काल एक फुलपाखरू घरात बागडत होतं. काळं कुळकुळीत. जशी काही एखादी सावली....इकडे तिकडे उडणारी. आणि त्याबरोबर बागडणारे खरे रंगीबेरंगी फुलपाखरू नाहीच. फक्त धावणारी सावली. माझ्या इतकी हाताजवळून गेली की त्या नाजूक सावलीचा स्पर्श देखील हलकाच कळावा. सावलीचा स्पर्श. मी हलकेच माझी बोटं हलवली. सावली उडाली. आणि मला आठवण झाली...
...त्यादिवशी देखील अशीच एक सावली खोलीतील क्षीण प्रकाशात मला दिसली होती. मध्यरात्रच होती. ती सावली माझ्या मानेवर हुळहुळून सरकली होती. आणि म्हणूनच मला जाग आली होती. भीती. भीती दाटली मनात. मी उठले. त्या सावलीवर मी सपाताचा वार केला. एक दोन तीन. अज्ञानातील चढती भीती. सावली थरथरली. माझा वार प्रबळ झाला. धडपडत ती निष्प्राण झाली. मी लहानग्या लेकीला कुशीत घेतलं आणि तिच्यावरील नकळत आलेलं संकट दूर केल्याच्या आनंदात डोळे मिटले.
खोलीत प्रकाश शिरला तेव्हा सवयीनुसार जाग आली. सपाता पायात सरकवण्यासाठी पाय पुढे नेले. आणि जागतेपणाचा पहिला इशारा...अंगावर शहारा आणून गेला.
एक निष्पाप फुलपाखरू मरून पडलं होतं. चेचलं गेलं होतं. फाटके पंख, चिमुकला जीव. चिरडून गेला होता.
मला अंधाराने आंधळं केलं...जाणीवा नष्ट केल्या आणि माझ्या हातून ते फुलपाखरू मेलं. रात्रीच्या अंधारात मी केलेले ते वार आठवले. जीवाच्या आकांताने केलेले घाव. धस्स झालं. जर गेल्या जन्मावर विश्वास ठेवावा तर फुलपाखराचं आणि माझं असं काय नातं होतं? का त्याने मानेला नाजूक स्पर्श करून मला उठवावं आणि मग हे असं माझ्या हातून क्रूर मरण ओढवून घ्यावं? हे देणे, गत जन्माचे?
तो हाताच्या दोन पेराइतकासा जीव आणि पलंगावर माझ्यावर विसंबून, निवांत झोपलेला तितकाच निरागस एक जीव.
रात्री, खोलीतील मिट्ट काळोख दूर करणं खरं तर काही कठीण नव्हतं.
एकाच बटणाचे तर अंतर आणि त्यावर अवलंबून एक आयुष्य...
ते शरीर उचललं....
ती नाजूक कुडी...तळहाताएव्हढी...
कुंडीतील रातराणीला अर्पण केली...
निसर्गाला मान निसर्गाचा...
संपले असेल काय ते माझे आणि फुलपाखराचे देणे?
निदान ह्या आयुष्यात...
44 comments:
थोडे शब्द उसने देशील का???
कमेंट्स दयायला !!!
निःशब्द.. ! फारच संवेदनशील !! आता प्रत्येक वेळी फुलपाखरू पाहिलं की ही पोस्ट आठवेल !
काय बोलू... शब्दच संपले :(
अप्रतिम
दीपक! आभार! :)
निसर्गाला मान निसर्गाचा...
प्रत्येक वेळी फुलपाखरू पाहिलं की ही पोस्ट आठवेल !>>>
हेरंबा, मी ते मरून पडलेलं फुलपाखरू कधी विसरूच नाही शकलेले...
आभार रे!
सुहास, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आभार आनंद...
अप्रतिम!!!
very sensitive , dolyat pani annari
निःशब्द..फारच संवेदनशील !!
अनघा, कधीकधी अजाणता असं काहीतरी हातून घडतं, आणि मग ते आयुष्यात कधी विसरता येत नाही. नेहेमीसारखंच सुंदर लिहिलं आहेस!
अश्याही गोष्टी होतात आयुष्यात याची कल्पनाच नव्हती.
मनःपूर्वक आभार या करून दिलेल्या जाणीवे बद्दल .
शब्दातीत...
फारच सुरेख... माझ्याजवळ शब्द नाहीत!! :-|
बा द वे.. मला माझ्या आतेभावाचा छोटासा पोरगा आठवला...
तो फुलपाखरू ला फुलपाखडू म्हणतो! :D
आ का, आभार...
सौमित्र, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद रे.
योगेश, आभार... :)
हो ना गौरी, ते एक चित्र डोक्यात बसूनच रहातं...
आभार गं.
Akshu....आभार, प्रतिक्रियेबद्दल.
सिद्धार्थ, धन्यवाद...
विद्याधर, फुलपाखडू, छान किती दिसते...!
:)
उमा, आभार. :)
speechless.....
apratim...
थोडे शब्द उसने देशील का???
कमेंट्स दयायला !!! +111111
:) संकेतानंद!!
very sensitive...nice
आभार, योग...
एकदम जबरा....बोलती बंद...
अपर्णा, आभार गं! :)
नि:शब्द.....!!!
:)
व्वाह व्वाह व्वाह!!! कोणतही फुलपाखरू एवढं सुंदर नसेल जेवढं सुरेख त्याबद्दल लिहलं आहे.
पण अरेरेरे!!! बिच्चारं फुलपाखरू. एक चिटिंग आहे राव. ह्या फुलपाखराच्या जागी जर डास/माशी/पाल असती तर त्यांचा कोणी एवढा विचार नसता केला. फुलपाखरू नाजुक सुंदर दिसतं म्हणुन नेहमी भाव खाऊन जातं.
खुप सुंदर!
लहानश्य़ा बाबतीतली मोठी गोष्ट..
सौरभ +१...
बिचारी माशीतरी काय त्रास देते कुणाला? जग सुंदर लोकांची बाजू घेतं हेच सत्य! स:P
सौरभ, शहाण्या, रक्तपिपासू डास मेल्याचे काय दु:ख करू?? आणि काल पोस्ट टाकली आणि माझ्या मनात हेच आलं होतं, कि सौरभबुवा आता डास, झुरळं आणि पालींसाठी शोक करणार! :p
:D
विद्याधर, देते माशी त्रास देते! बाळांना उठवते! लेक बाळ होती तेव्हा माश्या मारण्यावर मी मस्त नैपुण्य मिळवलं होतं! :p
मीनल, धन्यवाद... :)
अनघा! काय बोलू? अगदी तरल! -आणि दोन अनुभवांचा मेळ घातलेला अनुभव जो तू आम्हाला देतेस, वा! अप्रतिम!
आभार विनायक... :)
प्रथम वाचले तेव्हां नि:शब्द झाले... मग मूकच राहिले. आज पुन्हा वाचले... वाटले आता आम्हां सगळ्यांकडून त्या फुलपाखराचे देणे असावे... अविरत!!!
खरंय...
अनघा, तू खूप हळवी आहेस गं!!!!
ह्म्म्म...काsssही भलं होत नाही असं हळवं असल्याने! :)
Post a Comment