नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 7 February 2011

चपात्यांचं गणित

आठ करायला हव्यात. मनाशी म्हटलं. कणिक, तेल, मीठ आणि पाणी. मळायला सुरुवात. जवळजवळ एखाद्या वर्षाने हे काम अंगावर आले होते. चपात्या करणे म्हणजे एक ध्यान लावणे. एकाच प्रकारची क्रिया ठराविक टप्प्यात करत जायची. मनच्या वारूची अवकाशात दौड सुरु.
आधी कणिक मळून ठेवणे, पंधरा मिनिटे झाकून ठेवून देणे, तेव्हढ्या वेळात भाजीची तयारी करणे आणि मग पुन्हा त्या मळून ठेवलेल्या कणकेकडे वळणे वगैरे वगैरे...
ओssssम सुरु.....

जवळजवळ तीन दशकांपुर्वीची गोष्ट.
"अगं, तिला घे हाताशी चपात्या भाजायला." आईने माझ्या मामेबहिणीला फर्मावले. कॉलेजच्या मे महिन्याच्या सुट्टीतील हे ट्रेनिंग. बहिणीच्या चपात्या मऊसूत , पापुद्र्यांच्या. चपात्या करणे हे जेवण करण्यातील सर्वात कठीण काम. आईने माझे चपाती शिक्षण चांगल्याच गुरूवर सोपवले होते.
मग रोज सकाळी सुरू. अक्का काय करते ते तिच्या बाजूला उभे राहून न्याहाळणे. अंतिम निकाल मऊ लागण्यासाठीची पूर्वतयारी. किती पीठ, किती मीठ, किती पाणी आणि किती तेल. मग संगमरवरी पोळपाटावर एक दोन इंची गोळा घ्या, तो थोडा लाटा, त्याचे अंग चिमटवा, मोजकं तेल लावा, घडी करा आणि करा सुरु. लाटायला. अगदी गोल. मग तिला घ्या तव्यावर तुमच्या ताब्यात.
"अगं, उलट!"
"उलटू?"
"हो! मग?!"
.......
"अगं, चिकटली!
धडपड!
"अय्या! फाडलीस कि गं!"
हिरमुसलेला चेहेरा.
"असू दे! पुढची नीट पलट. जरा हळूवार."
मग कुठेही न चिकटता अलगद तप्त तव्यापासून तिला दूर सारून उलटसुलट गरजेपुरते भाजणे जमले. म्हणजे असेही नाही, उभं आयुष्य जाळून उठल्यासारखी. हळूहळू माझ्या चपातीला वाफ स्वत:त कोंडून घेणेही जमले. अक्काची सहनशक्ती संपायच्या आत. गेला बाजार इथे तिथे..'अरे संसार संसार' ची सुरुवात हातावर दिसू लागली होती.
सुट्टी मध्यावर येईपर्यंत खातेबदल घडून आला. अक्काने मोठ्या विश्वासाने लाटणे माझ्या हातात दिले आणि कालथा स्वत:च्या ताब्यात घेतला. त्यामुळे आपोआपच आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.
मात्र पुढील जबाबदारीत आकार महत्वाचा होता. गोलाकार. आता 'वेगवेगळे देशाकार' घडवणे, कसे कोण जाणे पण माझ्याकडून नाहीच घडले. तेव्हांच कळून चुकायला हवं होतं....आपली कुवत काही देश घडवण्याची नाही. आपला एकच तो साच्यातला गोलाकार. जमून गेला.
जिवलग मैत्रिणीबरोबर गप्पांना मग एक वेगळा विषय मिळाला.
"पप्पांना ना मी केलेल्याच चपात्या आवडतात."
"माझ्या पण आता चांगल्या फुगू लागल्यात." वगैरे वगैरे...

मग ह्या पोळपाट लाटण्याची एक वेगळीच आठवण. जवळपास त्याच सुमाराची. त्या आठवणीच्या मध्यस्थानी माननीय अहिल्याबाई रांगणेकर. त्यांनी शहरातील सर्व स्त्रियांना केलं होतं एक आवाहन. सूर्यास्तानंतर सर्व स्त्रियांनी हातात एक थाळी एक लाटणे घ्यावयाचे होते. घराबाहेर उभं राहून सुमारे दहा मिनिटे लाटण्याने त्या स्टीलच्या थाळीवर बडवायचे होते. ढ्यॅढ्यॅढ्यॅण! कारण नाही आठवत. महागाई हे अबाधित चालणारे कारण होते की काय कोण जाणे. परंतु त्यांना पूर्ण पाठींबा देऊन आम्ही घरातील चार स्त्रियांनी, हा ठणाट मोठ्या आवेशात पार पाडला होता. आवाजाचा प्रचंड त्रास होणारे एकमेव पुरुष, बाबा, त्यावेळी घरात काय करत होते कोण जाणे!

मग आठवण
कॉलेजमधील. आई डब्यात तीन चपात्या देत असे. त्यावेळचा माझा मित्र, ( आणि नंतर झालेला नवरा! हो! सांगून टाकलं! उगाच शंका नको! :) ) ...आता तो काही डबा आणत नसे. म्हणजे माझीच जबाबदारी नाही का त्याला घरचं खायला घालण्याची? मग आईकडून जास्ती चपात्या कश्या मागायच्या? आई ऑफिसला निघण्याच्या घाईत आमच्या एव्हढ्या चपात्या करत असे! आणि त्यात आता हे!
"आई."
"काय?" घाईघाईत आईची गणती चालू!
"मला ना हल्ली जास्तीच भूक लागते! आणि तू दिलेला डबा ना सगळ्यांना खूपच आवडतो."
"मग?"
"मग काही नाही! सगळ्या माझ्या मैत्रिणी खाऊन टाकतात ना! मग मला काहीच नाही उरत! तू ना मला अजून दोन चपात्या जास्ती दे बाबा! आणि भाजी पण जास्तीच दे!"
पटलं बुवा तिला! मग पुढली तीन वर्ष मला पाच चपात्या मिळाल्या. तीन त्याला आणि दोन मला!

हे आठवणीचं लाटणं फिरवता फिरवता
सहा चपात्या झाल्या होत्या. दोनच उरल्या.

डोंबिवलीतील गोष्ट. बाळ, हवेत लाथा झाडणे ह्यापलीकडे काहीही करता न येणारं. पाचच्या आसपास स्वयंपाक आटपणे आणि मग सहाच्या सुमारास बाळाला घेऊन फिरायला पडणे हा रोजचा रिवाज. आता हे फक्त एका जागीच पडून रहाणारं बाळ तसं काही भीतीदायक नव्हतंच. मग स्वयंपाकघरात तिला मागे चटईवर ठेवायचं आणि आपल्या चपात्या आटपायच्या. एकदा हे असंच आमचं दोघींचं काम चालू होतं. माझ्या तोंडाची टकळी चालू. काहीही प्रतिसाद मिळाला नाही तरी गप्पा मारण्याचे हे कौशल्य एखाद्या नवजात आईकडूनच शिकावे. एक दहा मिनिटांनी सहज मागे बघितलं तर काय? मागचं माझं बाळ गुल! म्हणजे काय? म्हणजे चटई आपली जागच्या जागी आणि त्यावर बाळ नाहीच! धाबं दणाणलं! लाटण ओट्यावर टाकलं आणि स्वयंपाकघराच्या दारापाशी आले. तिथेही नाही! काहीही न येणार हे बाळं एका क्षणात गेलं कुठे? कुठे मिळालं? बाळाला त्याच क्षणी गडाबडा लोळण्याचा शोध लागला होता आणि बाळ लोळतलोळत संडासाच्या दाराशी पोचलं होतं! म्हणजे हे असं लोळता येतं हे कळल्याकळल्या एकदम आर की पार! पुढल्या क्षणाला एकदम आत शिरलं असतं! "अगं माझे आई!" उचलला तिला! म्हणजे ह्याचा अर्थ उद्यापासून बाईसाहेब झोपलेल्या असताना उरकायला हवाय हा कार्यक्रम!

तर गोल चपात्यांचं हे असं गोल घड्याळ. म्हणजे दिवसाचं घड्याळ बसवायचं ते ह्या चपात्यांवर आधारित. चपात्या करायच्या आधी आणि चपात्या झाल्यानंतर...असं फिरणारं.

सात आणि आठ! झाल्या चपात्या.

चपात्या आणि चपात्यांशी निगडीत लाटत गेलेलं आयुष्य.
कधी संपल्या कधी शिळ्या राहिल्या. मग शिळ्याला चमचमीत फोडणी तर कधी गुळाचे लाडू.
चपात्यांचा आकडा कधी वाढला तर कधी महिनोंमहिने एक आकडी राहिला.
आता कळतं, गणती जास्त म्हणजे आयुष्यात रंगत जास्त.
चढती भाजणी बरी. उतरती खिन्न.
चपात्यांचं गणित. सुखदु:खाशी निगडीत.

हे एव्हढं चपात्यांवर भाष्य करण्याची आज संधी दिली ती आमच्या वैभवीने. बाई गावी गेल्यात. चांगलंच झालं म्हणायचं. मी चपात्या केल्या. करताकरता आयुष्याची गणती केली आणि हे हाताशी लागलं.

हा उद्योग संपल्यावर म्हटलं जरा गुगलकाकांना विचारू, चपात्यांवर त्यांचं काय म्हणणं आहे.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे चपाती हा पदार्थ द्राविड आहे. तिला मराठीत पोळी म्हणतात आणि हिंदीत चपाती! पटलं? अजिबात नाही! मी काय हिंदीत बोलतेय इतकी वर्ष? कैच्याकै!
गुगलकाकांना ह्या आपल्या चपातीचा उल्लेख अगदी पार अकबराच्या ऐने-अकबरीत सापडलाय!

शिकरण चपाती!
ऑल टाइम फेवरीट! न्याहारी म्हणा नाहीतर जेवताना ताटात घ्या!

आणि ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड!
कसं?
:)

22 comments:

BinaryBandya™ said...

छान झाली आहे पोस्ट...

हे आठवणीचं लाटणं फिरवता फिरवता सहा चपात्या झाल्या होत्या. दोनच उरल्या.
"आठवणीचं लाटणं "
"गोल चपात्यांचं गोल घड्याळ"

आवडला ...

Anagha said...

मोठी झालीय ना बंड्या पोस्ट? एव्हढं कधी लिहित नाही मी! पण पूर्ण लिहिल्यावर दोनतीनदा वाचून बघितलं पण काय 'delete' करावं ते नाहीच कळलं! :p
आभार! :)

THEPROPHET said...

मस्त झाली पोस्ट ताई!
>>तेव्हांच कळून चुकायला हवं होतं....आपली कुवत काही देश घडवण्याची नाही. आपला एकच तो साच्यातला गोलाकार. जमून गेला.
हे बेस्टच.. पण हळुवार आठवणीही आवडल्या!!! :)
अन हो..
तू इतकी वर्षं हिंदीतच बोलतेयस! :P

Anagha said...

हेहे!! बघ ना! हे गुगलकाका कायपण थापा मारतात! :)

Yogesh said...

अनघा ताइ...मस्त झाली आहे पोस्ट....आठवणी आवडेश...

सारिका said...

हे अनघा..या शब्दांच्या चपात्या मस्त जमल्यात तूला..!!

Anagha said...

धन्यवाद योगेश! :)

Anagha said...

हेहे!! आवडल्या ना गं सारिका तुला माझ्या चपात्या? खा हो भरपूर! :p

हेरंब said...

मस्तच. !! 'हिंदी' चपात्यांची कहाणी ;)

देश घडवणं, डोंबिवलीच्या आठवणी, 'मैत्रिणीं'साठी एक्स्ट्रॉ पोळ्या.. सगळंच एकदम झक्कास.. !!

भानस said...

तुझ्या वैभवीला मधून मधून दांड्या मारायला दे. :)

आता कळतं, गणती जास्त म्हणजे आयुष्यात रंगत जास्त.
चढती भाजणी बरी. उतरती खिन्न.
चपात्यांचं गणित. सुखदु:खाशी निगडीत.

अगदी अगदी.:(

ते अहिल्याबाई रांगणेकरांचे भाववाढी विरोधीच असावे गं... मलाही आठवतेय. आमची आई,तिच्या मैत्रिणी आणि आम्ही मुले बडवत होतो. :) अनघे, खूप सुंदर झालेय चपाती आख्यान. आवडेश.

Anagha said...

हेहे! मैत्रिणींसाठी चपात्या! :p
हेरंबा, धन्यवाद! :)

Anagha said...

हो ना गं भाग्यश्री?! कसल्या बडवल्या होत्या आम्हीं थाळ्या! बिच्चारे बाबा! :p
आणि देते मी वैभवीला तुझा निरोप!
आभार गं!

Raindrop said...

chapati ka ganit zara kathin hi hai....geometry gol nahi, number ka mol nahi....and A+B is never equal to AB....it is always A+B only....door door...alag alag....

Anagha said...

वंदू, आता आलीस ना इथे कि आपण वैभवीला सुट्टी देऊया आणि तुझ्या हातच्या चपात्या खाऊया! कशी आहे आयडीया?!
मी मदत करेन गं भाजायला! :p

BinaryBandya™ said...

मोठी झालीये थोडी नेहमीपेक्षा पण छानच झालीये ..

Anagha said...

:)

सौरभ said...

वाह वाह!!! क्या बात है!!! एवढं कधी रिलेट नाही केलं ब्वा चपातीला कशाशीही.
>> "गणती जास्त म्हणजे आयुष्यात रंगत जास्त"
गणती वाढवायचीये... हरकत नाही. पोळी-भाजी केंद्र चालू करुयात.
आणि मैत्रिणी डबा खातात होय... अच्छा... हम्म्म... :D ;)

Anagha said...

हेहे! सौरभा!
अमेरिकेहून येऊन काय केलं...तर पोळीभाजी केंद्र चालवायला मदत केली! व्वा व्वा!
;)

Sampada Malavde said...

छान लिहिलंयस ! :)

Anagha said...

आभार गं संपदा. :)

Shriraj said...

आज जेवताना पहिल्यांदा इतकं निरखून पाहिलं चपात्यांना! :)

रोहन... said...

आत्ताच हा विषय बझवर झाला आणि मी नेमका पोस्ट वाचायला घेतला.. :) १९९३ ते २००१ ह्या ८ वर्षात मी भात खाल्लाच नव्हता. फक्त चपात्या. दिवसाला किती ती मोजदाद नाही.. बसलो की फन्ना उडवायचा इतकेच ठावूक... :)