नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 19 January 2011

अहं! अहं? अहं!!

असं आहे कि हा प्रवास आहे. जीवनाचा. लिफ्टसारखा. वरवर नेणारा. ही लिफ्ट कळ नसलेली. कोणाचाच ताबा नसलेली लिफ्ट. कुठे थांबणार...कोण उतरणार...कोणाला ना थांग ना पत्ता. पण ठरलेला मजला आला की जो तो उतरून मात्र नक्की जाणार. न सांगता न निरोप घेता. चालायचंच. प्रवासाचे नियमच वेगळे असतात. जशी अनोळखी लोकं आगमन करतात. तसेच जवळचे, ओळखीचे त्यांच्या त्यांच्या मजल्यावर उतरून जातात. परत फिरून न येण्यासाठी. कधी नव्या गाठीभेटी. तर कधी नुसत्याच नजरभेटी. एखादं स्मित हास्य. ना हा प्रवास टाळता येत. ना प्रवाश्यांची आवकजावक बदलता येत.

अश्याच ह्या माझ्या प्रवासातले हे माझे तीन अनुभव. पुरुष नामक जातीच्या 'अहं' संदर्भातील.
कधी हा अहं जसा ताठ माड तर कधी जशी नाजूक हिरवीकंच केळ.

दुपारचा साधारण एक वाजत आला होता. नागपूरच्या विमानतळावर उतरून पुढे चार तासांच्या अंतरावरील एका मध्यम आर्थिक परिस्थितील गावात पोचलो होतो. मी, छायाचित्रकार आणि त्याचे ३ सहकारी. दिवस पहिला होता. पुढचे तीन दिवस शूट चालणार होतं. आणि त्या शूटसाठीची जागा आणि मॉडेल्स गावातील फेरफटक्यावर ठरणार होती. मॉडेल्स असणार होते खरेखुरे शेतकरी आणि त्यांची बायकापोरं. क्लायंटचे, गावातील कर्मचारी, श्री. महाले ह्यांनी आधी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती. शेतकरी बांधवांतून मला निवड करावयाची होती. जसजसे शेतकरी समोर येत होते, मी माझ्या साध्या कॅमेरावर त्यांचे पासपोर्ट धर्तीचे फोटो काढत होते. त्यामुळे इतकेच साध्य होत होते की मला तिथल्या तिथे शेतकऱ्यांना नकार द्यावयास लागत नव्हता. जरी महिना नोव्हेंबर असला तरी देखील सूर्य माथ्यावर तळपती शरवृष्टी करतच होता.
"मॅडम"
"हं, महाले?"
"हे साहेब आलेत. त्यांचा उद्या फोटो काढूचया आपण."
मी महाल्यांच्या मागे नजर टाकली. दुचाकीवर एक ४०-४५ दरम्यानचे गृहस्थ बसलेले होते. डोळ्यांवर चष्मा, त्यातून दिसून येणारे पिवळट डोळे, घट्ट पिना मारलेले ओठ, जश्या काही असंख्य टाचण्या उलट्या करून ठेवाव्यात तसे अस्ताव्यस्त दाढीचे खुंट. न हसणारा व उगाच डोळ्यांना डोळे भिडवणारा चौकोनी चेहेरा. महाल्यांच्या हावभावावरून ही गावातील कोणी बऱ्यापैकी मोठी असामी दिसत होती. आणि मी त्यांना नकार देऊन दुखवू नये ही आज्ञा महाल्यांच्या विनंतीत छुपलेली जाणवत होती.
"ठीक. करुया. साहेब, कृपा करून उद्या येताना दाढी करून याल का?" माझी विनंती.
दुचाकी गुरगुरली. साहेब निघून गेले.
दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजताची वेळ साहेबांना दिली होती. सव्वा तीनच्या सुमारास आधी कानावर डरकाळी आली आणि मग साहेब समोर येऊन उभे राहिले. कालच्या आणि आजच्या परिस्थितीत काही फरक नव्हता. टाचण्या तश्याच विखुरलेल्या होत्या. त्यामुळे अस्वच्छ दिसणारा चेहेरा आणि तेच उद्दाम भाव कायम. आता? आमचे ऑफिसमधील 'इमेज वर्क' करणारे दीपक नजरेसमोर तरळले. "काय ग ए बाई! ह्याला दाढी करून यायला सांगता आलं नाही तुला? मी इथे बसून आता काय दाढी करू ह्याची?! फोटोशॉपमुळे तुम्ही क्रिएटीव्ह लोकं ना फार बेजबाबदार झालायत!!" कानावर दीपकचा आवाज आदळला. इतर चित्रीकरण चालू ठेवलं. साहेबांकडे दुर्लक्ष केलं...बाईने दुर्लक्ष केलं! अहंकाराला ठेच गेली. महाल्यांच्या 'अहं' फुग्यालाही नकळत छिद्र पडलं. साहेबांच्या भावना दुखावल्या. मी पुन्हा मुंबईत ऑफिसला पोहोचायच्या आधीच आमच्या ऑफिसमध्ये क्लायंटकडून तक्रार नोंदवली गेली. गावात एजन्सीने शेतकऱ्यांना नीट वागणूक दिली नाही. तिथलेच दुसरे कुटुंब...श्री. बुखाडे. त्यांच्या कुटुंबाने, आवर्जून भरलेली माझी ओटी श्रीयुत महाले विसरून गेले बहुधा. एजन्सीकडून क्लायंटकडे उत्तर गेलं." When Anagha is concern, we don't think any misbehavior can occur."

महाले आणि साहेब.
अहं? तीव्र.

दुसरा अनुभव. प्रत्येक भारतीय मनातील ही जुनीच ओळख. साक्षात गुलजार. समोर उभे. दुपारची वेळ. वांद्रा येथील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात ठरलेल्या वेळी आम्हीं पोचलो होतो. मी व माझी जीवश्च कंठश्च मैत्रिण आणि फिल्म दिग्दर्शक वंदना. त्यांच्या लाडक्या लेकीच्या खोलीत आम्ही उभे. १२ बाय १२ ची खोली. भरपूर प्रकाशाची. मंचामागे खिडक्या. समोर उजव्या हाताला कोपऱ्यात पायऱ्या. निमुळता, सात आठ पायऱ्यांचा जिना. छायाचित्रण मुव्ही कॅमेऱ्यावर होतं. शॉट वंदनाला आखायचा होता. बाईंच्या सुपीक डोक्यात काही शिजू लागलं. "गुलजारजी, क्या आप इन सीढ़ीयों पे बैठ जाओगे? यहाँ मै मेरा कॅमेरा रखुँगी. और फिर हम बातचीत करेंगे. है ना?"
मी एकदम कानकोंडी. मान खाली वगैरे.
"हां हां.. क्यों नही? वैसे भी
हमने कभी यहाँ बैठके तस्वीरें नहीं खींची! अच्छी कल्पना है आपकी."
साईसारखा मऊ आवाज कानी पडला. हळूच वर बघितलं. चेहेऱ्यावर
स्मितहास्य आणि शरीरावर पांढरा शुभ्र कुर्ता परिधान केलेले गुलजारजी पायऱ्यांवर विसावले देखील होते. आणि मग पुढील अर्धा तास ते लाखमोलाचे शब्द, कान तृप्त होऊन ऐकत राहावं असे.

गुलजार.
अहं? मृदू.
समोर येणारा प्रत्येक मनुष्य हा एकाच पातळीवर आणि तो सुद्धा त्यांच्याच पायरीवर. दुणं
दूजं? शून्य!

आता तिसरा सहप्रवासी. तासाभराचा एकत्र प्रवास.
गणपतीचे दिवस. नाना पाटेकरचे वास्तव्य त्याच्या माहीमच्या घरी. एका शूटसाठी तिथे पोचलो. फुलांचा घमघमाट सर्वत्र. गणपती देखील त्यात बुडालेला. प्रसन्न वातावरण. नाना, लालबागच्या गणपतीला दर्शन देण्यासाठी गेले होते. आम्हीं तासभर थांबलो. टॅक्सीतून उतरून नाना तरातरा गणपतीपाशी उभे. फुलांची बाकी राहिलेली सजावट चालू. आमचे मास्तर त्यांचे मित्र. मग मित्रद्वयीच्या गप्पा चालू. मध्येच मास्तरांना बाजूला शांत उभी असलेली मी दिसले.
"नाना, हिच्या बाबांचं खूप मोठं
पुस्तकांचं कलेक्शन आहे, बरं का? किती आहेत गं आसपास?"
नाना नजर फक्त फुलं आणि गणपती.
"हल्लीच मोजदाद केली. सुमारे साडे चार हजार आहेत." भाबडं उत्तर.
"हो? मोजलीस?
हे मला सांगितलंस, आणि कोणाला बोलू नकोस! पुस्तकं वाचायची सोडून मोजलीस म्हणून!"
एक बिन आवाजाची कानफटात!
"नाही म्हणजे, बाबांचे विषय मला नाही कळत!"
पुढे दुर्लक्ष. फक्त गणपती आणि पिवळा धमक ताजा ताजा झेंडू बिं
डू. तास उलटला.
"हं आता बोला. काय करायचंय?"
गजाननाची सजावट संपली होती. आता पुढचा काही वेळ आमचा होता. किती? कोण जाणे. त्या सुवासिक खोलीतून बाहेर आलो.
बाहेरची खोली अंधारलेली. नाना कोपऱ्यातील पलंगावर बसले. खिड़की मागे. नानांच्या चेहेऱ्यावर प्रकाश? शून्य. सावळा चेहेरा अधिकच अंधारलेला. बाजूला उभ्या असलेल्या फोटोग्राफर मित्राची, रोहितची, चुळबूळ सुरू.
"अगं, त्यांना सांग ना जरा बाहेर पडवीत बसायला. इथे खूप काळोख आहे गं. नाही येणार फोटो बरोबर."
हे म्हणजे कठीणच. वाघाच्या जबड्यात हात वगैरे.
"गपचूप काढ रे आता!
आपण फोटोशॉप मध्ये उजळू त्यांना नंतर!" सगळं कसं कुजूबुजू.
"अरे! तू विचारून तर बघ ना!"
"नाना..."
भुवया उंचावल्या गेल्या.
"नाना, तुम्ही बाहेर पडवीत बसता का? तिथे ना जास्त उजेड आहे!" इथे काळोख आहे म्हणण्यापेक्षा तिथे कसा जास्त उजेड आहे हे म्हणणे बरे नव्हे काय?
टोपीवाले नाना अजूनच पलंगावर मागे सरकले. पाय वर घेऊन बस्तानच ठोकलं. अगदी आत बसलेल्या गणपतीसारखेच.
"मी इथेच हा असाच बसणार! काढायचं तर काढा!"

नाना पाटेकर.
अहं?
अगदी अगदी! ताडमाड!

अशी ही तीन अहं झाडे.
माझ्या जीवनाच्या प्रवासात भेटलेली.
एक
अहं, जसं काटेरी रानटी, नकोसं झाड.
एक
अहं, जशी मृदू आपलेपण लगडलेली केळ.
एक
अहं, अरेरावीचा जसा णगट वटवृक्ष. जटा खोल रुतवून. अढळ.

33 comments:

Raindrop said...

aha what observation and what lovely metaphors in the end. Kharach ekdum tasech aahet na te loka. Tujhya life chya goshti mhanje ek ek texbook che dhade :) am glad to have been a part of that journey. keep blogging :)

Soumitra said...

अशी ही तीन अहं झाडे.
माझ्या जीवनाच्या प्रवासात भेटलेली.
एक अहं, जसं काटेरी रानटी, नकोसं झाड.
एक अहं, जशी मृदू आपलेपण लगडलेली केळ.
एक अहं, अरेरावीचा जसा दणगट वटवृक्ष. जटा खोल रुतवून. अढळ.
Shevtchi Punch line ekdum mastch ahe barech divasni blog vachun bar vatle, 3 different personalities but one perception, observation & expression of Anagha . Keep it Up Anagha

Anagha said...

आभार सौमित्र. तुलाही वेगवेगळी लोकं अनुभवायला मिळतच असतील, नाही का? तुझ्या शूटच्या दरम्यान. :)

Anagha said...

वंदू, :) 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ!' असेच आहे नाही का आपले?! :p

सौरभ said...

वाह वाह वाह.. अगदी त्या तिघांना समोर बसवून ओळख करुन दिल्यासारखं चितारलं आहे. कसलं भारी!!! बरंय अशी माणसं अशी वेगवेगळी असतात. एकसारखी असती तर किती बोर वाटलं असतं. :)

विनायक पंडित said...

पोस्ट आवडली अनघा.अहं उलगडून दाखवलेस.पुन्हा ते काव्यात्म शैलीत आणि ती शैलीही वेगळी न जाणवता.क्या बात है!अहं पटले मला!

Anagha said...

:) हे बरिक खरं हा सौरभ! माणसं वेगवेगळी असतात हे बरं. एक छाप नाही. प्रिंट मारल्यासारखी! :)

Anagha said...

धन्यवाद विनायक. असे विविध पैलू आपोआप मनात ठसा उमटवून जातात. नाही का? :)

Gouri said...

अग आज पुन्हा ब्लॉगविश्वाकडे बघायची संधी मिळाली ... अजून नुसतं चाळलंय ... पण खूप काय काय सुंदर लिहिलं आहेस तू गेल्या दोन महिन्यात! आता बसून निवांत वाचते.

Anagha said...

गौरी, मी पण तुला प्रत्येक पोस्टच्या वेळी miss केलं....मनापासून.

हेरंब said...

खरंय.. एकाच अहं चे तीन प्रकार. आणि तू मांडलेसही एकदम मस्त. तुझ्या खास ओघवत्या शैलीत.

गुलजारचा अहं आपल्या लौकिक अहं च्या व्याख्येपासून शेकडो मैल दूर तर नानाचा अहं अहं असूनही तसा वाटला मात्र नाही. कदाचित नानावरच्या आंधळ्या प्रेमामुळे :D

भानस said...

वा! तिनही अहंचा त्यांच्या त्यांच्या प्रकृतिशी प्रामाणिक प्रवास आहे हा, :) तुझे अवलोकन आणि समोरुन पाहणार्‍याच्या नजरेतून वाटणारे ते भावले.

या तिनही चेहर्‍यांच्या आड जीवनाचे प्रचंड अनुभव दडलेत. त्यातून घडत गेलेले ते आज आपल्या समोर असे दिसतात, खरेखुरे ते कसे आहेत हे फक्त तेच जाणोत.

Anagha said...

:) आंधळं प्रेम आमचं पण आहे हेरंब बुवा. पण अहं तो अहंच!

Anagha said...

खरं आहे ते भाग्यश्री.
आणि गुलजार आणि नानाच्या बाबतीत ते जसे आत आहेत तसेच बाहेर दिसतात...आणि म्हणून तर ते आपल्याला इतके भावतात. :)

THEPROPHET said...

माझं पर्सनल फेव्हरेट
>>नाना, लालबागच्या गणपतीला दर्शन देण्यासाठी गेले होते
लोळालोळीमॅक्स होतं हे!!! :D:D:D
बाकी पोस्टसुद्धा आवडली मला :)

Yogesh said...

पोस्ट आवडली....तिन्हीपण अहं खुप सुंदर रेखाटले आहेत.... एक काटेरी तर दुसरी मृदु अन तिसरी दणगट.....या तिन्ही प्रकृति नक्की कशा घडल्या असतील?? यांना त्यांच्या समोर येत गेलेल्या परिस्थितीने घडवल की मुळातच अशा असतील..

Anagha said...

:D विद्याधर, नानाचा वावर असाच तर असतो...कुठेही असो! राजा! :)
आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

योगेश, नाना आणि गुलजारजींच्या बाबतीत वाटतं कि हे त्यांच्या रक्तातच (I mean, genes) असावं.
आणि गावातील साहेबांचे कदाचित 'संस्कार व परिस्थिती' अधिक वरचढ असतील!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

सारिका said...

मला तर बुवा..गुलजार जास्त आवडले...तू लिहिलेले...

छान लिहिलं आहेस..

Anagha said...

:) खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे ते. देवमाणूस. आणि अशी माणसं कुठे बघायला मिळतात हल्ली. कर्तुत्वाने जितकी मोठी तितकीच मनाने थोर.
आभार गं सारिका. :)

juikalelkar said...

अनघा फारच सुरेख. तुझ्या लिखाणात दिवसेंदिवस खुपच प्रगल्भता येत आहे.
अहं ..... थोडाफार प्रमाणात तो सर्वानाच असतो. मला वाटते तो कुठल्या वातावरणात निर्माण झालाय त्यावर त्याची तीव्रता कमीजास्त
प्रमाणात असावी. मला तर बुवा तुझे तीनही अहं चे प्रकार आवडले.
तीव्र , मृदु आणि राकट .......

panda said...

अतिशय सुरेख वर्णन !!! अगदी तिन्ही व्यक्ती समोर बसलेले वाटले. गुलझार साहेब आणि नाना तर फारच आवडले.
"गावातील साहेबांचे कदाचित 'संस्कार व परिस्थिती' अधिक वरचढ असतील!" हे मात्र नक्की...मी घरी जातो तेंव्हा मला असे साहेब गल्लोगल्ली भेटतात. आता तर सवय झालीये.

Anagha said...

आभार ग जुई! :)

Anagha said...

पंकज, धन्यवाद! :)
खरंच..पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या माणसांचे प्रमाण वाढते आहे.

Raindrop said...

on a lighter note....the title sounds like the gentle cough madhuri dixit uses to get one man's (salmans) attention in 'hum aapke hain kaun' ;)

and our madhuri does ahm ahm ahm to get our attention three men...not a bad score haan ;)

rajiv said...

raindrop + 1

Anagha said...

hehehe!!! Vandu! :D

BinaryBandya™ said...

छान लिहिलं आहेस..

Anagha said...

आभार बंड्या :)

Shriraj said...

मस्त वाटलं पुरुषांचे ३ वेग-वेगळे रंग वाचून :)

Anagha said...

आलात वाटतं गावाहून परत ? धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. :)

नीरजा पटवर्धन said...

पहिला अहं... प्रत्येक काम करणाऱ्या बाईच्या वाट्याला वेगवेगळ्या स्वरूपात येणाराच गं. तुझ्याऐवजी बाप्या असता एखादा तर अनुभव वेगळा असता.
बाकी गुलजार... :)
आणि नाना इज नाना... हे सगळं त्यालाच शोभतं.. :)

Anagha said...

अगदी नीरजा... अगदी खरंय...कदाचित बाप्या असता तर ते गावचे बुवा वेगळे वागले असते! आणि नानाला हे सगळं अगदी शोभून दिसतं...आणि मग अधिकच आवडायला लागतो तो! :p