नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 31 January 2011

कर्ता करविता...

एक घटना कानी पडली. ह्यातील व्यक्तिमत्वे काही माझ्या ओळखीची नाहीत. आणि इथे व्यक्तिचित्रण मला अनावश्यक वाटले...म्हणून नाही केले.

बाप लेक एका सामाजिक मान्यता मिळालेल्या शाळेत मुलाखत देण्यासाठी बसले होते. शाळा इंग्लिश माध्यम. मुलाखत लेकाची. बापाची, बाहेरून तपासणी. लेक, वय वर्षे अदमासे साडे तीन. बाप, पस्तीशीच्या आसपास. चाचण्या विविध प्रकारच्या होत्या. गुण नाही तर श्रेणी होती. ए पासून सी पर्यंत. रंग ओळखा, चित्र ओळखा...वगैरे वगैरे. पोरगा चुणचुणीत होता. पाचही चाचण्यांमध्ये ए श्रेणी पटकावली. ह्या ओळखपरेडमध्ये तेथील शिक्षिकांनी मुलासमोर काही सुंदर रंगीबेरंगी खेळणी ठेवली होती. पोराला त्यातले एक फारच भावले. त्याने बापाच्या कानावर आवड घातली. आता पुढील संवाद अगदी तंतोतंत माहिती नसला तरी देखील आपण एक अंदाज बांधू...
"बाबा, ती गाडी छान आहे ना?" बापाच्या कानात हळूच.
"हं."
"ती आपण घेऊन जाउया का?"
"शूsss हळू बोल! असं नाही करू शकत आपण! ठेव ती तिथे!"
"पण बाबा! मला ती आवडलीय! मी घेऊन जाणार!" पोराचा आवाज आता चढलेला.
"बंड्या! ठेव पाहू ते गपचूप तिथे!" बापाचा आवाज बंद दंतपंक्तीतून परंतु जरबेचा.
"बाबा, F x x K YOU!"

समोर मगाशी मुलाची हुशारी बघून प्रेमाने भारलेल्या तरुण शिक्षिका अजूनही बसलेल्याच होत्या.
मुलाची श्रेणी ए वरून त्वरित सी वर आली.

मुलाचा मेंदू हा समजा एक टीपकागद धरला, तर त्या टिपकागदाने घरातल्या घरात रंगांबरोबर बेरंग देखील टिपलेला आहे. बापाने दिलेले हे शिक्षण अधिक प्रभावशाली ठरले आहे.

लेकाला त्या नावाजलेल्या शाळेत प्रवेश मिळाला कि नाही, काही कल्पना नाही.

आसमंतात निराशावाद पसरलेला आहे. सर्वत्र चंगळशाही माजली आहे. भले व बुरे यामधील पूर्वी असलेल्या दरीची आता जेमतेम एक अरुंद भेग उरलेली आहे. घराबाहेर असलेल्या स्पर्धात्मक जगामुळे रोज येणारे निराशेचे झटके वडिलाधाऱ्यांकडून, घरात बाहेर पडतात. कधी मुखातून तर कधी मारहाणीतून.

माझा एक मराठी मित्र...
बाप झाल्यावर त्याचं स्वप्न, शिवाजी घडवण्याचं आहे.
माझा दुसरा मराठी मित्र....
चार वर्षाच्या पोराला ताप जावा म्हणून एक पेग दारू पाजतो, कारण त्याला बायकापोरांना घेऊन दुसऱ्या दिवशी गोव्यासाठी प्रस्थान करावयाचे असते...गोव्यात जेव्हा समुद्रकिनारी अकस्मात नग्न स्त्रिया फिरताना दिसतात..त्यावेळी हा बाप लेकाला टाळी देतो.

कधीही आपली मानसिकता आपण जे काम करत आहोत त्यातून बाहेर येते. समजा आपण दु:खी असलो तर आपण चितारत असलेल्या चित्रात काळा रंग अधिक प्रमाणात उतरेल. वा आपण काही काव्य करीत असलो तर काव्याचे स्वरूप त्यातील शब्द निवडीमुळे, निराशेकडे झुकू शकेल. मग आपण जे एक माणूस नावाचे शिल्प घडवायला घेतले आहे, त्या शिल्पात हीच आपली मानसिकता नाही का उतरणार?

म्हणतात, स्वातंत्र्य मिळाल्यापासून चार पिढ्या फुकट गेलेल्या आहेत. नव्या पिढीने जन्म घेतलेला आहे.
त्यातून शिवाजी निघणार की कलमाडी...
काळ ठरवेल...
दोन्हींला, हातभार मात्र आपलाच आहे.

13 comments:

सौरभ said...

हम्म्म्म...

THEPROPHET said...

पिढ्या तर बर्‍याच फुकट गेल्यात! शिवाजी महाराजांचीही गेलीच असती..पण एका शिवाजीमहाराजांनी अख्ख्या पिढीचं ऍव्हरेज कर्तृत्व उंचीवर नेऊन ठेवलं.
आता एक शिवाजी नाहीत पण शंभर १/१०० शिवाजी निपजले, तरी लाखो कलमाडी असूनदेखील काही फरक पडणार नाही!
पण पण पण....

शिवाजी जन्माला घालणारे शेजारी नाहीत सध्या!!! :(

हेरंब said...

कठीण आहे सारंच !!

BinaryBandya™ said...

माझा एक मराठी मित्र...
बाप झाल्यावर त्याचं स्वप्न, शिवाजी घडवण्याचं आहे.

सगळेच शिवाजी झाले नाही तरी चालतील ..
पण असा तुमच्या मित्रासारखा विचार करणारे बाप जरी जन्माला आले तरी बराच फरक पडेल ...

Anagha said...

खरंय बंड्या....

Anagha said...

आता तुम्हां सगळ्यांवर जबाबदारी आहे ही विद्याधर...शहाजी होण्याची! आणि जिजामाता शोधायची!
:p

Anagha said...

काय झालं सौरभ?

Anagha said...

ही एकेक माणसं दिसतात ना हेरंब, मुलांना वाढवण्याबाबत वेगवेगळे विचार बाळगणारे....मग प्रश्र्नच पडतो....कि end product काय होणार आहे?!

Yogesh said...

>>आता एक शिवाजी नाहीत पण शंभर १/१०० शिवाजी निपजले, तरी लाखो कलमाडी असूनदेखील काही फरक पडणार नाही!
पण पण पण.... +123

खुप कठीण आहे :(

Anagha said...

खरंच काळ खूप कठीण आलेला आहे योगेश....

Shriraj said...

एवढा गंभीर लेख वाचून तुझी पुढील कमेंट वाचताना मी गरजेपेक्षा जरा जास्तच हसलो -
"आता तुम्हां सगळ्यांवर जबाबदारी आहे ही विद्याधर...शहाजी होण्याची! आणि जिजामाता शोधायची!"

Raindrop said...

one can only raise them as good as one is....not better, not worse....future depends on what our past has been

Anagha said...

Don't know Vandu. Now we need to look beyond our past...I feel.