुळे भावाबहिणीचं नातं दुरावताना बघितलंय. इच्छापत्र तर करवंच, पण आपापसातले आर्थिक व्यवहारसुद्धा शक्यतो स्पष्ट, लिहिलेले असावेत असा धडा मिळाला त्यातून.
हे महाभारत आहे... प्रत्येकाच्या घरात घडत आहे.
may this matter get solved in decent way... :|
कसली नाती आणि कसली काय गं...
गौरी, मुंबईतील जागांच्या चढत्या किमंतींमध्ये सगळी नातीगोती जाळून खाक होताना दिसतायत...
सौरभ, आता हे प्रकरण कितीही चांगल्या रीतीने सुटले तरी देखील नाती जळून गेली ती गेलीच. ती नाही आता कधी पुन्हा उभी रहाणार...नाही का?
का कोण जाणे माझ्या घरी घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली...खूप मन:स्ताप झाला होता वडिलांना... सोड काय बोलायच परत परत, असा राग येतो ना.....पण :(
रक्ताची नाती तुटताना बघितली आहेत ग मी...काळजी घे. सगळ ठीक होईल
सुहास, सध्या मला वाटतं प्रत्येक घरात हे चालू आहे...
वाढत्या जागांच्या किमतींमुळे नाती पार तुटून जातायत...हाव वाढलीय.
:(
अनघा अगं सगळीकडेच आहे असे चित्र.... काही जखमा उघड काही लपवलेल्या... पण नाती तूटताना होणाऱ्या यातना फार मोठ्या गं!!
नुसतं एक नातच नव्हे तर विश्वासालाच तडा जातो....
जप गं!!
Anagha, you touched a wrong nerve..ashya khaplya kadhu nakos ga, please! Great piece anyway.
हेमंत, इलाज नाही....ह्याची जाणीव करून द्यायला हवीच...आज आपण तरी निदान ही काळजी घ्यायलाच हवी. कायद्याची मदत वेळच्यावेळी घेतली, तर नाती शिल्लक रहातात.
ह्या सध्याच्या जगात, गणित उलट झालंय...नाती घट्ट म्हणून कायदा लागत नाही असं चित्र नाही उरलेलं...तर नातं घट्ट राहावं म्हणून कायद्याची मदत घेणे गरजेचे झाले आहे..
तुझ्या नको त्या आठवणी जाग्या केल्या ना मी?....तसं नव्हतं करायचं मला....
पण सद्य परिस्थितीत ह्याची गरज वाटली...
:) आभार गं तन्वी.
घरोघरी मातीच्याच चुली. :( :(
संयम राखणे खूप गरजेचे असते अशा वेळेस, किंवा कोणाला तरी त्याग करवा लागतो ; आणि तेच कठीण असते.
कायद्याची मदत घेऊनसुद्धा नाती शिल्लक राहतील याची खात्री नसते गं ताई, मेलेल्या बापाला दोष देतात , बापाचे अमक्यावर जास्त प्रेम होते म्हणतात आणि नाती दुरावली जातात. मृत्युपत्राने १००% समाधान होण्याची शक्यता कमीच असते.कुठे न कुठे उणीदुणी काढली जातात. पण विना-मृत्युपत्राच्या संपत्तीपेक्षा कमी त्रास होतो हे मान्य आहे मला, त्यामुळे मृत्युपत्र असावे याच मताचा मीदेखील आहे.
>> "म्हणजे तुला म्हणायचंय की आमच्या लग्न झालेल्या बहिणीचा देखील त्या जागेवर आमच्या इतकाच हक्क आहे?!"
>> "ताईचं लग्न झालं यार! ती गेली अमेरिकेला! आता तिचा काय हक्क ह्या घरावर?"
हे असले प्रश्न आजच्या युगातही सुशिक्षितांना पडतातच कसे हेच मला कळत नाही !
तारीख पे तारीख .... :((
मला फारसे तपशील माहित नाहीत आणि असे प्रसंग फार जवळून अजून पाहिलेले नाहीत त्यामुळे जास्त काही बोलत नाही.. फक्त सगळं व्यवस्थित व्हावं एव्हढीच इच्छा! :)
अन हो एक तात्पर्य काढलंय मी - 'एकुलत्या एक' मुलीशीच लग्न करायला हवं ;)
हे सगळे प्रसंग याआधीच वाचल्या/पाहिल्यासारखे वाटताहेत यात काय ते समज... अशा किती कहाण्या कुठेही न लिहिता नाती संपवून संपत असतील हेच आमच्या पिढीच दुर्दैव.....
हे नक्की की नात्याचे भान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने ठेवायला हवे. त्यातील एक जरी कुठे चुकीचा विचार करत असेल तर कीड लागायला वेळ नाही लागत.
भावना बाजूला ठेवून भावनांचा मान राखता यायला हवा.
आभार संकेत...प्रतिक्रियेबद्दल. :)
मलाही हाच प्रश्न पडत असे हेरंब...आपण आपल्याला सुशिक्षित म्हणवतो आणि मग हे असे विचार येतातच कुठून मनात....
परंतु, आता दुर्दैवाने जवळजवळ ७५% घरात ही एकच कपट कारस्थानांची मालिका चालू दिसते आणि जाणवतं....डिग्र्या घेतल्या म्हणजे माणूस सुशिक्षित म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही ठरत...
आपण जागरूक रहायला हवं....इतकंच.
:)
मला आता वाटतं अपर्णा, की आपल्या आधीच्या पिढ्यांनी खबरदारी नाही घेतलेली..त्यात भर जागांच्या गगनचुंबी भावांची..त्यामुळे आता कली शिरलाय...
खरंय, आपलं दुर्दैव...दुसरं काय?
हेहे!! विद्याधर, किती झकास तात्पर्य काढलयस! चला, आता आम्हांला अजून एक कळलं...तुझ्यासाठी मुलगी शोधायचीच झाली तर ती एकुलती एक हवी! :) गोरी, लांब केसांची हे तर गृहीतच आहे! ( संदर्भ- लांबसडक शेपटी!' :p )
आणि ह्या अशा प्रसंगांना तुला कधीही सामोरे जावे लागू नये...ही इच्छा. :)
दांभिकता बाहेर आली. वरून रसरशीत दिसणारं सोनेरी सफरचंद...आत पूर्ण किडकं निघालं.
घरोघरी थोड्याफार फरकाने हेच घडतेयं. :( संस्कार, शिक्षण सारे काही यापुढे फोल ठरतेयं. शिवाय नंगे से खुदा भी डरता है! त्यामुळे अशा नाती जाळून बसलेल्यांशी आपणही त्याच पातळीवर उतरून लढा देउ शकत असलो तरच काहितरी होईल अन्यथा फक्त जीवघेणा मन:स्तापच पदरात येईल.
काळजी घे गं बयो!
लढा हा द्यायलाच हवा गं...अन्यायाविरुद्ध लढा न देणे म्हणजे अन्यायाला पाठिंबा देणे...हेच शिकवले बाबांनी मला! मामाला विसर पडलाय...माझे बाबा 'विश्वास पाटील' आहेत!'
आभार गं...
:)
माझ्या गेल्या २०-२५ वर्षातील वकिली व्यवसायातील अनुभवातून हे कळून आलेय की - व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरेय ..! आपकमाईतील सोडाच पण जेंव्हा वारस म्हणून बापकमाई हातात येते तेंव्हा आधीच्या पिढ्यांचे ती मिळवण्यात लागलेले कष्ट लक्षात न घेता, वाढून आलेले ताट आपले एकट्याचे आहे असे समजून त्यावर ताव मारण्याची वृत्ती ही व्यक्ती सापेक्ष आहे.स्थावर इस्टेटीच्या `आकाश फाडून जाणाऱ्या किमती' ह्या या सगळ्या नात्यांच्या ऱ्हासास मुख्यत्वे कारणीभूत होत आहेत. सुशिक्षितपणाचा त्यात काहीही संबंध नसतो.
म्हणूनच मी इथे नमूद करू इच्छितो की-
१. पूर्वज जी संपत्ती सोडून गेले आहेत ती आपली एकट्याची नाहीच आहे...तीच्यावर त्यांच्या सर्व वारसांचा हक्क आहे. कारण ती आपण मिळवलेली नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येक भावाचा व बहिणीचा त्यावर आपल्या इतकाच हक्क आहे व हे तत्व आता कायद्याने पण मान्य केलेलं आहे .
२. सर्व वारस हे सारखेच हक्कदार आहेत. परंतु `हाजीर तो वजीर' वा `कसेल त्याची जमीन' या न्यायाचा गैर अवलंब करून, इतर वारसांचे हक्क डावलले जातात व त्यामुळे सर्वच नात्यात दुरावा निर्माण होतो. कारण धनाची (विना कष्ट) अभिलाषा बहुश: प्रत्येकाला कमीअधिक प्रमाणात असतेच. परंतु आपल्याच रक्ताच्या पाठच्या व/वा पुढच्या माणसाचे हक्क हिरावून/ नाकारून, आपण आपल्या मुलांसमोर आपल्या आप्पलपोटेपणाचे /स्वार्थाचे एक उदाहरण घालून, त्यांच्यामध्ये नसलेली विषवेली अंकुरून ठेवतो.
यावर उत्तम उपाय म्हणजे `इच्छापत्र '! आपल्या संपत्तीचे आपणच वाटप करून ठेवावे म्हणजे वारसांना ते मंजूर नसले तरी बंधनकारक असते व त्यायोगे कदाचित उदभवू शकणाऱ्या वादाचे मूळ कारण नष्ट होऊ शकेल व नाती दृढ राहण्यास मदत होईल.
३. आज लोकं इस्टेटीला नामांकन करून ठेवतात. पण हे नामांकन ही फक्त एक कार्यालयीन सोय आहे. ते इच्छापत्र नाही. व त्यामुळे मृत्यू पावणाऱ्याच्या अज्ञानातून, त्याच्या वारसांत मात्र त्यावरून वाद निर्माण होतात. ज्याचे नाव नामांकनावर आहे त्याचा गैरसमज( सोईस्कररित्या) होतो की - माझे नाव ह्या इस्टेटीवर नामांकन म्हणून आहे ह्याचा अर्थ ही इस्टेट माझीच आहे. म्हणून नामांकनाबरोबरच इच्छापत्र लिहून ठेवणे हे आवश्यकच आहे.
खरे तर जी बापकमाई आपल्यापर्यंत येते तिचे आपण रखवालदार असतो व त्याचे संवर्धन करून पुढील पिढ्यांच्या हातात ते सोपवणे हे आपले कार्य असायला हवे.
माझा एक अनुभव - माझ्या एका पारशी पक्षकाराने (७८ वर्षे) आपले घर आपल्या वारसांना [१ मुलगा (बदफैली ) , १ मुलगी (विवाहित) , पत्नी ] यांना न देता त्यांच्या ५० वर्षे शेजारी असलेल्या (आता २ कि.मी.वर असलेल्या ) मुस्लीम दाम्पत्याला दिले . मात्र पैसे सगळे पत्नीला दिले. हे इच्छापत्र करीत असताना मी खूप आश्चर्य चकित झालो होतो. तेंव्हा त्या पारशी गृहस्थाने सांगितले की माझ्या माघारी माझी पत्नीला धमकावून माझा मुलगा घर हिसकवून घेईल व मुलगी, ७५ वर्षाच्या आईला परदेशात नेणार नाही. मात्र माझे शेजारी हे माझ्या पत्नीचा आईप्रमाणे सांभाळ करतील ही मला खात्री आहे.
५ वर्षांनी ते गृहस्थ गेल्यावर मी पुढील कामे केली: - एक आठवडा घरात आईला डांबून ठेवणाऱ्या, अचानक उपटलेल्या मुलाला पोलिसांकरवी अटक, आईची सुटका व पुढील ७ वर्षे त्या पूर्वीच्या शेजारच्या मुस्लीम दाम्पत्त्याने केलेली त्या स्त्रीची स्वतःच्या आईप्रमाणे केलेली सेवा, याचे भरल्या डोळ्यांनी घेतलेले दर्शन!
त्या पारशी गृहस्थांची माणसाची पारख किती अचूक होती!
माफी !! प्रतिक्रिया देण्याच्या नादात मूळ पोस्ट पेक्षा जास्त लिहून बसलोय :(
घरोघरी मातीच्याच चुली !!!
इस्टेट किंवा वाटणीच्या वेळेस शिक्षण ,संस्कार हे सगळं चुलीत घातले जाते...आणि आपलीच माणसे,सगळी नातीगोती सगळी भस्म होतात...जाउ दे..नको तो विषय...काळजी घे !!होइल सगळ ठिक !!
घरोघरी हेच....नाती दुरावली की वाईट वाटतंच...
राजीव, तुमची प्रतिक्रिया ही ह्या विषयावर अतिशय महत्त्वाची व माहितीपूर्ण आहे.
आज जर तुमची हीच प्रतिक्रिया मी पोस्ट म्हणून टाकली तर त्यावर तुमचा आक्षेप नसावा, अशी आशा करते.
खूप धन्यवाद. :)
होईलच सगळं ठीक...खात्री आहे मला. :)
आभार उमा.
सारिका, दु:ख होतंच...पण मी सांगू एक, जी नाती अशा कारणाने तुटतात ना...ती जपण्याच्या लायकीची नसतात...
आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)
एकच भाऊ.. ७ बहिणी.. त्यातली एक माझी आई. लग्न होऊन सासरी गेलेल्या. मालमत्तेचा जणू हाच एक मालक...गावातले घर आणि वाडी विकून मोकळा.. कोर्टात ५ वर्षे केस चालतेय... कधी न्याय मिळणार देवाला ठावूक... घरोघरी मातीच्या चुली...
रोहन, आहेच का तुमच्या घरी पण हे ! ह्या असल्या लबाड्या करून ह्यांना शांत झोप तरी लागत असेल काय ?
Post a Comment