नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 12 February 2011

माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो...

एक गोष्ट लिहिली होती. वय वर्ष अंदाजे दहा. बकुळी नावाच्या राजकन्येची. मग बाबांनी ती वर्तमानपत्राकडे पाठवली. आणि ती छापून देखील आली. मला वाटतं सकाळ मध्ये. बाबांच्या घरी त्यांच्या कपाटात ते कात्रण कदाचित असेलही. तिथे अनघा पाटील नाव वाचलं आणि पेपर हातात घेऊन उड्याबिड्या मारल्या.

घरी महाराष्ट्र टाइम्स येत असे. त्यात दर रविवारी अगदी वाट बघून सोडवायचे असे ते ह. अ. भावे ह्यांचे शब्दकोडे. हाताशी बाबांनी घरात आणून ठेवले होते महाराष्ट्र शब्दकोश. भाव्यांचे शब्दकोडे,
शब्दकोश, आईबाबांनी मिळून केलेले चमचमीत मटण म्हणजे पाटलांच्या घरचा रविवार. जवळजवळ दोन दशके.
त्याच सुमारास अगदी मन लावून लिहिलेली दिल्लीत रहाणाऱ्या मामेबहिणींना लिहिलेली मजेशीर पत्रे. अस्सल मराठीत.

मग कॉलेज. आणि फिरत्या कालचक्रानुसार प्रेमबीम. त्यामागोमाग दैनंदिनी. आता वाचायला घेतली तर बालिश वाटेल अशी. पण तेव्हाचा आधार. त्यात्या वेळी गळफास झालेले प्रश्न मन लावून ऐकणारी
दैनंदिनी.

मग हे बाहेरचं अक्राळविक्रा
जग. जाहिरातक्षेत्र. अतिशय स्पर्धक. त्या विश्वात तग धरून रहाण्याची एक धडपड. कधीकधी चमकणारी कधी फक्त धुमसणारी. आयुष्यातील पहिले बॉस आनंद गुप्ते. बाबांखालोखालचा हा आधार. त्यांना आता उगाच जग अवधूत गुप्तेचे बाबा म्हणून ओळखतात. हे माझे सर, उत्कृष्ट मराठी लिहितात. त्यावेळी त्यांची कॉपी आणि माझे आर्टडिरेक्शन. क्लायंट, जैन ठिबक सिंचन आणि युनायटेड वेस्टर्न बँक. भारतामध्ये त्या काळी जाहिरातक्षेत्रात कॅग स्पर्धा जोमात होती. मग आम्ही दोघांनी मिळून, आमच्या मराठीतील कॅम्पेन्सच्या जोरावर काही चंदेरी सोनेरी अवॉर्ड्स मारली.
त्या अवधीत मराठीशी हा असा संपर्क.

त्यापुढील कालावधीत मराठीतील वर्तमानपत्र नित्यनेमाने वाचणे आणि घरी मराठीत बोलणे एव्हढाच काय तो मराठीशी संबंध. बाकी कामानिमित्त वापरली जाणारी भाषा इंग्रजी वा हिंदी.
त्याच माझ्या क्षेत्रातील अतिशय आवडणारी टॅगलाइन म्हणजे श्री वसंत बापटांनी महाराष्ट्र
टाइम्ससाठी लिहिलेली...महाराष्ट्र टाइम्स, 'पत्र नव्हे मित्र'. तीन शब्दांमध्ये पकडलेलं सार! आता जेव्हा ICICI Prudential Insurance ची टॅगलाइन, 'जिने का इन्शुरन्स लिया क्या?' गावोगाव झळकताना दिसते तेव्हां मन उद्विग्न होतं...वाटतं उद्या हे माझ्या श्वासावर देखील पैसे लावायला कमी नाही करणार.
असो...


एक दिवस शोध लागला ह्या ब्लॉगविश्वाचा. पुन्हा लिहायला घेतलं...जवळजवळ तीन दशकानंतर. तोपर्यंत आयुष्यातील अनुभवांची पोतडी भरभरून वहात होती... एव्हढीच काय ती जमेची वा वजाबाकीची बाब.

मग नवनवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या ही एक फार मोठी गोष्ट. आणि त्याला धरून आली चक्क बक्षिसे....म्हणजे लिखाण, जगण्याचा आधार आणि बक्षिसे, त्यावरील बोनस.

तुम्हां सर्वांचे मनापासून आभार...मला जगण्याचे बळ दिल्याबद्दल....खरोखर...
:)



33 comments:

Suhas Diwakar Zele said...

अनघा, असच दर्जेदार लिहत रहा.
अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा :) :)

Anonymous said...

अभिनंदन अनघा... लिहित रहा!! :)

सारिका said...

नेहमी लिहत राहा....तूला मनापासुन शुभेच्छा!!

Gouri said...

आजच्या पाटीवर विश्रांतीला गुन्हा म्हणणार्‍या या बाईने काय लिहून ठेवलं असेल म्हणून हल्ली रोज इकडे फिरकावंच लागतं अशी (माझ्या जालावरच्या धूमकेतूपणावर मात करणारी) सवय तू लावून ठेवली आहेस ;) ... अशीच लिहित रहा (आमच्यासाठी) :D

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

मन:पूर्वक अभिनंदन गं अनघा! नियमीत लिहितेस ते आवडतं मला. अशीच लिहीत रहा. साहित्याची पोतडी इथे रिती होऊ देत.

THEPROPHET said...

अभिनंदन ताई!!! लिहित रहा!!! :)

देवदत्त said...

अभिनंदन अनघा :)

Anagha said...

सुहास, सर्वप्रथम तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा! :)
आणि धन्यवाद! मंडळ आभारी आहे! :)

Anagha said...

तन्वी, आभार गं! :)

Anagha said...

सारिका, नेहेमी वाचत रहा... :)
खूप खूप आभार गं. :)

Anagha said...

गौरी! :):):)
आभार गं...रोजरोज भेट दिल्याबद्दल...अशीच येत रहा...मला खूप बरं वाटतं... :)

Anagha said...

कांचन, मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! :)
आणि धन्यवाद गं! :)

Anagha said...

विद्याधर! आज तरी आभार मानायलाच हवेत. नाही का? म्हणून....मंडळ आभारी आहे! :)

Anagha said...

देवदत्त, धन्यवाद! :)

Raindrop said...

ye kya ho gaya...achanak???

Anagha said...

वंदू, 'मी मराठी'च्या कथा स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याचं काल कळलं...मग ज्यांच्यामुळे मिळालं त्यांचे आभार नको मानायला... :)

Anonymous said...

अनघा,
अभिनंदन!! लिहित रहा.

Anagha said...

धन्यवाद महेंद्रजी. :)

सौरभ said...

आता मी अभिनंदन करायचं म्हणजे उगीच आपले शिष्टाचार केल्यासारखं... अपन नुसताच स्माईल करेगा... ये तो शुरुआत है! पुरी फिल्लम बाकी है. और पार्टीभी :)

Anagha said...

हेहे!! आधी दर्शन तर द्या सौरभबुवा, नंतर बघू पार्टीचं! :)

अपर्णा said...

अनघा, अभिनंदन You deserv it आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा ..Gauri +++++++++++

Anagha said...

अपर्णा, आभार...खूप खूप! :)

Soumitra said...

apratim

panda said...

अनघा, मन:पूर्वक अभिनंदन. असेच लिहित रहा. अभिनंदनाचे असे प्रसंग वारंवार येवोत, या शुभेच्छा !!!

Anagha said...

सौमित्र, आभार. :)

Anagha said...

:) पंकज, आभार.
आणि ह्या विश्वासाबद्दल देखील धन्यवाद. :)

भानस said...

अनघे, त्रिवार अभिनंदन! बयो, अशीच भरभरून लिहित राहा! :)

Anagha said...

हेहे!! कित्ती वाट बघत होते मी तुझी!!! आभार आभार ग! ह्या यशात तुझा वाटा पण आहेच ग सखे! :)

हेरंब said...

बक्षिसे आणि बोनस..... अँड काउंटिंग... !! :)

मनःपूर्वक अभिनंदन !!अशी अनेकानेक अभिनंदनं करण्याचे योग आमच्यावर येत राहोत.. :)

Anagha said...

आभार आभार... हेरंब, मंडळ आभारी आहे! :)

Shriraj said...

अनघा, तुझ्या ब्लॉग वर मी पहिल्यांदा कसा आलो कुणास ठाऊक, पण मी देवाचे नेहमी आभार मानतो कि त्याने मला तुझ्या सारख्या एका सुंदर व्यक्तीची ओळख करून दिली.

Anagha said...

श्रीराज, गेल्या वर्षीच्या मार्चपासून आपण एकत्र आहोत आणि त्या मैत्रीचे हे बळ आहे जे आता कायम माझ्याबरोबर आहे....आभार श्रीराज. :)

रोहन... said...

एक एक करून तुझ्याकडची पोतडी रिकामी करत तू आमच्यावर संस्कार करत आहेस ते तुला उमगतंय ना?