नशिबाच्या चक्रात फिरणे. गोल गोल. मग तोच तोचपणा.. आकाश तेच. चांदण्या त्याच. सगळ्या रात्री तश्याच. कदाचित जवळून बघितलं तर रातकिडे देखील तेच असतील. तोच युगांयुगांचा सूर खेचत. हेच मला आवडत नाही. एकसूरीपणा मनास पटत नाही.
उघड्या दरवाजातून निघायचं. सरळ समोर चालत राहायचं. रात्रभर. हे असं चालण्याची मात्र मजा काही औरच. एक रस्ता धरायचा आणि चालत जायचं. हे असं मी कधीपासून करतो आहे....नाही आठवत. कित्येक वर्ष. पण इथे कोणालाच कोणाकडे बघायची सवड नाही. थोडं स्वत:ला बाजूला ठेवून समोर बघा, त्याच्या आयुष्यात काय होतंय ह्याचा विचार करा...पण हे तर दूरचच. खूप विचार केला मी ह्यावर. रात्र रात्र घालवल्या...कूस अदलबदल. कापूस भिजून गेला...पिंजून गेला....पण उत्तर नाही मिळालं. कधी मनात आलं, आत्महत्या केली तर हे जग माझी नोंद घेईल काय? आत्महत्या... नव्हे...प्राणत्याग. म्हणजे नाहीसेच होऊन जायचे ह्या जगातून. मग ही दुनिया माझी आठवण काढून टिपे गाळेल काय? तसं माझ्यात काय आहे की जगाने माझी नोंद घ्यावी. चेहेऱ्यावर डाग...पांढराफटक रंग. त्यामुळे तर डाग अधिक उठून. लोकांना आस सौंदर्याची असते. हाव असते....ओढ असते पराकोटीची. मग माझ्याकडे कोण बघणार? मी लपुनछपून बाहेर पडतो. कधी स्वत:ला झाकून घेतो. हे असे मी कित्येक तप केले. पण एक दिवस अतिरेक झाला. वेदनेने तीव्र रूप गाठले. उपाय शोधावाच लागला. काय...काय करू मी? काय उपाय शोधला मी?
...रूपे...मी रूपे धारण केली. रोज एक. बाहेर रात्रीच पडायचो...पण वेगळी रूपे धारण करून. कधी कोणासमोर रेंगाळायचो. कधी डोकावायचो...डोळयांत निरखत रहायचो. कधी कोणी दखल घेऊ लागले...त्यांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह तरळू लागले. काल ज्याला बघितले तो काय हाच होता? लोक एकमेकां विचारू लागले. वादविवाद करू लागले. मला धीर आला. मला हुरूप आला. कित्येक वर्षांनी कोणी माझी दाखल घेतली होती. अशी पंधरा रूपे शोधली. आरशासमोर तास दोन तास बसून रहायचो. अभ्यास करावा लागला. चवदा रूपे सहज मिळाली. प्रारंभी आरशात बघून स्वत:चे चित्र काढून ठेवले. आणि नीट आरशालाच डकवून टाकले. तारीख लिहून. पंधरावे मात्र खूप कठीण गेले. कळत नव्हते काय करावे. मनाशी खुणगाठ तर पंधराची होती. ह्या खेळाची एक धुंदीच चढली होती. रंग चढवायचो, बुरखे पांघरायचो...किती आणि काय काय. पण आता पंधराव्या दिवसाचे काय? असाच बसून राहिलो होतो आरशासमोर. काही सुचेना. काही सुधरेना. बाहेर पडायची वेळ समीप येत चालली होती. माझी अजून काहीच तयारी झालेली नव्हती. बुरखा असाच पांघरला होता...आणि तेव्हढ्यात बाहेर नजर गेली. खूप उशीर झाला होता. त्याच क्षणाची गरज होती. मला बाहेर पडायला हवेच होते. मी पूर्ण बुरखा पांघरला. तसाच बाहेर पडलो. अंधारात मिसळून गेलो. ह्याची मजा देखील काही औरच. आजूबाजूला आसमंतात नजर टाकली. रोजचे चेहेरे दिसत होते परंतु मी कोणालाच दिसत नव्हतो.
आणि मग एक दिवस...
...तो दिवस चौदाव्या चेहेऱ्याचा होता. मी बाहेर पडलो होतो. नित्याचा फेरफटका मारत होतो. पाय मोकळे होत होते. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहेरे. त्यात माझाही एक वेगळा चेहेरा. स्वत:वर आता मी खुष होतो. एका झाडामागे असाच थोडा थांबलो. रेंगाळलो. वारा वाहत होता. भिरभिरत एक कागद झाडापाशी येऊन थबकला. माझी नजर पडली. काही अभ्यासाचा कागद होता. मी वाचू लागलो. सरसर. कागद पुन्हा वाऱ्याचा हात पकडायच्या आत संपवणे भाग होते. ती काही माहिती होती...कुठल्या रोगाची. मानसिक रोगाची. एक स्त्री आणि तिची १६ व्यक्तिमत्व! Schizophrenia! कोणी मुलगी होती....वेगेवेगळी नावे धारण करून...वेगवेगळे वेष परिधान करून...विविध रूपे धारण करून...म्हणजे माझ्यासारखी....म्हणजे? पण हा रोग मला लागला? कधी? हे मी काय केलं? मी, स्क्रिझोफ्रेनिक? हो...मी देखील १५ रूपे धारण केली...लोकांमध्ये नाना कला घेऊन फिरलो....हो....मी स्क्रिझोफ्रेनिक बनलो....माझ्या नकळत मी ह्या रोगाचा शिकार झालो. पाणी वाहू लागलं....धो धो....कित्येक वर्षांनी मी हा असा मनमोकळा रडलो. माणूस सैरावैरा धावू लागला ....पावसाळा कधीच संपलेला होता.
मी पूर्ण रात्र वाट फुटेल तसा फिरत होतो. नव्हते कळत, काय करावे...कसा आणि कधी परतलो...कोण जाणे.
दुसरा दिवस...विचार करण्यात गेला. कोंडून घेतलं. केस पिंजारले...भकास झालो....कधीतरी बाहेर पडलो. आज आरशात बघायचे मात्र विसरलो. माहित होतं...रडून..आसवं गाळून काय होणार होतं दुसरं? पडलो बाहेर. एकटं बसून वेड लागायची पाळी आली होती. एकांतवास भुतं नाचवत होता.
तो महिना पौष होता. मी समुद्रापाशी जाऊन विसावलो. मन थकलेलं. शरीर? मी पाण्यात डोकावलो. आणि... मला काय दिसले? माझे प्रतिबिंब समुद्राच्या पार तीराशी पोचले होते....पार किनाऱ्यापाशी....ते बघितलं...मी तर सुंदर दिसत होतो! हसलो....कसनुसं हसू आलं चेहेऱ्यावर. का बरं पुन्हां डोळे भरले? मी सुंदर दिसत होतो....मी आज सुंदर दिसणारच होतो....आज शाकंभरी पौर्णिमा होती. पण कोणी बघत होते काय? कोणाला जाण होती काय? मी हा असा सडाफटींग...१५ व्यक्तिमत्वाचा स्क्रिझोफ्रेनिक... येतो आणि जातो....आता मी काय ह्या माणसासाठी सोळावे रूप धारण करू? काय करू मी आता की हा माणूस माझी जाण ठेवेल...कधी हा माझ्याकडे डोळे भरून पाहिल? कधी तो मला डोळा समावून घेईल? माझे डोळे आता पुन्हा भरले....टीप टीप अश्रू पडू लागले. प्रेमात, भान हरपून एकमेकांच्या कुशीत, किनाऱ्याशी विसावलेले दोन जीव...माझ्याकडे बघू लागले. त्याने ताल धरला...."तोच चंद्रमा नभात...तीच चैत्र यामिनी...एकांती मज समीप..."
मी पंधरा वेडा...आणि मला साथ द्यायला हे दुसरे वेडे....
चालायचंच...वेड्याला साथ वेड्यांची.
इस्पितळ...वेड्यांचे इस्पितळ...
आणि शहाण्यांची, ही आंधळी जगरहाटी...
'सिबिल' हा सिनेमा बघितला आणि हे डोक्यात आलं.
22 comments:
अप्रतिम !
त्याच्या `कलां'ची स्क्रिझोफ्रेनिया शी केलेली तुलना ` न भूतो भविष्यती' !!
ती पण त्याच्या सौंदर्याला गालबोट न लावता ....!! खूपच छान !!
या पूर्वी अशा प्रकारे त्याच्या `कलां'बाबत लिहिले गेल्याचे वाचनात नाही .
या लेखात तुझ्या लिखाणाने एक नवी उंची, स्तर गाठल्याचे जाणवतेय .
खूप आवडलाय लेख हा !!
काय.... काय द्यावी प्रतिक्रिया. वाह रे वाह. अशक्य... मला शब्दच नाही सुचत्येत. गप्पगार... ब्बास्स... वाचत रहावं...
आभार राजीव.
एका वेगळ्या प्रकारे लिहायचा प्रयत्न केलेला आहे...
तुम्हाला आवडलं...आनंद झाला.
:)
सौरभ बुवा...!?
आभार! :)
sundarach thought :) thanks for personALLY explaining it :)
थांब हं जरा मे आरशात पहुन माझं चित्र काढुन ठेवतो. :) कल्पना छान आहे,. आयला मी पण वैतगलो आहे या रोजच्या रुटीन कामाला.
हे म्हणजे भन्नाटच आहे ! एकदम झक्कास लिहिलंस गं ! म्हणजे कसं माहित आहे, वाचताना त्यातला "तो" स्वतःच समजुन वाचत होतो.!
अरे वा! ही तर मला एकदम मोठीच शाबासकी दीपक! आभार! :)
आभार मला मानायला हवेत आपले मॅडम! असं काही तरी भन्नाट लिहितेस आणि मग आपसुक का होईना मला कधीतरी स्वतःमध्ये डोकावण्याची संधी मिळते! :)
अप्रतिमच! ही पोस्ट अतिशय भावली !!
मी पंधरा वेडा...आणि मला साथ द्यायला हे दुसरे वेडे.... तुलना व उपमा सहीच!
राजीवशी सहमत.
आभार गं भाग्यश्री! :)
प्रामाणिकपणे सांगायचं तर आधी नीट कळलं नाही काही. मग तू दिलेला सिबीलचा विकी वाचून आलो.. मग एकदम आवडलं लिखाण.. मस्तच.. वेगळं एकदम.. खूप सही..
रच्याक, जमलं तर आयडेंटिटी बघ.. थोडीशी अशीच कल्पना.. पण स्क्रिझोफ्रेनिया वगैरे काही नाही.. वेगळा मानसिक रोग..
http://www.imdb.com/title/tt0309698/
मला फारशी कळली नाही, पण प्रचंड आवडली मात्र...
आता सिबिल सिनेमा बघायचाच्च्च्च्च आहे!!!!!
विद्याधर, मला हे वाटलं होतं कि पोस्ट थोडी कठीण जाईल. पण चंद्राच्या रोजच्या वेगळ्या कला आणि स्क्रिझोफ्रेनिया ह्यात कल्पनांचे साम्य जाणवले...आणि मग लिखाण सुरु केले.
डोक्यात ठेवलं होतं कि एकदा शेवट वाचल्यावर कल्पना कळेल आणि मग पुन्हा वाचून त्यात आनंद मिळेल.
तुला पोस्ट आवडली...मला आनंद झाला :)
हेरंब, आभार आभार! :)
नक्की बघेन- आयडेंटिटी!
भन्नाट ..
शब्दच नाहीत माझ्याकडे
आभार बंड्या. :)
मस्तच! अर्धा लेख वाचेपर्यंत कळलं हे कुणाचं प्रथमपुरूषी निवेदन आहे ते.तरीही शेवटपर्यंत वाचावसं वाटत राहिलं कारण तुझी शैली अनघा.सिझोफ्रेनियाचं हे परिमाण मला अगदी अभिनवच वाटलं.छान! असं लिखाण या माध्यमात दुर्मिळ आहे.
विनायक, तू कालपासून काही बोलला नाहीस तर मला जरा प्रश्र्नच पडला होता! आवडलं कि नाही!? :)
आभार प्रतिक्रियेबद्दल.
तू म्हणालीस त्याप्रमाणे पुन्हा वाचली मी पोस्ट...
खरंच आता जास्त कळली :)
ह्या सिबिलची सीडी-डीव्हिडी मिळते काय गं इझिली?
:) विद्याधर, कल्पना नाही. चौकशी करायला हवी. पण तू मिळवंच. पुस्तक देखील आहे त्या केसवर.
या पोस्टसाठी हेरंब आणि बाबाला +१ नाही :)
मला जाम आवडली ही पोस्ट...
>>>त्याच्या `कलां'ची स्क्रिझोफ्रेनिया शी केलेली तुलना ` न भूतो भविष्यती' !!
ती पण त्याच्या सौंदर्याला गालबोट न लावता ....!! खूपच छान !!
ही कमेंट लिहीली गेलीये आधिच मी अजून काय लिहू... अप्रतिम!!!
लिहीत रहा गं.. तुझे लेखन हे आमचे औषध आहे..
मला कित्ती आनंद झाला तन्वी हे वाचून! :) :)
खूप खूप आभार!!!
हा ब्लॉग हे माझं औषध आहे गं!
:)
Post a Comment