नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 26 February 2011

कि की की?

मी गोंधळले होते. मी उजवी की डावरी? म्हणजे गेलं जवजवळ एक वर्ष मला दोन्ही बाजूने कामाला जुंलं गेलं. तक्रार आहे ही माझी. कोणाकडे? ते नाही माहित. पण आहे...आणि तक्रार करून ठेवलेली बरी, म्हणून सांगतेय. कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला. म्हणजे मला जिने असं ठेवलं, तिला तर वाटत होतं की मी मुळी उजवी आणि डावरी...दोन्ही आहे. म्हणजे तेच ते...अँबीडेक्सट्रस. म्हणून मग केलं मला...कधी डावरं तर कधी उजवं! आणि मला बोलता येत नाही. त्यामुळे जसं मला ठेवलं गेलं तशीच मी बसले. कधी डावरी कधी उजवी! वैताग यायचा! एक वर्ष हे मी सहन केलं! कोणीही ह्याबद्दल काहीही केलं नाही. बघणारे बघत राहिले. मनोमन हसत राहिले. पण केलं मात्र काही नाही! मग काय? मी काय करणार बिचारी? मुकी!

पण दिवस बदलले! कसे कोण जाणे पण माझे दिवस बदलले! ही जी बाई आहे ना...हा असा माझ्या आयुष्यात गोंधळ घालणारी...तिला शेवटी एकदाचे कळून चुकले! कसे देव जाणे! आणि आपल्याला ते काय करायचंय? नाही का? शेवटी आपण झालं काय ते बघायला हवं! ते का झालं आणि कसं झालं त्यात पडू नये! ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड!

तर एके दिवशी ही बाई मला समोर घेऊन बसली! आणि मी म्हणजे काही एक दोन नाही...अहो, मी म्हणजे जवळजवळ आठशे तरी आहे...म्हणजे हिच्या जवळ मी निदान तेव्हढी तरी आहेच! तर जवळजवळ तीन दिवस ही स्वत:ची चूक सुधारत बसली होती! हे तरी तुम्ही मान्य केलंच पाहिजे! एकदा चूक कळल्यावर ती अगदी पार पहिल्या दिवसावरच पोचली! चूक सुधारायला! म्हणजे अगदी आरंभापासून इतिपर्यंत तिने मला सुधारलं. सगळीकडे उजवं केलं. म्हणजे काय केलं? अहो मी सर्वात उजवीच आहे! कळलं का तुम्हांला? अजून नाहीच का कळलं? कम्मालेय!

अहो, मी म्हणजे 'की'!
म्हणजे तुम्हीं जेव्हा मराठी लिहिता, त्यावेळी बरेचदा तुम्हीं मला वापरता...म्हणजे समजा तुमचं वाक्य आहे...मी असं म्हणालो 'की'...मी असं ऐकलं 'की'.....
ती मी 'की'!! आता तरी कळलं?

तर, गेलं वर्षभर ह्या अनघाबाई मला कधी ऱ्हस्व (हे जोडाक्षर नीट टाईप होतच नाहीये! पंधरा मिनिटं घालवली मी त्यावर!) तर कधी दीर्घ करून ठेवत होत्या! म्हणजे कधी 'की, तर कधी 'कि'! आणि बिचारी मुकी मी! मी काय करणार? बसले चरफडत! म्हणजे तिच्या एका पोस्ट मधील हे वाक्यच घ्या...'पण जर देवाला वाटतंय कि मी त्याची बसण्याची नीट व्यवस्था केलेली नाही...' ह्यातील 'कि' दिसला? असा होता! आता नका अगदी मुद्दाम जाऊन बघू! बाईंनी केलंय आता मला दुरुस्त!

आता विचारा, कशा काय सुधारल्या ह्या बाई! अहो, अमेरिकेहून सांगावा धाडला गेला! अगदी पत्रच आलं म्हणे! मॅडमच्या मैत्रिणीने वाचवलं शेवटी! अपर्णा! ओळखता ना तिला? तिचं पत्र आलं! सक्काळी सक्काळी! मोठ्या एक पोस्ट तयार करून घेऊन आल्या होत्या....गरमागरम! हापिसात! आधी पत्रपेटी उघडली तर तिथे हे प्रेमपत्र! मग काय? बालमोहनच्या ना बाई?! पायाखालची जमीन सरकली! हापिसात तर बाईंचा शब्दकोश नव्हता हाताशी! गोंधळल्या! मग लावला त्यांनी त्यांच्या आदरणीय गुप्ते सरांना फोन!
"सर!"
"अरे व्वा! आज सकाळी सकाळीच कशी म्हाताऱ्याची आठवण झाली?!"
"काय हो सर!!?"
"अगं, गंमत केली! बोल बोल! काय झालं?"
"सर...आपण बोलतो ना...की मी असं म्हणतेय की...त्यातील 'की' आपण लिहिताना दीर्घ लिहितो की ऱ्हस्व?"
"दीर्घ! आमच्या वेळी तर त्यावर एक अनुस्वार पण असे आणि पुढे एक स्वल्पविराम. पण हल्ली अनुस्वार कमी केल्याकारणाने आता फक्त दीर्घ की लिहिला जातो! पण आता तुला का हा प्रश्न पडला?"
"अहो नाही सर...मी तुम्हांला म्हटलेलं ना की मी हल्ली मराठी ब्लॉग लिहिते...त्यात ना, मी गेलं वर्षभर की हा शब्द, कधी दीर्घ आणि कधी ऱ्हस्व लिहून ठेवलाय! आणि आज ना सक्काळी सक्काळीच मला माझ्या एका नव्या मैत्रिणीचं पत्र आलंय...ह्याबाबत!"
"हो का? अरे व्वा! मला आधी ह्याचाच आनंद झालाय की तुला शुद्धलेखनाची एव्हढी पर्वा अजूनही वाटतेय!"
"म्हणजे काय सर!? अहो, बालमोहन! विसरलात का?"
"अरे नाही! ते नाही विसरलो! पण हल्ली सगळीकडे 'आर्शिवाद' वाचून मी आता ह्या अशुद्ध लेखनाचा त्रास करून घेणंच सोडलंय!...मग काय आता....घालीन लोटांगण! चूक मान्य करून टाका!"
"हो! ते तर करेनच मी सर! पण आता सगळं सुधारल्याशिवाय नाही लिहिणार पुढे!"
"अगं, मला ना ते तुमचं इंटरनेट नाही कळत आणि ते तुमचं मोबाईल प्रकरण पण नाही कळत! म्हणून मग वाचलं नाही जात तुझं लिखाण!"
'माहितेय ते मला सर....मी ना त्यातल्या त्यात जे बरं लिहिलं गेलंय, त्याचे ना तुम्हांला प्रिंट आउटच पाठवते!"
"हा! ते बरं होईल बघ!"

तर असा काहीसा संवाद, गुरु शिष्येत घडला...

मग बाईंना शाळेतील दिवस आठवले...अशुद्धलेखनावर, शिक्षा काय? तर तो शब्द काढा लिहून वहीच्या पानभर! मग काय? बाई दिवसभर वेळ मिळेल तसा, ब्लॉगवर मागेमागे जाऊन माझे हातपाय धड करत गेल्या! डावीकडचा पाय उजवीकडे!...कॉपी पेस्ट...कॉपी पेस्ट...कॉपी पेस्ट...एक दिवस...दोन दिवस...आणि तिसरा दिवस! बाई तीन दिवस हे एव्हढंच करत होत्या! जवळजवळ २८८ पोस्टा त्यांना सुधाराव्या लागल्या! केलं त्यांनी! न करून सांगतायत कोणाला....

तर मंडळी, आशा आहे की आता बाई पुन्हा कधीही अशी चूक करणार नाहीत आणि 'मी' जी उजवी आहे...ती उजवीच तुमच्या समोर येईन! आता नवीन चुका केल्या तर काही सांगता येत नाही हा! पण असं काही मिळालं तर वेळीच सांगा! असे थांबू नका १००० होईस्तोवर! कारण 'की' हा शब्द तुम्ही इतक्या वेळा वापरता...की बाई जवळजवळ २८८ X २ (कमीतकमी!!) कॉपी पेस्ट करत होत्या!! :)

आता जरा व्याकरण बघुया का 'की' ह्या शब्दाचं?
की:
१) उभयान्वयी अव्यय - अथवा, किंवा. (अ+व्यय - कधीही न बदलणारा)
संशयबोधक अव्यय - 'की माझे दुर्दैव प्रभूच्या मार्गात आडवे पडले?'
२) प्रश्नावर जोर देण्याकरिता प्रश्नाच्या शेवटी पुष्कळदा योजतात. जसे: मी देतो की, येतोस की, जातोस की.
३) स्वरूपबोधक अव्यय. जे, असे. 'ते बोलले की आम्हांस यावयास बनणार नाही.'
हा शब्द एक अव्यय असल्याकारणाने कधीही बदलत नाही। त्याआधी स्त्रीलिंग वा पुल्लिंगी काहीही आले तरी देखील 'की' हा दीर्घच रहातो.
(संदर्भ, गुप्ते सर!)
किं:
कोण? कोणाचा? काय? हा शब्द बहुव्रीहि समासात नेहेमी येतो. जसे- किंकर्तृक= कोणी केलेले? कोण कारण झालेले? किंप्रयोजक= कोणत्या कामाचा किंवा कोणत्या उपयोगाचा?
(संदर्भ- महाराष्ट्र शब्दकोश. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे.)

:)

29 comments:

सौरभ said...

सर्व ब्लॉगमंडळींमधे दवंडी पिटवा... "restiscrime"वरील ब्लॉगपोस्टमधे चुकीचा "कि" मिळवा आणि लेखिकेकडुन भरघोस पारितोषिक मिळवा... :D

Anagha said...

सौरभाssss!!!!
बऱ्याच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया तुझी आलीय...म्हणून सोडतेय तुला!!! नाहीतर फटके मारणार होते!!!!
:D :D

आणि जरा स्वत:चं शुद्धलेखन सुधारशील का?
लेखिके'कडुन' काय? 'कडून'! लिही आता निदान पाच पन्नास वेळा! :)

Raindrop said...

husshhhyaaa....damle me vachta vachtach....ani tu basun sagale 'kee' correct keles??? kamaal aahe!!!

सौरभ said...

मि बरोबरच लीह्लय... आता सांगीतल्याप्रमाणे पाच पन्नासवेळा लीह्तोये. :D
५५५५५५५५५५-५५५५५५५५५५-५५५५५५५५५५-५५५५५५५५५५-५५५५५५५५५५ :))

Anagha said...

अगं! मग काय चुकीचंच ठेऊन देऊ?! :)
किती टोचायला लागली होती माहितेय ती 'की' मला?! :p

Anagha said...

व्वा व्वा!!! सौरभ! :D

अपर्णा said...

सौरभने मुददाम मी चुकवलाय...:P
अनघा बाकी तू त्यामागचं रहस्य़ शोधलंस हे मस्त केलंस नाहीतर माझी "की" घोक्कंपट्टी आणि मागे शाळेत अख्ख्या वर्गाला बाईंनी लिहायला लावलं होतं निव्वळ त्यामुळे लक्षात राहिलेली होती आता अनघाच्या पोस्टमुळे कायम लक्षात राहणार.....
नेमकं आजच्या खास दिवशी ही पोस्ट वाचते...

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

rajiv said...

ये तो "मास्टर`की' " बन गयी ...!!
पूरा ब्लॉग जो खुल गया उससे .... रिपेअरिंग के वास्ते .. :(

Anagha said...

अपर्णा, हे मला आता लेकीमुळे कळलंय! नुसतं पाठांतर करू नये! विषयाच्या मूळाशी जावं म्हणजे गोष्ट नीट लक्षात रहाते!
तुला धन्यवाद आणि तुलाही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. :)

rajiv said...

मिस. परफेक्शनीस्ट , आपण मराठी भाषा दिनानिमित्त त्या 'की' ने एकदम व्याकरणाची पण तिजोरी आमच्यासाठी उघडलीत की.....!!!
तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच, या सगळ्या अथक कष्टांबद्दल .

Anagha said...

राजीव, दरवेळी नजरेसमोर ती चुकीची 'की' आली की दु:ख करत बसण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकलेला बरा नाही का?! :) आणि शाळेत अशुद्ध लेखनासाठी अशीच तर शिक्षा असायची...काढा लिहून १०० वेळा! मग तेच केलं! :)

हेरंब said...

अनघा,

तू संपूर्ण ब्लॉग मधला 'कि' दुरुस्त केलास?????? मानलं तुला.. फेटाउछाल !!! (हॅटस ऑफ)

[तरीच तीन दिवस रेस्ट इज क्राईमने रेस्ट घेतली होती ;)]

Anagha said...

फेटा उछाल!! :D
जागतिक मंचावर असं चुकीचं मराठी कसं ठेवून देणार हेरंबा?! मग बसले चूक सुधारत! :)

हो! म्हणजे 'रेस्ट' घेऊन काही 'क्राइम' नाही केला मी! ;)

sanket said...

हा लेख वाचताना मला उगाचाच "सत्याचे प्रयोग" आठवत होते. गांधीनंतर तूच !!

मलापण माझ्या ब्लॉगवर असलेल्या चुका शोधून काढाव्या लागतील.तुझा आदर्श डोळ्यांसमोर आहे "की" आता !! "की" ची चूक तर मी केलीच नसणार बाकी !! शाळेत एक धडा पक्का केला होता , मराठीत "की" असते ते हिंदीत "कि" असते. अरे हो , मी अजूनही " तो म्हणाला की, असे असते ." असेच लिहितो,"की" नंतर स्वल्पविराम !(अर्थात ब्लॉगवर लिहितांना ते सुटले असण्याची शक्यता आहे. ;) हेहे !)सध्या तो नियम कालबाह्य ठरवलाय की नाही याची मला कल्पना नाही बुवा !!
तुझ्या प्रांजळपणाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मी गुपचुप सुधारणा केली असती,कुणालाही सुगावा लागू न देता. :D

Anagha said...

संकेत! :)
चुका करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी असातसा सोडणार नाहीच! :p
आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा...नाही का? म्हणून हा प्रपंच! :)

आभार रे! :)

nileshnaik said...

Wah..wah..Hatt off!!!me assach mhananar...karan tuje shabda khoop majeshir ani Khoop hasnya sarakhe asatach....(Based on Real Life)Hyat maja kahi chukala nasel na..Lihitna...Naghax!! :)

neela said...

शाब्बास अनघाताई!!! बालमोहनची लाज राखलीत... अभिमान वाटतो तुमचा..... बाकी तुमचे सगळेच लेख मस्त असतात, त्यामुळे प्रत्येकावर comment देत बसत नाही.. (मला माहितेय याला आळशीपणा म्हणतात.. :-)... )

Anagha said...

नीला...माझ्या शाळेतील भगिनीची ही अशी प्रतिक्रिया वाचून मला किती आनंद झाला, काय सांगू! खूप आभार गं! :)

Anagha said...

निलेश भाऊ, टाइप तर इंग्लिश मध्ये केलयस! त्यात मी आता काय चुका काढू?!
आभार प्रतिक्रियेबद्दल! :)

Shriraj said...

:)
भाग्यश्रीचे काही दिवसापुर्वीचे एक पत्र माझ्या डोळ्यासमोर आले... मी 'गालफड' ऐवजी 'गालफट' लिहिलेलं :D

Gouri said...

अग ही पोस्ट बघितलीच नव्हती मी ... सध्या आगरकर वाचते आहे, त्यामुळे जुन्या भाषेतला ‘कीं’भेटला तिथे. एखादी चूक सापडल्यावर डोळ्याला फार त्रास देते ना? पण बसून सगळ्या ब्लॉगवर दुरुस्त केलंस म्हणजे गुरू आहेस. पुढच्या पोस्टमध्ये पायाचा फोटो टाक, नमस्कार करते.
माझ्या एका पोस्टमध्ये नावातच चुकलंय ... ‘सरहस्यानि’ च्या ऐवजी ‘सरहस्याणि’ झालंय. पण पोस्ट पुन्हा पब्लिश केली म्हणजे सगळीकडे नव्या तारीख- वेळेने येते म्हणून इतके दिवस मी ते तसंच ठेवलंय. :( पुढच्या वेळी अशी चूक सापडली, म्हणजे तुझं नाव घेईन आणि दुरुस्ती करीन.

Anagha said...

:D हेहे!! गौरी, टाकते हा टाकते माझ्या पायाचा फोटू!! पेडिक्युअर करून घेते आधी! ;)

Anagha said...

श्रीराज, माहितेय हे मला! गालफट काय?! :D

THEPROPHET said...

हेहेहे...
सारखं नाही हां बालमोहन बालमोहन... मग आम्ही सुरू करू 'उत्कर्ष मंदिर'!!!! आम्ही आत्ता शांत राहत आहोत कारण 'की' मराठी शाळांमध्ये गटबाजी नको :)
अन हो.. 'बहुव्रीहि' मला लहानपणापासून प्रचंड आवडतो.. का माहितीय??? म्हणून बघ तीनचारदा!!! :D:D:D

भानस said...

मीही विद्यासारखे शिशुविहार सुरू करीन हं का अशाने. :P

बाकी, या ’ कि ’ ची खेळी मजेशीरच म्हणायची. आपली मराठी भाषा साहेबासाच्या भाषेसारखी सहज नाहीच मुळी. :D वाक्यानुरूप रंग माझा वेगळा! :)

आणि त्या ’ र्‍ह” वर इतका वेळ कशाला दवडलास तू?

Anagha said...

हेहे!! अगदी अगदी आभार गं भाग्यश्री ह्या 'र्‍ह' साठी!!! कसा मिळवलास तू?! आता बदलते मी तो बसून!! :p

Anagha said...

:D अरे, विद्याधर, कसली गटबाजी चालायची माहितीय तुला?! बालमोहन आणि राजा शिवाजी!!! दहावीत किती मुलं बोर्डात येतायत ह्यावरून!!! आमची दहा तुमची फ़क्त ५! असा वाद!!!

:D:D हा 'बहुव्रीहि' पण मी तीनदा शब्दकोशात तपासून मग टाइप केलाय! :p

रोहन... said...

वाचून मनी आनंद जाहला.. :)

Anagha said...

रोहन, :D